Monday, February 27, 2017

दारूबंदी-नाट्य प्रसंग

“उपाय योजना” 

ठिकाण -: राजवाडा
(राज्याचे महाराज कित्येक दिवस मौजमस्तीत दंग झालेले होते मात्र आज त्यांच्या मातोश्रींनी त्यांची त्यांच्या बेजबाबदार कारभाराबद्दल चांगलीच कानउघडणी केली आहे.भानावर आलेले महाराज आज खूप दिवसांनी राज्याचा हालहवाल बघायला बाहेर पडताहेत)
महाराज –कोण आहे रे तिकडे?
(काहीच प्रतिसाद येत नाही)
महाराज – अरे सगळे मेले की काय? कोण आहे की नाही इथे?सहा महिने लक्ष दिले नाही तर राज्यात एवढा गोंधळ?
(महाराजांचा वाढलेला आवाज ऐकून प्रधानजी दुसऱ्या दालनातून पळत येतात.)
प्रधान-(कुर्निसात करत) अहो महाराज, काय झालं? आपण कुणाला हाक मारताय?
महाराज –प्रधानजी राज्यात हे काय चाललं? मी एवढा ठणाणा ओरडून हाक मारतोय साधा शिपाईसुध्दा पुढे येत नाही!
प्रधान –माफ करा महाराज; मी बघतो कुठे गेलाय तो!
(प्रधानजी बाहेर जातात, एका दारू पिवून झोकांड्या खाणाऱ्या शिपायाला दोन्ही हाताने ढकलत महाराजांसमोर उभे करतात)
प्रधानजी-महाराज हा सापडला बघा शिपाई; दरवाजासमोर लोळत होता,याची कालची दारू अजून उतरली नाही!
महाराज – काय सांगता ? माझ्या राज्यात कामावर असताना शिपाई दारू पितात?अशा माणसाला सेवेत ठेवलेच कसे तुम्ही?आणि तुम्ही काय करत होता?
प्रधानजी – अहो महाराज लहान तोंडी मोठा घास घेतोय तुमचं लक्षच नाही कारभारात तर आमचं तरी कसं राहील? अहो हा शिपाईच काय,राजवाड्याचे सगळे सेवक रात्री तर्राट झालेले असतात.बहुसंख्य जनताही रस्त्यात पिवून पडलेली असते!एकवेळ राज्यात प्यायला पाणी मिळत नाही पण दारू मुबलक मिळते!
महाराज- काय सांगताय प्रधानजी? एवढा गोंधळ आहे राज्यात? आम्हाला कसं कळल नाही?
प्रधानजी –( हळू आवाजात पुटपुटत) तुमचं राज्यकारभारात लक्ष असेल तर ना!
महाराज –काय म्हणालात?
प्रधानजी-काही नाही महाराज,आपण या शिपायाला दारू पिला म्हणून शिक्षा करू या का?
महाराज-(शिपायाकडे बघून) काय रे, दारू पिवून नोकरी करतोयस काय?राज्यात दारूबंदी असताना कुठून येते ही दारू?
शिपाई –(त त प प करत) महाराज माफ करा, पण शेजारच्या राज्यातून दारू ,गुटका,गर्द सगळ येतया बघा!
महाराज –प्रधानजी, काय म्हणतोय हा, ताबडतोब खात्री करा,दारू गांजा गुटका गर्द याचा कुणी धंदा करत असलं तर त्याला कैद करा! आणि हो आजपासून मी जनतेला भेटणार आहे! लोकांना दारूच्या दुष्परिणामाबद्दल सांगणार आहे! लोकांच्या संसाराचे वाटोळे करणाऱ्या या दारूचे राज्यातून उच्चाटन व्हायलाच पाहिजे! प्रधानजी,असं झालं नाही तर तुम्हालाच सर्वात आधी तुरूंगात टाकतो!
प्रधानजी –नको नको महाराज,कुसूर झाली,माफ करा,आता मी जातीने लक्ष घालतो,(शिपायाला) शिपाई, ताबडतोब सगळ्या राज्यात नशाबंदीची दवंडी द्यायची व्यवस्थ्या करा!
शिपाई – होय महाराज आताच दवंडी पिटाया लावतो की ....(शिपाई जातो)
(महाराज आणि प्रधान पुढे चालायला लागतात) (लांब कुठे दवंडी दिल्याचा आवाज येतो)
“ऐका हो ऐका SSS तमाम जनतेला इशारा देण्यात येतो की आजपासून राज्यात कोणीही नशा करताना आढळला,कुणी दारू विकताना आढळला तर त्याला कठोर शिक्षा दिली जाईल,कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही होSSS, ऐका हो ऐका SSS राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आहे हो SSS, ऐका हो ऐका SSS
....... प्रल्हाद दुधाळ .

