Wednesday, June 28, 2017

प्रेरणा

प्रेरणा...
 माणसाला आयुष्यात प्रगती साधण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रोत्साहन मिळण्याची आवश्यकता असते.अगदी नुकतंच चालायला किंवा बोलायला लागलेल्या मुलाला त्याचे वडीलधारे प्रोत्साहन देत असतात.आपल्याकडे लहान मुलाला अंगाईगीत म्हणून जोजावले जाते.तसेच बडबडगीते  शिकवून वेगवेगळ्या शब्दांची ओळख करून द्यायची पध्दत आहे. लहान मुलांची श्रवणशक्ती तसेच निरीक्षण शक्ती एकदम तीक्ष्ण असते.आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे मुले निरीक्षण करत असतात.सभोवताली असणाऱ्या माणसांच्या विविध हालचाली व बोलण्याचे अनुकरण ही चिमुरडी करत असतात. शाररीक व मानसिक पातळीवर त्याचा विकास होत असताना त्याला अनेकांचे प्रोत्साहन मिळाल्याने त्यांची प्रगती होत असते.चांगले संस्कार मिळाले तर त्या मुलांच्या प्रगतीचा वेग वाढलेला आढळतो. संस्कारक्षम वयात आजूबाजूला चांगली माणसे लाभणे ही नशिबाची गोष्ट आहे.अनेकांना असे संस्कार लहानपणी मिळत नाहीत पण उपजत निरीक्षणशक्तीच्या जोरावर हे छोटे जीव चांगल्या सवयी अंगिकारतात व जीवनात प्रगती साधू शकतात.
  आज या शब्दाची आठवण झाली ती एका फेसबुक गृप वर चाललेल्या चर्चेवरून, विषय होता की तुम्हाला आयुष्यात कोणा कोणाकडून प्रेरणा मिळाली? मी जेव्हा या विषयावर विचार करायला लागलो तेव्हा लक्षात आले की मी व्यक्तिश: आयुष्यात जे काही मिळवले ते काही एकाच व्यक्तीच्या प्रोत्साहनाने किंवा एका विशिष्ट व्यक्तीच्या प्रेरणेने मिळालेले नाही त्यामुळे एका ओळीत या विषयावर काही लिहिणे शक्य नाही.डोळ्यासमोर असंख्य नावे तरळून गेली मग ठरवले की चला आपल्या या प्रेरणास्रोतांचा आढावा घेऊ या का?
  माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर माझ्या जडणघडणीत माझ्या आईचा मोलाचा वाटा आहेआयुष्यात कोणतीही वाईट परिस्थिती येवो विचलीत न होता ती  हाताळण्याचे प्रचंड  कौशल्य तिच्याकडे होते. त्या कौशल्याची देणगी मला तिच्याकडून मला मिळाली आहे तिच्याकडे थोडा कोपिष्टपणा होता पण वडीलांकडे असलेला शांतपणा मला वारशात मिळाला. वास्तवात जगण्याची शिकवण मला पालकांकडून मिळाली. मी तेरा चौदा वर्षांच्या असताना पितृछत्र हरपले.मी त्यांचे शेंडेफळ होतो.प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत आईने वाढवले अर्थात कोंड्याचा मांडा करून कसे जगता येते याची शिकवण परिस्थितीमुळे मिळाली.तडजोड करत जगायला शिकलो ते तेव्हाच!
   अक्षरओळख झाली आणि लिहावाचायची प्रेरणा मिळाली ती प्राथमिक शाळेतल्या कुचेकर बाई, वसंत गुरूजी,भुजंग गुरूजी यांनी सुरूवात तर छान करून दिली होती पण मिळेल ते वाचायची सवय खूप चांगले संस्कार करत राहीली.पुढे हायस्कूल जीवनात विद्यासागर सर भेटले त्यांनी मराठी आणि इंग्रजी शिकवले त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी मराठी साहित्यातली गाजलेली पुस्तके वाचनाची आवड जोपासली.इंग्रजी विषयात बोर्डाच्या मेरीटलिस्टमधे आलो ते या सरांच्या कुशल शिकवणीमुळे! ससेसर अरणकल्लेसर,पडवळसर,कदमसर असे दिग्गज शिक्षक लाभले त्यांच्या प्रेरणेमुळे शैक्षणिक प्रगती साधली गेलीच पण जगायलाही शिकविले.

