Tuesday, December 17, 2019

एक आनंदानुभव

#कुबेरदिवाळीअंक 2019
     दुपारनंतर गणेश कलाक्रीडा मंदिरात लागलेल्या फर्निचर प्रदर्शनाला गेलो होतो.तेथील एक एक स्टॉलवर फिरत असताना खिशात मोबाईल वाजत होता;पण माझ्या ते लक्षात आले नाही.घरी येऊन मोबाईल बघितल्यावर लक्षात आले की एका अनोळखी नंबरवरून तीनवेळा मिसकॉल येऊन गेला आहे."एवढं तातडीने कुणी फोन केला असेल? "
असा विचार करून मी घाईघाईने त्या नंबरवर कॉल केला .....
  फोनला उत्तर मिळाले आणि मी काही बोलण्यापूर्वीच समोरच्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली...
"नमस्कार दुधाळ साहेब,आत्ताच कुबेर नावाच्या दिवाळी अंकात तुमची 'कवडसा'ही कथा वाचली.मला कथा खूप आवडली आपल्याला लगेच प्रतिक्रिया द्यावीशी वाटली म्हणून फोन केला होता."
समोरची व्यक्ती उत्साहात मला बोलण्याची संधी न देता बोलत होती!
"खूप खूप धन्यवाद सर,आपण कोण बोलताय?" संधी मिळताच मी चॊकशी केली.
"ओह्ह ,कधी एकदा कथेबद्दल सांगतो असं झालं होतं,गडबडीत माझी ओळख द्यायची राहूनच गेली की!बाय द वे,मी डॉक्टर रानडे बोलतोय दिघीहून...."
"सर थँक यू आवर्जून फोन केल्याबद्दल,तुम्ही कुबेर मेम्बर आहात का?"
"नाही नाही,आमच्या शेजारी एक दरेकर मॅडम राहातात त्यांनी कुबेर दिवाळी अंकाबद्दल शिफारस केली होती म्हणून आवर्जून मी अंक विकत घेतला आणि वाचून काढला! फारच सुंदर अंक झालाय! छान दर्जेदार असं काही वाचनाचा अनुभव मिळाला कुबेरमुळे!"
डॉक्टर रानडे कुबेर दिवाळी अंक आणि त्यातील साहित्याचे भरभरून कौतुक करत होते आणि माझ्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटत होतं!
डॉक्टर रानडे पुढे बोलत होते....
" दुधाळ साहेब तुम्हाला चालणार असेल तर एक विचारायचं होतं....."
"विचारा न सर...."
" तुमच्या 'कवडसा' या कथेतल्या नायिकेबद्दल एका शब्दात काय सांगू शकाल?"
त्यांचा तो प्रश्न अनपेक्षित होता.मी थोडा विचारात पडलो ....
" त्या नायिकेबद्दल एकाच शब्दात सांगायचं तर 'दुर्दैवी' असे वर्णन मी करेल!"
" छान, तुम्ही कथेचा शेवट सकारात्मक केलात ते फार महत्वाचं आहे;पण अशा दुर्दैवी मूड स्विंगचा आजार असलेल्या मुलीला या फेऱ्यातून बाहेर काढणारी व्यक्ती भेटणे तसं प्रत्यक्षात खूप अवघड आहे,हो ना?"
" हो सर,प्रत्यक्षात अशा व्यक्ती खूप कॉम्लेक्स स्वभावाच्या असतात त्यामुळे अशा व्यक्तीपासून सगळे लांब पळतात;पण मला अशा व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण येऊ शकतो असा सकारात्मक संदेश द्यायचा होता!"
" बाय द वे तुम्ही सायकॉलॉजी शिकलाय का? कारण त्या नायिकेच्या तशा स्वभावामागील कारणमीमांसा,नकळत मनावर झालेला खोल परिणाम,एकंदरीत जगावरचा राग हे सगळं छान व्यक्त झालयं! " रानडे सर.
" सर सायकॉलॉजीचे शिक्षण असे नाही;पण मला त्या दृष्टीने माणसं वाचायची आवड आहे आणि अशी माणसे त्यांचे स्वभाव, विचार माझ्या लिखाणात डोकावतात."
माझ्या कथेतली पात्रं,प्रसंग,कथेची मांडणी याचं व्यवस्थित रसग्रहण रानडे सरांनी केलं होतं!माझ्यासारख्या नवख्या कथाकाराला त्यांनी दिलेली दाद खूपच आनंददायी होती.
 तब्बल पंधरा मिनिटे आम्ही बोलत होतो.कुबेर समूह, कुबेर फौंडेशन,समूहातर्फे चालविण्यात येणारे उपक्रम,कुबेर संमेलन याबाबत मी त्यांना माहिती दिली.अशा आगळ्या वेगळ्या समूहाबद्दल आणि समूहातील लेखक कवींच्या साहित्याने नटलेल्या सर्वांगसुंदर  दिवाळी अंकाबद्दल त्यांनी खूप कौतुक केले आणि कुबेर लेखकांना मनापासून शुभेच्छा दिल्या....
 कुबेर  समूह जनसामान्यांच्या मनावर आपलं नाव कोरतोय याचा प्रचंड आनंद आहे ....
.......प्रल्हाद  दुधाळ

