Thursday, June 30, 2016

समजूत .

       समजूत .
     काल मुंबईवरून शिवनेरीने पुण्याला परत  चाललो होतो. एकतर पाचची गाडी साडेपाचला लागली. दिवसभर भरपूर फिरणे झाले होते त्यामुळे गाडी सुरू झाली की मस्त ताणून द्यायची असे ठरवले होते. गाडीने सायन ओलाडले होते मी डोळे झाकून झोपेची आराधना सुरू केली.गाडीत एकदम शांतता होती. अचानक माझ्या मागच्या सीटवरील मॅडमचा जोरात बोलण्याचा आवाज आला त्या  मोबाईलवरून कुणाशी तरी बोलत होत्या. मॅडमचा आवाज एवढा मोठा होता की ड्रायव्हर पासून ते अगदी शेवटच्या सीटपर्यंत त्या बोलत असलेला शब्द न शब्द सर्वाना  ऐकू येत होता. माझे  डोळे बंद होते पण कानावर नको म्हटले तरी सगळा संवाद ऐकू येत होता बहूदा त्या आपल्या मावशीबरोबर बोलत होत्या.
" हॅलो मावशी , हो आत्ताच निघाली गाडी ."
" हो आज बरी वाटली पप्पांची तब्बेत. मी डॉक्टरांशी बोलले "
जो संवाद चालला होता त्यावरून मॅडमचे पप्पा हॉस्पिटलमधे ॲडमिट होते आणि त्या नुकत्याच त्याना भेटून आल्या होत्या . दुसऱ्या बाजुकडील बोलणे जरी ऐकू येत नसले तरी मॅडमच्या बोलण्यावरून  गाडीतल्या सर्व प्रवाशांना परिस्थिती कळत  होती. त्या संवादात मला ऐकू  आलेली  काही वाक्ये ...
" हो छान जेवले ते . तीन चपात्या खाल्ल्या त्यांनी आज ! ते स्वत:च म्हणाले मला आता माझ्या पायावर उभे रहायचय ."
" नाही ग डॉक्टर म्हणतात, लगेच पाय कट नको करायला. आधी वाटत होत गॅंगरीन असाव, जखमही चांगली बोट जाईल एवढी आहे म्हणाले .पण बघू अजून आठ दिवस मग ठरवू म्हणाले डॉक्टर !"
" हो ना, खुपच दुर्लक्ष केल त्यांनी स्वत:कडे, एवढी शुगर वाढत चालली होती. पथ्यपाणी मुळी  पाळतच नव्हते. आज म्हटले मी आता काळजी घेईन . कालपर्यंत फक्त एकच चपाती खायचे  आज  त्यांनी तीन चपात्या खाल्ल्या. डाळींबही सोलून मागीतले . खरच पॉजिटीव विचार करायला लागलेत"
" हो आपण प्रार्थना करू महाराजांकडे आपल्या पायावर उभे राहूदे त्यांना!"
" हो ना ,मलाही आतुन वाटतय ते उठतील या दुखण्यातून !"
 " हो , तू ही भेटून ये आनंद होईल पप्पाना ."
 मॅडमच्या बोलण्यातुन सर्व कथानक लक्षात आले होते. मावशींचा फोन झाल्यावर त्यानी मामाला फोन केलापुन्हा तेच  बोलणे तोच दिलाशाचा स्वर ,स्वत:ची समजूत घालत बोलणे. समोरून मिळालेल्या धीराच्या शब्दाने अजून धीराने घेणे.
मॅडम एकापाठोपाठ एक अशा सर्व नातेवाईकांना फोन करून तेच तेच सांगत होत्या. त्याना वाटत असलेला आशावाद पुन्हा पुन्हा गिरवून अधोरेखित करत होत्या ! पुण्यात कोथरूडला पोहोचेपर्यंत त्या अखंड फोनवर अनेकाना तेच तेच सांगत होत्या. मला असे वाटले की त्या स्वत:लाच समजावत होत्या!
त्या कोथरूडला उतरल्या.
मी डोळे न उघडताच प्रार्थना केली ...
" देवा , मॅडमचा आशावाद प्रत्यक्षात येवू दे ,त्यांच्या पप्पाना बरे वाटू दे !"
        ....... प्रल्हाद  दुधाळ.

Thursday, June 23, 2016

पाठराखण ....

पाठराखण ....

  आज माझे वय छप्पनच्या वर आहे.आजपर्यंतच्या जीवनात अनेक आघाड्यांवर वेगवेगळ्या प्रकारची लढाई लढत रहावी लागली.कधी आर्थिक,मानसिक,पारिवारिक वा शाररिक आघाडीवर समस्या येत राहिल्या.तशा तर त्या प्रत्येक सजीवाच्या आयुष्यात येतच असतात! आयुष्याच्या  सुरूवातीला जेंव्हा जेंव्हा  अशा समस्या उभ्या ठाकल्या तेंव्हा मी घाबरून जायचो.वाटायचे आता सगळे संपले, समोर अंधार असायचा.कुणी आपल्याला आधार देईल,खंबीरपणे मागे उभा राहील अशी परिस्थिती बिल्कूल  नव्हती. हताश होवून जे काही होईल ते पहात रहाणे एवढेच काय ते हातात असायचे.अशा वेळी मनाचा तोल ढासलेल व कदाचित  स्वत:च्या जीवाचे काही बरेवाईट आपल्या हातून घडेल अशी भीतीही  क्वचितप्रसंगी वाटायची, पण तेवढे धैर्य नव्हते म्हणा किंवा मनात कुठेतरी अंधुक का होईना आशेचा किरण दिसू शकेल असा  संकेत मिळाल्याने म्हणा, कधी टोकाच्या आततायीपणे  मी वागलो नाही.सुरूवातीला  असा  हताश  अवस्थेत  असताना  एक  अनुभव आला  अशा  समस्येच्या वेळी अचानक काहीतरी मार्ग निघाला त्याने  आलेली समस्या पूर्ण सुटली जरी नाही तरी उभ्या ठाकलेल्या  त्या समस्येचा बोचरेपणा सहन होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. एकदा  दोनदा  तीनदा  याची पुनरावृत्ती  झाली  आणि  मग  याची सवयच झाली! उगीच  रडत  बसण्याऐवजी  खंबीरपणे  तोंड द्यायची मानसिक तयारी  करू लागलो. असा विचार  करू लागलो की  समोर आलेल्या समस्येवर  काही ना काही मार्ग  असतोच आणि योग्य  वेळ  आल्यानंतर  त्या  समस्येवर असलेले  ते  समाधान  अचानक  सुचते किंवा  अदृश्य  शक्तीकडून सुचवले जाते  याचा  अनुभवांती  विश्वास  वाटायला  लागला. आणि मग आयुष्यात  कोणतेही  संकट आले, कितीही गंभीर समस्या  उभी  राहीली तरी त्यावर  काहीतरी उत्तर  मिळेल असा  आशावाद आणि पुढे  आत्मविश्वास  निर्माण झाला . मार्ग  कसा  निघेल, कोण  काढेल याचा काहीच अंदाज नसतानाही  केवळ  आशावादी  राहून  समस्येवर अगदी  समाधानकारक  नाही मिळाली  तरी  काही ना काही  उत्तरे  मिळतीलच हा आशावादच  कायम माझ्या मदतीला  आला .या  आशावादानेच  कायम  माझी पाठराखण केली आहे  आणि  विश्वास  आहे की  पुढेही  असेच  घडत  राहील.(अपूर्ण )