Sunday, June 25, 2017

थोरली विहीर ... एक गुढ!

थोरली विहीर...एक गुढ!
   मुख्य रस्त्यावरून आमच्या वाडीत जायला अत्यंत अरूंद असा रस्ता आहे. या रस्त्याने आत वळले की एका छोट्या पुलावर आपण अलगद उतरतो.तिथे पुल आणि ओढ्याच्या सांध्याला गावाच्या पाणी पुरवठ्यासाठीची  विहीर दिसते. उंच कठडा असलेली ही विहीर अगदी अलिकडे म्हणजे वीसेक वर्षापुर्वी खोदली गेली आहे. अरूंद रस्त्याने आपण अजून थोडे पुढे गेलो की रस्त्याच्या  दोन्ही बाजूला दोन विहीरी दिसतात त्यातल्या एका विहीरीला तर कठडाही नाही आणि मी लहानपणापासून बघतोय की ती वापरातही नाही. दुसऱ्या बाजूची विहीर म्हणजे पदुबाईची विहीर. या विहीरीच्या बाजूला अगदी छोटेसे पदुबाईचे मंदीर आहे म्हणून ती पदुबाईची विहीर!या विहीरीवर माझ्या लहानपणी मोट चालायची. मोट चालू असताना चाकाचा येणारा कुई कुई आवाज आणि खड्या आवाजातली मोटेवरची गाणी अजूनही कानात घुमतात.आधी डिझेल पंप आणि नंतर  गावाला वीज आल्यावर विजेचे पंप आले आणि या मोटेवरच्या गाण्यांचा व चाकांच्या आवाजाला गाव विसरून गेलं. या दोन विहीरीच्या मधे जेमतेम आठ दहा फुटाचे अंतर आहे त्यातली एक ओसाड व आत  झाडे वाढलेली विहीर पाहून गावाला पहिल्यांदा आलेला पाहूणा घाबरतोच इथल्या लोकांना मात्र या धोकादायक रस्त्याची सवय झालेली आहे!
  या विहीरींपासून ओबडधोबड रस्त्याने आपण थोड्या चढण असलेल्या रस्त्याने पुढे निघतो आणि अचानक समोर आलेल्या थोरल्या विहीरीकडे बघून दचकतो! एका बाजूला रस्त्याच्या पातळीवर असलेली ही थोरली विहीर आणि दुसऱ्या बाजूला जुन्या पडलेल्या घराची भिंत या दोन्हीच्या मधून जेमतेम एक गाडी जाईल एवढा निमुळता खडबडीत रस्ता, नवख्या ड्रायव्हरला हमखास वाटते अरे आपली गाडी चुकून या विहीरीत तर कलंडणार नाही ना?
गेले कित्येक वर्षे हा रस्ता तसाच आहे आणि ही थोरली विहीरही तशीच आहे!
     ही जुनी विहीर गेल्या कदाचित ऐंशी ते शंभर वर्षापासून वापरात नसावी. ही विहीर सार्वजनिक आहे.भल्या मोठ्ठ्या दगडात अगदी तळापर्यंत बांधकाम असलेली ही विहीर आता जरी पडीक असली तरी कदाचित एके काळी आजूबाजूच्या कित्येक शेतांसाठी जीवनदायिनी असेल. इथेही आठ दहा मोटा एकावेळी चालत असतील. या विहीरीला थोरली विहीर का म्हणतात  हे खात्रीने सांगू शकणारे सध्या कुणी हयात नाही पण कदाचित सर्वात जुनी एकमेव विहीर म्हणून हीला थोरली विहीर म्हणत असतील. नंतर खोदली म्हणून कोणत्या विहीरीला धाकटी विहीर असे नाव असल्याचे मात्र ऐकिवात नाही,असो.कदाचित सर्वात थोरल्या घराण्याची  म्हणूनही ही थोरली असेल!
    या विहीरीबद्दल एक आख्यायिका आहे. इंग्रज सरकारला हवा असलेला एक क्रांतिकारी इथल्या शेतात कित्येक दिवस लपून बसला होता. या गावच्या लोकांनीच त्याला आसरा दिलेला होता. इथले लोक त्या पापा नावाच्या फरारी म्हणून घोषित असलेल्या क्रांतिकारकाराला खाणेपिणे पुरवायचे. तर कित्येक दिवस हा पापा इथल्या शेतात लपून बसला होता म्हणे. एक दिवस मात्र कुणीतरी फंदफितुरी केली आणि पापा पोलिसांच्या हाताला लागला. पोलिसांनी पापाला हाताला काढण्या बांधून शेतातून बाहेर आणला.अरूंद पायवाटेने पोलीस त्याला घेवून चालले होते. या विहिरीच्या काठवरून जात असताना प्रचंड शक्तीमान असलेल्या पापाने त्याला बांधलेल्या काढणीला हिसका दिला आणि विहीरीत स्वतःला झोकून दिले! काढणीचे दुसरे टोक पोलीसाने स्वत:च्या हाताला बांधले होते त्यामुळे पापाबरोबर तो पोलीसही विहीरीत पडला. त्या काळी विहीरीला खूप पाणी होते. पापा त्या पाण्यात बुडून मेला मात्र अर्धमेल्या पोलीसाला इत्तरानी वाचवले! कुणी म्हणतात की हा पापा पत्रिसरकारशी संबंधीत होता, पण खात्रीशीर माहिती कुणाकडेच नाही!
     ही थोरली विहीर मात्र आता कचराकुंडी झाली आहे. कुणी जाणीवपूर्वक तिला बुजविण्याची शक्यता नाही कारण त्यासाठी बऱ्यापैकी खर्च करावा लागेल पण आपल्या पोटात कचरा साठवत साठवत ही एक गुढ असलेली थोरली विहीर काही वर्षानंतर इतिहासजमा होईल हे मात्र नक्की!( ऐकिव माहीतीवर आधारीत)
    ...... प्रल्हाद दुधाळ.

Sunday, June 18, 2017

फादर्स डे ...

      काय आहे की मदर्स डे/ फादर्स डे च्या निमित्ताने फेसबूकवर पडलेल्या आई वडीलांच्या बरोबर काढलेल्या सेल्फी आणि प्रेमाने ओसंडून वाहणाऱ्या पोस्टी वाचल्या की वाटतं की लोक उगीच नव्या पिढीच्या नावाने बोंब मारतात!खरचं किती प्रेम आहे प्रत्येक चाईल्डला  त्यांच्या पॅरेंट्सबद्दल,मग तो मुलगा असो किंवा मुलगी! पण काय आहे ना, लोकांना ना  कायम असा  काहीतरी चघळायला विषय लागतो, उगीच बदनाम करतात मुलांना झालं!
   काल फादर्स डे होता तर आमच्या शेजारी जे देशपांडे काका काकू रहातात ना त्यांची मुले फादर्स डे साजरा करायला आली होती. बापरे, मिठाया काय, श्रीखंडपूरी काय, साग्रसंगीत जेवणाचं पार्सलच घेवून आले होते.एरवी ही दोन म्हातारी माणसेच घरी असतात,घर कसं  ओस असतं; पण काल फादर्स डे च्या निमित्ताने त्यांचं घर कसं नातवंडांनी हसतं खेळतं गोकूळ झालं  होतं! मस्त एंजॉय केलं सर्वांनी. प्रत्येकाने या दोघांच्याबरोबर सेल्फी काय  काढल्या, एकमेकांना आग्रहाने खाऊ काय घातलं, चांगला दोन तास धिंगाणा घालून दणक्यात साजरा झाला की फादर्स डे! तिथल्या तिथे प्रत्येकाने आपापलं फेसबुक स्टेट्ससुध्दा अपडेट करून टाकलं! देशपांड्यांचा धाकटा त्याच्या बायकोला सांगत होता ...
" मी ना आत्ताच आईबरोबरही सेल्फी घेवून टाकले, आता  परत मदर्स डे ला इकडे यायचं झंजट नको, काय!"
आपला नवरा कित्ती हुषार आहे ना, असा विचार करून बायकोने काय स्टाईलमधे त्याला स्माईल दिले ना की बस्स!
  त्यांच्या पोरांनी असा एकदम धुमधडाक्यात फादर्स डे साजरा केला तरी देशपांडेबाई मात्र  दुसऱ्या दिवशी बडबडत होत्या...
" काय तर म्हणे फादर्स डे साजरा केला, आता दिवसच घाला म्हणाव आमचे मेल्यांनो! अहो जेवण आणायचे ते आमची पथ्ये बघून तरी ना,आणले आणि स्वत:च खाल्ले! सगळं मेलं  वावडं असलेलं जेवण आणलं होतं! एकही घास नाही खाऊ शकलो आम्ही दोघेही!"
       तर अशी ही जुनी पिढी! एकदम खडूस! सालं त्यांना कौतुकच नाही आपल्या पोरांच!
           ...... प्रल्हाद दुधाळ.
                  ( काल्पनिक)

Monday, June 12, 2017

हजामत.

