सोशलमिडीया- दुधारी तलवार.
सोशलमिडीया म्हणजे खरे तर आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला दिलेले एक महत्वाचे
वरदान आहे.आयुष्याच्या विविध टप्प्यावर भेटलेली पण पुढे जगण्याची लढाई लढताना
गर्दीत हरवलेली माणसे या मिडीयाने पुन्हा आभासीरूपाने का होईना पण पुन्हा संपर्कात
आली.सुखदु:खे शेअर करू लागली.
साहित्यिक कलाकारांना आपले कलागुण सादर करायला मीडियामुळे एक सशक्त
व्यासपीठ मिळाले.आपल्या कोंडलेल्या भावनांना व्यक्त करायला इथे हक्काचे ठिकाण
मिळाले. सकारात्मक विचारांची,माहितीची
देवाणघेवाण करणारे अनेक समूह (उदा. कुबेर समूह, कुबेरफौंडेशन, मकस ई.)
सोशल मेडीयाच्या माध्यमातून उदयाला आले आणि समाज जागृती व इत्तर रचनात्मक कामे करू
लागले.या मेडीयाने अनेकांना आपल्या व्यवसाय धंद्याची जाहिरात करायला, आपल्या
मनात आलेले विचार तत्क्षणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक साधन दिले.एकूणच
व्यक्तीला व्यक्त होणे सोपे झाले. सोशल मिडियाचे काही सकारात्मक उपयोग होत असले
तरी दुसऱ्या बाजूला काही धर्मांध/जात्यांध लोक आपल्या व काही विशिष्ट गटाच्या
स्वार्थासाठी समाजात धर्मभेद व जातीभेदाचे विष पेरण्यासाठी,माणसामाणसात
तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मिडीयाचा अंधाधुंद वापर करू लागले.अफवा पसरविण्यासाठी
या माध्यमाचा सर्रास वापर वाढला.सांस्कृतिक प्रदूषण वाढवण्यासाठीही सोशल मिडीयाचा
उपयोग होवू लागला.विद्यार्थी अभ्यास सोडून सोशल मिडीयावर पडीक राहू लागले.नको त्या
गोष्टी नको त्या वयात उपलब्ध झाल्या. जोडीदाराबद्दल गैरसमज वाढून सहजीवनात कटूता
येण्याचे प्रकार मिडीयावरील अतिरेकी वावरामुळे वाढले. लोक आपल्या कामाकडे दुर्लक्ष
करू लागले.आभासी मिडीयावर हजारो मित्रमैत्रिणी असणारी माणसे या मिडीयाच्या अतिरेकी वापरामुळे वैयक्तिक
आयुष्यात मात्र एकटी व निराशाग्रस्त दिसत आहेत.मानसिक रोग वाढत आहेत. सोशल
मिडियाचे भयंकर दुष्परिणाम आता समोर दिसू लागले आहेत.
ही दुधारी तलवार योग्य प्रकारे वापरली नाही तर नक्कीच माणसे या तलवारीने
आत्मघात करून घेवू शकतात याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी.अनिर्बंध असलेला हा
मिडीया नीट वापरला नाही तर त्याचे भयंकर परिणाम या व यानंतरच्या कित्येक पिढ्यांना
भोगावे लागणार आहेत
सोशल
मिडीयाचा वापर करताना प्रत्येकाने काही पथ्ये पाळणे आवश्यक झाले आहे.यासंबंधी
सर्वांनी जागृत व्हायला हवे आणि मिडीयाच्या नकारात्मक व सकारात्मक परिणामाबद्दलचे
प्रबोधन घरोघरी करायला हवे. प्रत्येकाने मनोमन ठरवणे आवश्यक आहे की ....
१.मी फक्त मनोरंजन,ज्ञानवर्धन,विचारविमर्श,मार्गदर्शन,लेखन,वाचन
अशा रचनात्मक बाबीसाठीच सोशल मिडीयाचा वापर करेन.मिडीयाचा वापर मी अगदी मर्यादित
स्वरूपात करेन.सोशल मिडियाचे मला व्यसन लागू नये याबाबत दक्षता घेईन तसेच माझ्या
कार्यक्षमतेवर अथवा कौटूंबिक जीवनावर या मीडियामुळे प्रतिकूल परिणाम तर होत नाही
ना या बाबतीत मी सदैव जागरूक असेन.
२.मी सोशल मिडीयावर फक्त सकारात्मक पोस्ट्सचा प्रसार करेन.
३.कुठल्याही प्रकारच्या द्वेषमुलक पोस्ट्स मी वाचणार नाही,लिहिणार
नाही वा फौरवर्ड करणार नाही. धर्म वा जातीवाचक लिखाण,अश्लील
लिखाण वा चित्रे माझ्याकडून प्रसारित होणार नाहीत याबाबतीत मी दक्षता घेईल.
४. जेथे समाजात तेढ निर्माण केली जाते द्वेष पसरवला जातो अशा मिडीयावरील
कोणत्याही समुहाचा मी सदस्य होणार नाही वा तशा गोष्टीत भाग घेणार नाही.
५. सोशल मिडीया ही दुधारी तलवार आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे त्याचा
योग्य आणि मर्यादित वापर व्हावा म्हणून मी माझे मित्र व कुटुंबीय यांचे प्रबोधन
करत राहील.
.... प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment