Friday, October 25, 2013

रोखठोक.


              रोखठोक.  
         काही माणसे मनात येईल ते बोलून टाकतात.राग,लोभ जे व्हायचे ते होऊ दे असा विचार करून जी काही  मनातली भावना असेल ती रोखठोक बोलतात. अशा स्पष्ट वक्तेपणामुळे समोरचा माणूस  दुखावला तरी त्याची ते पर्वा करत नाहीत. जे खरे आहे ते बोलल्यामुळे किंवा वास्तव समोर ठेवल्यामुळे जरी तात्पुरता वाईटपणा आला. तरी तो घेण्याची अशा माणसांची तयारी असते. अशा प्रसंगी ऐकणाऱ्याला जे आहे ते जरी कटू असले तरी सत्य काय आहे हे माहीत होते. गप्प राहून किंवा गुळमुळीत उत्तर देऊन वेळ निभावून नेण्याच्या भागुबाई  वृत्ती पेक्षाहा रोखठोकपणा शत पटींनी चांगला.यातून फार तर आजचा दिवस निभावला जातो. पण आज ना उद्या सत्य समोर येते व केवळ वाईटपणा घ्यायला नको म्हणून केलेला खोटेपणाही उघड होतो. अशा केलेल्या खोटेपणामागे बऱ्याच वेळा तात्कालिक स्वार्थ असतो! अशा प्रसंगी परस्परात गैरसमज वाढू शकतात. खरे तर योग्य वेळी खरी परिस्थिती समोर ठेवली तर समोरचा माणुसही जमिनीवर राहून विचार करू शकतो.जे आहे त्यांचा स्वीकार करून पुढची वाटचाल करू शकतो. पण ......

                  पण नाही म्हणायला जे धैर्य लागते ते सर्वांपाशी कुठे असते?

                असे रोखठोक वागण्याची तेव्हढीच मोठी किंमतही मोजावी लागेल या जाणीवेने व भित्रेपणामुळे लोक असा वाईटपणा घेत नाहीत!  

Tuesday, October 8, 2013

विवाहोत्तर नात्यांचे संगोपन.


विवाहोत्तर नात्यांचे संगोपन.

 

                  भिन्न वातावरणात वाढलेले ते दोघे जेंव्हा लग्नानंतर पती-पत्नी च्या भूमिका साकारायला लागतात तेंव्हा बऱ्याचदा एकमेकाला समजून घेताना अडचणी येऊ शकतात. लग्नानंतर पती-पत्नी मधील नात्यांचे योग्य संगोपन होणे आवश्यक असते.एकमेकांना समजून घेताना वयक्तिक अवकाशाचा योग्य तो आदर ठेऊन काही घेण्याबरोबरच काही देण्याची मानसिक तयारी ठेवायला हवी. मी च्या जागी आम्ही यायला हवा.पती-पत्नी या नात्याबरोबरच दोघांच्याकडील कुटुंबे ही एकमेकाशी जोडली जातात. सख्ख्या नात्यागोत्यांबरोबरच चुलत/मावस नातेसंबंधही सांभाळावे लागतात. काही नाजूक नाती ही काचसामानाप्रमाने जपावी लागतात. नातेसंबंध सांभाळताना बऱ्याचदा अनोळखी घरात नुकत्याच आलेल्या नववधूला तारेवरची कसरत करावी लागते. लग्न करताना त्यानंतर कराव्या लागणार्या अशा तडजोडींचा जर आधीच विचार व मानसिक तयारी केलेली असेल तर गोष्टी सोप्या होऊन जातात, पण संपर्कात येणारी  व्यक्ती जर विनाकारण वाकड्यात घुसणारी, नकोसे रिमार्क पास करणारी किंवा टोमणे मारणारी असेल तर उमलण्यापूर्वीच अशी नाती कोमेजू शकतात. घरात आलेल्या नववधुला जर पहिल्या दिवसापासूनच मानापमानाच्या तराजूत तोलले जात असेल तर घरातील वडीलधार्या माणसांनी हस्तक्षेप करून योग्य ती जाणीव संबंधितांना देणे आवश्यक ठरते. नातेसंबंधातील पोषणासाठी घरातील प्रत्येकानेच समंजसपणे वागणे फायद्याचे आहे. प्रख्यात डॉ.ऋजुता विनोद यांच्या मते नवराबायकोचा  संसार यशस्वी होण्यासाठी त्यांच्या भावी  सुखी संसारात पती-पत्नी ही भूमिका जरी मध्यवर्ती असली तरी प्रसंगानुरूप वेगवेगळ्या भूमिका दोघांना साकाराव्या लागतात.-

