Tuesday, December 21, 2021

प्रेम करूया स्वतःवर...

प्रेम करूया स्वतःवर.... स्वतःबद्दल काही ना काही तक्रारी असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या अवतीभवती आपण बघत असतो... कुणाला त्यांचा जन्म गरीब घरात झाला याचा खेद असतो,कुणाला आपला रंग गोरा नाही म्हणून दुःख असते तर कुणी अजून काही ना काही कारणाने स्वतःला कमनशिबी समजत असतो.... खरं तर सृष्टीने माणसाला खूप काही दिलेले असते;पण अनेकांना त्याची जाणीवच नसते. पायी चालणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे सायकल नाही म्हणून दुःख वाटते तर ज्याच्याकडे सायकल आहे तो बाईक नाही म्हणून चिडचिड करत जगत असतो. बाईक असणारा कार नाही म्हणून रडत असतो.प्रत्येकाला आपल्याकडे जे आहे याबद्दल काहीच वाटत नाही परंतु जे नाही त्याचे मात्र दुःख असते!अशी छोट्या छोट्या दुःखांची गाठोडी बाळगत माणूस जगत असतो. तशा अर्थाने माणूस कधीच जीवनाच्या कोणत्याच आघाडीवर समाधानी नसतो.त्याची हाव कधीच संपत नाही आणि मग तो स्वतःचा द्वेष करायला लागतो... माझं नशीबच फुटकं, मी असा असतो तर यंव केलं असतं आणि तसा असतो तर त्यांव केलं असतं असा बडबडत रहातो.स्वतःला,ज्या कुटुंबात जन्म घेतला त्या कुटुंबाला,समाजाला, देशाला दोष देत रहातो. याचे कारण माणसाला त्याच्यातल्या सामर्थ्याची जाणीव नसणे हे आहे.स्वतःवर, स्वतःच्या आयुष्यावर प्रेम नसणारी अशी अनेक माणसे आपण आजूबाजूला वावरत असलेली पाहतो. खरं तर प्रत्येक व्यक्ती जन्मत: खूप गुणांनी परिपूर्ण असते, प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठली ना कुठली उपजत कला असते, कुणी गाण्याचा गळा घेऊन आलेला असतो,कुणी चित्रकलेत पारंगत असतो... आपल्याला आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टींचे वरदान मिळालेले असते.आपल्याकडे खूप अंगचे गुण असतात,आजूबाजूला अनेक गुणवान माणसे असतात पण आपल्याला याची जाणीवच नसते आपल्याला असलेल्या अनुकूल परिस्थितीचे भान नसते आणि आपण या गोष्टींबाबत कधी गंभीरही नसतो.आपले सगळे लक्ष आसपासच्या सकारात्मक बाबींपेक्षा नकारात्मक गोष्टींकडे एकवटलेले असते.अशा नकारात्मक मनस्थितीचा एकूण जगण्यावरच वाईट परिणाम होत रहातो कलागुणांची,सृष्टीने भरभरून दिलेल्या वरदानांची त्या त्या व्यक्तीला जाणीव नसते त्यामुळे प्रथम प्रत्येकाने स्वतःला ओळखायला हवे.यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा वास्तव स्वीकार! यासाठी प्रत्येकाने आपले सामर्थ्य ओळखायला हवे.. "मी जसा आहे, जेथे आहे तसा स्वतःचा स्वीकार करतो.मी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करतो, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे" अशी भावना जोपासली तरच प्रत्येकजण स्वतःला ओळखू शकेल... 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...' मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले हे गीत मला त्यामुळेच खूप म्हणजे खूप आवडते. माणूस संवेदनशील कधी असतो? माणसाच्या हृदयात करुणा दयाभावना कधी जिवंत असते? माणूस स्वतःवर प्रेम करत असेल तरच तो इत्तरांप्रती प्रेमळ वागू बोलू शकतो. संवेदनशीलता हा प्रेमळ, दयाळू व्यक्तीचा स्थायीभाव असतो,असायला हवा... एकदा का स्वतःवर प्रेम करता आले की माणूस आयुष्यातले छोटे छोटे क्षण साजरे करायला लागतो.त्याच्या मनात सतत असेच विचार येतात.... असे मिळाले आनंदी मानव जीवन कोमल हृदय संवेदनशील सुमन! ब्रम्हांडाने दिले मनोभावे जे मागिले सुबुद्धी समृद्धी अन नियमित धन! गर्द ही हिरवाई पाणी हवा मोकळी आरोग्यसंपदा अशी मिळाली कायम! माणुसकीचा अती सुंदर हा वारसा जाणू शकतो परपीडा दु:खी मन! माया ममता साथ ही जिवलगांची कोण पेरते जीवनी प्रसन्न हे क्षण! भल्याबुऱ्या प्रसंगी अचानक त्या शक्ती मिळते मम मनास कोठून? सृष्टीचक्र नियतीचे अविरत फिरते कधी इंद्रधनुचा देखावा विलक्षण! अबोध अशा त्या शक्तीला त्या सृष्टीला सांज सकाळी कृतज्ञतापूर्वक वंदन! तेव्हा प्रेम करायला हवे स्वतःवर आणि इत्तरांवरही! .....© प्रल्हाद दुधाळ.पुणे 9423012020

साथ सावलीची...

साथ सावलीची.... हिंदू धर्मात एकूण सोळा संस्कार सांगितले आहेत. या संस्कारात विवाह अर्थात लग्न संस्कार हा एक महत्वाचा संस्कार आहे.या संस्काराचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन वेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या संस्कारात वाढलेले ते दोघे पती आणि पत्नी रूपाने सप्तपदी चालतात आणि आयुष्यभर एकमेकाला साथ देण्याची शपथ घेतात! कोणत्याही विवाहाचे यश हे दोघांनी सप्तपदीत दिल्या घेतल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत यावर आहे. पती आणि पत्नी ही संसाराच्या गाड्यांची दोन चाके आहेत असे म्हटले जाते ते यासाठीच! लग्न झाले की वधू आपल्या आईवडिलांचे घर सोडून पतीच्या घरी रहायला येते.आत्तापर्यंत आईवडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेली ती नव्या घरात येते आणि आता तिने हे नवे घर आपलेसे करावे,तिथल्या लोकांना जसे सासू ,सासरे,दिर,नणंदा तसेच चुलत नात्यातली सगळी माणसे आपली मानावी,त्यांचे सुख ते आपले सुख मानावे त्या घराचे दुःख ते आपले दुःख मानून जबाबदारी निभावावी असे आपले संस्कार सांगतात.एखाद्या जोडप्याचे सहजीवन जर यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी दोन्ही जोडीदारांनी एकमेकाला मनापासून साथ असायला हवी.एकमेकांना समजून घेणे,जोडीदाराच्या गुणांबरोबर दोषांचाही स्वीकार करणे,एकमेकांच्या आनंदात सहभागाबरोबरच दुःखाच्या प्रसंगीसुध्दा एकमेकांस आधार देणे या गोष्टी मनःपूर्वक केल्या तरच जोडप्याचे सहजीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल... संसार यशस्वी होण्यासाठी पतीने बाहेरच्या सर्व जबाबदाऱ्या जसे आवश्यक असलेले धनार्जन करण्यासाठी योग्य असा नोकरी धंदा करणे, कुटुंबाच्या पालनपोषण व सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची व्यवस्था करणे इत्यादी जबाबदाऱ्या निभावणे आवश्यक आहे असे पूर्वी म्हटले जाई,परंतु आधुनिक काळात शिक्षण प्रसारामुळे पत्नीही सुविद्य असते घरातल्या जबाबदाऱ्या घेण्याबरोबरच ती सुध्दा अर्थार्जनासाठी बाहेर पडते.आपली नोकरी व्यवसाय पूर्ण कार्यक्षमतेने चालवणे या बरोबरच घरच्या पारंपरिक जबाबदाऱ्याही ती लीलया पेलताना दिसते. कुटुंबासाठी अर्थार्जन करण्यात आता तिचा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे पत्नीबरोबरच पतीच्या जबाबदारीतही नक्कीच वाढ झालेली आहे हे प्रत्येक पतीने समजून घ्यायला हवे. पूर्वी पत्नीचे कार्यक्षेत्र हे चूल आणि मुल एवढेच मर्यादित होते.घरातल्या निर्णय प्रक्रियेत तिचा सहभाग क्वचितच असायचा;पण आता काळ बदलला आहे त्यामुळे आजच्या काळात पत्नीनेही घरातल्या आर्थिक सामाजिक बाबीत जबाबदारी निभावणे आवश्यक आहे. आज स्री पुरुष समानतेचे युग आहे त्यामुळे पत्नीने आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी आणि समजासाठीही कसा करता येईल हे पहाणे आवश्यक झाले आहे. नवरा आणि बायको यांची सावलीसारखी साथ एकमेकांना मिळाली तर घरात सुख समृध्दी आणि आनंद ओसंडून वाहत रहातो... पतीपत्नी मधले नाते आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारी माझी एक कविता.... एक गंमत सांगू तुला?जगणं आहे सुंदरशी कला! तुटेल एवढं ताणायचं नसतं,उसवलं तर नातं विणायचं असतं! एक गंमत सांगू तुला? जगणं म्हणजे अधांतरी झूला! धोक्यांनी डगमगायचं नसतं,एकमेकांना सावरायचं असतं! एक गंमत सांगू तुला?जगणं असावं रंगमंच खुला! मुखवट्यांना भुलायचं नसतं,चेह-यांना ओळखायचं असतं! एक गंमत सांगू तुला? स्वत:तच बघ मला! एकमेकात उणं बघायचं नसतं,सूर जुळवत जीवनगाणं गायचं असतं! बरोबर ना? ......©प्रल्हाद दुधाळ. 9423012020

Wednesday, December 15, 2021

लयाला चाललेल्या लोककला...

