Thursday, August 28, 2014

मी जबाबदार आहे!

मी जबाबदार आहे!
   आपल्या जीवनात काही ना काही बऱ्या अथवा वाईट घटना घडत असतात.जेंव्हा आपण
 अशा घटनांची कारणमीमांसा जाणायचा प्रयत्न करतो तेंव्हा माणसाची एक सहजप्रवृत्ती
असते की, जीवनातल्या चांगल्या घटनांचे श्रेय तो स्वत:कडे घेत रहातो. मी यांव केले आणि
मी त्यांव केलं म्हणूनच मला यश मिळाले किंवा जे काही चांगले घडले ते केवळ माझ्या
 एकट्याच्या प्रयत्नाने! अशी शेखी मिरवत रहातो! अशा प्रसंगी तो आपल्या उपकारकर्त्यांना
पद्धतशीरपणे विसरलेला असतो.या यशासाठी ज्यांनी कुणी कळत नकळत हातभार लावलेला
असतो अशांच्या बाबतीत कृतघ्नपणा दाखवतो. याउलट जीवनात घडलेल्या वाईट घटनेसाठी
किंवा सामना कराव्या लागलेल्या परिस्थितीसाठी मात्र इतर कुणाला तरी दोष देत रहातो.
माझ्या अमुक वाईट परिस्थितीला अमुक माणूस जबाबदार आहे. तमुक परिस्थितीमुळे माझ्या
जीवनात तमुक वाईट प्रसंगाला मला सामोरे जावे लागले अन्यथा मी व्यवस्थित
परिस्थिती हाताळली असती वगैरे वगैरे.असा कुणावर आपण जेंव्हा आरोप करत असतो
त्यावेळी आपण वास्तवतेच भान सोडलेले असते.अशा वेळी शांतपणे आपल्या सारासार
विवेकबुध्दीला स्मरून जर विचार केला तर हे नक्की लक्षात येईल की आपल्याबाबत
आयुष्यात जे काही घडत असते त्याला सर्वस्वी आपण स्वत:च जबाबदार असतो! मग ती
चांगली घटना असो वा वाईट! पण आपले मन हे वास्तव मानायला तयार नसते, आपल्या
अपयशाच किंवा आपल्याला वाईट प्रसंगी जे काही भोगावे लागले त्यांचे माप दुसऱ्या कुणाच्या
पदरात घालायची आपण घाई करतो. जेंव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेंव्हा
आपल्या बोटाची उरलेली चार बोटे आपल्या स्वत:कडे अंगुलीनिर्देश करतात हे आपण
सोयीस्करपणे विसरलेले असतो!
    ‘आपल्यावर आलेल्या परिस्थितीला आपण स्वत:च जबाबदार असतो!’ हे कटू असले तरी
 सत्य असते. हे असे का घडते यामागे अनेक कारणे असू शकतात......
१.आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे?, आपल्या जीवनाचे अंतिम धेय्य काय
 असायला हवे? जीवनातला आनंद म्हणजे नक्की काय? सुख व समाधानी असणे म्हणजे
 काय?याबद्दल कुठल्याच दिशेने आपण विचार केलेला नसतो शिवाय आपल्याकडे पुरेसा
आत्मविश्वास नसतो किंवा स्वत:वर नको इतका फाजील विश्वास असतो.स्वत:ला
ओळखायला,स्वत:मधली कमजोरी आणि बलस्थ्याने जाणून घेण्याचे आपण जाणता अजाणता
टाळलेले असते.
२.कुठेतरी आपण आजूबाजूच्या व्यक्तींवर नको इतके अवलंबून असतो.स्वत: मुध्देसूद विचार
 न करता इत्तरानी आपल्यासाठी विचार करावा व योग्य निर्णय घ्यावा अशी आपली अपेक्षा
असते व अशाप्रकारे कुणीतरी सुचविल्याप्रमाणे आपल्याला निर्णय घेण्याची सवय लागलेली
असते.स्वावलंबनाचे महत्व शाळेत अभ्यासलेले असते पण व्यवहारातही ते वापरायचे असते हे
सोयीस्करपणे विसरलेले असते.आपली ओझी कायम दुसऱ्यांनी उचलावीत व जीवनभर अल्लाद
वाहून न्यावीत अशी अवास्तव अपेक्षा आपण केलेली असते.
