Wednesday, December 19, 2018

पुण्यकर्म

काल एक मनोरंजक तेव्हढीच   गंभीरपणे विचार करायला लावणारी केस माझ्यासमोर आली होती.प्रशासन विभागात काम करत असल्याने सामान्यपणे लोकांना होता होईल एवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो;पण कधी कधी अशी काही बिलींदर माणसे भेटतात की ज्याचे नाव ते!
   निवृत्ती जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड तपासून काही त्रुटी असल्यास त्या दुरूस्त करून पुढे पेंशन संबंधी काही अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही मोहीम राबवत असतो.अशाच एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला तो पुढच्या सहा महिन्यात रिटायर होत असल्याने त्याचे सर्व्हिस बुक दाखवले.
सर्व्हिस पुस्तकातल्या नोंदी पाहून तो बराच विचारात पडलेला दिसला . त्या  दिवशी तो निघून गेला; पण सातआठ दिवसांनी तो काही कागदपत्रे घेऊन पुन्हा आला . त्याने एक अर्ज आणला होता.
  अर्जात त्याने लिहिले होते...
" माझी पहिली पत्नी राजश्री केशव जाधव हीचे दिनांक  २०/५/२००० रोजी निधन झाले.( सोबत मृत्यू प्रमाणपत्र जोडले आहे) .त्यानंतर २ जाने.२००१ ला मी उषा केशव बेंद्रे हिच्याशी लग्न केले आहे आणि तिचे नाव बदलून राजश्री केशव जाधव असे ठेवले आहे! (सोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदली झाल्याचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे) . नजर चुकीने माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल ऑफिसला कळवणे राहून गेले होते त्याबद्दल माफी असावी .आता माझ्या सर्व्हिस पुस्तकात माझ्या पहिल्या  पत्नीचे नाव वगळून दुसऱ्या पत्नीची नोंद करावी तसेच माझे आधीचे नॉमिनेशन बदलुन नवीन नोंद करावी ....."
त्याचा अर्ज वाचून मी विचारात पडलो.  
त्याचा  अर्ज घेतला आणि त्याला दोन तीन दिवसात फोन करून कळवतो असे सांगितले.
मी गोंधळून गेलो होतो.  
 लगेच त्याची केस वाचायला घेतली ...
आता तुम्ही म्हणाल यात मजेशीर काय आहे?....सांगतो....
  या महाशयांनी दुसरे लग्न २००१ सालात केले असे म्हटले आहे; पण त्याची नोंदणी सतरा वर्षांनी केली आहे. ऑफिसला पहिल्या बायकोचे निधन आणि दुसऱ्या लग्नाबद्दल कळवावे असे त्याला तब्बल सतरा वर्षानंतर आवश्यक वाटले . आपल्या दुसऱ्या बायकोला त्याने पहिल्या बायकोचे नावच दिले!
 विशेष म्हणजे दुसऱ्या बायकोच्या वडिलांचे नाव आणि हे महाशय दोघांचे नाव सारखेच!
केशव!!! आहे का नाही योगायोग?
सगळी केस वाचून डोक्याचा गोयंदा झालायं....
त्याचा नॉमिनेशन फॉर्म वाचून मात्र मी गंभीर झालोय...
आधीच्या नॉमिनेशन मध्ये त्याच्या पहिल्या पत्नी बरोबर एक मुलगा आणि एका मुलीचे नाव होते .नवीन नॉमिनेशन फॉर्म मध्ये मात्र  त्याने फक्त दुसऱ्या बायकोचे नाव लिहिले आहे ....
काय दोष त्या मुलांचा?
केस पेंडीग ठेवलीय...
विचारात पडलोय ...
बघूया काय करता येईल.  ...
(उत्तरार्ध..)

काल तो पुन्हा आला .
त्याची केस माझ्याकडे पडलेली होती त्यामुळे मी त्याची वाटच बघत होतो. त्याने  आपले नॉमिनेशन बदलावे म्हणून दिलेले एप्लिकेशन अजून मी कार्यवाहीसाठी घेतले नव्हते.
या केसमध्ये आपण नियमात बसवून काहीतरी करायला पाहिजे असे मनापासून वाटत होते पण;शेवटी ते त्याचे नॉमिनेशन होते आणि ते त्याने कुणाच्या नावाने करावे हा त्याचा अधिकार होता!असे असले तरी कितीही वाईट असला तरी प्रत्येक माणसात एक सज्जन माणूस दडलेला असतो यावर माझा विश्वास होता आणि त्याच्यातल्या त्या सज्जन माणसाला आवाहन करायचे आणि त्या मुलांवर भविष्यकाळात कळत नकळत होणारा अन्याय दूर करायचा मी प्रयत्न करणार होतो.त्याला नियमांच्या खिंडीत गाठून हे करणे शक्य आहे हे दोन तीन दिवस केलेल्या विचाराअंती मला माहीत झाले होते. आता तो विचार प्रत्यक्षात आणायची वेळ आलेली होती.
" सर माझ्या अर्जाचे काय झाले?"
"ते दुसरे लग्न आणि नॉमिनेशन बद्दल ना..."
मी उगीचच अज्ञान पाजळले..
" हो सर..."
" त्याचे काय आहे की तुमची बायको गेली २००० ला , पुढे २००१ सालात तुम्ही दुसरे लग्न केले बरोबर ना ?"
" हो..."
" मग अठरा वर्षांनी तुम्हाला हे ऑफिसला कळवावे असे का वाटले?"
मी माझ्या मनात खदखदत असलेला प्रश्न विचारला...
" हे कळवायला लागतं हे मला माहीत नव्हतं..."
" मग आता कसं काय समजलं?"
" मी या वर्षी रिटायर होणार आहे त्यामुळे एका नातेवाईकाने सगळं रीतसर करून घ्यायला सांगितलं, म्हणून अर्ज दिलाय ..."
" आधी दिलेलं नॉमिनेशन बदलायला त्यानेच सांगितलं का?"
"हो,त्यानेच सांगितलं!"
" तो माणूस दुसऱ्या बायकोच्या नात्यातला आहे ना?"
त्याने आता मान खाली घातली आणि मान डोलावली.
आता माझा आवाज वाढला..
" अरे काय आहे, त्याने सांगितले आणि तुम्ही लगेच अर्ज दिला, थोड स्वतः डोकं चालवाव वाटलं नाही तुम्हाला? फक्त दुसऱ्या बायकोच्या नावाने नॉमिनेशन हवंय ? त्या दोन पोरांनी काय केलंय? त्यांची नावे वगळायची?"
खर तर त्याच्याशी असं बोलणं नियमानुसार नव्हतं;पण चांगल्या कामासाठी ही रिस्क मी घेतली.
माझा तो बदललेला पवित्रा बघून तो बराच गंभीर झाला होता.त्याने काढता पाय घेतला..
"मी दुपारनंतर परत येतो सर..."
माझा निरोप घेवून तो निघून गेला.
लंचला जाऊन मी परत आलो तर तो माझी वाटच बघत होता.
" सर, ते आधीचे पेपर परत द्या, आणि माझे हे नवे नॉमिनेशन घ्या ..."
मी त्याचा नवीन अर्ज वाचला आणि मी माझ्यावर खुश झालो.
ऑपरेशन सक्सेसफुल झाले होते!
नव्या नॉमिनेशन फॉर्म मध्ये त्याच्या दुसऱ्या बायकोला ५०टक्के आणि दोन्ही मुलांना २५ टक्के प्रत्येकी असे वाटप होते .
"धन्यवाद सर, मी चूक करत होतो. तुम्ही मला सावध केले..."
त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान होते.
नकळत हातून एक चांगले काम होणार होते .
...प्रल्हाद दुधाळ.

