Friday, July 31, 2015

गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने....

गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने ...
आज गुरुपोर्णिमा,आपल्या गुरूंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस! आपल्या आयुष्यात अनेक गुरूतुल्य व्यक्ती येतात, कळत नकळत चांगले संस्कार करत रहातात.मी जेंव्हा या निमित्ताने माझ्या आयुष्याचा विचार करतो तेंव्हा लक्षात येते, अरे मी आज जो काही आहे तसा घडण्यामधे माझ्या आईवडिलांचा व शिक्षकांचा वाटा तर नक्कीच आहे,पण या माझ्या गुरूंबरोबरच असे अनेक लोक आहेत त्यानी मला जगणे शिकवले.वडीलांचा सहवास फार नाही लाभला,पण जो काही तेरा चौदा वयापर्यंत लाभला त्या सहवासात मी खूप काही शिकलो . मी प्रत्येक क्षणी डोके थंड ठेवून निर्णय घायला शिकलो,घाई घाईने, रागात असताना वा खुप आनंदात असताना घेतलेले निर्णय हे बहुतांशी  भावनेच्या भरातले असतात आणि त्याचा पुढे आयुष्यात त्रासच होवू शकतो, हे फार कमी वयातच मी शिकलेलो होतो.आई बद्द्ल काय बोलू ?आपल्याला  जीवनात जर काही चांगले घडवायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही.समोर उभ्या राहिलेल्या जटील समस्येला कुणीतरी आयते उत्तर देईल यावर तिचा मुळीच भरवसा नव्हता ! आपला मार्ग आपण स्वत: शोधायचा, आलेला प्रत्येक दिवस नवा म्हणुन जगायचा,आत्मसन्मान विकून मिळालेले सोनेही  मातीमोलाचे असते.अशी अमुल्य शिकवण अगदी लहान वयातच मिळाल्यामुळे कायम वास्तवात जगायची सवय लागली.आलेला दिवस साजरा करून आनंदात कसे रहायचे हे मी आईकडून शिकलो.आई आणि वडिलांशिवाय आजूबाजूचे भाऊबंद नवे नवे संस्कार करत राहिले .भाऊबंदकी मधील भांडणातुनही मला सदेश मिळाला -असे वागणे बरे नाही! शाळेत अक्षर ओळख झालीच पण आमची शाळा ही शेती शाळा असल्यामुळे शेतातली खुरपणी, काढणी सारखी कामे करायला मिळाली.लिहावाचायला शिकलो तसा अवांतर वाचनाचीही आवड तयार झाली.हाती येईल ते, अगदी त्या वयात जे वाचू नये, तेही वाचले गेले पण त्यामुळे चांगल्या वाईटातला फरक कळण्याइतपत जाणीवा समृध्द होत गेल्या .मी येथे कुणाचे  नाव घेणे प्रशस्त होणार नाही, पण असेही गुरूजी मला लाभले जे वर्ग चालू असताना दारू प्यायचे! पण अशा लोकांकडूनही मला कसे वागू नये याचे संस्कार मिळाले.शाळेत वर्गात चांगली मुले होतीच त्यांच्याकडून चांगले शिकलोच, पण वर्गात अशीही मुले होती जी तंबाखू खात,गांजा ओढत,जुगार खेळत, एवढेच काय दारूसुध्दा पीत असत.त्यांच्या सोबत राहून शालेय अभ्यासात प्रथम क्रमांकाने पास होत राहीलो.  व्यसने माणसाचा विनाश करू शकतात, त्यांच्या वाट्याला आयुष्यात कधीच जायचे नाही, याची खुणगाठ त्या अर्धवट वयातच बांधली गेली.