Monday, July 28, 2014

वडिलोपार्जित शेती

 वडिलोपार्जित शेती
       
      परवाचीच गोष्ट आहे, काही कामानिमित्त बसने प्रवास करत होतो.शेजारी एक पन्नाशी चे गृहस्थ्य बसले होते.सहज इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या.त्यांनी सांगितले की, एके काळी पुण्याच्या शेजारील एका गावात त्यांची पंधरा एकर बागायती शेती होती त्यांचे वडील शेती करत पण त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे भाऊ शेती विकून पैसे वाटून देण्याबद्दल भांडण करू लागले.खूप समजावले पण ते ऐकायला तयार नव्हते शेवटी दररोजच्या कटकटीना कंटाळून त्यांनी त्यांची  वंश परंपरेने आलेली  शेती एका बिल्डरला विकून टाकली व मिळालेले पैसे आपापसात वाटून घेतले.वाट्याला आलेल्या पैशातून त्या  गृहस्थ्याने  सोलापूर रोडवर थोडी शेतजमीन घेतली.शहरात एक दुकान घेऊन भाड्याने दिले आहे.एक मुलगा शेती करतो व दुसरा इंजिनअर झाला आहे.ठोस उत्पन्नाचे साधन  असल्यामुळे एकंदरीत आनंदात वाटला तो माणूस! त्याने पुढे सांगितले की" माझे ठीक आहे हो, पण माझ्या दोन्ही भावांची अवस्थ्या सध्या अत्यंत वाईट आहे! शेती विकून मिळालेल्या पैशांतून त्यांनी फक्त मौजमजा केली! प्रथम त्यांनी आलिशान मोटारी खरेदी केल्या.मुलांना  हव्या तशा किमती बाइक्स आल्या.त्यांना  हवा तेवढा पॉकेटमनी दररोज च्या दररोज मिळू  लागला.पैश्याबरोबर अंगात भरपूर  मस्ती व तोंडी उद्धट भाषा आली.अचानक भरपूर पैसा आल्यामुळे 'असतील शिते तेथे जमतील भुते'  या न्यायाने आजूबाजूला मतलबी लोकांचा वावर वाढला. समाजात त्यांना मान मिळू लागला.मग या अचानक मिळालेल्या प्रतिष्ठेपायी पाण्यासारखा पैसा खर्च  व्हायला लागला.घरात नको एवढी किमती वस्तूंची खरेदी होऊ लागली.सर्व कुटुंब छानछोकीत राहू लागले.आपल्याला काहीच कमी नाही अशा समजुतीत पैसा उधळला जाऊ लागला.बाप व मुले दोघानाही दारूचे व्यसन लागले.ढाब्यांवर पार्ट्या व डान्सबारवर पैसा खर्च व्हायला लागला.अनेकांनी अनेक प्रकारे समजावले पण त्यांचेवर काही परिणाम झाला नाही.आपल्याच मस्तीत दोन्ही भाऊ व त्यांचे कुटुंबीय होते.आपल्या समजदार भावाला ते आपला शत्रू समजू लागले.शेवटी व्हायचे तेच झाले! हळू हळू शिल्लक पैसा कमी कमी होत गेला.आणि शेवटी लागलेल्या व्यसनांपायी सुरुवातीला गाड्या मग दागिने व शेवटी रहाते घर विकून मिळालेला पैसासुध्दा उधळला गेला.कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले. आज त्या दोन्ही भावांना भाड्याच्या झोपडीत राहावे लागत आहे! .काहीही उत्पन्न नाही.कुठलेही काम न करता ते चोवीस तास नशेत असतात!मुले वाईट संगतीत आहेत.बायका मोलमजुरी करून कसेबसे या सर्वाना पोसत आहेत!" शेजारील माणसाने सांगितलेले हे प्रखर वास्तव ऐकल्यावर मन सुन्न झाले.आपली वडिलोपार्जित शेती विकून माणसे अशी देशोधडीला का लागतायेत?  
        सध्या वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमिनीचे झपाट्याने रहिवाशी पट्ट्यात रुपांतर होत आहे. वाढत्या शहरांचा आजूबाजूच्या गावात विस्तार होत आहे.शहरांकडे माणसांचे लोंढे वाढतायेत आणि या वाढत्या लोकसंखेच्या गरजा भागविताना  शेतजमीन कमी कमी होत चालली आहे.त्यातच शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय आहे असा मतप्रवाह वाढत आहे.शेतीत राबण्यापेक्षा आपली परंपरेने आलेली शेती विकून रोकडा पैसा मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.शेती व्यवसाय भरवशाचा नाही,आणि  हा कमीपणाचा व्यवसाय असे मानणाऱ्या नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी आपल्याकडील वडिलोपार्जित शेती विकण्याचा सपाटा लावला आहे.अनेक जमीन माफिया लोकांच्या या मानसिकतेचा पुरेपूर फायदा उठवीत आहेत.पैशाच्या व त्या निमित्ताने येणाऱ्या तात्कालिक ऐश्वर्याच्या  मोहाला  शेतकरी बळी पडत आहे व आपल्या जमिनी विकून टाकत आहेत!
