Tuesday, December 27, 2016

तरुणाई.

तरुणाईला का झोडपता?
    माझ्या ऑफिसातल्या  बहुतेक मंडळीनी वयाची पन्नाशी पार केलेली आहे.काहींच्या पाल्यांचे शिक्षण चालू आहे तर काहींची मुले नोकरी धंद्यालाही लागली आहेत.दोनतीन जणांच्या मुलांचे तर दोनाचे चार हातही झाले आहेत.गप्पांमध्ये साहजिकच मुलाबाळांचा विषय असतो! मी एक गोष्ट कायम बघत आलो आहे की, अशा गप्पांमधे क्वचितच कुणी आपल्या मुलांबद्दल कौतुकाचे चार शब्द बोलतो.बहुतेकजण मुलांच्या तक्रारींचा पाढाच जास्त करून वाचत असतात! या तक्रारींमध्ये साधारणपणे काही समान मुद्दे असतात.या लोकांचे म्हणणे असते -“आपल्या मुलांसाठी आपण कितीतरी खस्ता खाल्ल्या,आयुष्यात काटकसर केली,प्रसंगी हौसेमौजेला मुरड घालून मुलांसाठी काय काय केले याची यादीच मग वाचली जाते. सध्याची तरुण मुले-मुली कशी बेजबाबदार आहेत आणि यांच्या वयात आपण किती आणि कसे वडिलधाऱ्यांच्या धाकात रहायचो ,किती जबाबदारीने वागत होतो याचे दाखले देत आजची तरुणाई कशी स्वैर वागते याची सोदाहरण चर्चा होत रहाते”
     अशावेळी साधारणपणे एका बाबीवर या पालक मंडळींचे एकमत होत असते की, “सध्याच्या तरुणाईला विनाकष्ट सगळ्या सुखसोयी मिळाल्या आहेत.फारशी झळ न लागता व सहजासहजी सर्व हवे ते मिळाल्यामुळे या तरुण मुलांना पैसा आणि नातेसंबंध या दोन्हीचीही मुळीच किंमत नाही.”
थोडक्यात काय तर आजची तरुणाई काही अपवाद सोडले तर पार बिघडलेली आहे!
     जरा शांतपणे विचार करून बघा, खरच आजची तरुणाई एवढी बेजबाबदार आहे?
मला वाटते हे बरोबर नाही! आम्ही समजतोय तेवढी वाईट परिस्थिती नक्कीच नाही.आजचा तरुण वर्ग थोड्या मुक्त विचारांचा आहे तो वास्तव जगात वावरतो हे खरे असले तरी एवढ्यावरून तरुणाईला ‘स्वैर’,’बेजबाबदार’ किंवा ‘उध्दट’ अशी लेबले लावणे चुकीचे आहे .प्रचंड बुध्दिमत्ता,कल्पकता, तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता व अमर्यादित उर्जा असलेल्या आजच्या तरुणाईकडे गगनाला गवसणी घालण्याची क्षमता आहे हे कबूल करायलाच हवे.तरुणाईचे मूल्यमापन करताना आधीची पिढी चुकीचे मापदंड वापरते आहे असे मला वाटते. त्यातूनही काही प्रमाणात दोष तरुण पिढीत आहेत असे गृहीत धरले तर या दोषांसाठी कोण जबाबदार आहे ? मला असे वाटते की मुळात आजची पन्नाशीच्या पुढची पालक पिढी आणि आजची तरुणाई यांच्या जीवनाची तुलनाच होवू शकत नाही कारण या दोन पिढ्या संपूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या आहेत.तीस चाळीस वर्षापूर्वीची तरुणाई आज जी पालकांच्या भूमिकेत आहे त्यांच्या वेळची सामाजिक व आर्थिक परिस्थिती आजच्यापेक्षा पूर्णत: भिन्न होती त्यावेळच्या समस्यांचे स्वरूप वेगळे होते आयुष्याच्या  प्राथमिकता वेगळ्या होत्या आजच्या तरुणांना ज्या गोष्टीना सामोरे जावे लागते आहे त्याचा त्या काळात मागमूसही नव्हता हे वास्तव प्रथम मान्य करायला हवे.त्या काळी शिक्षणाचा प्रसार आजच्या मानाने मर्यादित होता.आज सर्व क्षेत्रात पदोपदी जाणवणारी स्पर्धा त्या काळात फारशी नव्हती.माणसांच्या मुलभूत गरजा कमी होत्या आणि उपलब्ध साधनसामग्रीमधे त्या भागत होत्या.त्या वेळी एकत्र कुटुंबात कुटूंबप्रमुख सर्वासाठी निर्णय घ्यायचे आणि कुटुंबातील इत्तर सदस्यांवर शक्यतो त्या बाबतीतला ताण पडायचा नाही.आज नोकरी धंद्यानिमित्त झालेले स्थलांतर तसेच इत्तर अनेक कारणास्तव कुटुंबे छोटी झाली.हम दो हमारे दो चा जमाना मागे पडला आणि एकुलत्या एका अपत्यावर लोक समाधानाने राहू लागले.माणसे आत्मकेंद्रित झाली. चाळसंस्कृती अथवा वाडा संस्कृतीचा ऱ्हास झाला.घरे छोटी कुटूंब छोटे आणि मनेही संकुचित झाली ती याच काळात! आज पन्नाशी-साठीत असलेल्या मंडळीनीच या बदलाचा त्यावेळी अंगीकार केला.त्यावेळी थोडेफार शिकलेल्या व्यक्तीला सहज नोकरी मिळायची.सरकारी नोकऱ्या मुबलक उपलब्ध होत्या.पुढच्या  काळात  मनुष्यबळावर जी कामे व्हायची ती संगणकावर  होवू लागली आणि सुरक्षित नोकऱ्यांच्या संधी कमी कमी होत गेल्या.प्रचंड संख्येने  शिकून बाहेर पडलेल्या तरुणांना केवळ खाजगी नोकऱ्यांचा पर्याय समोर होता.उपलब्ध नोकऱ्या आणि प्रचंड इच्छुक यामुळे प्रचंड प्रमाणात स्पर्धा आली या जीवघेण्या स्पर्धेत टिकायचे तर आपले ज्ञान अद्यावत पाहिजे त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली.आयटी व तत्सम नोकऱ्यांचे त्यामधील पगाराच्या आकर्षक आकड्यांमुळे आकर्षण वाढले. हातात प्रचंड पैसा आल्यामुळे आपोआपच राहणीमान सुधारले आणि हे राहणीमान त्याच स्तरावर टिकून ठेवण्यासाठी ’पळा पळा कोण पुढे पळे तो’ अशी जीवघेणी शर्यत सुरू झाली. धकाधकीच्या जीवनात ताण तणाव वाढले. तरुणाई या ताणाची पहिली शिकार झाली.विलक्षण  बुद्धीमत्ता लाभलेल्या या तरुणाईला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पळावे लागते आहे.बारा ते पंधरा तास बौद्धिक स्वरूपाचे काम केल्यानंतर दमछाक तर होणारच.या स्पर्धेत आपल्या पाल्याचा  निभाव लागायला हवा म्हणून पालक मंडळीनीच फक्त मार्कांना महत्व दिले. मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा,त्याला मूल्याधिष्ठित संस्कार मिळायला हवेत या बाबींपेक्षा त्याला या रेससाठी तयार करण्याचे काम याच पालक मंडळीनी केले. या संस्कारात तयार झालेली आजची तरुणाई भरपूर शिकली, पालकांच्या अपेक्षेप्रमाणे मुबलक पैसा कमवायलाही  लागली. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास केला केला म्हणूनच तुम्हाला अपेक्षित असे त्यांचे करिअर घडले.तुम्ही जसे त्यांना घडवले तसेच ते घडले मग आता ते बिघडले असे तुम्ही कसे काय म्हणू शकता?
     म्हणून मला वाटते की आजच्या तरुणाईला स्वत:च्या तराजूत तोलू नका त्यांना कोणताही दोष देण्यापूर्वी विचार करून पहा की आपण त्याची जोपासना करताना काय काय द्यायला विसरलो! एकुलता एक म्हणून त्याचे नको इतके लाड कुणी केले? आपल्याला लहानपणी मिळाली नव्हती असा विचार करून त्याने हट्ट केलेली प्रत्येक वस्तू कुणी घेवून दिली? अभ्यासात व्यत्यय नको म्हणून खेळायला किंवा त्याच्या आवडत्या छंदाला लगाम कोणी घातला? बिघडेल म्हणून आजूबाजूंच्या मुलांमध्ये जायला त्याला कोणी रोखले? आपल्याला मिळाला नव्हता म्हणून भरपूर पोकेटमनी त्याला कोणी दिला? तुम्हाला त्याला द्यायला वेळ नव्हता,त्याच्यासाठी सकस जेवण तयार करून द्यायला वेळ नव्हता म्हणून बाहेरचे खायला  त्याला कुणी सांगितले? सुट्टीत आजीआजोबा किंवा नातेवाईक यांच्यात सोडण्याऐवजी त्याला कुठल्यातरी संस्कार वर्गात/वेकेशन क्लासला घालायचा अट्टाहास कुणी केला?
    मान्य आहे की तुम्ही शून्यातून तुमचे विश्व साकारले.काडी काडी जमवून घरटे सजवले.कवडी कवडी काटकसर करून मुलांना शिकवले, स्वत:च्या पायावर उभे केलेत मग आता तुम्ही त्यांनी तुमच्यासारखे वागायला हवे,काटकसर करायला हवी अशी अपेक्षा का करताय? तुम्ही पंख दिलेत आता त्यांना त्यांच्या पद्धतीने उडू द्या की! तिथेही तुम्ही त्यांना अडथळा का ठरता? उलट भव्य भरारी घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.त्यांच्या कर्तुत्वाला वाव द्या.चुकतील तेथे मार्गदर्शन करा पण असेच वाग म्हणून अट्टाहास करू नका. ही तरुणाई हुशार आहे, त्यांच्या हुशारीला दाद द्या आणि बघा आयुष्यातली सगळी आव्हाने ते किती लीलया पेलाताहेत!

      ................ प्रल्हाद दुधाळ. (९४२३०१२०२०)

No comments:

Post a Comment