Monday, March 8, 2021

महिला दिन स्पेशल

 #womensdayspecial 

  मी १९८१ साली टेलिफोन खात्यात टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरीला लागलो.त्या आधी पुण्यात तरी या पदावर फक्त महिलांचीच भरती होत असायची.तो  ट्रंक कॉल बुक करून संभाषण होण्यासाठी तासनतास वाट बघण्याचा काळ होता, आणि हे कॉल जोडून द्यायचं काम आमच्या खात्याच्या या महिला टेलिफोन ऑपरेटर तिन्ही शिफ्टमध्ये काम करून करायच्या.१९८० दरम्यान तांत्रिक बिघाडासंदर्भातील कामात महिलांच्या मर्यादा लक्षात घेऊन ऑपरेटर पदावर पुरुष कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आणि त्यातल्या दुसऱ्याच बॅचमध्ये माझी खात्यात वर्णी लागली.

    ट्रेनिंग संपले आणि पोस्टिंग झाल्यावर पहिल्याच दिवशी लक्षात आले की पस्तीस स्टाफ असलेल्या आमच्या सेक्शनला आम्ही केवळ सहाजण पुरुष ऑपरेटर होतो,एवढेच नाही तर आमच्या सहा सुपरवायझरमध्ये चार महिला होत्या! आमच्या सेक्शन प्रमुख पदी (ज्याला हायर ग्रेड सुपरवायझर असे म्हणत असत)एक अत्यंत कडक स्वभाव असलेल्या महाडिक नावाच्या मॅडम होत्या,आणि त्यांची सेक्शनवर प्रचंड दहशत होती....

    थोडक्यात प्रचंड प्रमाणात महिलाराज असलेल्या त्या सेक्शनमध्ये आणि टेलिफोन खात्यात मला आता काम करायचे होते... आत्तापर्यंतचे  माझे आयुष्य खेड्यात गेलेले, शिवाय त्या काळात मी येरवड्यात नागपूर चाळीत रहात असल्याने ग्रामीण आणि शिवराळ भाषा बोलण्यात सवयीची होती. बोलताना तथाकथित असंस्कृत शिवराळ शब्दही बऱ्याचदा तोंडाला यायचे आणि इथे तर बोलण्याचेच काम होते तेही महिला बाजूला बसलेल्या असताना!,त्यामुळे खूपच टेन्शन आले होते. 

    कार्यालयात या महिलांशी बोलताना चुकूनही वावगा शब्द ओठांवर येऊ नये म्हणून सुरुवातीला खूप काळजी घ्यावी लागली, पण लवकरच महाडिक मॅडमने लावलेल्या शिस्तीमुळे भाषा सुधारलीच, शिवाय कामातही तरबेज झालो...

   माझी कामातली हुशारी पाहून माझ्यावर काही विशेष कामे सोपवली गेली आणि शिफ्ट ड्युटी मधून माझी सुटका झाली.प्रमोशन साठी परीक्षेच्या अभ्यासाला वेळ मिळाल्याने पहिल्या पाच वर्षांतच मला प्रमोशन मिळून टेलिफोन इन्स्पेक्टर झालो, पुढे तीन चार वर्षात ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर झालो....

    आता जरी मी वर्ग दोनचा अधिकारी झालो असलो तरी समोर वेगळाच प्रश्न उभा रहायचा; कारण ज्यांच्या बरोबर पूर्वी मी ऑपरेटर म्हणून काम केले होते अशा महिलांचा बॉस म्हणून मला काम करावे लागत होते! २००५ साली माझ्याकडे ग्राहक सेवा केंद्राचा उप विभागीय अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली.bsnl ने नुकतीच मोबाईल आणि ब्रॉडबांड सेवा सुरू केली होती आणि  निदान हजार पाचशे ग्राहक इथे आपल्या समस्या घेऊन दररोज यायचे.माझ्या हाताखाली सत्तावीस महिला कर्मचारी कार्यरत होत्या आणि सगळ्यांची मर्जी सांभाळत काम करवून घेण्याचे मोठे आव्हान समोर असायचे,पण मुळात नेहमीच सर्वाँना बरोबर घेऊन माझी काम करण्याची पध्दत मला मदतीला आली आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या स्टाफने प्रचंड सहकार्य केले मला त्रास होईल असे कोणीही वागले नाही,उलट आपल्यातूनच वरच्या पदावर गेलेल्या या मित्राला जास्तीत जास्त मदत करून सेक्शनची आणि पर्यायाने आपल्या साहेबाची कार्यक्षमता कशी उत्कृष्ट होईल हे पाहिले जायचे.