३.आपण सारासार विचार न करता, परिणामांचा विचार न करता आततायीपणा करून निर्णय
घेतलेले असतात.पण जेंव्हा त्या निर्णयाची जबाबदारी घ्यायची वेळ येते तेंव्हा ती
झटकण्याकडे आपला कल असतो.एक गोष्ट येथे नमूद करायला हवी की कोणताही निर्णय
कुणीही कुणावर लादला तरी तो घेण्याचा अंतिम अधिकार आपण स्वत:च बजावलेला असतो!
हे वास्तव आपण सहजपणे विसरतो व इत्तराना दोष देत रहातो. खर तर कुठलाही निर्णय
घेतल्यानंतर त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होणार आहेत त्याची पूर्ण जबाबदारी आपली
स्वत:चीच आहे.
४.आपण माणसांशी नाती जोडण्यात व असलेली नाती जोपासण्यात कमी पडतो.नाती
जोपासण्या पेक्षा आपण आपला अहंकार कुरवाळत बसतो.जीवनातल्या आजूबाजूच्या
माणसांच्या चुका माफ करून आणि आपल्या झालेल्या चुकांसाठी माफी मागून मानवी जीवन
अधिक सुखी होते समृध्द होते हे आपल्या गावीच नसते! वास्तव जीवनात अस्तित्वात
नसलेल्या गोष्टी साठी, वा हरवलेल्या निसटून गेलेल्या क्षणांसाठी रडत बसण्यापेक्षा
समोर जे मिळाले आहे त्यावर लक्ष केंद्रित करून आयुष्य समरसतेने जगण्याची जी संधी
निर्मिकाने आपल्याला दिलेली आहे, त्याबद्दलची कृतज्ञता आपण बाळगत नाही.
५.आपण आपल्याच विश्वात कुपमंडूक वृत्तीने जगत असतो बाहेरच्या विशाल जगाची
आपल्याला जाणीवच नसते. या स्वत:च्या कोषातल्या  जगातील स्पर्धा असूया मत्सर भीती
चिंता कटकटी यातच आपण इतके गुंतून पडतो की जेंव्हा बाहेरच्या जगातील लोकांचा संबंध
येतो तेंव्हा त्या जगात वावरताना गोंधळून जातो.
६.आपल्यात इच्छाशक्तीचा अभाव असतो.केवळ नशिबावर हवाला न ठेवता त्या नशिबाच्या
साथीला आपले योग्य दिशेने केलेले अथक प्रयत्न सुध्दा यश,सुख ,समाधान मिळण्यासाठी
आवश्यक असतात याची आपल्याला जाणीवच नसते. ’अपयश ही यशाची पहिली पायरी असते’
 हे सुविचार म्हणून आपण बऱ्याचदा वाचलेले असते पण त्यावर विश्वास ठेवलेला नसतो!
७.आपण नकारात्मक विचारातच रमलेले असतो हे जीवन सुंदर करण्यासाठी जी सकारात्मकता
अंगी बाळगायला हवी त्याबद्दल एक तर अनभिज्ञ असतो किंवा त्या दिशेने कधी विचारच
केलेला नसतो. मनात कायम नकारात्मक विचार ठेवल्यामुळे आकर्षणाच्या नियमाप्रमाणे
जीवनात फक्त वाईट गोष्टीच घडत रहातात व माणूस हळू हळू निराशेच्या गर्तेत फसत
जातो.केवळ सकारात्मकता बाळगण्याने जीवनात चमत्कार घडतात!
८.मिळालेल्या संधीचा सुनियोजित वापर करण्याचे आपण टाळलेले असते,थोडक्यात आपण
 नेमक्या वेळी कामचुकारपणा केलेला असतो, आयुष्यात प्रत्येकाला योग्य वेळी संधी मिळतेच
 मिळते, पण ही संधी ओळखून अचूकपणे पकडण्याचा डोळसपणा आपल्याकडे असायला
 हवा.आपल्याच कोषात राहणाऱ्या व्यक्तीची अर्थातच ही संधी हुकते आणि मग तो आपल्या
 नशिबाला दोष देत रहातो. “ वक्तसे पहले और नाशिब से जादा किसीको कुछ नही मिलता”
 असे जरी काही लोक म्हणत असले तरी

 “कोशिश करने वालोंकी कभी हार नही होती” हे
 सुध्दा तेव्हढेच खरे आहे! आवश्यकता आहे ती यश अपयाशापलीकडे जाऊन केलेल्या
  प्रयत्नांची!