हजामत.
आता माहीत नाही पण पूर्वी गावाकडे परंपरागत बलुतेदार पद्धत आस्तित्वात होती.या पद्धतीमध्ये गावातली कामे “पेंढी” वर करून घेतली जायची. (कदाचित इत्तर ठिकाणी याला वेगळे नाव असेल,गावातले मोठे शेतकरी बलुतेदारांना वर्षाला काही ठराविक पायल्या धान्य वा काही रक्कम द्यायचे व त्याबदल्यात त्या शेतकऱ्याची वर्षभराची सगळी कामे त्या संबंधीत बलुतेदार मोफत करून द्यायचा!) या पद्धतीप्रमाणे समजा त्या घरातली कुणाची चप्पल दुरुस्त करायची झाली तर संबंधीताकडून ती दुरुस्त केली जायची, शेतातल्या अवजारांची दुरुस्ती सुतार, लोहार गरजेप्रमाणे करून द्यायचे,ठरलेला नाभिक त्या घरातील पुरुषांची हजामत करून द्यायचा, कोंबडी बकरी कापायचे काम गावातला मुलानी करायचा.अशा कामाच्या मोबदल्यात वर्षातून एकदा पेंढी (धान्य ई.) हाच काय तो मोबदला त्यांना मिळायचा. बड्या शेतकऱ्यांककडून अशी पेंढीची पध्दत सर्रास वापरली जायची.
छोटे शेतकरी मात्र आपली कामे रोखीने करून घ्यायचे.आज बहुतेककरून ही पेंढीची पद्धत नामशेष झाली असावी. 
मी अल्पभूधारक घरातला होतो त्यामुळे माझी कामे रोखीनेच करून घ्यावी लागायची.
मी शाळेत शिकत असतानाची ही गोष्ट आहे. त्या दिवशी माझा वर्गमित्र बाळया आणि मी,दोघांनाही शाळेतल्या मास्तरांनी केस कापून घ्यायला सांगितले.बाळया गावातल्या मोठ्या जमीनदार घरात जन्मलेला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेजण एकाच वेळी केस कापायला शंकरकाकाच्या दुकानात गेलो.त्या काळी पंचवीस पैशात कटिंग करून मिळायची तर तुळतुळीत गोटा पंधरा पैशात करून मिळायचा! 
आमचे बाळ्यासारखे ‘पेंढी’ खाते नव्हते.माझे कटिंगचे पैसे रोख मिळणार असल्याने शंकरकाकाने मला लगेच कटींगच्या खुर्चीत बसवलं.
“ काय रे गोटा करायचा ना?” काकाने विचारले.
“ नाहीSSनाही, कटिंग करायचीय.” मी घाईघाईनं बोललो.न जाणो बोलता बोलता अर्ध्या डोक्यावरून शंकर काकाचा वस्तरा फिरायचा!
“चार आणे आणल्यात ना?”
“हो आणल्यात ना!” मी घाईघाईने खिशातली पावली काकाला दाखवली!