Friday, October 19, 2018

सिमोलांघण

सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
 माणसाने आपल्या भोवती वेगवेगळ्या नको त्या गोष्टींची कुंपने  घालून घेतलेली असतात.या कुंपणाच्या आतले जग हेच खरे जग आहे असे तो समजायला लागतो.अशा कुंपणा पलीकडे असलेल्या भव्य जगाची त्याला जाणीवच उरत नाही.मग त्याच्या त्या संकुचित जगातल्या जाती, धर्म, आपला, तुपला अशा भेदाभेदात तो अडकून पडतो.त्याने आपल्याभोवती तयार केलेल्या कोषात  तो इतका गुरफटून जातो की तो त्याचे खरे जगणेच विसरून जातो. ही एक प्रकारची गुलामगिरी त्याने स्वीकारलेली असते.या संकुचित जगात वावरताना तो मुक्तपणे विहरणे विसरून जातो आणि मग त्याची  खरी ओळख हळू हळू  पुसली जाते.
   आजच्या या विजयादशमीच्या निमित्ताने स्वतः ला ओळखण्यासाठी या संकुचित सीमांचे उल्लंघन करून बाहेर काय चालले आहे ते उघड्या डोळ्यांनी बघायला हवे.या काल्पनिक भिंती पलीकडे  मुक्त विचार, मुक्त जग आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत.तेव्हा आता चला; जात, पात, धर्म अशा सीमा ओलांडून त्या मोठ्या जगाकडे पाहू या! त्या  वेगळ्या जगात आपली नवी ओळख निर्माण करुया. सीमोल्लंघन करूया संकुचित विचारांचे, सीमोल्लंघन करूया अहंकाराचे, सीमोल्लंघन करूया भेदभावाचे!
 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे!
 या नव्या सीमा ओलांडून सुख, शांती, आरोग्य आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या समृद्ध आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
 हॅप्पी दशहरा!

Tuesday, September 25, 2018

मढेघाट

मढेघाट ...
दररोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा कधीतरी खूप कंटाळा येतो.या धावपळीतून एखादा दिवस तरी ब्रेक मिळावा असे आतून वाटत असते;पण समोर उभे असलेले कामाचे डोंगर यावर विचारही करू देत नाही तर तो अमलात आणणे तर खूप लांबची गोष्ट. कधीतरी बोलाफुलाची गाठ पडते आणि अचानक एखाद्या एकदिवसीय सहलीचा प्रस्ताव समोर येतो.रूटीन आयुष्यातून एक दिवस का होईना पण बाहेर पडता येईल म्हणून आपण तो प्रस्ताव लगेच स्वीकारतो.आपण कुठे जाणार आहोत,सहलीत नक्की काय बघणार आहोत याचा विचार येथे गौण होतो.एक दिवसाचा बदल एवढाच एक विचार यामागे असतो.माझेही असेच झाले.आम्हा पुण्यात रहात असलेल्या गाववाल्यांचा एक मंच आहे आणि या मंचाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.महिन्यातून एकदा आम्ही भेटत असतो."या महिन्यात आपण एक दिवसाची एक सहल आयोजित करत आहोत" या प्रस्तावाला मी लगेच प्रतिसाद दिला तो हवा असलेला एक दिवसीय बदल या विचातूनच!    काल प्रत्यक्ष सहल सुरू झाल्यावर   मात्र पुण्यापासून इतक्या जवळ अशी देखणी उर्जादायी ठिकाणे असूनही अजूनपर्यंत आपण ती कशी काय पाहिली नव्हती याबद्दल क्षणभर खंत वाटली. आमची ही सहल सुरू झाली ती खडकवासला धरणापासून! मग आम्ही पानशेत व वरसगाव ही धरणे पाहून वरची खिंड ओलांडून गुंजवणी धरणाकडे कूच केले.या खिंडीतून एका वेळी एका बाजूला तीन धरणे आणि दुसऱ्या बाजूला गुंजवणीचा नजारा अक्षरशः अवर्णनीय होता!
    केवळ एका हिरव्या रंगाच्या या अगणित छटा पहाताना भान हरपून गेले!रस्त्याच्या दुतर्फा विविध रंगांची रानफुले अगदी स्वागताला उभी असल्यागत डोलत होती. निसर्गाने अशा सजवलेल्या मार्गाने आम्ही अलगद गुंजवणी गावात उतरलो.आता भूक लागली होती.विशाल नावाच्या हॉटेलमध्ये मिसळपाव चापून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता आम्ही तोरणा किल्ल्याच्या बाजूने मढे  घाट बघायला निघालो होतो. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून असे वाटत होते की तेथे मढे नावाचे गाव असेल आणि त्या गावाच्या नावावरून त्या घाटाचे हे नाव पडले असेल;पण प्रत्यक्षात वेगळाच इतिहास समजला. कोंढाणा किल्ला जिंकताना शिवबाचा शूर मावळा तानाजी मालुसरे कामाला आला.गड आला पण सिंह गेला.या सिहाचे शव   अंत्यसंस्कारासाठी या अत्यंत अवघड अशा घाटाने एका रात्रीत त्याच्या कोकणातील मूळ गावी नेले होते.बोली भाषेत शव म्हणजे मढे, म्हणून या घाटाचे नाव मढे घाट असे पडले. इथल्या निसरड्या वाटेने तोल सांभाळत खाली अर्धा किलोमीटर गेल्यावर विहंगम असा लक्ष्मी  धबधबा पाहिल्यावर प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जातो! वरच्या कड्यावरून दिसणारे तळकोकण नजरेत साठवू म्हटले तरी साठवता येत नाही. हिरवाईने सजलेली इथल्या सृष्टीचा नजारा इतका मनमोहक होता की परत निघावे असे वाटत नव्हते!आमचा हा सह्याद्री केवळ दगड धोंड्याचा नाही तर येथील निसर्गसौंदर्याने संवेदनशील मनाला मोहिनी घालण्याची अदा या सौंदर्यात नक्कीच आहे याची साक्ष पटते! दुपार उलटून गेली होती आता पोटात कावळे कोकलायला लागले होते त्यामुळे गाडीत बसलो आणि वाजेघरकडे कूच केले ...(क्रमशः)

Tuesday, May 1, 2018

कामगार दिन


कामगार दिनानिमित्त  ....
 आज १ मे कामगार दिन!
या निमित्ताने कष्टकरी जगतातल्या बदलाचा माझ्या अल्पमतीने घेतलेला अल्प धांडोळा!
  तो काळच वेगळा होता पुण्या मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यात अनेक मोठे मोठे उद्योग प्रचंड बहरात होते.या मोठ्या उद्योगांना पूरक अशा अनेक छोट्या मोठ्या कंपन्या येथे तीन तीन शिफ्टमध्ये आपल्या चिमण्यातून धूर ओकत होत्या.त्या काळी पुण्यातल्या पिंपरीचिंचवड एमआयडीसी भागात विविध कंपन्यांच्या भोंग्यांचे आवाज एकामागोमाग घुमायचे  आणि त्या आवाजाच्या तालावर निळ्या युनिफॉर्ममधल्या असंख्य कामगारांच्या शिस्तबध्द हालचाली चालू राहायच्या.
     आपापल्या शिफ्टला कामावर जाणाऱ्या आणि सुट्टी झाल्यावर घराच्या ओढीने सायकल दामटणाऱ्या शेकडो कामगारांची वर्दळ  आकुर्डी ते भोसरी पट्ट्यातल्या रस्त्यांवर सतत जाणवायची.आपल्या निढळाच्या घामाच्या जोरावर इथला कामगार एक खुशहाल जिंदगी जगत होता.
   दिवाळीचा बोनस,पगारवाढीचे करार अशा गोष्टींवर घरोघरी चर्चा झडायच्या.या कामगारांच्या हितासाठी जागरूक असलेल्या अनेक कामगार संघटनांचे आस्तित्व रस्तोरस्ती जाणवायचे. वेळप्रसंगी आंदोलनांचे हत्यार वापरून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या जायच्या.मनासारखी वेतनवाढ वा बोनस मिळाला की जल्लोष व्हायचा, गुलालाने  रस्ते लालभडक व्हायचे.औद्योगिक पट्ट्यातील कामगारांच्या आर्थिक उलाढालीवर पुण्यातल्या व्यावसायिकांची गणिते बदलत रहायची.हातात पैसा आला की कामगारांकडून मनसोक्त खरेदी व्हायची. थोडक्यात शहरी जीवनातच काय पण शहरालगतच्या गावातल्या दैनंदिन आयुष्यांत या कामगार जगताला प्रचंड महत्व होते.
   काळ बदलला आणि तांत्रिक प्रगतीमुळे कारखान्यातली मनुष्यबळाची गरज घटत गेली.प्रथम अकुशल कामगार आणि नंतर कुशल कामगारांच्या नोकऱ्या कपात होत गेली.काही मोठे उद्योग बंद झाले तर काहीचे स्थलांतर झाले.मग या मोठ्या कारखान्यांवर अवलंबून असलेले छोटे उद्योगही हळूहळू बंद झाले आणि एरवी सतत गजबजलेले एमआयडीसीतले रस्ते ओस पडायला लागले.
    आधुनिकीकरणाच्या या रेट्यात अनेक कामगारांना  आपल्या नोकऱ्याना मुकावे लागले.काहीना स्थलांतर करावे लागले.कामगार संघटनांचे आस्तीत्वही जाणवण्याइतपत कमी झाले.अनेक कामगारांनी पोटासाठी पर्यायी लहान मोठ्या नोकरी व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला.ज्या कामगारांनी काळाप्रमाणे आपले कौशल्य वाढवले तेच टिकले बाकी असंघटीत कामगारांची होरपळ सुरू झाली.
   पुण्यासारख्या शहरात छोटे कारखाने जरी कमी झाले तरी काही काळानंतर आयटी वा तत्सम क्षेत्रातले अनेक व्यवसाय वाढले.आता पुण्याची आय टी हब म्हणून ओळख वाढायला लागली.संगणक क्षेत्रातल्या अनेक कार्पोरेट कंपन्या इथे आल्या.या क्षेत्रात नोकऱ्याच्या नव्या संधी मिळू लागल्या आणि निळ्या युनिफॉर्ममधील कामगारांऐवजी अपटूडेट पोशाखातल्या संगणक अभियंत्यांची वर्दळ पुण्यात वाढली. हिंजवडी,बाणेर,खराडी,हडपसर, येरवडा अशा विविध उपनगरात अनेक कार्पोरेट जगतातील कंपन्यानी आपले बस्तान बसवले आणि पुण्यात नव्या आयटी संस्कृतीचा उदय झाला.
    औद्योगिक वसाहतीतल्या संघटीत कामगारांचे जीवन आता हळू हळू इतिहासजमा होत आहे आणि आयटी मधली एक नवी कामगार संस्कृती उदयाला आली आहे.
     या दोन संस्कृतीत फार मोठा फरक आहे.
   जुना औद्योगिक कामगार फार शिकलेला नव्हता तरी त्याचे कामाचे तास ठरलेले होते,त्याच्या सोयी सुविधा मर्यादित होत्या पण जीवन शिस्तबध्द होते. तो आनंदात जगत होता!
    याउलट,
  आजचा उच्चशिक्षित आयटी प्रोफेशनल प्रचंड पैसा मिळूनही असुरक्षित आहे.प्रचंड स्पर्धेचे दडपण घेवून तो जगतो आहे. त्यातच असंघटीत असल्याने शोषण होत असूनही तो त्याविरूध्द आवाज उठवू शकत नाही.
असो,आजच्या जागतिक कामगार दिनानिमित्त अशा सर्व कुशल,अकुशल,संघटीत,असंघटीत,ब्ल्यू कॉलर व व्हाईट कॉलर कामगारांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
   ...... प्रल्हाद दुधाळ.
  
        

Monday, April 16, 2018

माझा_आवडता_चित्रपट


#माझा_आवडता_चित्रपट

‘पुष्पक’

     अलिकडच्या काळात म्हणजे गेल्या दहाबारा वर्षांपासून मी फारसे चित्रपट पाहिले नाहीत.आवडलेल्या चित्रपटावर लिहिण्याचा जेव्हा विचार केला तेव्हा थेट पंचवीस तीस वर्षापूर्वी पाहिलेल्या चित्रपटांचा विचार मी करायला लागलो आणि मला त्यावेळी अतिशय आवडलेल्या चित्रपटाचे नाव समोर आले ते “पुष्पक”या चित्रपटाचे नाव!

      शृंगार नागराज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सिंगीतम श्रीनिवास राव यांनी केले आहे.फार पूर्वी म्हणजे ८७-८८ मधे पाहिलेल्या या चित्रपटाविषयी लिहायचे तर तो पुन्हा एकदा बघावा लागणार होता.यु ट्यूबवर धांडोळा घेतला आणि आज पुन्हा एकदा या चित्रपटाचा आस्वाद घेतला.

मूळ तामिळी भाषेतील “पुष्पक विमान” या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन म्हणजे हा “पुष्पक” चित्रपट.
विशेष म्हणजे या चित्रपटातील पात्रांच्या तोंडी एकही संवाद नाही! चित्रपटातील कलाकारांनी केवळ हावभावांच्या माध्यमातून( मायामिंग) केलेला अभिनय केवळ अप्रतिम आहे!

    कमल हसन,अमला आणि टिनू आनंद यांनी पुष्पकमधे अभिनय करताना अक्षरश: जीव ओतला आहे.फरीदा जलालचीही यात भूमिका आहे.