९.आपल्यातली जिद्द कुठेतरी कमी पडलेली असते,एखाद्या प्रयत्नात मिळालेल्या अपयशामुळे
आपण हताश होतो.सगळ काही संपल्याची भावना मनाचा ताबा घेते आणि अपयशाच्या
 भीतीपोटी प्रयत्न करणेच बंद केले जाते.यश अपयशाची चिंता न करता मनाची जिद्द कायम
ठेउन केलेले सतत चे प्रयत्न शेवटी यशापर्यंत घेऊन जातात.
१०.आपण काम क्रोध मद मत्सर इ .च्या आहारी जाऊन आपल्या कामाकडे दुर्लक्ष केलेले
असते वा आपली कुवत समजून न घेता पाउल टाकलेले असते. आपण आपले उद्धिष्ट
ठरवताना आपली शाररीक व बौद्धिक कुवत सुद्धा लक्षात घ्यायला हवी पण बऱ्याचदा
“दिल मांगे मोअर” च्या चक्रात आपण अडकतो व अधिकाधिक च्या या नादात हातात असलेले
सुध्दा उपभोगायचं राहून जात.त्यामुळे कुठे थांबायचं हे सुध्दा ठरवता आले पाहिजे.आधुनिक
युगात गरजेच्या गोष्टी निश्चितच मिळायला हव्या पण या गोष्टीपायी आपले भावानाविहीन
यंत्र तर होत नाही ना याचे तारतम्य असायला हवे.
    अशा प्रकारे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक बऱ्या वाईट घटनांची जबाबदारी  आपणच
 घ्यायला हवी. ती कुणा दुसऱ्यावर ढकलून इत्तराना दोष देणे चुकीचे आहे !
    आपल्याला आयुष्यात जे काही मिळते ते आपल्या कर्माचे फळ असते त्यामुळे मनात
कायम ही गोष्ट असायला हवी की अशा बऱ्या अथवा वाईट गोष्टीला “मी जबाबदार आहे, मी
जसे वागतो,बोलतो व त्या वागण्याबोलण्याचे जे काही परिणाम समोर येतात त्याला मी
जबाबदार आहे. माझ्या वेगवेगळ्या प्रसंगी केलेल्या बऱ्या वा वाईट कृतीचे जे काही बरेवाईट
परिणाम समोर येणार आहेत त्याला मी जबाबदार आहे.अशा बऱ्या वाईट परिणामामुळे मला
जो काही आनंद मिळेल त्याला मी जबाबदार आहे.जे काही मानहानीचे प्रसंग माझ्या समोर
येतील त्याला मी जबाबदार आहे. जे काही दु:ख वाट्याला येईल त्याला मी जबाबदार आहे.एक
माणूस म्हणून या जगात जन्म घेतल्यानंतर त्या जन्माबरोबर जे काही दु:खाचे, दैन्याचे,
अगतिकतेचे ,अपमानाचे, सुखाचे ,आनंदाचे, वा अन्य कुठल्याही प्रकारचे प्रसंग समोर येतील
ते कृतज्ञा पूर्वक निर्मिकाकडून मिळालेला अनुभवरूपी प्रसाद म्हणून  स्वीकारण्याला मी
 जबाबदार आहे”.
मला हे पूर्णपणे माहीत आहे की –
   “माझ्या जीवनाचा शिल्पकार ‘मी’ च आहे!”


                       .........................प्रल्हाद दुधाळ .
प्रकाशित -साहित्य लोभस दिवाळी अंक २०१५ 

Tuesday, August 26, 2014

संवेदनशीलता.

संवेदनशीलता.
       आपल्या आजूबाजूला अनेक अशी माणसे आपण पहातो की स्वत:वर वा इत्तरांवर आलेल्या
कोणत्याही प्रसंगी पराकोटीचे भावूक होतात.त्यांना आपल्या भावनांवर काबू राखणे जमत नाही
कुणावरही आलेल्या वाईट प्रसंगी/ समस्येच्या प्रसंगी अशा व्यक्तींच्या डोळ्यात चटकन पाणी
येते तर दुसऱ्याला झालेला आनंद्सुध्दा अशा लोकांना भावूक बनवतो. टी.व्ही.वर वा चित्रपटात
पाहिलेल्या भावनिक प्रसंगांनी सुध्दा अशी हळवी माणसे भावनावश होतात.अशा माणसांना
कुणावर झालेला अन्याय सहन होत नाही. अगदी सहजपणे यांना कुणाचीही कणव येते.
