Saturday, February 27, 2021

तुम्हीच ठरवा

 कोणतीही व्यक्ती इतरांसाठी चांगली किंवा वाईट हे कशावरून ठरते? 

    खरं तर माणूस चांगला आहे किंवा वाईट आहे असे काही नसते! 

   माणूस समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे वागला की संबंधीत माणूस त्या व्यक्तीच्या दृष्टीने चांगला, तर तो त्याच्या मनाविरुद्ध वागला की तो वाईट ठरतो...

    त्यामुळेच असेल एकच व्यक्ती एखाद्याच्या दृष्टीने चांगली असते,पण दुसऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून तीच व्यक्ती वाईट असू शकते!

    तुम्हाला कुणी चांगले म्हणते म्हणून तुम्ही चांगले असालच असे मुळीच नाही!

   तुम्ही चांगले तेव्हाच ठराल जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःला चांगले असल्याचे पटवून द्याल...

  तेव्हा, तुम्हाला कोण काय समजतो त्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत तुम्ही चांगले रहाण्याचा प्रयत्न करायला हवा. एकदा का तुम्ही चांगलेच आहात हे स्वतःला वागण्या बोलण्यातून समजावले की काय बिशाद आहे तुम्हाला कोणी वाईट म्हणायची? आणि त्यातूनही कुणी बोट दाखवले तर त्याला फार गंभीरपणे घ्यायची गरज नाही...बरोबर ना?( सहजच)

©प्रल्हाद दुधाळ.

मराठी भाषा दिवस आणि आपण

 आपले जगणे अधिकाधिक सोपे व्हावे म्हणून माणसाने जसा विविध यंत्रांचा शोध लावला तसाच आपल्या बोलण्यातला अघळपघळपणाही कमी करून आपला वेळ आणि ऊर्जा वाचवायचा प्रयत्न केला आहे.

   प्रत्येक गोष्टीला आटोपशीर आणि सोपे करायच्या नादात त्याच्या लिहिण्यात आणि बोलण्यात अनेक शॉर्टकट आले.इंग्रजी भाषेतल्या अनेक शब्दांची लघुरुपे आपण अगदी मराठीत बोलतानाही सर्रास वापरतो.समोरासमोर भेटायला वेळ नाही म्हणून सुरुवातीला फोनवरून होणाऱ्या गप्पांना चॅटिंगचा सोपा पर्याय आला आणि लांबलचक टाईप करून शाब्दिक गप्पा सुरू झाल्या. मग पुढे जाऊन टायपिंगचा वेळ वाचवण्यासाठी विविध शब्दांचे शॉर्टकट वापरात आले.वाढदिवसाच्या शुभेच्छा,गुड मॉर्निंग, गुड नाईट,इत्यादी hbd, gm, gn इतके आकुंचित झाले! 

   त्यातच सोशल मीडियावर विविध ईमोजी आल्या आणि शब्दांपेक्षा या बाहुल्याच मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी सर्रास वापरल्या जाऊ लागल्या आहेत...

  मनातले चार शब्द लिहिण्यासाठी लोकांना वेळ नाही त्या ऐवजी तिथे बाजूला तयार असलेल्या इमोजींपैकी एकावर टिचकी मारून भावना व्यक्त करण्याचा शॉर्टकट लोकांच्या सवयीचा होऊ पहात आहे.

   एका बाजुला मीssमsराsठी चा गजर करायचा,पण एरवी दिवसभरात एखादा मराठी शब्द लिहिण्याचीही तसदी घ्यायची नाही असा करंटेपणा सुरू झाला.वर्षातून एकदाच मराठी भाषा दिनाच्या दिवशी आमची मराठी किती महान आहे याचे गोडवे गायचे,पण एरवी सगळा आनंदी आनंदच आहे....

   मराठी भाषा मराठी माणसांनी वापरली तरच जगणार आहे तेव्हा आपल्या या अमृतापेक्षा गोड भाषेचा वापर जाणीवपूर्वक करूया....

  मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

  ©प्रल्हाद दुधाळ.

Friday, February 26, 2021

लवचिकता... एक आवश्यक बाब

 आपल्या लहानपणापासून आपण काही समजुती (किंवा गैरसमजुतीही) आपल्या मनात घट्ट बसवून ठेवलेल्या असतात.

   आपल्या भोवतालच्या परिस्थिती आणि माणसांनी या समजुती मनात अजूनच पक्क्या बिंबवण्यास मदत केलेली असते.

   माणसाचे वय वाढते तसे तसे खरं तर या समजुती तार्किक कसोट्यांवर घासून त्याची सत्य अथवा असत्यता पडताळून पहाणे अपेक्षित असते,पण प्रत्यक्षात मात्र माणूस अशी पडताळणी करायच्या भानगडीत पडत नाही.त्या समजुती बद्दल प्रश्न पडले तरी कुणी तरी दुखावले जाईल किंवा आपण कशाला आपले डोके चालवायचे? असा विचार करून त्या समजुती अंधपणे आपण कुरवाळत बसतो.कधी कधी तर या समजुती स्वतःच्या अहंकाराशी जोडून चुकीच्या पद्धतीने वागले जाते...

   खरं तर आपली वैचारिकता लॉजिकल आहे का हे वेळोवेळी तपासून बघायला हवे...

   काही चुकत असेल तर स्वतःमध्ये आवश्यक असलेले बदल अंगिकारण्यात कसला आलाय कमीपणा? ही लवचिकता तुमच्या अंगी असली ना की जीवनात आनंदी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही! बरोबर ना?( सहजच)

©प्रल्हाद दुधाळ.

