Thursday, February 27, 2020

मराठीराजभाषादिन

#मराठीराजभाषादिन

     आज 27फेब्रुवारी,मराठी साहित्याचा मानदंड  वि. वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस! हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून जगभरातले मराठी बांधव साजरा करतात.या निमित्ताने मराठी भाषेचे गोडवे गायले जातात.विविध साहित्यिक उपक्रम राबवले जातात.फेसबुक व्हाट्सअँप सारख्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या घेतल्या जातात.अभिमानाने मराठी भाषेचा जागर केला जातो.
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी.
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी.
धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी.
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
  कथा कविता कादंबऱ्या अशा साहित्याने समृद्ध असलेली मायमराठी आपली मातृभाषा आहे याचा प्रत्येक मराठी बांधवाला सार्थ अभिमान आहे आणि तो असायलाही हवा;पण हा अभिमान आजकाल फक्त 27फेब्रुवारी आणि 1मे या दोनच दिवशी प्रकर्षाने आढळतो.एरवी मात्र महाराष्ट्रातील विशेषतः शहरांत  मातृभाषा मराठी असूनही बऱ्याचदा दोन मराठी माणसे एकमेकांशी हिंदी वा इंग्रजी भाषेत संवाद साधताना दिसतात.मराठी शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होते आहे.मराठीत शिकण्याचा,  बोलण्याचा,लिहिण्याचा लोकांना कमीपणा वाटायला लागला आहे.
       हे खरे आहे की जागतिकीकरणाच्या धबडग्यात सर्वमान्य इंग्रजी भाषेचे महत्व  वाढले आहे.एक परिपूर्ण ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीला असे महत्व असणे साहजिकही आहे;पण 'आम्ही इंग्रजी माध्यमातून शिकतो आहोत यामुळे मराठी मुळीच नको' ही भावना मराठी भाषेला मारक ठरते आहे.व्यवहार भाषा म्हणून इंग्रजीचा अंगीकार करतानाच आपल्या मुलांनी आपली मातृभाषाही शिकायला हवी हा आग्रह मराठी पालकांनी धरायला काय हरकत आहे?
   फक्त मराठी माध्यमातूनच शिकावे असा  आग्रह आजच्या काळात जसा दुराग्रह आहे तसाच 'मराठ' हा विषयच  अभ्यासात नको असा अट्टाहासही मायमराठी भाषेसाठी प्रचंड मारक आहे!
      आजच्या स्पर्धेच्या युगात टिकाव लागण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने इंग्रजी शिकायलाच हवी कारण ती सध्याची जागतिक मान्यतेची व्यवहारभाषा आहे;पण त्याबरोबरच प्रत्येकाने आपली मातृभाषा  मराठीही शिकायला हवी, आवर्जून लिहायला हवी आणि बोलायलाही हवी.मराठी अस्मिता,  मराठी संस्कृती, मराठी साहित्याचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे जाण्यासाठी जाणीवपूर्वक
मराठी भाषा संवर्धनाचे काम घराघरात व्हायला हवे. थोडक्यात...
  स्तुती मराठीची भाषेच्या या दिनी
  एरवी मराठी भासे दीनवाणी.
  आजकाल लाज आईच्या भाषेची
  आवडते बोली सदा इंग्रजीची.
  परक्या भाषेत मिळवावे ज्ञान
   माय मराठीचे ठेवू परी भान.
   मराठी आपुली ओळख मातीची
   आठवावी भाषा बोबड्या बोलीची.
   बोलावे हसावे गावे मराठीत
   मराठी माणसा बोल मराठीत.

       चला आजच्या मराठी भाषा दिनी शपथ घेऊ...
      मराठी लिहू,मराठी वाचू,मराठी बोलू!
    ......  प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020