Monday, July 28, 2014

वडिलोपार्जित शेती

 वडिलोपार्जित शेती
       
      परवाचीच गोष्ट आहे, काही कामानिमित्त बसने प्रवास करत होतो.शेजारी एक पन्नाशी चे गृहस्थ्य बसले होते.सहज इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या.त्यांनी सांगितले की, एके काळी पुण्याच्या शेजारील एका गावात त्यांची पंधरा एकर बागायती शेती होती त्यांचे वडील शेती करत पण त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे भाऊ शेती विकून पैसे वाटून देण्याबद्दल भांडण करू लागले.खूप समजावले पण ते ऐकायला तयार नव्हते शेवटी दररोजच्या कटकटीना कंटाळून त्यांनी त्यांची  वंश परंपरेने आलेली  शेती एका बिल्डरला विकून टाकली व मिळालेले पैसे आपापसात वाटून घेतले.वाट्याला आलेल्या पैशातून त्या  गृहस्थ्याने  सोलापूर रोडवर थोडी शेतजमीन घेतली.शहरात एक दुकान घेऊन भाड्याने दिले आहे.एक मुलगा शेती करतो व दुसरा इंजिनअर झाला आहे.ठोस उत्पन्नाचे साधन  असल्यामुळे एकंदरीत आनंदात वाटला तो माणूस! त्याने पुढे सांगितले की" माझे ठीक आहे हो, पण माझ्या दोन्ही भावांची अवस्थ्या सध्या अत्यंत वाईट आहे! शेती विकून मिळालेल्या पैशांतून त्यांनी फक्त मौजमजा केली! प्रथम त्यांनी आलिशान मोटारी खरेदी केल्या.मुलांना  हव्या तशा किमती बाइक्स आल्या.त्यांना  हवा तेवढा पॉकेटमनी दररोज च्या दररोज मिळू  लागला.पैश्याबरोबर अंगात भरपूर  मस्ती व तोंडी उद्धट भाषा आली.अचानक भरपूर पैसा आल्यामुळे 'असतील शिते तेथे जमतील भुते'  या न्यायाने आजूबाजूला मतलबी लोकांचा वावर वाढला. समाजात त्यांना मान मिळू लागला.मग या अचानक मिळालेल्या प्रतिष्ठेपायी पाण्यासारखा पैसा खर्च  व्हायला लागला.घरात नको एवढी किमती वस्तूंची खरेदी होऊ लागली.सर्व कुटुंब छानछोकीत राहू लागले.आपल्याला काहीच कमी नाही अशा समजुतीत पैसा उधळला जाऊ लागला.बाप व मुले दोघानाही दारूचे व्यसन लागले.ढाब्यांवर पार्ट्या व डान्सबारवर पैसा खर्च व्हायला लागला.अनेकांनी अनेक प्रकारे समजावले पण त्यांचेवर काही परिणाम झाला नाही.आपल्याच मस्तीत दोन्ही भाऊ व त्यांचे कुटुंबीय होते.आपल्या समजदार भावाला ते आपला शत्रू समजू लागले.शेवटी व्हायचे तेच झाले! हळू हळू शिल्लक पैसा कमी कमी होत गेला.आणि शेवटी लागलेल्या व्यसनांपायी सुरुवातीला गाड्या मग दागिने व शेवटी रहाते घर विकून मिळालेला पैसासुध्दा उधळला गेला.कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले. आज त्या दोन्ही भावांना भाड्याच्या झोपडीत राहावे लागत आहे! .काहीही उत्पन्न नाही.कुठलेही काम न करता ते चोवीस तास नशेत असतात!मुले वाईट संगतीत आहेत.बायका मोलमजुरी करून कसेबसे या सर्वाना पोसत आहेत!" शेजारील माणसाने सांगितलेले हे प्रखर वास्तव ऐकल्यावर मन सुन्न झाले.आपली वडिलोपार्जित शेती विकून माणसे अशी देशोधडीला का लागतायेत?  
        सध्या वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमिनीचे झपाट्याने रहिवाशी पट्ट्यात रुपांतर होत आहे. वाढत्या शहरांचा आजूबाजूच्या गावात विस्तार होत आहे.शहरांकडे माणसांचे लोंढे वाढतायेत आणि या वाढत्या लोकसंखेच्या गरजा भागविताना  शेतजमीन कमी कमी होत चालली आहे.त्यातच शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय आहे असा मतप्रवाह वाढत आहे.शेतीत राबण्यापेक्षा आपली परंपरेने आलेली शेती विकून रोकडा पैसा मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.शेती व्यवसाय भरवशाचा नाही,आणि  हा कमीपणाचा व्यवसाय असे मानणाऱ्या नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी आपल्याकडील वडिलोपार्जित शेती विकण्याचा सपाटा लावला आहे.अनेक जमीन माफिया लोकांच्या या मानसिकतेचा पुरेपूर फायदा उठवीत आहेत.पैशाच्या व त्या निमित्ताने येणाऱ्या तात्कालिक ऐश्वर्याच्या  मोहाला  शेतकरी बळी पडत आहे व आपल्या जमिनी विकून टाकत आहेत!
