Tuesday, February 23, 2016

जन पळभर म्हणतिल

राजकवि भा रा तांबे यांची जन पळभर म्हणतील ....ही माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे मानवी जीवन व त्यातील क्षणभंगुरता अगदी सहज सोप्या भाषेत मांडली आहे. ते सांगतात की या जगातले तुझे आस्तित्व हे काही दिवसाकरिता आहे या जगातून तू गेल्यावर या जगाच्या दैनंदीन व्यवहारात काडीचाही फरक होणार नाही .तू गेल्यानंतरही निसर्गचक्र जसे आहे तसेच फिरत राहील तुझ्यावाचून कुणाचे काही अडणार नाही काळ जसा पुढे सरकेल तसे तुझ्या आस्तित्वाशिवायही हे जग आहे तसेच राहील. थोडे दिवस तुझ्या जाण्याबद्द्ल हळहळ व्यक्त होईल. दिवस जसे जसे जातील तसे दुनियेचे नेहमीचे व्यवहार सुरू होतील आणि मग तुझ्या अगदी प्रिय व्यक्तीही हळूहळू तुला विसरून जातील.
या जगात कुणाचेही कुणावाचून अडत नाही. अगदी राम वा कृष्णा सारख्या देवांवाचुनही अडले नाही . तेंव्हा जे आयुष्य तुला मिळाले आहे ते शांततेत आणि आनंदात जग. मृत्यू हे मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि मिळालेला जन्म सर्व विकारांवर विजय मिळवून समरसतेने जगण्याची महत्वाची जाणीव व शिकवण कवी या कवितेतून देतात .

जन पळभर म्हणतिल - भा. रा. तांबे

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’ ! 
मी जाता राहिल कार्य काय ? 

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल, 
तारे अपुला क्रम आचरतिल, 
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल, 
गर्वाने या नद्या वाहतिल, 
कुणा काळजी की न उमटतिल, 
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल, 
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल 
मी जाता त्यांचे काय जाय ?

रामकृष्णही आले, गेले ! 
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?
कवी -भा रा तांबे.
रसग्रहण प्रयत्न --प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment