Thursday, December 31, 2015

लेखाजोखा

लेखाजोखा माझ्या आयुष्यातील  २०१५ चा.

    म्हणता म्हणता २०१५ ही संपल. परवा परवा पर्यंत  लोकानी विचारले की "काय मग किती दिवस आहे अजून नोकरी?" मी उत्साहाने  सांगायचो "आहेत अजून पाचेक वर्षे" .पण आज मी पुन्हा एकदा हिशोब केला.अरेच्चा, आता तर धड साडेचार वर्षे सुध्दा नाही राहीली नोकरीची!
    खर तर गेले चौतीस वर्षे नोकरी करतोय.अनेक कडू गोड आठवणी आहेत नोकरीतल्या, पण त्या पुन्हा कधीतरी! आजचा विषय  आहे तो  सरत्या वर्षाचा माझ्या जीवनापुरता लेखाजोखा काय आहे?अख्ख्या वर्षाचा हिशोब मांडला आणि लक्षात आले की खुपच संमिश्र असे अनुभव दिले २०१५ ने. यात या सालाचा काहीच दोष नाही."येतो आणि जातो, शिकवून जातो काळ हा ." असे  मीच माझ्या एका कवितेत म्हटले आहेच की!
   २०१५ सालासाठी मी एक स्वप्न पाहीले होते  ते एका  पुस्तकाच्या प्रकाशनाचे.हे स्वप्न  साकार नक्कीच झाले.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष  श्री शेजवलकर यांच्या अध्यक्षतेखाली व्  जानेवारी २०१५ मधील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री  श्रीपाल सबनीस यांचे हस्ते माझा "सजवलेले क्षण " हा कविता संग्रह पुण्यातील  चपराक प्रकाशन तर्फे  प्रकाशित झाला.चपराक चे संपादक घनश्याम पाटील यांच्या सहकार्याने हे माझे स्वप्न साकार झाले.त्यांच्या सानिध्यात अनेक पत्रकार व् साहित्यिक यांची ओळख झाली.लेखन  करण्यास प्रेरणा मिळआली.एकूण सहा दिवाली विशेषांकात साहित्य छापून आले.कविता लिहीतच होतो आता कथा व् लेखही लिहितोय.या क्षेत्रात थोडेफार नाव झाले ते या २०१५ मधेच!
 फेसबुक व् वाट्स अप वर या वर्षी अनेक मित्र जोडले गेले.अनेक साहित्यिक मित्र यादीत आले.कुबेर सारखा फेसबुक ग्रुप जोडला गेला .ज्ञान व् माहीती मिळण्याची सोय झाली.अनेक साहित्यिक व् वाचक तेथे  भेटले.चारोळ्या कथा व् कविता लिहिण्याचे सातत्य या ग्रुप्स च्या निमित्ताने वाढले.
   आत्तापर्यंत च्या नोकरीत जवळ जवळ  पंचवीस वर्षे मला फिल्ड मधे काम करावे लागले पण गेले सहासात वर्षे त्या मानाने कामाचा बोजा कमी असलेले पद सध्या मला मिळाले आहे.फार कटकटी नसलेले काम असल्यामुले  ऑफिस च्या आघाडीवर २०१५ माझ्यासाठी अत्यंत चांगले गेले.
   या वर्षी या ना त्या कारणाने  अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी प्रवास केला.कालभैरव नाथ जोतिबा,तुकाईमाता,कालूबाई,यमाई निरा नरसिंगपूर अशा अनेक देव देवतांचे मनोभावे दर्शन झाले. वयाची पंचावन्न वर्षे  या अध्यात्मिक क्षेत्राकड़े नाही म्हटले तरी  माझे दुर्लक्ष झाले होते. २०१५ मधे मनापासून आत्मिक समाधानासाठी मी श्री श्रीपादश्रीवल्लभ यांच्या चरित्राचे  पारायण केले.दत्तजयंतीला श्री दत्त दिगंबरासमोर नतमस्तक झालो.आता  या पुढील आयुष्यात अध्यात्म हाच आनंदी व समाधानी जगण्याचा आधार आहे याचे भान २०१५ या वर्षातच मला आले.
  कौटुंबिक आघाडीवर मात्र २०१५ हे तसे यथायथाच गेले.या वर्षी कुटूंबात काही छोटे मोठे अपघात झाले. अगदी जीवाच्या संकटातून  काही सदस्य वाचले.काही सदस्य सतत आजारी होते. घरात काही काळ  अशांती होती पण प्रभू कृपेने  यातून बाहेर पडण्याचा मार्गही मिळत गेला व्  पुढेही  मिळत राहील.
    आर्थिक आघाडीवर ना नफा ना तोटा अशी काहीशी स्थिती होती.
२०१५ तर आता संपले आता उत्सुकता आहे २०१६ ची.हे वर्ष मात्र  सर्वच आघाड्यांवर उत्साही भरभराटीचे असणार आहे यात शंका नाही . हे वर्ष मला तर उत्तम जाणारच आहे पण माझ्या बरोबरच आपणा सर्वाना आनंदाचे समाधानाचे उत्तम आरोग्याचे व्  भरभराटीचे जाओ ही परमेश्वराजवळ  प्रार्थना करतो .
शुभम भवतु.
                                 .......प्रल्हाद दुधाळ

Friday, December 18, 2015

कर्मयोगी संत शिरोमणी नरहरी सोनार.

    कर्मयोगी संत शिरोमणी नरहरी सोनार.
   यादव कालीन वारकरी संप्रदायात नामदेव शिंपी, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, दासी जनी, सोहिरोबा,गणिका कान्होपात्रा,चोखोबा,सेना न्हावी असे अठरापगड जातीमध्ये जन्म घेतलेले संत होवून गेले. अशा संतानी आपापल्या भक्ती मार्गाने वारकरी संप्रदायाची,भागवत धर्माची पताका सतत फडकत ठेवली.आपापले पारंपारिक व्यवसाय सांभाळून व आपला संसार करता करता या संतानी  पांडुरंगाचे नामस्मरण केले.या संतांपैकी एक श्री संत शिरोमणी नरहरी सोनार हे व्यवसायाने सोनार असलेले एक महान संत होते व त्यांनी आपल्या भक्तीचा वेगळा ठसा जनमानसावर उमटवला होता. प्रारंभी संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते.परंपरेने त्यांच्या घरात ही शिवभक्ती चालत आली होती.भगवान शंकरावर त्यांची एकनिष्ठ भक्ती होती.त्यांच्या या शंकर भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होत होती.रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असत.रोज भल्या पहाटे जोतिर्लिंगावर बेल पत्र वाहिल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू व्हायचा नाही.आपल्या अशाच एका शिवस्तुतीपर अभंगात ते म्हणतात-
भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर । तेथें मी पामर काय वर्णू ॥ १ ॥
भूषण जयाचें भुवना वेगळें । रुंडमाळा खेळे गळ्यामध्यें ॥ २ ॥
कर्पुरगौर भोळा सांब सदाशिव । भूषण धवल विभूतीचें ॥ ३ ॥
माथां जटाभार हातीं तो त्रिशूळ । श्वेत शंख बळें फुंकीतसे ॥ ४ ॥
भांग जो सेवूनी सदा नग्न बैसे । जटेंतूनि वाहे गंगाजळ ॥ ५ ॥
गोदडी घालूनी स्मशानीं जो राहे । पंच वस्त्र होय श्रेष्ठ भाग ॥ ६ ॥
नाम घेतां ज्याचे पाप ताप जाती । पापी उद्धरती क्षणमात्रें ॥ ७ ॥
नरहरी सोनार भक्ति प्रियकर । पार्वती शंकर ह्रदयीं ध्यातो ॥ ८ ॥
 