   कधी कधी तर मला असेही काही सेक्शन मिळाले जेथे पूर्वी माझ्या सिनियर असलेल्या महिलांची माझ्या हाताखाली नेमणूक झाली.इथे त्यांना योग्य तो मान देऊन त्यांच्याकडून भरपूर काम करून घेण्यासाठी मला माझे सारे कौशल्य पणाला लावायला लागायचे आणि मी त्यात यशस्वी व्हायचो. यासाठी मी माझी म्हणून एक कार्यशैली विकसित केली होती.सगळ्यांचे वाढदिवस साजरे करणे, दर आठ मार्चला Women's Day ला खास सुजाता मस्तानी मागवायची.सगळ्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आणि नियमात बसवून शक्य तेवढी मदत देण्याचा प्रयत्न करायचा, धीराचे दोन शब्द बोलायचे, सगळ्यांची विचारपूस करत रहायचे अशा पद्धतीच्या वागण्याने मी  स्टाफ बरोबर आपलेपण जोपासत राहीलो त्यामुळे माझी जिथे जिथे बदली झाली तो सेक्शन माझे कुटुंब होऊन जायचा! 

   माझ्या या कामाच्या पध्दतीमुळे प्रत्येक ठिकाणी मला हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडून  प्रचंड सहकार्य मिळत राहिले आणि मी कायमच एक कार्यक्षम अधिकारी म्हणून नावारूपाला आलो.

एक यशस्वी अधिकारी म्हणून मी निवृत्त झालो याचे श्रेय अर्थातच या स्टाफचे आहे... आजच्या या महिला दिनी माझ्या यशासाठी ज्या महिलांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे नक्कीच माझे कर्तव्य आहे म्हणून हा पोस्ट प्रपंच....

 महिला दिनानिमित्त सर्व स्री जगताला सलाम!

© प्रल्हाद दुधाळ.

Saturday, February 27, 2021

तुम्हीच ठरवा

 कोणतीही व्यक्ती इतरांसाठी चांगली किंवा वाईट हे कशावरून ठरते? 

    खरं तर माणूस चांगला आहे किंवा वाईट आहे असे काही नसते! 

   माणूस समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे वागला की संबंधीत माणूस त्या व्यक्तीच्या दृष्टीने चांगला, तर तो त्याच्या मनाविरुद्ध वागला की तो वाईट ठरतो...

    त्यामुळेच असेल एकच व्यक्ती एखाद्याच्या दृष्टीने चांगली असते,पण दुसऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून तीच व्यक्ती वाईट असू शकते!

    तुम्हाला कुणी चांगले म्हणते म्हणून तुम्ही चांगले असालच असे मुळीच नाही!

   तुम्ही चांगले तेव्हाच ठराल जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःला चांगले असल्याचे पटवून द्याल...

  तेव्हा, तुम्हाला कोण काय समजतो त्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत तुम्ही चांगले रहाण्याचा प्रयत्न करायला हवा. एकदा का तुम्ही चांगलेच आहात हे स्वतःला वागण्या बोलण्यातून समजावले की काय बिशाद आहे तुम्हाला कोणी वाईट म्हणायची? आणि त्यातूनही कुणी बोट दाखवले तर त्याला फार गंभीरपणे घ्यायची गरज नाही...बरोबर ना?( सहजच)

©प्रल्हाद दुधाळ.

मराठी भाषा दिवस आणि आपण

 आपले जगणे अधिकाधिक सोपे व्हावे म्हणून माणसाने जसा विविध यंत्रांचा शोध लावला तसाच आपल्या बोलण्यातला अघळपघळपणाही कमी करून आपला वेळ आणि ऊर्जा वाचवायचा प्रयत्न केला आहे.

   प्रत्येक गोष्टीला आटोपशीर आणि सोपे करायच्या नादात त्याच्या लिहिण्यात आणि बोलण्यात अनेक शॉर्टकट आले.इंग्रजी भाषेतल्या अनेक शब्दांची लघुरुपे आपण अगदी मराठीत बोलतानाही सर्रास वापरतो.समोरासमोर भेटायला वेळ नाही म्हणून सुरुवातीला फोनवरून होणाऱ्या गप्पांना चॅटिंगचा सोपा पर्याय आला आणि लांबलचक टाईप करून शाब्दिक गप्पा सुरू झाल्या. मग पुढे जाऊन टायपिंगचा वेळ वाचवण्यासाठी विविध शब्दांचे शॉर्टकट वापरात आले.वाढदिवसाच्या शुभेच्छा,गुड मॉर्निंग, गुड नाईट,इत्यादी hbd, gm, gn इतके आकुंचित झाले! 

