Tuesday, December 27, 2016

तरुणाई.

तरुणाईला का झोडपता?
    माझ्या ऑफिसातल्या  बहुतेक मंडळीनी वयाची पन्नाशी पार केलेली आहे.काहींच्या पाल्यांचे शिक्षण चालू आहे तर काहींची मुले नोकरी धंद्यालाही लागली आहेत.दोनतीन जणांच्या मुलांचे तर दोनाचे चार हातही झाले आहेत.गप्पांमध्ये साहजिकच मुलाबाळांचा विषय असतो! मी एक गोष्ट कायम बघत आलो आहे की, अशा गप्पांमधे क्वचितच कुणी आपल्या मुलांबद्दल कौतुकाचे चार शब्द बोलतो.बहुतेकजण मुलांच्या तक्रारींचा पाढाच जास्त करून वाचत असतात! या तक्रारींमध्ये साधारणपणे काही समान मुद्दे असतात.या लोकांचे म्हणणे असते -“आपल्या मुलांसाठी आपण कितीतरी खस्ता खाल्ल्या,आयुष्यात काटकसर केली,प्रसंगी हौसेमौजेला मुरड घालून मुलांसाठी काय काय केले याची यादीच मग वाचली जाते. सध्याची तरुण मुले-मुली कशी बेजबाबदार आहेत आणि यांच्या वयात आपण किती आणि कसे वडिलधाऱ्यांच्या धाकात रहायचो ,किती जबाबदारीने वागत होतो याचे दाखले देत आजची तरुणाई कशी स्वैर वागते याची सोदाहरण चर्चा होत रहाते”
     अशावेळी साधारणपणे एका बाबीवर या पालक मंडळींचे एकमत होत असते की, “सध्याच्या तरुणाईला विनाकष्ट सगळ्या सुखसोयी मिळाल्या आहेत.फारशी झळ न लागता व सहजासहजी सर्व हवे ते मिळाल्यामुळे या तरुण मुलांना पैसा आणि नातेसंबंध या दोन्हीचीही मुळीच किंमत नाही.”
थोडक्यात काय तर आजची तरुणाई काही अपवाद सोडले तर पार बिघडलेली आहे!
     जरा शांतपणे विचार करून बघा, खरच आजची तरुणाई एवढी बेजबाबदार आहे?
मला वाटते हे बरोबर नाही! आम्ही समजतोय तेवढी वाईट परिस्थिती नक्कीच नाही.आजचा तरुण वर्ग थोड्या मुक्त विचारांचा आहे तो वास्तव जगात वावरतो हे खरे असले तरी एवढ्यावरून तरुणाईला ‘स्वैर’,’बेजबाबदार’ किंवा ‘उध्दट’ अशी लेबले लावणे चुकीचे आहे .प्रचंड बुध्दिमत्ता,कल्पकता, तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता व अमर्यादित उर्जा असलेल्या आजच्या तरुणाईकडे गगनाला गवसणी घालण्याची क्षमता आहे हे कबूल करायलाच हवे.तरुणाईचे मूल्यमापन करताना आधीची पिढी चुकीचे मापदंड वापरते आहे असे मला वाटते. त्यातूनही काही प्रमाणात दोष तरुण पिढीत आहेत असे गृहीत धरले तर या दोषांसाठी कोण जबाबदार आहे ? मला असे वाटते की मुळात आजची पन्नाशीच्या पुढची पालक पिढी आणि आजची तरुणाई यांच्या जीवनाची तुलनाच होवू शकत नाही कारण या दोन पिढ्या संपूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या आहेत.तीस चाळीस वर्षापूर्वीची तरुणाई आज जी पालकांच्या भूमिकेत आहे त्यांच्या वेळची सामाजिक व आर्थिक परिस्थिती आजच्यापेक्षा पूर्णत: भिन्न होती त्यावेळच्या समस्यांचे स्वरूप वेगळे होते आयुष्याच्या  प्राथमिकता वेगळ्या होत्या आजच्या तरुणांना ज्या गोष्टीना सामोरे जावे लागते आहे त्याचा त्या काळात मागमूसही नव्हता हे वास्तव प्रथम मान्य करायला हवे.त्या काळी शिक्षणाचा प्रसार आजच्या मानाने मर्यादित होता.आज सर्व क्षेत्रात पदोपदी जाणवणारी स्पर्धा त्या काळात फारशी नव्हती.माणसांच्या मुलभूत गरजा कमी होत्या आणि उपलब्ध साधनसामग्रीमधे त्या भागत होत्या.त्या वेळी एकत्र कुटुंबात कुटूंबप्रमुख सर्वासाठी निर्णय घ्यायचे आणि कुटुंबातील इत्तर सदस्यांवर शक्यतो त्या बाबतीतला ताण पडायचा नाही.आज नोकरी धंद्यानिमित्त झालेले स्थलांतर तसेच इत्तर अनेक कारणास्तव कुटुंबे छोटी झाली.हम दो हमारे दो चा जमाना मागे पडला आणि एकुलत्या एका अपत्यावर लोक समाधानाने राहू लागले.माणसे आत्मकेंद्रित झाली. चाळसंस्कृती अथवा वाडा संस्कृतीचा ऱ्हास झाला.घरे छोटी कुटूंब छोटे आणि मनेही संकुचित झाली ती याच काळात! आज पन्नाशी-साठीत असलेल्या मंडळीनीच या बदलाचा त्यावेळी अंगीकार केला.त्यावेळी थोडेफार शिकलेल्या व्यक्तीला सहज नोकरी मिळायची.सरकारी नोकऱ्या मुबलक उपलब्ध होत्या.पुढच्या  काळात  मनुष्यबळावर जी कामे व्हायची ती संगणकावर  होवू लागली आणि सुरक्षित नोकऱ्यांच्या संधी कमी कमी होत गेल्या.प्रचंड संख्येने  शिकून बाहेर पडलेल्या तरुणांना केवळ खाजगी नोकऱ्यांचा पर्याय समोर होता.उपलब्ध नोकऱ्या आणि प्रचंड इच्छुक यामुळे प्रचंड प्रमाणात स्पर्धा आली या जीवघेण्या स्पर्धेत टिकायचे तर आपले ज्ञान अद्यावत पाहिजे त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली.आयटी व तत्सम नोकऱ्यांचे त्यामधील पगाराच्या आकर्षक आकड्यांमुळे आकर्षण वाढले. हातात प्रचंड पैसा आल्यामुळे आपोआपच राहणीमान सुधारले आणि हे राहणीमान त्याच स्तरावर टिकून ठेवण्यासाठी ’पळा पळा कोण पुढे पळे तो’ अशी जीवघेणी शर्यत सुरू झाली. धकाधकीच्या जीवनात ताण तणाव वाढले. तरुणाई या ताणाची पहिली शिकार झाली.विलक्षण  बुद्धीमत्ता लाभलेल्या या तरुणाईला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पळावे लागते आहे.बारा ते पंधरा तास बौद्धिक स्वरूपाचे काम केल्यानंतर दमछाक तर होणारच.या स्पर्धेत आपल्या पाल्याचा  निभाव लागायला हवा म्हणून पालक मंडळीनीच फक्त मार्कांना महत्व दिले. मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा,त्याला मूल्याधिष्ठित संस्कार मिळायला हवेत या बाबींपेक्षा त्याला या रेससाठी तयार करण्याचे काम याच पालक मंडळीनी केले. या संस्कारात तयार झालेली आजची तरुणाई भरपूर शिकली, पालकांच्या अपेक्षेप्रमाणे मुबलक पैसा कमवायलाही  लागली. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास केला केला म्हणूनच तुम्हाला अपेक्षित असे त्यांचे करिअर घडले.तुम्ही जसे त्यांना घडवले तसेच ते घडले मग आता ते बिघडले असे तुम्ही कसे काय म्हणू शकता?
     म्हणून मला वाटते की आजच्या तरुणाईला स्वत:च्या तराजूत तोलू नका त्यांना कोणताही दोष देण्यापूर्वी विचार करून पहा की आपण त्याची जोपासना करताना काय काय द्यायला विसरलो! एकुलता एक म्हणून त्याचे नको इतके लाड कुणी केले? आपल्याला लहानपणी मिळाली नव्हती असा विचार करून त्याने हट्ट केलेली प्रत्येक वस्तू कुणी घेवून दिली? अभ्यासात व्यत्यय नको म्हणून खेळायला किंवा त्याच्या आवडत्या छंदाला लगाम कोणी घातला? बिघडेल म्हणून आजूबाजूंच्या मुलांमध्ये जायला त्याला कोणी रोखले? आपल्याला मिळाला नव्हता म्हणून भरपूर पोकेटमनी त्याला कोणी दिला? तुम्हाला त्याला द्यायला वेळ नव्हता,त्याच्यासाठी सकस जेवण तयार करून द्यायला वेळ नव्हता म्हणून बाहेरचे खायला  त्याला कुणी सांगितले? सुट्टीत आजीआजोबा किंवा नातेवाईक यांच्यात सोडण्याऐवजी त्याला कुठल्यातरी संस्कार वर्गात/वेकेशन क्लासला घालायचा अट्टाहास कुणी केला?
    मान्य आहे की तुम्ही शून्यातून तुमचे विश्व साकारले.काडी काडी जमवून घरटे सजवले.कवडी कवडी काटकसर करून मुलांना शिकवले, स्वत:च्या पायावर उभे केलेत मग आता तुम्ही त्यांनी तुमच्यासारखे वागायला हवे,काटकसर करायला हवी अशी अपेक्षा का करताय? तुम्ही पंख दिलेत आता त्यांना त्यांच्या पद्धतीने उडू द्या की! तिथेही तुम्ही त्यांना अडथळा का ठरता? उलट भव्य भरारी घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.त्यांच्या कर्तुत्वाला वाव द्या.चुकतील तेथे मार्गदर्शन करा पण असेच वाग म्हणून अट्टाहास करू नका. ही तरुणाई हुशार आहे, त्यांच्या हुशारीला दाद द्या आणि बघा आयुष्यातली सगळी आव्हाने ते किती लीलया पेलाताहेत!

      ................ प्रल्हाद दुधाळ. (९४२३०१२०२०)

Sunday, December 11, 2016

दौलतजादा .

पुर्वी गावाकडे नवरात्रात देवळासमोर लोककलावंत आपली हजेरी लावायला यायचे. त्या दहा दिवसाच्या उत्सवात तमाशा कलावंतही लोकांच्या मनोरंजनासाठी नाचगाणी करत असायचे. एक ढोलकीवाला, एक पेटीवादक व दोन तीन कलावतीणी असा हा ताफा असायचा .काही  शौकीन मंडळी तेथे नाचनाऱ्या व गाणाऱ्या त्या तमाशा कलावंतीना दौलतजादा करायचे. हे शौकीन हातात त्या काळी रुपया दोन रुपयांचे बंडल घेवून बसायचे. कलावंतीण नाचत आणि लावणी म्हणत त्या शौकीन धेंडासमोर यायची, तो एकावेळी एकच नोट तिच्या हातावर ठेवायचा ती नोट घेवून ती नाचत नाचत जावून पेटीवादकाच्या जवळ ठेवायची.पुन्हा गाणे  गात व नाचत त्या शौकिनासमोर जायची. तो आनखी एक नोट  तिच्या हातात सरकावायचा,परत ती नाचत नाचत पेटीवाल्याकडे यायचीत्या शौकीन माणसाकडील सगळ्या नोटा  संपेपर्यंत हा खेळ ( का छळ!) चालत रहायचा! मग दुसरा एखादा शौकीन हाच खेळ करत रहायचा! मध्यरात्रीपर्यंत त्या कलावंतीणीची पार दमछाक झालेली असायची! सध्या सामान्य  लोकांची अवस्था नेमकी त्या नाचगाणी करणाऱ्या कलावंतीणी सारखी झाली आहे. पळत पळत बॅंकेत  किंवा पैसे असतील त्या एटीएमवर जायचे दोन हजाराची नोट मिळवायची नाचवत नाचवत घरी न्यायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच तिकीटावर(डेबीटकार्ड  / क्रेडीटकार्ड/ चेकबूक) तोच खेळ!
गेला महिनाभर कधी नोट मिळतेय तर कधी रिकाम्या हाताने पळावे (नाचावे) तर लागतेच आहे! हो की नाही?
....... प्रल्हाद दुधाळ .