ऐकूनही घ्या की राव !

ऐकूनही घ्या की राव!

         माझ्या ऑफिसमध्ये एक सहकारी होता अनेकदा काही ना काही कामाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलावे लागायचे.त्याच्याशी बोलणे सुरू केले की मी माझे पहिले वाक्य संपवायच्या आतच जसं  काही त्याला मला काय म्हणायचंय ते सगळं आधीच माहीत आहे असं गृहीत धरून माझं बोलणं मधेच थांबवून तो सुरू व्हायचा.फक्त माझ्यासारख्या सहकारी व मित्रांशीच नाही तर त्याचा  बॉस किंवा हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येकाशी बोलताना त्याचं वागणं असंच असायचं! 
    थोडक्यात त्याला समोरच्याचं बोलणं ऐकून घेण  बिलकूल मान्य नव्हतं! त्याच्या अशा वागण्यामुळे हळूहळू मी त्या व्यक्तीशी कामापुरताच संबंध ठेऊ लागलो.तो समोर असताना सहसा कुणी विषय वाढवायच्या फंदात पडायचं नाही कारण त्या संवादाचा शेवट नेहमी एकतरफी विसंवादात होणार हे निश्चित असायचं.पुढे पुढे मीसुध्दा त्याच्याशी बोलणेच नको असा विचार करुन त्याला टाळायला बघायचो.
     आपल्या  अवतीभवती अशा अनेक व्यक्ती वावरत असतात, ज्यांना समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे जमत नाही.जगातल्या कोणत्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान आपल्याला असल्याचा समज (खरं तर गैरसमज) अशा व्यक्तीला असतो. बोलणे ही एक कला आहे हे नक्कीच;पण त्याहीपेक्षा ऐकून घेण्याची कला महत्वाची आहे असे मला वाटते! 
        समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण म्हणणे ऐकून न घेता त्याला मधेच थांबवून आपले अर्धवट माहितीवर आधारित मत इत्तरांवर लादण्याची ही सवय अशा व्यक्तीला समाजापासून दूर करते.तडकाफडकी तोडायला जमत नाही म्हणून दोन चार वेळा लोक अशा व्यक्तीला सहन करतात;पण लवकरच अशा व्यक्तीला त्याला नकळत टाळणे सुरू होते.
      दोन व्यक्तीमधील खऱ्या अर्थाच्या सुसंवादासाठी दोघांचीही एकमेकांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेण्याची मानसिक तयारी असायला हवी अन्यथा असा one way संवाद त्या व्यक्तींमध्ये गैरसमज रूजवतो.दुसऱ्या व्यक्तीला बोलूच न देणे आणि आपले म्हणणे इतरांनी ऐकून झाले की संवादाची खिडकी बंद करुन नामानिराळे होण्याची सवय म्हणजे एक प्रकारची मानसिक विकृती आहे असे मला वाटते!
    आपल्या व्यावसायिक, सामाजिक वा कौटूंबिक जीवनात संवाद साधताना  समोरच्या व्यक्तीचे म्हणणे त्याला मधेच कोणताही अडथळा न आणता ऐकून घेणे आवश्यक आहे.अगदी वादाचा मुद्दा असला तरी किंवा टोकाची मतभिन्नता असली तरी समोरच्या व्यक्तीची बाजू शांतपणे ऐकून घेण्याची सवय नक्कीच नातेसंबंधात येणारी संभाव्य कटूता टाळू शकेल असे मला मनापासून वाटते. प्रत्येक गोष्टीची एक निश्चित अशी दुसरी बाजू असते;ती  बाजू योग्य आहे की अयोग्य आहे हा नंतरचा मुद्दा आहे;पण ती दुसरी बाजू किमान ऐकून घेतली गेली तरी माणसा माणसातील अहंकारापोटी होणारे टकराव कमी करू शकतील.सुसंवादासाठी एकमेकांशी संपर्कांचा दरवाजा कायम उघडा असला तर नातेसंबंधात दुराव्याची शक्यता निश्चितच काही प्रमाणात का होईना पण कमी होऊ शकेल. थोडीशी सहनशीलता ठेवून समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची सवय नसेल तर प्रयत्नपूर्वक ती सवय लावून घ्यायला हवी.
   आनंदी जीवनासाठी निश्चितच हे आवश्यक आहे! 
 तुम्हाला काय वाटतं?
......प्रल्हाद दुधाळ . 9423012020.