   त्यातच सोशल मीडियावर विविध ईमोजी आल्या आणि शब्दांपेक्षा या बाहुल्याच मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी सर्रास वापरल्या जाऊ लागल्या आहेत...

  मनातले चार शब्द लिहिण्यासाठी लोकांना वेळ नाही त्या ऐवजी तिथे बाजूला तयार असलेल्या इमोजींपैकी एकावर टिचकी मारून भावना व्यक्त करण्याचा शॉर्टकट लोकांच्या सवयीचा होऊ पहात आहे.

   एका बाजुला मीssमsराsठी चा गजर करायचा,पण एरवी दिवसभरात एखादा मराठी शब्द लिहिण्याचीही तसदी घ्यायची नाही असा करंटेपणा सुरू झाला.वर्षातून एकदाच मराठी भाषा दिनाच्या दिवशी आमची मराठी किती महान आहे याचे गोडवे गायचे,पण एरवी सगळा आनंदी आनंदच आहे....

   मराठी भाषा मराठी माणसांनी वापरली तरच जगणार आहे तेव्हा आपल्या या अमृतापेक्षा गोड भाषेचा वापर जाणीवपूर्वक करूया....

  मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

  ©प्रल्हाद दुधाळ.

Friday, February 26, 2021

लवचिकता... एक आवश्यक बाब

 आपल्या लहानपणापासून आपण काही समजुती (किंवा गैरसमजुतीही) आपल्या मनात घट्ट बसवून ठेवलेल्या असतात.

   आपल्या भोवतालच्या परिस्थिती आणि माणसांनी या समजुती मनात अजूनच पक्क्या बिंबवण्यास मदत केलेली असते.

   माणसाचे वय वाढते तसे तसे खरं तर या समजुती तार्किक कसोट्यांवर घासून त्याची सत्य अथवा असत्यता पडताळून पहाणे अपेक्षित असते,पण प्रत्यक्षात मात्र माणूस अशी पडताळणी करायच्या भानगडीत पडत नाही.त्या समजुती बद्दल प्रश्न पडले तरी कुणी तरी दुखावले जाईल किंवा आपण कशाला आपले डोके चालवायचे? असा विचार करून त्या समजुती अंधपणे आपण कुरवाळत बसतो.कधी कधी तर या समजुती स्वतःच्या अहंकाराशी जोडून चुकीच्या पद्धतीने वागले जाते...

   खरं तर आपली वैचारिकता लॉजिकल आहे का हे वेळोवेळी तपासून बघायला हवे...

   काही चुकत असेल तर स्वतःमध्ये आवश्यक असलेले बदल अंगिकारण्यात कसला आलाय कमीपणा? ही लवचिकता तुमच्या अंगी असली ना की जीवनात आनंदी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही! बरोबर ना?( सहजच)

©प्रल्हाद दुधाळ.

Thursday, February 18, 2021

मी एक कॉम्रेड

 मी एक कॉम्रेड

गोष्ट 1985-86 मधली आहे, नोकरीत थोडाफार रुळलो होतो. 

   कामगार संघटनेचा सभासद असलो तरी फारसा ॲक्टिव नव्हतो. त्याच दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग नेमावा या मागणीसाठी देशभरातील कर्मचारी संघटनांनी आंदोलने करायला सुरुवात केली होती आणि त्याचा भाग म्हणून पुण्यातल्या सर्व केंद्रीय कर्मचारी संघटनांनी एका मोर्चाचे आयोजन करायचा निर्णय घेतला.पुण्याचे विधानभवन ते अलका टॉकीज असा भरपूर लांब मार्ग मोर्चासाठी ठरला.भर दुपारच्या उन्हात होरपळत जाणाऱ्या या मोर्चात सामील व्हायची माझी तरी तयारी नव्हती त्यामुळे मोर्चा सुरू होण्यापूर्वीच आपण ऑफिसातून हळूच मागच्या गेटमधून कलटी मारायची असा बेत मी केला होता.या गेटकडे कुणाची नजर असायची शक्यता नव्हती....

   आमच्या टेलिफोन खात्यातल्या सगळ्या कामगार संघटना या मोर्च्यात सामील होणार होत्या त्यामुळे सगळे पुढारी आपापल्या सदस्यांवर कुणी पळून जाऊ नये म्हणून नजर ठेऊन होते.त्यावेळी मी ज्या संघटनेचा सदस्य होतो त्या संघटनेची धुरा एका धिप्पाड रणरागिणीकडे होती....