व्यक्तिचित्रण ‘सुशीला’

व्यक्तिचित्रण
‘सुशीला’
तीसेक वर्षापूर्वी “सुशीला” नावाचा अनंत माने दिग्दर्शित चित्रपट प्रचंड गाजला होता.चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका त्या वेळची आघाडीची नायिका रंजना यांनी साकारली होती.रंजना यांच्या बरोबर अशोक सराफ,अविनाश मसुरेकर आणि उषा नाईक यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. सुशीला ही चित्रपटातली नायिका! तिच्या जीवनाची फरफट हा या चित्रपटाचा विषय आहे.जन्मठेपेची शिक्षा संपवून सुशीला जेलमधून बाहेर पडतानाच्या प्रसंगाने चित्रपटाची सुरुवात होते आणि तिच्या आठवणीतले तिचे पूर्वायुष्य आपण पाहतो.
  सुशीला अत्यंत कर्तव्यदक्ष शिक्षिका.”सत्यं शिवम सुंदरा” हे गीत मुलांना शिकवतानाची  सुशीला, मुलांच्याकडे नट्यांचे फोटो पाहून त्यांना शिक्षा करणारी सुशीला अशा प्रसंगात एक तळमळीची शिक्षिका दिसते.शाळेत आपल्या भावाला केलेल्या शिक्षेचा जाब विचारायला आलेल्या शेखरला चार खडे बोल सुनावतानाची करारी शिक्षिका आणि मग जेंव्हा संधी मिळेल तेव्हा शेखरचा पाणउतारा करतानाची शिक्षिका या प्रसंगात रंजनाचा अभिनय अप्रतिमच.आपला घडीघडी होणारा अपमान शेखरला सहन होत नाही आणि त्या सुडाग्नीमुळे शेखर सुशीलावर अतिप्रसंग करतो.त्याची तक्रार करायला गेलेल्या सुशीलावर पंचमंडळीही अत्याचार करतात.त्यातून ती गरोदर रहाते.रेल्वे स्टेशनवर टीसी तिला पकडतो तेंव्हा एक बाई तिची सुटका करते आणि तिला फसवून कुंटणखाण्यावर घेवून जाते.तिथून ती पळून जाते आणि तिच्यासारख्याच अभागी म्हमदूच्या आश्रयाला रहाते.म्हमदू सुशीलाला बहीण मानतो पण निश्चय करतो की सुशीलेची ही अवस्थ्या करणाऱ्याच्या जीवनाची राखरांगोळी करायची आणि मगच या बहिणीकडून राखी बांधून घ्यायची! अगतिक भरकटलेली सुशीला  दुनियेवर सूड उगवण्यासाठी चोऱ्या करते,पाकीटमारी करते सिनेमाच्या तिकीटांचा काळाबाजार करते! तिच्या बाळाचे रडणे चालू असताना पोलीस पकडू नये म्हणून बाळाचे तोंड दाबते आणि त्यातच ते बाळही गुदमरून मरते.शेखरला सिनेमाच्या तिकिटाचा  काळाबाजार करताना शेखर पाहतो तिच्या जीवनाची झालेली वाताहात पाहून शेखरला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो.सुशिलेने घातलेल्या सगळ्या अटी मान्य करून शेखर घरी लग्नाची बायको असतानाही तिला घरी घ्रेवून जातो.बायकोचे मंगळसूत्र तिला देतो.म्हमदू सूड घेण्यासाठी शेखरच्या बायकोवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना सुशीला त्याच्या पाठीत सुरा खुपसून त्याला मारते आणि शेखरच्या बायकोचे मंगळसूत्र तिला परत करते.तिला जन्मठेपेची शिक्षा होते!सुशीलेतली सुशील शिक्षिका,अगतिक स्री,करारी  रणरागिणी,अभागी आई आणि शेवटी एक सहृदय स्री अशी विविध रूपे चित्रपटाची बलस्थाने आहेत! 

     ...... प्रल्हाद दुधाळ.

Saturday, February 25, 2017

येरे येरे पावसा.

रसग्रहण -.

येरे येरे पावसा.
पारंपारिक पाऊस गाणे- माझ्या नजरेतून....

येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा!
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून!
    कधी लिहिले?, कुणी लिहिले? माहीत नाही; पण “येरे येरे पावसा” हे गाणे लहानपणी ऐकले नाही,  वा हे गाणे गात पावसात स्वत:भोवती गिरक्या घेतल्या  नाही असा मराठी माणूस सापडणे अवघड आहे.महाराष्ट्रातील कित्येक पिढ्या पहिल्या पावसात हे पाऊसगाणे म्हणत, पावसात भिजत, गारा वेचत  मोठया झाल्या असतील.
   अत्यंत साध्या सोप्या भाषेत हे गाणे रचले आहे.
'आपले काम साधण्यासाठी ज्याच्याकडे आपले काम आहे अशा  माणसाला कशाची तरी  लालूच दाखवली की तो माणूस समोरच्या व्यक्तीचे हवे ते ऐकतो आणि मिळणाऱ्या फायद्यासाठी ते काम करून देतो!’- हा बहूसंख्य माणसातला गुण म्हणा किंवा अवगुण म्हणा पावसालाही लागू होईल आणि पैशाची लालूच दाखवून त्याला पडायला भाग पडेल.असा विचार अतिबुध्दीमान आणि अतिशय  व्यवहारी माणसाशिवाय कोण करणार?. या मिळालेल्या लाचेला जागून मुसळधार पाऊस तर   येतो; पण  माणसाने दिलेला पैसा मात्र खोटा झालेला! माणसात असलेल्या उपजत खोटेपणाची जणू काही येथे  कबुलीच दिली आहे!
     पण  पावसानेही माणसासारखेच वागायचे ठरवल्यावर काय होणार? पावसाच्या  सरीमागून सरी कोसळल्या.माणसाच्या इच्छेप्रमाणे मडकेही भरायला घेतले पण तो एवढा जोरात कोसळला की मडकेच वाहून गेले!
  साध्या सोप्या भाषेतल्या या बालागीतात माणसांच्या कृतघ्नपणावर  घाव घालायचे काम या अज्ञात कवीने केले आहे हे मात्र नक्की!
......... प्रल्हाद दुधाळ.

काटा रुते कुणाला

रसग्रहण
काटा रुते कुणाला                                                                                                कवयित्री -शांता शेळके,

 काटा रुते कुणाला आक्रंदात कोणी
 मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे
काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना
आयुष्य ओघोळोनी मी रिक्तहस्त आहे
 कवयित्री शांताबाई शेळके यांची ही रचना मला अत्यंत भावते. प्रत्येक माणसाला जगण्याचा खरा अर्थ समजेलच असे नाही.आपल्या मनातल्या सच्च्या भावना व्यक्त करण्याची संधीही प्रत्येकाला मिळतेच असे नाही.आपल्या आयुष्यात आपण बरेच काही ठरवतो पण ठरवले तसेच घडत नाही,आयुष्याच्या एका ठराविक वळणावर पोहोचल्यानंतर याची जाणीव होते.असे होते की जे कधी आपण बोललोही नव्हतो ते घडते! आणि जे काही घडते आहे ते नीटसे उमगत नाही आणि चुकून उमगले तरी असेही घडू शकते हे लवकर पटत नाही.
 शांताबाई म्हणतात - ज्याच्या पायाला काटा रुततो त्याचे आक्रंदन अगदी साहजिक आहे त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्यामुळे दु:खी होणे समजूही शकते पण मला फुलसुध्दा रुतते आहे हा कसला दैवयोग? खर तर ज्याच्या वाट्याला फुले आली ते नशीबवानच की! मात्र कधी कधी उलटे घडते,काळजाच्या आतली वेदना बोलताही येत नाही त्याची सल कुणाला दाखवताही येत नाही. जीवनातली अशी कसौटी खूपच त्रासदायक असते.या दु:खावर काही उपाय केला तरी अनर्थ होईल.हे असे जगणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे.हे असे का आणि कसे मला मुळीच कळत नाही. यावर माझा मीच उपाय शोधला आहे. मला जे काही मिळाले आहे मग ते काटे असोत की फुले,सगळे सोडून दिले आहे आणि माझे हात रिक्त केले आहेत.आयुष्याच्या संध्याकाळी मी एका स्थितप्रज्ञ अवस्थेला पोहोचले आहे! अशा विरक्त आनंदाचा कवयित्री आता अनुभव घेते आहे.
.................... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, February 23, 2017