ते कोणताही मागचा पुढचा विचार न करता संबंधित माणसाला होता होईल तेव्हढी मदत देउ
करतात.इतरांवर आलेली वेळ ही स्वत:वरच आलेली आहे असे समजून हे लोक वागत
असतात.प्रसंगी पदरमोड करून अशी माणसे तनमनाने इतरांच्या समस्या मध्ये
एकरूप होतात. असे इतके संवेदनशील असणे योग्य की अयोग्य हा प्रश्न मला नेहमी पडतो.
     याउलट चित्रही आजूबाजूला पहायला मिळते.अशीही अनेक मुर्दाड माणसे दिसतात की
ज्यांना कोणाचेही कुठल्याही प्रकारचे सोयरसुतक नसते! कुणाचे काहीही होवो त्यांच्या जीवनात
काडीचाही बदल  होत नाही.अगदी त्यांच्या स्वत:वर वा जवळच्या माणसावर कोणताही वाईट
प्रसंग आला तरी ते आपल्याच मस्तीत मस्त मजेत जगत असतात! त्यांना ना कुणाची
फिकीर असते, ना कशाबद्दल खेद असतो, ना कसली खंत असते.ना ते भूतकाळात रमतात,ना
त्यांना भविष्याची चिंता असते! कुठल्याही प्रकारची लाज वा शरम ते बाळगत नाहीत.
जग काय म्हणेल? हा प्रश्नच त्यांना कधी पडत नाही.आपल्या वागण्या बोलण्याचे परिणाम
काय होतात कुणी दुखावला जातोय का किंवा आपल्यामुळे कुणावर अन्याय होतोय का
याबद्दल त्यांना किंचितही काही वाटत नाही. आपल्या समाजातील प्रतिष्ठेला त्यांच्या लेखी
शून्य किंमत असते. ही माणसे एकदम भावनाशुन्य असतात.स्वार्थासाठी ते कोणत्याही थराला
जाउ शकतात. अशा लोकांना कुणाचीही भीती वाटत नाही. कुणाच्याही मनाचा ते विचार करत
 नाहीत. कुणी कितीही प्रयत्न करा यांच्या भावनेला हात घातला तरी ते पाघळत नाहीत.
   वरील दोन्ही पैकी कोणता स्वभाव चांगला? माझ्या मते टोकाची संवेदनशीलता वा
 भावनाशुन्यता दोन्हीही वाईटच!
    अतिभावनाशील लोकांच्या अतिसंवेदनशील असण्याचा सर्वात मोठा फटका त्यांना
स्वत:लाच बसत असतो.त्यांच्या स्वत:च्या वास्तव जीवनाशी काडीचाही संबंध नसलेल्या
 गोष्टीतील त्यांच्या मानसिक सहभागामुळे त्यांच्या मनावर अनिष्ट परिणाम होत असतात.
त्याचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या शाररीक व मानसिक स्वास्थ्यावर होत
 असतात.साधू व संतांसाठी “ जे का रंजले गांजले,त्यांशी म्हणे जो आपुले” हे आदर्श वागणे
साधुत्वाचे लक्षण असेलही, पण वास्तवात सामान्य माणसासाठी  “प्रपंच करावा नेटका” हेच
 आदर्श संतवचन असते! वयक्तिक आयुष्यातील सुख,समाधान, आरोग्य व ऐश्वर्य हेच
सामान्य माणसाचे प्राथमिकतेचे विषय असतात, हेच सत्य आहे!