लयाला चाललेली लोककला... माझे लहानपण गावाकडे गेले आहे.थोडेफार समजायला लागले तेव्हापासून विविध लोककलांना मिळत असलेला लोकाश्रय अगदी जवळून पाहिला आहे.लोककलावंतांना सन्मान दिला जाई.दर एकादशीच्या दिवशी गावातील गोंधळी गावदैवत आणि पांडुरंगाची भजने त्याच्या डवराच्या तालावर प्रत्येक दरवाजावर येऊन म्हणायचा आणि आयाबायानी घातलेल्या शिध्याने त्याची झोळी भरून जायची. नवरात्राच्या नऊ दिवसात ग्रामदैवत भैरवनाथाच्या पायावर आपली सेवा रुजू करायला काही ठराविक कलावंतीण यायच्या.कोल्हाटी समाजातील या कलावंतीनी दर वर्षी न चुकता नवरात्रीत हजर व्हायच्या.रोज रात्री पायात घुंगरू बांधून त्यांचे पाय ढोलकीच्या तालावर थिरकत असायचे.या कलावंतीना दौलतजादा करायला गावातले प्रतिष्ठित हजर असलेले आठवतात... एकदा सुगी सुरु झाली की काढणी मळणी उपणनी अशी कामे सुरू व्हायची.सगळे कुटुंब खळ्यावर कामासाठी उपस्थित असायचे.या सीझनला वासुदेव, पिंगळा, कुडमुडे जोशी, नंदिवाले असे लोककलाकार दारावर अथवा खळ्यावर हमखास हजेरी लावून जात.पिकलेल्या पिकातून सुपभर अशा कलावंतांच्या झोळीत ओतले जाई आणि भरभरून आशीर्वाद देऊन ही मंडळी जायची. यात्रा जत्रेचा सिझन सुरू झाला की ढोल लेझीम पथके अशा यात्रात हजेरी लावायला सज्ज होत.यात्रेच्या दिवशी अशा बाहेर गावाहून आलेल्या ढोल पथकांचे डाव पहाणे खूप आनंदाचे असायचे.उत्तम खेळ करून आपली कलाकारी दाखवणाऱ्या पथकाला खास बक्षीस जाहीर केले जात असे. गावच्या ग्रामदेवतेच्या उत्सवांचा अर्थात जत्रा यात्रा उत्सवाचा तमाशा फड हा अविभाज्य भाग असायचा. कोणत्या गावाने कोणत्या लोकनाट्य तमाशाला त्या वर्षी सुपारी दिली आहे हे आवरजून पाहिले जात असे. जत्रेतला तमाशा आणि त्याचे वगनाट्य जेवढे फर्मास त्यावर जत्रा कशी झाली याचे मोजमाप लोक करत.... संक्रातीच्या आधी महिनाभर गावात मारीआईचा फेरा येत असे.पोतराजाच्या आसुडाच्या फटके आणि ढोलकीच्या गुबुगुबु आवाजाने गावाकडे मरीआईचा डोलारा आल्याची वर्दी मिळे.आणि सवाष्णी पूजेच्या तयारीला लागत.या वर्षी संक्रात काय काय लेऊन आली आहे,तिने कोणता रंग घातला आहे, कोणत्या दिशेकडून आली आहे, कोणत्या दिशेकडे जाणार आहे यावरून संक्रात सणात काय काय वर्ज्य करायचे याची माहिती घेतली जात असे. हा फेरा घेऊन येणाऱ्या जोडीला धन धान्याची आणि ओटी बरोबर आलेल्या सामानाची बऱ्यापैकी कमाई होत असे. गावात कधी गारुडी येत असे.त्याचे खेळ बघायला पोराटोरांची चांगलीच गर्दी व्हायची.त्याच्याकडील मुंगूस आणि सापाची लढत बघायची उत्सुकता ताणत ठेवत गारुडी त्याच्याकडे असलेले ताईत मोठ्या खुबीने विकायचा. नजरबंदी चे जादूचे प्रयोग करून गारुडी लोकांचे मनोरंजन करत आपला गावातला शेअर घेऊन जात असे. गावात कधीतरी अचानक डोंबाऱ्याचा खेळ यायचा आणि त्यातल्या डोंबाऱ्याचा पोरांचे कसरतीचे खेळ पाहून गाव अंचांबित होऊन जात असे. त्यातल्या छोट्या मुलीने दाखवलेले खेळ गावात पुढे कित्येक दिवस चर्चेत असायचे. आता गावांचे शहरीकरण झाले आहे.आता लोककलेला खेड्यात सुध्दा पूर्वीसारखा लोकाश्रय राहिला नाही.अनेक लोक कलावंत आता त्यांचे पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरी धंद्याची वाट चोखाळत आहेत.नव नव्या मनोरंजनाच्या आधुनिक सोयींनी बाळबोध लोक कलेचे महत्व आज संपवले आहे. शहरात सोडा; पण ग्रामीण भागातही लोककला नामशेष होत चालली आहे... ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Wednesday, December 8, 2021

पन्नास वर्षे पुढे..

पन्नास वर्षे पुढे... पन्नास वर्षांपूर्वीच्या जगात आणि आजच्या जगात जमीन अस्मानाचा फरक आहे. गेल्या पाच दशकांत जगातील उपलब्ध तंत्रज्ञानात शेकडोपट प्रगती झाली आहे.सोयी सुविधांमध्ये कैक पटीने सुधारणा झाली आहे. मानवी बुद्धिमत्तेने अनेक चमत्कार घडवून पन्नास वर्षात विज्ञान तंत्रज्ञानात कल्पनातीत गोष्टी घडलेल्या आमच्या पिढीने प्रत्यक्ष पाहिले अनुभवले आहे ... एक विचार सहजपणे मनात डोकावून गेला.... मला दिव्य दृष्टी मिळून पन्नास वर्षानंतरचे जग बघता आले तर? नक्की कसे असेल हे जग? मी विचारांनी त्या जगात पोहचलो....मी पाहिले.... आता जगात तंत्रज्ञानाने अत्युच्च पातळी गाठली आहे.लोकांना आता संभाषण करण्यासाठी बोलणे लिहिणे किंवा वेगळ्या कोणत्याही मीडियाची गरज भासत नाही. अती विकसीत सूक्ष्म लहरींच्या जोरावर माणूस एका मनातील संदेश दुसऱ्या मनात केवळ विचार करून पाठवू शकतो.आज असलेल्या स्मार्ट फोनच्या जागेवर अदृश्य असे स्मार्टफोन जे नजरेने दिसत नाहीत विकसित झाले आहेत.ज्याला संदेश पाठवायचा आहे त्याचा फक्त चेहरा नजरेसमोर आणला तरी त्याच्या संवेदन यंत्रणेला नोटिफिकेशन जाते आणि समोरच्या व्यक्तीकडून तो कोडेड संदेश स्विकारला किंवा नाकारला जातो. एकाच्या मनातील गोष्ट दुसऱ्याला अगदी मायक्रो सेकंदात पोहोचते. सूक्ष्म लहरीवर आधारीत अशी मेट्रो सेवा शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरली जाते पूर्वी ज्या प्रवासाला तास दोन तास लागायचे त्यां प्रवासाला आता केवळ पाच दहा मिनिटे लागतात.रस्त्यांवर आता अजिबात ट्रॅफिक नसते. प्रदूषण नामशेष झाले आहे.सर्व यंत्रणा आता अत्याधुनिक झाल्या आहेत त्यामुळे माणसा माणसात बोलणे भेटणे या गोष्टी इतिहास जमा झालेल्या आहेत. एका संदेशावर आता सरकारी कामे होतात.कुठल्याही कामासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत.केवळ एका संदेशावर तुम्हाला तुमचे काम करून घरपोहच मिळते. कुटुंब व्यवस्था, लग्नसंस्था, सणसमारंभ आता इतिहासजमा झालेले आहे .आता केवळ लिव्ह इन रिलेशनचा जमाना आहे.आता कुणीही कुठल्या नात्यात स्वतःला बांधून घेत नाही आणि बांधत नाही.आता केवळ शुध्द व्यवहारावर जग चालते मूल पाच वर्षाचे झाले की आई बापाला सोडून स्वतंत्र राहायला लागते त्याची सगळी जबाबदारी सरकार घेते. या जगात भावनेला थारा नाही. सर्व गोष्टी मायक्रो रोबोट करतात. माणसे केवळ यंत्रवत व्यवहार करतात. आता जगात कोणतीही नाती खरी नसतात.आभासी नात्यामुळे कोणीही कुणाशी भावनिक दृष्ट्या जोडलेला नसतो. खरी नातीच नसल्याने वाद भांडण तंटे रुसवे फुगवे असल्या गोष्टी नाहीत.जगाला अभिप्रेत असलेल्या आदर्श जगात आता माणूस रहातो आहे....एकदम शांत....निवांत... नो कलकलाट... नो गोंधळ.... " ए मूर्खा दिसत नाही का, का धक्के मारत चालतोय? दिवसा घेतली की काय?" कुणाला तरी माझा धक्का लागला आणि त्याच्या आवाजाने मी भानावर आलो.... त्या जगात पोहोचायला अजून पन्नास वर्षे आहेत तर.... जाऊ दे तोपर्यंत आहे तेच खरे जीवन.... © प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Sunday, December 5, 2021

डुलकी दुपारची

डूलकी दुपारची.... आयुष्यात काही काही गोष्टींची वेळ यावी लागते असे म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या बाबतीत त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दुपारच्या घटकाभर घेतलेल्या डुलकीत असलेले सुख अनुभवण्याची वेळ येण्यासाठी मला चक्क माझी वयाची साठी यावी लागली... शिकत असताना शाळा दिवसभर असायची,पुढे अगदी कॉलेजही संध्याकाळपर्यंत असायचे आणि कॉलेज लाईफ संपण्यापूर्वीच नोकरीत रुजू झाल्याने दुपारी झोपण्याचे ते सुख कधी मिळाले नव्हते.त्यातच आम्ही पडलो आयुर्वेदाचे हौशी अभ्यासक,आणि आयुर्वेदिक जीवनशैलीत जे वाचनात आले होते त्याप्रमाणे दुपारची झोप म्हणजे रोगांना आमंत्रण! त्यामुळे दुपारची झोप नको रे बाप्पा, असेच मनावर कोरले गेले होते.... आमचे अनेक मित्र छोटे मोठे व्यावसायिक होते ते मात्र या बाबतीत खूप म्हणजे खूप नशीबवान! सकाळी आठ नऊ वाजता आपल्या व्यवसायाच्या जागेवर जायचे,दुपारी घरी येऊन गरम गरम जेवण करायचे आणि मस्त पैकी पडी मारायची! चारनंतर वाफाळलेला चहा घेऊन पुन्हा व्यवसायाच्या ठिकाणी हजर! अशी मजेतली जीवनशैली प्रत्येकाला आकर्षक वाटणे अगदी साहजिक आहे. खरं तर बऱ्याच लोकांना दुपारी झोपावे आणि त्यातले सुख आपल्यालाही उपभोगता यावे अशी आंतरिक इच्छा असते परंतु बहुसंख्य लोकांना त्यांच्या नोकरी व्यवसायामुळे हे केवळ अशक्य असते... माझ्या बाबतीतही हेच होते.मला या दुपारी घडीभर का होईना झोप घेणाऱ्यांचा नाही म्हटलं तरी हेवा वाटत असायचा. ऑक्टोंबर २०१९ मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर भरपूर फिरायचे, आपल्या छंदासाठी वेळ द्यायचा, परदेशात ट्रिपला जायचे.ज्येष्ठ नागरिक संघात रमायचे असे रम्य प्लॅन्स तयार होते;पण मार्च २०२०मध्ये कोरोनामुळे लॉक डाऊन लागले आणि जगाचे चक्र अक्षरशः थांबले.आमची निवृत्तीनंतर काय काय करायचे याची पाहिलेली स्वप्ने अक्षरशः कोमेजून गेली!मग सुरू झाली वेळ घालवण्याची लढाई....खाणे, बसणे, वाचन, टिव्ही,घरातल्या घरात येरझाऱ्या, घरातल्या कामातली बिनकामी लुडबुड...तरीही वेळ जात नव्हता! झोप कितीही आकर्षक वाटत असले तरी दुपारी शक्यतो झोपायचे नाही असे ठरवले होते,पण दुपारी जेवण झाले की नुसते बसून कंटाळा यायला लागला.सोफ्यावर बसून पाठ अवघडून येऊ लागली,मग जरा पाठ टेकवू... असे म्हणत दुपारी बेडवर आडवे होणे सुरू झाले आणि त्या आडव्या होण्याचे वामकुक्षीत रूपांतर कधी झाले ते माझे मलाच समजले नाही! न दुपारची झोप आरोग्याला हानिकारक आहे हे मनावर कोरलेले असूनही या डुलकीचा मोह मात्र अनावर होऊ लागला आणि शेवटी मनाची समजूत घातली....त्यातच कुठे तरी एका प्रख्यात वैद्यांनी लिहिलेले वाचनात आले....दुपारच्या जेवणानंतर आटोपशीर वामकुक्षी घेणे आरोग्यास हितकारक असते! मग काय माझ्या वामकुक्षीचे शास्त्रशुध्द कारणही हाताला लागले.... आता पूर्णवेळ 'नो टेन्शन फुल पेन्शन ' अर्थात निवृत्त असल्याने दुपारी दीड दोन वाजता मनसोक्त जेवण करायचे, थोडी शतपावली करायची आणि आवडीचे पुस्तक किंवा मोबाईल मध्ये एखाद्या आवडत्या लेखकाचे आर्टिकल वाचायला घ्यायचे.वाचता वाचता अचानक डोळे जड होतात ती वेळ साधायची आणि निद्रादेवीच्या अधीन होऊन जायचे. या डुलकीतली सुखाची अनुभूती? छे हो ते सुख शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य! ती वाचायची किंवा ऐकायची गोष्ट नाही तर अनुभवायची गोष्ट आहे तर उगाच चर्चेत वेळ घालवू नका आपल्याला रुचेल पचेल आणि शरीराला झेपेल इतकी वामकुक्षी अर्थात दुपारची झोप नक्की घेऊन बघा आणि या सुखाची सुंदर अनुभूती जरूर घ्या.... © प्रल्हाद दुधाळ पुणे. 9423012020

Monday, November 29, 2021

यंत्र मानव विचार करू लागला तर...

