Wednesday, February 24, 2016

माझा आवडता ऋतू..पावसाळा.

माझा आवडता ऋतू..पावसाळा.
(शालेय वयात आहे  समजून  लिहिलेला  निबंध )

        विज कडाडते,ढग गडगडाट करतात आणि मग मस्त मातीचा वास सुटतो. थोड्याच वेळात जोराचा पाऊस सुरू होतो पावसाळ्याची ही सुरूवात मला खूप खूप आवडते. विज कडाडते तेंव्हा थोड घाबरायला होत,पण त्यानंतर येणाऱ्या धोधो पावसात भिजायची मजा काही वेग
ळीच असते. सगळी मोठी माणसे ओरडतात पावसात जायला लागलो की, पण मी कुण्णाच न ऐकता पावसात जातो.आजुबाजूची मुलेही माझ्याबरोबर भिजायला येतात. आम्ही पावसात गोल गोल फिरून म्हणतो ..
येरे येरे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा
येग येग सरी माझे मडके भरी
सर आली धाऊन मडके गेले वाहून ..
       अशी मजा येते ना ,पण आई लगेच "फार भिजू नको आत चल " सांगायला येते.असा राग येतो ना मोठ्या माणसांचा.सगळे फारच ओरडायला लागले की घरात जायलाच लागते. सर्दी व्हायला नको म्हणून आई
खसाखसा डोके पुसून देते गरम गरम आले घालून केलेला चहा देते .
        मला पावसाळा खूप आवडतो .एकदा पाऊस पडायला लागला की रस्त्यावर पाणी वाहायला लागते जणू काय घराच्या समोर नदीच वाहू लागते. वळचणीला तर धबधबा पडत असतो. त्या  धबधब्याखाली  भिजायला  तर  खुप्पच  मज्जा  येते !  बाहेर पाणी साठले की मी जुन्या वह्यातली पाने फाडून होडी बनवतो बाईनी मागच्या वर्षीच होडी कशी बनवायची ते शिकवले आहे. मग होड्या बनवून त्या पाण्यात सोडायच्या त्या पुढे पुढे जायला लागल्या की त्यांच्या मागे पळायचे. रस्त्यावरचा चिखल सगळा कपड्यावर उडतो हातपायही चिखलाने भरून जातात पण मज्जा येते चिखलात खेळायला! थोडा ओरडा पडतो आईबाबांचा, पण तरी परत परत बाहेर पावसात खेळायला आवडतेच.
भरपूर पाऊस पडला की नदीला पूर येतो. पूर बघायला बाबा मला नदीवर घेऊन जातात.बापरे ,किती जोरात पाणी धावत असते .ते लाल चहासारखे गढूळ पाणी बघायला खूप आवडते. पुराच्या पाण्याकडे एकसारखे बघत राहीले की आपणच फिरतोय असे वाटते . एकदा तर मला चक्करच आली होती पण बाबाना नाही सांगीतले, नाहीतर पुर बघायला पुन्हा न्यायचे नाहीत.
पावसाळा सुरू झाला की रस्ते एकदम स्वच्छ होतात .झाडेही धुतली जातात सगळीकडे हिरवेगार दिसायला लागते पावसाळा आला की हवा थंड होते, मला अशी हवा आवडते.
सारखा पाऊस पडायला लागला की माझ्या वर्गातला बंड्या मात्र रडायला लागतो. तो म्हणतो आता त्याच्या घरात पाणी गळाले असेल. घरात पुराचे पाणीही येते ,असे तो म्हणाल. त्याचे घर का गळते ते नाही माहीत मला! एकदा बाबाना विचारायला पाहिजे, की त्याचे घर आपल्यासारखे का नाही!
ते काही असो पण पावसाळा मला आवडतो. उन्हाळा बंद करून पावसाळाच कायम असायला हवा असे वाटते!
                                                                              ............प्रल्हाद दुधाळ.(९४२३०१२०२०)

माझा शाळेचा पहिला दिवस....