    याचा अर्थ माणसाने फक्त आपल्यापुरतेच पहावे असेही नाही. माणूस म्हणून जगताना
आवश्यक असलेली माणुसकी अंगी नक्कीच असायला हवी. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी तर
दुख:चे प्रसंगी ते दुख: वाटून घ्यायला माणसाने तत्परतेने पुढे यायला हवे.एक सहिष्णू माणूस
म्हणून हा गुण निश्चितच अंगी असायला हवा, पण संवेदनशील माणसे समोरच्या माणसाच्या
जागी स्वत: आहोत असे समजून वागतात/ अति भावूक होतात, हे चुकीचे आहे. इतरांच्या
समस्यांमध्ये गुंतून आपले स्वत:चे जगणे अवघड करून घेण्यापेक्षा वा समस्याग्रस्त
 माणसाच्या सुरात सूर मिसळून रडणे वेगळे आणि त्या समस्येचे वास्तव विश्लेषण करून
 तिचे निराकरण करण्यासाठी तटस्थ्य वृत्तीने मदत करणे वेगळे! मदतच करायची तर
दुसऱ्या प्रकाराने करणे कधीही समोरच्या व्यक्तीच्या फायद्याचे असते.अशाच प्रकारची मदत
कोणत्याही अडचणीतील माणसाला अपेक्षित असते.यालाच माणुसकी असे म्हणतात!
कवी नामदेव ढसाळ एका कवितेत म्हणतात –
“वह्या पुस्तकाची ओझी वाहिली नसती तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या!”
थोडक्यात अतिसंवेदनशील असण्याचे फायदे असण्यापेक्षा तोटेच जास्त असतात.
संवेदना बोथट असणे वेगळे आणि संवेदनशील असणे वेगळे!
संवेदनशील माणसे कोणत्याही प्रकारच्या भावनांमध्ये वाहून जात नाहीत तर अशा प्रसंगी
तारतम्य  बाळगून समतोल विचार करतात.व अडचणी मधून सुयोग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न
 करतात.अशा प्रकारे योग्य पद्धतीने व योग्य दिशेने केलेला विचार नेहमीच समस्येच्या
समाधानापर्यंत घेउन जातो.
अतिसंवेदनाशीलता किंवा संवेदनहीनता हे दोन्ही वाईंटच! या दोहोमधील अवस्थ्या ही आदर्श
 म्हणायला हवी.
आपल्याला काय वाटते?
                                  ..........प्रल्हाद दुधाळ.



Thursday, August 21, 2014

मोल .

              मोल .             
       
माझ्या ओळखीतल्या एकाला पेन हरवण्याची वाईट सवय होती. तो कायम आपल्या निष्काळजीपणामुळे पेन कुठे तरी विसरून येत असे.आपल्या या सवयीमुळे तो कायम स्वस्तातले पेन खरेदी करून वापरत असे! त्यामुळे असे किरकोळ किमतीचे पेन हरवले तरी त्याला त्याचे काहीच वाटत नसे. एकदा तो आपल्या मित्रांशी या सवयीबद्दल फुशारकी मारत बोलत होता.विशेष म्हणजे त्याच्या त्या सवयीचे तो समर्थन करत होता! मुळात आपण खरेदी करतानाच एकदम स्वस्तातले पेन घेतो त्यामुळे पेन हरवले तरी त्याचे मुळीच वाईट वाटत नाही, अशा प्रकारे तो त्याच्या निष्काळजीपणाला एका सद्गुणाचे लेबल लाऊ पहात होता. त्याची ती वटवट ऐकून वैतागलेल्या एका मित्राने त्याला सुचवले की " एक काम कर, तू असे स्वस्तातले पेन वापरण्यापेक्षा एकदा एखादा महागडा पार्करचा पेन घे आणि तो किमती पेन नेहमीच्या सवयीने हरवतो का ते बघ!" त्याने हो ना करत हे चॅलेंज स्वीकारले. मार्केटमधे जाऊन चांगला सातशे रूपयाचा पार्कर कंपनीचा एकदम आकर्षक सोनेरी पेन खरेदी केला. इतका महागडा पेन त्याने आयुष्यात पहिल्यांदाच घेतला होता. दररोज हा पेन त्याने वापरायला सुरूवात केली.मधे एका वर्षाचा काळ गेला; पण हा महागडा पेन त्याने हरवला नाही!
तो विचारात पडला....
असे का घडले असावे?
त्याच्या लक्षात आले की हा पेन त्याच्या नेहमीच्या सवयीने हरवला नाही याचे कारण होते त्या पेनाची किंमत!
जास्त किंमत मोजली असल्यामुळे तो या पेनाची प्रचंड काळजी घेत होता!
माणसाच्या आयुष्याचही असंच असतं!
आपण अशाच गोष्टीची काळजी घेतो ज्या गोष्टीना आपण आपल्या जीवनात अत्यंत मौल्यवान समजतो!
-जर आपण आपल्या उत्तम आरोग्याचे मोल जाणत असलो तर नक्कीच आपल्या आहारविहार व नियमित व्यायाम करून आपल्या शरीराची व मनाची काळजी घेऊ. काय, किती आणि कस खायचं याबद्दल सतत सजग राहू.
-जर खऱ्या मैत्रीची किंमत आपण जाणत असलो तर मित्रांशी आदराने वागू.त्याच्या सुख दु:खात सामील होवून हे स्नेह नाते जोपासण्याला सर्वोच्च महत्व देऊ.
-जर पैशाचे मोल आपल्याला माहीत असेल तर तो जपून वापरू. अनाठाई होणाऱ्या खर्चाला आवर घालू. बचत करून उज्वल भविष्यासाठी तरतूद करून ठेऊ.
-जर वेळेचं महत्व आपल्याला माहीत असेल तर प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करू आणि कुठल्याही प्रकारे अनमोल वेळेचा अपव्यय केला जात नाही ना हे पाहू.
-जर आयुष्यात वेगवेगळी नाती तुमच्यासाठी मोलाची असतील तर तुम्ही कुणालाही दुरावा देणार नाही.नाती टिकवण्याला आपले प्राधान्य असेल.नाते टिकवण्यासाठी आपण आपल्यात असलेल्या अहंकाराला दूर ठेवू. माफ करून आणि माफी मागून नात्यांचे संगोपन करायला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल.
वरील विवेचनावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की जर तुम्ही निष्काळजी असाल, आयुष्यात कोणत्याही बाबतीत तुमच्या संवेदना बोथट असतील तर तुम्हाला जीवनातल्या कोणत्याच बाबींचे गांभीर्य नाहीच;शिवाय नाती,पैसा, वा स्वत:चे जीवन अशा कोणत्याच गोष्टींची खरी किमत वा महत्व तुम्हाला अजून माहीत नाही!
......प्रल्हाद दुधाळ
.

Tuesday, August 12, 2014

कृतज्ञता....एक जादू .

कृतज्ञता....एक जादू .
      आपल्या दररोज च्या आयुष्यात पावलागणिक अनेक माणसे आपल्याला भेटतात.काही परिचित असतात तर काही अपरिचित असतात.अशा माणसांचे आपण जर निरीक्षण केले तर आढळून येईल की प्रत्येकजण कुठल्या तरी चिंतेत आहे.अनेक प्रकारच्या समस्यांचे ओझे घेउन माणसे जगत असतात.क्वचित एखादा माणूस खळाळते हास्य चेहऱ्यावर घेउन आणि तणावरहित असा दिसतो.अशा माणसाला निश्चितच विचारावेसे वाटते की त्याला कसलीच समस्या नाही का? आधुनिक जगात कुठलीच समस्या नाही अशी व्यक्ती अस्तित्वात असणे शक्य नाही असे मला वाटते.मग काही माणसे आपल्या सर्व समस्या बाजूला ठेउन कसे काय प्रसन्न चेहऱ्याने वावरू शकतात? माझ्या मते अशी माणसे वास्तवाचा स्वीकार करून आपल्या आयुष्याला सामोरे जात असावीत!
    समाधानी आयुष्यासाठी माणसाने प्रथम त्याच्याकडे असलेल्या गोष्टींबाबत आभारी असायला हवे पण माणूस नेमके याच्या उलट वागताना दिसतो.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो त्याच्या हातात नसलेल्या गोष्टींवरून भीती, चिंता, कटकट, वटवट करत, रडत आणि नशिबावर चिडत,कसेबसे जगत असतो असे करताना तो आपली मन:शांती सुख समाधान सगळ सगळ हरवून बसतो.खरे सुख कशात आहे याबद्दल त्याच्या भ्रामक कल्पना असतात.क्षणभंगुर समाधानासाठी तो आपले सर्वस्व पणाला लावतो व त्यापोटी एक दिवस निराशेच्या गर्तेत सापडतो.सकाळी उठल्यानंतर त्यांचा दिनक्रम चिडचिडेपणा करण्याने सुरु होतो आणि मग त्याचा सगळा दिवस,आठवडा,महिना आणि मग महिनोंमहिने शेवटपर्यंत तो निराशाग्रस्त रहातो.मन:शांतीसाठी कुठले ना कुठले उपाय करत रहातो.आध्यात्मिक गुरूंचे उंबरठे झिजवले जातात.काहीजण इत्तर काही अतर्क्य मार्गाने मन:शांती शोधू पहातात.यामध्ये माणूस गुरफटून जातो.अशावेळी खूप कमी लोकांना योग्य मार्गदशन मिळते.बाकीच्या असंख्य माणसांची ससेहोलपट होत रहाते.