 सुरुवातीच्या काळात नरहरी सोनार कट्टर शिवभक्त असल्यामुळे इत्तर दुस-या कोणत्याही देवांवर त्यांची बिलकूल श्रध्दा नव्हती.त्यांच्या या दुसऱ्या देवाबद्दलच्या वृत्तीचा त्या काळी बऱ्याच जणांना राग यायचा.असे म्हणतात की, एक दिवस  खुद्द पांडुरंगानेया शिवभक्ताची परीक्षा घ्यायचे ठरवले.पंढरपुरात एका सावकाराला बऱ्याच नवससायासाने पुत्रप्राप्ती झाली होती.त्याच्या नवसपूर्तीसाठी त्याने विठ्ठलाला एक मौल्यवान कलाकुसर असलेली सोन्याची साखळी तयार करून घालायचे ठरवले.पंढरपुरात संत नरहरी सोनार हे सुवर्णकामातले एक उत्कृष्ट कारागीर होते.त्यांची कलाकुसर पंचक्रोशीत अत्यंत प्रसिध्द होती,त्यामुळे हे काम त्या सावकाराने संत नरहरी सोनारांना सांगितले. ‘आपण फक्त शंकराची भक्ती करतो आणि शंकराशिवाय कोणत्याही देवाचे तोंड आपण बघणार नाही’ हे कारण सांगून सोनसाखळी तयार करायला नरहरी सोनार यांनी साफ नकार दिला. हे काम नरहरी यांच्याकडूनच करून घ्यायचे असा सावकाराचा हट्ट होता.नरहरी सोनारांकडून त्यांनी विठ्ठलाचे तोंड न दाखवता ही साखळी घडवून घ्यायचे ठरवले त्यासाठी सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माप स्वत: आणून देण्याचे कबूल केले तेंव्हा एकदाचे संत नरहरी सोनार यांनी ती सुवर्णसाखळी बनवण्याचे मान्य केले.दुस-या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप स्वत: त्यांना आणून दिले.संत नरहरी यांनी आपली सर्व कलात्मकता पणाला लावून एक सुंदर सोनसाखळी तयार केली.सावकार ती अप्रतिम सोनसाखळी पाहून खूपच खुश झाला.तात्काळ त्याने मंदिरात जाऊन स्वत:च्या हाताने विठ्ठलाला ती सोनसाखळी घालायाचे ठरवले व मंदिरात गेला.तो साखळी घालायला लागल्यावर त्याच्या लक्षात आले की सोनसाखळी विठ्ठलाच्या कामरेपेक्षा वीतभर मोठी झाली आहे.सावकाराने पुन्हा माप घेवून आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे साखळीचे माप बरोबर करून आणण्यास पाठवले.असे कसे झाले असा विचार करत संत नरहरी सोनार यांनी साखळी नवीन मापाप्रमाणे दुरुस्ती करून दिली.सावकाराने पुन्हा विठठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झालेले आढळले.हे पाहून संत नरहरी सोनार पुरते गोंधळून गेले.माप बरोबर घेवूनही असे कसे झाले या विचारात पडले.शेवटी त्यांनी स्वत:च माप घ्यायचे ठरवले  त्यासाठी ते नाईलाजास्तव डोळ्यावर पट्टी बांधून मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले.विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घालायला कमरेला हात लावला तर त्यांच्या हाताला व्याघ्रचर्मे जाणवली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले.नरहरी सोनारांनी आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर सावळ्या विठ्ठलाचीच मूर्ती होती.पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच झाले यामुळे ते खूपच गोधळून गेले.शेवटी त्यांना आत्मज्ञान होवून त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच भोलानाथ शंकर आहे.ईश्वर एकच आहे.सगळे देव विठ्ठलातच सामावलेले आहे.पुढे आपल्या भक्तीने ज्ञानदेवांनी जी शैव आणि वैष्णव यांच्यामधील एकात्मतेची अपेक्षा केली, ती नरहरी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे पूर्ण केली.या 'कटिसूत्र' प्रसंगानंतर ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू यांच्यामधील अभेद जाणवला यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये पुरते बुडून गेले.आपल्या अभंगात ते म्हणतात-
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥ १ ॥
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोनें ॥ २ ॥
त्रिगुणाची करुनी मूस । आंत ओतिला ब्रह्मरस ॥ ३ ॥
जीव शिव करुनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी ॥ ४ ॥
विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ॥ ५ ॥
मनबुद्धीची कातरी । रामनाम सोनें चोरी ॥ ६ ॥
ज्ञान ताजवा घेउन हातीं । दोन्ही अक्षरें जोखिती ॥ ७ ॥
खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी ॥ ८ ॥
नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥ ९ ॥
'देवा, मी तुझा सोनार आहे, आणि मी नेहमी तुझ्या नामाचाच व्यवहार करीत असतो. फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी-बागेसरी म्हणजे माझा देह आहे. त्यात जीवाशिवाचं सोनं घातलेलं आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांची मूस मी तयार केली आहे आणि त्यात ब्रह्मारस ओतला आहे. जीवाशिवाच्या फुंकणीनं मी या धगधगत्या आगीत, ती शिलगावण्यासाठी, फुंक मारतो आहे. म्हणून त्यात माझ्या अंतरात्म्याचं सोनं तावून-सुलाखून निघतं आहे. त्या तप्त झालेल्या सुवर्णाला रात्रं-दिवस, ठोकाठोकी करून मी आकार द्यायचा प्रयत्न करतो आहे.'
संत नरहरी सोनाराच्या नावावर तसे फारथोडे अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई' 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा' माझे प्रेम तुझे पायी' आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' अभंग प्रसिद्ध आहेत.
   संत नरहरी सोनार म्हणतात, आपण आपले तन-मन-धन अर्पून स्वीकारलेले काम निष्ठापूर्वक केले, तर यश, कीतीर्, वैभव आपल्या पायाशी लोळण घेणारच आहे. म्हणूनच 'यात अर्थ नाही, त्यात अर्थ नाही' असे म्हणत बसण्यापेक्षा जे काम स्वीकारले आहे, त्यालाच दिव्यत्वापर्यंत नेण्याची शिकवण त्यांनी आपल्या अभंगातून दिली.
काहीं करीना उपाय । दिवसें दिवस व्यर्थ जाय ॥ १ ॥
संसारीं नाहीं समाधान । न चुकती जन्ममरण ॥ २ ॥
शेण लोणी सोनें कांसें । एक मोले विके कैसें ॥ ३ ॥
दुर्जनसंग त्यागावा । संतसंग तो धरावा ॥ ४ ॥
नरहरी जोडोनियां कर । उभा सेवे निरंतर ॥ ५ ॥
असा कर्मयोगातून मोक्षाप्रत जाणारा भक्तीमार्ग त्यांनी लोकांना सांगितला.अशा या कर्मयोगी संत नरहरी सोनार यांना लक्ष लक्ष वंदन.
                                   ...प्रल्हाद दुधाळ. पुणे (९४२३०१२०२०).



Sunday, November 22, 2015

मी एक नाट्य कलाकार.

मी एक  नाट्य कलाकार.
 माझा आणि नाटकाचा संबंध तसा मुळीच नव्हता.शाळेत असताना गावात एक नाटक कंपनी आली होती.दररोज एका नाटकाचा प्रयोग व्हायचा.शाळेच्या पटांगणावर या नाटकाचे प्रयोग व्हायचे.नाटकाचे तिकीट पन्नास पैसे होते.दररोज पन्नास पैसे खर्च करणे तर शक्यच नव्हते.माझा भाउ त्याकाळी वायरमन ची फुटकळ कामे करायचा.एम एस ई बी च्या वायरमनशी त्याची मैत्री होती या ओळखीच्या जोरावर मला ही नाटके फुकटात पाहायला मिळाली.आता सगळी नावे आठवत नाहीत पण या स्टेजवरच मी 'सती महानंदा' 'उमाजी नाईक' तसेच काही ऐतिहासिक नाटके पाहिली.खेड्यात यात्रा जत्रेत मुख्यत्वे तमाशा/लोकनाट्यात  वगाचे प्रयोग मी मन लावून बघायचो.तेव्हढाच माझा नाटक/लोकनाट्य या कलांशी संबंध आला होता.हायस्कूलमध्ये असताना आम्हाला विद्यासागर नावाचे शिक्षक होते.ते नुकतेच पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात  श्रीराम लागू यांचे 'नटसम्राट' व काशिनाथ घाणेकरांचे 'अश्रुंची झाली फुले' ही नाटके पाहून आले होते.त्यांच्यावर या नाटकांनी एवढी जादू केली होती की वर्गात ते दोन्ही नाटकांच्या प्रयोगाचे हुबेहूब वर्णन करत.नाटकातले  सगळे संवाद त्यांनी तोंडपाठ केले होते.संपूर्ण प्रयोग अगदी सर्व पात्रांसहित ते वर्गात जिवंत करायचे.त्यावेळी आपण एकदा तरी बालगंधर्व रंगमंदिरात जावून नाटक पाहायचेच हे मनाशी ठरवले होते पण त्या वयात माझ्यासाठी ते एक दिवास्वप्नच  होते!मी मिळेल त्या नाटकांची पुस्तके मात्र मन लावून वाचत होतो.
   पुढे शिक्षणासाठी म्हणून मी पुण्यात आलो.दररोज बालगंधर्व समोरच्या जंगली महाराज रस्त्याने सायकल चालवत मी कॉलेजमध्ये जायचो पण या तेथे जावून नाटक पहाणे हे स्वप्नच  राहिले.पुढे टेलिफोन खात्यात नोकरी लागली.नोकरीत थोडा स्थिरस्थावर झाल्यावर युनियन,कल्चरल प्रोग्रॅम या क्षेत्रांतील कर्मचार्यांशी मैत्री झाली.त्या काळी आमचे टेलिफोन खात्या कडून एक गरवारे करंडक एकांकिका स्पर्धा घेतली जायची.या स्पर्धेत पुण्यातील पोस्ट ,टेलिफोन,आर एम एस ची अनेक कार्यालये आपली एकांकिका बसवून सादर करायची.साधारण पाच सहा कार्यालयांच्या एकांकिका या स्पर्धेत उतरायच्या.अगदी उत्साहात ही स्पर्धा व्हायची.भरत नाट्य मंदीर,टिळक स्मारक मंदीर वा बालगंधर्व रंगमंदिरात ही स्पर्धा दरवर्षी घेतली जायची.
एकोणीसशे त्र्याऐंशी सालच्या या स्पर्धेत आमच्या ऑफिसतर्फे  'काच सामान जपून वापरा ' ही एकांकिका या स्पर्धेकरीता बसवायचे ठरले. प्राध्यापक माधव वझे (श्यामची आई या सिनेमात त्यांनी लहानपणी श्याम ची भूमिका केली होती.) याना दिग्दर्शन करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.वाडिया कॉलेजवर ते प्राध्यापक होते. एकांकिकेत काम करण्यासाठी कर्मचार्यांची नावे मागवण्यात आली होती.त्यामधून वझे सर पात्रयोजना करणार होते.माझा मित्र आजचा प्रसिध्द एकपात्री कलाकार दिलीप हल्याळ याने नाव दिले होते त्याच्या बरोबर मी अगदी सहजच पात्रांची निवड होणार होती त्या हॉल मध्ये गेलो होतो.वझे सर एका एका कलाकराला समोर बोलावून काही वाक्ये म्हणायला सांगायचे वेगवेगळ्या प्रसंगी ते वाक्य कसे म्हणावे लागेल ते सांगून तसे करून घेत त्यांच्या पसंतीला आलेल्या कलाकारांची एकांकिकेतील भूमिका निश्चित करत होते.त्यांनी अचानक मला पुढे बोलावले."मी सहज आलोय,मी काम करणार नाही ."असे मी त्यांना सांगितले व जागेवरच थांबून राहिलो.समोर आमचे काही अधिकारीही हजर होते.त्यातील एका अधिकाऱ्याने मला "काही हरकत नाही जा तू पुढे, नसले केले तरी आता सर सांगतात तसे करून दाखव."असे सांगितले.मला घाम फुटला होता.मी आत्तापर्यंत नाटकात भूमिका सोडा,एखाद्या भाषणाच्या स्पर्धेतसुध्दा भाग घेतला नव्हता.चार लोकांसमोर बोलायचा कधी आयुष्यात प्रसंगच आला नव्हता.या बाबतीत प्रचंड न्यूनगंड मला होता, अजूनही थोडाफार आहेच! पण साहेबाला कसे नाही म्हणायचे,म्हणून मी पाय ओढत पुढे गेलो! माधव वझे सरांना मी सांगायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत त्यांनी एक वाक्य लिहिलेला कागद मला दिला.आणि म्हणाले हे वाक्य म्हणून दाखव.
मी वाक्य वाचून पाहिले.बापरे लिहिले होते ....प्रियकर त्याच्या प्रेयसी ला म्हणतो ..
"  मला तू खूप आवडतेस,मी तुझ्यावर प्रेम करतो !"
मी वाक्य मनातल्या मनात वाचल्यावरच मला घाम फुटला.अंग थरथरायला लागले होते.कसेबसे मी ते वाक्य तोंडातल्या तोंडात  उच्चारले.वझे सर म्हणाले" जरा जोरात म्हण" मी थोडा धीर एकवटून ते वाक्य बोललो."छान !" आणि नको नको म्हणताना एकांकिकेतील  प्रियकराची  भूमिका माझ्यावर अक्षरशः लादली गेली.या एकांकिकेत हेलन माझ्या  प्रेयसीची भूमिका करायची.तालमी सुरू झाल्या आणि माधव वझे सर प्रियकर प्रेयसी चा जो सीन होता त्याची तयारी आम्हा  दोघांकडून परत परत करून घ्यायला लागले."अजून चांगले व्हायला हवे" "अजून जीव ओत " तीच तीच वाक्ये तोच सीन सगळे संवाद पाठ झाले होते पण वझे सरांना अभिप्रेत असणारा प्रवेश काही रंगत नव्हता! त्या दिवशी तोच सीन त्यांनी आमच्याकडून अंदाजे वीस वेळा तरी करून घेतला असेल.एक झाले की परत परत तो सीन केल्यामुळे हेलन व माझ्या अभिनयात मोकळेपणा आला जो सरांना अभिप्रेत होता आणि एकांकिका  स्पर्धेत सादर करण्यासाठी तयार झाली.भरत नाट्य मंदिराच्या स्टेजवर गेल्यावर अंगात अभिनय संचारला आणि आमची एकांकिका प्रेक्षकांनी उचलून धरली.आमच्या तो लव सीन छान झाला.पुढे दरवर्षी या एकांकिका स्पर्धेत आमच्या कार्यालयातर्फे जी एकांकिका सादर व्हायची त्यात छोटी का होईना पण माझी भूमिका असायचीच."बच्चू बर्वेची अफलातून दिवास्वप्ने" "गुड बाय मिसेस होम्स" "टेन मिनिट्स टू डेथ" इत्यादी एकांकिका आम्ही बसवल्या व सादर केल्या.आमचा एक नाटकाचा ग्रुप तयार झाला."राजा नावाचा गुलाम "हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी बसवले गेले.या नाटकाचे दिग्दर्शन रघुनाथ माटेसर यांनी केले होते.या नाटकात एक छोटीसी भूमिका मी केली होती.या आमच्या मित्रमंडळी पैकी अशोक अवचट,दत्ता भुवड ,संजय डोळे,दिलीप हल्याळ, वसंत भडके,असे मित्र  अभिनय वा दिग्दर्शन  क्षेत्रात पुढे  आले.त्यांचे यश पहाताना एक दिवस आपणही यांच्याबरोबर काम केले होते याचा अभिमान  वाटतो.फक्त एक हौस म्हणून मी या गोष्टीकडे पहात होतो.माझ्या आयुष्यातल्या प्राथमिकता वेगळ्या होत्या.अनेक पारिवारिक व आर्थिक समस्या व जबाबदाऱ्या  माझ्या समोर आ वासून उभ्या होत्या.कितीही मोह होत असला तरी मला रंगभूमीवर मिरवणे  परवडणारे नव्हते. हे आभासी जग आपल्यासाठी नाही याची जाणीव होती.आयुष्यात खूप मोठा पल्ला गाठायचा होता. मी स्टेजवर काम करायची हौस भागवून घेतली होती.त्यातला आनंद उपभोगला होता. वैयक्तिक आयुष्यात प्रगती करून घेण्यासाठी  प्रमोशन मिळवायचे  होते. प्रमोशन साठीच्या  खात्यांतर्गत परीक्षेला बसायचे होते त्यामुळे  मनाला मुरड घालून लवकरच मी नाटक मंडळीत न जाता  अभ्यासात रमायला लागलो. जवळ जवळ पाच वर्षे मी या चळवळीत राहिलो.स्टेजवर चे नाटक, स्टेज च्या मागचे वातावरण आणि एखादा प्रयोग झाल्यावरचा कल्ला.त्यातली झिंग व  होणारे संभाव्य  परिणाम व दुष्परिणाम  अगदी जवळून हे सगळ अनुभवता आला याचा नक्कीच  आनंद आहे.मला माझ्या मर्यादा माहीत होत्या.अभिनय हे माझे क्षेत्र कधीच नव्हते पण योगायोगाने या क्षेत्रातल्या दर्दी लोकांशी संबंध आला .स्टेजवर अभिनय करून पहाता आला त्यातली नशा अनुभवता आली हे माझे भाग्य समजतो.माझे अनुभवविश्व यामुळे नक्कीच समृध्द झाले.
                                                                          ..............प्रल्हाद दुधाळ .  

Tuesday, October 27, 2015

मी (पत्र) लेखक!

मी (पत्र) लेखक!
     माझ्या लहानपणी आजच्यासारखी संपर्काची साधने नव्हती. वाहतुकीचे महत्वाचे साधन म्हणजे बैलगाडी! त्या काळी गावात एखादीच सायकल असावी. गावात पुण्याहून मुक्कामाला एक एस.टी.ची बस यायची ती सकाळी पुण्याकडे जायची आणि दुसरी दुपारी अकराच्या दरम्याने यायची. तिच्यातून पोस्टाची पिशवी यायची म्हणून तिला पोस्टाची गाडी असे म्हणायचे.गावात पोस्टमन म्हणून गावचा गुरव काम करायचा.गावाला बारा वाड्या होत्या.बाहेर गावाहून आलेली पत्रे पोस्टमन वाड्या वस्त्यावरून गावातल्या शाळेत आलेल्या त्यातल्या त्यात हुशार मुलांच्याकडे देवून टाकायचे व मग तो मुलगा किंवा मुलगी पुढे पोस्टाचा बटवडा करायचे. आमच्या वाडीत आलेली पत्रे बऱ्याचदा मला दिली जायची.मग मी वाडीचा  पोस्टमन! ज्या कुणाची पत्रे असायची तेथे मी अगदी पोस्टमनच्या रूबाबात ती  पत्रे नेवून द्यायचो! त्या काळात  लिहायला वाचायला येणाऱ्या गावकऱ्यांची संख्या अगदीच मोजकी होती.अर्थातच वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने आलेले पत्र वाचून दाखवायचे कामही मला करावे लागायचे.अगदी  तिसरी चौथीत असल्यापासुन अक्षरे जुळवून (गिचमिड अक्षर असले तरी) मी आलेली पत्रे  मागणीनुसार लोकाना वाचून दाखवायचो.त्यावेळी जास्त करून पोस्टकार्डावरच पत्रव्यवहार व्हायचे.काही  मोजकेच लोक अंतर्देशीय पत्राचा वापर करायचे. त्या काळी गावातले बरेच लोक मुंबईला मिलमध्ये कामाला असायचे ते घरच्या लोकाना पत्राचे उत्तर पाठवायला सोपे जावे म्हणून जोडकार्ड पाठवायचे.मग या जोडकार्डावर  पत्राला उत्तर लिहायचे काम सुध्दा त्या वयात माझ्याकडे यायचे! माझे मराठी अक्षर बरे असावे, कारण असे लोक जेंव्हा दिवाळी किंवा यात्रेला गावाकडे यायचे तेंव्हा माझ्या पत्रलेखनाचे आवर्जून कौतुक करायचे! हे पत्र लेखन बरेचसे बोली भाषेत असायचे.त्यात लिहायचे विषय व मजकूरसुध्दा मजेशीर असायचा! अनुभवाने मी पत्राचे काही मायने शिकलो होतो तेच मायने कौशल्याने नाती समजून घेत वापरायचो. उदाहरण द्यायचे झाले तर माझी एक चुलत चुलत काकू होती, तिचा सर्व पत्रव्यवहार माझ्याकडेच असायचा.ती जास्त करून आपल्या मुलीना पत्र लिहायला सांगायची. काकू मजकूर सांगायची –
लिही ‘ स न वि वि सुंदरबाय तुजे पतर मिळालं लिहिला मजकूर समजला आता तुजा पाय दुकायचा थांबला का. औशीद घेतल का नाय.पावण्याच बर हाये का.इथ आमी खुleft m yardशाल हाये तुमची खुशाली वरचेवर कळवने.काल शेरडी व्याली इकडन दोन दिसात  कुणी तिकड आल तर चिक पाठवील. बाळ्याला म्हणाव साळत जा.मामासारक   पतर लिवता याया पायजे.बाकी सगळ ठीक हाये पतराच उतर देवून खुशाली कळवत जा.घरातल्या मोठ्याना नमसकार लहानांना आशीरवाद.बाकी सगळ ठीकाय.कळावे .तुझी आय- मथुराबाय .”
   अशा अर्थाची वा थोडाफार मजकुरातला फरक असलेली बोलीभाषेतली  भरपूर पत्रे मी त्या काळी लिहीली आहेत.अनेकांची आलेली पत्रे वाचून दाखवलेली आहेत.अशिक्षित असणारे ते लोक माझे जवळचे  वा लांबचे चुलते, चुलत्या, आजोबा, आज्जी असे नात्यातले असायचे. अशा लोकांचा मी कौतुकाचा विषय असायचो.पत्र वाचायच्या वा लिहायच्या निमित्ताने अशा लोकांची अनेक आर्थिक  वा कौटूंबिक  सिक्रेट्स आपसूक मला कळायची.ते वय असे होते की वाचलेल्या वा पत्रात लिहिलेल्या अनेक गोष्टी त्या वयात मला कळायच्याही नाहीत. माझ्या या  पत्रलेखक वा वाचकाच्या भूमिकेमुळे अर्थातच माझे या बाबतीतले कौशल्य  माझे वय व शिक्षणातली इयत्ता वाढेल तसतसे वाढत गेले. त्यामुळेच बहुतेक मला शालेय जीवनात पत्रलेखन निबंधलेखन यात चांगले मार्क्स मिळायचे,शिवाय या चिमुरड्या अस्मादिकाला लोकांकडून मानही मिळायचा!