                 हे खरे आहे की,आपल्याकडील धोरणांच्या दुष्काळामुळे शेती करणे भरवस्याचे राहीले नाही..अंगमेहनती चे कष्ट करण्याची नव्या पिढीची तयारी नाही त्यामुळे शेतीसाठी लागणारे मनुष्यबळ सहजासहजी उपलब्ध होत नाही.शेती या व्यवसायाला समाजात पुरेशी प्रतिष्ठाही मिळत नाही.शेती करणाऱ्या मुलाना लग्नासाठी कुणी मुली देत नाही हे वास्तव आहे!त्यामुळे आपली  वडिलोपार्जित शेती विकुन रोकडा पैसा उभारण्याची प्रवृत्ती वाढते आहे.शहरांच्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावापर्यंत ही वृत्ती पसरली आहे.असा विनाकष्ट व अचानक मिळालेला पैसा कसा व कुठे वापरावा याची अक्कलच नसल्यामुळे  तो नको तेथे उधळला जातो आहे. थोडे दिवस या पैशातून खरेदी केलेल्या  जाड जाड सोनसाखळ्या, हातात जाड कडी घालून मिरवले जात आहे. महागड्या गाड्या, महागडी कपडे, हौस मौज यात हा पैसा अक्षरशः उधळला जात आहे.ढाब्यांवर व डान्सबार वर दौलतजादा  करून नोटांच्या थप्प्या उधळल्या जाताहेत.व्यसनांच्या आहारी जाऊन  क्वचित अपवादात्मक उदाहरणे सोडता अशा प्रकारे बहुसंख्य शेतकरी जमिनी विकून देशोधडीला लागले आहेत.हा पैसा हळूहळू संपत जातो आणि लागलेल्या वाईट सवयीमुळे पिढ्या बरबाद झाल्या आहेत आणि होत आहेत.अशी अनेक उदाहरणे पहायला मिळत आहेत की दहा पंधरा वर्षापूर्वी  मुबलक शेतीचा मालक असलेला शेतकरी आपली जमीन  विकून त्याच जमिनीवर बांधल्या गेलेल्या  हौसिंग सोसायटी च्या गेटवर चौकीदाराचे जिणे जगतो आहे! त्याची अर्धांगिनीला नाईलाजाने चार घरची धुणीभांडी करावी लागत आहेत!  विदारक असले तरी  हे  चित्र अगदी खरे आहे! 
             आपला  परंपरागत शेतीचा व्यवसाय गुंडाळून शेती विकायला माणस कशी काय तयार झाली? मला असे वाटते की वाढते शहरीकरण.शेतीचा बेभारवशाचा व्यवसाय, शेतमजुरांची चणचण,वाढता भांडवली खर्च व त्याच्या वसुलीचा नसलेला भरवसा.सुशिक्षित तरुणांचा शेतीबाबत अनुत्साह अशा अनेकविध कारणांनी शेती करण्याऐवजी ती विकून आयता पैसा उभारण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.कृषिप्रधान भारतात शेती व्यवसायाला समाजात मिळायला हवी तेव्हढी प्रतिष्ठा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे,पण याचा अर्थ शेतीचे महत्व कमी झाले आहे असे थोडेच आहे? आपल्या मागच्या पिढ्यांनी कष्ट करून आपल्या हाती सोपवलेली शेती आपण तात्कालिक पैशाच्या मोहाला बळी पडून विकतो आहोत,त्यावर ऐश करत आहोत याची खर तर आपल्याला लाज वाटायला हवी.पण एकंदरीत उतरणीला लागलेल्या सामाजिक मूल्यांमुळे मनेही मुर्दाड झाली आहेत .आत्मकेंद्रित वृत्तीमुळे माणूस फक्त आजचाच विचार करतो आहे.वाढत्या जागतिकीकरणाच्या धबडग्यात माणसाचे माणूसपण हरवत चालले आहे.
       तेंव्हा,ही धरणी ओरडून सांगते आहे –“बळीराजा सावध हो, आपली काळी माय विकायला काढू नको.थोडा विचार कर! वडिलोपार्जित शेती विकून तुझी पिढी मौजमजा करेल,पण येणारी पुढची पिढी काय करेल? स्वार्थी वृत्ती सोडून दे. आपल्या आधीच्या पिढीने असलेली दौलत विकून विनाकष्ट आपले आयुष्य कसे जगता येईल असा स्वार्थी विचार केला हे कळेल तेंव्हा येणाऱ्या पिढ्या तुला माफ करणार नाहीत! तेंव्हा अजूनही वेळ गेली नाही आतातरी जागे होऊन राहिलेली शेती विकायची थांबव तुही ऐक आणि दुसऱ्याला सुध्दा जमिनी विकून येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून दे !”
धरणीमाय चा हा आक्रोश बळीराजाने आतातरी ऐकायलाच हवा! तुम्हाला काय वाटते?                                                                                                                                                                                      .................प्रल्हाद दुधाळ .

No comments:

Post a Comment