यंत्र मानवाला विचार करता येऊ लागला तर... नुकताच मी एका मॉलमध्ये गेलो होतो तिथे काही कामे यंत्र मानव करताना दिसले.उदाहरणार्थ मी पाहिले की मॉलमधील फरशी साफ करण्यासाठी एक रोबोट अर्थात यंत्रमानव बसवलेला आहे. मी शांतपणे त्या यंत्रमानवाचे काम पहात होतो.तो भिंतीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी सरळ रेषेत चालत तो जमिनीवरचा कचरा स्वाहा करत होता.त्याला सोपवलेली जबाबदारी तो इतक्या इमान इतबारे करत होता की त्याचे ते काम पहातच रहावे असे वाटत होते. सहजच मनात विचार आला की या यंत्रमानवाच्या जागी खराखुरा माणूस असता तर त्याने हेच काम करताना किती चुकारपणा केला असता? त्याच्या मागे एक सुपरवायझर पुन्हा त्या सुपरवायझरचा मुकादम एवढे मनुष्यबळ ठेऊनसुध्दा कामात हलगर्जीपणा झाला असता;पण हा यंत्रमानव त्याला दिलेल्या आदेशाचे किती तंतोतंत आणि शिस्तीने पालन करत होता... माणसाने त्याच्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर असे कितीतरी प्रकारचे यंत्रमानव तयार केले.माणसाचे कष्ट कमी करून सगळी कामे अगदी चुटकीसरशी व्हावीत,मानवी अंगमेहनत कमी व्हावी म्हणून, माणसाच्या बुध्दिवर अकारण पडणारा ताण कमी व्हावा, एकूणच उत्पादन क्षमता वाढावी म्हणून अशा यंत्रमानवांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली.या यंत्रासाठी काही ठराविक प्रोग्राम डिझाईन करून त्याला दिलेल्या ठराविक आदेशप्रणालीच्या भरवशावर माणसाची अनेक किचकट वेळखाऊ कामे सोपी करण्यात माणूस यशस्वी झाला. समजा काही चमत्कार झाला आणि माणसाने तयार केलेले यंत्रमानव विचार करू लागले तर? मी विचार करू लागलो.... शेवटी यंत्रमानव ही मानवाचीच निर्मिती आहे त्यामुळे त्याने बनवलेला यंत्रमानव विचार करू लागला तर तो माणसासारखाच विचार करणार ना? मग सध्या इमाने इतबारे जमिनीची स्वच्छता करणारा यंत्रमानव अचानक माणसासारखा विचार करेल की ' काल तर ही जमीन मी स्वच्छ केली.समोर कचरा किंवा धुळही दिसत नाहीये,मग मी विनाकारण कशाला फिरत राहू? त्यापेक्षा जरा आराम केला तर मालकाला थोडेच समजणार आहे? त्याला विचार करण्याची शक्ती मिळाल्याने स्वतः वेगळ्या पद्धतीने काम करणे सुरू होईल.चुकारपणा् सुरू होईल. यंत्राला माणसाने दिलेली आज्ञावली कुचकामी होऊन तो यंत्रमानव स्वतःच्या विचारप्रणालीवर निर्णय घ्यायला लागेल.' काम करायचे की नाही, आज सुट्टी घ्यायची का, आज थोड्या कमी चकरा मारू ' अशा प्रकारे विचार करून तो मनमानी करायला लागेल. पैसे मोजून घेणारा आणि देणारा यंत्रमानव असाच स्वतःच्या मनाने वागायला लागला तर आर्थिक क्षेत्राचा खेळखंडोबा होऊन जाईल. विविध इंडस्ट्रीजमधील यंत्रमानव जर त्यांना सोपवलेली कामे सोडून स्वतः विचार करून वेगळे वागायला लागले तर उत्पादनांची गुणवत्ता मार खाईल. थोडक्यात यंत्रमानव जित्याजागत्या माणसासारखा विचित्र पद्धतीने वागायला लागेल आणि त्याला बनविण्यासाठीचा माणसाचा उद्देशच निकालात निघेल... यंत्र मानव विचार करायला लागला तर माणसात आणि त्याच्यात फरक रहाणार नाही किंबहुना माणसाला यंत्रमानव आपल्याला वरचढ होतो आहे हे सहनच होणार नाही.मग माणूस आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर यंत्र मानवाचा विनाश घडवून आणेल आणि या बाबतीत मानवाने केलेली प्रगती शून्य होऊन जाईल.... म्हणून माणूस यंत्रमानव त्याच्या आज्ञेप्रमाणे च काम करेल स्वतः विचार करू शकणार नाही याची काळजी घेत आला आहे आणि पुढेही घेत राहील कारण सर्व प्राणिमात्रात मनुष्य हा प्राणी फारच खतरनाक आहे! ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Friday, November 26, 2021

ज्ञानी- अज्ञानी

ज्ञानी-अज्ञानी ज्ञान अर्थात एखाद्या गोष्टी बाबतीत सखोल वास्तवाची जाणीव हा माणसाच्या जन्माबरोबर मिळणारा गुण नाही.प्रत्येक बाळ हे या पृथ्वीतलावर आल्यावर सारखेच असते.थोडीफार प्रत्येकाची आकलनशक्ती वेगळी वेगळी असू शकते;पण ज्ञान ही निश्चितच पुढच्या टप्प्यावर मिळण्याची गोष्ट आहे. दुसरे असे की प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातले परिपूर्ण ज्ञान असणे केवळ अशक्य आहे.वाढत्या वयाबरोबर ज्ञानार्जन करण्याची भूकही वाढत जाते;पण व्यक्तीच्या आजूबाजूचे संस्कार,त्याला उपलब्ध असलेल्या संधी तसेच त्या व्यक्तीची ज्ञान ग्रहण करण्याची कुवत याप्रमाणे ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकते हे ठरते. मी असे मुळीच मानत नाही की आयुष्यात प्रत्येकाला योग्य संधी मिळेल पण असेही घडत नाही की इथला संधी मिळालेला प्रत्येकजण निश्चितपणे ज्ञानी होईल इथे प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार ज्ञानार्जन करतच असतो;पण एका क्षेत्रात प्रावीण्य असलेली व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात तशी अज्ञानीच असते. समाजात वावरताना मात्र आपल्याला काही स्वतःला सर्वज्ञ समजणारी माणसे पदोपदी भेटतात.त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे असे निदान त्यांना तरी वाटते.एखाद्या बाबतीत आपल्याला ज्ञान नाही हे कबूल करणे अशा व्यक्तींना कमीपणाचे वाटते! कोणतीही व्यक्ती स्वतःला परिपूर्ण समजत असेल तर तो वास्तवातील सर्वात मूर्ख व्यक्ती आहे असे माझे मत आहे. या जगातला प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे,प्रत्येकाची आवड वेगळी आहे.ज्ञानार्जनाची प्रत्येकाची कुवत वेगळी आहे.एखाद्या व्यक्तीला मिळणारी संधी, अंगिकारता आलेली कौशल्य यावर त्या त्या व्यक्तीचे ज्ञान कमी जास्ती असू शकते .म्हणूनच कुणी कुणाला अज्ञानी म्हणून हिनवणे चुकीचे आहे तसेच मी सर्वज्ञानी आहे असा अहंगंड बाळगणे सुध्दा पूर्णपणे चुकीचे आहे. हजार अज्ञानी परवडले पण एखादा अर्धवट ज्ञानी खूपच त्रासदायक ठरतो. जगातील ज्ञानाचे भांडार अमर्याद आहे आणि कोणीही व्यक्ती प्रत्येक क्षेत्रातला तज्ज्ञ होऊ शकत नाही. तसा तर प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. प्रत्येकाने या मर्यादांची जाणीव नक्कीच ठेवायला हवी. कसे ओळखायचे हे ज्ञानी-अज्ञानी? कणभर ज्यास ज्ञान नाही वास्तवाचे परी भान नाही तया मूर्ख असे समजावे हात चार लांबच राहावे ! फारसे जरी ज्ञान नाही शिकण्यास नवे ना नाही असंस्कारी तया समजावे संस्कारांनी सुज्ञ करावे ! तसा तो अडाणी नाही ज्ञानाचे त्यास भान नाही निद्रेत मग्न समजावे जागृतीचे यत्न करावे! मुळी ज्यास ज्ञान नाही स्वीकाराचे भान नाही लबाड त्यास समजावे ढोंग तयाचे उघड करावे ! सर्वज्ञानी परी गर्व नाही ज्ञान दानास नां नाही गुरुपदी योग्य समजावे ज्ञानामृत ग्रहण करावे ! तर अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रत्येकाने ज्ञानार्जनाची कास धरावी.... प्रत्येकास अधिकाधिक ज्ञानार्जनासाठी शुभेच्छा.... ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Wednesday, November 24, 2021

हट्टी माणसे हटवादी माणसे

हट्टी माणसे हटवादी माणसे... 'हट्टी आहे हो खूप तो' एखाद्या लहान मुलासाठी हे वाक्य आपण अनेकदा ऐकलेले असते.लहान मुलांचा हट्टीपणा हा सर्वांनी गृहीत धरलेला असतो किंबहुना प्रत्येकजण लहानपणी हट्टी असतोच असतो. एखाद्या लहान नासमज मुलाने एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे आणि परिस्थिती असो अथवा नसो तो हट्ट पालकाने पुरवणे हे अगदी साहजिक आहे;पण एखादा वयाने आणि बुध्दीने सशक्त असलेला माणूस ' मी म्हणतो तेच खरे' असे म्हणून आपले चुकीचे म्हणणे इत्तरांवर लादत असेल तर? नक्कीच अशा हट्टीपणाचे कुणी समर्थन करणार नाही. हट्टीपणा या विषयाबद्दल जेव्हा चर्चा होते त्यावेळी तीन व्यक्तींचा हट्ट पुरवावाच लागतो असे सर्रास म्हटले जाते.ते म्हणजे बालहट्ट, राजहट्ट आणि स्रीहट्ट .लोक चेष्टेने म्हणतात एकवेळ पहिले दोन हट्ट नाही पुरवले गेले तरी हरकत नाही:पण स्री हट्ट पुरवणे मात्र टाळता येत नाही. एखाद्या गोष्टीचा कट्टर आग्रह म्हणजे हट्ट. हा हट्ट टोकाचा असेल तर मात्र बऱ्याचदा त्रासदायक ठरतो. पुराणात असे अनेक हट्टाचे आणि त्यापायी झालेल्या नुकसानीचे दाखले पानोपानी दिसतात. रामायणात कैकयी हट्टामुळे रामाला वनवासात जावे लागले तर सीतेच्या सोनेरी हरणाच्या हट्टापायी पुढचे रामायण घडले असे म्हटले जाते.अनेक पौराणिक व ऐतिहासिक कथांमध्ये कुणा ना कुणाच्या हट्टामुळे टोकाच्या घटना घडल्याचे दिसते. हट्ट ही गोष्ट चांगली की वाईट? मला वाटते हट्ट चांगला अथवा वाईट नसतो तर त्या हट्टामुळे होणारे परिणाम चांगले अथवा वाईट असू शकतात.एखादा विद्यार्थी म्हट्ट म्हणून उच्च विद्याविभूषित होऊ शकतो तर एखादा विद्यार्थी हट्टाने व्यसनांच्या अथवा कुमार्गाने जातो आणि आपल्या जीवनाचे मातेरे करून घेतो म्हणजेच हट्ट कशाचा आहे यावर तो हट्ट चांगला की वाईट हे ठरेल. हट्टाने प्रगती होऊ शकते तशीच अधोगतीही होऊ शकते.हट्टाने केलेल्या कष्टाने आयुष्याचे सोने केलेल्या अनेक माणसांची यशोगाथा आपण वाचतो तशीच वावग्या हट्टामुळे सुखात असलेला जीव दारूण दुःखात लोटलेली माणसेही समाजात बघायला मिळतात.हट्टापायी आयुष्याची धूळधाण झालेली माणसेही पावला पावलावर बघायला मिळतात. हट्ट आणि हटवादीपणा यात निश्चितच फरक आहे.आग्रह आणि दुराग्रह यात जो फरक आहे तोच फरक इथेही आहे.सर्वसमावेशक हितासाठी धरलेला हट्ट नक्कीच भल्यासाठी असेल;पण केवळ मी म्हणतो म्हणून किंवा स्वतःच्या अहंकरापोटी केलेला हटवादी पणा त्या संबंधित व्यक्तीबरोबर सामाजिक आरोग्यासाठीही महाभयंकर ठरू शकतो त्यामुळे हट्ट किती आणि कसला याचे तारतम्य नक्कीच असायला हवे. अशा हट्टापायी काय काय होऊ शकते ?... करतो तो पुरा बरबाद,नात्यात येई दुरावा, हवा का वेगळा पुरावा,नाशच होई हट्टापायी! माझेच खरे जे म्हणती,दुराग्रह ना सोडती , विनाश ओढवून घेती, दुःखी होती हट्टापायी! नाही वास्तवाचे भान, अंगी वसे दुराभिमान, अहंकाराने त्या ग्रासला, मातीस मिळे हट्टापायी! बरोबर ना? आता तुम्हीच ठरवा हट्टी व्हायचं की हटवादी? ©प्रल्हाद दुधाळ. पुणे 9423012020