Saturday, December 7, 2019

सेवानिवृत्ती निमित्ताने मनोगत

रिटायरमेंट 
        बीएसएनएल पुणेच्या वतीने नुकताच   ऑफिशिअली रिटायरमेंट फंक्शनमध्ये मला माझ्या स्वेच्छा निवृत्ती निमित्ताने सन्मानपत्र देण्यात. या प्रसंगी मी व्यक्त केलेले मनोगत..... 

सर्वांना नमस्कार.... 
सर्वप्रथम आज रिटायर होणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकार्याना तसेच पुढच्या काही महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सर्वाना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
   मी  पुणे टेलीफोन्समध्ये 28 डिसेंबर 1982 रोजी टेलिफोन ऑपरेटर म्हणून कॅंटोन्मेंट एक्सचेंज टेस्टींग सेक्शन येथे नोकरी सुरू केली.त्यावेळी मी बीएस्सी च्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो;पण शिक्षण पूर्ण करण्यापेक्षा नोकरी करणे आवश्यक झाल्याने मी ही नोकरी पत्करली होती.
    पुढे नाईट शिफ्ट करून मी माझे शिक्षण पूर्ण केले. आज सांगायला हरकत नाही की मी टेलिफोन खात्यात येईपर्यंत टेलिफोनवर एकदाही बोललो नव्हतो!सिलेक्शन झाल्यावर स्वारगेट एस टी स्टॅण्डवर एक कॉईन बॉक्स होता तेथे जाऊन टेलीफोनमध्ये कुठून बोलायचे आणि कुठून ऐकायचे असते ते बघितल्याचे आजही आठवते!असो...
   टेलिफोन खात्यात आल्यावर पहिला शब्द शिकवला गेला तो  'नमस्कार', हा! .'अहर्निश सेवामहे'  हा वसा इथल्या ट्रेनिंगमध्ये दिला गेला आणि जवळ जवळ अडतीस वर्षे तो वसा मी प्रामाणिकपणे निभावू शकलो याचा खूप आनंद आहे. आज दोनतीन वर्षांपूर्वीच ठरवल्याप्रमाणे स्वेच्छेने निवृत्त होताना पुणे टेलीफोन्स आणि पुढे बीएसएनएल मध्ये निभावलेल्या विविध जबाबदार्याचा सगळा चित्रपट समोर उभा आहे....
   या खात्याने मला खूप काही दिले, पद,पैसा, प्रतिष्ठा आणि समाजात पत याबरोबरच मला सर्वांगीण प्रगती करण्याची संधी दिली.देशात कदाचित हे एकमेव डिपार्टमेंट असेल जिथे तुमची इच्छा असेल तर अभ्यास करून,परीक्षा देऊन तुम्ही प्रमोशन्स घेऊ शकत होता,  आणि मला तशी संधी मिळाली.पहिल्या पाच वर्षातच मी फोन इन्स्पेक्टर या पदाची स्पर्धापरीक्षा पास झालो आणि 1989 ते 1996 या काळात फोन इन्स्पेक्टर म्हणून संपूर्ण कार्यक्षमतेने काम केले.कॅंटोन्मेंट एक्स्चेंज विभागात  उत्कृष्ट काम केल्याचे फळ म्हणून मला 1993 सालचा संचार सारथी हा बहुमान  मिळाला.प्रथमच एक्स्टर्नल विभागात  हा पुरस्कार दिला गेला होता! 
    1996 ते 2004 या काळात मी जेटीओ म्हणून RTTC , वाकड,  सांगवी तसेच साळूंके विहार इत्यादी विभागात काम केले.अनेक आव्हाने पेलत मी या विभागात मला दिलेली जबाबदारी पार पाडली. सांगवीत तीन वर्षात तीनशे किलोमीटर केबल टाकून मागितल्याबरोबर टेलिफोन कनेक्शन देण्याची व्यवस्थ्या करण्यात माझी महत्वपूर्ण भूमिका होती याचा आनंद आहे.याच विभागात एका आठवड्यात 467 टेलिफोन कनेक्शन देण्याचा विक्रम आमच्या टीमच्या नावावर नोंदवला गेला आणि त्याबद्दल ऍप्रिसिएशनही  मिळाले.
   पुढे एसडीई म्हणून भोर ग्रुप , बाजीराव रोड ग्राहक सेवा केंद्र , सेल्स मार्केटिंग अशा विविध विभागात उल्लेखनीय जबाबदाऱ्या मी निभावल्या.
2009 ते 2012 या काळात बीएसएनल सातारा येथे युएसओ सेक्शनचे काम पाहिले आणि फेब्रुवारी 2012 ते जुलै 2018 या काळात आयटीपीसी पुणे प्रशासन विभागात आणि शेवटचे दिड वर्ष बीएसएनएल पुणे च्या स्टाफ सेक्शन येथे कार्यरत होतो.
    मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला  इंटर्नल ,एक्स्टर्नल ,प्लॅनिंग, केबल कन्स्ट्रक्शन,सी एस सी, सेल्स मार्केटिंग, ट्रेनिंग सेंटर, युएसओ, वेल्फेअर, प्रशासन आणि स्टाफ अशा विविध विभागात अनेक महत्वाच्या पदांवर  काम करण्याची संधी मिळाली.
पगार मिळतो म्हणून सगळेचजण काम करतात,  पण कामात मिळणाऱ्या समाधानासाठी आपले काम संपूर्ण कार्यक्षमतेने केल्यानंतर जो अवर्णनीय आनंद मिळतो तो आनंद मला माझ्या पूर्ण नोकरीच्या काळात मिळाला.
   आपले कर्तव्य बजावत असतानाच या डिपार्टमेंटमध्ये मला ट्रेड युनियनमधील एक कार्यकर्ता म्हणूनही ओळख मिळाली.सुरुवातीला एनएफपीटीई संघटनेत ब्रँच लेव्हलला  आणि प्रमोशननंतर एस एन इ ए पुणे या संघटनेत खजिनदार म्हणून उल्लेखनीय असे काम करण्याची संधी मला मिळाली.
   पुणे टेलीफोन्स तर्फे त्या काळी घेतल्या जाणाऱ्या गरवारे करंडक एकांकिका स्पर्धेत सलग पाच वर्षे मला एकांकिकेत छोट्यामोठया भूमिका करण्याची संधीही मिळाली.या निमित्ताने स्टेजवर अभिनयाची हौसही भागवली गेली.