   आपल्याला आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टींचे वरदान मिळालेले असते.आपल्याकडे खूप अंगचे गुण असतात,आजूबाजूला अनेक गुणवान माणसे असतात पण आपल्याला याची जाणीवच नसते आपल्याला असलेल्या अनुकूल परिस्थितीचे भान नसते आणि आपण या गोष्टींबाबत कधी गंभीरही नसतो.आपले सगळे लक्ष आसपासच्या सकारात्मक बाबींपेक्षा नकारात्मक गोष्टींकडे एकवटलेले असते.अशा नकारात्मक मनस्थितीचा एकूण जगण्यावरच वाईट परिणाम होत रहातो. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग विविध तज्ञ सुचवतात असाच एक मार्ग नुकताच मला THE MAGIC या पुस्तकात वाचायला मिळाला. या पुस्तकामध्ये कृतज्ञतेचा सिद्धांत सांगितला आहे.या थेअरी प्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सर्व गोष्टींची,परिस्थितीची,व्यक्तींची यादी करून त्या गोष्टीबाबत सजगपणे व सकारण कृतज्ञता व्यक्त करायची सवय लाउन घ्यायची आहे.
  आता आपण कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करू शकतो यावर थोडा विस्ताराने विचार करू.
आपण कृतज्ञ असले पाहिजे अशा गोष्टी शोधण्यासाठी सुरुवात आपल्या स्वत:पासून करणे योग्य राहील.
- अनमोल असा मानवाचा जन्म मिळाला म्हणून आभारी असायला हवे.
-आपल्याला निरोगी शरीर लाभल्याबद्दल आभार व्यक्त करायला हवेत.शरीरातील प्रत्येक अवयव अहोरात्र काम
करतो म्हणून प्रत्येक अवयवाचे तो देत असलेल्या सेवेचे स्मरण करून वारंवार आभार मानले पाहिजेत.
-आपण जे अन्न खातो त्या अन्नाबद्दल कृतज्ञ असायला हवे आपल्या ताटात जे वेगवेगळे पदार्थ
 येतात त्यासाठी अनेक व्यक्तीनी वेगवेगळ्या टप्प्यांवर आपआपले योगदान दिलेले असते त्या सर्वांचे तसेच
निसर्गाचे आपण आभार मानायला हवेत.
-आपण करीत असलेल्या कामाप्रती आपण आभारी असायला हवे. आपल्या कामामध्ये जे यश आपण
मिळवतो ते मिळवताना व  काम व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी आपला बॉस, हाताखालचे कर्मचारी, ग्राहक तसेच
जाणते अजाणतेपणी अनेक इत्तर घटक योगदान देतात या सर्वांचे आपण आभारी असायला हवे.
 -समाजात आपण जेंव्हा एक यशस्वी व्यक्ती म्हणून मिरवतो तेंव्हा हे यश मिळवताना आपल्या अगदी आपल्या
बालवयापासून शिक्षण तसेच इत्तर आवश्यक कौशल्ये प्राप्त करताना प्रगती करताना आपले पालक तसेच अनेक
व्यक्ती,संस्थ्या,मित्रमंडळी, शेजारी, नातेवाईक ई.यांचा हातभार लागलेला असतो हे यश साजरे करताना आपण
या सर्वांचे आभारी असायला हवे.
-आपण ज्या घरात सुखाने व समाधानाने रहातो ते घर बनविण्यासाठी ज्यांनी कष्ट उपसले त्या सर्वांचे तसेच
घरासाठी जे मटेरीअल वापरले ते बनविणारे व घराच्या जागेपर्यंत पोहाचते करणारे हात तसेच विविध अभियंते व
तंत्रज्ञ यांचेही आभारी असायला हवे.