  आमच्या खात्यात या कॉम्रेड शारदा मॅडमचा प्रचंड दरारा होता.खात्याचे मोठे मोठे अधिकारीसुध्दा तिला प्रचंड घाबरायचे.एखादे काम घेऊन ती अधिकाऱ्याकडे येणार आहे असा नुसता निरोप गेला तरी ते काम आधीच व्हायचे एवढी या मॅडमची दहशत होती! वेळ आली तर समोरच्या व्यक्तीच्या कानाखाली वाजवण्याची तिची तयारी असायची त्यामुळे सगळे सदस्यही तिला टरकून असायचे.त्या काळात ती स्कुटरवरून फिरायची.कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हककांसाठी प्रशासनाशी कोणत्याही प्रकारचा पंगा घ्यायच्या तिच्या गुणांमुळे पुण्यात तिच्या संघटनेची सदस्यता सर्वात जास्त होती....

  तर,त्या दिवशी ठरवल्याप्रमाणे मी मोर्चाला जायला नको म्हणून हळूच ऑफिसच्या मागच्या गेटने बाहेर सटकलो.या गेटमधून बाहेर पडले की एका निमुळत्या गल्लीतून थेट सदर्न कमांडच्या प्रवेशद्वाराकडे बाहेर पडता यायचे त्यामुळे हा सेफ मार्ग मी निवडला होता...

 आता कुणाच्याही लक्षात न येता मी मोर्चाच्या विरुध्द दिशेकडे बाहेर पडणार होतो आणि भर उन्हातली माझी पायपीट वाचणार होती...

   मी गल्लीतून बाहेर पडणारच होतो तोच समोर एक स्कूटर येऊन उभी राहिली,आणि स्कुटरवर साक्षात कॉम्रेड शारदा!

  " काय रे, कुठे चाललाय?"

  " कुठे काय,... कुठे म्हणजे?.. तिकडे मोर्चाकडेच निघालोय की..." 

मी सारवा सारव करायचा प्रयत्न करायला लागलो. .

  माझ्याकडे हसरा कटाक्ष टाकून मॅडम म्हणाल्या  ....

 " बरं, चल बस माझ्यामागे ..."

 आता काही पर्यायच नव्हता...

 मी गुमान मॅडमचया मागे स्कूटरवर बसलो. तोपर्यंत मोर्चाचे सुरुवातीचे टोक पार ससून हॉस्पिटल ओलांडून पुढे गेले होते तर शेवटचे टोक अजून विधान भवनातच होते....

   मला वाटल होत की विधानभवनात नेऊन मला मोर्चेकऱ्यात सामील केले जाईल,पण मॅडमने स्कूटर मोर्च्याच्या कडे कडेने थेट नरपत गिर चौकाकडे जेथे मोर्चाचे पुढचे टोक होते तिकडे नेली...

  आमची वरात आता पार मोर्चाच्या सुरुवातीच्या पुढारी मंडळींपर्यंत पोहोचली होती ...

 कॉम्रेड शारदाने मला सरळ मोर्चाच्या फ्रंटवर नेले तिथे एकाच्या हातात असलेला भला मोठा लाल बावटा काढून घेऊन माझ्या हातात दिला आणि जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली!

   कामगार चळवळीत तोपर्यंत अगदीच बॅकफुटवर असलेल्या माझ्या हातात अचानकपणे कामगार चळवळीचा लाल बावटा देऊन कॉम्रेड शारदाने मला मोर्चातला क्रियाशील कार्यकर्ता केले...

  पुढे नोकरीत पस्तीस वर्षे मी कोणत्या ना कोणत्या कामगार वा अधिकारी संघटनेत जिल्हा स्तरावर पदाधिकारी म्हणून काम करायचे होते कदाचित त्याची मुहूर्तमेढ अशी रोवली गेली ..

   आजही मी निवृत बी एस एन एल अधिकारी संघटनेचा फायनान्स सेक्रेटरी आहे आणि तो बावटा अजूनही तसाच हातात आहे...

 ©प्रल्हाद दुधाळ.