Thursday, February 18, 2021

मी एक कॉम्रेड

 मी एक कॉम्रेड

गोष्ट 1985-86 मधली आहे, नोकरीत थोडाफार रुळलो होतो. 

   कामगार संघटनेचा सभासद असलो तरी फारसा ॲक्टिव नव्हतो. त्याच दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग नेमावा या मागणीसाठी देशभरातील कर्मचारी संघटनांनी आंदोलने करायला सुरुवात केली होती आणि त्याचा भाग म्हणून पुण्यातल्या सर्व केंद्रीय कर्मचारी संघटनांनी एका मोर्चाचे आयोजन करायचा निर्णय घेतला.पुण्याचे विधानभवन ते अलका टॉकीज असा भरपूर लांब मार्ग मोर्चासाठी ठरला.भर दुपारच्या उन्हात होरपळत जाणाऱ्या या मोर्चात सामील व्हायची माझी तरी तयारी नव्हती त्यामुळे मोर्चा सुरू होण्यापूर्वीच आपण ऑफिसातून हळूच मागच्या गेटमधून कलटी मारायची असा बेत मी केला होता.या गेटकडे कुणाची नजर असायची शक्यता नव्हती....

   आमच्या टेलिफोन खात्यातल्या सगळ्या कामगार संघटना या मोर्च्यात सामील होणार होत्या त्यामुळे सगळे पुढारी आपापल्या सदस्यांवर कुणी पळून जाऊ नये म्हणून नजर ठेऊन होते.त्यावेळी मी ज्या संघटनेचा सदस्य होतो त्या संघटनेची धुरा एका धिप्पाड रणरागिणीकडे होती....

  आमच्या खात्यात या कॉम्रेड शारदा मॅडमचा प्रचंड दरारा होता.खात्याचे मोठे मोठे अधिकारीसुध्दा तिला प्रचंड घाबरायचे.एखादे काम घेऊन ती अधिकाऱ्याकडे येणार आहे असा नुसता निरोप गेला तरी ते काम आधीच व्हायचे एवढी या मॅडमची दहशत होती! वेळ आली तर समोरच्या व्यक्तीच्या कानाखाली वाजवण्याची तिची तयारी असायची त्यामुळे सगळे सदस्यही तिला टरकून असायचे.त्या काळात ती स्कुटरवरून फिरायची.कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हककांसाठी प्रशासनाशी कोणत्याही प्रकारचा पंगा घ्यायच्या तिच्या गुणांमुळे पुण्यात तिच्या संघटनेची सदस्यता सर्वात जास्त होती....

  तर,त्या दिवशी ठरवल्याप्रमाणे मी मोर्चाला जायला नको म्हणून हळूच ऑफिसच्या मागच्या गेटने बाहेर सटकलो.या गेटमधून बाहेर पडले की एका निमुळत्या गल्लीतून थेट सदर्न कमांडच्या प्रवेशद्वाराकडे बाहेर पडता यायचे त्यामुळे हा सेफ मार्ग मी निवडला होता...

 आता कुणाच्याही लक्षात न येता मी मोर्चाच्या विरुध्द दिशेकडे बाहेर पडणार होतो आणि भर उन्हातली माझी पायपीट वाचणार होती...

   मी गल्लीतून बाहेर पडणारच होतो तोच समोर एक स्कूटर येऊन उभी राहिली,आणि स्कुटरवर साक्षात कॉम्रेड शारदा!

  " काय रे, कुठे चाललाय?"

  " कुठे काय,... कुठे म्हणजे?.. तिकडे मोर्चाकडेच निघालोय की..." 

मी सारवा सारव करायचा प्रयत्न करायला लागलो. .

  माझ्याकडे हसरा कटाक्ष टाकून मॅडम म्हणाल्या  ....

 " बरं, चल बस माझ्यामागे ..."

 आता काही पर्यायच नव्हता...

 मी गुमान मॅडमचया मागे स्कूटरवर बसलो. तोपर्यंत मोर्चाचे सुरुवातीचे टोक पार ससून हॉस्पिटल ओलांडून पुढे गेले होते तर शेवटचे टोक अजून विधान भवनातच होते....

   मला वाटल होत की विधानभवनात नेऊन मला मोर्चेकऱ्यात सामील केले जाईल,पण मॅडमने स्कूटर मोर्च्याच्या कडे कडेने थेट नरपत गिर चौकाकडे जेथे मोर्चाचे पुढचे टोक होते तिकडे नेली...

  आमची वरात आता पार मोर्चाच्या सुरुवातीच्या पुढारी मंडळींपर्यंत पोहोचली होती ...

 कॉम्रेड शारदाने मला सरळ मोर्चाच्या फ्रंटवर नेले तिथे एकाच्या हातात असलेला भला मोठा लाल बावटा काढून घेऊन माझ्या हातात दिला आणि जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली!

   कामगार चळवळीत तोपर्यंत अगदीच बॅकफुटवर असलेल्या माझ्या हातात अचानकपणे कामगार चळवळीचा लाल बावटा देऊन कॉम्रेड शारदाने मला मोर्चातला क्रियाशील कार्यकर्ता केले...

  पुढे नोकरीत पस्तीस वर्षे मी कोणत्या ना कोणत्या कामगार वा अधिकारी संघटनेत जिल्हा स्तरावर पदाधिकारी म्हणून काम करायचे होते कदाचित त्याची मुहूर्तमेढ अशी रोवली गेली ..

   आजही मी निवृत बी एस एन एल अधिकारी संघटनेचा फायनान्स सेक्रेटरी आहे आणि तो बावटा अजूनही तसाच हातात आहे...

 ©प्रल्हाद दुधाळ.