Thursday, April 28, 2016

चुकलेल्या वाटा .

चुकलेल्या वाटा .
   "जोशी साहेब म्हणजे एकदम तत्वाचा माणुस"
"इथले सगळे सुपरवायझर चांगले आहेत पण हा जोशी ना एकदम खडूस!"
नोकरीला नवीनच लागलो होतो आणि पहिल्याच दिवशी  तेथील   सुपरवायझर बद्द्ल जुन्या जाणत्या  कर्मचाऱ्यांच्या कडून  माहीती दिली जात होती. कुणाबरोबर  कसे  वागायला  हवे याच्या  टीप्स मिळत होत्या सर्वसाधारणपणे जोशींबद्दलचा  रिमार्क  मात्र विचित्र व  खडूस  माणुस आहे असाच होता. ते कडक असल्याने त्यांच्यापासुन  सावध रहा असा सल्लाही  मिळाला. या  माणसाबद्दल मनात  थोडी भीतीही  वाटायला लागली होती.
   दुसऱ्याच  दिवशी या जोशींची आणि  माझी एकच  शिफ्ट आली आणि  त्यांच्याबद्दल ऐकलेल्या  एका एका गोष्टींची प्रचिती  यायला  लागली! झाले काय की, दहाची ड्युटी होती आणि मी साधारणपणे दहा वाजून दहा मिनिटानी  विभागात गेलो माझ्यानंतर दोन मिनिटांनी एकदम गोरे गोमटे उंच  पण  तब्बेतीने  थोडेसे किरकोळ असे जोशी  साहेब  विभागात आले. त्यांना  मी माझे  आजचे काम विचारण्यासाठी गेलो त्या काळी  टेलिफोन सुपरवायझरला मॉनिटर असेही  संबोधले  जायचे. मी समोर  गेलो  त्यानी  माझ्यासमोर  अटेंडस  रजिस्टर  ठेवले. माझ्या नावासमोर रिमार्क  लिहिला होता - Late by ten minuits! आणि विशेष म्हणजे स्वत:च्या  नावासमोर रिमार्क  लिहिला होता- late by twelve minuits! स्वत:चा लेट मार्क स्वत:  करणारे  जोशी  हे  माझ्या चौतीस वर्षात  भेटलेले एकमेव  सुपरवायझर  होते. सरकारी नोकरीत असुनही  हा माणूस  सर्व्हीसच्या शेवटच्या दिवसापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे  व कार्यक्षमतेने  करत होता! टेलिफोन  कर्मचार्यांना  प्रथमच जाहीर झालेला  प्रॉडक्टीव्हीटी लिंकड बोनस  या माणसाने  नाकारला होता.  त्या काळात आमच्या विभागात  टेलिफोनबाबत असलेली fault registration and repair service  या बाबतीत  कामकाज  चालायचे.त्याकाळी टेलिफोन ही अत्यंत चैनीची वस्तू  मानली  जात होती. आठ दहा वर्षे  वाट  पाहिल्यावर  टेलिफोन  मिळायचा. अगदी श्रीमंत व्यक्ती,मोठे उद्योगपती व सरकारी उच्चाधिकारी यानाच टेलिफोन घेणे परवडू  शकत होते. इंडियन टेलिग्राफ  ॲक्ट खाली  टेलिफोन धारक व या  खात्यातील कर्मचारी येत असत. कर्मचार्यांसाठे कडक नियम  व  शिस्त  पाळणे आवश्यक होते  आणि  ही शिस्त आमच्या जोशी साहेबांच्या  प्रत्येक कृतीमधे  दिसायची! या शिस्तीमुळेच त्याना लोक  खडूस  म्हणून ओळखायचे. लवकरच माझे आणि त्यांचे  चांगलेच सूर जमले होते. त्याचे कारण  म्हणजे  माझे हस्ताक्षर, त्यांना माझे  अक्षर  खूप आवडायचे! मी  कविता  लिहितो  हे समजल्यानंतर ते  माझ्याबरोबर दिलखुलास गप्पाही  मारू लागले. त्यांना प्रचंड  वाचनाची आवड होती. ते त्या काळी एम.ए. मराठीची पदवीधारक   होते! त्यांच्याबरोबर  बोलताना  लक्षात आले  की  खर तर हा माणुस आमच्या पोस्ट ॲन्ड टेलिफोन सारख्या एकदम  रूक्ष खात्याऐवजी एखाद्या नावाजलेल्या कॉलेजात  मराठीचा  प्रोफेसर  असायला हवा होता! एकदा  त्यांना मी तसे बोललो, तर  ते  किंचित  हसले.म्हणाले " बरोबर आहे ,मला प्रोफेसरच व्हायचे  होते  पण  परिस्थितीच  अशी निर्माण  झाली  की  मिळेल ती नोकरी  करावी लागली ,आणि  एक सांगतो -  या पोस्ट आणि  टेलिग्राफ खात्यात एकदा माणुस  चिकटला  की  तो कायमचा चिकटतो! नंतर आलेल्या चांगल्या  संधीही  नाकारतो "
  मी  त्यावेळी त्यांचे म्हणणे  फार  गंभीरपणे  घेतले नाही, कारण  अशा रूक्ष  खात्यात दुसरी  चांगली नोकरी मिळाली तर कोण कशाला  राहील,काहीतरीच!   मी तरी  जाईलच .पण पाच  दहा वर्षात लक्षात  आले की ते म्हणतात ते  बिल्कुल  खरे  आहे! इथे  पंचाहत्तर  टक्के कर्मचारी असे आहेत की त्याना आयुष्यात वेगळेच काही व्हायचे होते, पण  वाट  चुकून  इथे  ते चिकटले ते  कायमचेच, अगदी  माझ्यासह!
   जोशी साहेब फारच शिस्तीचे असल्याने व त्यांना अभिप्रेत असलेली  शिस्त खात्यात  पुढे  कुणालाच  नको  असल्याने  ऑड मॅन  आऊट न्यायाने  अजुन रिटायर व्हायला  सात आठ वर्षे असतानाच जोशींनी व्ही आर एस घेतली! पुढे ते कधीच  ऑफिसकडे  फिरकले नाहीत!
    ,,,,,,,प्रल्हाद दुधाळ  पुणे .

Thursday, April 21, 2016

जोपासना

    माणसाला झाडे लावायची उपजत आवड असते.शहरात रहात असूनही आपण हौसेने एखादे झाड तरी लावतोच.घराच्या आजूबाजूला जर तशी योग्य जागा असेल तर अनेक प्रकारची रोपटी लावून त्याची देखभाल करण्याची हौस तर कित्येकाना असते.जरी फ्लैटमधे रहात असले तरी शक्य असेल तेथे खिडकीत,बाल्कनीत,टेरेसवर अगदी जेथे कुठे शक्य असेल तेथे लोकांकडून अशी झाडे लावायची हौस वा छंद जोपासला जातो.काहीजण इनडोर प्लांट लावूनही हा आनंद घेतात.अशी होसेने लावलेली फुलझाड़े व शोभेची झाडे घरातले वातावरण प्रसन्न ठेवायला नक्कीच मदत करतात.अशा झाडांची कणाकणाने होणारी वाढ, रोपटयाला आलेले पाहिलेवाहीले फुल त्याचा रंग सुवास याचे कोण कौतुक असते. हे सगळे क्षण अगदी नकळत आपण साजरे करत असतो! अगदी क्षणभर का होईना पण अशा गोष्टी माणसाला आनंद देवून जातात!
       इथपर्यंत ठीक आहे,पण आपण अशी कुंडीत किंवा परसात लावलेली शोभेची वा फुलाझाड़े  कशी व किती वाढायला हवीत,पानांचा रंग कसा हवा,त्यांची फुले कधी यायला हवीत याबद्दल आपण काही आडाखे बांधतो.या झाडांकडून अनैसर्गिक अपेक्षा करतो.त्याची वाढ सरळच व्हायला हवी,त्याची फांदी विशिष्ट दिशेलाच वाढायला हवी, किंवा त्यांच्या फुलांचा रंग अमक्या प्रकारचाच हवा इत्यादी इत्यादी. हे झाड मी लावले आहे,मी त्याची देखभाल करतो आहे म्हणजे त्याचा आकार त्याची फुले हे सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणेच व्हायला हवे आणि जर तसे घडले नाही तर मी त्याला छाटून हवा तो आकार देणार, मला हवीत तशी  फुले नाही आली तर ते झाड मी उपटून काढणार हा अट्टाहास चुकीचा आहे,असे मला वाटते! तुम्ही झाड लावले त्याला खतपाणी घातले,देखभाल केली म्हणून त्या झाडाने तुमच्या अपेक्षा पूर्ण करायलाच हव्यात हा विचार चुकीचा आहे.तुम्ही तुमचे  काम केले त्यातून हवा तेवढा आनंदही  तुम्हाला मिळाला आहे तेंव्हा आता त्या रोपाने कसे व कधी बहरावे,त्याला फुल कधी यावे,त्या  फुलाचा रंग कसा असावा हे निसर्गाला ठरवू दे ना!. तुम्ही तुमच्या अपेक्षा त्याच्यावर कशाला लादताय?नैसर्गिकरीत्या बहरलेल्या त्या सौंदर्याचा आनंद लूटा!
    जे तत्व अशा झाडाबद्द्ल तेच माणसामधल्या नात्यांच्या बाबतीतही लागू आहे.
   तुम्ही कोणत्याही अपेक्षेशिवाय नात्यांची जोपासना करत रहा, अशी नाती मग नैसर्गिकरीत्या बहरतील, फुलतील आणि अशा फुललेल्या नात्यातून मिळेल तोच खरा स्वर्गीय आनंद!
तुम्हाला काय वाटते?
   ---------प्रल्हाद  दुधाळ, पुणे (९४२३०१२०२०)