सामर्थ्य शब्दांचे.

सामर्थ्य शब्दांचे.
    कुशाग्र बुद्धीमत्तेप्रमाणेच ‘वाणी’ हे माणसाला इत्तर प्राण्यांपेक्षा जास्तीचे वरदान लाभलेले आहे. बोलण्याच्या या वरदानामुळे  माणसे एकमेकांशी संवाद साधू शकतात.हा संवाद शब्दांच्या माध्यमातून साधला जातो.मनातल्या भावना योग्य शब्दात मांडण्याची कला अंगी असलेल्या व्यक्तीची समाजात  वेगळी ओळख असते.संवाद साधताना शब्द खूप महत्वाची भूमिका बजावतात.शब्द कसे उच्चारले गेले,आवाजातील चढउतार यावरून एका शब्दाने विविध अर्थ वा अनर्थही घडू शकतात.
कोणी महात्म्याने म्हटले आहे –
शब्दांमुळे दंगल। शब्दांमुळे मंगल।
शब्दांचे हे जंगल। जागृत राहावे।।
   शब्दांची विविध रूपे आहेत.शब्दांचे सेतू संवाद जमवून आणू  शकतात हे जेवढे खरे आहे तेवढेच हे सुध्दा सत्य आहे की, एखाद्या चुकीच्या शब्दाने विसंवादही रुजू शकतो. म्हणूनच हे दुधारी शस्र फार काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे काय असतात हे शब्द?
शब्द असतात बहुरूपी, रंग बदलतात  क्षणात शब्द!
बोचू शकतात शब्द, ओरखाडे काढू शकतात शब्द!
शब्द घालतात काळजाला साद,ओथंबले असतात शब्द!
शब्द असू शकतात मवाळ,आगही लावू शकतात शब्द!
पोकळ काही असतात शब्द, मायावीही असतात शब्द !
शब्दातून ओसंडते प्रेम,मुर्दाड मनालाही आणती ओल शब्द!
शब्दात असू शकते दयामाया,लाचारही असू शकतात शब्द!
शब्दाने देतात आधार, विश्वासाने दिले घेतले जातात शब्द!
वाढू शकतात शब्दानेच शब्द, नाती बिघडवूही शकतात शब्द!
अस्रही असू शकतात शब्द, शस्रही होवून टोचू शकतात शब्द!
म्हणूनच असे म्हणतात की तोलून मापूनच वापरावेत हे शब्द!
  शब्दात प्रचंड सामर्थ्य आहे हे सामर्थ्य तसे तर शब्दातीतच आहे!
 जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात...
‘‘आम्हा घरी धन - शब्दांचीच रत्ने,
शब्द शब्दांचीच शस्त्रे - यत्न करू।।’’
शब्द हे शस्त्र आहे. ते जपून वापरायला शिकणे ही साधना आहे. शब्द हसवू शकतात त्याप्रमाणे  शब्द रडवूही शकतात.म्हणूनच आनंदी,सुखी,समाधानी जीवनासाठी शब्दांचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. ज्या माणसाकडे सौजन्य,शिष्टाचार व चार गोड शब्द आहेत, त्यांचे बोलणे आपल्याला नेहमीच आवडते.अशी व्यक्ती आपल्यावर एक प्रकारची जादू करते. अशा शब्दप्रभू माणसाचे विचार आपल्याला भावतात. अर्थपूर्ण संवादाने शब्दांना श्रीमंती येते. मनातले विचार व भावना संयमित शब्दात व्यक्त करणे ही एक कला आहे आणि ही कला ज्याला साध्य झाली आहे तो माणसांच्या समूहाला जिंकू शकतो! आपली जीभ जेव्हा गोड बोलू लागते,बोलण्यात माधुर्य येते! या माधुर्याच्या  जोडीला विनम्रतेचा गुण असेल तर असा माणूस सर्वांना जीव की प्राण असतो!
    ................ प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, February 22, 2017

माझा आवडता प्राणी .