Tuesday, November 23, 2021

सजगता..काळाची गरज

सजगता अर्थात चौफेर जागरूकता अंगी असणे ही आज काळाची गरज आहे.तुम्ही कोणीही असा,तुम्ही कोणत्याही वयोगटात असा,दैनंदिन आयुष्यात जगताना पावलोंपावली तुम्ही सजग असायलाच हवे. दररोजच्या वर्तमान पत्रात किंवा बातम्यात तुम्ही अनेक फसवणुकीचे नवे नवे प्रकार संबंधित भामट्यांनी अंगिकरलेले सतत वाचत वा ऐकत असता... उदाहरणार्थ ... घरात एकटे गाठून वृध्द व्यक्तीला लुबाडले. पॉलिशच्या बहान्याणे महिलेचे दागिने लांबवले. फोनवर ओ टी पी विचारून खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले. किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड संबंधी फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा. अशा त्या मानाने जुनाट पध्दती बरोबरच डिजिटल दुनियेत फसवणुकीचे नवे नवे प्रकार शोधून अपहरण /लुबाडणूक /फसवणूक असे प्रकार सर्रास घडत आहेत. कधी कधी तर अल्प लाभाच्या आमिषाला बळी पडून लोक विविध मार्गांनी अशा गुन्हेगारांनी लावलेल्या सापळ्यात अलगद सापडतात आणि राजरोसपणे फसवले जात आहेत. माणसाची एकदा अशी फसवणूक झाली की माणसाला "आपण इतक्या सहजासहजी फसलोच कसे?" असा प्रश्न पडतो.आर्थिक नुकसान तर होतेच त्याबरोबर अनेक प्रकरणात प्रचंड मानसिक त्रासही भोगावा लागतो.स्वतःला तांत्रिक तज्ज्ञ समजणाऱ्या व्यक्तीलाही संपूर्णपणे फसल्यानंतरच आपली हुशारी किती फोल आहे हे कळते. आजकाल लोकप्रिय झालेल्या ऑनलाईन खरेदी व इतर बँकिंग व्यवहारांमध्ये वेळेची आणि श्रमाची प्रचंड बचत होते याबद्दल दुमत असायचे कारण नाही; पण असे व्यवहार करताना पुरेसे सजग असणे गरजेचे आहे.कुणीतरी पाठवलेल्या कोणत्याही ऑनलाईन लिंक ला क्लिक करण्यापूर्वी सजगपणे त्या लिंक ची तपासणी करणे आवश्यक आहे. आपल्या आर्थिक तिजोरीच्या किल्ल्या अर्थात पासवर्ड ओटीपी कार्ड वा खात्याचे डिटेल्स कुणी मागते आहे म्हणून देणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. फेसबूक अथवा व्हॉट्स ॲप सारख्या आभासी जगातील मैत्रीच्या माध्यमातून व्यवहार करताना खूप सावध असणे गरजेचे आहे. कधी कधी तुमच्या स्वभावाचा पध्दतशीर अभ्यास करून तुम्हाला टार्गेट केले जाऊ शकते तर तुमच्या वयाचे तुमच्या एकटेपणाचे, तुमच्या आजाराचे भांडवल करून लोक तुमच्याशी सलगी वाढवून तुमच्या खाजगी आयुष्यात प्रवेश मिळवतात.नात्यात व्यवहार येतो आणि तुम्ही अलगद फसता.अशावेळी तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थीती जीवनात येते त्यामुळे स्वभावात सजगता असणे हे अत्यंत गरजेचे आहे. सध्याचा जमाना बोकाळला स्वार्थ भोळेपण व्यर्थ ध्यानी घे रे म्हणूनच आजच्या युगात ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्यवहारच काय पण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सजगपणे वागणे बोलणे ही काळाची गरज आहे. पटतय ना? © प्रल्हाद दुधाळ पुणे (9423012020)

Monday, November 22, 2021

विवेक...एक विचार

विवेक विवेक म्हणजे नक्की काय? मला असे वाटते विवेक म्हणजे सारासार तारतम्य! जीवनातल्या चांगल्या आणि वाईटात फरक करण्याची हातोटी! योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची माणसाची क्षमता म्हणजेही विवेकच! हा विवेक ज्याच्या अंगी आहे त्याला आयुष्यात सहसा अपयशाचा सामना करावा लागत नाही,कारण ज्या गोष्टीत यश मिळेल असेच काम हातात घ्यायची सारासार बुद्धी त्या व्यक्तीला अंगी असलेल्या विवेकामुळे लाभलेली असते. ज्यांच्या अंगी विवेक असतो त्या व्यक्तींच्या अंगी प्रचंड सहनशीलता असते कारण विवेक जागा ठेऊन निर्णय घेताना खूप संयम ठेवावा लागतो. माणसाच्या आयुष्यात त्याला अनेक चढउतारांचा संकटांचा सामना करावा लागतो.अनेकदा मानसिक परिस्थिती दोलायमान असते.कधी कधी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर माणसाला लढावे लागते.प्रचंड कष्ट करावे लागतात.हे कष्ट कधी अंगमेहनत स्वरूपात असतात तर कधी ही बौद्धीक स्वरूपाची मेहनत असते. अनेकदा निर्णय घेताना त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी त्या व्यक्तीवर असते अशावेळी खरा विवेकाचा कस लागतो .कधी निर्णय घेताना निती अनितीचा प्रश्नही असतो त्यावेळी तर निर्णय घेताना नुसते बुध्दीचे काम नसते तर संबंधित लोकांच्या सामाजिक व मानसिक स्तरावर होणाऱ्या परिणामांचा विचार होणेही आवश्यक असते.अशावेळी सदविवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावे लागतात. भले काय बुरे काय, काय केले तर काय होईल.निर्णयाचे चांगले परिणाम काय आहेत, वाईट परिणाम काय आहेत,कोण आनंदी होईल, कुणाला त्रास होईल, कोण दुखावले जाईल आणि या सगळ्यांच्या संभाव्य प्रतिक्रिया काय असतील? त्या प्रतिक्रियांचे काय पडसाद उमटू शकतात? त्याचे समाजावर किंवा कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम लगेच किंवा कालांतराने दिसतील इथपर्यंत लांबवर विचार करण्याचे तारतम्य केवळ विवेकाने साधता येते .... थोडक्यात काय माणसाच्या जीवनात विवेक या गुणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जगताना रात्रंदिवस हर क्षणाला हा विवेक जागा ठेवावा लागतो.त्यातल्या त्यात आनंदी जीवनासाठी हे तारतम्य किंवा विवेक खूपच महत्त्वाचा आहे? बरोबर ना? © प्रल्हाद दुधाळ 9423012020

Sunday, August 8, 2021

चिंतन -वृत्ती

चिंतन १... भर्तृहरी एक कवी,त्याने माणसाचे एकूण चार प्रकार सांगितले आहेत १. ' माझे वाटोळे झाले तरी चालेल;पण जगाचे चांगले व्हायला हवे.गरज पडली तर मी लोकांचे पाय धरेन;पण आयुष्यात कधी कोणाचे पाय ओढणार नाही ' असा विचार करून तसे वागणारी माणसे. २. ' माझे चांगले होण्यासाठी कुणाचे नुकसान झाले तरी चालेल.एकदा का सगळे माझ्या मनासारखे झाले की मग मी दुसऱ्यासाठी विचार करेन.माझे पोट भरल्यानंतर मी लोकांच्यासाठी काय करता येईल याचा विचार करेन. ' असा विचार करणारी माणसे. ३. ' माझे चांगले होणे याला माझी सर्वोच्च प्राथमिकता असेल भले त्यासाठी इत्तरांचे वाटोळे झाले तरी चालेल.मी फक्त माझाच विचार करेन.' असे वागणारी माणसे. आणि ४. ' माझे वाटोळे झाले तरी हरकत नाही; पण माझ्याबरोबर सगळ्यांचे वाटोळे व्हायला हवे. मला जर सुख मिळणार नसेल तर माझ्याबरोबर सर्वांच्या आयुष्यात केवळ दुःखच असायला हवे ' असा आततायी विचार करून तसेच वागणारी माणसे. खरे तर इतरांचे वाईट चिंतून या जगात सर्व प्रकारची सुखे मिळूनही खऱ्या अर्थाने मिळालेले सुख कोणीही उपभोगू शकत नाही.... .... प्रल्हाद दुधाळ

Friday, August 6, 2021

कर्मयोगी संत सावता माळी..

प्रपंची असुनी परमार्थ साधावा I वाचे आळवावा पांडुरंग I मोट,नाडा,विहीर, दोरी Iअवघी व्यापिली पंढरी I किंवा 'स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात।’ ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’ ज्या काळात ईश्वर प्राप्तीसाठी अनेक महान संत तीर्थाटने,भजन,कीर्तन, योगयाग,जपतप वा व्रतवैकल्ये आदी मार्गांचा अवलंब करत होते त्याच काळात असेही एक संत होते,ज्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी कर्मयोगाचा अवलंब केला आणि आपल्या दैनंदिनबकामात पांडुरंग शोधायला भक्तांना सांगितले. हे महान संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता माळी! सावता महाराज संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन संत होते. ईश्र्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये याची बिलकूल आवश्यकता नाही तर केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन करायला हवे अशी शिकवण त्यांनी दिली. संत सावता माळी यांच्याबद्दल संत नामदेव म्हणतात:- धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।। सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।I सावतोबा यांचे आजोबा देबू माळी हे पंढरीचे वारकरी होते.त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा.पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते.आपला शेतीचा परंपरागत व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत.पंढरीची वारीही ते नियमितपणे करायचे.पुरसोबा यांचा विवाह त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला.या दांपत्याच्या पोटी सावतोबा यांचा जन्म( ईसवी सन १२५०) झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले होते.सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी आपल्या अभंगात आपल्या व्यवसायातील शब्द व वाक्प्रचार मुक्तपणे वापरले आहेत. ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा,सावपणा असा याचा अर्थ होतो.सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले,फळे,भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते म्हणतात. 'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी I ’'लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’ ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास,न पडे संकट,नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा सरळ साधा अनुभव होता.त्यांनी जनसामान्यांना आपले कर्तव्य करता करता साधता येणाऱ्या आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत.प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास येत. निरपेक्ष वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती ‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।। तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।। हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. प्रपंच व आपले कर्तव्य करताना त्याबरोबरच नामसंकीर्तन करण्यावर त्यांनी जास्त भर दिला. भगवंत भक्तीसाठी सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही.प्रपंच करता करताही ईश्वर भेटतो असे ते सांगत. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना पाणी भाकरी फळे फुले देऊन त्यांची पूजा ते करत.त्यांचे शेत त्यांचा मला हेच सावतोबाचे पंढरपूर होते. मळ्यात काबाडकष्ट करणे, भाज्या आणि फले पिकवणे वाटसरू ची सेवा हीच त्यांच्यासाठी पांडुरंग भक्ती होती. 'तो परमेश्वर माझ्या मळ्यात रहातो मला पंढरपुराला जायची गरज नाही.पांडुरंग मूर्तीत नाही तर आपण रोज जे काम करतो ते मनापासून केले की पांडुरंगाची भेट होते' असा त्यांचा ठाम विश्वास होता. संत एकनाथ सावतोबाबद्दल म्हणतात... 'एका जनार्दनी सावता तो धन्य I तयाचे महिमान न कळे काहीI' अध्यात्म व भक्ती, आत्मबोध व लोकसंग्रह, कर्तव्य व सदाचार यांचा मेळ त्यांनी आपल्या आचरणात घातला.धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता, अवडंबर व कर्मकांडे याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’ 'सावता म्हणे ऐसा भक्तीमार्ग धरा I जेणे मुक्ती द्वारा ओळंगती I' ' आमुची माळीयाची जात I शेत लावू बागाईत II आम्हा हाती मोट नाडा I पाणी जाते फुल झाडा II' असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच विठ्ठलदर्शन होत असे. त्यांच्या सर्व अभंगरचना काशिबा गुरव यांनी लिहून घेतल्या आहेत. ‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’ ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’ सावता महाराजांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. आज त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत.अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते. तर अशा या संतश्रेष्ठ सावता महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त साष्टांग दंडवत.. पंढरीस आषाढीला जमे वैष्णवांचा मेळा संत सावता ने ना कधी सोडला आपुला मळा पंढरीच्या वाटेवरी अखंड टाळ कुटाई संतश्रेष्ठ सावतालेखी कांदा मुळा ही विठाई पांडुरंग स्व कर्मामध्ये काम भजन कीर्तन मनामध्ये हवा भाव नको देखले नमन कर्मयोगी सावताने नाही पहिली पंढरी भक्ताच्या या दर्शनार्थ केली विठ्ठलाने वारी .....पांडुरंग हरी वासुदेव हरी..... ©प्रल्हाद दुधाळ पुणे.

Thursday, July 29, 2021

पुनर्जन्म

#पुनर्जन्म आमच्या कुबेर समूहात पुनर्जन्म या विषयावर लिहिण्यासाठीच्या उपक्रमाची पोस्ट मी त्या दिवशी झोपायला जाता जाता वाचली. रात्रभर छान शांत झोपलो होतो... पहाटे पहाटे एक सुंदर स्वप्न पडले.स्वप्नात चक्क सर्वशक्तिमान परमेश्वर मला दर्शन देण्यासाठी समोर आला! मी देवाला साष्टांग दंडवत घातले... माझ्या भक्तीवर प्रसन्न होत देवाने आशीर्वाद दिले आणि म्हणाला... " वत्सा मी तुझ्यावर प्रचंड खुश आहे,आज मी तुला तुझ्या पुढच्या जन्मासाठी तू मागशील ते वरदान देणार आहे.सांग तुला पुढचा जन्म कसा हवा...." साक्षात परमेश्वराच्या रुपात माझ्यासाठी सुवर्णसंधी हात जोडून उभी होती. खरं तर या जन्मावर, या जगण्यावर माझे खूप प्रेम होते; पण त्याबरोबरच या आयुष्याबद्दल माझ्या काही तक्रारीही होत्या.जगताना या तक्रारी मनात ठेऊन मी आनंदी जीवनाचा देखावा करत असलो तरी आत दाबून ठेवलेल्या इच्छा आकांक्षानी मला देवासमोर खरे खरे सांगायची आणि पुढील जन्मी मला कसा जन्म हवा ते मागायची संधी दिली होती, त्या संधीचे सोने करायची जबरदस्त इच्छा झाली.आयुष्यात आत्तापर्यंत कधीच कुणापुढे काही मागण्यासाठी हात न पसरलेला मी, देवासमोर लोटांगण घालत माझ्या पुढच्या जन्मासाठीच्या मागण्यांचे निवेदन सादर केले... हे सर्वशक्तिमान निर्मिका,पुनर्जन्म ही संकल्पना खरेच आस्तित्वात असेल तर, मला नक्कीच यानंतरचा जन्मही मानव जन्मच हवा;पण काही अटी शर्ती वर! तर,मानव म्हणून पुनर्जन्म घेण्यासाठी माझ्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या मात्र तुला पूर्ण कराव्या लागतील... या चालू जन्मात मी भावंडात धाकटा म्हणून जन्मलो आणि मला माझ्या आईवडिलांचा सहवास फारसा लाभला नाही. खरे तर जीवनात आपल्या आईवडिलांची सेवा करणे हे माझे कर्तव्य होते; पण तशी सेवा करण्यास मी सक्षम होईपर्यंत ते दोघेही जगातून गेलेले होते त्यामुळे ते कर्तव्य तसेच राहून गेले.म्हणून सांगतो पुढच्या जन्मात मला थोरला म्हणून जन्म मिळायला हवा! अजून एक, या जीवनात मी लहान धाकटा असल्याने माझे बहीण अथवा भाऊ हे भावंडांच्या नात्यापेक्षा माझे पालक म्हणूनच माझ्याशी वागले.अनेक कुटुंबात बहीण भावात जे अल्लड नाते असते ते मला या चालू जन्मात कधीच अनुभवता आले नाही! पुढील जन्मी मात्र ही उणीव नक्की भरून निघावी.सगळ्यात धाकटा असूनही माझ्याकडून तू कर्मे मात्र थोरल्याची करून घेतलीस, तू दिलेली ती एक एक जबाबदारी निभावताना मी माझे लहानपण उपभोगू शकलोच नाही! मला अकाली प्रौढत्व स्विकारावे लागले.इत्तरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता स्वतःच्या आशा आकांक्षाचे नको इतके मला दमन करावे लागले.विशेष म्हणजे मला माझ्या मनातली ही गोष्ट कधीच कुणाला मोकळेपणी सांगता आली नाही.आजूबाजूचे लोक मला कायम गृहीत धरू लागले.वयाच्या एका टप्प्यावर झालेली ती घुसमट कधीच व्यक्त झाली नाही.तशी परिस्थिती मात्र मला पुन्हा पुढच्या जन्मात नको हो... अजून सांगतो मला सद्वर्तनी,समविचारी मित्र दे. या चालू असलेल्या जन्मात मला माझे विश्व आकाराला आणताना खूप अडथळे माझ्या समोर ठेवले होतेस,कठीण परीक्षा घेतल्या. वेळोवेळी तुझ्या कृपेने मी ते अडथळे त्या परीक्षा यशस्वीरीत्या पार केल्या.तुझ्या कसोटीवर पारखून मला तू यश, कीर्ती समृद्धी सारे सारे दिलेस,कायम सुबुद्धी दिलीस,सर्व दृष्टीने यशस्वी असा लौकिक दिलास.मी नक्कीच कृतज्ञ आहे;पण देवा हे सगळे देताना खूप थकविलेस रे... पुढच्या जन्मात एवढ्या परीक्षा नको रे घेऊ! साधे सरळ सोपे आयुष्य असायला हवे.... आणि हो, या जन्मात मला खूपच संवेदनशील बनवले होते, व्यवहारी जगात एवढं संवेदनशील असणेही बरे नाही रे.... आता मात्र काळजी घे, अंगी धाडस आणि खंबीरता सुध्दा हवी ती मात्र नक्की दे... आणि पुनर्जन्म झाला तरी कुबेर समूहाची सदस्यता अबाधित ठेव बरं का! माझ्या मागण्यांची वाढत चाललेली लांबलचक यादी ऐकून समोर उभा असलेल्या त्या कृपाळू पांडुरंगाच्या ओठांवर प्रसन्न स्मितरेषा उमटली....मला आशीर्वाद देत त्याच्या मुखातून सुंदर गंभीर ध्वनी उमटला "तथास्तु"... अचानक मी झोपेतून जागा झालो... ते स्वप्न आठवून खूपच प्रसन्न वाटत होते! पण हे काय, आपण देवाकडे स्वतःसाठी उगीचच काय काय मागितले! स्वप्नातले ते सगळे आठवले आणि एक प्रकारची उदासी दाटली... मी डोळे मिटले आणि पुनर्जन्मासाठी वास्तविक प्रार्थना केली.. सहण्याचे जे सत्य,धारिष्ट्य मिळू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे! नकोच मज समस्यांमधली मुक्ती, रहावी ईश्वरावर निस्सीम भक्ती, अनुभवांची हाव मनात राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे! नको आळशी मरगळले ते जिणे, बेफिकीर असूदे कायम जगणे, हळवेपण आत असेच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे! दु:ख जीवनीचे कधी कोणा चुकते, फळ कर्मांचे योग्य येथेच मिळते, स्वीकारायाचे धैर्य सदैव लाभू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे! ........©प्रल्हाद दुधाळ.