माझा शाळेचा पहिला दिवस....
गोष्ट पासष्ट सालची आहे. मी पाच सहा वर्षाचा असेल. त्या काळी गावाकडे बालवाडी किंवा आंगणवाडी असले काही प्रकार नव्हते. शिवाय आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत जायलाच पाहिजे, त्यांनी शिकलेच पाहिजे असाही लोकांचा हट्ट नसायचा गा
वात शाळेची सोय आहे म्हणून पन्नास टक्के मुलेमुली शाळेत पाठवली जायची! त्यावेळी आमच्या
गावात “शेती शाळा परिंचे” नावाची जिल्हा परिषदेची शाळा होती.या शाळेचे तिसरी पर्यंतचे वर्ग शाळेच्या इमारतीत आणि काही रामाच्या देवळात भरायचे.चौथी ते सातवीचे वर्ग गावातल्या ऐतिहासिक दोन मजली भल्यामोठ्या परांजपे वाड्यात भरायचे.या शाळेची शेतीही होती.त्या शेतीमधे विद्यार्थ्याना शेतकामाचे शिक्षणही मिळायचे!पुणे जिल्हा परीषदेलाच गावात शाळा चालवायची गरज(सरकारी धोरण) असल्यामुळे या शाळेच्या प्रवेशाची प्रक्रिया खूप मजेशीर होती.साधारण प्रत्येक वर्षी में महिन्यात शाळेच्या शिक्षकांचे गावात तसेच वाड्यावस्त्यांवर सर्वेक्षण सुरू व्हायचे.त्या वर्षी कोणकोणती मुले सहा वर्षाची झाल्यासारखी वाटतात याचे ते सर्वेक्षण असायचे! अश्या प्रवेशयोग्य पोरापोरींच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवले जायचे.जून महिन्याच्या सुरुवातीला अशा पोरापोरींना पहीलीच्या वर्गात अक्षरश: घातले जायचे! बहुतेक मुलांची जन्मतारीख पालकाना माहीत नसायचीच ! शिक्षकच जन्मतारीख ठरवायचे व ती रेकॉर्डवर लिहिली जायची,साधारण एक जूनला शाळा सुरू व्हायच्या त्यामुळे अशा बहुतेक विद्यार्थ्यांची जन्मतारीख एक जून व सहा वर्षे वय असायला हवे म्हणून सहा वर्षापुर्वीचे साल टाकून दिले की झाली त्या विद्यार्थ्याची पूर्ण जन्मतारीख! अशाच एका प्रवेशमोहिमेत माझा शाळाप्रवेश झाला जन्मतारीख लिहिली गेली-एक जून एकोणिसशे साठ!पहिल्या दिवशी शाळेत गेलो,दप्तर वगैरेचा प्रश्नच नव्हता,रिकामाच गेलो होतो.अंगावर मळकट ढगळ पांढरा शर्ट व निळसर रंगाची जुनी पॅंट असा गबाळा पेहराव घातला होता.आयुष्यात प्रथमच शाळेत गेलो होतो ना, त्यामुळे वेड्यासारखा गोंधळून इकडे तिकडे बघत होतो! माझ्यासारखीच बरीच मुले व मुली वर्गात होती. कोण रडत होते,काहीजण एकमेकांशी मारामारी करत होते, कुणी उभे तर कुणी बसलेले होते. एकूणच भरपूर गोंधळ चालू होता!मीही सारवलेल्या जमिनीवर बसकन मारली.एक खापराची पाटी आणि पेन्सीलचा तुकडा या वस्तू शाळेतल्या बाईनी सर्वाबरोबर मलाही दिल्या.त्यांचे नाव कुचेकर बाई होते.त्या ओरडून काहीबाही सांगत होत्या पण काहीच ऐकू येत नव्हते.या बाईच माझ्या पहिल्या इयत्तेच्या पहिल्या शिक्षिका होत्या.केसांची लांब वेणी व सहावारी पांढरी साडी नेसलेल्या या माझ्या बाईंचा चेहरा आता अस्पष्टसा आठवतों.आयुष्यात पहिल्यांदाच हातात पाटीपेन्सिल मिळाली होती, त्यावर इतर मुलांचे बघून रेघोट्या ओढत बसलो.कुचेकर बाईनी फळ्यावर मोठ्या अक्षरात ‘अ ‘ काढून ठेवला होता व त्या प्रत्येकाने पाटीवर तसा 'अ' काढावा म्हणून सांगत होत्या पण वर्गात पोरापोरींचा एवढा गोंधळ चालू होता, की त्या काय सांगतायेत ते कळतच नव्हते.माझ्या जवळ येऊन बाईनी माझ्या हातात पेन्सिल धरायला लावली व माझा हात धरून पाटीवर मोठा ‘अ ‘ काढला,ती माझ्या आयुष्यातली पहिली अक्षर ओळख!तर असा होता माझा शाळेचा पहिला दिवस! बहुतेक माझा शिकायचा वेग बरा असावा,कारण लवकरच मी कुचेकर बाईंचा लाडका विद्यार्थी झालो.
प्रल्हाद दुधाळ (९४२३०१२०२० )

माणूस -- एक कृतघ्न जमात ....