-आपण सुखी व समाधानी जीवन जगत असताना आपल्या अशा जीवनासाठी अनेकजण जाणते अजाणतेपणे
आपली सेवा करत असतात जसे पेपरवाला, दूधवाला, सफाई कर्मचारी, रिक्षावाला ,भाजीवाला,सार्वजनिक वाहतूक
कर्मचारी,नगरपालिका,सीमेवरील जवान ,पोलीस तसेच इत्तर सेवा पुरवठा करणाऱ्या सरकारी तसेच खाजगी
कंपन्यांचे कर्मचारी ई.ई. असे अनेक लोक आपल्या सुखासाठी अहोरात्र झटत असतात अशा सर्वांचे आपण
आभारी असायला हवे.
-एक व्यक्ती म्हणून आनंदात जगत असताना आपल्या आनंदी जगण्यासाठी आपले सर्व कुटुंबीय जसे आई,
वडील पत्नी मुले अनेक जवळचे व लांबचे नातेवाईक आपापल्यापरीने हातभार लावत असतात.आपल्या
आरोग्यपूर्ण जगण्यासाठी आपले डॉक्टर योग्य मार्गदर्शन करत असतात.विविध कलाकार आपलेमनोरंजन करत
असतात अशा अनेक व्यक्तींमुळेच आपले जीवन समृध्द होत असते.आपण जर व्यावसायिक असलो तर आपले
कर्मचारी,पुरवठादार व सर्वात महत्वाचे म्हणजे आपले ग्राहक व नोकरदार असलो तर आपले सहकारी व आपण
काम करत असलेली संस्थ्या  यांच्यामुळेच आपल्याला पैसा मिळत असतो त्यामुळे अशा सर्व व्यक्तींचे आपण
सतत आभारी असायला हवे.
-अनेकदा आपल्याला काही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो काही नको त्या व्यक्ती व नकारात्मक  
परिस्थितीचा सामना करावा लागतो तेंव्हा आपल्याला मिळालेल्या या अनुभावाप्रतीसुध्दा आपण आभारी असायला
हवे कारण त्यातूनच आपल्याला जगण्याचे धडे मिळत असतात.चिडचिड न करता आपण कृतज्ञ राहिल्यामुळे
अशी परिस्थिती झपाट्याने सकारात्मक होते.
   आयुष्यात आपल्याला अशी अनेक वरदाने मिळालेली असतात पण आपण या वरदानांच्या बाबत
कधीच कृतज्ञता व्यक्त करत नाही त्यामुळे आपण जीवनात अनेक दु:खांचा सामना करत रहातो.समाधानी
आयुष्यासाठी ही कृतज्ञतेची जादू वापरता येणे आवश्यक आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला मिळालेल्या
 अगणित वरदानांची यादी वाचून हरेक वरदानाबाद्द्ल आभारी आहे असे किमान तीन वेळा म्हणून कृतज्ञता
व्यक्त केल्याने तसेच रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्वात आनंददायक घटनेचे स्मरण केल्यामुळे आपल्या
आयुष्यात खूपच फरक होतो कारण जेंव्हा तुम्ही चांगली घटना आठवत झोपी जाता तेंव्हा प्रसन्नपणे झोपता
तसेच सकाळी आपल्याला लाभलेल्या वरदानाबाद्द्लआभारी आहे असे म्हटल्याने सकाळी आपले मन प्रसन्न रहाते
दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी झाल्यामुळे दिवसही आनंदात जातो.दिवसाचा शेवटही चांगल्या विचारांनी
होतो त्यानुळे शांतपणे झोप मिळते सतत आनंदी रहाण्याची सवय होते त्यामुळे आकर्षणाच्या नियमाप्रमाणे फक्त आनंददायक गोष्टीच आयुष्यात घडत रहातात.जीवनात यश,सुख समाधान पैसा सशक्त नातेसंबंध यामध्ये झपाट्याने सुधारणा घडून येते असा लेखिकेचा दावा आहे.
   अधिक माहिती व ज्ञानासाठी The SECRET आणि  THE MAJIC ही पुस्तके जरूर वाचायला हवीत.
                                                             -----प्रल्हाद दुधाळ