मनोरंजन.. चला बालपण जगू या!-  निबंध
दुसरी किंवा तिसरीत शिकतोय असे समजून लिहिलेला निबंध .
माझा आवडता प्राणी .

   मी छोटा होतो ना,तेव्हा मला कोणताच प्राणी आवडायचा नाही.एकदा मी घरात खेळत होतो, आईने मला प्यायला दुध ठेवलं होत.माहीत नाही, कुठून एक बोका घरात आला आणि सगळ दुध पिवून टाकल.मी रडायला लागलो तर त्याने माझ्या हाताला बोचकारले की! आईचा आवाज ऐकून बोक्यान धूम ठोकली.त्यामुळे मला सगळ्या प्राण्यांची भीतीच वाटायची!
   एकदा मात्र मजा झाली.मी चालत चालत शाळेत चाललो होतो.डब्यात आईने शिरा करून दिला होता.रस्त्यात एक बसचा थांबा होता.तिथून मी चाललो होतो, तर  काय झालं ना ,एक कुत्र्याचं पिल्लू  माझ्या मागे मागे यायला लागलं.मी घाबरून पळायला लागलो तर ते सुध्दा माझ्यामागे पळायला लागलं.मी थांबलो.पिल्लू माझ्या पायाजवळ आलं.मी नीट बघितलं तर एकदम मस्त दिसत होत ते! मी हळूच त्याला हात लावून बघितला.ते माझ्याशी मस्तीच करायला लागलं की! मला ते पिल्लू खूप आवडलं.मी डब्यातला अर्धा शिरा त्याला खायला दिला.त्याने पटापट खावून घेतला मग मी राहिलेला शिराही त्याला देवून टाकला! आता शाळेला उशीर होईल म्हणून मी पुढे गेलो तर ते पिल्लू माझ्यामाग आलं.मी त्याला सांगितलं-“मी शाळेत चाललोय,तू थांब इथं!”
ते खरंच थांबल की! संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी निघालो तर ते रस्त्यात माझी वाट बघत उभं होते.माझ्या मागे मागे बस थांब्यावर आल्यावर ते मागच्या बाजूला गेले.दुसऱ्या दिवशी शाळेत निघालो तर ते माझी वाट बघत होत.परत शाळेपर्यंत आलं.बाहेरच थांबलं.आणि मग असं दररोज व्हायला लागलं.मी डब्यातलं अर्ध जेवण दररोज त्याला देतो.त्याच्याबरोबर खेळतो.
  मी आता त्याला रॉकी म्हणतो.रॉकी खूप हुशार आहे.माझ एका मित्राशी एकदा भांडण झालं तर रॉकी त्या मित्रावर जोरात भुंकला, तो घाबरला आणि पळून गेला.मी आता दररोज त्याच्याशी गप्पा मारतो.फार मस्तीखोर आहे रॉकी.मी अजून माझ्या आईला रॉकीबद्दल सांगितले नाही.आईचा ओरडा पडेल ना म्हणून नाही सांगणार आईला! रॉकी माझ्याबरोबर असला ना की मला एकदम मस्त वाटत.माझे शाळेतले मित्र म्हणतात-“ लै भारी आहे रे तुझे कुत्रे!”
रॉकीला कुणी कुत्रे म्हणलेलं मला आवडत नाही.माझा दोस्त आहे तो! मला दररोज शाळेत पोहोचवतो,परत घ्यायला येतो! मला रॉकी फार आवडतो.मी आता आईला सांगणार आहे वाढदिवसाला मला काहीच गिफ्ट नको फक्त रॉकीला घरी आणू दे!
     .... प्रल्हाद दुधाळ.