माणूस -- एक कृतघ्न जमात ....
प्रवेश एक 


स्थळ- रस्ता.
वेळ – मे महिन्यातली दुपार.
विश्वास आणि गिरीधर- विश्वासचे वडील (वय अंदाजे पासष्ट )भर उन्हातून पायी चालले आहेत.डोक्यावर ओझी आहेत.रखरखत्या उन्हात घामाने निथळत ते हळूहळू चालले आहेत.विश्वास चांगलाच दमलेला आहे. धापा टाकत एक एक पाउल पुढे टाकतो आहे.त्याला आता थांबायचे आहे.
विश्वास –अहो दादा,ओझ्याने माझी मान खूपच अवघडून आलीये, उन्हाचा चटकाही खूप लागतोय,थांबू ना ज़रा इथेच.
गिरीधर–अरे विश्वास,माझीही मान अवघडलीय,थोड़ी कळ काढ ना,अजून बरच लांब जायचय,आणि या भर उन्हात थांबायचे तरी कुठे?दोन किलोमीटरच्या पट्ट्यात एक झाड शिल्लक राहीले असेल तर शप्पत!हे बघ, पुढच्या वळणावर एक वडाचे झाड आहे. घनदाट सावली असेल तेथे, थांबू घटकाभर तिथे तू म्हणतोय तर!
विश्वास- (नाईलाजाने) हो दादा,तिथेच थांबू.तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.पूर्वी या रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच प्रकारच्या झाडांची जणू नैसर्गिक कमान होती. साऱ्या रस्त्याने एवढी सावली असायची की प्रवासाचा शिण बिल्कूल जाणवायचा नाही.( विश्वासला आठ दहा वर्षापुर्वीचा तो रम्य हिरवागार रस्ता आठवतो.)
गिरीधर- हो ना,तिकडे सर्जापूरला तो केमिकल कारखाना काय आला,वाट लागली सगळ्या तालुक्याची! रस्ता मोठा करायला होती नव्हती ती झाडी पार तोडून टाकली.सगळ माळरान उघडबोडक करून टाकलय.कारखान्याच्या धुराने दहापंधरा किलोमीटरच्या पट्ट्यात डोळ्याची नुसती आग आग होत रहाते. मला तर हल्ली सारखा खोकलाही होतो ,इकडे रहायचच अवघड झालय बघ.नशीब, अख्ख्या परिसरात एवढेच एक झाड वाचलय!ते ही वठायला लागलय!
दोघेही बोलत बोलत त्या भल्यामोठ्या वडाच्या झाडाखाली पोहोचतात .झाडाच्या सावलीत येताच खूप थंड वाटायलालागते.डोक्यावरची ओझी खाली ठेवून दोघेही आरामशीर सैलावून बसतात.

प्रवेश दोन

स्थळ- तोच रस्ता पण आधीच्या प्रवेशानंतर दोन वर्षानंतरचा काळ, तशीच में महिन्याची दुपार.
हे बाप लेक रस्त्याने पायी चालले आहेत. दोन वर्षे सलग दुष्काळ पडलाय. हिरवी पाने असलेले एकही झाड आता रस्त्यात उरलेले नाही.जिकडे पहावे तिकडे उजाड माळरान दिसतेय.
श्वासविकाराने आता गिरीधर पुरता वाकून गेला आहे.त्याचा हात हातात पकडून विश्वास रणरणत्या उन्हातून गिरीधरला सरकारी दवाखान्यात घेवून चालला आहे. जिवघेण्या उन्हाने दोघानाही धाप लागली आहे. रस्त्याच्या कडेचे ते जुने वडाचे झाड आता वठले आहे. विश्वास गिरिधरला खोडाशी आणतो. गिरिधर आपल्या क्षीण डोळ्यानी झाडाकडे बघतो...
त्याला वाटते--- झाडही आपल्याशी बोलतय, हा भास नाही ----नक्कीच झाड आपल्यावर डाफरतय ..... काहीतरी सांगतय ......
"आयुष्याच्या या वळणावर
भरदुपारच्या टळटळीत उन्हात
सुन्नपणे मी उभा
असे का चा भुंगा कुरडतो आहे
पाडतोय तो भुगा मेंदूचा
कालपर्यंत गर्दी भोवतालची
हटता नव्हती हटत
आज मात्र
बरोबर सावलीही नाही स्वत:ची
कारणांचा शोध घेतोय
कालपरवापर्यंतचा कल्पवृक्ष
मी बहरलेला
जो जे वांछिल ते मनमुराद देणारा
आता संपूर्ण छाटलेला
जीवनरस आटलेला
आंतर्बाह्य वठलेला
माझ्या या स्थितीला जबाबदार कोण ?
ऐकले ते खरेच असावे
स्वार्थी आणि मतलबी माणूस
निसर्गाप्रती एकदम कृतघ्न जमात...."
(गिरीधर स्वत:शी हातवारे करत बोलत होता ....
विश्वास सुन्नपणे पहातोय वठलेल्या झाडाकडे)
(प्रकाश मंद मंद होत जातो ......)

