Tuesday, August 26, 2014

संवेदनशीलता.

संवेदनशीलता.
       आपल्या आजूबाजूला अनेक अशी माणसे आपण पहातो की स्वत:वर वा इत्तरांवर आलेल्या
कोणत्याही प्रसंगी पराकोटीचे भावूक होतात.त्यांना आपल्या भावनांवर काबू राखणे जमत नाही
कुणावरही आलेल्या वाईट प्रसंगी/ समस्येच्या प्रसंगी अशा व्यक्तींच्या डोळ्यात चटकन पाणी
येते तर दुसऱ्याला झालेला आनंद्सुध्दा अशा लोकांना भावूक बनवतो. टी.व्ही.वर वा चित्रपटात
पाहिलेल्या भावनिक प्रसंगांनी सुध्दा अशी हळवी माणसे भावनावश होतात.अशा माणसांना
कुणावर झालेला अन्याय सहन होत नाही. अगदी सहजपणे यांना कुणाचीही कणव येते.
ते कोणताही मागचा पुढचा विचार न करता संबंधित माणसाला होता होईल तेव्हढी मदत देउ
करतात.इतरांवर आलेली वेळ ही स्वत:वरच आलेली आहे असे समजून हे लोक वागत
असतात.प्रसंगी पदरमोड करून अशी माणसे तनमनाने इतरांच्या समस्या मध्ये
एकरूप होतात. असे इतके संवेदनशील असणे योग्य की अयोग्य हा प्रश्न मला नेहमी पडतो.
     याउलट चित्रही आजूबाजूला पहायला मिळते.अशीही अनेक मुर्दाड माणसे दिसतात की
ज्यांना कोणाचेही कुठल्याही प्रकारचे सोयरसुतक नसते! कुणाचे काहीही होवो त्यांच्या जीवनात
काडीचाही बदल  होत नाही.अगदी त्यांच्या स्वत:वर वा जवळच्या माणसावर कोणताही वाईट
प्रसंग आला तरी ते आपल्याच मस्तीत मस्त मजेत जगत असतात! त्यांना ना कुणाची
फिकीर असते, ना कशाबद्दल खेद असतो, ना कसली खंत असते.ना ते भूतकाळात रमतात,ना
त्यांना भविष्याची चिंता असते! कुठल्याही प्रकारची लाज वा शरम ते बाळगत नाहीत.
जग काय म्हणेल? हा प्रश्नच त्यांना कधी पडत नाही.आपल्या वागण्या बोलण्याचे परिणाम
काय होतात कुणी दुखावला जातोय का किंवा आपल्यामुळे कुणावर अन्याय होतोय का
याबद्दल त्यांना किंचितही काही वाटत नाही. आपल्या समाजातील प्रतिष्ठेला त्यांच्या लेखी
शून्य किंमत असते. ही माणसे एकदम भावनाशुन्य असतात.स्वार्थासाठी ते कोणत्याही थराला
जाउ शकतात. अशा लोकांना कुणाचीही भीती वाटत नाही. कुणाच्याही मनाचा ते विचार करत
 नाहीत. कुणी कितीही प्रयत्न करा यांच्या भावनेला हात घातला तरी ते पाघळत नाहीत.
   वरील दोन्ही पैकी कोणता स्वभाव चांगला? माझ्या मते टोकाची संवेदनशीलता वा
 भावनाशुन्यता दोन्हीही वाईटच!
    अतिभावनाशील लोकांच्या अतिसंवेदनशील असण्याचा सर्वात मोठा फटका त्यांना
स्वत:लाच बसत असतो.त्यांच्या स्वत:च्या वास्तव जीवनाशी काडीचाही संबंध नसलेल्या
 गोष्टीतील त्यांच्या मानसिक सहभागामुळे त्यांच्या मनावर अनिष्ट परिणाम होत असतात.
त्याचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या शाररीक व मानसिक स्वास्थ्यावर होत
 असतात.साधू व संतांसाठी “ जे का रंजले गांजले,त्यांशी म्हणे जो आपुले” हे आदर्श वागणे
साधुत्वाचे लक्षण असेलही, पण वास्तवात सामान्य माणसासाठी  “प्रपंच करावा नेटका” हेच
 आदर्श संतवचन असते! वयक्तिक आयुष्यातील सुख,समाधान, आरोग्य व ऐश्वर्य हेच
सामान्य माणसाचे प्राथमिकतेचे विषय असतात, हेच सत्य आहे!
    याचा अर्थ माणसाने फक्त आपल्यापुरतेच पहावे असेही नाही. माणूस म्हणून जगताना
आवश्यक असलेली माणुसकी अंगी नक्कीच असायला हवी. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी तर
दुख:चे प्रसंगी ते दुख: वाटून घ्यायला माणसाने तत्परतेने पुढे यायला हवे.एक सहिष्णू माणूस
म्हणून हा गुण निश्चितच अंगी असायला हवा, पण संवेदनशील माणसे समोरच्या माणसाच्या
जागी स्वत: आहोत असे समजून वागतात/ अति भावूक होतात, हे चुकीचे आहे. इतरांच्या
समस्यांमध्ये गुंतून आपले स्वत:चे जगणे अवघड करून घेण्यापेक्षा वा समस्याग्रस्त
 माणसाच्या सुरात सूर मिसळून रडणे वेगळे आणि त्या समस्येचे वास्तव विश्लेषण करून
 तिचे निराकरण करण्यासाठी तटस्थ्य वृत्तीने मदत करणे वेगळे! मदतच करायची तर
दुसऱ्या प्रकाराने करणे कधीही समोरच्या व्यक्तीच्या फायद्याचे असते.अशाच प्रकारची मदत
कोणत्याही अडचणीतील माणसाला अपेक्षित असते.यालाच माणुसकी असे म्हणतात!
कवी नामदेव ढसाळ एका कवितेत म्हणतात –
“वह्या पुस्तकाची ओझी वाहिली नसती तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या!”
थोडक्यात अतिसंवेदनशील असण्याचे फायदे असण्यापेक्षा तोटेच जास्त असतात.
संवेदना बोथट असणे वेगळे आणि संवेदनशील असणे वेगळे!
संवेदनशील माणसे कोणत्याही प्रकारच्या भावनांमध्ये वाहून जात नाहीत तर अशा प्रसंगी
तारतम्य  बाळगून समतोल विचार करतात.व अडचणी मधून सुयोग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न
 करतात.अशा प्रकारे योग्य पद्धतीने व योग्य दिशेने केलेला विचार नेहमीच समस्येच्या
समाधानापर्यंत घेउन जातो.
अतिसंवेदनाशीलता किंवा संवेदनहीनता हे दोन्ही वाईंटच! या दोहोमधील अवस्थ्या ही आदर्श
 म्हणायला हवी.
आपल्याला काय वाटते?
                                  ..........प्रल्हाद दुधाळ.




No comments:

Post a Comment