Wednesday, February 24, 2016

माझा शाळेचा पहिला दिवस....

माझा शाळेचा पहिला दिवस....
गोष्ट पासष्ट सालची आहे. मी पाच सहा वर्षाचा असेल. त्या काळी गावाकडे बालवाडी किंवा आंगणवाडी असले काही प्रकार नव्हते. शिवाय आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत जायलाच पाहिजे, त्यांनी शिकलेच पाहिजे असाही लोकांचा हट्ट नसायचा गा
वात शाळेची सोय आहे म्हणून पन्नास टक्के मुलेमुली शाळेत पाठवली जायची! त्यावेळी आमच्या
गावात “शेती शाळा परिंचे” नावाची जिल्हा परिषदेची शाळा होती.या शाळेचे तिसरी पर्यंतचे वर्ग शाळेच्या इमारतीत आणि काही रामाच्या देवळात भरायचे.चौथी ते सातवीचे वर्ग गावातल्या ऐतिहासिक दोन मजली भल्यामोठ्या परांजपे वाड्यात भरायचे.या शाळेची शेतीही होती.त्या शेतीमधे विद्यार्थ्याना शेतकामाचे शिक्षणही मिळायचे!पुणे जिल्हा परीषदेलाच गावात शाळा चालवायची गरज(सरकारी धोरण) असल्यामुळे या शाळेच्या प्रवेशाची प्रक्रिया खूप मजेशीर होती.साधारण प्रत्येक वर्षी में महिन्यात शाळेच्या शिक्षकांचे गावात तसेच वाड्यावस्त्यांवर सर्वेक्षण सुरू व्हायचे.त्या वर्षी कोणकोणती मुले सहा वर्षाची झाल्यासारखी वाटतात याचे ते सर्वेक्षण असायचे! अश्या प्रवेशयोग्य पोरापोरींच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवले जायचे.जून महिन्याच्या सुरुवातीला अशा पोरापोरींना पहीलीच्या वर्गात अक्षरश: घातले जायचे! बहुतेक मुलांची जन्मतारीख पालकाना माहीत नसायचीच ! शिक्षकच जन्मतारीख ठरवायचे व ती रेकॉर्डवर लिहिली जायची,साधारण एक जूनला शाळा सुरू व्हायच्या त्यामुळे अशा बहुतेक विद्यार्थ्यांची जन्मतारीख एक जून व सहा वर्षे वय असायला हवे म्हणून सहा वर्षापुर्वीचे साल टाकून दिले की झाली त्या विद्यार्थ्याची पूर्ण जन्मतारीख! अशाच एका प्रवेशमोहिमेत माझा शाळाप्रवेश झाला जन्मतारीख लिहिली गेली-एक जून एकोणिसशे साठ!पहिल्या दिवशी शाळेत गेलो,दप्तर वगैरेचा प्रश्नच नव्हता,रिकामाच गेलो होतो.अंगावर मळकट ढगळ पांढरा शर्ट व निळसर रंगाची जुनी पॅंट असा गबाळा पेहराव घातला होता.आयुष्यात प्रथमच शाळेत गेलो होतो ना, त्यामुळे वेड्यासारखा गोंधळून इकडे तिकडे बघत होतो! माझ्यासारखीच बरीच मुले व मुली वर्गात होती. कोण रडत होते,काहीजण एकमेकांशी मारामारी करत होते, कुणी उभे तर कुणी बसलेले होते. एकूणच भरपूर गोंधळ चालू होता!मीही सारवलेल्या जमिनीवर बसकन मारली.एक खापराची पाटी आणि पेन्सीलचा तुकडा या वस्तू शाळेतल्या बाईनी सर्वाबरोबर मलाही दिल्या.त्यांचे नाव कुचेकर बाई होते.त्या ओरडून काहीबाही सांगत होत्या पण काहीच ऐकू येत नव्हते.या बाईच माझ्या पहिल्या इयत्तेच्या पहिल्या शिक्षिका होत्या.केसांची लांब वेणी व सहावारी पांढरी साडी नेसलेल्या या माझ्या बाईंचा चेहरा आता अस्पष्टसा आठवतों.आयुष्यात पहिल्यांदाच हातात पाटीपेन्सिल मिळाली होती, त्यावर इतर मुलांचे बघून रेघोट्या ओढत बसलो.कुचेकर बाईनी फळ्यावर मोठ्या अक्षरात ‘अ ‘ काढून ठेवला होता व त्या प्रत्येकाने पाटीवर तसा 'अ' काढावा म्हणून सांगत होत्या पण वर्गात पोरापोरींचा एवढा गोंधळ चालू होता, की त्या काय सांगतायेत ते कळतच नव्हते.माझ्या जवळ येऊन बाईनी माझ्या हातात पेन्सिल धरायला लावली व माझा हात धरून पाटीवर मोठा ‘अ ‘ काढला,ती माझ्या आयुष्यातली पहिली अक्षर ओळख!तर असा होता माझा शाळेचा पहिला दिवस! बहुतेक माझा शिकायचा वेग बरा असावा,कारण लवकरच मी कुचेकर बाईंचा लाडका विद्यार्थी झालो.
प्रल्हाद दुधाळ (९४२३०१२०२० )

No comments:

Post a Comment