 

                १.प्रियकर प्रेयसी भूमिका- ही पती-पत्नीमधील  सर्वात भावणारी भूमिका आहे .या भूमिकांमध्ये स्पर्धा ,अहंकार वा कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड यांना थारा नाही.केवळ निकोप प्रेम या नात्यात असते.एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी व उस्फूर्तता व प्रसंगी वेडेपणा या भूमिकांत असतो. या नात्यात खोडकरपणा आहे. काव्य आहे,रसिकता आहे , निरागसता आहे. मोकळ ढाकळ पारदर्शी असे हे नाते असते. लग्नानंतर काही दिवस केवळ याच भूमिका जगल्या जातात. हळू हळू जबाबदार्यांच्या जाणीवा वाढतात आणि या भूमिकांचा प्रभाव कमी होऊ लागतो व समंजस गृहस्थाश्रमाची सुरुवात होते. आयुष्यातील अनेक प्रसंगी या उत्कट नात्याची पुनरावृत्तीचे दर्शन होते.आनंदी व  सशक्त दांपत्य जीवनासाठी आयुष्यभर या उत्कट भूमिका पुन्हा पुन्हा जगायला हव्यात.एकमेकांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस,मैत्री दिवस, व्हालेंटाइन डे, असे स्पेशल दिवस मनापासून साजरे केल्यामुळे  नात्यांतले माधुर्य वाढते.

 

                २.बालक पालक भूमिका- या भूमिकांमध्ये दोघात वात्सल्याचे नाते असते.  एकामधल्या बालकाला दुसरा जोडीदार पालकाच्या भूमिकेतून सांभाळतो. वेगवेगळ्या प्रसंगी गरजेप्रमाणे एकाने पालकाची भूमिका बजावली तर अहंकारांपोटी येणारी नात्यांमधील कटुता टाळता येऊ शकते. एकमेकाना सांभाळून घेणे / समजून घेणे  या भूमिकांच्या अंतर्गत येते. एकदा का एकमेकांची मने ओळखायला येऊ लागली की एकमेकांना समजून घेणे ही सोप्पे होऊन जाते .आपल्या जोडीदाराच्या किंवा मुलांच्या  आजारपणात त्यांची योग्य ती सेवा,औषधोपचार व सुश्रुषा या भूमिकेतून केली जाते. दोघांपैकी कोणालाही कुठल्याही प्रकारची समस्या आली तर दुसऱ्याने पालकाची भूमिका स्वीकारून त्या समस्येचे निराकरणासाठी योग्य ती मदत करायला हवी. एकमेकांच्या यशाचे मनापासून कौतुक तर अपयशाच्या प्रसंगी आधार/धीर देणे हे या बालक पालक भूमिकेतूनच साध्य होते.

               “एक जोडीदार जर कुठे कमी पडत असेल तर दुसऱ्याने त्याला सावरायचे असते, सांडलेच काही एकाकडून चुकून-माकून तर दुसऱ्याने न रागावता पुन्हा भरायचं असते!

             असे एकमेकाला समजून उमजून तर घ्यायचंच पण घरातल्या वयोवृद्ध माणसांचे/तिच्या किंवा त्याच्या जन्मदात्यांचे संगोपन आपुलकीच्या भावनेने पालक या नात्याने दोघांनी मिळून करण्याची दांपत्याची भूमिका असायला हवी. आयुष्यभर पती-पत्नी दोघांनाही  कधी बालक तर कधी पालक या भूमिका साकाराव्या लागतात.

             या भूमिका साकारताना निव्वळ कर्तव्यभावना कामाची नाही. या भूमिका साकारताना  कर्तव्यभावने बरोबरच आपुलकी ओलावा असेल तर सहजीवनातला आनंद कितीतरी पटीने वाढतो.

 

                              .यजमान–गृहिणी भूमिका- पती-पत्नी नात्यामध्ये ही भूमिका व्यापक अर्थाने खूप महत्वाची आहे. एक कुटुंब म्हणून समाजात स्थिरता आल्यावर एकमेकांच्या साथीने  पती व पत्नी आपल्या महत्वकांक्षा साकारतात. स्वत:चे शिक्षण करिअर घडवतात.आपापल्या कामात प्रवीण होतात. उद्योग व्यवसायात जम बसतो. यजमान–गृहिणी भूमिका साकारताना मुलांचे पालनपोषण तसेच त्यांचेवर उत्तम संस्कार केले जातात. एकसंघ आदर्श कुटुंब म्हणून नावलौकिक मिळतो.एकमेकांच्या सुख दुख:त साथ दिली जाते. येथे ना उपकाराची भाषा असते ना कुणी कुणाचे ऋणाईत असते.एका समान पातळीवर येऊन आपल्या जोडीदाराला प्रोत्साहित करून मिळणार्या यशापयशाची जबाबदारी एकमेकासाठी घेतली जाते. उत्तम सहजीवनात या भूमिकांचा वाटा मोलाचा आहे.

 

               ४.मित्र-मैत्रीण भूमिका- नवदाम्पत्यांसाठी पती-पत्नी नाते यशस्वीपणे निभावण्यासाठी प्रथम एकमेकांचे मित्र होणे गरजेचे आहे. या भूमिकेत समजूतदारपणा असतो. मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांवर विश्वास असायला हवा. परस्पर आदरभावना असायला हवी. अनेक जोडपी लग्नापूर्वी एकमेकांचे चांगले मित्र असतात. त्यानंतर ते प्रियकर-प्रेयसी चे  नातेही यशस्वीपणे निभावतात पण लग्नानंतर पती-पत्नी भूमिकेत गेल्यावर ही मैत्रीभावना दुरावते. खर तर असे घडायला नको. पती-पत्नी जेंव्हा मित्र-मैत्रीण भूमिकेतून आयुष्याकडे पहातात तेंव्हा संसाराचा स्वर्ग व्हायला वेळ लागत नाही.

 

              ५.गुरु-शिष्य भूमिका - नवरा-बायको एकमेकांचे गुरु शिष्यही  असू शकतात.

             आजच्या उच्च शिक्षित जोडप्यामध्ये वयक्तिक अहंकारापोटी विसंवाद होतांना दिसतात. प्रत्येकजण स्वत:ला शहाणा समजतो व सहजीवानातली मजा लुटायची सोडून एकमेकांवर कुरघोडी करणे सुरु होते. अशी  एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा खर तर  पतीदेव  पत्नीकडून तर कधी पत्नी पतीकडून काही नवे शिकू शकतात. एकमेकातल्या त्रुटी शोधण्यापेक्षा त्या त्रुटी दूर करून जीवन समृद्ध कसे करू शकतो यावर भर असायला हवा. गुरु शिष्याच्या भूमिका मनापासून साकारून अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या ज्ञानसागराचा लाभ घ्यायला काय हरकत आहे ? आपल्याला जे माहित आहे ते जोडीदाराशी वाटून घेऊन/देऊन  पती-पत्नी नातेसंबंध एका नव्या उंचीवर पोहोचू शकतात. अशा दांपत्यांची पुढची पिढी निश्चितच अत्यंत हुशार निपजेल.

               सुखी संसारासाठी प्रत्येक जोडीदाराने आपल्या वाट्याला आलेल्या व वेळोवेळी आवश्यकतेनुसार साकाराव्या लागणार्या वरील वेगवेगळ्या भूमिका मनापासून साकारल्या तर सहजीवनाची ही वाट आनंद सुख समाधान यांनी सजलेली असेल.


भिन्न भिन्न स्वभाव, समंजसाचा तेथे अभाव,

शब्दांचे घणाघाती घाव, कुचकामी असा संसार!

नसावी ती "ग" ची बाधा, महत्व सदैव सुसंवादा,

आत्मसन्मानास नको ठेच,  तोच सुखी संसार!

एक दुस-यास सावरावे, दोषांसहीत स्वीकारावे,

सुसंवादातुन साधणे हीत, आनंदी होईल संसार!

..........
प्रल्हाद कों दुधाळ.

                 ९४२३०१२०२०

              Blog-www.dudhalpralhad.blogspot.com