एका जिध्दीची कहाणी

  एका जिद्धीची गोष्ट...
       ही गोष्ट एकोणिसशे एकोण्णवदची आहे.माझ्या टेलिफोन इन्स्पेक्टर या पदावर झालेल्या  प्रमोशननंतर  मला मुंबईत बांद्रा येथे सहा महिन्याचे एक ट्रेनिंग पुर्ण करावे लागणार होते. खात्यातर्फे आमची  या ट्रेनिंगच्या काळात रहाण्याची सोय सहारा येथील खात्याच्या क्वार्टर्समधे केलेली होती.
  चार जणात आम्हाला दोन बेडरूमची एक क्वार्टर रहायला  दिलेली होती. मला ज्या क्वार्टरमधे जागा मिळाली होती  तेथे माझ्याबरोबर एक सिल्वराज नावाचा तामीळभाषीक व्यक्ती रहाणार होता. टिपिकल मद्रासी असलेल्या या सिल्वराजला फक्त  तामीळ भाषा  व काही प्रमाणात इंग्रजीशिवाय  कोणतीच भाषा येत नव्हती.
     सिल्वराजला हिंदी भाषेचा किंचितही गंध नव्हता त्यामुळे त्याच्याशी संवाद साधणे आम्हालाच काय; पण बांद्रा ट्रेनिंग सेंटरच्या इन्स्ट्रक्टर लोकांनाही अवघड जात होते.त्यात तो नेमका माझा रूममेट होता, त्यामुळे त्याला माझ्याशी आणि मला त्याच्याशी बोलणे अगदी  आवश्यकच  झाले होते!.
    तो त्याच्या त्या तामीळी हेलात व मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत मला सतत काहीतरी विचारत राहायचा आणि मी माझ्या मराठी स्टाईल इंग्रजीत त्याची उत्तरे द्यायचा प्रयत्न करायचो!
    लवकरच अशा तोडक्या मोडक्या का होईना होणाऱ्या संवादामुळे आम्ही दोघे चांगले मित्र झालो.त्याला उत्तम तांत्रिक ज्ञान होते;पण भाषेची समस्या त्याला चांगलीच सतावत होती.त्याचे प्रमोशन हे महाराष्ट्र सर्कलच्या वेकन्सी साठी होते त्यामुळे ट्रेनिंग नंतर त्याला  महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यात राहून काम करावे लागणार होते!
     याला मराठी वा हिंदी शिकल्याशिवाय महाराष्ट्रात कसे काय काम करता येणार? तो पब्लिकशी कसा बोलेल? बोलताना काय काय मजेशीर प्रसंग घडतील? यावरून सगळे ट्रेनीज त्याची चेष्टा करायचे आणि खो खो हसायचे. त्याला आमची भाषाच समजत नसल्याने   केलेली मस्करीही त्याला समजायची नाही, आणि तोही आम्ही हसतोय ते पाहून काहीतरी जोक झाला असेल असं समजून हसायचा!
     एकदा ट्रेनिंग सेंटरच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्याला भर क्लासमधे येवून हिंदी येत नाही यावरून  भरपूर फायरिंग केले.ते त्याला चांगलेच फटकारत होते...
" इफ यू आर नॉट एबल टू  अंडरस्टॅन्ड लोकल लॅंग्वेज; देन हाऊ यू कॅन वर्क इन व्हिलेज? यू मस्ट लर्न हिंदी, ऑदरवाईज यू विल बी सेंट बॅक टू चेन्नई ऑन युवर ओरिजनल पोस्ट, यू विल नॉट गेट प्रमोशन!"
   हे फायरिंग सिल्वराजच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.त्या दिवशी  तो रात्रभर खूपच अस्वस्थ होता. सकाळी मी त्याला समजावले ..
" यू कॅन लर्न हिंदी इजिली, डोंट टेक टेंशन,व्हाटएव्हर आय कॅन डू फॉर यू,आय विल हेल्प यू फॉर द सेम !"
  मी दिलेल्या मानसिक आधाराने तो थोडा शांत झाला.
       दुसऱ्या दिवशी तो मला घेवून मुंबईच्या फोर्ट एरियात गेला.त्याने पुस्तकांच्या दुकानातून व फुटपाथवरून माझ्याशी सल्लामसलत करून हिंदीची अगदी प्रायमरी लेवलची व  देवनागरी लिपीच्या अक्षरओळखीपासूनची पुस्तके खरेदी केली.हिंदी अंकलिपी,इंग्रजी ते हिंदी दररोजच्या वापरातला शब्दकोश तसेच सोप्या सोप्या भाषांतराची तसेच चित्ररूप गोष्टींची अशा भरपूर पुस्तकाची खरेदी त्याने त्या दिवशी केली!
   दुसऱ्या दिवशी त्याने ट्रेनिंग क्लासमधे समोर जाऊन डिक्लेअर केले ...
" लिसन, आय टेल यू विथ चॅलेंज दॅट- आय विल स्पिक फ्ल्युएंट हिंदी विथिन ए मंथ!"
सगळा क्लास त्याच्या त्या चँलेंजने चिडीचूप झाला....
    आणि मग सिल्वराजने ट्रेनिंगचा अभ्यास सोडून रात्रंदिवस फक्त हिंदीच शिकायचा ध्यास घेतला. क्लासमधे भेटेल त्याला इंग्रजी शब्दांचे हिंदी प्रतिशब्द,त्या शब्दांचे वाक्यात उपयोग इत्यादी गोष्टी विचारत होता.जे काही समजेल ते आत्मसात करत होता.प्रश्न विचारून विचारून त्याने मला आणि बाकी रूम पार्टनर्सना अगदी भंडावून सोडले होते...
   खरं सांगतो ,त्याच्या त्या इंग्लिश टू हिंदी आणि हिंदी टू इंग्लिश कसरतीमुळे मलाही दोन्ही भाषांचा चांगलाच सराव झाला!
     पंधरावीस दिवसातच तो दिसेल त्याच्याशी मोडके तोडके हिंदी बोलू लागला.
     एकेकाळी हिंदीचा बिल्कूल गंध नसलेला सिल्वराज लवकरच चांगले हिंदी बोलू लागला, समजू लागला.त्याची ती जिध्द खरच वाखाणण्याजोगी होती!
    कमाल म्हणजे ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी  सिल्वराजने चक्क हिंदीतून आपले मनोगत व्यक्त केले!
   ट्रेनिंग सेंटरच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्याच्या या प्रगतीचे खास कौतुक केले!
         पुढे त्याचे पोस्टींग गोव्यात झाले.पाचेक वर्षे तो महाराष्ट्र सर्कलमध्ये राहीला आणि पुढच्या प्रमोशनच्या वेळी तामिळनाडूला बदली घेवून गेला....
    त्याच्याशी पुढे संपर्क राहिला नाही;पण जिद्ध असेल तर माणसाला अशक्य काहीच नाही याचं जितंजागतं उदाहरण म्हणून सिल्व्हराज कायमचा लक्षात राहिला...
    ©प्रल्हाद दुधाळ.

Thursday, December 8, 2016

एका फोटोचा किस्सा .

एका फोटोचा किस्सा ....
आज सकाळी सकाळी मोबाईलवर एक कॉल आला. अनोळखी नंबरवरून तो आला होता.
मी फोन घेतला " हॅलो"
" आपण प्रल्हाद दुधाळ बोलताय का?"
" हो आपण कोण?"
" मी xxx मासिकाचे जुने अंक चाळत होतो त्यात तुम्ही लिहिलेली " ठेविले अनंते" ही कथा वाचली. छान लिहिली आहे."
" धन्यवाद." मी आभार मानले.
" मला सांगा, ही काल्पनिक कथा आहे की खरचं घडलेली आहे?"
" मी शाळेत असताना अशी घटना घडली आहे त्यामुळे ती सत्यकथाच आहे पण थोडाफार मसाला लावून व स्थळ व नावे बदलून ती लिहिली आहे ." मी.
" खूप छान उत्कंठावर्धक कथा आहे तुमची! शेवट तर एकदम कलाटणी देणारा आहे. तो किर्तनकार दरोडेखोरांना सामील म्हणजे खरचं अध्यात्माला काळीमाच की!"
" धन्यवाद, आपण आवर्जून प्रतिक्रिया कळवलीत,खूप आनंद झाला, मी खूप आभारी आहे आपला."
" छानच आहे कथा,  बरं आता मला अजून एक सांगा, कथेच्या बाजूला तुम्ही फोटो छापला आहे तो तुम्ही कोठून घेतलाय?"
" कथेवर ना माझाच  फोटो आहे की ?"
" तो नाही हो, तो दुसरा फोटो म्हणतोय मी!"
" तो किर्तनकाराचा का? तो मी नाही दिलेला,कथेला साजेसा म्हणून संपादकानी निवडला असेल तो, किंवा  गूगलवरून घेतला असेल, का हो?"
" काही नाही, मी एक किर्तनकार आहे  आणि काही महिन्यांपुर्वी माझा बालगंधर्वमधे किर्तनाचा कार्यक्रम झाला होता , त्या वेळचा माझा फोटो आहे तो! थोडा अस्पष्ट करून तो घेतलाय त्यामुळे इत्तराना समजणार नाही पण माझा फोटो मी ओळखारच ना !"
एकंदरीत मोठाच  प्रॉब्लेम झाला होता.आता काहीतरी सारवासारव तर करायलाच हवी होती. मी थोडा दिलगिरीचा सुर लावला ...
" बाप रे, तो तुमचा फोटो आहे! तुम्ही हर्ट झाला असाल तर संपादकांच्या वतीने मी माफी मागतो, पण मला वाटते की त्यांचाही हेतू वाईट नसावा, कथेला पुरक म्हणून कीर्तनकाराचे  एक चित्र एवढाच त्या फोटोला अर्थ आहे शिवाय त्या फोटोतला चेहरा एकदम अस्पष्ट आहे ."
" नाही ते ठिक आहे. दिलगीरी नको , माझा फोटो कितीही अस्पष्ट असला तरी मला ओळखता येणारच ना ! फोटो  पाहून प्रथम मला वाटले की तुम्ही माझ्यावर लेख लिहिलाय,पण प्रत्यक्षात ही वेगळीच कथा निघाली! बाय द वे पुस्तक बिस्तक छापलय की नाही कथांच ?"
" दोन कविता संग्रह झालेत बघू भविष्यात कथासंग्रहही होईल!"
" तुम्हाला शुभेच्छा, बर झाल त्या निमित्ताने ओळख झाली, बाय द वे मी कीर्तनकार देव , सेव करून ठेवा नंबर"
" हो सर, धन्यवाद!"
यापुढे असा कुणाचा फोटो वापरायचा तर विचार करायला हवा !
 तो माणूस चांगला होता म्हणून ठिक,नाही तर ....

..... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, November 30, 2016

नोटबंदीचे टेंशन .

काल एका नातेवाईकाच्या घरी गेलो होतो. त्यांची इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेली मुलगी घरीच होती.तिच्याबरोबर एक मैत्रिणही होती.
" काय मग संपली का परिक्षा? कसे होते पेपर्स?"
मी चौकशी केली.
" हो काका आजच शेवटचा पेपर झाला. एकदम छान झाले पेपर!"
" छान, आणि ही मैत्रीण का?"मी तिच्या मैत्रिणीबद्द्ल विचारले.
" जी हा अंकल हम दोनो एक ही क्लास मे पढते है." ती उत्तर भारतीय मुलगी बोलली.
" आपकी कैसी रही परिक्षा?"
" क्या कहे अंकल पुरी परिक्षा अलग से टेंशन मे गयी!"
" क्यों, स्टडी नही किया था क्या?"
" वो बात नही अंकल, पेपर्स तो अच्छे लिखे है लेकीन इस दौरानही पाचसो हजारके नोट बंद हुये ना उसकी वजहसे स्टडी छोडके अलगही समस्या झेलनी पडी!"
" क्यों , क्या हो गया?"
" अंकल ऐसा हूआ की महीने के खर्चे के लिये पापाने पाच हजार बॅंक खाते मे भेज दिये थे. सात तारीख को मैने एटीएमसे पैसे निकाले सब पाचसो के नोट थेआठ तारीख को नोट बंद हो गये और चाय मिलना भी मुश्किल हो गया! पाचसो के  नोट पर्स मे थे लेकिन खर्चा कर नही कर पाये.चाय नही, खाना नही उपर से परिक्षा चालू थी, बॅंक मे भी जाये तो कैसे जाये,और खाली पेट स्टडी करना भी मुश्किल हो गया!" तिला रडू फुटले.
डोळे पुसतच ती पुढे सांगू लागली.
" श्वेता ने मेरी हालत देखी और तबसे वह मुझे अपने घर लेकर आयी, यह फ्रेंड नही रहती तो मेरा क्या होता भगवान ही जाने!"
तिच्या शब्दा शब्दात कृतज्ञता भरली होती.
नोटाबंदीच्या या परिणामाबद्द्ल कधी विचारच मनात आला नव्हता!
मी निशब्द झालो ...
...
... प्रल्हाद दुधाळ.

Friday, November 25, 2016

देश बदल रहा है.....

देश बदल रहा है.....
सकाळी सकाळी ऑफिसला जायची गडबड होती.घराबाहेर पडणार होतो तेव्हढ्यात दररोज गाडी पुसणारा अर्जुन दारात आला.दररोज पार्किंग मधील गाड्या पुसायचे काम तो करतो व महिन्याला ठरलेली रक्कम घेवून जातो.
" साहेब या महिन्याचे पैसे द्या ना."
नोटाबंदी झाल्यापासून अशी किरकोळ देणी देणे फारच अवघड झाले आहे.काटकसरीने दिवस काढणे चालू आहे त्यामुळे त्याला आता काय सांगायचे हा प्रश्नच पडला होता.
"अरे शंभर पन्नासच्या नोटा नाहीत,दोन हजाराचे सुट्टे आहेत का?"
"नाही हो साहेब."
"बर मग बँकेत अकाऊन्ट असेल ना, त्याचा नंबर दे,आजच तुझ्या खात्यावर साडेचारशे रुपये ट्रान्स्फर करून टाकतो ."
" साहेब सुट्टे नाहीत तर पेटीएम आहे का तुमचे?"
" तुझ्याकडे आहे का पेटीएम?" मी आश्चर्याने त्याला विचारले.
" हो साहेब आहे ना, करा पेटीएमने पेमेंट,चालेल मला."
" सांग तुझा मोबाईल नंबर."
त्याने मला त्याचा मोबाईल नंबर दिला मी माझ्या वालेट मधे त्याचा नंबर टाकला आणि दोन मिनिटाच्या आत त्याच्या वालेटमधे पैसे जमा झाले!
खरंच नोटाबंदी करायला हवी होती का नव्हती याच्यावर कितीही मतमतांतरे असोत,त्या वादात मला पडायचे नाही पण त्या निमित्ताने गाड्या धुणारा कष्टकरी अर्जुन पेटीएमने त्याची मजुरी स्वीकारू लागलाय!
हा बदल नक्कीच महत्वाचा आहे!
बदल नक्कीच होतो आहे!
काय वाटतंय तुम्हाला?
................ प्रल्हाद दुधाळ.

Monday, November 21, 2016

भुताटकी.

भुताटकी.

       ते १९८३ साल होते.टेलिफोन खात्यात त्या काळी टेलिफोन ऑपरेटर म्हणून मी नोकरी करत होतो.वेगवेगळ्या शिफ्टमधे ड्युटी करावी लागायची.मी नोकरी करून शिकतही होतो त्यामुळे जास्त करून दुपारची किंवा रात्रीची शिफ्ट करायचो.त्या काळी आजच्या सारखी एसटीडी वा मोबाईलची सोय नव्हती त्यामुळे ट्रंककॉलचे बुकिंग करूनच बाहेरगावी बोलायला लागायचे आणि हे ट्रंक टेलिफोन एक्स्चेंज मी जेथे काम करायचो त्याच बिल्डिंगमध्ये होते.विशेष म्हणजे या ट्रंकएक्स्चेंजमधे सगळ्या शिफ्टमध्ये फक्त लेडीज टेलिफोन ऑपरेटर्सच काम करायच्या.रात्रंदिवस तेथे ट्रंककॉल लावून द्यायचे काम चालू असायचे.रात्री बारा वाजता ड्युटी संपणाऱ्या लेडीजसाठी त्याच बिल्डींगमधे रात्री झोपण्याची सोय केलेली होती.रात्री बारानंतरसुध्दा सुमारे शंभरेक लेडीज तेथे काम करायच्या.

       एक दिवस आवई उठली की या ट्रंक एक्स्चेंजमधील मागच्या बाजूला रात्रीच्या वेळेस भूत दिसले!त्या रात्री ड्युटीवर असलेल्या दोनतीन लेडीजना ते भूत दिसले होते आणि भूत बघून त्या एवढ्या घाबरल्या की त्यातली एक तापाने आजारी पडली.बाकीच्या “आम्ही आता नाईट ड्युटी करणारच नाही” असे म्हणू लागल्या.दुसऱ्या दिवशीही भूत दिसल्याचे अजून काही लेडीज सांगायला लागल्या त्याही खूप घाबरलेल्या होत्या. आठवडाभरात या भूताच्या अफवेने स्टाफमधे घबराट पसरली.ज्यांना नाईट ड्युटी लागेल त्या लेडीज कामावर गैरहजर राहू लागल्या.रात्रीच्या ट्रंककॉल्सवर याचा परिणाम व्हायला लागला.”भूतबीत काही नसते!” असे एरवी छातीठोकपणे सांगणाऱ्या अनेक लेडीज घाबरून नाईट ड्युटीपासून लांब पळायला लागल्या.दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत राहिले. रात्रंदिवस तेथे कडक सिक्युरिटी व्यवस्था असूनही नाईट ड्युटी करायला कुणी तयार होत नव्हते.

“रात्री साडेबाराच्या सुमारास एक प्रचंड मोठी सावली मागच्या कायमच्या बंद असलेल्या खिडक्यांच्या दुधी काचांवरून पुढे पुढे सरकत जाते,ती सावली एवढी मोठी असते,की एक्स्चेंजमधे काम करणाऱ्या लेडीजची घाबरून घाबरगुंडी उडायची.आपले काम सोडून त्या दुसऱ्या खोलीत निघून जायच्या.रात्र रात्र थरथरत बसून राहायच्या.मागच्या बाजूला एक जुना पारशी माणसाचा बंगला होता.त्या बंगल्यात कित्येक वर्षापासून कुणी रहात नव्हते.त्या बंगल्यात भुताटकी आहे अशी चर्चा आधीपासून होत होतीच आणि सध्या रात्री दिसणाऱ्या या कथित भूतामुळे तर त्या भुताटकीच्या चर्चेला अजूनच घबराटीचे स्वरूप आले होते. एक्स्चेंजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्टाफला “असे काही नसते” हे समजावण्याचा प्रयत्न केला; पण स्टाफ ऐकायच्या मनस्थितीत नव्हता.

”ही भुताटकी बंद झाल्याशिवाय आम्ही कुणीही नाईट ड्युटी करणार नाही असे लेडीज म्हणू लागल्या.रात्रीच्या वेळचे अर्जंट व लायटनिंग ट्रंककॉलसुध्दा लागणे बंद झाले. या बद्दलच्या तक्रारी दिल्लीपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या.

शेवटी असे ठरले की रात्री चार पाच पुरूष कर्मचारी ट्रंकएक्स्चेंजमधे थांबून तथाकथीत भुताटकीची खातरजमा करतील व रिपोर्ट देतील.

दुसऱ्याच रात्री या भुताटकीची खातरजमा करायचे ठरले.मीसुध्दा त्या गृपमधे थांबलो.रात्री बारा वाजले आणि आम्ही त्या खिडक्यांकडे नजर लाऊन बसलो. तसे आम्हीही थोडे घाबरलेलो होतो; पण उसने अवसान आणून त्या भुताची वाट पहात होतो.रात्रीचे साडेबारा होवून गेले तरी भूत काही आले नाही.आता आम्ही त्या घाबरणाऱ्या बायकांची आपापसात चर्चा व टिंगलटवाळी करायला लागलो.

”भुताटकी वगैरे काही नसते.मनाचे खेळ असतात,त्या बायकाना नाईट ड्युटी नको म्हणून बहाणा करत असतील!” 
"नाटक करताहेत",अशी टवाळी करू लागलो.रात्रीचा एक वाजला आणि अचानक प्रचंड मोठी सावली एका खिडकीच्या काचेवर दिसली! या खिडक्या उघडणाऱ्या नव्हत्या त्यामुळे कसली सावली आहे ते बघणेही शक्य नव्हते.हळूहळू ती सावली पुढे पुढे सरकायला लागली,आता ती पुढच्या खिडकीवर दिसायला लागली.मोठ्ठे केस पिंजारलेले डोके त्या सावलीत दिसत होते! आता मात्र आमच्यातले एकदोघे घाबरले होते.मागच्या बाजूला जाणे लगेच शक्य नव्हते.पुढच्या रस्त्यावर जावून बिल्डिंगला वळसा घालायचे आम्ही ठरवले आणि अंधारात तसे गेलोही; पण त्या पडीक बंगल्याच्या आवारात प्रचंड गवत वाढलेले होते आणि माणसांचा वावर नसलेल्या त्या बंगल्यात जायचे आम्हाला डेअरिंगही झाले नाही त्यामुळे आम्ही परत आलो.आत असलेले आमचे साथीदार प्रचंड घाबरलेले होते. त्यांचे म्हणणे होते की ती प्रचंड सावली सगळ्या दाही खिडक्यांवर नंतर दिसून दिसेनाशी झाली.त्या दिवशीची मोहीम अर्धवट सोडून आम्ही निघून गेलो. दुसऱ्या दिवशीही खात्री करायची असे ठरवले गेले त्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने एका खिडकीची काच थोडी फोडायचे ठरले.दुसऱ्या दिवशी जेथून नीट दिसेल अशा ठिकाणच्या खिडकीच्या काचेचा खालचा कोपरा आम्ही फोडला. दिवसा उजेडी मागच्या बंगल्याचे निरीक्षण केले व कुठल्या बाजूने बंगल्याच्या परिसरात शिरता येईल याचाही अंदाज घेतला.त्या रात्री अजून दोघेजण आमच्यात सामील झाले आज हे भूत बघायचेच असे आम्ही ठरवले होते! 