Tuesday, February 23, 2016

साहित्याचा जनमानसावर परिणाम ...

साहित्याचा जनमानसावर परिणाम ...
साहित्य जागृत मानवी संस्कृतीचा आरसा आहे.बरेच लोक असे म्हणतात की आजकाल वाचनसंस्कृती लोप पावली आहे,आजची पिढी पुस्तके वाचत नाही.पण नुकत्याच झालेल्या मराठी साहित्य सम्मेलनातील पुस्तक विक्रीचा आकडा पाहिला तर वाचन संस्कृती कमी झाली आहे असे मत चुकीचे ठरते. आजच्या साहित्याचे स्वरूप बदलले आहे. फक्त छापील कथा,कादंबरी अथवा कवितांची वा इत्तर पुस्तके म्हणजे साहित्य ही व्याख्या आता बदलली आहे. कालानुरूप वर्तमानपत्रे, टीव्ही, इंटरनेट साइट्स, ब्लॉग्ज , ई बुक्स वा सोशल मीडिया अशा माध्यमातून विविध प्रकारचे साहित्य मोठया प्रमाणात लिहिले जाते आहे आणि त्याच प्रमाणात ते वाचलेही जाते आहे. इथे आपण चर्चा करतो आहे ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचा समाजावर काय परिणाम होतो याची!
माझ्या मते जनमानसावर साहित्याचा निश्चितच प्रभाव पडतो. पुस्तके समाज मनावर कसा परिणाम करू शकतात याची काही उदाहरणे मुद्दाम सांगावीशी वाटतात.विश्वास पाटील यांची लासलगावच्या कांदा व्यवहारावर लिहिलेली ‘पांगिरा’ कादंबरी किवा निवृत्त पोलीस अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी यांनी लिहिलेले ‘कुण्या एकाची धरणगाथा’ या पुस्तकाने तत्कालीन समाजाला अस्वस्थ केले होते.'रिडल्स'सारख्या पुस्तकाने समाजात स्फोटक परिस्थिती निर्माण केली. ’घाशीराम कोतवाल’ ,‘सखाराम’ व ' संतसुर्य तुकाराम' वा इत्तर काही धार्मिक पुस्तकानी निर्माण केलेले वादविवाद तर सुपरिचित आहेत.
समाजमनाला व्यापून टाकणारे साहित्य संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव इत्यादि वारकरी संप्रदायातील संतानी लिहिले.संत साहित्याच्या वाचन वा श्रवणाने प्रचंड प्रमाणात समाज जागृती झाली. संत साहित्याने स्वातंत्र्य,समता,बंधुता,सहकार्य,शुद्धभाव,समान संधी,श्रद्धा,ध्येय,देव,वैराग्य,भक्ति आणि युक्ती, शिस्त व एकता अश्या विषयांवरील मार्गदर्शक तत्वे आपल्या अभंग-ओव्यातून सांगून,राष्ट्रधर्माची व भागवत धर्माची ध्वजा सतत फ़डकत ठेवली.जनजागृती केली व समाजाचे ऐक्य वाढवले.
पेशवाईकाळानंतर तत्कालीन समाजात जातिभेद,अंधश्रध्दा व कर्मकांडे वाढली होती.अनिष्ट प्रथा,अघोरी उपाय,जादुटोणा,गंडादोरा यांचे स्तोम नको इतके माजले होते.महात्मा जोतिबा फ़ुलें,महर्षी कर्वे व इत्तर काही समाज सुधारकानी आपल्या साहित्यातून अनिष्ट रुढीपरंपराना हादरे दिले. त्याचा निश्चित असा परिणाम समाजावर झाला.त्यानी केलेल्या शिक्षणप्रसाराने समाजात क्रांती झाली.पुढे बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याने दलित शोषित समाजामधे मोठया प्रमाणात समाजप्रबोधन केले.अशा वंचित समाजापर्यंत शिक्षण व सामाजिक अधिकार पोहोचले.
परकीय सत्तेच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यात साहित्याचा सिंहाचा वाटा आहे. लो.टिळक, आगरकर, म.गांधी इत्यादि महापुरूषानी आपल्या वृत्तपत्रीय अग्रलेखातुन व इत्तर लिखाणातून ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात जनजागृती केली.साम्राज्याविरूध्द असंतोष जनतेत पसरला व स्वातंत्र्य लढा उभा राहीला.भारत दीडशे वर्षाच्या गुलामीतून मुक्त झाला.
आजच्या काळातही साहित्याचे तेवढेच महत्व आहे. ई-माध्यमामुळे तर हे महत्त्व अजूनच अधोरेखित झाले आहे.फेसबुक,वाट्सॲप च्या माध्यमातून आता सामान्य माणसाला व्यक्त होण्यासाठी एक प्रभावी हत्यार मिळाले आहे. हे दुधारी शस्र हातात आल्यामुळे त्याचे काही घातक परिणामही समाजाला भोगावे लागत आहेत.सत्ताधारी अशा माध्यमाला टरकून रहात आहेत तर समाज मोठया प्रमाणात व्यक्त होत आहे. आधुनिक साहित्याची समाजमनावरची ही वाढती पकड़ काही मर्यादा राखून स्वागतार्हच आहे.
तात्पर्य :-साहित्य जनमानसावर निश्चितपणे चांगला अथवा विपरीत परिणाम घडवू शकते

