Sunday, August 4, 2019

आठवणींच्या पोतडीतून ....

आठवणींच्या पोतडीतून ....
 १९७६ चा तो असाच जुलै महिना होता . मी नुकताच लोणंद येथील मालोजीराजे विद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता.मला खरं तर अजूनही पॉलिटेक्निकला प्रवेश मिळेल याची आशा होती त्यामुळे अकरावी सायन्स वर्गात अजून लक्ष लागत नव्हतं .जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात डिप्लोमाकरीता चांस कॉल येतात असे ऐकले होते;पण मला मात्र अजून त्याबद्दल काहीच समजले नव्हते.पावसाने संततधार धरली होती आणि नीरा नदीला महापूर आला होता. पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणारे सगळे पूल पाण्याखाली गेले होते त्यामुळे माझं गाव आणि लोणंद यांचा संपर्क तुटला होता.एस टी वाहतुकीची सेवा संपूर्णपणे  बंद झाली होती .पूर्ण आठवडा हेच चित्र होते. पाऊस कमी झाला आणि नदीचे पाणी जवळ जवळ दहा दिवसांनी ओसरले.त्यानंतर एक दिवस माझा भाऊ एक पत्र घेवून धावतपळत माझ्याकडे आला .पत्र वाचले आणि मला रडूच फुटले.....
 तो माझ्या डिप्लोमा प्रवेशाचा चांस कॉल होता आणि त्या पत्रातील मजकूर असा होता की "मी चार तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करावा अन्यथा पुढच्या उमेदवाराला ती जागा बहाल करण्यात येईल!" आज दहा तारीख उलटून गेली होती; हातातोंडाशी आलेला घास जाणे म्हणजे काय असते याचा हा आयुष्यातला मोठा धडा होता. माझा डिप्लोमा प्रवेश निरेच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला होता!
त्यातूनही काही चमत्कार होईल अशी आशा होती म्हणून कराड पॉलिटेक्निक गाठले;पण वेळ गेलेली होती....
....प्रल्हाद दुधाळ.

हरवलेल्या मित्रांसाठी....

हरवलेल्या मित्रांसाठी....
   आज वैश्विक मैत्रीदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या घेतल्या जात आहेत. पाश्चात्य संस्कृतीला कितीही नावे ठेवली जात असली तरी त्यांची वेगवेगळ्या नात्यांचा सन्मान करणारे  हे वेगवेगळे "डे" ज साजरे करायची पध्दत नक्कीच स्तुती योग्य आहे! आजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात असे डेज आता खूप महत्त्वाचे वाटतात!
    वेगवेगळी समाज माध्यमे आज मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत आणि या माध्यमामुळे एक छान सोय झाली आहे ,प्रत्यक्ष न पाहता, न भेटतासुध्दा अनेक लोकांचा एकमेकाप्रती स्नेहभाव व्यक्त करण्याची, मैत्री जोपासण्याची एक उत्तम सोय या माध्यमातून हाताशी आली आहे! त्यातूनच अनेक अनोळखी व ओळखीच्या मनामनात एक स्नेहसेतू उभारला जातो आहे ही नक्कीच आजच्या समाजासाठी चांगली गोष्ट आहे.
  आज वयाच्या पन्नाशीच्या पुढे असणाऱ्या पिढीसाठी हे एक उत्तम वरदान आहे.शाळा कॉलेजमधल्या अनेक घट्ट मित्रमैत्रीणी फेसबुक, ट्विटर, व्हाटस्आप अशा माध्यमातून एकत्र येत आहेत. त्या निमित्ताने त्या मोरपंखी दिवसांच्या आठवणीना उजाळा मिळतो आहे.
   खरं तर आज  एका घरात, शेजारी असलेल्या लोकांचा एकमेकांशी संवाद हरवलेला असताना असे चार क्षण ऑनलाईन का होईना; पण आपल्या त्या त्या काळातल्या मित्र मैत्रीणीसोबत गुजगोष्टी करायला मिळणे ही या लोकांसाठी सुवर्णसंधीच आहे असे मला वाटते. भौतिक सुखांच्या गर्दीत आज नाती हरवली आहेत.कुणालाही कुणासाठी वेळ देता येत नाही.पिढ्यापिढ्यातले वैचारिक अंतर वाढले आहे.अनेकांची संवादाची भूक आतल्या आत दाबली जात असताना या आभासी का होईना माध्यमामुळे हरवलेले मैत्र जपले जाते आहे ही गोष्ट मला वाटते खूप महत्त्वाची आहे .या माध्यमातून पुन्हा जोडलेली मैत्री ही केवळ आभासी पातळीवर न ठेवता प्रत्यक्षात भेटून या स्नेहसेतूचे रूपांतर एखाद्या सामाजिक चळवळीत व्हायला हवे .आज सामाजिक व आर्थिक सुस्थितीत असलेल्या समाजातील घटकांनी आपल्या त्या त्या काळातल्या घट्ट मैत्रीच्या धाग्याला अजून घट्ट करून यथाशक्ती मानसिक आधार व मार्गदर्शन व गरज असेल तेथे शक्य तेवढी आर्थिक स्वरूपाची मदतही करायला हवी.श्रीकृष्ण-सुदामा मैत्रीची कथा आपण अगदी भक्तीभावाने वाचतो व ऐकतो आणि मैत्रीचे गोडवे गातो .
 बघा, तुम्ही जर थोडेफार तशा कृष्णपदापर्यंत पोहोचले असाल तर तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या हरवलेल्या सुदामास नक्की शोधा... कदाचित त्याला तुमच्या मदतीची गरज नसेलही;पण आपली आठवण ठेवून हा मित्र पुन्हा एकदा समोर आलाय आणि तोही केवळ बालपणीची मैत्री जोपासण्यासाठी! त्या मित्राचे सोडा;पण यातून तुम्हाला किती आनंद मिळेल याचा विचार करा....
     जगण्याच्या बेफाम लढाईत आज  अशा कुठे कुठे हरवलेल्या मित्र मैत्रीणीनाही ...
मैत्री दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
.... प्रल्हाद दुधाळ.(४/८/२०१९)

Thursday, August 1, 2019

प्रेमळ

" ए मूर्खा तुला काय कळतं की नाही, ठेव ते बाजूला!"
" जरा म्हणून अक्कल नाही..."
" ये म्हाताऱ्या जरा ऐक की ..."
" चल हो बाहेर सगळी वाट लावली .."
" अरे नीट खा की सगळं कपड्यावर सांडवल की. .."
"चल उरक की लवकर..."
 दररोज सकाळी ऑफिसला जायची गडबड एका बाजूला चालू असताना खालच्या मजल्यावरच्या फ्लॅट मधून तावा तावात चालू असलेली जुगलबंदी अगदी नको नको म्हणत असताना कानावर आदळत असते, आता या गोष्टीची इतकी सवय झालीय की एखाद्या दिवशी आवाज आले नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं...
या जुगलबंदीत फक्त काकूंचा आवाजच टिपेला गेलेला असतो.काका मात्र अगदी हळू आवाजात वाद घालत असतात;पण ते जे काही बोलत असावेत ते असे असावे की त्याने काकूंचा पारा अजूनच वाढलेला असतो, निदान आवाजाच्या टीपे वरून तरी तस वाटत रहातं!
   या दरम्यान माझी सौ.नेमकी किचन मध्ये असते आणि खालच्या किचनमध्ये चालू असलेली ही जुगलबंदी माझ्यापेक्षा तिला जास्त स्पष्टपणे ऐकू येते.
सुरूवात झाली की सौ.मला हमखास हाक मारुन सांगते...
" झाली बघा सुरू जुगलबंदी!"
मग मीही तिला चिडवत ऐकवतो...
" बघ ऐकून ऐकून तू ही माझ्याशी म्हातारपणी असं वागू नको म्हणजे झालं!"
  ऑफिसला जायची  गडबड असते त्यामुळे तपशिलात कधी गेलो नाही; पण हेच काका काकू मला सोसायटीत फिरताना दिसले की ते भांडणारे दोघे हेच का असा प्रश्न पडावा! कारण काकू हाताने काठी टेकवत टेकवत पुढे चाललेल्या असतात आणि काका अगदी हळू हळू त्यांच्या मागे मागे चालत चाललेले असतात....
  एक दिवस सुट्टी घेतली होती त्यामुळे निवांत बसलो होतो.आणि अचानक ती जुगलबंदी चालू झाली. माझं कुतूहल मला शांत बसून देत नव्हतं,त्यामुळे मी खालच्या फ्लॅट मध्ये डोकावल, आणि पहातच राहीलो...
   नुकतंच काका अंघोळ करून आलेले असावेत आणि काकू टॉवेलने त्यांचे डोके पुसून देत होत्या! एका बाजूला त्यांची तोडाची टकळी चालू होती. ...
   " अरे बहिर्या जरा डोकं खाली घे की, आणि लगेच तो पोहे खाऊन घे मग फिरायला जाऊ! ये येड्या ऐकतोय ना?"
तो त्यांचा "सुसंवाद" ऐकून मला खूप  हसू आलं!मी तेथून काढता पाय घेतला..
   या जोडप्याबद्दल कुतूहल होत त्यामुळे शेजाऱ्या बरोबर थोडी चर्चा केली...
  या दोघांचे एके काळी जवळच्या तालुक्यात प्रचंड कमाई असलेले दुकान होते.वय झाल्यावर ते दुकान विकून आपल्या एकुलत्या एक मुलाबरोबर ते कोथरुड येथे मोठा बंगला घेवून राहायला आले .मुलाचे लग्न थाटात झाले .मोठ्या घरातुन आलेल्या सुनेने सासूच्या फटकळ बोलण्यावरून भांडण सुरू केले आणि दररोज कटकट नको म्हणून मुलाने आपल्या आई बापाला या फ्लॅट मध्ये आणून ठेवले आहे .काकूंचे गुढगे गेलेत तर काकांना दिसण्याचा आणि ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे.आपल्या तरुणपणी प्रेमविवाह करून शून्यातून आपलं विश्व साकारणारे हे दोघे आज एकमेकांना छान सांभाळून घेत आनंदाने जगताहेत.एकमेकांच दुखलं खुपल तर एकमेकांची काळजी घेतात . नियमित फिरणे आहार विहार या बाबतीत जागरूक असलेलं हे जोडपं आपली नवी इनिंग मस्त जगताहेत! 
  आणि हो... ती सकाळी सकाळी चालू असलेली जुगलबंदी म्हणजे त्या दोघांचा अगदी नेहमीचा "प्रेमळ" संवाद असतो ...!
..... @प्रल्हाद दुधाळ.