                 हे खरे आहे की,आपल्याकडील धोरणांच्या दुष्काळामुळे शेती करणे भरवस्याचे राहीले नाही..अंगमेहनती चे कष्ट करण्याची नव्या पिढीची तयारी नाही त्यामुळे शेतीसाठी लागणारे मनुष्यबळ सहजासहजी उपलब्ध होत नाही.शेती या व्यवसायाला समाजात पुरेशी प्रतिष्ठाही मिळत नाही.शेती करणाऱ्या मुलाना लग्नासाठी कुणी मुली देत नाही हे वास्तव आहे!त्यामुळे आपली  वडिलोपार्जित शेती विकुन रोकडा पैसा उभारण्याची प्रवृत्ती वाढते आहे.शहरांच्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावापर्यंत ही वृत्ती पसरली आहे.असा विनाकष्ट व अचानक मिळालेला पैसा कसा व कुठे वापरावा याची अक्कलच नसल्यामुळे  तो नको तेथे उधळला जातो आहे. थोडे दिवस या पैशातून खरेदी केलेल्या  जाड जाड सोनसाखळ्या, हातात जाड कडी घालून मिरवले जात आहे. महागड्या गाड्या, महागडी कपडे, हौस मौज यात हा पैसा अक्षरशः उधळला जात आहे.ढाब्यांवर व डान्सबार वर दौलतजादा  करून नोटांच्या थप्प्या उधळल्या जाताहेत.व्यसनांच्या आहारी जाऊन  क्वचित अपवादात्मक उदाहरणे सोडता अशा प्रकारे बहुसंख्य शेतकरी जमिनी विकून देशोधडीला लागले आहेत.हा पैसा हळूहळू संपत जातो आणि लागलेल्या वाईट सवयीमुळे पिढ्या बरबाद झाल्या आहेत आणि होत आहेत.अशी अनेक उदाहरणे पहायला मिळत आहेत की दहा पंधरा वर्षापूर्वी  मुबलक शेतीचा मालक असलेला शेतकरी आपली जमीन  विकून त्याच जमिनीवर बांधल्या गेलेल्या  हौसिंग सोसायटी च्या गेटवर चौकीदाराचे जिणे जगतो आहे! त्याची अर्धांगिनीला नाईलाजाने चार घरची धुणीभांडी करावी लागत आहेत!  विदारक असले तरी  हे  चित्र अगदी खरे आहे! 
             आपला  परंपरागत शेतीचा व्यवसाय गुंडाळून शेती विकायला माणस कशी काय तयार झाली? मला असे वाटते की वाढते शहरीकरण.शेतीचा बेभारवशाचा व्यवसाय, शेतमजुरांची चणचण,वाढता भांडवली खर्च व त्याच्या वसुलीचा नसलेला भरवसा.सुशिक्षित तरुणांचा शेतीबाबत अनुत्साह अशा अनेकविध कारणांनी शेती करण्याऐवजी ती विकून आयता पैसा उभारण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.कृषिप्रधान भारतात शेती व्यवसायाला समाजात मिळायला हवी तेव्हढी प्रतिष्ठा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे,पण याचा अर्थ शेतीचे महत्व कमी झाले आहे असे थोडेच आहे? आपल्या मागच्या पिढ्यांनी कष्ट करून आपल्या हाती सोपवलेली शेती आपण तात्कालिक पैशाच्या मोहाला बळी पडून विकतो आहोत,त्यावर ऐश करत आहोत याची खर तर आपल्याला लाज वाटायला हवी.पण एकंदरीत उतरणीला लागलेल्या सामाजिक मूल्यांमुळे मनेही मुर्दाड झाली आहेत .आत्मकेंद्रित वृत्तीमुळे माणूस फक्त आजचाच विचार करतो आहे.वाढत्या जागतिकीकरणाच्या धबडग्यात माणसाचे माणूसपण हरवत चालले आहे.