दुसऱ्या रात्री आम्ही रात्रभर त्या खिडक्यांकडे बघत बसलो; पण भूत आलेच नाही! काल जे पाहिले ते खरे की आज?, आम्ही सगळे चांगलेच बुचकळ्यात पडलो होतो.रात्रभर जागरण झाले होते.तिसऱ्या दिवशी परत प्रयत्न करू असे ठरवून आम्ही आपपल्या घरी गेलो.

तिसऱ्या रात्री पुन्हा आम्ही भूतासाठी सापळा लावला.रात्री एकच्या सुमाराला पहिल्या खिडकीवर ती अजस्र सावली पडली आणि आम्ही सावध झालो.एकजण फुटलेल्या काचेतून बाहेर बघत होता पण त्याला पहिल्या खिडकीच्या समोरचा भाग दिसत नव्हता.ती सावली हळूहळू पुढे सरकायला लागली साधारण चवथ्या खिडकीवर आल्यावर ती सावली आली आणि फुटलेल्या काचेसमोर असलेला आमचा सहकारी अचानक खो खो हसायला लागला.त्याने दुसऱ्या सहकाऱ्याला त्या अरुंद फटीतून पहायला सांगितले त्याने बाहेर बघितले आणि तोही हसायला लागला.एकेक करून आम्ही सर्वांनीच ते बाहेरचे दृश्य पाहिले आणि पोट धरधरून सगळेजण हसायला लागलो कारण भूत भूत म्हणून सगळे ज्या सावलीला घाबरत होते ती एका वेडसर दिसणाऱ्या बाईची सावली होती! एरवी ही बाई पुणे स्टेशनवर कायम फिरत असलेली प्रत्येकाने पाहिलेली होती! केस पिंजारलेली, अंगावरच्या कपड्याचे भान नसलेली व कायम काही ना काही बडबडत हातवारे करत ती तिथे फिरत असायची!

आम्ही लगेच त्या बंगल्याकडे गेलो.आम्ही बंगल्यात भूत येते असे समजत होतो मात्र सत्य वेगळेच होते.त्या पारश्याच्या बंगल्याच्या कंपाऊंडला लागून एक पायवाट होती त्या पायवाटेवर लोक कचरा टाकायचे तिथे कचऱ्यात टाकलेले अन्न खायला ही बिचारी वेडी बाई तिथे येत असावी,कारण आम्ही गेलो तर ती त्या कचऱ्यात पडलेले अन्न अधाशा सारखी वेचून खात होती! ती जेंव्हा कधी इकडे यायची तेंव्हा पलीकडे असलेल्या पुना क्लब ग्राउंडवर लावलेल्या प्रखर दिव्यांमुळे तिची सावली ट्रंक एक्स्चेंजच्या खिडकीवर पडायची ती जसजशी पुढे पुढे जायची तिची मोठी मोठी होत जाणारी सावली पुढच्या खिडक्यांवर पडायची आणि आतल्या काम करणाऱ्या बायकांसाठी ती भुताटकी ठरत होती!

सगळ्या गोष्टी समजल्यानंतर मात्र त्या गोष्टीवरून त्या घाबरणाऱ्या स्टाफची बरेच दिवस बाकीचा स्टाफ टिंगल करायचा! 
............... @.प्रल्हाद दुधाळ.

Monday, November 7, 2016

शिक्षा.

शिक्षा.
आज मला विजू जवळ जवळ पंधरा वर्षानंतर भेटला.

त्याला बघितले आणि मला तीस वर्षापूर्वी घडलेला एक किस्सा आठवला.

    त्याकाळी आमच्या ऑफिसात तो कॅज्युअल मजदूर म्हणून कामाला होता.तो जरी इथे मजूर म्हणून काम करत होता तरी त्याचे रहाणीमान एकदम टापटीप व व्यवस्थित असायचे! तो मुळातच दिसायला गोरागोमटा व देखणा होता शिवाय कायम कडक इस्त्रीचे कपडे तो घालायचा.बोलण्यात एकदम नम्र होता त्यामुळे त्याची कुणाशीही लगेच मैत्री व्हायची.
    तर आमच्या एका अधिकाऱ्यांकडे – नाडगौडा त्यांचे नाव,त्यांच्या ऑफिसात हरकाम्या म्हणून या विजूला ठेवण्यात आले होते.त्याच्या कामात व्यवस्थितपणा असायचा.पोस्टाची कामे,स्टाफला चहापाणी देणे तसेच साहेब सांगेल ती किरकोळ  कामे विजू अगदी प्रामाणिकपणे करायचा.या नाडगौडा यांचे रहाणीमान एकदम साधे होते.अंगावर कायम चुरगळलेले व मळके कपडे घातलेले असायचे.केस अस्ताव्यस्त असायचे. खर तर हे  सरकारी वर्ग दोनचे अधिकारी, पण नाडगौडा अगदीच  अजागळपणे रहात होते. त्यांच्याकडे पाहून त्यांनी कित्येक दिवसात आंघोळ तरी केली असेल का असा प्रश्न पडावा असे त्यांचे राहणीमान होते. सगळे कर्मचारी या गोष्टीवरून त्यांच्या मागे चेष्टेच्या सुरात बोलायचे!
   एकदा  काय झाले की, हेड ऑफिसातून निरोप आला त्या निरोपाप्रमाणे  दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या दिल्लीच्या ऑफिसातून इन्स्पेक्शनसाठी एक अतिवरिष्ठ अधिकारी रेल्वेस्टेशनवर उतरणार होते आणि त्यांना रिसीव्ह करण्यासाठी नाडगौडा यांनी जायचे होते.
    आपल्याबरोबर एखादा मदतनीस असावा म्हणून नाडगौडा यांनी विजूलाही  दुसऱ्या दिवशी स्टेशनवर बोलावले.
    दुसऱ्या दिवशी सकाळी विजू त्याला सांगितल्याप्रमाणे स्टेशनवर हजर झाला.नाडगौडा साहेब खात्याची गाडी घेवून स्टेशनवर गेले. निर्धारित वेळेवर गाडी आली.सांगितलेल्या बोगीसमोर विजू आणि नाडगौडासाहेब उभे राहिले.त्या बोगीत बहुतेक ते अधिकारी एकटेच उतरणारे प्रवासी होते  त्यांना रिसीव्ह करायला नाडगौडासाहेब आणि विजू दोघेही त्या बोगीकडे धावले.
     ते बडे साहेब खाली उतरले त्यानी  रिसिव्ह करायला आलेल्या त्या दोघांकडे पाहीले. नाडगौडा यांच्या अवतारावरून काही अंदाज बांधला आणि आपल्या हातातली ओडिसी ब्रिफकेस त्यांनी नाडगौडा साहेबांच्या हातात दिली आणि अपटूडेट  पोषाखात असलेल्या विजूसमोर  हस्तांदोलन करायला हात पुढे केला! विजूची फारच पंचायत झाली त्याने नाईलाजाने हात मिळवला आणि नाडगौडा साहेबांकडे हात दाखवला.
" सर, यह हमारे साहब नाडगौडाजी." अशी ओळख करून दिली आणि त्यांच्या हातातली बॅग पटकन स्वत:कडे घेवून खाली मान घालून गाडीच्या दिशेने निघाला.
    काय घोटाळा झालाय ते आलेल्या अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल स्मित झळकले, त्यांनी आता नाडगौडाशी हस्तांदोलन केले. दोघेही गाडीत बसले आणि गाडी इंस्पेक्सन क्वार्टरकडे निघाली.
    कॅज्युअल मजदूर असूनही विजू एकदम टेचात रहातो याचा नाडगौडा साहेबाला फारच राग आला होता!या विजूमुळेच आपल्याबद्दल त्या साहेबाचा गैरसमज झाला आणि आपल्याला मजदुर समजले गेले हे नाडगौडा साहेबाना फारच झोंबले होते! दुसऱ्याच दिवसापासून विजूची बदली स्टोअरमधे हेल्पर म्हणून झाली!
         ........... प्रल्हाद दुधाळ.

Saturday, September 3, 2016

विद्यासागर सर.

कळत-नकळत घडवणारे विद्यासागर सर
- प्रल्हाद दुधाळ, पुणे
शनिवार, 3 सप्टेंबर 2016 - 02:30 AM IST

माणसाच्या जडणघडणीत आई-वडिलांच्या बरोबरीनेच शिक्षकांचेही अत्यंत मोलाचे योगदान असते. त्यातही एखादा शिक्षक किंवा शिक्षिका संपूर्ण आयुष्यभर पुरून उरतील एवढे संस्कार करतात आणि त्या बाई किंवा सरांचे त्या माणसाच्या मनात आयुष्यभरासाठी आदराचे स्थान निर्माण होते. माझ्यावरही अनेक शिक्षकांनी असेच खूप चांगले संस्कार केले. 

एका अशिक्षित, अल्प-भूधारक शेतकरी कुटुंबातला मी.. आज मी जो काही आहे, तो केवळ मला लाभलेल्या अनेक शिक्षकांनी वेळोवेळी केलेले संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच! सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची गावात असलेली ‘शेती शाळा परिंचे‘ या शाळेत आणि पुढे रयत शिक्षण संस्थेच्या ‘कर्मवीर विद्यालय परिंचे‘ या माझ्या हायस्कूलमध्ये अनेक चांगले शिक्षक भेटले. त्यांनी मला शालेय अभ्यासक्रम तर शिकवलाच; पण खऱ्या अर्थाने जगणेही शिकवले. आपल्या पगारातून माझी फी भरणारे पडवळ सर मला इथेच भेटले. साहित्य-कला-नाट्याचे बीज माझ्यात रुजवले ते जी. बी. विद्यासागर या माझ्या गुरुंनी.. तसं पाहिलं, तर विद्यासागर सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे. आम्हाला आठवीपासून इंग्रजी हा विषय होता. विद्यासागर सरांनी अशा काही कौशल्याने इंग्रजी शिकवलं, की बस्स! एक-एक शब्द शिकवण्याची त्यांची तळमळ, हातोटी अजूनही लक्षात आहे. ‘थ्रो‘ आणि ‘कॅच‘ शिकवण्यासाठी त्यांनी वर्गात चेंडू आणला होता; तर ‘डान्स‘ शिकवण्यासाठी त्यांनी अक्षरश: नाचून दाखवलं. त्यांनी इंग्रजी विषयात माझी इतकी तयारी करून घेतली, की बोर्डामध्ये इंग्रजीत मी पहिल्या पाचांमध्ये होतो.. विद्यासागर सर इंग्रजी तर चांगले शिकवायचेच; पण मराठी साहित्याचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. आम्हाला इंग्रजी शिकवता शिकवता अनेकदा ते मध्येच मराठी कवितेविषयी बोलायला लागायचे. त्यांचा तो तास म्हणजे माझ्यासाठी अक्षरश: साहित्यिक पर्वणी असायची. त्यांनी अशा मराठीच्या जादा तासात आम्हाला कुसुमाग्रज, बालकवी, विंदा, भा. रा. तांबे, केशवसुत, ग्रेस अशा महान साहित्यिकांच्या अनेक गाजलेल्या कविता रसग्रहणासह शिकवल्या. एखाद्या कथेचा किंवा कादंबरीचा रसास्वाद कसा घ्यायचा, ते आम्ही त्यांच्यामुळे शिकलो. ‘नटसम्राट‘, ‘अश्रूंची झाली फुले‘, ‘एकच प्याला‘सारखी अनेक नाटके सरांना तोंडपाठ होती. ते नाटकाविषयी बोलायला लागले, की असे वाटायचे की आपण नाटकच स्टेजवर पाहतोय. अजूनही ते तास जसेच्या तसे आठवतात. 

विद्यासागर सरांनी शिकवलेलं ‘पृथ्वीचं प्रेमगीत‘, ‘खबरदार जर टाच मारुनी‘ वा ‘जन पळभर म्हणतील हाय हाय‘ यांसारख्या अनेक कविता आजही जशाच्या तशा स्मरणात आहेत. त्या साहित्यसंस्कारांमुळे पुढील आयुष्यात मला वाचनाची प्रचंड गोडी लागली. आपल्या वैयक्तिक आयुष्यात मी पायरी-पायरीने प्रगती साधत राहिलोच; पण लेखन क्षेत्रातही काही ना काही धडपड करत राहिलो. 

आतापर्यंतच्या माझ्या लेखनप्रवासामध्ये दोन कवितासंग्रह, काही कथा आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, 2007 मध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला विद्यासागर सरांची प्रस्तावना लाभली. गेल्या 30 वर्षांमध्ये त्यांच्याशी संपर्क नव्हता. रयत शिक्षण संस्थेतून ते उपसचिव पदावरून निवृत्त झाले होते. तरीही मी त्यांना भेटून माझी ओळख सांगताच त्यांनी आनंदाने हे काम केले. माझे व्यक्तिमत्व घडण्यात त्यांनी कळत-नकळत केलेले संस्कारच कारणीभूत आहेत, हे सांगायला मला अभिमान वाटतो. 

Thursday, August 25, 2016

दहीहंडी.

दहीहंडी.
काल ऑफिसातुन मित्र घरी गेला त्याची बालवर्गात जाणारी मुलगी, जी खूपच चिकित्सक आहे.तिने बालसुलभ जिज्ञासेने याला विचारले.
" बाबा दहीहंडी म्हणजे काय असते?"
त्याने त्याने तिला कृष्ण, त्याच्या बाललीला, त्याची माखनचोरी,मग दही दुध लोणी उंच कसे ठेवत, कृष्ण त्याच्या साथीदारांच्या मदतीने हे उंच ठेवलेले लोणी कसे चोरायचा इत्यादी त्याला जेवढे माहीत होते ते तिला कळेल अशा भाषेत सांगितले.त्याचा उत्सव म्हणजे दहीहंडी असे नीट समजावले! तिचे बऱ्याच प्रमाणात समाधान झालेले दिसले. मित्राने विचार केला की आपण हीला जर प्रत्यक्ष दहीहंडी कशी फोडतात ते दाखवले तर या उत्सवाबद्दल तिला छान समजेल. त्याने तिला बाईकवर बसवले व जवळच्या सार्वजनिक मंडळाची दहीहंडी दाखवयला घेवून गेला. मंडळाची दहीहंडी बांधून झाली होती आणि उत्साही कार्यकर्ते कर्कश आवाजात वाजणार्या डीजे च्या तालात झिंगाट होवून बघणाऱ्या लोकांनाही लाज वाटावी असे अंगविक्षेप करत सैराट होवून नाचत होते! प्रचंड आवाजाने कानठळ्या बसत होत्या.आजूबाजूच्या बिल्डिंगा हादरत होत्या.
तो प्रचंड आवाज व ते हिडीस दृश्य बघून मित्राने तिथून बाईक दुसऱ्या मंडळाच्या दिशेने वळवली. पुढच्या सार्वजनिक मंडळाच्या इथेही कमीअधिक प्रमाणात तीच परिस्थिति होती. अजून पुढचे मंडळ बघू असे करत करत त्यांने आठ दहा सार्वजनिक मंडळाना भेट दिली. सगळीकडे तोच धांगडधिंगा फार तर गाणे वेगळे असायचे पण बाकी सगळे तसेच.अशी दहीहंडी दाखवण्याऐवजी आपण घरीच दहीहंडी बांधून तिला फोडायला लावावी हा विचार करून शेवटी तो कुंभारवाड्यात गेला.एक रंगीत मडके लाह्या बत्तासे गोळ्या चॉकलेट व लागणारे साहित्य घेवून घरी आला. त्याने सर्व खाऊ मडक्यात टाकून घरातच दहीहंडी बांधली. मुलीला सर्व माहिती दिली व तिला स्वत:च्या पाठीवर उभे रहायला लावून तिच्याकडून दहीहंडी फोडण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. मुलीनेही ही घरची दहीहंडी स्वतच्य:च्या हाताने फोडून या उत्सवातला आनंद अक्षरशः लुटला! मित्र एकदम खुश झाला! बालसुलभ प्रश्नांची आपण व्यवस्थित उत्तरे दिल्याचा आनंद त्याला नक्कीच झाला होता!
तिने शेवटी एक प्रश्न विचारलाच!
" बाबा दहीहंडीत दही का नव्हते?"
......
--्--- प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, August 2, 2016

बळजबरीची वधू परिक्षा

    मी नोकरीला लागून दोन तीन वर्षे झाली होती.मी एस. वाय. ला असतानाच मला टेलिफोन खात्यात नोकरी मिळाली होती.नंतर नोकरी करता करता माझे बी. एस्सी. पर्यंत शिक्षणही झाले.अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मी येथपर्यंत पोहोचलो होतो.आता कुटूंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या.सावकाराकडे गहाण पडलेली जमिन सोडवायची होती,गावाकडे दोन खणाचे का होईना साधेसे घर बांधायचे होते, पडत्या काळात अनेकांनी काही ना काही मदत केली होती,त्यांचे जमेल तेव्हढे उतराई व्हायचे होते, त्यामुळे लगेच लग्न करायचा माझा मुळीच विचार नव्हता.तसेही चोवीस वर्षांचे वय होते, पण नातेवाईकांच्या दृष्टीने मात्र माझे स्टेटस आता ‘ एक बरे स्थळ' असे झाले होते! आपापल्या माहीतीमधली वा नात्यातली  अशा सुयोग्य वधूचे माझ्या परस्परच संशोधन सुरू झाले होते.अर्थात  हे काही माझी पर्सानिलिटी बघून घडत नव्हते, तर मला मिळालेल्या सुरक्षित सरकारी नोकरीची ही जादू होती! नोकरी नसताना कित्येकजण, हा चुकून पैशाची मदत तर मागणार नाही ना, असा विचार करत, कायम मला झुरळासारखे लांब झटकणारे, जवळचे वा  लांबचे नातेवाईकसुध्दा आजकाल मुद्दाम जवळ येवून माझी चौकशी करत होते. आडून आडून पगाराचा आकडा विचारत होते!
मी पुण्यात जेथे रहात होतो त्याच गल्लीत एक बाई रहायच्या.  त्यांचा मुलगा माझ्याच वयाचा होता. थोडीफार त्याच्याशी मैत्रीही होती. तर,  या मावशी एका शनिवारी संध्याकाळी खास माझ्याकडे आल्या.
    त्यांनी सहज विचारल्यासारखे दाखवत माझा रविवारचा कुठे जायचा कार्यक्रम आहे का विचारले."मी घरीच  आहे",  म्हटल्यावर त्या म्हणाल्या....
" अरे बरे झाले, उद्या माझ्याबरोबर चल दत्तवाडीला! माझ्या भावाला तुमच्या गावाकडच्या कुणाची तरी माहीती पाहीजे आहे! त्याला मी तुझे तेच गाव आहे हे सांगितले तर त्याने  रविवारी तुला घेऊन यायलाच सांगितले!"
खरे तर  मावशींच्या त्या भावाला ना मी कधी बघितले होते, ना त्याने मला! पण असेल काही काम, असा विचार करून रविवारी तिकडे जायला मी होकार दिला.
    दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या मावशी व त्यांचा मुलगा रिक्षा घेवून माझ्याकडे आले,  मी काय सडाफटींग माणूस! बसलो रिक्षात आणि निघालो! अर्ध्या पाऊण तासातच आम्ही दत्तवाडीला मावशींच्या त्या भावाकडे पोहोचलो. त्या घरी बहूतेक आम्ही येणार असल्याचे आधीच माहीत असावे. दरवाजातच नमस्कार करून मावशींच्या भावाने आमचे स्वागत केले. मला कळेना की, हा बाबा, त्याच्यापेक्षा एकदम लहान, तब्बेतीने एकदम बारकुंड्या पोराला एवढा हात जोडून नमस्कार का घालतोय?
    दोन खोल्याच्या चाळवजा घराच्या बाहेरील खोलीत असलेल्या कॉटवर आम्ही बसलो.मावशींच्या भावजयीने पाणी दिले. उन्हाळा असल्यामुळे तहान लागलेलीच होती! मी घटाघटा पाणी पिवून घेतले.
     मग मावशींचे बंधूराज समोर बसून मला- माझी नोकरी,काय काय काम करावे लागते, पगार किती, सुट्ट्या कधी व किती असतात,घरी कोण कोण असते, इथे एकटाच कसा राहतोस वगैरे वगैरे माहीती गप्पा मारता मारता विचारू लागले. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत राहीलो. त्यांच्या ऑफिसात माझ्या गावचे कोणी जाधव म्हणून काम करत होते त्यांचाबद्दलही  मला विचारले , अर्थात मी  जाधवाना ओळखत नव्हतो. इत्तरही  काही काही गप्पा चालत राहिल्या.
   थोड्याच  वेळात आतल्या घरातून एक मुलगी पोह्याच्या डीश घेवून बाहेर आली! आत्तापर्यंत आतल्या खोलीत अजुनही  कोणी असेल असे वाटत नव्हते. त्या मुलीने प्रथम माझ्या समोरच ट्रे धरला, नाईलाजास्तव मी  एक प्लेट उचलली  नकळत तिच्या चेहऱ्याकडे लक्ष  गेले. फार तर नववी दहावीत शिकत असेल! आणि ती मुलगी चक्क साडी नेसून,अवघडत  सर्वाना पोहे देत होती! माझी एकदम ट्युब पेटली! " ही मुलगी दाखवायला तर मला आणले नसेल ना?" मी पुन्हा एकदा तिच्याकडे पाहीले. थरथरत ती तेथेच उभी होती, वय असेल फार तर पंधरा सोळा! बापरे, या लोकांना वेड लागलय की काय? या वयात तिला लग्नासाठी दाखवताहेत? मनात विचार आला, कदाचित तसे काही नसावे,माझ्याच मनाचा खेळ असेल! मी गप्प राहून पुढचा अंदाज घेवू लागलो.
" अहो विचारा, काय विचारायच असल तर तिला!" -  मुलीचे पिताश्री.
" मी ? मी कशाला काय विचारू तिला!" मी एकदम गडबडून गेलो होतो.
" अरे, नीट बघून घे, विचारायचे असले तर विचार काही, आयुष्याभराचा प्रश्न असतो!" - मावशी.
" म्हणजे ? मी समजलो नाही!"
" अरे समजायचय काय, पसंत आहे का सांग, लग्नासाठी दाखवलीय तुला ती! "
मला काही सुचेनाच काय बोलावे ते! मी सरळ उठून खोलीबाहेर आलो. मागचा पुढचा विचार न करता पळतच मुख्य रोडवर आलो. थोडक्यात तेथून चक्क पळालो!
ही मावशी आपली भाची, जी अजून लग्नायोग्य वयाचीही नव्हती ,अजून तिचे हसण्या बागडण्याचे शिकायचे वय संपले नव्हते, अशा कोवळ्या कळीला माझ्याबरोबर बोहोल्यावर चढवायला निघाले होते! तेही मला कोणतीही कल्पना न देता! मला त्या खोटारड्या मावशींचा व मित्राचा प्रचंड राग आला होता,चांगला जाब विचारावा असे वाटत होते, पण तो राग मी  गिळला! अजुन  मी खूप छोटा होतो! दुसऱ्याला बदलवण्याएवढा मोठा तर नक्कीच झालो नव्हतो! आयुष्यात खूप काही करायच होत, त्यामुळे नको तेथे आपली एनर्जी खर्च होवू नये याची अक्कल देवदयेने त्या वयातही  होती, त्यामुळे ही घटना मी फारशी मनाला लावून घेतली नाही! काही घडलेच नाही असा विचार केला आणि माझ्या कामाला लागलो.
 मात्र, पुढचे पंधराएक दिवस त्या मावशीला चुकवत राहीलो! पुढे तीनेही या बाबतीत माझा नाद सोडला!
      .......... प्रल्हाद दुधाळ.