जन पळभर म्हणतिल

राजकवि भा रा तांबे यांची जन पळभर म्हणतील ....ही माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे मानवी जीवन व त्यातील क्षणभंगुरता अगदी सहज सोप्या भाषेत मांडली आहे. ते सांगतात की या जगातले तुझे आस्तित्व हे काही दिवसाकरिता आहे या जगातून तू गेल्यावर या जगाच्या दैनंदीन व्यवहारात काडीचाही फरक होणार नाही .तू गेल्यानंतरही निसर्गचक्र जसे आहे तसेच फिरत राहील तुझ्यावाचून कुणाचे काही अडणार नाही काळ जसा पुढे सरकेल तसे तुझ्या आस्तित्वाशिवायही हे जग आहे तसेच राहील. थोडे दिवस तुझ्या जाण्याबद्द्ल हळहळ व्यक्त होईल. दिवस जसे जसे जातील तसे दुनियेचे नेहमीचे व्यवहार सुरू होतील आणि मग तुझ्या अगदी प्रिय व्यक्तीही हळूहळू तुला विसरून जातील.
या जगात कुणाचेही कुणावाचून अडत नाही. अगदी राम वा कृष्णा सारख्या देवांवाचुनही अडले नाही . तेंव्हा जे आयुष्य तुला मिळाले आहे ते शांततेत आणि आनंदात जग. मृत्यू हे मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि मिळालेला जन्म सर्व विकारांवर विजय मिळवून समरसतेने जगण्याची महत्वाची जाणीव व शिकवण कवी या कवितेतून देतात .

जन पळभर म्हणतिल - भा. रा. तांबे

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’ ! 
मी जाता राहिल कार्य काय ? 

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल, 
तारे अपुला क्रम आचरतिल, 
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल, 
गर्वाने या नद्या वाहतिल, 
कुणा काळजी की न उमटतिल, 
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल, 
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल 
मी जाता त्यांचे काय जाय ?

रामकृष्णही आले, गेले ! 
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?
कवी -भा रा तांबे.
रसग्रहण प्रयत्न --प्रल्हाद दुधाळ.

Monday, February 22, 2016

कहाणी अपयशाची .....

           शाळेत असताना हमखास एका विषयावर निबंध लिहायला सांगायचे.... मोठे झाल्यावर तुम्ही कोण होणार? प्रत्येकजण आपल्या बौध्दीक कुवतीनुसार या विषयावर लिहायचे .मी मात्र या विषयावर कधीच निबंध लिहिला नाही. निबंध लिहिला नाही तरी कधी ना कधी हा प्रश्न समोर उभा रहाणारच होता. गावातच शिक्षणाची सोय असल्यामुळे व सरकारी इ बी सी ची सोय असल्याने दहावी पर्यंत प्रत्येक वर्षी पहिल्या क्रमांकाने पास होत राहिलो आणि एक दिवस त्या प्रश्नाने गाठलेच! पुढे काय? पुढे शिकायचे होते, पण काय शिकायचे याचे मार्गदर्शन करणारे जवळ कुणीच नव्हते. त्या काळी गावातुन बाहेर पडलेले बहुतेक लोक मुंबईत गिरणी कामगार वा कुठल्यातरी खाजगी कंपनीत कामगार होते .तिनेक वर्षाने मोठा असलेला एक मुलगा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला डिप्लोमा करत होता त्यामुळे आपणही डिप्लोमा करायचा व इंजिनयर व्हायचे असे मनाशी ठरवले. इकडून तिकडून माहीती काढून प्रवेशासाठी फॉर्म मिळवला व भरला. प्रवेशासंबंधी पत्रही आले. त्या वर्षी खूप पाऊस पडला होता व पोस्टाची बस एक दोन दिवस आलीच नाही! पत्र मला शेवटच्या तारखेला पोहोचले. मी कसाबसा कॉलेजवर पोहोचलो व प्रिंसिपलसाहेबाना भेटलो. त्यानी दुसऱ्या दिवशीपर्यंत फी भरायला वेळ दिला. साधारणपणे तीनशे रूपये भरायचे होते पण माझ्याकडे होते वीस रूपये! पैशाची व्यवस्थ्या होण्यासारखी नव्हती. कुणी आर्थिक मदत देण्याचा प्रश्नच नव्हता. थोडक्यात मी माझ्या आर्थिक आवाक्याच्या बाहेरचे स्वप्न पाहिले होते व ते भंगले होते. या अपयशामुळे मी खूप नाउमेद झालो .'अंथरून पाहून पाय पसरावे' ही उपदेशात्मक म्हण मी जवळून अनुभवली व खुणगाठ बांधली इथुन पुढे आयुष्यात वास्तवात जगायचं! स्वप्ने पहायची पण ती वास्तवावर घासून बघायची!
           माझ्या या अपयशाकडे मी सकारत्मकतेने पाहिले आणि शेजारच्या तालूक्यातल्या रयत शिक्षण संस्थ्येच्या शाळेत नव्याने सुरू झालेल्या अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी संपर्क साधला. त्या शाळेला विद्यार्थी कमी पडत होते त्यामुळे एक पैसाही न भरता माझा अकरावीचा प्रवेश झालाबारावी साठीही अशीच रयतची गरजू शाळा मिळाली तेथे तर विनामुल्य रहायची सोय सुध्दा झाली. भाजी भाकरी स्वत: करून खायचो त्यामुळे बारावी पर्यंत शिक्षण झाले . पुढे त्याच शाळेतले आम्ही सहाजण गरवारे कॉलेज पुणे येथे फर्स्ट ईयर सायन्सला गेलो एका झोपडपट्टीत राहून भाड्याची सायकल घेवून कॉलेज करत होतो .फर्स्ट ईयर कसेबसे झाले आणि एक गोष्ट लक्षात आली "आपल्याला पुढे शिकायचे असेल तर नोकरी करूनच शिकता येइल!" नोकरीच्या जाहिराती बघू लागलो व पुणे टेलिफोन्सच्या टेलिफोन ऑपरेटर पदासाठी अर्ज केला. निवड झाली व रात्रपाळीला नोकरी करून बीएस्सी पूर्ण केले. या सरकारी खात्यात स्पर्धा परीक्षा देवून वरच्या पदावर प्रमोशन मिळण्याची संधी उपलब्ध होती! या संधीचा पुरेपूर उपयोग मी करून घेतला व एकापाठोपाठ एक परीक्षा देत प्रमोशन घेत राहिलो. नियतीने डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची संधी मला मिळू दिली नव्हती तोच मी आज "सबडिव्हीजनल इंजिनिअर" म्हणून बीएसएनएल या सरकारी कंपनीत कार्यरत आहे .
आयुष्यात येणाऱ्या अपयशाने खचून न जाता वास्तवाचा स्वीकार करून समोर आलेल्या समस्येमधे लपलेली संधी शोधण्याची आईकडून मिळालेली शिकवण आयुष्यभर मला मार्गदर्शन करते आहे..
..... प्रल्हाद दुधाळ (९४२३०१२०२०)

Saturday, February 20, 2016

व्यथा लेखकांच्या...

लेखकांच्या व्यथा.
  लेखणीत एवढी ताकद असते की सर्व शक्तीमान सत्ताही लेखनी उलथवू शकते.खरच आहे ते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधे वृत्तपत्रानी  ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्यात सिहांचा वाटा उचलला. ब्रिटीश सत्तेविरूध्द असंतोष पसरविण्याचे महत्वाचे काम लोकमान्य टिळक,महात्मा गांधी यानी आपल्या अग्रलेखातुन केले.स्वातंत्र्य लढ्यात लोकानी स्वत:ला झोकून दिले अनेक स्वातंत्र्य सैनिकानी चलेजाव आंदोलनात उडी घेवून हौतात्म्य पत्करले. भारत स्वतंत्र झाला . लेखणी काय करू शकते याचे हे उदाहरण. अनेक लेखकानी आपल्या लेखनातुन सामाजिक क्रांतीचे महत्व जनतेपर्यंत पोहोचवले. सामान्य माणसापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यात लेखकानी अहम भुमिका निभावली.अनेक लेखक कवी आपल्या लेख कविता कथा कादंबर्या इत्यादि विविध प्रकारचे साहित्य निर्माण करून समाजाचे प्रबोधन व मनोरंजन करत असतात. पण लेखक म्हणजे शेवटी एक माणूसच आहे त्याच्याही समाजांच्या विविध घटकांकडून काही अपेक्षा असू शकतात लेखक म्हणून त्यांच्याही काही व्यथा असू शकतात नाही का?मी या क्षेत्रात अगदीच नवखा आहे पण जेंव्हा लेखकांच्या व्यथांचा मी जेंव्हा विचार केला तेंव्हा काही समस्या माझ्या अल्पअनुभवाने लिहाव्या वाटल्या त्या येथे मांडतों ...
       लेखकाच्या अनेक व्यथांपैकी प्रमुख व्यथा म्हणजे लोकांचे वाचन कमी कमी होत चालले आहे. टीव्ही चॅनल्स,फेसबूक ट्वीटर व वॉट्स ॲप सारख्या सोशल नेटवर्क साइट्समुळे उथळ लिखानाचा सुळसुळाट झाला आहे व सकस व अभ्यासपूर्ण वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. दुसरी समस्या अशी की ,जे काही लिहिले जातेय ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य प्रकाशक करत असतात पण या प्रकाशन व्यवसायाचे व्यापारीकरण झाले असल्याने जे लेखक नामांकित  व प्रस्थ्यापित आहेत त्यांचेच साहित्य प्रकाशित केले जाते आहे. जे विकण्याची खात्री आहे तेच छापले जाते आहे . नवे साहित्यिक प्रयोग तसेच उदयोन्मुख लेखकाना काही हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या प्रकाशकांचा अपवाद वगळता प्रकाशक संधी द्यायचे टाळताना दिसतात. नव्या लेखकाना आपले लेखन वाचकांपर्यंत पोहोचावे असे वाटते. काही नवसाहित्यिकाना मार्गदर्शन हवे असते पण प्रस्थ्यापित लेखक व कवी अशा नवसाहित्यिकाना जवळ फिरकू देत नाहीत.मग असे बरेच साहित्यिक नाऊमेद होतात व लिखाण सोडून देतात. काही नवोदित मात्र फेसबूक ट्वीटर वा वॉट्स ॲप इत्यादिच्या माध्यमातुन आपली लिखाणाची हौस भागवताना दिसतात.लेखकाची अजून एक व्यथा म्हणजे साहित्य मंडळा मधील कंपूशाही. विविध पातळ्यांवर अशी कंपूशाही आढळते. प्रदेश,जात,धर्म, लिंग अशा विविध निकषावर साहित्यिकाचे व त्याच्या लिखाणाचे मूल्यांकन होत असते. प्रस्थ्यापित साहित्यिक सगळेच वाईट आहेत असे मला मुळीच म्हणायचे नाही ,तेथेही काही चांगली माणसे आहेत म्हणून तर काही प्रमाणात नविन साहित्यिक उदयाला येताना दिसताहेत पण अशा वृत्ती क्रियाशील आहेत हे नक्की.साहित्य परीषदे सारख्या संस्थ्येत नवोदित लेखकांसाठी काही ठोस होताना दिसत नाही.काव्य हा साहित्य प्रकार दुर्लक्षित होतो आहे ही अजुन एक व्यथा आहे. साहित्य सम्मेलनातही  कवी  व कवितेकडे दुर्लक्ष केले जाते.नुकत्याच  झालेल्या पिंपवड साहित्य सम्मेलनात कविकट्टा सभागृह याचे ताजे उदाहरण आहे. इत्तर साहित्य प्रकार आलिशान सभागृहात सादर होत होते. मूठभर निमंत्रित कवि याच सभागृहात कविता सादर करीत होते पण नवोदितांच्या कवीकट्ट्याची अवस्थ्या अगदी केविलवाणी होती! तेथे एकदम ढिसाळ व्यवस्थ्या होती. मान्य आहे सध्या कवी व कवितांचे उदंड पिक येते आहे पण अशा उदंड पिकातुनच सकस लिखाण करणारे  साहित्यिक तयार  होऊ शकतात!  पण हे लक्षात कोण घेणार ?
      प्रल्हाद दुधाळ (९४२३०१२०२०)