    पुणे टेलिकॉमचे मुखपत्र सिंहगड तसेच सह्याद्री,सातारा टेलिकॉमचे अजिंक्यतारामध्ये माझ्या कविता नेहमी प्रसिद्ध व्हायच्या.हिंदी  पखवाडा तसेच सतर्कता सप्तांहात घेतल्या गेलेल्या स्पर्धात माझ्या निबंधाना अनेक बक्षिसे मिळालेली आहेत.माझे दोन कविता संग्रह आणि एक वैचारिक लेखांचा संग्रह अशी तीन पुस्तके प्रसिद्ध झालीत आणि या क्षेत्रात अजून काही भरीव करण्याचा प्रयत्न आहे.
माझ्या या संपूर्ण प्रवासात मला अत्यंत चांगले अधिकारी लाभले.एक जबाबदार कार्यक्षम अधिकारी म्हणून माझे नाव झाले ते केवळ माझ्या हाताखाली काम केलेल्या कार्यक्षम कर्मचारी व माझ्या सहकारी अधिकारी मित्रांमुळेच! त्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना खूप खूप धन्यवाद! फिल्डमध्ये काम करत असताना बारा बारा तास घराबाहेर रहावे लागायचे त्यामुळे घराकडे दुर्लक्ष व्हायचे पण याबद्दल कुठलीही तक्रार न करता माझी पत्नी स्मिता हिने स्वतःची स्टेट गव्हर्मेंटची नोकरी करुन घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावल्या. तिच्या साथीमुळेच मी आज जो काही आहे तसा आहे. माझा विवाहित मुलगा त्याच्या कुटूंबाबरोबर अमेरिकेत आहे. सर्व आघाड्यांवर अत्यंत यशस्वी समाधानी जीवन आज आम्ही जगतो आहोत याचे सर्व श्रेय्य अर्थातच बीएसएनएलने दिलेल्या आर्थिक व मानसिक आधारामुळे! यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो!
शेवटी जाता जाता माझी एक कविता..... 
काही असे, काही तसे, जगलो असे, जमले जसे!
हात कधी पसरला नाही, पडले मनासारखे फासे, 
जगलो असे जमले जसे!
गरिबीची लाज नाही, श्रीमंतीचा माज नाही, 
सरळ मार्ग सोडला नाही, टाकले नाही घेतले वसे, 
जगलो असे जमले जसे!
हवेत इमले बांधले नाही, मृगजळामागे धावलो नाही, 
शब्दांत कधी सापडलो नाही, झाले नाही कधीच हसे, 
जगलो असे जमले जसे!
भावनेत कधी वाहिलो नाही, वास्तवाला सोडले नाही, 
विवेकाला तोडले नाही, वागलो कधी जशास तसे, 
जगलो असे जमले जसे!
वावगा कधी हट्ट नाही, तडजोडीला ना नाही, 
उगा रक्त आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे 
जगलो असे जमले जसे!
  पुन्हा एकदा सर्वांचे आभार....
बी एस एन एल ला पुन्हा गतवैभव लाभो या सदिच्छेसह मी माझे मनोगत संपवतो.....
  धन्यवाद!

