Monday, February 22, 2016

कहाणी अपयशाची .....

           शाळेत असताना हमखास एका विषयावर निबंध लिहायला सांगायचे.... मोठे झाल्यावर तुम्ही कोण होणार? प्रत्येकजण आपल्या बौध्दीक कुवतीनुसार या विषयावर लिहायचे .मी मात्र या विषयावर कधीच निबंध लिहिला नाही. निबंध लिहिला नाही तरी कधी ना कधी हा प्रश्न समोर उभा रहाणारच होता. गावातच शिक्षणाची सोय असल्यामुळे व सरकारी इ बी सी ची सोय असल्याने दहावी पर्यंत प्रत्येक वर्षी पहिल्या क्रमांकाने पास होत राहिलो आणि एक दिवस त्या प्रश्नाने गाठलेच! पुढे काय? पुढे शिकायचे होते, पण काय शिकायचे याचे मार्गदर्शन करणारे जवळ कुणीच नव्हते. त्या काळी गावातुन बाहेर पडलेले बहुतेक लोक मुंबईत गिरणी कामगार वा कुठल्यातरी खाजगी कंपनीत कामगार होते .तिनेक वर्षाने मोठा असलेला एक मुलगा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला डिप्लोमा करत होता त्यामुळे आपणही डिप्लोमा करायचा व इंजिनयर व्हायचे असे मनाशी ठरवले. इकडून तिकडून माहीती काढून प्रवेशासाठी फॉर्म मिळवला व भरला. प्रवेशासंबंधी पत्रही आले. त्या वर्षी खूप पाऊस पडला होता व पोस्टाची बस एक दोन दिवस आलीच नाही! पत्र मला शेवटच्या तारखेला पोहोचले. मी कसाबसा कॉलेजवर पोहोचलो व प्रिंसिपलसाहेबाना भेटलो. त्यानी दुसऱ्या दिवशीपर्यंत फी भरायला वेळ दिला. साधारणपणे तीनशे रूपये भरायचे होते पण माझ्याकडे होते वीस रूपये! पैशाची व्यवस्थ्या होण्यासारखी नव्हती. कुणी आर्थिक मदत देण्याचा प्रश्नच नव्हता. थोडक्यात मी माझ्या आर्थिक आवाक्याच्या बाहेरचे स्वप्न पाहिले होते व ते भंगले होते. या अपयशामुळे मी खूप नाउमेद झालो .'अंथरून पाहून पाय पसरावे' ही उपदेशात्मक म्हण मी जवळून अनुभवली व खुणगाठ बांधली इथुन पुढे आयुष्यात वास्तवात जगायचं! स्वप्ने पहायची पण ती वास्तवावर घासून बघायची!
           माझ्या या अपयशाकडे मी सकारत्मकतेने पाहिले आणि शेजारच्या तालूक्यातल्या रयत शिक्षण संस्थ्येच्या शाळेत नव्याने सुरू झालेल्या अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी संपर्क साधला. त्या शाळेला विद्यार्थी कमी पडत होते त्यामुळे एक पैसाही न भरता माझा अकरावीचा प्रवेश झालाबारावी साठीही अशीच रयतची गरजू शाळा मिळाली तेथे तर विनामुल्य रहायची सोय सुध्दा झाली. भाजी भाकरी स्वत: करून खायचो त्यामुळे बारावी पर्यंत शिक्षण झाले . पुढे त्याच शाळेतले आम्ही सहाजण गरवारे कॉलेज पुणे येथे फर्स्ट ईयर सायन्सला गेलो एका झोपडपट्टीत राहून भाड्याची सायकल घेवून कॉलेज करत होतो .फर्स्ट ईयर कसेबसे झाले आणि एक गोष्ट लक्षात आली "आपल्याला पुढे शिकायचे असेल तर नोकरी करूनच शिकता येइल!" नोकरीच्या जाहिराती बघू लागलो व पुणे टेलिफोन्सच्या टेलिफोन ऑपरेटर पदासाठी अर्ज केला. निवड झाली व रात्रपाळीला नोकरी करून बीएस्सी पूर्ण केले. या सरकारी खात्यात स्पर्धा परीक्षा देवून वरच्या पदावर प्रमोशन मिळण्याची संधी उपलब्ध होती! या संधीचा पुरेपूर उपयोग मी करून घेतला व एकापाठोपाठ एक परीक्षा देत प्रमोशन घेत राहिलो. नियतीने डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची संधी मला मिळू दिली नव्हती तोच मी आज "सबडिव्हीजनल इंजिनिअर" म्हणून बीएसएनएल या सरकारी कंपनीत कार्यरत आहे .
आयुष्यात येणाऱ्या अपयशाने खचून न जाता वास्तवाचा स्वीकार करून समोर आलेल्या समस्येमधे लपलेली संधी शोधण्याची आईकडून मिळालेली शिकवण आयुष्यभर मला मार्गदर्शन करते आहे..
..... प्रल्हाद दुधाळ (९४२३०१२०२०)

5 comments: