Tuesday, March 31, 2020

मलाआवडलेलीशॉर्टफिल्म

मलाआवडलेलीशॉर्टफिल्म
 
      सध्या रिटायर्ड असल्यामुळे सतत काही ना काही नाविन्याचा धांडोळा घेणे चालू असते. परवा असंच यु ट्यूब वर मराठी नाटकसिनेमाचा शोध चालू असताना एक लघुपट नजरेसमोर आला त्याचे शीर्षक होते...
"आबा ऐकताय ना.. "
 यातल्या प्रमुख कलाकाराचे नाव वाचूनच तो बघायचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त "आबा ऐकताय ना" या 28 मिनिटाच्या लघुपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केले आहे.त्यातील आबा अर्थात आजोबांची भूमिका साकारली आहे जेष्ठ कलाकार अरुण नलावडे यांनी!
   ही कथा आहे आबा या आजोबांची... आबांच्या वृद्धापकाळचे विलक्षण असे चित्रण यात आहे.अरुण नलावडे यांनी अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह आबा हे आजोबा रंगवले आहेत. वृध्दपणीच्या विविध जाणिवा त्यांनी आपल्या समर्थ अभिनयाने अधोरेखित केल्या आहेत.
   एक परिपूर्ण असे जीवन जगलेले आबा आपले निवृत्तीनंतरचे जीवन अत्यंत समाधानाने व्यतीत करत असतात.जेष्ठ नागरिकांच्या हास्य क्लबात जाऊन ते रमत असतात. वयपरत्वे त्यांची श्रवणशक्ती कमी कमी व्हायला लागते.आपल्या वृध्द्व सहकाऱ्यांची सुखदु:खे ते जवळून पहात असतात.आबांची सून आणि मुलगा त्यांची खूप छान काळजी घेतात याचा त्यांच्या इत्तर मित्र मंडळींना हेवा वाटत असतो.त्यांचा वाढता बहिरेपणा त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यासाठी श्रवणयंत्र घेतले जाते.
      श्रवणयंत्र वापरायला सुरुवात केल्यानंतर  जीवनातले अनेक हरवलेले आवाज त्यांना ऐकू यायला लागतात.नुसत्या नजरेने अनुभवणे अशक्य असलेल्या  छोट्या छोटया गोष्टीतून निर्माण होणारे सुंदर ध्वनी अनुभवून आबा  अगदी लहान मुलासारखे हरकून जातात.
     घड्याळाची टिकटिक,देवघरातल्या घंटीचा आवाज, नातवाच्या खेळण्यातल्या मोटारीचा आवाज, पावसाची तडतड, स्वयंपाक घरातले विविध आवाज ऐकून आबांना "सुख सुख म्हणजे हेच!" याचा साक्षात्कार होतो.
हां धनींचा जादुई जगताची सफर करत असतानाच अचानक त्यांना घरातल्या मोलकरणीच्या आबांच्याबद्दलच्या तक्रारी, वकील असलेल्या सुनबाईच्या क्लायंटच्या केसेसवरची चर्चा.त्यातच त्यांच्या जावई आणि मुलीच्या घटस्फोटाबद्दलची मुलगा आणि सुनेच्या बेडरूममधली अस्पष्ट चर्चा त्यांना ऐकू येते. त्यांनी घाईत विकलेला प्लॉटच्या व्यवहारावर नाराज असलेल्या सून आणि मुलातली चर्चा अशा नको असलेल्या चर्चा त्यांच्या कानावर येते आणि आपल्या सुखी जीवनाबद्दल अत्यंत समाधानी असल्याच्या विश्वासाला धक्का बसतो. जर श्रवणयंत्र बसवलेच नसते तर या सगळ्या गोष्टींच्या अज्ञानात आपण सुखी असतो या वास्तव जाणीवेने ते आपल्या श्रवणयंत्राची बॅटरी काढून फेकून देतात. संपूर्ण लघुपटाला अरुण नलावडे यांच्या आवाजातील काव्यत्म स्वगताने एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. प्रत्येकाने त्यातल्या त्यात जेष्ठ लोकांनी जरूर पाहावा असा हा लघुपट आहे. जरूर पहा...
"आबा ऐकताय ना... "
.... प्रल्हाद दुधाळ.
  9423012020

Wednesday, March 11, 2020

सोशल मीडिया... एक व्यसन.

सोशल मीडिया... एक व्यसन.
     आपल्या जीवनात सोशल मिडीयाने चंचूप्रवेश केला आणि थोडा थोडा वापर वाढत वाढत आता नकळत आपण त्याचे गुलाम झालो आहोत. सदासर्वकाळ फेसबुक, व्हाटसअप, ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या समाजमाध्यमावर अनेकजण पडीक असल्याचं दिसतं आहे. सोशल मीडियाच्या अतिवापराचे अनेक मनोकायिक दुष्परिणाम माणसाच्या आयुष्यावर दिसू लागले आहेत.यातून अनेक मानसिक आजार वाढत चालंले आहेत. यातून संपूर्णपणे बाहेर पडणे जवळ जवळ अशक्य आहे;पण त्यांच्या वापराबाबत स्वतःवर काही बंधने घालून घेतली तर या व्यसनाचा अतिरेक नक्कीच आपण थोपवू शकतो
1.दिवसातले काही ठराविक तास( फार फार तर एक दोन तास) या कारणासाठी देण्याची मर्यादा स्वतःवर घालून त्या वेळेचे काटेकोर पालन करणे.
2.आठवड्यात एक दिवस सोशल मीडिया फास्ट म्हणजे त्या दिवशी काही झाले तरी या मीडियापासून लांब राहणे.
3.मोबाईल ऐवजी दुसरा एखादा आवडता छंद जोपासणे.
4.मोबाईल आपल्या हाताशी न ठेवता थोडा दूर ठेवणे व तो हातात घेण्याचा मोह जाणीवपूर्वक टाळणे.
5.अती वापराचे हे व्यसन सोडवण्यासाठी योग्य त्या समुपदेशकाचे मार्गदर्शन व उपचार घेणे.
 थोडक्यात सोशल मीडियाच्या या व्यसनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी स्वयंशिस्त हा एकमेव उपाय आहे असे मला वाटते....
--- (c)प्रल्हाद दुधाळ 9423012020.