   एक बेरोजगार तरुण(कमल हसन) नोकरी शोधून शोधून वैतागलेला असतो.आपण खूप श्रीमंत असावे असे त्याचे स्वप्न असते;पण प्रत्यक्षात तो खायलाही महाग असतो.पुष्पक नावाच्या आलिशान हॉटेलसमोर उभा राहून तो श्रीमंतांचे चकाचौंध जीवन लांबून पहात असतो.तेथेच तो त्या श्रीमंत उद्योगपतीला पहातो.पुढे योगायोगाने तोच व्यक्ती रस्त्याच्या कडेला नशेत चूर होवून पडलेला दिसतो.तो त्याचे (समीर खक्कर) अपहरण करतो आणि त्याला स्वत:च्या खोलीत डांबून त्याच्या हॉटेलमधील आलिशान सूटचा ताबा घेतो.त्याच्या पैशावर तो मनसोक्त मजा करायला लागतो. हॉटेलातल्या जादूगाराच्या मुलीचे(अमला) आणि दोघांचे प्रेम जमते.उद्योगपतीच्या जीवावर उठलेला एक भाडोत्री गुंडापासून(टिनू आनंद) त्याला धोका निर्माण होतो.उद्योगपतीचे अपहरण,त्याच्या जागी याचे हॉटेलात रहाणे,एका कफल्लक तरुणाला अचानक घबाड मिळणे,त्याची व त्या जादुगार मुलीची प्रेमकहाणी यातून  एक मजेशीर विनोदी कथा आकार घेते, ती कथा म्हणजे हा बिनसंवादी विनोदी चित्रपट! 
    चित्रपटाचे मुख्य वेगळेपण म्हणजे यातली विज्युअल भाषा! चित्रपट सुरू झाल्यावर पहिली पंधरावीस मिनिटे एकही संवाद नसल्यामुळे आपण थोडे अस्वस्थ होतो;पण एकदा का त्याच्यातील दृश्यांच्या फ्रेम्स आणि नुसत्या हावभावातून साधलेले पात्रातले संवाद (मायमिंग) आपण समजून घेऊ लागलो की या चित्रपटात अक्षरश: हरवून जातो. प्रत्यक्ष संवाद ऐकू येत नसला तरी चित्रपटातली दृश्यांची एक एक चौकट आपल्याशी संवाद साधायला लागते! एल वैद्यनाथन यांनी दिलेल्या पार्श्वसंगीताने ही जादू साधली आहे.

    एका गजबजलेल्या कामगार वसाहतीमधील चाळीत या चित्रपटाची सुरुवात होते.कष्टकरी व बेरोजगार लोकांच्या वर्दळीच्या वस्तीत एक उफाड्याची मोलकरीण चाळ झाडत असते आणि तिथले पुरूष तिच्या मादक हालचालींवर झुलत तिला नजरेने पीत आहेत अशा प्रसंगाने चित्रपटा सुरु होतो.मोलकरीण झाडू मारता मारता  मुरकेही मारत टेरेसवर राहात असलेल्या नायकाच्या खोलीजवळ पोहोचते.ही खोली विविध सिनेतारकांच्या पोस्टर्सनी व्यापलेली आढळते,अर्धनग्न फोटो असलेली मासिके खोलीत अस्ताव्यस्त पसरलेली असतात.ती उचलून ठेवता ठेवता मोलकरीणही ती चित्रे बघते.अशा छोट्या छोट्या प्रसंगातून विनोद फुलवला आहे. कामवाली चपला नायकाच्या डिग्रीच्या कागदावर टाकते आणि आपल्याकडील पदव्यांची वास्तव परिस्थिती चटका लावून जाते. एकट्या रहाणाऱ्या तरुणाचे घर कसे असते याचा नमुना म्हणजे ही चाळीतली खोली! 

   नायकाच्या खोलीत कार्ल मार्क्सचे एक पोस्टरही चिटकवलेले दिसते!त्याच खोलीत नंतर उद्योगपतीला  अपहरण करून नायक ठेवतो! संपूर्ण चित्रपटात विविध पोस्टर्सच्या माध्यमातून मार्क्सवाद आणि भांडवलशाही यातील संघर्षावर भाष्य केले आहे. बेकार असलेला कमल हसन जेव्हा नोकरीसाठी वणवण फिरत असतो,श्रीमंत होण्यासाठी धडपडत असतो तेंव्हा दोन वर्गातली दरी प्रकर्षाने अधोरेखित होते.एका प्रसंगात कमल हसनचा तुटलेला चहाचा कप अर्धा भरलेला दाखवला आहे त्याच वेळी इत्तर लोक संपूर्ण भरलेल्या कपातून चहा पीत असतात!

    चित्रपटात पुष्पक हे एका आलिशान हॉटेलचे नाव असते.वर्तुळाच्या दोन बाजूला भव्य पंख असलेले शिल्प हा या हॉटेलचा लोगो असतो.दर्शनी भागात मालकाचा भव्य फोटो असतो.अत्यंत विपरीत परिस्थितीतून अगदी छोट्याशा हॉटेलव्यवसायापासून ते या आलिशान हॉटेलपर्यंत मालकाने प्रगती केलेली असते.या हॉटेलाबाहेर आशाळभूतपणे उभा असतानाच त्या दारूबाज श्रीमत उद्योगपतीचे पहिले दर्शन नायकाला होते.अप्रतिम प्रतिमांचा वापर दिग्दर्शकाने अफलातून पद्धतीने केला आहे.

    या चित्रपटातले काही प्रसंग विनोदी पध्दतीने तर काही हसवता हसवता प्रेक्षकाला अंतर्मुख करतात.
   एका प्रसंगात दाखवले आहे की  प्रेमिका अमलाची आवडती फुले अगदी अडचणीच्या ठिकाणी असतात.नायक  तिच्या प्रेमापायी धूळमातीची पर्वा न करता त्या ठिकाणी पोहचतो व तिला ती फुले आणून देतो.त्यातील काही फुले ती त्याला देते.तिने दिलेली फुले त्याच्या एका हातात असतात आणि दुसऱ्या हातात नोटां असतात. नायकाकडून चुकून दोन्ही वस्तू खाली पडतात.तो घाईघाईने नोटा गोळा करायला लागतो.नोटा उचलण्याच्या नादात एका हातातून निसटलेली आणि पायदळी पडलेली फुले त्याच्या बुटाखाली चिरडली जातात! या प्रसंगातून नायकाची प्राथमिकता अधोरेखित होते.

   दुसऱ्या एका प्रसंगात बेरोजगार असताना नायक हातातले एक नाणे नाचवत रस्त्याच्या कडेला भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याला हिणवतो.भिकारीही त्याला त्याच्या कपड्यातल्या वेगवेगळ्या खिशातून त्याला नोटा काढून दाखवतो सर्वात शेवटी त्याच्या बसायच्या पोत्याखाली लपवलेल्या नोटा दाखवतो आणि कुत्सितपणे हसतो. चित्रपटात पुढे त्या बेवारस भिकारी मेल्यानंतर पालिकेचे कामगार त्याचे प्रेत उचलायला येतात.प्रेत उचलल्यानंतर त्याच्या कपड्याखाली असलेल्या नोटा बाहेर उडायला लागतात आणि सगळे कामगार व आजूबाजूचे बघे त्या नोटा गोळा करायला धावतात.ज्यांच्या हातात प्रेत असते ते कामगारही प्रेत बाजूला ठेवून नोटा गोळा करायला धावतात. जीवनात माणसाला पैशाचे महत्व किती टोकाचे असते ते पाहून नायकाला पैशाच्या मागे धावणे किती व्यर्थ असते याची जाणीव होते! 