Friday, July 9, 2021

माझे_आवडते_शिक्षक

#माझे_आवडते_शिक्षक माणसाच्या जडणघडणीत आई-वडिलांच्या बरोबरीनेच त्याच्या शिक्षकांचेही अत्यंत मोलाचे योगदान असते. त्यातही एखादा शिक्षक किंवा शिक्षिका नकळत संपूर्ण आयुष्यभर पुरून उरतील एवढे महत्वाचे संस्कार करतात आणि त्या बाई किंवा सरांचे त्या माणसाच्या मनात आयुष्यभरासाठी आदराचे स्थान निर्माण होते. माझ्यावरही अनेक शिक्षकांनी असेच खूप चांगले संस्कार केले. एका अशिक्षित, अल्प-भूधारक शेतकरी कुटुंबातला मी.. आज मी जो काही आहे, तो केवळ मला शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर लाभलेल्या शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच! सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची गावात असलेली ‘शेती शाळा परिंचे‘ या शाळेत आणि पुढे रयत शिक्षण संस्थेच्या ‘कर्मवीर विद्यालय परिंचे‘ या माझ्या हायस्कूलमध्ये मला अनेक चांगले शिक्षक भेटले.त्यांनी मला शालेय अभ्यासक्रमात असलेले विषय तर शिकवलेच;पण खऱ्या अर्थाने जीवन जगणेही शिकवले. आपल्या तुटपुंज्या पगारातून माझी एसएससी परीक्षेची फॉर्म फी भरणारे पडवळ सर मला इथेच भेटले. साहित्य-कला-नाट्याचे बीज माझ्यात रुजवले ते जी. बी. विद्यासागर या माझ्या गुरुंनी.. तसं पाहिलं,तर विद्यासागर सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे.आम्हाला अभ्यासक्रमात आठवीपासून इंग्रजी हा विषय होता. आठवीपर्यंत एबीसीडी न येणाऱ्या आम्हाला विद्यासागर सरांनी अशा काही कौशल्याने इंग्रजी शिकवलं, की बस्स! त्या भाषेतला एक-एक शब्द शिकवण्याची त्यांची तळमळ, हातोटी इतक्या वर्षानंतरही अजूनही जशीच्या तशी लक्षात आहे. ‘थ्रो‘ आणि ‘कॅच‘ शिकवण्यासाठी त्यांनी वर्गात चेंडू आणला होता; तर ‘डान्स‘ हा शब्द शिकवण्यासाठी त्यांनी अक्षरश: आम्हाला नाचून दाखवलं होतं! सरांनी इंग्रजी विषयाची माझी इतकी तयारी करून घेतली, की बोर्डामध्ये इंग्रजीत मी पहिल्या पाचांमध्ये होतो.. विद्यासागर सर इंग्रजी तर चांगले शिकवायचेच; पण मराठी साहित्याचाही त्यांचा गाढा अभ्यास होता.आम्हाला इंग्रजी शिकवता शिकवता अनेकदा ते मध्येच मराठी कवितेविषयी बोलायला लागायचे. त्यांचा तो तास म्हणजे माझ्यासाठी अक्षरश: साहित्यिक पर्वणी असायची.त्यांनी अशा मराठीच्या जादा तासात आम्हाला कुसुमाग्रज, बालकवी, विंदा, भा. रा. तांबे, केशवसुत, ग्रेस अशा महान साहित्यिकांच्या अनेक गाजलेल्या कविता रसग्रहणासह शिकवल्या. एखाद्या कथेचा किंवा कादंबरीचा रसास्वाद कसा घ्यायचा, ते आम्ही त्यांच्यामुळे शिकलो. ‘नटसम्राट‘, ‘अश्रूंची झाली फुले‘, ‘एकच प्याला‘सारखी अनेक नाटके सरांना त्यातील प्रसंगांसहित तोंडपाठ होती.ते एखाद्या नाटकाविषयी बोलायला लागले, की असे वाटायचे की आपण ते नाटक स्टेजवर पाहतोय! अजूनही त्यांचे ते तास जसेच्या तसे आठवतात... विद्यासागर सरांनी शिकवलेलं ‘पृथ्वीचं प्रेमगीत‘, ‘खबरदार जर टाच मारुनी‘ वा ‘जन पळभर म्हणतील हाय हाय‘ यांसारख्या अनेक कविता आजही जशाच्या तशा स्मरणात आहेत. त्या साहित्यसंस्कारांमुळे पुढील आयुष्यात मला वाचनाची प्रचंड गोडी लागली. आपल्या वैयक्तिक आयुष्यात नोकरीत मी पायरी-पायरीने प्रगती साधत राहिलोच; पण लेखन क्षेत्रातही नेहमीच काही ना काही धडपड करत राहिलो..याचे श्रेय अर्थातच विद्यासागर सरांचे आहे. आतापर्यंतच्या माझ्या लेखनप्रवासामध्ये दोन कवितासंग्रह,एक लेखसंग्रह काही कथा आणि ललित लेख प्रसिद्ध झाले आहेत. २००७ साली प्रसिद्ध झालेल्या माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला माझ्या आवडत्या शिक्षकाची ...या विद्यासागर सरांची प्रस्तावना घेण्याची माझी इच्छा होती.माझ्या मॅट्रिकनंतर पुढच्या 30 वर्षांमध्ये त्यांच्याशी अजिबात संपर्क नव्हता... रयत शिक्षण संस्थेतून ते उपसचिव पदावरून निवृत्त झाले होते. त्यांची प्रस्तावना घेण्यासाठी पुण्यात त्यांचे घर शोधून मी त्यांना भेटलो. माझी ओळख आणि भेटण्याचे प्रयोजन सांगताच त्यांनी आनंदाने हे काम केले. एक सुंदर प्रस्तावना लिहून दिली. माझे व्यक्तिमत्व घडण्यात त्यांनी कळत-नकळत केलेले संस्कारच कारणीभूत आहेत, हे सांगायला मला नेहमीच अभिमान वाटतो. ©प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, June 16, 2021

गोंधळात गोंधळ

#चित्रपट_आठवण नोकरीला लागल्यावर असेच एक दिवस ऑफिसमधून आम्ही चार मित्र प्रभातला लागलेला अशोक सराफचा ( बहुतेक गोंधळात गोंधळ) सिनेमा बघायला गेलो.मध्यंतर झाले आणि आम्ही चौघेही थिएटर मधून बाहेर यायला लागलो.आमच्या समोर एक जोडपे म्हणजे त्यातला पुरुष बाईच्या कमरेला हात घालून बाहेर निघाला होतो.आम्ही तो सीन बघत त्यांच्या मागून एकमेकांना खुणा करत हसत येत होतो. थिएटर मधील अतिमंद प्रकाशातून ते जोडपे बाहेर उजेडात आल्याबरोबर त्यातल्या पुरुषाने विजेचा झटका लागल्यासारखा त्या बाईच्या कमरेवरचा हात काढून कावरा बावरा होऊन कुणाला तरी शोधत परत थिएटरमध्ये जायला लागला! हा बाबा असा का उलटा फिरला म्हणून आम्ही तसेच जागेवर थांबलो... पहातो तो आत जाऊन दुसऱ्या बाई बरोबर-आपल्या बायकोबरोबर पुन्हा तो बाहेर येत होता .... येता येता ओशाळून तो बायकोला सांगत होता... " अशी कशी मागे राहिलीस ग? तू समजुन मी भलत्याच बाईच्या कमरेला विळखा घालून डोरवर आलो ना! " बायकोच्या डोक्यात काही लवकर प्रकाश पडला नाही.. " हो का...चला वडा पाव घेऊ" आम्ही चौघेही एकमेकांना टाळ्या देत जोरात हसत राहिलो... ' गोंधळात गोंधळ! ' ©प्रल्हाद दुधाळ.

Friday, June 11, 2021

इंग्रजी सिनेमा...आठवण

#चित्रपट_आठवण मी वयाच्या सतरा वर्षापर्यंत थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिला नव्हता.तोपर्यंत रोडवर किंवा फार फार तर टुरिंग टॉकीजमधे काही सिनेमे पाहिले होते.शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर मित्रांबरोबर जमेल तसे खिशाला परवडतील असे चित्रपट पहात होतो. मी त्यावेळी गरवारे कॉलेजात शिकत होतो आणि सकाळी ऑफ पिरीयड असला की तेथून जवळ असलेल्या अलका टॉकीजला बऱ्याचदा matinee show बघितला जायचा.तिथे फारसा चॉईस नसायचा.टाईमपास करणे एवढाच उद्देश असल्याने त्या काळात मी गुरुदत्तचा ' प्यासा ' किमान सहा वेळा बघितला होता! त्याच दरम्यान अलकाला The Spy Who Loved Me हा बाँड पट लागला होता.वर्गात या इंग्लिश सिनेमाची अगदी रसभरीत चर्चा चालू होती.मी एकही इंग्लिश सिनेमा तोपर्यंत पाहिलेला नव्हता त्यामुळे एकदा तरी तो अनुभव घ्यावा अशी सुप्त इच्छा मनात होती. कुळकर्णी नावाच्या माझ्या एका मित्राला मी माझ्याबरोबर सिनेमाला यायला तयार केला आणि पैशाची जमवाजमव करून अलकाला दुपारच्या शोला बुकिंग खिडकिसमोर लाईनीत उभे राहिलो. सिनेमाला खूपच गर्दी जमली होती.मला सिनेमाचे तिकीट काढायचा फारसा अनुभव नसल्याने कुळकर्णी लाईंनमधून खिडकीवर गेला आणि दोन बाल्कनीची तिकिटे घेऊन आला.त्याने एक तिकीट मला दिले आणि एक स्वतःकडे ठेवले. शो सुरू व्हायच्या वेळेला तो पुढे आणि मी त्याच्या मागे हॉलमध्ये निघालो... डोअर किपरने त्याचे तिकीट अर्धे फाडून त्याच्या हातात कोंबत कुलकर्णीला आत सोडले .त्याच्या मागे मी माझे तिकीटही डोअर किपरकडे दिले.त्याने माझ्याकडे नीट पाहिले आणि तो म्हणाला... " तुला नाही सोडू शकत आत..." " पण; का?" " हा adult सिनेमा आहे,फक्त प्रौढांसाठी..." " अहो मी कॉलेजात शिकतो " त्याने मला वरून खालपर्यंत न्याहाळले... त्याची फारशी चूक नव्हती... हे खरे होते की मी वयाच्या मानाने खूपच बारका आणि कोवळा वाटत होतो... " बघू तुझे आय कार्ड?" नशीब माझे आय कार्ड खिशात होते! मी लगेच माझे कार्ड त्याला दाखवले.त्याने पुन्हा पुन्हा माझा फोटो आणि Year of Study समोरील S.Y. B.Sc वाचले आणि माझ्याकडे पहात म्हणाला... " खोटी जन्म तारीख लावली का रे?" " नाही हो..." नाईलाज झाल्यासारखा चेहरा करून त्याने एकदाचे मला आत सोडले... कुळकर्णी माझी वाट पहात दरवाजाशी उभा होता.आम्ही आमच्या खुर्च्या शोधून त्यावर बसलो.तोपर्यंत सिनेमाची टायटल होऊन गेली होती! तर अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यातला पहिला इंग्लिश सिनेमा( तोही जेम्स बाँड 007 चा!) पाहिला ... The Spy Who Loved Me.. © प्रल्हाद दुधाळ.

Sunday, May 9, 2021

मदर्स डे

 आज 'मदर्स डे'....मातृदिन ...

आपल्याकडे बरेच लोक अशा नात्यांसाठी वेगळे वेगळे दिवस साजऱ्या करण्याच्या फॅडला नाके मुरडताना दिसतात,मला मात्र पाश्चात्य संस्कृतीचे या 'डे' ज साजऱ्या करायच्या पद्धतीचे कौतुक वाटते.

कुणी म्हणेल त्यात कौतुक ते काय?

आम्ही संपूर्ण वर्षभर प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या नात्यांचे उत्सव साजरे करतच असतो,प्रत्येक नात्याचा वेगळा दिवस साजरा करायची आम्हाला गरजच नाही...

हो, मान्य आहे... आपली संस्कृती नक्कीच महान आहे आणि पूर्वी आमच्या प्रत्येक सणासुदीत आम्ही विविध नात्यांचा सन्मान करत होतो आणि आजही ती परंपरा काही प्रमाणात जोपासली जात आहे,पण हे सुध्दा तेव्हढेच खरे आहे की जागतिकीकरणाच्या धबडग्यात आपण न कळत का होईना पाश्चात्यांच्या पद्धतींचे अनुसरण करतो आहोत.

   आपल्या परंपरा सांभाळून असे हे सण उत्सवही साजरे करायला काय हरकत आहे ?

तर या मातृदिनाच्या निमित्ताने माझ्या काही कविता  ...खास आईसाठी!

हर दिन मातृदिन.....

मातृदिन आज

उमाळे मायेचे

हर दिवसाचे

होऊ देत...

आईसवे फोटो

सजल्यात भींती

कविता या किती

लिहिल्या हो...

स्मरतात सारे

उपकार तिचे

जग ते आईचे

गुण गाई...

एका दिवसाचा

नको हा देखावा

हर दिन व्हावा

मातृदिन...

सांभाळले तुम्हा

लावला जो जीव

असावी जाणीव

रात दिन...

थकलेली माय

ओझे नये होऊ

काळजी घे भाऊ

आईची रे...

पालक म्हातारे

अनुभवांचा ठेवा

उपयोग व्हावा

संस्कारांचा...

नात्यांचे हे दिन

उपयुक्त सारे

समजून घ्यारे

मोल त्यांचे...

मातृदिनी आन

जोपासेन नाती

नाहीतर माती

जीवनाची...

प्रत्येकाच्या आईने खूप कष्ट घेतलेले असतात आपल्या लेकरांसाठी...

आता माझी आईच बघा ना...


ती कभी ना पाहिली थकलेली 

समस्येसी कुठल्या ती थबकलेली 

सुरकुतल्या हातात हत्तीचे बळ

आधार मोठा असता ती जवळ

कोणत्याही प्रसंगी मागे सदा सर्वदा

निस्वार्थ सेवा वृतीने वागे ती सदा 

माया ममता सेवा भरलेले ते गांव 

सदा ओठी असु दे आई तुझे नाव!


अशी ती राबत असायची सतत ...सदैव ..

आई...

कोंबड आरवायच्या आधीच 

तिने घेतलेली असायची 

डोक्यावर माळव्याची पाटी

चालत रहायची अनवाणी 

नसायची अंधाराची अथवा 

विचूकाट्याची भीती 

मनात एकच ध्यास 

दिवस वर येण्यापूर्वी 

पाटीतला भाजीपाला 

खपायलाच हवा... 

परत धा वाजता 

मजुरीवर पोचायला हवं... 

तिच्या त्या ढोर मेहनतीत 

तिने पेरली होती 

उज्वल भविष्याची स्वप्ने... 

आज ना उद्या या घामावर 

सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल.....

कधीच ती दिसली नाही हतबल 

पण....

माहीत नाही तिची स्वप्ने 

पूर्णत्वाला गेली की नाही 

सुखदु:खात कायम स्मरते 

माझी सतत राबणारी आई! 

  आज ती नाही...पण...

  आईने शिवलेली एक मायेची गोधडी अजूनही माझ्याकडे आहे...तीची आठवण..

मायेची गोधडी...

नऊवारी जुन्या साड्या जपून जपून ठेवायची,

फाटक्या कपड्यातले डिझाईन कापून जपायची,

रंगीबेरंगी चिंध्या नी काठ शिंप्याकडून आणायची,

ऊन तापायला लागलं की स्वच्छ धुवून सुकवायची,

फुरसतीचा दिवशी मोठ्या सुईत दोरा ओवायची,

जमिनीवर कपडे अंथरून तयार व्हायचं डिझाईन,

चौकोन त्रिकोण,पक्षांचे आकार रंगीत वेलबुट्टी,

कल्पनेला फुटायचे पंख, पळायचा धावदोरा सुसाट,

आकाराला यायची आईच्या हातची मायेची गोधडी!

तिच्यात असायची स्नेहाळ ऊब थंडीत रक्षणारी,

गुरफटून घेताच गाढ झोप लागायची जणू कुशीसारखी!

आता गोधडी जीर्ण झालीय,तरी जपतोय आठवण,

मन सैरभैर होते तेव्हा तेव्हा शिरतो या गोधडीत,

मायेचा हात फिरतो पाठीवर,मिळते नवी उमेद!

लाखोच्या आलिशान गादीवर नाही मिळत ते सुख,

मिळते जे मायेच्या त्या जीर्ण ओबडधोबड

गोधडीतून!

अशी असते आई...तिच्या नसण्याने आयुष्य अर्थहीन होऊन जाते ..

तुझ्याविना आई ...

वासल्य करुणा माया ममता

 हृदयात भरली ठाई ठाई,

त्यागास त्या लेकरास्तव

वरणाव्यास योग्य शब्द नाही!

 तव कष्टास त्या सीमा नव्हती,

 संकटांची मालिका ती भवती 

 हसतमुखी गायलेली अंगाई 

 कसे होऊ आम्ही उतराई?

 संस्कारांची दिली शिदोरी 

  स्वाभिमानाची बळकट दोरी 

  आशीर्वाद नी तुझी पुण्याई

  चाललो आडवाट वनराई

  जात्यावरील ओवी आठवे

  स्वाभिमानाची ज्योत आठवे

  आहे येथेच भास असा होई

  तुझ्याविना व्यर्थ हे जिणे आई!

आईने इतके कष्ट घेऊन मोठे केले तेव्हा तिला एक शब्द देणे आवश्यकच होते...


गवसणी...

 शिकवलेस स्वाभिमानी जगणे 

 माणुसकीने जिंकण्याचा ध्यास,

 संकटातही आई शोधेन संधी 

 घालेन गवसणी मी गगणास!


नक्कीच ...आईच्या त्या प्रचंड उपकारांचे उतराई होणे केवळ अशक्य आहे...

असं असलं तरीही समाजात आज वेगळं वेदनादायी चित्र बघायला मिळते आहे ..

महान संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या आमच्या देशातले हे चित्र नक्कीच विचार करायला लावते..m

आज  मातृदिन म्हणजे अनेक कृतघ्न लोकांसाठी केवळ एक उपचार झालेला आहे....ते झाले आहे...

सेलिब्रेशन... 

तो पोटचा पोरगा 

नटवलेल्या बायको आणि पोरांना घेऊन

मिठाईचं मोठ्ठ खोकं घेऊन 

सक्काळी सकाळी

आश्रमाच्या गेटवर आला तेव्हा

तिच्या सुरकुतलेल्या चेहर्यावर आणि डोळ्यात 

खूप खूप दिवसांनी मोकळढाकळं

हास्य ओसंडलं

भराभर उरकून

ठेवणीतलं लुगडं नेसून

थरथरते पाय सावरत

व्हरांड्यात ती उभी्.....

आज कित्येक दिवसांनंतर

नातवंड गळ्यात पडणार होती....

तिला अनुभवाने आता हे माहीत होतं...

आता मोबाईल सरसावतील

अंगाखांद्यावर तिच्या सलगीने रेलून

मिठाईचा मोठा तुकडा

तोंडात कोंबता कोंबता

होईल फोटोंची लयलूट

उद्या झळकतील छब्या 

सोशल मिडियावर...

तिने झटकले मनातले विचार ..

मनोमन...

हात जोडले त्या गोऱ्या साहेबाला...

जाता जाता देवून गेलेल्या संस्काराला...

‘मदर्स डे’

एक निमित्त...

पाडसांना कुरवाळण्याचं

कोंडलेल्या वात्सल्याला

वाट करून द्यायचं...

आता तिचा उत्साह दुणावला...

सज्ज आता ती....नव्याने....

‘मदर्स डे’

सेलिब्रेशनसाठी....

हे कटू असले तरी सत्य आहे...

यांना कोणीतरी सांगा हो..

मदर माता अम्मी वा मम्मी

माय अथवा म्हणू दे आई ....!

जगात निरपेक्ष स्नेहाचे

दुजे नाते आस्तीत्वातच नाही...!


आई... मातृदिनाच्या निमित्ताने तुला विनम्र अभिवादन...

..... ©प्रल्हाद दुधाळ.

       (९४२३०१२०२०)

Monday, March 8, 2021

महिला दिन स्पेशल

 #womensdayspecial 

  मी १९८१ साली टेलिफोन खात्यात टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरीला लागलो.त्या आधी पुण्यात तरी या पदावर फक्त महिलांचीच भरती होत असायची.तो  ट्रंक कॉल बुक करून संभाषण होण्यासाठी तासनतास वाट बघण्याचा काळ होता, आणि हे कॉल जोडून द्यायचं काम आमच्या खात्याच्या या महिला टेलिफोन ऑपरेटर तिन्ही शिफ्टमध्ये काम करून करायच्या.१९८० दरम्यान तांत्रिक बिघाडासंदर्भातील कामात महिलांच्या मर्यादा लक्षात घेऊन ऑपरेटर पदावर पुरुष कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आणि त्यातल्या दुसऱ्याच बॅचमध्ये माझी खात्यात वर्णी लागली.

    ट्रेनिंग संपले आणि पोस्टिंग झाल्यावर पहिल्याच दिवशी लक्षात आले की पस्तीस स्टाफ असलेल्या आमच्या सेक्शनला आम्ही केवळ सहाजण पुरुष ऑपरेटर होतो,एवढेच नाही तर आमच्या सहा सुपरवायझरमध्ये चार महिला होत्या! आमच्या सेक्शन प्रमुख पदी (ज्याला हायर ग्रेड सुपरवायझर असे म्हणत असत)एक अत्यंत कडक स्वभाव असलेल्या महाडिक नावाच्या मॅडम होत्या,आणि त्यांची सेक्शनवर प्रचंड दहशत होती....

    थोडक्यात प्रचंड प्रमाणात महिलाराज असलेल्या त्या सेक्शनमध्ये आणि टेलिफोन खात्यात मला आता काम करायचे होते... आत्तापर्यंतचे  माझे आयुष्य खेड्यात गेलेले, शिवाय त्या काळात मी येरवड्यात नागपूर चाळीत रहात असल्याने ग्रामीण आणि शिवराळ भाषा बोलण्यात सवयीची होती. बोलताना तथाकथित असंस्कृत शिवराळ शब्दही बऱ्याचदा तोंडाला यायचे आणि इथे तर बोलण्याचेच काम होते तेही महिला बाजूला बसलेल्या असताना!,त्यामुळे खूपच टेन्शन आले होते. 

    कार्यालयात या महिलांशी बोलताना चुकूनही वावगा शब्द ओठांवर येऊ नये म्हणून सुरुवातीला खूप काळजी घ्यावी लागली, पण लवकरच महाडिक मॅडमने लावलेल्या शिस्तीमुळे भाषा सुधारलीच, शिवाय कामातही तरबेज झालो...

   माझी कामातली हुशारी पाहून माझ्यावर काही विशेष कामे सोपवली गेली आणि शिफ्ट ड्युटी मधून माझी सुटका झाली.प्रमोशन साठी परीक्षेच्या अभ्यासाला वेळ मिळाल्याने पहिल्या पाच वर्षांतच मला प्रमोशन मिळून टेलिफोन इन्स्पेक्टर झालो, पुढे तीन चार वर्षात ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर झालो....

    आता जरी मी वर्ग दोनचा अधिकारी झालो असलो तरी समोर वेगळाच प्रश्न उभा रहायचा; कारण ज्यांच्या बरोबर पूर्वी मी ऑपरेटर म्हणून काम केले होते अशा महिलांचा बॉस म्हणून मला काम करावे लागत होते! २००५ साली माझ्याकडे ग्राहक सेवा केंद्राचा उप विभागीय अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली.bsnl ने नुकतीच मोबाईल आणि ब्रॉडबांड सेवा सुरू केली होती आणि  निदान हजार पाचशे ग्राहक इथे आपल्या समस्या घेऊन दररोज यायचे.माझ्या हाताखाली सत्तावीस महिला कर्मचारी कार्यरत होत्या आणि सगळ्यांची मर्जी सांभाळत काम करवून घेण्याचे मोठे आव्हान समोर असायचे,पण मुळात नेहमीच सर्वाँना बरोबर घेऊन माझी काम करण्याची पध्दत मला मदतीला आली आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या स्टाफने प्रचंड सहकार्य केले मला त्रास होईल असे कोणीही वागले नाही,उलट आपल्यातूनच वरच्या पदावर गेलेल्या या मित्राला जास्तीत जास्त मदत करून सेक्शनची आणि पर्यायाने आपल्या साहेबाची कार्यक्षमता कशी उत्कृष्ट होईल हे पाहिले जायचे.

   कधी कधी तर मला असेही काही सेक्शन मिळाले जेथे पूर्वी माझ्या सिनियर असलेल्या महिलांची माझ्या हाताखाली नेमणूक झाली.इथे त्यांना योग्य तो मान देऊन त्यांच्याकडून भरपूर काम करून घेण्यासाठी मला माझे सारे कौशल्य पणाला लावायला लागायचे आणि मी त्यात यशस्वी व्हायचो. यासाठी मी माझी म्हणून एक कार्यशैली विकसित केली होती.सगळ्यांचे वाढदिवस साजरे करणे, दर आठ मार्चला Women's Day ला खास सुजाता मस्तानी मागवायची.सगळ्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आणि नियमात बसवून शक्य तेवढी मदत देण्याचा प्रयत्न करायचा, धीराचे दोन शब्द बोलायचे, सगळ्यांची विचारपूस करत रहायचे अशा पद्धतीच्या वागण्याने मी  स्टाफ बरोबर आपलेपण जोपासत राहीलो त्यामुळे माझी जिथे जिथे बदली झाली तो सेक्शन माझे कुटुंब होऊन जायचा! 

