Tuesday, October 27, 2015

मी (पत्र) लेखक!

मी (पत्र) लेखक!
     माझ्या लहानपणी आजच्यासारखी संपर्काची साधने नव्हती. वाहतुकीचे महत्वाचे साधन म्हणजे बैलगाडी! त्या काळी गावात एखादीच सायकल असावी. गावात पुण्याहून मुक्कामाला एक एस.टी.ची बस यायची ती सकाळी पुण्याकडे जायची आणि दुसरी दुपारी अकराच्या दरम्याने यायची. तिच्यातून पोस्टाची पिशवी यायची म्हणून तिला पोस्टाची गाडी असे म्हणायचे.गावात पोस्टमन म्हणून गावचा गुरव काम करायचा.गावाला बारा वाड्या होत्या.बाहेर गावाहून आलेली पत्रे पोस्टमन वाड्या वस्त्यावरून गावातल्या शाळेत आलेल्या त्यातल्या त्यात हुशार मुलांच्याकडे देवून टाकायचे व मग तो मुलगा किंवा मुलगी पुढे पोस्टाचा बटवडा करायचे. आमच्या वाडीत आलेली पत्रे बऱ्याचदा मला दिली जायची.मग मी वाडीचा  पोस्टमन! ज्या कुणाची पत्रे असायची तेथे मी अगदी पोस्टमनच्या रूबाबात ती  पत्रे नेवून द्यायचो! त्या काळात  लिहायला वाचायला येणाऱ्या गावकऱ्यांची संख्या अगदीच मोजकी होती.अर्थातच वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने आलेले पत्र वाचून दाखवायचे कामही मला करावे लागायचे.अगदी  तिसरी चौथीत असल्यापासुन अक्षरे जुळवून (गिचमिड अक्षर असले तरी) मी आलेली पत्रे  मागणीनुसार लोकाना वाचून दाखवायचो.त्यावेळी जास्त करून पोस्टकार्डावरच पत्रव्यवहार व्हायचे.काही  मोजकेच लोक अंतर्देशीय पत्राचा वापर करायचे. त्या काळी गावातले बरेच लोक मुंबईला मिलमध्ये कामाला असायचे ते घरच्या लोकाना पत्राचे उत्तर पाठवायला सोपे जावे म्हणून जोडकार्ड पाठवायचे.मग या जोडकार्डावर  पत्राला उत्तर लिहायचे काम सुध्दा त्या वयात माझ्याकडे यायचे! माझे मराठी अक्षर बरे असावे, कारण असे लोक जेंव्हा दिवाळी किंवा यात्रेला गावाकडे यायचे तेंव्हा माझ्या पत्रलेखनाचे आवर्जून कौतुक करायचे! हे पत्र लेखन बरेचसे बोली भाषेत असायचे.त्यात लिहायचे विषय व मजकूरसुध्दा मजेशीर असायचा! अनुभवाने मी पत्राचे काही मायने शिकलो होतो तेच मायने कौशल्याने नाती समजून घेत वापरायचो. उदाहरण द्यायचे झाले तर माझी एक चुलत चुलत काकू होती, तिचा सर्व पत्रव्यवहार माझ्याकडेच असायचा.ती जास्त करून आपल्या मुलीना पत्र लिहायला सांगायची. काकू मजकूर सांगायची –
लिही ‘ स न वि वि सुंदरबाय तुजे पतर मिळालं लिहिला मजकूर समजला आता तुजा पाय दुकायचा थांबला का. औशीद घेतल का नाय.पावण्याच बर हाये का.इथ आमी खुleft m yardशाल हाये तुमची खुशाली वरचेवर कळवने.काल शेरडी व्याली इकडन दोन दिसात  कुणी तिकड आल तर चिक पाठवील. बाळ्याला म्हणाव साळत जा.मामासारक   पतर लिवता याया पायजे.बाकी सगळ ठीक हाये पतराच उतर देवून खुशाली कळवत जा.घरातल्या मोठ्याना नमसकार लहानांना आशीरवाद.बाकी सगळ ठीकाय.कळावे .तुझी आय- मथुराबाय .”
   अशा अर्थाची वा थोडाफार मजकुरातला फरक असलेली बोलीभाषेतली  भरपूर पत्रे मी त्या काळी लिहीली आहेत.अनेकांची आलेली पत्रे वाचून दाखवलेली आहेत.अशिक्षित असणारे ते लोक माझे जवळचे  वा लांबचे चुलते, चुलत्या, आजोबा, आज्जी असे नात्यातले असायचे. अशा लोकांचा मी कौतुकाचा विषय असायचो.पत्र वाचायच्या वा लिहायच्या निमित्ताने अशा लोकांची अनेक आर्थिक  वा कौटूंबिक  सिक्रेट्स आपसूक मला कळायची.ते वय असे होते की वाचलेल्या वा पत्रात लिहिलेल्या अनेक गोष्टी त्या वयात मला कळायच्याही नाहीत. माझ्या या  पत्रलेखक वा वाचकाच्या भूमिकेमुळे अर्थातच माझे या बाबतीतले कौशल्य  माझे वय व शिक्षणातली इयत्ता वाढेल तसतसे वाढत गेले. त्यामुळेच बहुतेक मला शालेय जीवनात पत्रलेखन निबंधलेखन यात चांगले मार्क्स मिळायचे,शिवाय या चिमुरड्या अस्मादिकाला लोकांकडून मानही मिळायचा!

 .....प्रल्हाद दुधाळ (९४२३०१२०२०)