  या चित्रपटात कमल हसनने एका मिडलक्लास बेकार स्ट्रगलर तरुणाची भूमिका केली आहे.अनेक ठिकाणी नोकरीसाठी नाकारल्यानंतर तो त्या उद्योगपतीचे अपहरण करून स्वत: त्या श्रीमंत उद्योगपतीचे जीवन जगायला लागतो.आता त्याला सगळेजण सैल्युट करायला लागतात.त्याची प्रेमिका त्याचा रूबाब,त्याची आलिशान गाडी,त्याची हॉटेलातला आलिशान सूट व त्याचे गुलहौशी राहणीमान हे सगळे बघत असते.

   चित्रपटाच्या शेवटी नायकाला आभासी श्रीमंती व ऐयाशी यापेक्षा प्रामाणिकपणे स्वकष्टातून मिळालेल्या गोष्टीतल्या समाधानाचे व आनंदाचे महत्व समजते. तो त्याचे पूर्वीचे जुने कपडे घालतो पूर्वीसारखाच नोकरी मिळवण्यासाठी झगडणाऱ्या लोकांच्या गर्दीत सामील होतो. पत्र लिहून तो त्याचे वास्तव प्रेमिकेला कळवतो.त्याच्यातल्या साध्यासुध्या माणसावरच ती प्रेम करत असते!आता  त्याच्या हातात प्रेमिकेने दिलेली फुले असतात! 

  ऐहिक सुखामागे धावताना माणूस खरे जगणे,छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद हरवून बसतो.आणि तो खऱ्या आनंदापासून कोसो दूर जातो तेव्हा ऐहिक गोष्टींपेक्षा वास्तविक सुख,समाधान,आनंद याला जीवनात जास्त महत्व द्यायला हवे अशी शिकवण पुष्पक चित्रपटातून मिळते किंबहुना हाच चित्रपटाचा गाभा आहे! 
  ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल त्यांनी एकदा तरी हा चित्रपट जरूर पहावा.

                                                        ......... प्रल्हाद दुधाळ 9423012020  

.

Sunday, March 18, 2018

स्मरण आईचे.

स्मरण आईचे.
१८ मार्च १९९४चा तो दिवस! माझी आई आजारी असल्यामुळे मी ऑफिसातून रजा घेऊन गावाकडेच मुक्कामी होतो.सहाच दिवसापूर्वी म्हणजे १२ तारखेला कॅंटोन्मेट टेलिफोन केंद्राचे फॅटेक्स इलेक्ट्रॉनिक केंद्रात परिवर्तन करण्यात आले होते. त्या केंद्राच्या बाह्य विभागातल्या तांत्रिक बाबींची जबाबदारी माझ्यावर असल्याने वरिष्ठांनी रजा देतानाच हे बजावले होते की गरज लागली तर लगेच कामावर यावे लागेल.
     त्या दिवशी सकाळीच गावाकडच्या एकमेव लॅंडलाईनवर साहेबांनी फोन केला व कामावर यायची विनंती केली. तशी आईची तब्बेत आज थोडी बरी होती त्यामुळे मी तिला पुण्याला जाऊ का विचारले." जा तू , आता मला बरं आहे.माझी काळजी करू नको " तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला. मी स्कूटरला किक मारली व पुणे गाठले. ऑफिसमधे खरचं माझी गरज होती. मी कामाला सुरूवात केली. पाच वाजेपर्यंत डोके वर काढायला वेळ झाला नाही. पाच वाजता टेबलावरचा फोन वाजला,फोनवर चुलत भाऊ होता. त्याने आई गेल्याचा निरोप दिला आणि माझ्या हातापायातले बळच गेले.कसबस स्वत:ला सावरलं आणि गाडी करून गाव गाठलं.
आयुष्यभर आपल्या मुलांसाठी जी माऊली हसमुखाने राब राब राबली, हाळीपाटी करून भाज्या विकल्या, लोकांच्या कुरड्या शेवया केल्या,गोधड्या शिवल्या, सुईण होऊन बाळंतपणे केली, अडल्या नडल्याना मदतीसाठी खंबीरपणे उभी राहीली, स्वत: शाळेचे तोंड पाहिले नव्हते पण आम्हा भावंडांनी शिकावे म्हणून आग्रह धरला त्या माझ्या आईच्या शेवटच्या प्रवासाचा साक्षीदार होण्यासाठी मी गावाला आलो.
      आज मागे वळून मी माझ्या जीवनाकडे बघतो तेव्हा माझ्या जीवनातल्या काही गोष्टींबद्दल माझे मलाच आश्चर्य वाटते. सामान्यपणे असे म्हटले जाते की माणसाचे घडणे वा बिघडणे हे तो कुणाच्या पोटी जन्माला आला, लहानपणी त्याचे पालनपोषण कोणत्या परिस्थितीत झाले,त्याचे मित्र कसे होते,त्याच्यावर शिक्षणाचे संस्कार करणारे गुरुजन कसे होते,याबरोबरच त्याची स्वत:ची बुध्दिमता आणि ग्रहणशक्ती यावर अवलंबून असते. माझ्या बाबतीत म्हणाल तर वर सांगितलेल्या बाबींपैकी बहुतांश बाबी या माझ्या जडणघडणीमधे प्रतिकूल परिणाम करू शकत होत्या अशा होत्या,तरीही मी जीवनात बिघडण्यापेक्षा घडलो ते माझ्या आईने माझ्यावर नकळत केलेल्या संस्कारांनी! माझी आई किंवा वडील कधी कोणत्या शाळेत गेलेले नव्हते. दोघेही अशिक्षित सहीच्या जागी डाव्या हाताचा निशाणी अंगठा उठवणारे होते. माझ्या एकूण सहा भावंडात मी शेंडेफळ होतो.मी हायस्कूल पर्यंत पोहोचेपर्यंत सगळी भावंडे आपल्या मार्गाने गाव सोडून गेलेली होती.माझे पालक अल्पभूधारक असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर काबाडकष्ट केल्याशिवाय कुटुंबात दोन वेळचे जेवण मिळायची मारामार होती.तशात होती नव्हती ती शेतीही सावकाराकडे गहाण पडलेली होती.अशा परिस्थितीत सत्तरच्या त्या दशकात, एका आडगावात राहून स्वत: अशिक्षित असूनही माझ्यासाठी शिक्षणाची स्वप्ने पहाणारे पालक लाभणे म्हणजे माझे थोर भाग्यच की!
    वडील तसे कायम आजारीच असायचे त्यामुळे घराचा सगळा डोलारा माझ्या आईच्या खांद्यावर उभा होता.मी आठवीत असताना वडीलांनी या जगाचा निरोप घेतला त्यानंतर तर तिच्या कष्टाला पारावार उरला नाही.मला आजही आठवते ती माझ्यासाठी सतत राबणारी आई.......
कोंबड आरवायच्या आधीच तिने घेतलेली असायची डोक्यावर माळव्याची पाटी,
चालत रहायची अनवाणी, नसायची अंधाराची अथवा विच्चूकाट्याची भीती
मनात एकच ध्यास  दिवस वर येण्यापूर्वी पाटीतला भाजीपाला खपायलाच हवा...
परत धा वाजता कुणाच्यातरी शेतावर मजुरीसाठी पोचायला हवं...
तिच्या त्या ढोर मेहनतीत  तिने पेरली होती माझ्या उज्वल भविष्याची स्वप्ने...
आज ना उद्या या घामावर  सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल!
जीवनात कधीच दिसली नाही हतबल,सदा धीरोदात्त,कायम हसतमुख...
तिचे ते अहोरात्र राबणे सतत देत होते मला माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव....
जर बदल हवा असेल तर बेट्या, तुझ्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आज सुखदु:खात कायम स्मरते  माझी सतत राबणारी प्रेरणादायी आई!