   माझ्या या कामाच्या पध्दतीमुळे प्रत्येक ठिकाणी मला हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडून  प्रचंड सहकार्य मिळत राहिले आणि मी कायमच एक कार्यक्षम अधिकारी म्हणून नावारूपाला आलो.

एक यशस्वी अधिकारी म्हणून मी निवृत्त झालो याचे श्रेय अर्थातच या स्टाफचे आहे... आजच्या या महिला दिनी माझ्या यशासाठी ज्या महिलांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे नक्कीच माझे कर्तव्य आहे म्हणून हा पोस्ट प्रपंच....

 महिला दिनानिमित्त सर्व स्री जगताला सलाम!

© प्रल्हाद दुधाळ.

Saturday, February 27, 2021

तुम्हीच ठरवा

 कोणतीही व्यक्ती इतरांसाठी चांगली किंवा वाईट हे कशावरून ठरते? 

    खरं तर माणूस चांगला आहे किंवा वाईट आहे असे काही नसते! 

   माणूस समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे वागला की संबंधीत माणूस त्या व्यक्तीच्या दृष्टीने चांगला, तर तो त्याच्या मनाविरुद्ध वागला की तो वाईट ठरतो...

    त्यामुळेच असेल एकच व्यक्ती एखाद्याच्या दृष्टीने चांगली असते,पण दुसऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून तीच व्यक्ती वाईट असू शकते!

    तुम्हाला कुणी चांगले म्हणते म्हणून तुम्ही चांगले असालच असे मुळीच नाही!

   तुम्ही चांगले तेव्हाच ठराल जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःला चांगले असल्याचे पटवून द्याल...

  तेव्हा, तुम्हाला कोण काय समजतो त्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत तुम्ही चांगले रहाण्याचा प्रयत्न करायला हवा. एकदा का तुम्ही चांगलेच आहात हे स्वतःला वागण्या बोलण्यातून समजावले की काय बिशाद आहे तुम्हाला कोणी वाईट म्हणायची? आणि त्यातूनही कुणी बोट दाखवले तर त्याला फार गंभीरपणे घ्यायची गरज नाही...बरोबर ना?( सहजच)

©प्रल्हाद दुधाळ.

मराठी भाषा दिवस आणि आपण

 आपले जगणे अधिकाधिक सोपे व्हावे म्हणून माणसाने जसा विविध यंत्रांचा शोध लावला तसाच आपल्या बोलण्यातला अघळपघळपणाही कमी करून आपला वेळ आणि ऊर्जा वाचवायचा प्रयत्न केला आहे.

   प्रत्येक गोष्टीला आटोपशीर आणि सोपे करायच्या नादात त्याच्या लिहिण्यात आणि बोलण्यात अनेक शॉर्टकट आले.इंग्रजी भाषेतल्या अनेक शब्दांची लघुरुपे आपण अगदी मराठीत बोलतानाही सर्रास वापरतो.समोरासमोर भेटायला वेळ नाही म्हणून सुरुवातीला फोनवरून होणाऱ्या गप्पांना चॅटिंगचा सोपा पर्याय आला आणि लांबलचक टाईप करून शाब्दिक गप्पा सुरू झाल्या. मग पुढे जाऊन टायपिंगचा वेळ वाचवण्यासाठी विविध शब्दांचे शॉर्टकट वापरात आले.वाढदिवसाच्या शुभेच्छा,गुड मॉर्निंग, गुड नाईट,इत्यादी hbd, gm, gn इतके आकुंचित झाले! 

   त्यातच सोशल मीडियावर विविध ईमोजी आल्या आणि शब्दांपेक्षा या बाहुल्याच मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी सर्रास वापरल्या जाऊ लागल्या आहेत...

  मनातले चार शब्द लिहिण्यासाठी लोकांना वेळ नाही त्या ऐवजी तिथे बाजूला तयार असलेल्या इमोजींपैकी एकावर टिचकी मारून भावना व्यक्त करण्याचा शॉर्टकट लोकांच्या सवयीचा होऊ पहात आहे.

   एका बाजुला मीssमsराsठी चा गजर करायचा,पण एरवी दिवसभरात एखादा मराठी शब्द लिहिण्याचीही तसदी घ्यायची नाही असा करंटेपणा सुरू झाला.वर्षातून एकदाच मराठी भाषा दिनाच्या दिवशी आमची मराठी किती महान आहे याचे गोडवे गायचे,पण एरवी सगळा आनंदी आनंदच आहे....

   मराठी भाषा मराठी माणसांनी वापरली तरच जगणार आहे तेव्हा आपल्या या अमृतापेक्षा गोड भाषेचा वापर जाणीवपूर्वक करूया....

  मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

  ©प्रल्हाद दुधाळ.

Friday, February 26, 2021

लवचिकता... एक आवश्यक बाब

 आपल्या लहानपणापासून आपण काही समजुती (किंवा गैरसमजुतीही) आपल्या मनात घट्ट बसवून ठेवलेल्या असतात.

   आपल्या भोवतालच्या परिस्थिती आणि माणसांनी या समजुती मनात अजूनच पक्क्या बिंबवण्यास मदत केलेली असते.

   माणसाचे वय वाढते तसे तसे खरं तर या समजुती तार्किक कसोट्यांवर घासून त्याची सत्य अथवा असत्यता पडताळून पहाणे अपेक्षित असते,पण प्रत्यक्षात मात्र माणूस अशी पडताळणी करायच्या भानगडीत पडत नाही.त्या समजुती बद्दल प्रश्न पडले तरी कुणी तरी दुखावले जाईल किंवा आपण कशाला आपले डोके चालवायचे? असा विचार करून त्या समजुती अंधपणे आपण कुरवाळत बसतो.कधी कधी तर या समजुती स्वतःच्या अहंकाराशी जोडून चुकीच्या पद्धतीने वागले जाते...

   खरं तर आपली वैचारिकता लॉजिकल आहे का हे वेळोवेळी तपासून बघायला हवे...

   काही चुकत असेल तर स्वतःमध्ये आवश्यक असलेले बदल अंगिकारण्यात कसला आलाय कमीपणा? ही लवचिकता तुमच्या अंगी असली ना की जीवनात आनंदी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही! बरोबर ना?( सहजच)

©प्रल्हाद दुधाळ.

Thursday, February 18, 2021

मी एक कॉम्रेड

 मी एक कॉम्रेड

गोष्ट 1985-86 मधली आहे, नोकरीत थोडाफार रुळलो होतो. 

   कामगार संघटनेचा सभासद असलो तरी फारसा ॲक्टिव नव्हतो. त्याच दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग नेमावा या मागणीसाठी देशभरातील कर्मचारी संघटनांनी आंदोलने करायला सुरुवात केली होती आणि त्याचा भाग म्हणून पुण्यातल्या सर्व केंद्रीय कर्मचारी संघटनांनी एका मोर्चाचे आयोजन करायचा निर्णय घेतला.पुण्याचे विधानभवन ते अलका टॉकीज असा भरपूर लांब मार्ग मोर्चासाठी ठरला.भर दुपारच्या उन्हात होरपळत जाणाऱ्या या मोर्चात सामील व्हायची माझी तरी तयारी नव्हती त्यामुळे मोर्चा सुरू होण्यापूर्वीच आपण ऑफिसातून हळूच मागच्या गेटमधून कलटी मारायची असा बेत मी केला होता.या गेटकडे कुणाची नजर असायची शक्यता नव्हती....

   आमच्या टेलिफोन खात्यातल्या सगळ्या कामगार संघटना या मोर्च्यात सामील होणार होत्या त्यामुळे सगळे पुढारी आपापल्या सदस्यांवर कुणी पळून जाऊ नये म्हणून नजर ठेऊन होते.त्यावेळी मी ज्या संघटनेचा सदस्य होतो त्या संघटनेची धुरा एका धिप्पाड रणरागिणीकडे होती....

  आमच्या खात्यात या कॉम्रेड शारदा मॅडमचा प्रचंड दरारा होता.खात्याचे मोठे मोठे अधिकारीसुध्दा तिला प्रचंड घाबरायचे.एखादे काम घेऊन ती अधिकाऱ्याकडे येणार आहे असा नुसता निरोप गेला तरी ते काम आधीच व्हायचे एवढी या मॅडमची दहशत होती! वेळ आली तर समोरच्या व्यक्तीच्या कानाखाली वाजवण्याची तिची तयारी असायची त्यामुळे सगळे सदस्यही तिला टरकून असायचे.त्या काळात ती स्कुटरवरून फिरायची.कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हककांसाठी प्रशासनाशी कोणत्याही प्रकारचा पंगा घ्यायच्या तिच्या गुणांमुळे पुण्यात तिच्या संघटनेची सदस्यता सर्वात जास्त होती....

  तर,त्या दिवशी ठरवल्याप्रमाणे मी मोर्चाला जायला नको म्हणून हळूच ऑफिसच्या मागच्या गेटने बाहेर सटकलो.या गेटमधून बाहेर पडले की एका निमुळत्या गल्लीतून थेट सदर्न कमांडच्या प्रवेशद्वाराकडे बाहेर पडता यायचे त्यामुळे हा सेफ मार्ग मी निवडला होता...

 आता कुणाच्याही लक्षात न येता मी मोर्चाच्या विरुध्द दिशेकडे बाहेर पडणार होतो आणि भर उन्हातली माझी पायपीट वाचणार होती...

   मी गल्लीतून बाहेर पडणारच होतो तोच समोर एक स्कूटर येऊन उभी राहिली,आणि स्कुटरवर साक्षात कॉम्रेड शारदा!

  " काय रे, कुठे चाललाय?"

  " कुठे काय,... कुठे म्हणजे?.. तिकडे मोर्चाकडेच निघालोय की..." 

मी सारवा सारव करायचा प्रयत्न करायला लागलो. .

  माझ्याकडे हसरा कटाक्ष टाकून मॅडम म्हणाल्या  ....

 " बरं, चल बस माझ्यामागे ..."

 आता काही पर्यायच नव्हता...

 मी गुमान मॅडमचया मागे स्कूटरवर बसलो. तोपर्यंत मोर्चाचे सुरुवातीचे टोक पार ससून हॉस्पिटल ओलांडून पुढे गेले होते तर शेवटचे टोक अजून विधान भवनातच होते....

   मला वाटल होत की विधानभवनात नेऊन मला मोर्चेकऱ्यात सामील केले जाईल,पण मॅडमने स्कूटर मोर्च्याच्या कडे कडेने थेट नरपत गिर चौकाकडे जेथे मोर्चाचे पुढचे टोक होते तिकडे नेली...

  आमची वरात आता पार मोर्चाच्या सुरुवातीच्या पुढारी मंडळींपर्यंत पोहोचली होती ...

 कॉम्रेड शारदाने मला सरळ मोर्चाच्या फ्रंटवर नेले तिथे एकाच्या हातात असलेला भला मोठा लाल बावटा काढून घेऊन माझ्या हातात दिला आणि जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली!

   कामगार चळवळीत तोपर्यंत अगदीच बॅकफुटवर असलेल्या माझ्या हातात अचानकपणे कामगार चळवळीचा लाल बावटा देऊन कॉम्रेड शारदाने मला मोर्चातला क्रियाशील कार्यकर्ता केले...

  पुढे नोकरीत पस्तीस वर्षे मी कोणत्या ना कोणत्या कामगार वा अधिकारी संघटनेत जिल्हा स्तरावर पदाधिकारी म्हणून काम करायचे होते कदाचित त्याची मुहूर्तमेढ अशी रोवली गेली ..

   आजही मी निवृत बी एस एन एल अधिकारी संघटनेचा फायनान्स सेक्रेटरी आहे आणि तो बावटा अजूनही तसाच हातात आहे...

 ©प्रल्हाद दुधाळ.