       तेंव्हा,ही धरणी ओरडून सांगते आहे –“बळीराजा सावध हो, आपली काळी माय विकायला काढू नको.थोडा विचार कर! वडिलोपार्जित शेती विकून तुझी पिढी मौजमजा करेल,पण येणारी पुढची पिढी काय करेल? स्वार्थी वृत्ती सोडून दे. आपल्या आधीच्या पिढीने असलेली दौलत विकून विनाकष्ट आपले आयुष्य कसे जगता येईल असा स्वार्थी विचार केला हे कळेल तेंव्हा येणाऱ्या पिढ्या तुला माफ करणार नाहीत! तेंव्हा अजूनही वेळ गेली नाही आतातरी जागे होऊन राहिलेली शेती विकायची थांबव तुही ऐक आणि दुसऱ्याला सुध्दा जमिनी विकून येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून दे !”
धरणीमाय चा हा आक्रोश बळीराजाने आतातरी ऐकायलाच हवा! तुम्हाला काय वाटते?                                                                                                                                                                                      .................प्रल्हाद दुधाळ .

आनंदी जीवन

                                आनंदी जीवन.
                   आपले जीवन आनंदात असावे असे प्रत्येकाला वाटत असते, किंबहुना आपले जीवन सुख समाधान व आनंदात असावे यासाठीच माणसे जीवनभर अनेक प्रकारचे खटाटोप करत असतात.कुणाला वाटते की आपल्याला भरपूर संपत्ती मिळाली की त्याचे जीवन आनंदाने भरून जाईल,तर कुणाला वाटते त्याला अनिर्बंध सत्ता मिळाली की त्याच्यासारखा आनंदी तोच! कुणी गृहसौख्याला आनंदी जीवन समजते तर कुणी आपल्याच मस्तीत जगण्याला आनंदी जीवन मानत असतो! काही लोक विविध व्यसनात आपला आनंद शोधत असतात! अशा प्रकारे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, जन्मापासून ते मरेपर्यंत माणसे आपापल्या परीने आनंदी रहाण्याचा प्रयत्न करत असतात. आनंदाच्या मागे माणूस अक्षरश: धावत असतो! यात अगदी तुम्ही,मी,आखिल मानवजात असेच वागते!सर्वजण अशा आनंदी जीवनासाठी धावपळ करत असतात ! खरच मिळतो का आनंद अशा धावपळीतून? होते का आनंदी माणसाचे जीवन त्याच्या अपेक्षेप्रमाणे?
                    मला असे वाटते की, आपल्याला आनंदी व्हायचे आहे म्हणजे नक्की काय मिळवायचे आहे? हे जोपर्यंत माणूस निश्चित करत नाही तोपर्यंत तो आनंदी जीवन जगतो आहे की नाही हे ठरवणे अवघड आहे. म्हणजेच,प्रथम आपल्या आनंदाच्या कल्पना ठरवायला हव्यात.मग या कल्पना साकार झाल्या की खर तर तुम्ही आनंदी झाला असे व्हायला हवे, पण तसे होत नाही आनंद ही भावना अशी कोणत्याही व्याख्येत बसवणे अशक्य आहे! एक उदाहरण म्हणून सकाळच्या चहाचे उदाहरण घेऊ, सकाळी उठल्याबरोबर बाल्कनीत कोवळ्या उन्हात बसून चहाचे घोट घेत आजचा पेपर वाचण्यात एखाद्याला प्रचंड आनंद मिळतो असे समजू.त्या व्यक्तीला त्याच्या अपेक्षेप्रमाणे बाल्कनीत पेपर व चहा मिळाला.तो घुटके घेत चहा पीत आहे.आनंदात डुंबत दररोज असा तो चहा पीत असतो तसाच तो आजही पीत आहे पण त्याचे मन ऑफिसात आज प्रमोशनच्या ज्या ऑर्डर निघणार आहेत त्यात आपले नाव असेल की नसेल या चिंतेत आहे. मग तो आनंदी आहे असे म्हणता येईल का? तर नाही असेच म्हणावे लागेल!अशा अनेक गोष्टी मानवी जीवनात त्या त्या प्रसंगी आनंद निर्माण करत असतात! अशा प्रासंगिक आनंदाच्या कल्पना माणसाच्या  सर्वंकष आनंदी जीवनासाठी कुचकामीच ठरतात. अशा प्रासंगिक आनंदाचे अनेक क्षण प्रत्येकाच्या दररोजच्या आयुष्यात येत असतात पण त्यावरून त्या व्यक्तीचे जीवन आनंदी आहे असे म्हणणे धाडसाचे ठरू शकते! मग आनंदी जीवन कशाला म्हणायचे?        