त्या व्यसनांची चव आपणही अजमावून पहावी हा मोह मात्र कधीच झाला नाही! याचे श्रेय अर्थातच अशी बुध्दी देणार्या त्या निर्मिकाचे! चोरी करू नये ,खोटे बोलू नये ,वाईट सवयी च्या वाटेला जावू नये,स्वत:चे काम स्वत: करावे,आयुष्यात फुकट मिळालेली कोणतीच गोष्ट समाधान देवू शकत नाही,अशा अनेक चांगल्या गोष्टी तो निर्मिक मला सतत शिकवत होता. अनुभवातुन शहाणपणाचे संस्कार होत होते.वयाच्या सोळाव्या वर्षी मी शिक्षणासाठी घराबाहेर पडलो, एकटा राहीलो पण पुस्तकांच्या रूपाने मला एक गुरू, एक सच्चा मित्र  भेटत राहीला आणि या वाचन संस्काराने मला आयुष्यात कधीच  वाकडे पावूल टाकू दिले नाही.हायस्कुल जीवनात व उच्च माध्यमिक शिक्षणा पर्यंत रयत शिक्षण संस्थ्येच्या शाळेत शिकलो.स्वावलंबी शिक्षण हे ब्रीद असलेल्या या संस्थ्येने स्वाभिमान जागा ठेवून व कष्ट करून जगायला शिकविले.रयतच्या सेवाभावी गुरुजनांचे माझ्या आयुष्यात अढळ स्थान आहे!पुढे कॉलेजला पुण्यात आलो.आबासाहेब गरवारे कॉलेजमधे शिकत असताना पुणेरी संस्कार आपोआप झाले.आधी ग्रामीण शिवराळ भाषा तोंडात असायची, ती जावून जाणीवपुर्वक चांगल्या पुणेरी मराठी भाषेत बोलू लागलो.वाचनाच्या कक्षा रुंदावल्या.कविता लिहिण्याचे सातत्य वाढले.जरी मी गरवारे कॉलेज मधे शिकत होतो, पण रहात होतो येरवड्यातील नागपूर चाळ या वसाहतीत! झोपडपट्टीचे जीवन जवळून अनुभवले. इथे अनेक प्रकारचे मित्र जोडले गेले.या मित्रांत सिनेमा तिकिटाचा काळाबाजार करणारे होते ,बिगारी काम करणारे होते ,रिक्षा चालवणारे होते तसेच काहीच कामधंदा नसलेले व  स्वयंघोषित छोटे मोठे 'दादा'ही होते.व्यवसाय काहीही असो,मनाने अत्यंत श्रीमंत असलेले हे मित्र माणुस कसा असावा आणि तो कसा नसावा याचे संस्कार करत राहिले.त्यांच्यातले चांगले गुण घेत राहिलो  हेसुध्दा माझे गुरूच होते  की !पुढे नोकरी करताना अनेक अधिकारी भेटले, खुप काही शिकवून गेले. चांगला कर्मचारी व चांगला अधिकारी कसा असावा,हाताखालच्या कर्मचार्यांकडून काम करून घेत असतानाच माणुसकीची जोपासनाही कशी होवू शकते! ग्राहकसेवेचे महत्व व समाधान देणारी सेवा दिल्यानंतर मिळणारे समाधान,इत्यादी बाबी कुणाकुणाकडून शिकत राहीलो,अजुनही शिकतो आहे.
   आतापर्यंतच्या जीवनात एक गोष्ट नक्कीच समजली की अवतीभवती असणारा प्रत्येक माणुस हा आपला गुरूच असतो.प्रत्येक माणसात गुणदोष हे असतातच! प्रत्येकात असणारे चांगले गुण आत्मसात करायचे असतात तर दुर्गूणाचे निरिक्षण करून आपल्यात तर असे दोष नाहीत ना याचे आत्मपरिक्षण करायचे असते.असलेच काही तसे दोष तर ते दूर करून प्रगती साधायची असते!
    माझ्या आयुष्यातील अशा सर्व ज्ञात अज्ञात गुरूजनाना आजच्या गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने साष्टांग दंडवत!
                      .....प्रल्हाद दुधाळ (31 जूलै 2015 )

No comments:

Post a Comment