Tuesday, February 9, 2016

फजिती

माझीही एक फजिती ....
अनेक कुबेरानी आपल्या फजितीचे प्रसंग लिहिले आहेत.मी सुध्दा माझ्या जीवनातील असा एखादा प्रसंग लिहावा म्हणून आठवू लागलो.संत कबीर आपल्या एका दोह्यात म्हणतात ....
ऐसे जगह बैठिये कोई ना बोले उठ,
ऐसी बात कहिये कोई ना बोले झुठ .
आयुष्यभर या शिकवणी प्रमाणे जगत आल्यामुळे सहसा फजितीचे प्रसंग वाट्याला फारसे आले नाहीत.तरीही अगदी शालेय वयातला एक प्रसंग आठवला ज्या प्रसंगी चांगलीच फजिती झाली होती ....तर  तोच प्रसंग सांगतो.
     मी सातवीत असतानाची गोष्ट आहे, त्या वर्षी प्रचंड दुष्काळ पडला होता .मी गावातल्या प्राथमिक शाळेत शिकत होतो.त्या काळी  बोर्डाची पी एस सी परिक्षा सातवीला असताना द्यावी लागायची .हे खुप महत्वाचे वर्ष मानले जायचे.शाळेचा रिझल्ट चांगला लागायला हवा म्हणून शिक्षक भरपूर अभ्यास करून घेत असत.शाळेत रात्री विद्यार्थ्याना  थांबवून अभ्यास घेतला जायचा .गावात त्या काळी दर अमावास्येच्या दिवशी ग्रामदेवता भैरवनाथाच्या मंदिरात गावजेवण(भंडारा)दिले जात असे.त्यावेळी विजेची सोय नव्हती,त्यामुळे रात्री अभ्यासासाठी आम्ही शाळेतच राहून कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत असू.शाळेची एकदम कडक शिस्त होती.गावातच राहणारे अत्यंत मारकुटे तसेच यामुळेच  विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशत असलेले गुरुजी शाळेचे मुख्याध्यापक होते.त्यांचा नियम होता की काहीही कारण असले तरी रात्री आठ वाजल्यानंतर कुणीही शाळेच्या बाहेर पडायचे नाही.आमची शाळा गावातल्या पेशवेकालीन वाड्यात भरायची. तर झाले काय की,अशाच एका अमावस्ये ला आम्ही मुलांनी मंदिरातल्या भंडाऱ्याच्या जेवणावळीत  जावून जेवायचे ठरवले. कुणाच्याही नकळत गुपचूपपणे आम्ही मंदिरात गेलो व मान खाली घालून भंडार्याच्या  पंक्तीत बसलो.समोरच्या पत्रावळीवर  कुणीतरी लापशी वाढली, भराभर जेवायचे होते त्यामुळे  हातात घास घेतला  अचानक समोर लक्ष गेले आणि समोरच्या व्यक्तीला पाहून हादरलोच!
           शाळेचे मुख्याध्यापकच पंक्तीत लापशी वाढत होते! त्यांची एवढी  प्रचंड दहशत होती की आम्ही जेवायचे सोडून  शाळेकडे धूम ठोकली! आता आपली काही धडगत नाही,शाळेतून आपल्याला काढून टाकणार या भीतीपोटी पुढचे तीन दिवस शाळेच्या वेळेत घरातून निघत होतो,पण शाळेला गेलोच नाही! आता शाळा कायमसाठी सोडायची व शेतातच काम करायचे असं मनाशी पक्क ठरवूनही टाकले!
  स्वत: मुख्याध्यापक चौथ्या दिवशी जातीने घरी आले व समजूत घातली तेंव्हा कुठे शाळेवर उपकार केल्याच्या अविर्भावात अस्मादिक शाळेत गेले! त्यावर्षी सातवीच्या (त्यावेळची पी.एस.सी.)परीक्षेत केंद्रात पहिला आलो आणि शेतमजूर होता होता वाचलो!!!!
  आजही झालेल्या फजितीचा  तो  प्रसंग आठवतो तेंव्हा अजाण वयातल्या त्या वेडेपणाचे हसू येते!
.....प्रल्हाद दुधाळ. पुणे. (९४२३०१२०२०)