Monday, December 7, 2020

त्या दोघी ..प्रल्हाद दुधाळ. ..कथा परीक्षण

 #कुबेरदिवाळीअंक    #आस्वाद(८)


 Pralhad Dudhal यांची #त्या_दोघी ही एक सुगम अशी लघुकथा. वृद्धाश्रम,  तिथली वेदना, त्या वेदनेला झिरपत नेणारे तिथले वृद्ध ..त्यांचं भावविश्व, त्यांचं कुटुंब, त्यांचे संस्कार आणि याच संस्काराला बाजूला सारून त्यांच्या  जीवलगांद्वारे  फोफावणारा स्वार्थ या सर्वांचं सुरेख चित्रण म्हणजे ही लघुकथा. कथेचा आवाका अत्यंत छोटा असला तरी विषयाने नि आशयाने कथेला महत्त्वाचे  स्थान मिळतेय. एका  संवेदनशील विषयाला अतिशय साधेपणाने पण सामर्थ्याने लेखकाने आपल्या शब्दांनी सजवलेय.  खरंच संस्कार  संस्कारच असतात. ते ग्रामीण आणि शहरी असा भेद करत नसतात. कारण कुठलेही आईवडील आपल्या लेकरांवर उत्तमोत्तम असेच संस्कार घडवत असतात. ग्रामीण, शहरी अशा वातावरणात फरक नसतो. तर तो असतो त्या व्यक्तिच्या विचारांच्या जडणघडणीत. स्वार्थ जेव्हा  पुढील दाराने आत प्रवेश करतो ना तेव्हा  हे उत्तम संस्कार मागील दाराने कधी निघून  जातात ते कळतही नाही. 'त्या दोघी' तील सरूबाई आणि सुमन अशाच स्वार्थीपणाला बळी पडलेल्या; पण सरूबाई... तिच्या मुलांनी तिला या आश्रमात आणलेले नसून त्यांच्या स्वार्थीपणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी  आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी  ती आपणहूनच या वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेते. तिथेच तिला मानसिक , भावनिक  नि शारीरिक साथ देणारी सुमन भेटते. या दोघींच्या भावविश्वावर प्रकाश टाकणारी ही कथा. अगदी साधीच. पण एक शिकवण देऊन जाते. आयुष्याच्या सायंकाळी  स्वाभिमानानं कसं जीवन जगावं हे सांगते. नवा विषय वाटला मला. नि तेवढाच समंजस आशय .. लेखक प्रल्हाद दुधाळ यांनी एक आगळीवेगळी कथा आपल्या हाती दिलीय . ते मुरलेले लेखक आहेत हे सर्वार्थाने खरे ठरले. 

या भावनिक , संवेदनशील कथेसाठी लेखकाला अनेकानेक धन्यवाद ...आणि अनंत शुभेच्छा लेखनप्रवाहासाठी.....!!

Wednesday, November 18, 2020

विचारचक्र आणि घटना

 आपले विचार आणि घटना....

  गेली अगणित वर्षे माणूस आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीला किंवा व्यक्तींना दोष देत आलेला आहे.त्याच्या या विचार धारणेमुळे  तो आपल्या मनात कुणाबद्दल तरी मत्सर घृणा असूया अशा भावना बाळगून दुःखात जगतो आहे.

   खरं तर माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या अथवा वाईट घटना या त्याने त्याच्या मनात भरलेल्या चांगल्या अथवा वाईट विचारांचा परिपाक असतो.

    आपल्या अंतर्मनात रात्रंदिवस जे विचारचक्र चालू असते त्या विचारांमध्ये जर भीती चिंता,अंधश्रद्धा,इर्षा,असूया आणि द्वेष अशा भावना भरलेल्या असतील तर तशाच घटना जीवनात विविध समस्यांच्या/घटनांच्या स्वरूपात समोर येतात.

     आपण आनंदात जगायचे की यातना भोगायच्या हे माणसाची विचार करण्याची पध्दती ठरवते. 

अवचेतन मन हे नेहमीच तटस्थ वृत्तीचे असते आणि त्यामध्ये चांगले काय आणि वाईट काय याचा फरक करण्याची शक्ती  किंवा भावना नसते ,म्हणूनच जर आपल्या अवचेतन मनातील विचार जर वाईट व नकारात्मक स्वरूपाचे असतील तर प्रत्यक्ष जीवनातही केवळ तसेच वाईट व नकारात्मक अनुभव येत राहील. 

  आपले अवचेतन मन जसा विचार करेल तशाच घटना समोर येत रहातात म्हणून आपले विचार बदलले तरच जीवनात सकारात्मक बदल जाणवेल... 

   (ज्ञानकण वेचलेले १)

   ....©प्रल्हाद दुधाळ.