     समोर प्रचंड संकटे असताना तिने मला शिकायला स्वत:च्या पायावर उभे रहायला प्रोत्साहन दिले. बऱ्याचदा स्वत: उपाशी राहून कोंड्याचा मांडा करून मला पोटभर खायला दिले.....

ती कधी न पाहिली थकलेली, समस्येशी कुठल्या थबकलेली.
सुरकुतल्या हातात हत्तीच बळ आधार मोठा ती असता जवळ.
कोणत्याही प्रसंगी मागे ती सदा,निस्वार्थ सेवा वृत्तीने वागे सर्वदा.
माया ममता सेवा भरलेल ते गाव, सदा ओठी असु दे आई तुझे नाव!

 माझी आई पहाटे उठून जात्यावर धान्य दळायची. दळताना ती जात्यावर छान छान ओव्या रचून म्हणायची.मी भान हरपून त्या ओव्या ऐकत रहायचो....प्रत्येक ओवीत तिने माझ्या भविष्याचे स्वप्न पेरलेलं असायचं!

अवसेची जाईल रात उगवेल तो चंद्र पुन्हा,बुक वाचतो माझा राजा, बैरीस्तर माझा कान्हा!
लेक चालला साळला संगे दिलीय भाकरी, साहेबावानी आहे त्याची मोठ्या पैक्याची नोकरी!
मला वाटते पुढे जीवनात मला चारोळ्या,कविता,कथा,लेख,लिहिण्यावाचनाची आवड निर्माण झाली ती आईने लहानपणी केलेल्या या संस्कारांमुळेच!
तिने आपल्या वागण्या बोलण्यातून मला सतत काही ना काही शिकवण दिली..
कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी आपल्या स्वाभिमानाशी इमान राखायचे.
उगाच हवेत इमले न बांधता कायम वास्तवात जगायचे.
जीवनात ऐश्वर्य आले म्हणून माजायाचे नाही,गरीबीला लाजायचे नाही.
अन्याय सहन करायचा नाही, स्वार्थासाठी कोणालाही फसवायचं नाही.
आपण चांगले वागलो तर आपल्याशीही लोक चांगलेच वागतात.
आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले की त्याचे चांगले फळ मिळतेच मिळते,
मोठी स्वप्ने बघायची पण नेहमी अंथरून पाहून पाय पसरायचे.
व्यसनाने आयुष्याचं वाटोळे होते त्यामुळे कधीही कोणतेच व्यसन करायचे नाही.
   मी आयुष्यभर तिची ती शिकवण जशी जमेल तशी आचरणात आणत राहिलो. हायस्कूल आणि कॉलेजला असताना अनेक व्यसनी मित्रांच्यात राहूनही मला कधी त्यांच्यासारखे वागायचा मोह झाला नाही.आयुष्यात वाममार्गाने पैसा कमावण्याच्या अनेक संधी समोर हात जोडून उभ्या होत्या; पण त्या आडवाटेने जाण्याचा मोह कधीच झाला नाही.कुणी याला माझा वेडेपणा म्हणून मला हिणवले;पण ज्या गोष्टीवर माझा नैतिक अधिकार नव्हता’अशा कोणत्याच गोष्टीचा मला कधी मोह झाला नाही.माझ्या तोंडी कधीही कुणासाठीही अरेतुरेची भाषा नसते.कुणी माझ्याशी वाईट वागले तरी मी कुणाबद्दलही आकस बाळगत नाही.कुणी माझा रस्ता आडवला तर मी आपली एनर्जी तेथे वाया न घालवता आपला रस्ता बदलण्याचा प्रयत्न करतो.
“ऐसी जगह बैठिये-कोई ना बोले उठ, ऐसी बात कहिये-कोई ना बोले झूठ!” हे माझे जगण्याचे तत्व माझ्या आईच्या संस्कारांचा परिपाक आहे असे मी मानतो! मी जीवनात यशस्वी आहे की नाही माहित नाही;पण आनंदी नक्कीच आहे आणि याबद्दल मी त्या सर्वशक्तीमान निर्मिकाचा कायमच आभारी आहे.
     आज अठरा मार्च ; माझ्या आईचा चोवीसावा स्मृतीदिन आहे.ती मला सोडून गेली त्याला एवढी वर्षे झाली:पण आजही माझ्या जीवनावर माझ्या आईचा प्रचंड प्रभाव आहे.
    अडचणी आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्या अडचणींचे संधीत रूपांतर करून त्यावर स्वार व्हायचे बाळकडू मला माझ्या आईकडून मिळालेले आहे आणि त्याच्या जोरावर माझी मार्गक्रमणा सतत प्रगतीच्या दिशेने चालू आहे, आणि अशीच चालू राहील.
  माझ्या पूज्य आईला तिच्या चोविसाव्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!!!

     ...... प्रल्हाद दुधाळ .

Thursday, March 15, 2018

"माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी स्त्री"