 .....प्रल्हाद दुधाळ (९४२३०१२०२०)

Wednesday, September 16, 2015

वर्गणी

        ही गोष्ट साधारणपणे 1982-83 मधील आहे त्यावेळी मी नुकताच नोकरीला लागलो होतो व पुण्यातल्या येरवडा भागात जेलजवळील नागपुर चाळ या वस्तीत रहात होतो.बहुतेक घरे पत्र्याच्या भिंती आणि मंगलोरी कौले अशा स्वरूपाची होती.तर त्या वस्तीत आमचे "छत्रपती शिवाजी मंडळ"होते.आम्ही पंचवीस तीस कार्यकर्ते या मंडळाचे क्रियाशील सभासद होतो.या मंडळातर्फे गणेशोत्सव,आंबेडकर जयंती,शिवजयंती जोशात साजरे केले जायचे.सर्व इद व क्रिसमस सुध्दा जोरात साजरे व्हायचे.त्या काळी अत्यंत गाजलेले चित्रपट आमच्या मंडळातर्फे रस्त्यावर आम्ही दाखवायचो.अर्थात या सगळ्यासाठी रहिवाशांकडून यथाशक्ती वर्गणी गोळा केली जायची.या मंडळाचा मी काही वर्षे खजिनदार होतो.अशाच एका गणेशोत्सवात आलेला हा अनुभव .....
गणेशोत्सव जवळ आला की दररोज संध्याकाळी आठ दहा कार्यकर्ते घेवून आम्ही मंडळाचे पावतीपुस्तक घेवून गल्लोगल्ली फिरायचो.कायम चांगले उपक्रम राबवत असल्याने बरेच रहिवाशी आनंदाने वर्गणी देत असत पण काही वस्ताद मंडळी आम्हाला मस्त गुंडाळत!
तर असेच आम्ही वर्गणी मागत फिरत होतो.एका घरी आम्हाला एक पन्नाशीचे गृहस्थ भेटले.
"काय नाव तुमच्या मंडळाचे ?"
"शिवाजी मंडळ "
"हा ,त्या दोन नंबरच्या गल्लीतले ना,चांगले चांगले पिक्चर दाखवता की तुम्ही.वर्गणी तर द्यायलाच पायजे !"
असे तोंडावर आमची कुणी स्तुती केली की अंगावर मुठभर मांस चढायच कार्यकर्तांच्या.आता इथे जरा बरी वर्गणी मिळणार असे वाटत होते .
"बर पोरानो कितीची पावती फाडायची?" गृहस्थ.
"एक्कावन्न ." आमच्यातल्या एकाने मोठा आकडा फोडला.आता निदान एकवीस तरी नक्की मिळणार हा हिशोब!
"हो हो चांगल काम आहे शिवाजी मंडळाचे,चला लिहा पावती."
"काका किती लिहू ?"
"किती म्हणून काय विचारता? फाडा की एक्कावणची!"
मी आनंदाने पावतीवर आकडा टाकला रू.51/-, अक्षरी रुपये एक्कावण फक्त .
"नाव काय लिहू ?"
"लिही ..सर्जेराव भगवानराव जगताप"
मी वळणदार अक्षरात नाव लिहिले .आज पहिलीच पावती मोठ्या रकमेची होती.मंडळ एकदम खुशीत!
मी रुबाबात पावती फाडली .सर्जेराव काका कडे दिली.
सर्जेरावानी पावती घेतली,त्यावरचे नाव व आकडा जोरात वाचला आणि सर्जेराव दिलखुलास हसले...
पावती परत माझ्यासमोर उलटी धरून सर्जेराव बोलले ..
"पोरा ,आता मागे लिही ...येणे !"
गणेश चथुर्थीला सकाळी यायचे आणि रोख एक्कावण घेवून जायचे,काय? पावती राहुदे माझ्याकडे! चला आता पुढच्या घरी....."
आम्हा कार्यकर्त्यांची तोंडे बघण्यासारखी झाली होती!
.......प्रल्हाद दुधाळ (9423012020)

Saturday, September 5, 2015

शिक्षकदिनाच्या निमित्ताने ......

शिक्षकदिनाच्या निमित्ताने ......
कविवर्य नामदेव ढसाळ आपल्या एका कवितेत म्हणतात ..
“ वह्या पुस्तकाची ओझी वाहिली नसती तर गावची गुरे वळली असती!”
शिकलो नसतो तर माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्याचे काय झाले असते ते सांगणारी ही ओळ आहे.जर शाळेत गेलोच नसतो तर नक्कीच गावची  गुरे वळली असती!
ही गोष्ट १९६५ च्या दरम्यानची आहे त्यावेळी आमच्या गावात “शेती शाळा परिंचे” ही  जिल्हा परिषदेची शाळा होती.शाळेचे तिसरीपर्यंतचे वर्ग शाळेच्या कौलारू इमारतीत व रामाच्या देवळात भरायचे.चौथी ते सातवीचे वर्ग मात्र गावातल्य  दोन मजली भल्यामोठ्या परांजपे वाड्यात भरायचे.विशेष म्हणजे या शाळेची शेतीही होती.
       गावातली कोणती कोणती मुले सहा वर्षाची झाल्यासारखी वाटतात यावर शाळेच्या शिक्षकांचे बारीक लक्ष असायचे.जून महिन्याच्या सुरुवातीला अशा पोरापोरींचा शोध घेऊन त्यांना पहिलीच्या वर्गात घातले जायचे.बहुतेक मुलांची जन्मतारीख शिक्षक स्वत:च ठरवायचे व रेकॉर्डवर लिहिली जायची, साधारणपणे एक जून आणि सहा वर्षापुर्वीचे साल टाकून द्यायचे! अशाच एका मोहिमेत आमचा शाळाप्रवेश झाला! 
       पहिल्या दिवशी रिकामाच शाळेत गेलो होतो. माझ्यासारखीच बरीच मुले व मुली वर्गात होती.शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसवले होते.एक खापराची पाटी आणि पेन्सीलचा तुकडा या  वस्तू मला “कुचेकरबाई” ज्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या, त्यांनी दिल्या.हातात प्रथमच पाटी पेन्सिल मिळाली होती,त्यावर इतर मुलांचे बघून रेघोट्या ओढत बसलो.कुचेकर बाईनी फळ्यावर मोठ्या अक्षरात ‘अ ‘ काढून ठेवला होता व त्या प्रत्येकाने पाटीवर तसा अ काढावा म्हणून सांगत होत्या पण वर्गात एवढा गोंधळ चालू होता की त्या काय सांगताहेत ते कळत नव्हते.माझ्या जवळ येऊन बाईनी माझ्या हातात पेन्सिल धरायला लावली  व माझा हात धरून  पाटीवर मोठा ‘अ ‘ काढला,ती माझ्या आयुष्यातली  पहिली अक्षर ओळख! बहुतेक माझा शिकायचा वेग बरा असावा,कारण लवकरच मी कुचेकर बाईंचा लाडका विद्यार्थी झालो होतो! दुसरीत गेलो आणि बाईंची बदली झाली.मग मला माझे दुसरे शिक्षक म्हणून मिळाले “वसंत गुरुजी” व ‘दीक्षित बाई”! मग तिसरी पर्यंत तेच माझे शिक्षक होते.अभ्यासाकडे त्यावेळी माझा नैसर्गिक ओढा असावा,कारण लवकरच माझे अक्षर वळणदार झाले.शिकवलेले लगेच आत्मसात केले जायचे.पाढे व सगळ्या कविताही पाठ असायच्या.चौथी ते सातवी शिकवायला आम्हाला दोन शिक्षक होते.एक होते “भुजंग गुरुजी” (भुजंगराव जाधव) व “नवले गुरुजी”.ते दोघे आळीपाळीने आम्हाला सगळे विषय शिकवायचे.पांढरे धोतर.पांढरा शर्ट व गांधी टोपी असा या दोघांचा पेहराव असायचा.या दोन्ही शिक्षकांनी माझ्यावर भरपूर मेहनत घेतली त्यामुळेच मी पी.एस.सी. परीक्षेत केंद्रात पहिला आलो.मला हायस्कूल स्कॉलरशिपही मिळाली.पुढे आठवीसाठी गावातच रयत शिक्षण संस्थेच्या  ‘कर्मवीर विद्यालयात” गेलो.त्यावेळी आठवीपासून इंग्रजी हा विषय होता.इंग्रजी शिकवायला आडनावच “विद्यासागर” असणारे शिक्षक लाभले.त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे इंग्रजीची भीती कुठच्या कुठे पळाली.आठवी ते दहावी तीन वर्षे ते माझे या विषयाचे शिक्षक होते व त्यांनी माझ्यावर घेतलेल्या मेहनतीमुळे मी इंग्रजी विषयात बोर्डात पहिल्या पाचात होतो! त्यांनी मला इंग्रजीच शिकवले असे नाही तर मराठी वाचनाची आवड लावली.नटसम्राट,अश्रूंची झाली फुले सारखी नाटके त्यांनी साभिनय म्हणून दाखवली होती.अनेक गाजलेल्या कवींच्या कविता त्यांनी अभ्यासक्रमात  नसतानाही  इंग्रजीच्या तासात शिकवल्या! माझ्यावर त्यांच्यामुळे सकस वाचनाचे व पुढे थोडेफार लिखाणाचे संस्कार झाले.याच काळात शाळेत शिकत असताना आदरणीय असे श्री ससे,अरणकल्ले,कदम,सगरे,बर्गे,पडवळ,जगताप,साळुंखे असे आपापल्या विषयातले निष्णात अत्यंत सेवाभावी शिक्षक लाभले.त्यांनी नुसतेच शिकवले नाही तर वेळोवेळी आर्थिक,मानसिक मदतही केली म्हणून आज जो काही आहे तसा मी घडलो.पुढच्या आयुष्यात शिकणे थांबेल की काय अशी परिस्थिती तयार झाली आणि निरेच्या महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक भोसलेसर देव होवून मदतीला धावले. त्यांनी फी तर माफ केलीच; पण शाळेतर्फे भाड्याने खोली घेवून दिली.'रयत' च्या शिक्षकांनी त्या संस्कारक्षम वयात जे स्वाभीमानाचे व स्वावलंबनाचे धडे दिले ते पुढे आयुष्यभरासाठी उपयोगाला येत आहेत! काँलेजात व नोकरीत अनेक प्राध्यापक व अधिकारी मार्गदर्शकाच्या भुमिकेत भेटले. आयुष्याची लढाई कशी लढायची याचे ज्ञान देणारे गुरुजन व गुरूतुल्य मित्र भेटले त्यांनी मन लावून निस्वार्थीपणे जगणे शिकवले म्हणूनच जगाचा व्यवहार  शिकू शकलो.शालेय शिक्षण चालू असताना संस्कारक्षम वयात भेटलेल्या त्या शिक्षकांचे आयुष्यात स्थान सर्वोच्च  आहेच;पण आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर मार्गदर्शक म्हणून भेटलेली सगळी माणसे म्हणजे माझे शिक्षकच की!
आजच्या या शिक्षकदिनी माझे आयुष्य घडण्यात ज्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे 'त्या' तमाम शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्रिवार वंदन!      
     ....प्रल्हाद दुधाळ. (०५ सप्टे.).

Thursday, August 13, 2015

ओळख ....एक संकट!

ओळख ....एक संकट!
कुणीतरी म्हणाले,  आपापली ओळख करून द्या .....
.....आपली ओळख आपणच करून द्यायची?.....
फारच अवघड काम असते हो ते!
आयुष्यातल्या खऱ्या खऱ्या घटना लिहायच्या, तर भीती असते आपल्याकडून कुणी दुखावले तर जाणार नाही ना?समाजातल्या आपल्या आजच्या प्रतिमेला व प्रतिष्ठेला धक्का तर लागणार नाही ना?
स्वत: भोगलेलं सगळ अगदी खर खर काही सांगाव,तर सगळेजण म्हणतील लागला भरल्यापोटी रडायला!
मी काय काय केलं, हे सांगावं तर म्हणतील, लागला स्वत:ची टिमकी वाजवायला!
उत्साहाने स्वत:चे कर्तूत्व सांगाव तर आरोप होउ शकतो उगीच बढाया मारतोय अशी!
 ....त्यामुळे मी जर मला कुणी स्वत:ची ओळख करून द्या, म्हटलं की खूप बुजतो!
तशी जर वेळच आली तर नाव,गाव,व्यवसाय,छंद सांगून थोडक्यात उरकतो!
.......पण, तरीही कधीतरी वाटत रहाते, आपण आज जसे आहोत,जसे दिसतो किंवा ज्या सामाजिक वा आर्थिक परिस्थितीत वावरतो किंवा असल्याचे भासवतो तीच आजूबाजूला आपली ओळख असते,जे दिसते तसेच होते आणि आहे तसेच आपण समाजाला माहीत असतो.पण ती ओळख निर्माण होण्यासाठी केलेल्या प्रवासाचे काय? हा प्रवास माझ्यासाठी तरी खूप मोठा व खूप महत्वाचा आहे! माझ्या या प्रवासातल्या टप्प्यांशी कुणाला काही देणे घेणे असायचे कारण नाही! बाहेरून माझ्याकडे  त्रयस्थ्य म्हणून  बघणाऱ्या माणसाला मी जेथे आहे,जसा आहे तो  पल्ला अगदीच किरकोळीतला वाटू शकतो!, त्यामुळे मला असे वाटते की, एखाद्या माणसाच्या कर्तुत्वाचे मूल्यमापन करताना तो सध्या ज्या ठिकाणी आहे त्यावरून न करता, त्याने आयुष्याची सुरवात कोठून केली याची व त्याच्या आताच्या स्थितीत येईपर्यंतच्या त्याने केलेल्या प्रवासाचेही मूल्यमापनही  महत्वाचे आहे. सर्वसाधारणपणे असे दिसते की लोक आजच्या देखाव्याला आणि दिखाव्यालाच खूप  महत्व देतात, शिवाय कुणालाच आपल्या गतइतिहासात डोकावायला तसे आवडत नाहीच! असो.
  खरच,काय ओळख आहे माझी? भारत सरकारच्या एका कंपनीत मी उपविभागीय अभियंता आहे, एक कुटुंब वत्सल माणूस म्हणून लोक मला ओळखतात,कविता लेख लिहितो,कथा लिहितो म्हणून फेसबुकवरील मित्र व ओळखणारे  एक धडपडणारा साहित्यिक माणूस म्हणून मला थोडेफार ओळखतात,रहाण्याच्या ठिकाणी व समाजात एक मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंब, ज्याचे सगळे सदस्य पगारदार आहेत व त्यामुळे त्यांना काय कमी असणार? अशीही ओळख आहे!
   पण माझी ही ओळख ही वरवरची आहे असे वाटते एका अल्पभूधारक निरीक्षर कुटुंबात परिंचे नावाच्या छोट्या खेड्यात  जन्मलेला मी! सहा भावंडातले शेंडेफळ.शेवटच्या बहीणीचे लग्नही मी चौथी पाचवीत असतानाच झाले होते व त्यापायी सगळी होती नव्हती ती शेती सावकाराकडे  गहाण पडलेली होती.हातातोंडाची गाठ पडणेही अवघड होते.खायचे म्हणाल तर बालपणी हुलग्याच माडगे,राशनच्या लाल गव्हाची रोटी, लाल मिलोची भाकरी,दुष्काळी कामावरची सुकडी, अशी एकेक ऐश होती! त्यातच आठवीत असतानाच पितृछत्र हरपले. दोन विवाहित बंधू पुण्यामुंबईत किरकोळ नोकरीत होते,पण त्यांचाच आपल्या अस्तित्वाचा लढा चालू होता! आपापल्या संसाराचे गाडे ढकलण्यातच त्यांची कमाई संपायची,त्यामुळे माझी आई मोलमजुरी करून, भाजीपाला विकून  मला वाढवत होती.सर्वात महत्वाचे म्हणजे शिकायला प्रोत्साहन देत होती.गरीबीतही अभिमानाने व वास्तवात राहून जगता येते हे शिकवत होती! सातवीत पी.एस.सी. परीक्षेत केंद्रात पहिला आलो.पहिली ते दहावी कायम प्रथम क्रमांकाने उतीर्ण होत होतो, त्यामुळे शिक्षक लोकांचा मी कायमच आवडता व शाळेचा आदर्श विद्यार्थी होतो असे माझे बालपण होते! हायस्कूलमध्ये स्कॉलरशिप मिळायची,नादारीची सवलत होती, यामुळे शिकायला मिळाले.वेळोवेळी व आत्यंतिक गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी ओळखीची,बिनओळखीची माणसे व शिक्षक देवाने  पाठवल्यासारखी आपण होवून होवून मदतीला धावली  म्हणून उच्चमाध्यमिकपर्यंत शिकू शकलो.पुढे कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना मिळालेली पहिली सरकारी नोकरी पकडली.पुणे टेलिफोन्स मधे टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी करता करता पदवीही मिळवली .त्या काळात झोपडपट्टीत रहात होतो.स्वत:च्या  हाताने स्वयंपाक  करून खात होतो.एक भाकरी व बेसनाची पोळी हाच दररोजचा मेनू असायचा.त्या वस्तीत आमचे एक सार्वजनिक गणपती मंडळ होते.तेथे अनेक चांगले मित्र भेटले तसेच स्वत: व्यसनी,जुगारी,गुन्हेगारी वृत्ती असलेले पण मनाने अत्यंत श्रीमंत असलेले  मित्रही भेटले.प्रत्येक मित्रातल्या फक्त  चांगुलपणाशी  मैत्री केली.अख्खे आयुष्य बिघडवू  शकत  होते असे  काही  मोहाचे क्षणही  समोर आले,पण परमेश्वर कृपेने त्या  वाटा टाळत गेलो. नोकरीच्या ठिकाणी खात्याअंतर्गत प्रमोशनच्या काही संधी उपलब्ध होत्या.मी परीक्षा देवून फोन इन्स्पेक्टर झालो.पुढे जुनिअर टेलिकॉम ऑफिसर या पदावर बढती मिळवली.नंतर आजच्या उपअभियंता पदापर्यंत पोहचलो.माझी नोकरी जास्त करून  ग्राहकसेवा क्षेत्रातली होती.त्या काळी सात सात वर्षे टेलिफोन ची प्रतीक्षा यादी असायची.माझ्या सेक्शन मधील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा कशी मिळेल असा माझा कटाक्ष असायचा.मी एक सरकारी सेवक आहे आणि लोकांना चांगली व तत्पर सेवा देण्यासाठी माझी नेमणूक झालेली आहे याचे भान ठेवून मी लोकांना सेवा देत आलो.पुण्यातील विविध भागात काम करत असताना अनेक टेलिफोन ग्राहकांशी कायमची मैत्री झाली.ग्राहक सेवा केंद्रात काम करताना  नोकरीतले अतीव समाधान  मिळवले.एक कार्यक्षम अधिकारी म्हणून समोर आपली कामे व अडचणी घेवून येणारे ग्राहक, वरचे अधिकारी तसेच हाताखालच्या स्टाफमधे जो मान सन्मान मिळाला तो खूप समाधान देवून जातो.नोकरी बरोबरच कामगार चळवळीत क्रियाशील होतो.अधिकारी संघटनेचा पदाधीकारी म्हणूनही काम केले.नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात ऑफिसच्या एकांकिका स्पर्धेतील एकांकिकेत छोट्या मोठ्या भूमिका केल्या.लहानपणापासून  असलेली  लेखन व वाचनाची आवडही  जोपासत राहिलो.खूप वाचतो तसेच  काहीबाही लिहित रहातो.आत्तापर्यंत दोन कवितासंग्रह व वीसेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.काही कथाही लिहिल्या आहेत.गद्य,पद्य व चारोळ्यांसाठी प्रत्येकी एक ब्लॉग,असे तीन ब्लॉग लिहितो.भविष्यातही लेखन करायचा संकल्प आहे. स्व-प्रगती साधतानाच एकत्र कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या व निभावल्या. मला  माझ्या आयुष्यात जे मिळू शकले नाही ते ते  सगळे माझ्या मुलाला देण्याचा प्रयत्न केला.समाजात हात कायम यथाशक्ती  'देता' ठेवला.
       सध्या माझा मुलगा सौफ्टवेअर इंजिनीअर आहे, तर सून होमिओपथिक डॉक्टर आहे.एक सुखी कुटुंबाचा कर्ता पुरूष म्हणून समाजात नाव  मिळाले आहे.या सर्व प्रवासात मला माझ्या पत्नीचे प्रचंड सहकार्य होते.स्वत: नोकरी करत  असतानाच माझ्या प्रत्येक निर्णयात,यशात तिने  मोलाची साथ दिली म्हणूनच मी हे दिवस पाहू शकलो.मला  जे काही  चांगले करावेसे वाटले ते करत आलो आहे.जेथे वाढलो ,शिकलो, ज्या समाजाने  पडत्या काळात मदत केली, त्या समाजाचे  मी  काहीतरी देणे लागतो याची जाणीव आहे, या जाणीवेतून मी ज्या  शाळेत शिकलो त्या शाळेला  दरवर्षी काहीतरी यथाशक्ती मदत करत असतो.आयुष्यात आजपर्यंत  खूप माणसे जोडली आहेत आणि अजूनही जोडतो आहे.खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव आहे. यासाठी आवश्यक ती उर्जा  व  बळ त्या निर्मिकाने मला देत  राहावे हीच प्रार्थना करत असतो.
माझ्याच एका कवितेत  माझ्याबद्दल सांगायचे तर ......   
काही असे काही तसे, जगलो असे जमले जसे!
लाचार कधी झालो नाही, स्व कधी विकला नाही,
हात कधी पसरला नाही, पडले मनासारखे फासे!
जगलो असे जमले जसे!
गरीबीची लाज नाही, ऐश्वर्याचा माज नाही,
सरळ मार्ग सोडला नाही, टाकले नाही घेतले वसे.
जगलो असे जमले जसे!
हवेत इमले बांधले नाही, मॄगजळामागे धावलो नाही,
शब्दात कधी सापडलो नाही, झाले नाही कधीच हसे!
जगलो असे जमले जसे!
भावनेत कधी वाहीलो नाही, वास्तवाला सोडले नाही,
 विवेकाला तोडले नाही, वागावे लागले जशास तसे!
जगलो असे जमले जसे!
वावगा कधी हट्ट नाही, तड्जोडीला ना नाही,
रक्त उगा आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे!
जगलो असे जमले जसे!
      ......प्रल्हाद दुधाळ.


  

Sunday, August 2, 2015

अतरंगी मित्र.

अतरंगी मित्र ....
  आज फ्रेंडशीप डे आहे .पाश्चात्य देशातील आपण अंगीकार केलेल्या अनेक पध्दतीत मला हे वेगवेगळे डेज साजरे करण्याची पध्दत आवडते.फादर्स डे,मदर्स डे ,डॉटर्स डे ,व्हॅलेंटाईन डे,इत्यादि इत्यादि....तर आज फ्रेंडशीप डे! ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशीप किंवा आपल्या भाषेत मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो.वाढत्या जागतिकरणात आता  ही वेगवेगळे डे साजरे करण्याची पध्दत आपल्याही अंगवळणी पडली आहे.असो,तर या आजच्या मैत्रीदिनाच्या सर्व मित्र व मैत्रिणीना मनापासुन शुभेच्छा!
    या निमित्ताने मला माझ्या एका अतरंगी इब्लिस मित्रांची आठवण झाली.एका एका मित्रावर एक एक लेख लिहिता येईल पण थोडक्या शब्दात मी या माझ्या मित्राने व त्याच्याबरोबर खेळत असलेल्या आम्हा सवंगड्यानी  केलेला आचरटपणा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.यातील सर्व पात्रे काल्पनिक असून कोणत्याही जीवंत वा मृत व्यक्तीच्या स्वभावाशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा!
     वय वर्ष पाच ,अजून शाळेत घातले नव्हते त्यामुळे केवळ हुंदाडणे चालू असायचे.साधारणपणे माझ्या वयाचे पाच सहा तरी सवंगडी बरोबर असतील.पालक आम्हाला चार घास खायला घालून खेळायला पिटाळायचे व घराला कुलूप घालून शेतात कामाला जायचे.मग आमचेच राज्य! जसा मूड फिरेल तसा खेळ खेळला जायचा.चिखलात लोळणे व्हायचे.नदीतली आंघोळ व्हायची,चिंचा बोरांच्या झाडावर दगड मारायचे,वाळायला घातलेल्या शेंगा खायच्या.मारामारी करायची .कट्टी फू व्हायची,घडीत सर्वजण पुन्हा  एकत्र!असे एक एक उद्योग चालायचे !
     तर एक दिवस आमची ही बालगॅंग उसाच्या चघाळाच्या ढिगावर खेळत होती.खेळता खेळता आम्ही त्या ढिगात बरेच आत गेलो होतो.आमच्या गॅंगमधे एक बिलिंदर बाळ होते.वयाच्या मानाने त्याची बुध्दी जरा जास्तच काम करायची! तर या हुषार बाळाला खेळता खेळता एक भला मोठा रबरी लाल रंगाचा एक मोठ्ठा फुगा चघाळाच्या ढिगात दिसला.त्याने ढकलत ढकलत तो फुगा थोड्या सपाट भागात आणला .बाकीची बाळेही त्याला मदत करायला लागली .त्या फुग्यावर बसून आम्ही घोडा घोडा खेळायला लागलो.खुप मजा येत होती.बाकी सगळे खेळत होतो पण आमच्यातले ते हुषार बाळ मात्र जवळच्या गोठ्यात गेले होते.तेथून त्याने एक खिळा व एक दांडा तुटलेला एक  कप आणला.एक मोठा दगडही आणला.आम्ही सगळेजण बुचकळ्यात पडलो होतो.त्याने सगळ्याना बाजूला ढकलले व फुग्याचा ताबा घेतला. खिळा फुग्यावर ठेवून तो दगडाने खिळ्यावर मारू लागला.त्याला फुगा घट्ट धरून बाकीची बाळेही मदत करू लागली.बराच वेळ प्रयत्न केल्यावर त्या फुग्याला एक बारीक छिद्र पडले आणि त्यातून पाण्यासारखे काहीतरी पडू लागले.आता हुषार बाळाला अजूनच चेव आला.तो त्या फुग्यावर बसून फुग्यावर दाब देवू लागला.दाबले की फुग्याच्या  छिद्रातुन  तो द्रव पदार्थाची धार बाहेर पडायची हे आमचे बाळ त्या धारेत कप धरायचे व थोडा द्रव कपात आला की तो ते प्यायचा.आम्ही सगळे स्तब्ध होवून या बाळाचे चाळे बावळटासारखे बघत होतो.तो हसत खिदळत थोडे थोडे पाणी पित राहीला.बाकीची बाळेही चेकाळली व धारेची चव घेवून बघू लागली.माझ्याकडे कप आला तेंव्हा त्याच्या उग्र वासावरून ही दारू की काय म्हणतात ते असावे अशी शंका आली.मला तो वास चांगला वाटला नाही त्यामुळे कप परत दिला.आता आमच्या त्या हुषार बाळाने फुगा जोरात दाबून कारंजे उडवले सर्वांचे कपडे ओले केले बराच वेळ हा खेळ चालू राहीला.फुगा रिकामा झाला होता."ए कार्ट्यानो काय दंगा चाललाय?" कुणीतरी ओरडले आणि मी लांब धुम ठोकली!
    थोड्या वेळाने हुषार बाळाचा जोराजोरात भोकाड पसरल्याचा आवाज यायला लागला.बहूतेक त्याची आई त्याला झोडपत होती!
    थोडे मोठे झाल्यावर जे समजले ते असे होते. त्या हुषार बाळाच्या शेतावर सालाने कामाला असलेला एक कामगार फावल्या वेळात दारू गाळायचा व फुगे भरून असे कुठे कुठे लपवायचा.त्यातलाच एक आम्हाला सापडला होता आणि आमच्या सवंगड्यांची त्यावर झोकात पार्टी झाली होती! हा माझा बालमित्र सहावी पर्यंतच शिकू शकला.मधल्या काळात अस्सल दारूडा म्हणून बदनाम होता.आता तो व्यसनमुक्त झाला आहे!
(काल्पनिक)
                               ......प्रल्हाद दुधाळ.

Friday, July 31, 2015

गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने....

गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने ...
आज गुरुपोर्णिमा,आपल्या गुरूंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस! आपल्या आयुष्यात अनेक गुरूतुल्य व्यक्ती येतात, कळत नकळत चांगले संस्कार करत रहातात.मी जेंव्हा या निमित्ताने माझ्या आयुष्याचा विचार करतो तेंव्हा लक्षात येते, अरे मी आज जो काही आहे तसा घडण्यामधे माझ्या आईवडिलांचा व शिक्षकांचा वाटा तर नक्कीच आहे,पण या माझ्या गुरूंबरोबरच असे अनेक लोक आहेत त्यानी मला जगणे शिकवले.वडीलांचा सहवास फार नाही लाभला,पण जो काही तेरा चौदा वयापर्यंत लाभला त्या सहवासात मी खूप काही शिकलो . मी प्रत्येक क्षणी डोके थंड ठेवून निर्णय घायला शिकलो,घाई घाईने, रागात असताना वा खुप आनंदात असताना घेतलेले निर्णय हे बहुतांशी  भावनेच्या भरातले असतात आणि त्याचा पुढे आयुष्यात त्रासच होवू शकतो, हे फार कमी वयातच मी शिकलेलो होतो.आई बद्द्ल काय बोलू ?आपल्याला  जीवनात जर काही चांगले घडवायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही.समोर उभ्या राहिलेल्या जटील समस्येला कुणीतरी आयते उत्तर देईल यावर तिचा मुळीच भरवसा नव्हता ! आपला मार्ग आपण स्वत: शोधायचा, आलेला प्रत्येक दिवस नवा म्हणुन जगायचा,आत्मसन्मान विकून मिळालेले सोनेही  मातीमोलाचे असते.अशी अमुल्य शिकवण अगदी लहान वयातच मिळाल्यामुळे कायम वास्तवात जगायची सवय लागली.आलेला दिवस साजरा करून आनंदात कसे रहायचे हे मी आईकडून शिकलो.आई आणि वडिलांशिवाय आजूबाजूचे भाऊबंद नवे नवे संस्कार करत राहिले .भाऊबंदकी मधील भांडणातुनही मला सदेश मिळाला -असे वागणे बरे नाही! शाळेत अक्षर ओळख झालीच पण आमची शाळा ही शेती शाळा असल्यामुळे शेतातली खुरपणी, काढणी सारखी कामे करायला मिळाली.लिहावाचायला शिकलो तसा अवांतर वाचनाचीही आवड तयार झाली.हाती येईल ते, अगदी त्या वयात जे वाचू नये, तेही वाचले गेले पण त्यामुळे चांगल्या वाईटातला फरक कळण्याइतपत जाणीवा समृध्द होत गेल्या .मी येथे कुणाचे  नाव घेणे प्रशस्त होणार नाही, पण असेही गुरूजी मला लाभले जे वर्ग चालू असताना दारू प्यायचे! पण अशा लोकांकडूनही मला कसे वागू नये याचे संस्कार मिळाले.शाळेत वर्गात चांगली मुले होतीच त्यांच्याकडून चांगले शिकलोच, पण वर्गात अशीही मुले होती जी तंबाखू खात,गांजा ओढत,जुगार खेळत, एवढेच काय दारूसुध्दा पीत असत.त्यांच्या सोबत राहून शालेय अभ्यासात प्रथम क्रमांकाने पास होत राहीलो.  व्यसने माणसाचा विनाश करू शकतात, त्यांच्या वाट्याला आयुष्यात कधीच जायचे नाही, याची खुणगाठ त्या अर्धवट वयातच बांधली गेली.त्या व्यसनांची चव आपणही अजमावून पहावी हा मोह मात्र कधीच झाला नाही! याचे श्रेय अर्थातच अशी बुध्दी देणार्या त्या निर्मिकाचे! चोरी करू नये ,खोटे बोलू नये ,वाईट सवयी च्या वाटेला जावू नये,स्वत:चे काम स्वत: करावे,आयुष्यात फुकट मिळालेली कोणतीच गोष्ट समाधान देवू शकत नाही,अशा अनेक चांगल्या गोष्टी तो निर्मिक मला सतत शिकवत होता. अनुभवातुन शहाणपणाचे संस्कार होत होते.वयाच्या सोळाव्या वर्षी मी शिक्षणासाठी घराबाहेर पडलो, एकटा राहीलो पण पुस्तकांच्या रूपाने मला एक गुरू, एक सच्चा मित्र  भेटत राहीला आणि या वाचन संस्काराने मला आयुष्यात कधीच  वाकडे पावूल टाकू दिले नाही.हायस्कुल जीवनात व उच्च माध्यमिक शिक्षणा पर्यंत रयत शिक्षण संस्थ्येच्या शाळेत शिकलो.स्वावलंबी शिक्षण हे ब्रीद असलेल्या या संस्थ्येने स्वाभिमान जागा ठेवून व कष्ट करून जगायला शिकविले.रयतच्या सेवाभावी गुरुजनांचे माझ्या आयुष्यात अढळ स्थान आहे!पुढे कॉलेजला पुण्यात आलो.आबासाहेब गरवारे कॉलेजमधे शिकत असताना पुणेरी संस्कार आपोआप झाले.आधी ग्रामीण शिवराळ भाषा तोंडात असायची, ती जावून जाणीवपुर्वक चांगल्या पुणेरी मराठी भाषेत बोलू लागलो.वाचनाच्या कक्षा रुंदावल्या.कविता लिहिण्याचे सातत्य वाढले.जरी मी गरवारे कॉलेज मधे शिकत होतो, पण रहात होतो येरवड्यातील नागपूर चाळ या वसाहतीत! झोपडपट्टीचे जीवन जवळून अनुभवले. इथे अनेक प्रकारचे मित्र जोडले गेले.या मित्रांत सिनेमा तिकिटाचा काळाबाजार करणारे होते ,बिगारी काम करणारे होते ,रिक्षा चालवणारे होते तसेच काहीच कामधंदा नसलेले व  स्वयंघोषित छोटे मोठे 'दादा'ही होते.व्यवसाय काहीही असो,मनाने अत्यंत श्रीमंत असलेले हे मित्र माणुस कसा असावा आणि तो कसा नसावा याचे संस्कार करत राहिले.त्यांच्यातले चांगले गुण घेत राहिलो  हेसुध्दा माझे गुरूच होते  की !पुढे नोकरी करताना अनेक अधिकारी भेटले, खुप काही शिकवून गेले. चांगला कर्मचारी व चांगला अधिकारी कसा असावा,हाताखालच्या कर्मचार्यांकडून काम करून घेत असतानाच माणुसकीची जोपासनाही कशी होवू शकते! ग्राहकसेवेचे महत्व व समाधान देणारी सेवा दिल्यानंतर मिळणारे समाधान,इत्यादी बाबी कुणाकुणाकडून शिकत राहीलो,अजुनही शिकतो आहे.
   आतापर्यंतच्या जीवनात एक गोष्ट नक्कीच समजली की अवतीभवती असणारा प्रत्येक माणुस हा आपला गुरूच असतो.प्रत्येक माणसात गुणदोष हे असतातच! प्रत्येकात असणारे चांगले गुण आत्मसात करायचे असतात तर दुर्गूणाचे निरिक्षण करून आपल्यात तर असे दोष नाहीत ना याचे आत्मपरिक्षण करायचे असते.असलेच काही तसे दोष तर ते दूर करून प्रगती साधायची असते!
    माझ्या आयुष्यातील अशा सर्व ज्ञात अज्ञात गुरूजनाना आजच्या गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने साष्टांग दंडवत!
                      .....प्रल्हाद दुधाळ (31 जूलै 2015 )

Wednesday, July 29, 2015

आठवणीतला बेंदूर

आठवणीतला बेंदूर
  आज गावाकडे बेंदूर साजरा होतोय अशी बातमी वाचली.आणि बेंदूर या सणाबद्दल लिहावेसे वाटले. आपल्या शेतात वर्षभर राब राब राबणाऱ्या बैलांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा सण साजरा केला जात असावा.काही ठिकाणी तो बैलपोळा म्हणून श्रावण अमावास्या  या दिवशी तर काही ठिकाणी भाद्रपद अमावास्येला साजरा केला जातो.कालौघात आता शेतीच्या कामांचे यांत्रिकीकरण झाले आहे आणि बैलांचे महत्वही ,पण एक काळ  असा होता की शेती पूर्णपणे बैलांवर अवलंबून होती. मोटेला बैल जुंपून शेताला पाणी दिले जायचे.नांगरणी,पेरणी,कोळपणी इत्यादी कामे बैलाकडून करून घेतली जायचीच पण त्या काळी  बैलगाडी वा छकडा हे वहातुकीचे महत्वाचे साधन होते.थोडीफार शेती असलेल्या शेतकऱ्याच्या दावणीला खिलारी बैलजोडी हमखास असायची! अजूनही काही शेतकरी बैल पाळतात. माझ्या लहानपणी गावात बेंदूर अगदी धुमधडाक्यात साजरा व्हायचा. तो थोडाफार आठवणीत असलेला बेंदूर आजच्या दिवशी आठवला त्याची ही उजळणी .......
      आषाढ महिन्यात पावसाची संततधार चालू असायची.शेतात उगवलेल्या पिकाने  हळूहळू बाळसे धरायला सुरवात केलेली असे.डोंगरदऱ्या,शेते व माळराने हिरव्या रंगात न्हालेली असत.नदीनाल्यांना पूर आलेला असायचा आणि मग बेंदूर सणाची चाहूल लागायची. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आणि या मित्रासाठी बेंदराच्या निमित्ताने बाजारातून बेगडाचा कागद,फुगे,रंगीत गोंडे,जलरंग व ऐटबाज झुलीची खरेदी व्हायची.लहान मुले कुंभारवाड्यातून मातीचे खिलारे  बैल घेवून त्यांना सजवत असत.बेंदराच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा बेत असायचा. शेतकरी पहाटे उठून बैलाच्या खांद्याला तेल/तूप व हळद लावून मालिश करत त्याला प्रमाणे न्हावू घालत.बैलाच्या अंगावर वेगवेगळे रंगीत छाप उठवले जायचे.शिंगाना हिंगुळ लावून ती रंगवली जायची. मग शिंगांना रंगीत बेगड, गोंडे व फुगे लावून दिमाखात सजवले जायचे.पाठीवर रंगीत कलाकुसर व आरसे असलेल्या झुली टाकल्या जायच्या. प्रत्येकजण आपला बैल मिरवणुकीत चांगला दिसायला हवा म्हणून प्रयत्न करत असे.ठरलेल्या वेळी सगळे शेतकरी आपल्या बैलजोड्या घेवून मिरवणुकीला येत. वाजंत्री, ढोलताशाचा गजर होवून मिरवणूक सुरू व्हायची. कधी कधी मिरवणुकीत कुणाची बैलजोडी पहिली उभी रहाणार यावरून वादही  व्हायचे.एखाद्या वर्षी अगदी मारामाऱ्या सुध्दा व्हायच्या.जाणकार प्रतिष्ठीत लोक अशावेळी मध्यस्ती करून भांडणे मिटवत व मिरवणूक सुरू होत असे. प्रथम वाजंत्री मग ढोलताशा, लेझीमपथक, गावाच्या मुख्य रस्त्याने धुमधडाक्यात ही मिरवणूक निघायची.उखळी दारूचे आवाज घुमायचे,फटाक्यांच्या माळा पेटवल्या जायच्या.मिरवणुकीतील बैल अशा आवाजांना बुजायाचे आणि मालकांना आपले बैल सांभाळणे मुश्कील होवून जायचे.आख्खे गाव ही मिरवणूक बघायला रस्त्याच्या दुतर्फा उभे असायचे.मुले नाचायची, सर्वजण मिरवणुकीची मजा लुटायचे.
      दीडदोन तास ही मिरवणूक चालायची ग्रामदेवतेचे दर्शन घेवून मिरवणुकीची सांगता व्हायची. बैलजोडी घरी येताच बैलांच्या पायावर पाणी घातले जायचे.घरातील महिला बैलांना पंचारतीने ओवाळत त्यांना पुरणपोळी खायला घालत व मग घरात सर्वजण पुरणपोळीचा आरामात आस्वाद घेत असत.तर अशा प्रकारे बळीराजा आपल्या मित्राची बैलाची वर्षातल्या बेंदराच्या  सणाला कृतज्ञतापुर्वक पूजा करत असे.अजूनही बेंदूर साजरा होतो पण आता बैलजोडी पाळणारे शेतकरी कमी झालेत!पण आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योजलेल्या या सणाला तोड नाही!

                                          .....प्रल्हाद दुधाळ.(२९ जुलै  २०१५)      

Monday, July 27, 2015

विठ्ठल भेट.

विठ्ठल भेट.
 मी पूजाअर्चा वा कर्मकांडात फार कधी रमलो नाही,पण मी नास्तिकही नाही!परमेश्वर नावाची एक महाशक्ती अस्तित्वात आहे आणि आपल्या अस्तित्वाची चुणूक वरचेवर आपल्या जीवनात तो दाखवत असतो.आपल्याला तो भेटतही असतो असे मला विश्वासपूर्वक वाटते.
   आपण नक्की विचाराल मग तुला भेटला का कधी हा परमेश्वर? तर याचे उत्तर आहे-हो!
मला अनेकवेळा तो पांडुरंग भेटला आहे! कधी तो समोर आला आहे,तर कधी अदृश्यपणे माझ्या मागे समर्थपणे उभा राहून त्याने मार्ग दाखवला आहे.बहुतेक वेळा तो समोर येऊनही मी त्याला तसे ओळखले नाही, पण त्या त्या प्रसंगाचा जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा जाणवते, ‘अरे मला तो नक्की भेटून गेला,मार्ग दाखवून गेला,मदत करून गेला,आनंद व समाधान देवून गेला,पण मला त्या क्षणी त्याला नाही ओळखता आले!
.......हो,......तो सावळा विठ्ठल मला अनेकदा भेटून गेला,....अजूनही भेटतो क्षणोक्षणी.....
....कधी तो दोन दिवसाचा उपाशी असताना भाकरीच्या रुपात येवून भूक भागवून गेला,आर्थिक अडचणीच्या वेळी उधारी-पाधारीची सोय करून गेला.पालनपोषण करायला आई,बहीण,भावंडे,विविध नातेवाईकांच्या रूपात भेटला.....
मला शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कर्मवीर विद्यालय परिंचे,मालोजीराजे विद्यालय लोणंद तसेच महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय नीरा या माझ्या शाळांच्या रूपाने भेटला,हायस्कूल स्कॉलरशिपरूपी मदत,कधी एखादे आदर्श विद्यार्थी सारखे बक्षीसही देउन गेला.
प्रसंगी आपल्या पगारातून माझी फी भरणाऱ्या पडवळ सरांच्या रूपाने,व जीव तोडून शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांच्या रूपाने भेटला.
वेळोवेळी शहाणपण व हुशारी देवून चांगल्या वाईटातला फरक करू शकणाऱ्या विवेकरूपाने भेटला.
.....हो ......मला विठ्ठल नक्कीच भेटला!.......
कधी भाकरी होवून,नोकरी होवून,मित्र होवून,संधी होवून,अनुभव देवून या ना त्या रूपाने तो भेटतच असतो....
मी त्याला हात जोडो अथवा ना जोडो, त्याचा हात कायमच डोक्यावर ..आशीर्वाद देण्यासाठी!....
संकटसमयी तो दाखवतो मार्ग....संधी देवून सिद्ध करायला लावतो- कर्तुत्व......
मार्ग दाखवतो,कधी कधी परीक्षाही घेतो, हरायला लागलो तर..... आधारही देतो तो!.....
पावलापावलावर तो भेटतच रहातो .....मार्गदर्शन करत रहातो .....
आजूबाजूला त्याचे आस्तित्व आहे, या जबरदस्त विश्वासावर मी चालत रहातो....आत्मविश्वासाने.....
त्या अदृश्य भगवंताचा मी कायमच आहे कृतज्ञ!......
.....पहा आत्ताही तो आहे माझ्याबरोबर .....तुमच्या रूपाने !........
          ......प्रल्हाद दुधाळ.( २७/०७/२०१५ आषाढी एकादशी.)                         




Saturday, July 25, 2015

पोपटमामा.

     पोपटमामा.
परवा खूप दिवसांनी गावाला गेलो होतो.थोडा निवांतपणा असला की मी गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अगदी विनाकारण चक्कर मारतो.अगदी मारुतीच्या देवळापासून ते सरकारी दवाखाण्यापर्यंत हा फेरफटका असतो.मला आवडते असे करायला.रस्त्याने चालत असताना पावलोपावली बालपणीची एक एक आठवण येते,बालपणीच्या आठवणीत रमत गमत फिरणं खूपच आनंददायक असतं!
तर त्या दिवशीही असाच रमत गमत चाललो होतो.आजूबाजूला काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे दिसत होते. आपल्याच गावात आता आपल्याला न ओळखणारे खुपजण आहेत हे प्रकर्षाने जाणवले.अचानक समोर एक ओळखीचा चेहरा दिसला.मला पहाताच त्याच्या चेहऱ्यावर दिलखुलास हास्य पसरले.आमच्या शाळेचा सेवानिवृत्त शिपाई होता तो!पांढरा मळकट पायजमा,फिक्कट निळा सदरा, डोक्यावर टोपी असा पेहराव! आम्ही त्याला पोपटमामा म्हणायचो.
“नमस्कार,कधी आलायस?”
“नमस्कार नमस्कार मामा,आजच आलोय, कसं चाललंय मामा?”
“ठीक आहे.आता रिटायर होवून पाच वर्षे झाली बघ.थोरल्याच लग्न केलं यंदा.धाकटासुध्दा लागलाय कामाला!” “तूझ कसं काय, ठीक ना?”
त्याने आपुलकीने विचारले.मी मात्र भूतकाळात अगदी शालेय जीवनात हरवलो ....
मी आठवीत हायस्कूलमधे प्रवेश घेतला होता.एकोणीसशे चौऱ्याहत्तर साल होते ते. तोपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं त्यामुळे हायस्कूलचा खाकी पांढरा युनिफॉर्म व इनशर्ट हे सगळ अगदीच नवीन होत आमच्यासाठी! त्यात शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड नावाचे सर होते ते खूपच कडक होते.सहा फूट उंच व धिप्पाड! लांब लांब मिशा व कानावर तसेच लांब लांब केस! हातात वेताची काठी घेवून हे सर सकाळी पावणेसातला हायस्कूलच्या गेटवर उभे राहायचे.सात वाजून अगदी एक मिनिट उशीर झाला तरी विद्यार्थ्यांना सर गेटच्या बाहेर उभे करायचे.साधारण सव्वा सात वाजेपर्यंत असे वीस पंचवीस विद्यार्थी तरी सापडायचे! मग हे सर त्यांना ओळीत उभे करून वेताच्या काठीने पायांवर फटके मारायचे. अगदी त्यांचे हात दुखेपर्यंत सपासप काठी मारत राहायचे! अगदी दररोज असा मार खाण्याचा कार्यक्रम असायचा शाळेचा शिपाई असलेल्या पोपटमामाला हे सगळे असह्य व्हायचे पण सरांसमोर बोलायची त्याचीच काय कुणाचीही हिंम्मत नव्हती. इत्तर शिक्षकानाही मुलांना असे गुरांसारखे मारणे आवडत नव्हते पण सांगायचे कसे,म्हणून तेही गप्प बसत.काही तरी करून मुलांना अशा दररोज पडणाऱ्या मारापासून वाचवायला हवे असे या पोपटमामाला अगदी मनापासून वाटत होते.मग त्याने या गोष्टीचा थोडा अभ्यास केला.बरीच मुले शाळेची घंटा वाजली की घरातून निघत अगदी धावत पळत शाळेत पोहचत,पण जे विद्यार्थी वेळेत पोहोचू शकत नसत ते नेमके सरांच्या तावडीत सापडायचे व भरपूर मार खायचे,जास्त करून थंडीच्या सिझनला जेंव्हा दिवस उशीरा उगवतो तेंव्हा अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढते हे मामाच्या लक्षात आले .मग त्याने यावर एक उपाय शोधला.
सकाळी सातच्या शाळेची घंटा पावणेसातलाच वाजायला लागली. पावणे सात ते सात अशी पंधरा मिनिटे हे मामा घंटा वाजवत रहायला लागले.गावातील अगदी शेवटच्या आळीतली मुलेही बेल सुरू झाल्याबरोबर पळत निघाली तर सात वाजायच्या आत शाळेत पोहोचू लागली.याचे चांगले परिणाम दिसायला लागले. मार खाव्या लागणाऱ्या मुलांच्या संखेत लक्षणीय घट झाली.अर्थात यासाठी पोपटमामाचे सर्वानी कौतुकच केले.....
“ अरे कसला विचार चाललाय?” मामाच्या प्रश्नाने मी भानावर आलो. “काही नाही मामा!” मी हसलो.
“चल, शेतात जायचंय, भेटत जा,असाच आला की” ...मामाने माझा निरोप घेतला.
मी पुढे चालायला लागलो.बालपणीच्या आठवणीना उजाळा देत देत एक एक पाउल पडत होते.....
. ........प्रल्हाद दुधाळ.