आता काकाने हातातला वस्तरा ठेवला आणि मशीन घेतली. सावकाश कट कट करीत मशीन चालू लागली.डोक्यावरच्या केसांचा बदलता आकार आरशात दिसायला लागला. काकांनी माझे व्यवस्थित केस कापले.वस्ताऱ्याने मानेच्या बाजूलाही कोरून कोरून आकार दिला.कापलेले केस झटकून पाण्याचा फवारा मारला आणि टॉवेलने मस्तपैकी डोके पुसून दिले.भांग पाडून दिल्यावर मागून आरसा दाखवला.शंकरकाकाने माझी कटिंग भलतीच मन लाऊन केली होती. आरशात बघितले,आता मी मस्तच दिसत होतो! 
बाळया बाकड्यावर बसून पंधरावीस मिनिटे मान वाकडी वाकडी करून माझ्या डोक्यावरची चालू असलेली कारागिरी मन लावून बघत होता. कटिंग झाल्यावर मी ऐटीत खिशातले चार आणे काढून शंकरकाकाला दिले आणि बाकड्यावर बाळयाशेजारी जावून बसलो.
शंकरकाकाने खुर्ची झटकली आणि बाळ्याला म्हणाला-
“चल, बस रे आता तू .” 
 बाळयाही ऐटीत खुर्चीवर बसला. शंकराकाकाने काही विचारण्यापुर्वीच बाळ्याने शंकराकाकाला फर्मान सोडले ...
“ माझीसुध्दा त्याच्यासारखीच कटिंग करा बर का!”
“ त्याच्यासारखीच कटिंग करतो हा बाळया तुझी, डोळ्यात केस जातील,खुर्चीवर डोळे मिटून शांत बस!”
शंकरकाकाने वस्ताऱ्याला भिंतीवर लावलेल्या पट्ट्यावर घासून घेतले.बाळ्याच्या डोक्यावर पाण्याचा फवारा मारला आणि त्याची मान पकडून वस्तरा या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरवला! बाळ्याच्या तोंडातून शब्द येण्यापूर्वीच शंकरकाकाने बाळ्याचे चकोट करायला सुरुवात केली होती
!बाळ्याने “काका कटिंग करा ना,म्हणेपर्यंत वरचे टक्कल उघडे झाले होते!”
बाळया रडायला लागला पण पुढच्या पाच मिनिटांत बाळ्याचा चमनगोटा करून झाला होता!
“मला कटिंग करायची होती ना, मग गोटा का केलाss” म्हणून बाळ्याने भोकाड पसरले.
“ तुला कटिंग पायजेल काय? जा दादाला सांग दोन वर्षाची पेंढी रहायलीय ती द्यायला, आणि हे बघ पुढच्या वेळी याच्यासारखे रोख चार आणे घेवून ये मग देतो याच्यासारखी कटिंग करून,काय?” 
“चला निघा आता!” 
मुकाट्याने बाळया बाहेर पडला.
मला उगीचच आपण रोख पैसे देतो याचा अभिमान वाटला!
..... प्रल्हाद दुधाळ.