 "माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी स्त्री"
        आज आठ मार्च जागतिक महिला दिन.या निमित्ताने माझ्या जडणघडणीतल्या प्रभावी महिला कोण आहेत यावर जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा काही मोजकीच नावे डोळ्यांसमोर आली.त्यात तिसऱ्या क्रमांकावर नाव होते ते स्वत:चा मुलगा समजून आपल्या मांडीवर बसवून माझा हात पकडून पहिल्यांदा क ख ग शिकवणाऱ्या माझ्या पहिलीच्या शिक्षिका कुचेकरबाई यांचे! मग आठवली ती माझ्यावर संस्कार करणारी माझ्यापेक्षा सातेक वर्षानी मोठी असलेली माझी ताई! अजून  पुढे आठवण्याचा प्रयत्न केल्यावर आठवल्या काही वर्गमैत्रिणी,ज्यांच्याबरोबर निकोप स्पर्धा केल्यामुळे मला अभ्यासाची व वाचनाची गोडी लागली! मग आठवल्या पहिल्यांदा नोकरी लागल्यावर कार्यालयातल्या माझ्या पहिल्या सुपरवायझर महाडिकबाई ज्यांच्याकडून मी खऱ्या अर्थाने शहरी पांढरपेशा वर्गात कसे वागायचे,कसे बोलायचे,याबरोबरच आपली नोकरी प्रामाणिकपणे व पूर्ण कार्यक्षमतेने कशी करायची हे शिकलो! दुसऱ्या क्रमांकार नाव घ्यावे लागेल माझी अर्धांगिनी-स्मिताचे जी गेली तेहतीस वर्षे माझ्या सुखदु:खात सतत साथ निभावते आहे!या सगळ्या झाल्या नंतरच्या गोष्टी;पण माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव जर कुणाचा असेल तर तो माझ्या आईचा!     
       आज मागे वळून मी माझ्या जीवनाकडे बघतो तेव्हा माझ्या जीवनातल्या काही गोष्टींबद्दल माझे मलाच आश्चर्य वाटते. सामान्यपणे असे म्हटले जाते की माणसाचे घडणे वा बिघडणे हे तो कुणाच्या पोटी जन्माला आला, लहानपणी त्याचे पालनपोषण कोणत्या परिस्थितीत झाले,त्याचे मित्र कसे होते,त्याच्यावर शिक्षणाचे संस्कार करणारे गुरुजन कसे होते,याबरोबरच त्याची स्वत:ची बुध्दिमता आणि ग्रहणशक्ती यावर अवलंबून असते. माझ्या बाबतीत म्हणाल तर वर सांगितलेल्या बाबींपैकी बहुतांश बाबी या माझ्या जडणघडणीमधे प्रतिकूल परिणाम करू शकत होत्या अशा होत्या,तरीही मी जीवनात बिघडण्यापेक्षा घडलो ते माझ्या आईने माझ्यावर नकळत केलेल्या संस्कारांनी! माझी आई किंवा वडील कधी कोणत्या शाळेत गेलेले नव्हते. दोघेही अशिक्षित सहीच्या जागी डाव्या हाताचा निशाणी अंगठा उठवणारे होते. माझ्या एकूण सहा भावंडात मी शेंडेफळ होतो.मी हायस्कूल पर्यंत पोहोचेपर्यंत सगळी भावंडे आपल्या मार्गाने गाव सोडून गेलेली होती.माझे पालक अल्पभूधारक असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर काबाडकष्ट केल्याशिवाय कुटुंबात दोन वेळचे जेवण मिळायची मारामार होती.तशात बहिणीच्या लग्नासाठी होती नव्हती ती शेतीही सावकाराकडे गहाण पडलेली होती.अशा परिस्थितीत सत्तरच्या त्या दशकात, एका आडगावात राहून स्वत: अशिक्षित असूनही माझ्यासाठी शिक्षणाची स्वप्ने पहाणारे पालक लाभणे म्हणजे माझे थोर भाग्यच की!
    वडील तसे कायम आजारीच असायचे त्यामुळे घराचा सगळा डोलारा माझ्या आईच्या खांद्यावर उभा होता.मी आठवीत असताना वडीलांनी या जगाचा निरोप घेतला त्यानंतर तर तिच्या कष्टाला पारावार उरला नाही.मला आजही आठवते ती माझ्यासाठी सतत राबणारी आई....
कोंबड आरवायच्या आधीच तिने घेतलेली असायची डोक्यावर माळव्याची पाटी,
चालत रहायची अनवाणी, नसायची अंधाराची अथवा विच्चूकाट्याची भीती 
मनात एकच ध्यास  दिवस वर येण्यापूर्वी पाटीतला भाजीपाला खपायलाच हवा... 
परत धा वाजता कुणाच्यातरी शेतावर मजुरीसाठी पोचायला हवं... 
तिच्या त्या ढोर मेहनतीत  तिने पेरली होती माझ्या उज्वल भविष्याची स्वप्ने... 
आज ना उद्या या घामावर  सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल!
जीवनात कधीच दिसली नाही हतबल,सदा धीरोदात्त,कायम हसतमुख...
तिचे ते अहोरात्र राबणे सतत देत होते मला माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव....
जर बदल हवा असेल तर बेट्या, तुझ्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही 
आज सुखदु:खात कायम स्मरते  माझी सतत राबणारी प्रेरणादायी आई! 
समोर प्रचंड संकटे असताना तिने मला शिकायला स्वत:च्या पायावर उभे रहायला प्रोत्साहन दिले. बऱ्याचदास्वत: उपाशी राहून कोंड्याचा मांडा करून मला पोटभर खायला दिले.....
ती कधी न पाहिली थकलेली, समस्येशी कुठल्या थबकलेली.
सुरकुतल्या हातात हत्तीच बळ आधार मोठा ती असता जवळ.
कोणत्याही प्रसंगी मागे ती सदा,निस्वार्थ सेवा वृत्तीने वागे सर्वदा. 
माया ममता सेवा भरलेल ते गाव, सदा ओठी असु दे आई तुझे नाव!
 माझी आई पहाटे उठून जात्यावर धान्य दळायची. दळताना ती छान जात्यावरच्या ओव्या म्हणायची.मी भान हरपून त्या ओव्या ऐकत रहायचो....प्रत्येक ओवीत तिने माझ्या भविष्याचे स्वप्न पेरलेलं असायचं!
अवसेची जाईल रात उगवेल तो चंद्र पुन्हा,बुक वाचतो माझा राजा, बैरीस्तर माझा कान्हा!
लेक चालला साळला संगे दिलीय भाकरी, साहेबावानी आहे त्याची मोठ्या पैक्याची नोकरी!
मला वाटते पुढे जीवनात मला चारोळ्या,कविता,कथा,लेख,लिहिण्यावाचनाची आवड निर्माण झाली ती आईने लहानपणी केलेल्या या संस्कारांमुळेच!
तिने आपल्या वागण्या बोलण्यातून मला सतत काही ना काही शिकवण दिली..
कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी आपल्या स्वाभिमानाशी इमान राखायचे.
उगाच हवेत इमले न बांधता कायम वास्तवात जगायचे.
जीवनात ऐश्वर्य आले म्हणून माजायाचे नाही,गरीबीला लाजायचे नाही.
अन्याय सहन करायचा नाही, स्वार्थासाठी कोणालाही फसवायचं नाही.
आपण चांगले वागलो तर आपल्याशीही लोक चांगलेच वागतात.
आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले की त्याचे चांगले फळ मिळतेच मिळते,
मोठी स्वप्ने बघायची पण नेहमी अंथरून पाहून पाय पसरायचे.
व्यसनाने आयुष्याचं वाटोळे होते त्यामुळे कधीही कोणतेच व्यसन करायचे नाही.
   मी आयुष्यभर तिची ती शिकवण जशी जमेल तशी आचरणात आणत राहिलो. हायस्कूल आणि कॉलेजला असताना अनेक व्यसनी मित्रांच्यात राहूनही मला कधी त्यांच्यासारखे वागायचा मोह झाला नाही.आयुष्यात वाममार्गाने पैसा कमावण्याच्या अनेक संधी समोर हात जोडून उभ्या होत्या; पण त्या आडवाटेने जाण्याचा मोह कधीच झाला नाही.कुणी याला माझा वेडेपणा म्हणून मला हिणवले;पण ज्या गोष्टीवर माझा नैतिक अधिकार नव्हता’अशा कोणत्याच गोष्टीचा मला कधी मोह झाला नाही.माझ्या तोंडी कधीही कुणासाठीही अरेतुरेची भाषा नसते.कुणी माझ्याशी वाईट वागले तरी मी कुणाबद्दलही आकस बाळगत नाही.कुणी माझा रस्ता आडवला तर मी आपली एनर्जी तेथे वाया न घालवता आपला रस्ता बदलण्याचा प्रयत्न करतो.
“ऐसी जगह बैठिये-कोई ना बोले उठ, ऐसी बात कहिये-कोई ना बोले झूठ!” हे माझे जगण्याचे तत्व माझ्या आईच्या संस्कारांचा परिपाक आहे असे मी मानतो! मी यशस्वी आहे की नाही माहित नाही;पण आनंदी नक्कीच आहे आणि याबद्दल मी त्या सर्वशक्तीमान निर्मिकाचा कायमच आभारी आहे.
     येणारा अठरा मार्च हा दिवस माझ्या आईचा पंचविसावा स्मृतीदिन आहे.ती मला सोडून गेली त्याला एवढी वर्षे झाली:पण आजही माझ्या जीवनावर माझ्या आईचा प्रचंड प्रभाव आहे.
    अडचणी आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्या अडचणींचे संधीत रूपांतर करून त्यावर स्वार व्हायचे बाळकडू मला माझ्या आईकडून मिळालेले आहे आणि त्याच्या जोरावर माझी मार्गक्रमणा सतत प्रगतीच्या दिशेने चालू आहे, आणि अशीच चालू राहील.  
     ...... प्रल्हाद दुधाळ .
         ( ८ मार्च २०१८)     