Friday, July 29, 2016

चिल्लर

मला  पुण्याच्या पी एम पी एल मधून फार क्वचित प्रवास करावा लागतो. काल तब्बेत बिघडल्यामुळे ऑफिसातुन लवकर निघालो. बस ने घरी जावे म्हणून बसस्टॉप ला आलो. माझे ऑफिस तसे ऑड ठिकाणी असल्याने तीन बसेस बदलून घरी जावे लागणार होते. साधारण दहा मिनिटात पुणे मनपा ची बस मिळाली. आत गेल्या गेल्या वाहक महाशयांनी आदेश दिला "सुट्टे पैसे काढा." मी खिशात चाचपले सुट्टे पैसे नव्हते. मी पन्नासची नोट दिली.
" सुट्टे द्या हो पाच रूपये!" तो खेकसला.
" पाच नाहीत "
माझ्याकडेही नाहीत!" पंचवीस रुपयाचे तिकिट व वीस रूपये त्याने माझ्या हातात कोंबले.पुढे गेला .
मला पुढच्या स्टॉपला बसायला जागा मिळाली. मी बसल्या बसल्या वाहकाकडे बघत होतो. तो प्रत्येकाला सुट्ट्या पैशासाठी ओरडत होता. अनेक  पॅसेंजर  त्याला  सुट्टे  पैसे देत होते  तो अशी आलेली चिल्लर पॅंटच्या मागच्या खिशात  टाकत होता. अशा प्रकारे त्याने निदान सतरा अठरा लोकांचे पाच पाच  रूपये  मागे ठेवले होते. कुणी जर पैसे मागितले की तो म्हणायचा " द्या सुट्टे पाच,आणि  दहाची नोट घ्या!"
पाच रूपयांसाठी कशाला वाद म्हणून बरेच पॅसेंजर आपला स्टॉप  आला की उतरून जात होते.
मी विचार करत होतो. पाच पाच रूपयांप्रमाणे दिवसभरामधे हा वाहक बरेच पैसे कमावत असेल, नाही का ? लोकानी तिकिटाचे  नेमके पैसे दिले तर असा प्रश्नच उद्भवला नसता, पण हल्ली ए टी एम मुळे चिल्लर फारशी दिसतच नाही.माझा स्टॉप जवळ आला तसे मी वाहकाला  पाच रूपये परत  देण्याबद्द्ल खुणावले. त्याने खुणेनेच तुम्हीच पाच द्या, मी दहा देतो खुणावले. मी उठून त्याच्या जवळ गेलो.
" अहो नाहीत पाच रूपये !" आता तो तोंडाने बोलला.
" बघा आले असतील की !" मी.
" अहो असते तर, कशाला ठेवले असते!"
" बर पाच रूपये तुमच्याकडे नाहीत ना, मग मला पाच रूपयाचे  एक तिकिट  द्या बर!" मी शांतपणे त्याला मार्ग सांगितला.
" काय , पाच रूपयाचे तिकिट देवू ?"
" हो , द्या पाच  रूपयाचे तिकिट, तेव्हढीच पी एम पी एल ला देणगी !"
' काय वेडा माणूस आहे ' अशा नजरेने त्याने माझ्याकडे पाहीले मशीनमधून पाच रूपयाचे तिकिट काढून माझ्या हातात दिले. आजूबाजूचे पॅसेंजर ' काय जिरवली ' असा भाव चेहऱ्यावर ठेवत हसत होते !
     ..... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, July 28, 2016

दिलको देखो ......

दिल को देखो ......
       कॉलेजात पहिल्या वर्षात शिकत होतो.आर्थिकदृष्ट्या होस्टेलमधे रहाणे अथवा जेवनासाठी  मेस लावणे मुळीच परवडणारे नव्हते.येरवडा भागात एका झोपडपट्टीत रहात होतो. त्या वस्तीत रहात असताना तेथे  अनेक मित्र कायमचे जोडले गेले. तेथेच माझी आणि सुरेशची ओळख झाली,पुढे  त्याच्याशी घनिष्ट मैत्री झाल्री .दिसायला एकदम गोरागोमटा, साडेपाच फूट उंची शिवाय आकर्षक  बोलणे यामुळे त्याची समोरच्या व्यक्तीवर  प्रथमदर्शनीच छाप पडायची! त्या भागातल्या नगरसेवकाची व याची चांगली ओळख होती त्यामुळे त्याचा  सामाजिक व राजकिय क्षेत्रातही राबता असायचा. आम्ही दोघे कॉलेजचा वेळ सोडून कायम बरोबरच असायचो.आमची मैत्री पुढे एवढी वाढली की आयुष्यातल्या अगदी खाजगी गोष्टीही तो माझ्याशी शेअर करू लागला. माझ्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहान असलेला सुरेश आय टी आय मधे कंपोझरचा कोर्स करत होता. तेथेच सुरेशला माया भेटली. सुरूवातीला गृपमधे डब्यातली भाजी शेअर करता करता या दोघांची चांगलीच गट्टी  जमली. तिची डायरी एकदा सुरेशने मला दाखवायला आणली होती. सुरेशने वर्णन केले होते त्यापेक्षा तिचे अक्षर कित्येक पटीने सुंदर होते. त्या डायरीत तिने लिहिलेल्या सुंदर कविता होत्या, मराठी व हिंदी शेरोशायरी होती, अनेक सुंदर स्केचेस होती. त्या डायरीत मी अक्षरश: हरवून गेलो होतो. सुरेशला एक संवेदनशील मैत्रीण लाभली होती. फावल्या वेळेत ते दोघे कुठे कुठे फिरत होते. सुरेशकडून मला त्यांच्या भटकंतीची बितंबातमी दररोज कळत होती.
- आज आम्ही चित्रकलेचे प्रदर्शन पाहिले.
- आज पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो.
- आज पांचाळेश्वर लेणी पाहीली
- पर्वतीवर गेलो होतो.
- सारसबागेत,बंडगार्डनमधे गेलो इत्यादी इत्यादी.
नंतर नंतर त्यांची रविवार व सुट्टीच्या दिवशीही भटकंती सुरू झाली दुसऱ्या दिवशी विचारले की वृतांत  मिळायचा. पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व गड किल्ल्यांवर, कार्ले भाजे लेणी, मंदिरे पाहून झाली होती . तिने लिहिलेली नवीन कविता लगेच सुरेश आणून मला वाचायला द्यायचा. तिचे  उच्च विचार. तिचे सर्व क्षेत्रातले ज्ञान. जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोण, मुख्य म्हणजे कलासक्त वृत्ती यावर सुरेश भरभरून बोलायचा. एवढी चांगली मैत्रीण त्याला लाभली याचा मला हेवाही वाटायचा. आय टी आय चा दोन वर्षाचा कोर्स झाल्यावर सुरेश व ती दोघानीही एन सी टी व्ही टी या  कोर्स ला ॲडमिशन घेतले. सुरेश आणि माया आता एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. सुरेश रविवारीही घरी  थांबत नाही हे पाहून त्याच्या आईने मला त्याबद्दल विचारले पण त्याच्या कोर्स व त्याचे क्लास असे काहीबाही सांगून मी वेळ निभावून नेली.
  दरम्यानच्या काळात मी दुसरीकडे रहायला गेलो आणि सुरेशबरोबरच्या दररोज होणाऱ्या भेटी बंद झाल्या. कधीतरी तो मला माझ्या ऑफिसात भेटायला यायचा.माया व तो याशिवाय त्याच्या बोलण्यत दुसरा विषयच नसायचा . मी त्याची प्रेमकहाणी ऐकत रहायचो.
      एक दिवस मधल्या सुट्टीत आचार्य अत्रे सभागृहात ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तके चाळत होतोमाझ्या ऑफिसच्या अगदी शेजारीच हे सभागृह असल्यामुळे ग्रंथप्रदर्शन भरले की दररोज मी मधल्या सुट्टीत तेथे जायचो. तर, त्या दिवशी  अशीच पुस्तके चाळत असताना सुरेश मला दिसला. त्याच्या बरोबर एक मुलगी होती. सावळा म्हणता येणार नाही असा काळा रंग, जेमतेम पाचेक फूट उंची, तिचे डोळे मात्र बोलके होते. सुरेशच्या आकर्षक व्यक्तींत्वापुढे तीचे कुरूपपण अजुनच अधोरेखीत होत होते. आजुबाजूचे लोकही तिरक्या नजरेने या विजोड जोडीकडे बघत होते! मी सुरेशच्या समोर गेलो. त्याने मायाची ओळख करून दिली.
" सुरेशच्या तोंडी तुमचे नाव ऐकलय खूप वेळा!"
तिचा आवाज एकदम सुंदर होता! अगदी रेडिओवरील अनाउंसर बोलल्याचा भास झाला.
समोरच्या हॉटेलमध्ये त्या दोघाना चहाला घेवून गेलो. मायाची एक प्रतिमा माझ्या मनात तयार झालेली होती त्या प्रतिमेला प्रत्यक्ष मायाच्या दर्शनाने छेद गेला होता!त्या दोघांना मात्र माझ्या मनात चाललेल्या विचारांची खबरबात असायचे कारण नव्हते!
     सुरेश आणि माया आपल्या भावविश्वात दंग होते. थोडावेळ गप्पा मारून ते दोघे निघून गेले. माझ्या मनातले विचारचक्र मात्र थांबले नव्हते. या  दोघांची ही प्रेमकहाणी सफल संपूर्ण होईल? माया मनाने अत्यंत सुंदर होती,सर्वगुणसंपन्न होती,पण फक्त मनाच्या सौंदर्यावरच यांचे प्रेम यशस्वी होईल का  हा नव्याने समोर आलेला गुंता मला चांगलाच छळू लागला. बाजूला कुठेतरी गाणे लागले होते....
" दिलको देखो, चेहरा ना देखो, चेहरा ना देखो, चेहरे ने लाखोंको लूटा,
दिल सच्चा और चेहरा झुटा, दिल सच्चा और चेहरा झुटा!"
मी मनोमन देवाजवळ प्रार्थना केली ....
" देवा यांचे प्रेम असेच बहरत राहू दे, जालिम जमान्याची त्याला नजर लागू देवू नको!"
          ....... प्रल्हाद दुधाळ .

Wednesday, July 27, 2016

समस्या.

समस्या.
  खूप दिवसांनी त्या भागात गेलो होतो.पूर्वी अगदी खेडेगाव असलेल्या गावाच्या माळरानावर एकापेक्षा एक बड्या बिल्डर्सचे गृहप्रकल्प उभे राहिले होते.गावातील मोकळ्या जमिनी विकून आलेल्या पैशांमुळे संपूर्ण गावाचा कायापालट झालेला दिसत होता. पूर्वी अगदी जुन्या घरांच्या जागी छोटी मोठी बंगलेवजा घरे उभी राहिली होती.घरांसमोर आलिशान मोटारी उभ्या होत्या.येथून तीनचार किलोमीटरवर हिंजवडी आयटी पार्क विकसित झाले होते आणि तेथे काम करणाऱ्या आयटी प्रोफेशनल्सच्या बडया पैकेजेसनी ही कमाल केली होती.याच गावातल्या एका तशा दूरच्या नातेवाईकाकडे भगवानकडे जवळ जवळ सहा सात वर्षानंतर मी गेलो होतो.भगवानच्या साध्या घराचेही आता आलिशान बंगल्यात रूपांतर झाले होते. कोपऱ्या कोपऱ्यात नव्याने आलेली सुबत्ता दिसत होती.या कुटूंबात फारसे कुणी शिकले सवरलेले नव्हते.या भागाचे शहरीकरण जसे जसे होवू लागले,तसे जमिनीला भाव मिळू लागले,झालच तर बायकोला भरपूर सोने नाणे घेवून दिले होते,आपली श्रीमंती आल्यागेल्याच्या नजरेत भरेल, अशा प्रकारे या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले जात होते.भगवान स्वत: व तरुण मुलगा गळ्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या व अंगठ्या घालून मिरवत होते. त्यानेही मोठ्या उत्साहात,त्याचे सगळे ऐश्वर्य मला दाखवले.त्याचे नवे  घर तसे हायवेला लागून होते.घराला लागून दोन एकरचा पट्टा अजून त्याने सांभाळून ठेवला होता.हायवे च्या कडेने त्याच्या जमिनीवर जाहिरात एजन्सीचे मोठे मोठे सहा फलक तेथे लावले होते.
       मी कुतूहलाने त्या फलकांबद्द्ल,त्यातून होणारे उत्पन्न, त्याची कराराची पद्धत याबद्दल त्याला विचारले. त्याने उत्साहात माहिती द्यायला सुरुवात केली.
“हो,या बोर्डाचे दोनेक लाख भाड्याचे मिळतात ना!” त्याने माहिती दिली.
“मग आता पोराचे लग्न करून टाकायचं की!” मी मजेत त्याला छेडलं.
“ लग्न करायचं हो,पण कुठ जुळतच नाही ना!”
मला प्रश्न पडला. एवढ्या श्रीमंत माणसाच्या मुलाचे लग्न जुळायला खर तर कसलीच अडचण यायला नको,पण हा तर म्हणतो जुळत नाही!
“का? न जुळायला काय झाल? मुलगा दिसायला चांगला आहे,पैसा आडका आहे मग अजून काय पाहिजे?”
“अहो तीच तर समस्या आहे, आजकाल नुसत्या पैशाला कोण विचारतो?आता पुर्वीसारख कुणी राह्यलय का? भरपूर पोरी पाह्यल्या पण कुणी हो म्हणेल तर शप्पथ!”
“ चुकून एखादी मुलगी पसंत पडली की समोरची पार्टी विचारते, पोरगा किती  शिकलाय? तो काय काम करतो? आम्ही सांगतो- आता खर सांगायचं तर पोरग चवथीपर्यंत शिकलय, आणि एवढा पैसा आहे काय करायचं शिक्षण आणि नोकरी!”
आम्ही सांगून पाह्यल, “पोराला दोन लाख रुपये कमाई आहे त्याला काम करायची काय गरजच नाही! समोरची पार्टी विचार करून सांगतो म्हणते आणि पुढे काय बोलतच नाही हो!”
“काही जण तोंडावर बोलतात,ही श्रीमंती बापजाद्यांची जमीन विकून आलीये,पोराच कर्तुत्व काय आहे? गप्प बसाया लागतंय बघा!” त्याने आपली व्यथा मोकळेपणी सांगितली.
मी  विचारात पडलो लोकांचे काय चुकीचे आहे.शहरांच्या आजूबाजूच्या गावात अशी हजारो कुटुंबे नक्की असतील ज्यांना या समस्येला सामोरे जावे लागत असेल.तात्पुरता आलेला पैसा चैनीत आणि ऐशोआरामात खर्च झाल्यावर या लोकांचे भवितव्य काय? आत्ताच अनेक अशा गावातले शेतकरी आपल्या जमिनी विकून देशोधडीला लागले आहेत.आपण विकलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या टोलेजंग सोसायटीच्या गेटवर वाचमनगिरी करत आहेत.घरातली बायकामाणसे धुण्याभांड्याची कामे करून आपली गुजराण करत आहेत! या भगवानचे तरी असे काही होवू नये असे मला मनोमन वाटत होते!
“बघा की एखादी पोरगी पहाण्यात असली तर!, आपल्याला हुंडाबिंडा काही नको,फक्त आम्हाला शोभल असं झोकात लग्न करून दिले की बास!”
समोरचा चहा संपवत मी म्हणालो –
“ हो  नक्की बघतो की!”
मी काढता पाय घेतला!

      ------- प्रल्हाद  दुधाळ.

Tuesday, July 26, 2016

राग.

                   राग.
                मला पूर्वी प्रचंड राग यायचा,पण तो राग शक्यतो व्यक्त होवू नये याची मी काळजी घ्यायचो.खूप वेळा असा आलेला राग मी गप्प गिळायचो! विसेक वर्षापूर्वीपर्यंत अगदीच टोकाची राग येणारी घटना घडलेली असेल, आणि समोरच्याचे वागणे तेवढेच अन्याय्य असेल,तर मागचा पुढचा विचार न करता समोरच्याला "योग्य" भाषेत वाजवायची तयारी असायची! मुळात ग्रामीण भागात बालपण गेल्याने हे रांगडेपण वागण्यात होते, अशा वेळी.समोरचा माणूस माझ्या किरकोळ तब्बेतीपेक्षा धिप्पाड असला, तब्बेतीने कितीही चांगला असला तरी त्याला गावरान भाषेत उत्तर द्यायचो.अजून एक, जर मी अशावेळी उपाशी असलो,की मग विचारायला नको, हा राग दुप्पट वेगात यायचा! शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहरात आलो पोटभर सकस खायला लागलो भरपूर सकस वाचायला लागलो, अनेक चांगल्या लोकांच्या संपर्कात आलो शिवाय माझा मूळ स्वभाव शांत असल्याने पुढे वयाच्या तिशी पस्तीशीनंतर मात्र प्रत्येक सिच्युएशनचे विश्लेषण करण्याची सवय वाढली.एक प्रकारची परिपक्वता आली आणि नकळत ती वागण्या बोलण्यात दिसायला लागली. आता आयुष्यात छपन्न पावसाळे पाहून झालेत जीवनातले अनेक चढ उतार अनुभवून झालेत एक प्रकारचे स्थैर्य आल्यामुळे असेल पण रागावर चांगलेच नियंत्रण आले आहे! आता जरी थोडीफार सटकली तरी समोरच्याच्या भूमिकेत जावून पहातो व आपोआपच राग आवरला जातो!
एक लक्षात आलय----
आपणच आपल जगण अवघड करत असतो,
 पालथ्या घड्यात पाणी विनाकारण भरत असतो!
तो 'तसा ' ती ' तशी' उगाचच बडबडत असतो,
साप साप म्हणून बऱ्याचंदा भुइलाच बडवत असतो!
भीती चिंता कटकट वटवट,करत असतो जीवनाची फरफट,
विनाकारण चडफडत असतो, जगण अवघड करत असतो!

------प्रल्हाद दुधाळ.

Monday, July 25, 2016

पुस्तके आणि मी.

वाचले म्हणून वाचलो!   

वाचले म्हणून वाचलो!   

   वय वर्षे सहा झाल्यावर मी माझ्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जायला लागलो आणि पाटीपेन्सिलच्या माध्यमातून पहिल्यांदा अक्षर ओळख झाली.
लिहावाचायला शिकलो तेंव्हापासून ते आजतागायत टप्प्याटप्प्याने माझी शब्दांशी दोस्ती वाढतच गेली.अगदी सुरुवातीला दुकानातून वाणसामान बांधून आलेल्या कागदावर एक एक शब्द जुळवत वाचायला लागलो आणि मग वाचायचा चाळाच लागला! जेथे कुठे मराठीत काही लिहिलेले आढळेल ते शब्द जुळवून वाचायचा छंदच जडला!साधारण तिसरी चौथीत असताना कुणीतरी रद्दीत फेकून दिलेले ‘चांदोबा’ मासिक हातात मिळाले आणि त्याच्या वाचनात हरवून गेलो.त्यातली विक्रम वेताळाची,परोपकारी गंपूची गोष्ट पुन्हा पुन्हा वाचत रहायचो. माझे गाव आडवळणी खेडेगाव असल्याने त्याकाळी  इत्तर काही वाचायला मिळणे अगदीच दुरापास्त होते, त्यामुळे शालेय अभ्यासक्रमातली पुस्तकेच पुन्हा पुन्हा वाचत रहायचो त्यामुळे शाळेत वेगळा अभ्यास करायची कधी गरजच पडायची नाही! हा वाचनाचा छंद(व्यसन म्हणा हवं तर!) असा काही जडला की, हातात येईल ते अधाशासारखे वाचून काढायचो.गावात लायब्ररी वगैरे असायचा प्रश्नच नव्हता, गावात एक दोन घरी ’सकाळ’ यायचा पण त्याचे लांबूनच दर्शन व्हायचे! त्यामुळे अर्थातच वाचनाच्या आवडीवर मर्यादा पडायच्या. हातात येईल ते वाचायच्या या सवयीमुळे चांगले सकस साहित्य वाचलेच,पण हातात आले म्हणून त्या वयात वाचायला नको असे पिवळ्या वेष्टनात येणारे साहित्यही (त्यातले कळत नव्हते तरी!) मी वाचले! आता सांगायला काहीच हरकत नाही,पण सातवीत असताना हातात मिळालेले “नवविवाहितांचा वाटाडया” असे शीर्षक असलेले पुस्तकही वाचले होते! याशिवाय कुठेतरी मिळालेली काकोडकरांची, बाबुराव अर्नाळकरांची पुस्तकेही मी मन लावून वाचली.आठवीनंतर हायस्कूलमध्ये शिकायला गेलो.शाळेची लायब्ररी होती पण तेथे कथा कादंबऱ्या फारशा नव्हत्या.मला इंग्रजी शिकवायला विद्यासागर नावाचे शिक्षक होते त्यांच्याकडे मराठी पुस्तकांचा बराच खजिना होता माझी वाचनाची आवड त्यांना माहीत झाल्यानंतर ते मला सुट्टीत वाचायला एखादे पुस्तक हमखास द्यायचे. दरम्यानच्या काळात माझ्यापेक्षा दोन वर्ग पुढे असणारा माझा एक चुलत चुलत भाऊ मुंबईहून शिक्षणासाठी गावी आला.त्यालाही  वाचनाची प्रचंड आवड होती शिवाय त्या काळी माझ्यासाठी दुर्मिळ असणारी वि.स.खांडेकर,शिवाजी सावंत,रणजीत देसाई,अत्रे,पुलं,सुहास शिरवळकर  इत्यादी प्रसिध्द लेखकांची अनेक पुस्तके त्याच्याकडे होती.त्याने हा सगळा खजिना मला उपलब्ध करून दिला आणि मी अक्षरश: तहानभूक विसरून वाचायला लागलो.त्याच्याकडची सगळी पुस्तके अधाशासारखी वाचून काढली!
   या वाचनामुळे माझ्यावर नकळत चांगले संस्कार होत गेले.ईश्वरी आशिर्वाद होते त्यामुळे मुळातच प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायची आंतरिक सवय होती,चांगल्या वाईटातला फरक करता यायचा,त्यामुळे जरी वाईट काही वाचले तरी त्याचा आयुष्यावर दुष्परिणाम झाला नाही ही केवळ ईश्वरी कृपाच होती असे मी मानतो... 
    दहावीपर्यंत घरीच होतो त्यामुळे आईचे चांगले संस्कार व वचकही होता,पण पुढे एकटा घराबाहेर राहायला लागल्यावर कोणाचाही धाक नव्हता.त्या वयात वाईट संगतीचा परिणाम होणे अगदी सहज शक्य होते,परंतु सतत पुस्तकांच्या संगतीत असल्यामूळे अशा बिघडण्यापासून वाचलो! शाळेत असताना दारू,गांजा अशी चौफेर व्यसने असलेली,नकळत्या वयात नको ती लफडीकुलंगडी करणारी अनेक मुले आजूबाजूला होती.पुढे कॉलेजला असताना किंबहुना नोकरीला लागल्यानंतरही काही वर्षे  पुण्यातल्या  येरवडा भागात, झोपडपट्टीत राहिलो.अनेक मित्राना विविध व्यसने होती,पण झालेल्या वाचनसंस्कारामुळे त्या वाईट सवयीं आत्मसात करायचा मोह कधीच झाला नाही!
    चांगले संस्कार करायला जवळ कुणी वडीलधारे नव्हते,पण जीवनातली ही कसर पुस्तकांनी भरून काढली.वाचनाच्या नादात बऱ्याचदा स्वयंपाकच करायचा राहून जायचा(हाताने भाजी भाकरी बनवून खायचो) आणि मग उपाशीच रहायला लागायचं,वाचनाने मी अक्षरशः झपाटलेला होतो!

 त्या झोपडपट्टीत हौस म्हणून मी एका गणेशोत्सव मंडळातर्फे जुन्या पुस्तकांची लायब्ररी सुट्टीच्या दिवशी मी सुरू केलि व बरेच दिवस चालवली.पुढे टेलिफोन खात्यात नोकरीला लागल्यावर ऑफिसमध्ये असलेल्या रिक्रिएशन क्लबच्या लायब्ररीमधल्या पुस्तकांचा खजिना हाती आला आणि माझ्या वाचनाचा झपाटा अजूनच वाढला.दरवर्षी नवी पुस्तके खरेदी करताना क्लबचे लोक मला पुस्तके निवडायला नेवू लागले त्यामुळे त्या काळी गाजत असलेल्या लेखकांची एकूणएक पुस्तके निवडून मी वाचून काढली.नोकरीत स्थिरसावर होईपर्यंत पुस्तके विकत घेणे अथवा खाजगी लायब्ररी लावणे परवडणारे नव्हते, पण गेले तीस वर्षे मी नियमित लायब्ररी लावली आहे. वीसेक वर्षापासून माझ्याकडे घरपोच लायब्ररी लावली  आहे. आठवड्याला माझ्या आवडीची चार पुस्तके/मासिके त्या लायब्ररीतून मिळतात.ऑफिसच्या लायब्ररीतली पुस्तकेही असतातच.गेली सात आठ वर्षे नियमितपणे आवडलेली पुस्तके विकत घेवून वाचतो.घरी दोनशेच्यावर पुस्तकांचा संग्रह तयार झाला आहे.कुणाच्याही वाढदिवसाला गिफ्ट म्हणून इत्तर काही देण्याऐवजी योग्य असे पुस्तक द्यायला मला आवडते.तशी तर सगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात,पण त्यातल्या त्यात गाजलेल्या मोठ्या लोकांची आत्मचरित्रे तसेच मानसशास्रावर आधारीत लेख, कथा, कादंबऱ्या व वैचारिक लेखन वाचायला विशेष आवडते.अशिक्षित अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला मी अत्यंत प्रतिकूल वातावरणात राहून स्वत:ची वैचारिक अध्यात्मिक आर्थिक व सामाजिक प्रगती साधू शकलो ते केवळ सकस वाचनाच्या जोरावर! ग्रंथ हेच माझे खरे गुरू होते आणि आहेत!

   मराठी साहित्याच्या त्या प्रचंड ज्ञानसागरातले माझ्या हाताला लागले तेव्हढेच अल्पसे कदाचित मी वाचले असेल, पण ही एक अखंड साधना आहे आणि ती चालूच राहील!

खरंच भरपूर वाचले म्हणून अनेक प्रसंगी मी वाचलो!   

पुस्तकांमुळेच झाला .....कायापालट -
अक्षरशत्रू समाजात
दोन घास मिळण्याची जेथे भ्रांत
गावंढ्या आडवळणी गावात
शिकून कुणाच भलं झाल्याची
गंधवार्ताही नसलेल्या माणसांत
जन्म घेतलेला मी .....
दारिद्र्याचा कलंक कपाळी
वर्षानुवर्षे अश्वथाम्याच्या जखमेसारखा!
पण हे सगळे .....
तुला भेटण्याच्याआधी.....
अपघातानेच  झाली अक्षरओळख.....
त्यानंतर तू  भेटलास ...
भेटत राहीलास ...
तुझ्या सहवासाची चटकच लागली
तहानभूक विसरून तुझ्यात रमू लागलो
तुझ्यामुळेच ज्ञानभांडार झाले खुले
एकामागोमाग एक ....
 ......तुला वाचत राहीलो
......लालसा ज्ञानाची भागवत राहीलो
तुझ्यामुळेच प्रगतीचा रस्ता दिसला
चालत राहीलो तुझ्या साथीने
आयुष्यात एक एक पायरी चढत राहीलो
हे असच चालत राहील ...
अविरतपणे!
 ............ प्रल्हाद  दुधाळ. 
 5/9 रुणवाल पार्क मा.यार्ड पुणे ३७.

          (९४२३०१२०२०)

Friday, July 22, 2016

दुकानदारी.

                                     दुकानदारी.

   साताठ वर्षापूर्वी मी शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी माझ्या मेव्हण्याच्या स्टेशनरी दुकानात जावून बसायचो. गिऱ्हाइकांची गर्दी वाढली तर मी त्याला मदतही करायचो.हळूहळू मला या दुकानातल्या वस्तू, त्यांच्या किमती,होलसेल मार्केट या धंद्यातले मार्जिन इत्यादीबद्दल बऱ्यापैकी माहिती झाली. आपणही धंदा करू शकू असे वाटायला लागले! कधी मेव्हण्याला दुसरे काही काम असेल तर मी त्याला सुट्टी द्यायला लागलो.अशावेळी संपूर्ण दुकान सांभाळण्यापर्यंत माझा  आत्मविश्वास वाढला होता.तर अशाच एका रविवारी मी दुकान उघडले व दुपारपर्यंत व्यवस्थित दुकान चालवले.तो शाळा कॉलेजेसचा दिवाळीच्या सुट्टीचा हंगाम होता, त्यामुळे स्टेशनरीला तशीही फारशी मागणी नव्हती. निवांत बसलो असताना साधारणपणे तिसरी चौथीच्या वर्गात असावीत अशी दोन मुले दुकानात आली. मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले.नेहमीचे काका दुकानात नाहीत हे पाहून एकाने विचारले.
“ते दररोज असतात ते काका नाहीत का आज?”
“का ,काही काम होत का त्यांच्याकडे?”
“नाही,असंच विचारलं,दिसले नाही म्हणून!”
दुसऱ्याने विचारले-
“काका, व्हाईटनर  आहे का हो?”
“हो आहे की, पंधरा रुपये.”
“दाखवा की”
मी त्याला पंधरा रुपये किमतीचे व्हाईटनर दाखवले.
“हे नाही हो दोन बाटल्यावाले व्हाईटनर पाहिजे.”
मी आतून मोठे व्हाईटनर काढून दाखवले.त्याने ते हातात घेवून दोन्ही बाटल्या आहेत का पाहून घेतले.
“कितीला आहे?”
मी खोक्यावर किंमत बघून सांगितले-
“बावीस रुपये!”
“काय कमी नाही का, काका.”
“नाही रे बाबा,ते दुकानवाले काका रागावतील ना?”
त्याने खिशातल्या पैशाचा अंदाज घेतला.
“बर काका,दोन मोठे व्हाईटनर द्या!”
मी त्याच्याकडून पन्नासची नोट घेतली.वरचे सहा रुपये आणि दोन बाटल्या त्याच्या हवाली केल्या. दोन्ही मुले उड्या मारत निघून गेली.
अर्धा तास झाला असेल नसेल साधारण त्याच वयाचा एक मुलगा आला.
“काका, व्हाईटनर आहे का हो?”
“हो आहे की, मोठा का छोटा?”
“मोठ्या तीन बाटल्या द्या!”
त्याने मोजून सहासष्ट रुपये आणले होते.
मी त्याला तीन बाटल्या काढून दिल्या.तो निघून गेला.
पंधरा वीस मिनिटानंतर  अजून एक थोडा मोठा मुलगा आला.त्याने चार बाटल्या व्हाईटनर मागितले. मी कुतुहलाने त्याला विचारले.
“एवढे व्हाईटनर कशाला लागतंय रे.”
“काका,अहो त्या पलीकडच्या रस्त्यावर प्रिंटींग प्रेस आहे तेथे लागतंय!”
मी त्याला चार बाटल्या व्हाईटनर काढून दिले.
दुकान दुपारी बंद होईपर्यंत अजून सहा बाटल्या व्हाईटनर विकले गेले!
सुट्ट्यांचा  सिझन असूनही गल्ल्यात या व्हाईटनर विक्रीमुळे बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते त्यामुळे आपला रविवार कामाला आला याचे वेगळे समाधान वाटत होते.दुकान बंद करून मी घरी गेलो.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या ऑफिसला गेलो. दुपारी मेहुण्याचा फोन आला.
“ अहो त्या कपाटात व्हाईटनर होते ते सगळे विकले का?”
“हो सगळ्या बाटल्या विकल्या की!” मी थोड्या फुशारकीतच सांगितले!
“छोटी मुले आली होती का घ्यायला?”
“हो,अरे तीन चार मुलेच आली होती.त्यांनाच विकले की! का? काय झाले?”
“अहो,त्या पोरांना नाही द्यायचे व्हाईटनर!”
“का नाही द्यायचे?” माझा इनोसंट प्रश्न!
“अहो ही मुले या व्हाईटनरच्या बाटलीत एक थिनरची बाटली असते ना ते पिवून नशा करतात! मी अशा लहान मुलांना अजिबात व्हाईटनर विकत नाही, सरळ नाही म्हणून सांगतो,मी दुकानात नाही याचा बरोबर फायदा घेतला कारट्यांनी!”
माझा मेहुणा हळहळत होता!
मी फोन बंद केला.
बापरे, म्हणजे मी नकळत का होईना,या पोरांच्या नशापानाला मदत केली होती!
माझी दुकानदारी केल्याची मिजास ताबडतोब उतरली!
                                                     ........ प्रल्हाद दुधाळ.