प्रल्हाद दुधाळ 
एस डी ई  बी एस एन एल
 9423012020

Monday, December 2, 2019

आज आत्ता लगेच

   आज आत्ता लगेच!

     काही काळासाठी माझी साताऱ्याला बदली झाली होती.तेथे माझ्याकडे रिटायरमेंटसाठी थोडेच दिवस बाकी असलेले एक असिस्टंट होते.माझ्या कामात मला हवी ती कारकूनी स्वरूपाची मदत करायचे काम त्यांच्याकडे होते.एका बाजूला आम्ही ऑफिसचे काम करत करत गप्पाही चालू असायच्या.माझ्यापेक्षा आठ नऊ वर्षे वयाने जेष्ठ असलेले हे गृहस्थ्य मला मदत करता करता माझ्यातल्या गुणदोषांवरसुद्धा स्पष्टपणे बोट ठेवायचे.मला त्यांचे ते स्पष्ट बोलणे सुरवातीला खटकत होते;पण नंतर त्या गोष्टी मला आवडायला लागल्या.सहसा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याची खोटी खोटी स्तुती करून हरबऱ्याच्या झाडावर चढवण्याचा लोकांचा प्रयत्न असतो;पण ही व्यक्ती वडीलकीच्या नात्याने मला काही सांगत असेल तर ते माझ्यासाठी चांगलेच आहे असा मी विचार करायला लागलो.त्यांनी माझ्यातला एखादा दोष सांगितला की मी आत्मपरीक्षण करणे सुरू केले आणि लक्षात आले की त्यांचे माझ्याबद्दलचे निरीक्षण अगदी योग्य असते!
      एकदा एक महत्वाचा रिपोर्ट आठवडाभरानंतर मुंबईतील आमच्या सर्कल कार्यालयाला पाठवायचा होता आणि त्यासंबंधीची माहिती गोळा करण्यासाठी ते मला मदत करत होते.एखादे काम हातात घेतले की आज त्यातले किती काम आजच संपवायचे हे मी आदल्या दिवशीच ठरवलेले असायचे.दुसऱ्या दिवशी काम सुरू केले की ते संपेपर्यंत मला चैन पडायचे नाही.एक प्रकारे मी वर्कहोलिक होतो कामाच्या नादात मी डबा खाणेही विसरायचो.एकही ब्रेक न घेता मी त्या दिवशी काम करत होतो.माझे असिस्टंट चहाच्या वेळेला चहा घेऊन आले.जेवण्याच्या सुट्टीत घरी जाऊन जेवण करून आले चार वाजता पुन्हा चहाला निघाले जाताना त्यांनी मला चहाला त्यांचेबरोबर चालण्याचा आग्रह केला;पण माझ्या डोक्यावर आजचे ठरवलेले काम आजच पूर्ण करायचे भूत स्वार झालेले होते त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.ते चहा घेऊन आले आणि आल्याबरोबर त्यांनी सरळ माझ्या पीसीचा पॉवर सप्लाय बंद केला! मला त्यांचा खूप राग आला होता;पण त्यांच्या जेष्ठतेकडे बघून गप्प बसलो.माझ्या चेहऱ्यावरचा राग त्यांना दिसला होता,त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी मला सुनावले ....
"सर, ही काय पध्द्त आहे का? पाहिजे तर माझ्यावर ऍक्शन घ्या;पण मी हे खपवून घेणार नाही!"
माझे नक्की काय चुकलंय हे तोपर्यंत माझ्या लक्षात आलं नव्हतं;पण त्यांनी माझा टिफिन माझ्यासमोर धरला तेव्हा माझ्या लक्षात आले.'कामाच्या गडबडीत मी माझा टिफिन खाल्ला नव्हता!"
"सर मला सांगा खाणे पिणे सोडून सलग करण्याएवढे हे काम महत्वाचे आहे का?हातात पुढचा अख्खा आठवडा आहे हे काम पूर्ण करायला! मग हातातलं सगळं काम आजच संपवायचा अट्टाहास कशासाठी? तुम्ही खूप चांगले अधिकारी आहात,तुमचा स्वभाव छान आहे;पण काम संपवण्यासाठी जेवणखाण सोडायची सवय मात्र मला मुळीच आवडत नाही!"
 मी भानावर आलो,ते बोलत होते त्यात तथ्य होतं! माझ्या जवळ जवळ तीस वर्षाच्या सेवेत माझ्यात असलेल्या या दोषावर कुणी बोट  ठेवलेच नव्हते. मी त्यांच्या हातातला माझा टिफिन घेतला आणि काहीही न बोलता जेवायला सुरुवात केली.
    मग मी विचार करायला लागलो आजपर्यंत आजचे काम आजच करायच्या अट्टाहासामुळे स्वतःचे किती नुकसान करून घेतले असेल?
   माझ्या त्या जेष्ठ मित्रामुळे मला माझ्यातल्या त्या दोषांची जाणीव झाली ज्याला आत्तापर्यंत मी माझा गूण  समजत  होतो! या माझ्यातल्या उणिवेवर मी खूप विचारमंथन केले आणि मग अनेक गोष्टींचा नव्याने उलगडा झाला....
    आपण आपल्याकडे असलेल्या कामाचा नको इतका बागुलबुवा केलेला असतो.आजचे सगळे काम आजच संपवून समोरचा कामाचा ट्रे रिकामा करायची घाई आपल्याला झालेली असते पण तो ट्रे कधीच रिकामा होत नाही.जेवढ्या गोष्टी तुम्ही हातावेगळ्या केलेल्या असतात तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा जास्तच कामे तुमच्या ट्रेमध्ये येऊन पडलेली असतात त्यामुळे व्यावसायिक जीवनात किंवा वैयक्तिक आयुष्यातही सगळी कामे आज आत्ता लगेच संपवायचा अट्टाहास करण्यात काहीच अर्थ नाही! अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्यासमोर असलेल्या कामांच्या ढिगाऱ्यातली फार थोडी कामे ही 'अत्यावश्यक  वा तातडीची 'असतात! शेकडा नव्वद टक्के कामे कामातला आनंद उपभोगत,हसत खेळत करण्यासारखी असतात.कुणी महात्म्याने म्हटले आहे की 'पाटातून वहात असणारे  पाणी हे शेती पिकवण्यासाठी सोडलेले आहे आणि ते त्याचसाठी वापरले जावे;पण त्या वाहणाऱ्या पाटावर जर कारंजे उडवले फुलझाडे लावली तर त्या पाटावर कितीतरी सौदर्य फुलवता येईल!'
     आपल्या दैनंदिन कामातून आपल्याला जगण्यासाठी आवश्यक अशी रोजीरोटी मिळत असते हे खरे आहे;पण फक्त काम आणि कामच करत राहिलो तर ज्या आनंदी व सुखी जीवनासाठी हा सगळा खटाटोप चाललाय तो आनंद उपभोगणार कधी? काळ कोणासाठी थांबत नाही. तुमच्या समोर पेंडिंग कामाचा ट्रे कायमच भरलेला असणार आहे,तुम्ही अगदी मरेपर्यंत तो उपसत राहिला तरी त्यात बरेच करण्यासारखे पेंडिंग असणार आहे तेव्हा वेळीच समोरचे सगळे काम आज आत्ता व लगेच संपवण्याचा अट्टाहास सोडा. जीवनात पैशापेक्षा धनदौलतीपेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी तुमची वाट पाहात आहेत त्यातला आनंद उपभोगा, स्वतःसाठी,मुलाबाळांसाठी,मित्रांसाठी वेळ काढा कामाच्या वेळी काम करा आणि जीवनात आनंद उपभोगण्यासाठी जो वेळ आहे त्याचा समतोल ठेवा!
    जिंदगी हासणे गाणे के लिये भी है! हो ना ?