Saturday, March 3, 2018

सोशलमिडीया- दुधारी तलवार.


सोशलमिडीया- दुधारी तलवार.

     सोशलमिडीया म्हणजे खरे तर आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला दिलेले एक महत्वाचे वरदान आहे.आयुष्याच्या विविध टप्प्यावर भेटलेली पण पुढे जगण्याची लढाई लढताना गर्दीत हरवलेली माणसे या मिडीयाने पुन्हा आभासीरूपाने का होईना पण पुन्हा संपर्कात आली.सुखदु:खे शेअर करू लागली.
साहित्यिक कलाकारांना आपले कलागुण सादर करायला मीडियामुळे एक सशक्त व्यासपीठ मिळाले.आपल्या कोंडलेल्या भावनांना व्यक्त करायला इथे हक्काचे ठिकाण मिळाले. सकारात्मक विचारांची,माहितीची देवाणघेवाण करणारे अनेक समूह (उदा. कुबेर समूह, कुबेरफौंडेशन, मकस ई.) सोशल मेडीयाच्या माध्यमातून उदयाला आले आणि समाज जागृती व इत्तर रचनात्मक कामे करू लागले.या मेडीयाने अनेकांना आपल्या व्यवसाय धंद्याची जाहिरात करायला, आपल्या मनात आलेले विचार तत्क्षणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक साधन दिले.एकूणच व्यक्तीला व्यक्त होणे सोपे झाले. सोशल मिडियाचे काही सकारात्मक उपयोग होत असले तरी दुसऱ्या बाजूला काही धर्मांध/जात्यांध लोक आपल्या व काही विशिष्ट गटाच्या स्वार्थासाठी समाजात धर्मभेद व जातीभेदाचे विष पेरण्यासाठी,माणसामाणसात तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मिडीयाचा अंधाधुंद वापर करू लागले.अफवा पसरविण्यासाठी या माध्यमाचा सर्रास वापर वाढला.सांस्कृतिक प्रदूषण वाढवण्यासाठीही सोशल मिडीयाचा उपयोग होवू लागला.विद्यार्थी अभ्यास सोडून सोशल मिडीयावर पडीक राहू लागले.नको त्या गोष्टी नको त्या वयात उपलब्ध झाल्या. जोडीदाराबद्दल गैरसमज वाढून सहजीवनात कटूता येण्याचे प्रकार मिडीयावरील अतिरेकी वावरामुळे वाढले. लोक आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू लागले.आभासी मिडीयावर हजारो मित्रमैत्रिणी असणारी माणसे या मिडीयाच्या अतिरेकी वापरामुळे वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटी व निराशाग्रस्त दिसत आहेत.मानसिक रोग वाढत आहेत. सोशल मिडियाचे भयंकर दुष्परिणाम आता समोर दिसू लागले आहेत.
ही दुधारी तलवार योग्य प्रकारे वापरली नाही तर नक्कीच माणसे या तलवारीने आत्मघात करून घेवू शकतात याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी.अनिर्बंध असलेला हा मिडीया नीट वापरला नाही तर त्याचे भयंकर परिणाम या व यानंतरच्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागणार आहेत
     सोशल मिडीयाचा वापर करताना प्रत्येकाने काही पथ्ये पाळणे आवश्यक झाले आहे.यासंबंधी सर्वांनी जागृत व्हायला हवे आणि मिडीयाच्या नकारात्मक व सकारात्मक परिणामाबद्दलचे प्रबोधन घरोघरी करायला हवे. प्रत्येकाने मनोमन ठरवणे आवश्यक आहे की ....
१.मी फक्त मनोरंजन,ज्ञानवर्धन,विचारविमर्श,मार्गदर्शन,लेखन,वाचन अशा रचनात्मक बाबीसाठीच सोशल मिडीयाचा वापर करेन.मिडीयाचा वापर मी अगदी मर्यादित स्वरूपात करेन.सोशल मिडियाचे मला व्यसन लागू नये याबाबत दक्षता घेईन तसेच माझ्या कार्यक्षमतेवर अथवा कौटूंबिक जीवनावर या मीडियामुळे प्रतिकूल परिणाम तर होत नाही ना या बाबतीत मी सदैव जागरूक असेन.
२.मी सोशल मिडीयावर फक्त सकारात्मक पोस्ट्सचा प्रसार करेन.
३.कुठल्याही प्रकारच्या द्वेषमुलक पोस्ट्स मी वाचणार नाही,लिहिणार नाही वा फौरवर्ड करणार नाही. धर्म वा जातीवाचक लिखाण,अश्लील लिखाण वा चित्रे माझ्याकडून प्रसारित होणार नाहीत याबाबतीत मी दक्षता घेईल.
४. जेथे समाजात तेढ निर्माण केली जाते द्वेष पसरवला जातो अशा मिडीयावरील कोणत्याही समुहाचा मी सदस्य होणार नाही वा तशा गोष्टीत भाग घेणार नाही.
५. सोशल मिडीया ही दुधारी तलवार आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे त्याचा योग्य आणि मर्यादित वापर व्हावा म्हणून मी माझे मित्र व कुटुंबीय यांचे प्रबोधन करत राहील.
.... प्रल्हाद दुधाळ.