Thursday, April 30, 2020

परांजपे वाडा...आठवणीतला.

     
परांजपे वाडा...आठवण

       काल टाईमपास म्हणून शब्दकोडे सोडवत असताना  एक  दोन अक्षरी शब्द समोर आला.पुण्यात पेशवेकालीन घरांसाठी हा शब्द वापरला जायचा तो शब्द म्हणजे 'वाडा'! जुन्या पुण्यात असे खूप वाडे असायचे!
     वाड्याचा विचार मनात आला आणि मन भरकटत पोहोचले आठवणीतल्या एका वाड्यात -आमची चवथी ते सातवीची शाळा ज्या वाड्यात भरायची त्या परांजपे वाड्यात!
      परांजपे नावाच्या ऐतिहासिक घराण्याचा  त्यावेळी सुस्थितीत असलेला हा वाडा शाळेच्या वापरासाठी दिलेला होता.या परांजपे लोकांच्या आडनावावरूनच कदाचित आमच्या गावाचे नाव परिंचे असे पडले असावे!
      मी नक्की  कुठे ते आठवत नाही; पण कुठेतरी वाचले होते की  शिवकाळातल्या बाळाजी विश्वनाथ यांना कोकणातून घाटावर आणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे घेऊन जाण्यात सरदार पुरंदरे यांच्याबरोबरच आमच्या गावच्या या परांजपे सावकारांचीही महत्वाची भूमिका होती.यासंबंधीची अधिक माहीती मात्र पुढे कधी वाचनात आली नाही.
    या परांजपे कुटुंबाची भरपूर जमीन परिंचे गावालगत होती असे म्हणतात;पण स्वातंत्र्यानंतर आलेल्या कुळकायद्यात ही सगळी जमीन कुळांकडे गेली असावी.
     परिंच्यात परांजपे यांचे एकमेकाला लागून असलेले दोन चौसोपी वाडे होते.त्या काळी  त्यापैकी एका वाड्यात रयत शिक्षण संस्थेचे हायस्कुल (आठवी ते अकरावी) होते.हायस्कुलची स्वतःची इमारत बांधून झाल्यावर या वाड्यात डॉक्टर कोठाडिया रहायला आल्या आणि तिथेच त्यांचे क्लिनिकही पुढे बरेच दिवस सुरु होते. दुसऱ्या वाड्यात प्राथमिक शाळेचे चौथी ते सातवीचे वर्ग भरायचे.जिल्हा परिषदेच्या 'शेती शाळा परींचे' या शाळेचे पहिली ते तिसरीचे वर्ग शाळेच्या इमारतीत व राम मंदिरात भरत असायचे;पण चौथीत गेलो की गावाच्या मध्यभागी असलेल्या या परांजपे वाड्यात  आपल्याला जायला मिळणार याचा त्या काळी मुलांना भलताच आनंद असायचा!
     मी सुद्धा चौथीत गेल्यावर या परांजपे वाड्यातल्या शाळेत प्रथम गेलो आणि त्या जुन्या वाड्याच्या प्रेमात पडलो....
   भरपूर उंची असलेल्या दोन मजले आणि वर एक उंच पोटमाळा असलेल्या या वाड्याचे बांधकाम कोरीव घडीव दगडात होते.सागवानी लाकडाचा मुबलक वापर या वाड्याच्या बांधकामात केलेला होता. वाड्याचा मजबूत साधारण वीस फुटी दरवाजा त्यावर पितळी कड्या. त्यातल्या एक दरवाजाला एक व्यक्ती एकावेळी आत जाऊ शकेल असा दिंडीदरवाजा होता. आतल्या बाजूने संपूर्ण दरवाजाला आतून कव्हर करणारी भली मोठी आगळ ( का अडसर),जी एरवी भिंतीच्या आत सरकवता यायची, दरवाजाच्या आत गेले की समोर भला मोठा चौक आणि चारी बाजूला मोठे मोठे हॉल आजही नजरेसमोर जसेच्या तसे उभे रहातात.वाड्यात वरच्या मजल्यावर जायला डाव्या आणि उजव्या बाजूने भिंतीच्या आतून पायऱ्या होत्या. या जिन्यात दिवसाही खूप अंधार असायचा.एकंदरीत वाड्याचा तो डामडौल  या परांजपे सावकाराच्या शिवकालीन व पुढे पेशवाईच्या काळात त्यांच्याकडील  धनदौलत आणि श्रीमंतीबद्दल सांगत असायचा!