                                आनंदी आणि समाधानी असणे ही एक मानसिक अवस्था आहे! जीवनभर आनंदी असण्यासाठी आपल्या जीवनाबद्दल त्याच्या उद्देशाबद्दल खूप अभ्यासाची गरज आहे.आपल्या जीवनात कोणत्या कोणत्या गोष्टींनी आनंद बहरू शकतो ते डोळसपणे ठरवायला हवे.तात्पुरत्या स्वरूपातील आनंदापेक्षा आपले जीवन कायम आनंदात राहील अशा कारणांची जाणीवपूर्वक यादी करायला हवी.अमक्या गोष्टीत खूप आनंद मिळेल पण त्या गोष्टीं ऐवजी अजून कशा कशामुळे तोच आनंद मिळू शकतो यावरही विचार करून ठेवायला हवा! कायम आनंदी अवस्थेत रहाण्यासाठी जीवनातले अगदी छोटे छोटे नकळत आयुष्यात येणारे आनंदी क्षणही जाणीवपूर्वक वेचता यायला हवेत.दुसऱ्याला झालेला आनंदही आपला आनंद म्हणून साजरा करता यायला हवा! घेण्यात आनंद आहेच पण काही देण्यातही आनंद असतो हे कळायला हवे. आपल्या प्रगतीमध्ये आनंद आहेच पण समाजाच्या उन्नतीमधील आनंदाचीही अंगी जाणीव हवी. कुणाला दु:खी करून आनंद मिळत असेल तर तो आनंद कामाचा नाही हे समजणारी संवेदना अंगी असायला हवी! आपल्याला मिळालेले मानवी जीवन हे भीती,चिंता,कटकटीने ग्रासलेले वा कसे तरी रडत खडत धुसफुसत ढकलण्यासाठी नसून ते आनंदात व उत्साहात प्रत्येक दिवस एक उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी आहे असे सतत मनावर बिंबवायला हवे.आयुष्यातली घडणारी प्रत्येक घटना आपल्या मनाप्रमाणे घडणे अशक्य आहे, तसेच समोर येणारा प्रत्येक माणूस आपल्याला अपेक्षित आहे तसाच वागणेही अशक्य आहे याची जाणीव ठेऊन आनंदी जीवनासाठी या जीवनातला प्रत्येक क्षण प्रसन्न कसा होईल ते बघायला हवे.आयुष्यातले येणारे चढ उतार हे जीवनाचे  अविभाज्य भाग आहे, त्यामुळे ते समोर येणारच आहेत,ते चढ वा उतार साजरे करायला शिकायला हवे. समोर येणाऱ्या  समस्येला आनंदातला अडसर न मानता अशा समस्येवर स्वार होऊन आव्हान स्वीकारण्यात मिळणारा आनंद उपभोगता यायला हवा! अशा वृत्तीने समस्या ही समस्या न रहाता एक संधी म्हणून स्वीकारली जाईल व या संधीच सोन करण्यातला आनंदही साजरा करता येईल!
                         आपल्या दैनंदिन रुटीन आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण हात जोडून उभे असतात पण आपल्या आनंदी जीवनाच्या पारंपारिक ठोकताळ्यात आपण गळ्यापर्यंत अडकलेले असल्यामुळे असे  छोटे छोटे आनंदाचे क्षण न उपभोगताच आपण जगत असतो. आभासी आनंदाच्या कल्पनाविश्वात रमत रहातो आणि जीवनातला खरा आनंद जीवनातून निसटून जातो! हे समजून घ्यायला हवे की थोडं हटके वागून प्रचंड आनंद निर्माण करता येतो.
             आयुष्यात आपल्याला जे मिळाले नाही त्यासाठी उगाच रडत वा चडफडत राहण्यापेक्षा जे समोर आहे त्यात सुख समाधान शोधून आनंदी जीवन जगण आपल्या मानसिक व शाररीक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि हे उत्तम मानसिक व शाररीक आरोग्य म्हणजेच आनंदाची गुरुकिल्ली आहे हे समजून घ्यायला हवे!
         थोडा वेगळ्या पद्धतीने  विचार केला तर ही गोष्ट लक्षात येईल.असा सकारात्मक दृष्टीकोन अंगी येण्यासाठी अगदी डोळसपणे आपल्या आनंदी जीवनाच्या कल्पना पुन्हा एकदा तपासून पहा! बघा, नुसत्या अशा उत्साही सकारात्मक विचारानेसुध्दा तुम्हाला प्रसन्न वाटत आहे! ही प्रसन्नता हा आनंद कायम कसा मिळत राहील यासाठी आजपासूनच स्वत:ला थोडं बदलायचं का?   

                                               ......................प्रल्हाद दुधाळ.