Wednesday, April 20, 2016

बनवेगिरी.

बनवेगिरी.
     गोष्ट तशी जुनी आहे मी आणि सौभाग्यवती काही कामानिमित्त कोरेगाव पार्क भागात गेलो होतो.बाइकवरून चाललो असताना रस्त्याच्या कडेला उभे एक पन्नाशीचे गृहस्थ्य आणि एक स्री ( बहुदा त्याची बायको असावी ) त्यानी मला थांबायची खूण केली .मी गाडी बाजूला घेतली. पायजामा शर्ट टोपी असा त्या व्यक्तीचा पेहराव होता. गंध लावलेला होता. बायको नववारीत होती. हातात मध्यम आकाराची प्रवासी बैग खांद्याला लावलेली होती. मी प्रश्नार्थक नजरेने त्या दोघांकडे पाहीले.
"साहेब, माफ़ करा तुम्हाला त्रास देतोय.मला नांदेड ला जायचय, मुलाने पैसे दिले होते पण माझा खिसा कापला आणि सगळे पैसे गेले. वाटखर्चीला पैसे नाहीत. कृपा करून मला मदत करा"
माझ्या खिशातही फार पैसे नव्हते.पण मला त्यांची दया आली.अशा प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे समजून मी खिशात असलेले होती नव्हती ती रक्कम काढली व त्या गृहस्थ्याला दिली. फार नव्हते पण तीनशे रुपयाच्या दरम्याने ती असावी.तोंडभरून आशीर्वाद देवून जोडपे समाधानाने पुढे गेले! आज आपण एका अड़चणीत असलेल्या गरजू माणसाला मदत केली याचे समाधान होते!
पंधराएक दिवस उलटले असतील मी पुणे स्टेशन परिसरात पायी चाललो होतो. अचानक एका जोडप्याने मला थांबवले.
याना कुठेतरी पाहीले आहे असे मला वाटत होते, आणि आठवले, हो ,तेच ते दोघे होते.
"साहेब सोलापूला जायचय, वाटखर्चाला पैसे नाहीत कृपा करून थोड़ी मदत करा ना."
त्या दोघांची ती बनावेगिरी लक्षात येताच संकटात असलेल्या माणसाला मदत केल्याची मागच्या वेळची भावना कुठल्या कुठे गेली्.
"काय बाबा, मागच्या वेळी नांदेड आता सोलापूर का?"
माझ्या तोंडचे ते वाक्य त्या दोघानी ऐकताच त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. ताबडतोब त्या दोघानी पोबारा केला!!!
.......प्रल्हाद दुधाळ
९४२३०१२०२०.

Friday, April 1, 2016

फिटमफाट !

   तुम्ही पुण्यातल्या कोणत्याही रस्त्याने पायी किंवा बाईकवरून जात असाल तर दोन तीन गोष्टींची काळजी घ्यावी लागते.एक म्हणजे तुम्ही पायी चालत असताना एखाद्या छोट्या मोठया खड्ड्यात पाय अडकून पडणार तर नाही ना, किंवा आपला पाय चुकून फुटपाथ वा रस्त्याच्या कडेला बसलेल्या पथारीवाल्या साहेबांच्या विक्रीसाठी ठेवलेल्या मालाला तर लागत नाही ना,याचीही काळजी घ्यावी लागते! हो , इथले फुटपाथ पायी चालना-या  लोकांपेक्षा पथारी व्यवसायाच्या सोयीसाठी बांधलेले असतात! दूसरी गोष्ट म्हणजे तुमच्या अंगावर कोणत्याही दिशेने एखादी बाइक वा रिक्षा येवून धडकू शकते किंवा रस्त्याच्या कडेला उभी असलेली एखादी चारचाकी अचानक चालू होवून कुठलाही इशारा न देता तुमच्या अंगावर येवू शकते! वाहतुकीचे नियम पाळणे म्हणजे येथे मागासलेपणाचे लक्षण मानले जाते! याशिवाय तुमची नज़र याही गोष्टीवर असायला हवी की आपल्या अंगावर अचानक कुणी पचकन थूंकत तर नाही ना?
बऱ्याचदा असे होते की तुम्ही रस्त्याने चाललेला असता,बाजूने एखादी चारचाकी येते व अचानक तिच्या खिडकीतून भली मोठी पिंक तुमच्यावर टाकून चारचाकी वेगाने निघून गेलेली असते.तुम्ही जर चालताना आजुबाजूला पाहीले की लक्षात येईल की असे कितीतरी  लोक रस्त्यावर मुक्तपणे  थूंकत असावेत!
    तर असाच एक दिवस मी बाईकवरून ऑफिसला चाललो होतो.रस्त्यावर त्या मानाने फार ट्राफिक नव्हते. मला ओव्हरटेक करून एकजण माझ्यापुढे गेला व थोडी मान खाली करून तोंडात असलेला मुखरस चालत्या बाईकवरून कडेला थुंकला! त्याच्या मागे मी सावकाश बाईक चालवत होतो.त्याने टाकलेली ती पिंक माझ्या कपड्यावर व् तोंडावर उडाली.एवढी प्रचंड किळस आली की लगेच आंघोळ कराविशी वाटत होती! प्रचंड रागही आला होता. एव्हाना तो शहाणा बराच पुढे गेला होता.मी गाडीचा वेग वाढवला व पाठलाग करून  त्याला गाठले.त्याच्यासमोर गाडी चक्क आडवी घातली.त्याला दोन तीन शेलक्या शिव्या हासडल्या  व त्याचे गचांडे पकडले.
“ साहेब चुकी झाली सॉरी.”
माफी मागून तो रिकामा व्हायला बघत होता.थूंकलो म्हणजे फारकाही चूक केलीय असे त्याला वाटतच नसावे! त्याचा चेहरा एकदम निर्विकार होता!
“ तुमच्या अंगावर उडलय त्याला आता मी काय करू?”
“अरे पण अशी गाडी चालवताना थुंकायला लाज वाटायाला पाहीजे तुला”.
“साहेब, त्यात लाजेच काय? आता झाली चूक! मी काय म्हंतो, एक काम करा साहेब, आता तुम्हीबी थूका माझ्या तोंडावर म्हणजे फिटमफाट हुईल! हां आता लगेच थूका! माझ्या  कपड्यावर बी थूका म्हंतो मी! ”
असे म्हणून त्याने आपले तोंड पुढे केले!
मला त्याच्याशी काय आणि कसे बोलावे तेच सुचेना!
निमुटपणे मी त्याचा शर्ट सोडला.
गाडीला किक मारून परत घराकडे निघालो.त्या दिवशी ऑफिसला दांडी पडली!
तेंव्हा म्हणतोय - काळजी घ्या!
----- प्रल्हाद दुधाळ, पुणे.