      मी चॊथीत असताना वाड्याच्या मागच्या भागात एक व्यक्ती एकटीच रहायची त्या व्यक्तीचे नाव बंडोपंत असे होते.गावात त्यांना लोक काका म्हणायचे. परांजपे कुटुंबातील त्या वाड्यात वास्तव्य केलेली ही  बहुतेक शेवटची व्यक्ती असावी! बंडोपंत कायम वाड्यातच असायचे. आठवड्यात कधीतरी एखाद्या वेळी ते अगदी आमच्या दुधाळवाडीपर्यंत आलेले दिसायचे.मी शाळेतल्या सगळ्या तुकड्यात कायम पहिला असायचो त्यामुळे माझ्याशी हे बंडोपंत छान बोलायचे. वयाने पन्नाशी साठीतले,  एकदम गोरेगोमटे, तब्बेत बरीच स्थूल, अंगावर कायम पांढरा पायजमा आणि फेंट निळा हाफ शर्ट त्यावर वर्षभर फुल बाह्यांचा काळा स्वेटर अशा वेशात असणारे बंडोपंत सतत तपकीर ओढायचे. त्यामुळे संपूर्ण परांजपे वाड्यात कायम या तपकिरीचा मंद घमघमाट सुटलेला असायचा. माझ्यावर बंडोपंतांचा विशेष लोभ असल्याने शाळा सुटली तरी सगळ्या वाड्यात मला मुक्त प्रवेश होता.आता मला आठवत नाही नक्की ते माझ्याशी काय बोलत असायचे;पण मी आणि  माझ्या वर्गातला किसन कायम त्यांच्याकडे असायचो.
     बऱ्याचदा त्यांच्या स्वयंपाक घरात नेऊन त्यांनी आम्हाला छोट्या प्लेटमधे पोहे किंवा शिरा   खायला घातल्याचे चांगलेच आठवते!...
   या वाड्याच्या त्या अंधाऱ्या जिन्यातून वरच्या मजल्यावर जायला मात्र आम्ही खूप  घाबरायचो. नंतर सहावी सातवीचा वर्ग वरच्या मजल्यावर असल्यामुळे ही भीती कमी झाली.रात्री या वाड्यात वरच्या पोटमाळ्यावरून कसले कसले आवाज येतात, वर भुते नाचतात अशा काही अफवा गावात असायच्या.
     वाड्यात एकटे रहाणाऱ्या बंडोपंतांचे व्यक्तिमत्वही गावात बऱ्याच लोकांना गूढ वाटायचं;पण आमच्याशी त्यांची चांगलीच गट्टी होती.परिंच्यात बाहेरून गावात आलेल्या कुटुंबातली एक बाई तिच्या आमच्याच वयाच्या मुलीबरोबर बंडोपंतांकडे स्वयंपाक आणि इत्तर  कामासाठी यायची....
     शाळा सुटेपर्यंत मुलामुलींच्या आवाजाने गजबजलेला वाडा शाळा सुटली की मात्र एकदम  भकास वाटायचा.
     सातवीत असताना आम्ही रात्री अभ्यासाला आणि झोपायला वाड्यातच असायचो.त्या काळी गावात वीज नव्हती. या वाड्यात गॅसबत्ती च्या प्रकाशात अभ्यास करूनच मी हायस्कुल स्कॉलरशिप मिळवली,त्यावेळी असलेल्या सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेत केंद्रात पहिला आलो.
      शालेय वयात या वाड्यात काढलेले दिवस अजूनही आठवतात; मात्र आम्ही आठवीत जाईपर्यंत  हायस्कुल गावाबाहेर नव्याने बांधलेल्या इमारतीत गेल्याने या वाड्याकडे यायचे बंद झाले. बंडोपंतही आजारी पडल्याने गाव सोडून गेले. पाचवी नंतरचे वर्ग त्याच दरम्यान हायस्कुलला जोडल्याने परांजपे वाड्याचा वापर मंगल कार्यालय म्हणून व्हायला लागला. तिथे कुणी रहात नसल्याने वाड्याची पडझड सुरु झाली.घडीव दगड आणि खूप जुने  सागवानी लाकडाच्या चोऱ्या होवू लागल्या.
    खूप वर्षांनी सहजच गावाच्या त्या भागात असलेल्या सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेलो होतो. वाड्याकडे नजर गेल्यावर त्याची अवस्था पाहून वाईट वाटले. संपूर्ण वाडा आता जमीनदोस्त झाला होता वाड्याची समोरची भिंत मात्र अजूनही त्या वाड्याच्या वैभवशाली इतिहासाची  केविलवाणी साक्ष देत शेवटच्या घटका मोजत असलेली आढळली.मनात विचार आला किती करंटे आहोत आपण!गावच्या ऐतिहासिक वारश्याच्या या वाड्याच्या रूपाने जिवंत असलेल्या खुणा आम्ही सांभाळू शकलो नाही.....
      माझ्या चवथी ते सातवी या संस्कारक्षम वयातल्या शालेय जीवनातल्या परांजपे वाड्याशी निगडीत आठवणी मनात पिंगा घालत होत्या....
     © प्रल्हाद दुधाळ पुणे., 942312020

Sunday, April 26, 2020

विनाकारण...

विनाकारण...
     सगळं सुरळीत चालू असताना अचानक एखाद्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच उदास उदास वाटायला लागतं, काही म्हणजे काही करावंसं वाटत नाही...
     अगदी दैनंदिनीतल्या ब्रश, अंघोळ, ब्रेकफास्ट अशा रुटीनच्या गोष्टींसाठीही अंगात उत्साह नसतो.. .
      खरं तर उदास होण्यासारखं एवढ्यात काही घडलेलं नसतं, समोर  ताणतणाव देणारे काही प्रश्नही नसतात....
   मागच्या दोन तीन दिवसात आहार विहारात काही बदल झाले होते का, कुणा नकारात्मक विचाराच्या व्यक्तीशी संपर्क आला होता का अशा गोष्टीही तपासून बघितल्या जातात,  तर तसंही काही कारण सापडत नाही...
    या निरुत्साही उदासीच्या मागे नक्की काय कारण आहे हे शोधूनही सापडत नाही.
   झोपून राहावं म्हटलं तर तेही नको वाटतं, निवांत बसून टीव्हीवर काही हलकफुलकं बघायचा प्रयत्न करून बघितला तर नेहमी खळाळून हसवणारा कार्यक्रमही निरस वाटायला लागतो.
      कुठं तरी वाचलेलं असतं की बिघडलेला मूड बदलण्यात आवडतं संगीत ऐकल्याने मदत होते. लगेच तोही प्रयोग करून बघितला जातो. अरुण दाते, सुधीर फडके, रफी, मुकेश, जगजीत सगळ्यांची गाणी शोधून शोधून ऐकली;तरी मरगळ होती तिथेच!
     यू ट्यूब वर रिलॅक्सिंग ट्रॅक लाऊन डोळे मिटून ध्यानमुद्रेत जाऊनही कधी नव्हे ते सगळं बकवास आहे असा फील येऊ लागतो.
फेसबुक, व्हाट्सअप, टिकटॉकवर जाऊनही काहीच फायदा नाही.
    नक्की आपलं काय बिनसलंय?  काय खुपतंय?  कसला आणि कुणाचा त्रास होतोय? 'सहन होत नाही आणि सांगताही येत नाही' अशा अवस्थेत का गेलो आहोत आपण?मानसशास्रात आणि अध्यात्मात मन अस्वस्थ असल्यावर करायचे सगळे प्रयोग कित्येक वेळा वाचलेत, त्यातले सगळे उपाय करून बघितले तरी ही उदासी काही संपेना तेव्हा 'आपल्याला काही आजार तर झाला नाही ना?' अशी शंका येते; पण सध्याच्या परिस्थितीत  डॉक्टरकडे जाणही धोक्याचं! उगा नैराश्य वाढणार!
     पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींचा विचार करून या उदासीचं कारण आपणच  शोधावं असं वाटायला लागतं.
      घरात उगाचंच चकरा मारता मारता विचारचक्र फिरत असतं.
    आपण अचानक आरशासमोर जाऊन उभं राहतो आणि स्वतःकडे नजर जाते....
   "अरे क्या हालत बना रखी है खुदकी?"
   अस्ताव्यस्त वाढलेले केस, खुरटलेली दाढी, गेला एक महिना तोच अवतार, दोन बर्मुडा आणि दोन टी शर्ट आलटून पालटून!.
    गेली चाळीस वर्षे महिन्याच्या महिन्याला सलूनमधे जाऊन केस एकदम शिस्तीत राखणारा तू, दररोज क्लीन शेव्ह करून दिवसाला कडक इस्त्रीचे कपडे बदलणारा तू, अगदी  सोसायटीच्या गेटवर जायचे असले तरी तोंडावर फेसपावडरचा हात फिरवून, कपड्यावर आवडत्या परफ्युमचा फवारणी करणारा तू, आज काय अवतार झालाय तुझा?
  कुठे गेला तो टिपटॉप अवतार?
  या उदासीचं कारण हे आहे तर !
   आपण झटकन कामाला लागतो, सेल्फ सर्वीस करून केसांना शेप देतो, गुळगुळीत दाढी करून गुणगुणत मस्त बाथ घेतो, वार्डरोबमधून बऱ्याच दिवसांनी आवडता फॉर्मल पिंक शर्ट अंगावर घालतो, परफ्युमचा मस्त सुगंध दरवळतो.इनशर्ट करून शूज घालतो, शीळ घालत डोळे ऑफिस बॅग शोधू लागतात...
   इतका वेळ आपल्या हालचाली शांतपणे न्याहाळणारी बायको समोर येते आणि सांगते...
" महाशय कुठे निघालात, लॉकडाऊन संपलेला नाही अजून!" आपण भानावर येतो...
पण; आता उदासी कुठल्या कुठं पळालेली असते, आपण मोबाईल हातात घेऊन कुबेरवरचे  बोलके व्हा मधले व्हिडीओ बघण्यात रंगून जातो....
   ©प्रल्हाद दुधाळ पुणे.
        26.4.2020