Wednesday, December 15, 2021

लयाला चाललेल्या लोककला...

लयाला चाललेली लोककला... माझे लहानपण गावाकडे गेले आहे.थोडेफार समजायला लागले तेव्हापासून विविध लोककलांना मिळत असलेला लोकाश्रय अगदी जवळून पाहिला आहे.लोककलावंतांना सन्मान दिला जाई.दर एकादशीच्या दिवशी गावातील गोंधळी गावदैवत आणि पांडुरंगाची भजने त्याच्या डवराच्या तालावर प्रत्येक दरवाजावर येऊन म्हणायचा आणि आयाबायानी घातलेल्या शिध्याने त्याची झोळी भरून जायची. नवरात्राच्या नऊ दिवसात ग्रामदैवत भैरवनाथाच्या पायावर आपली सेवा रुजू करायला काही ठराविक कलावंतीण यायच्या.कोल्हाटी समाजातील या कलावंतीनी दर वर्षी न चुकता नवरात्रीत हजर व्हायच्या.रोज रात्री पायात घुंगरू बांधून त्यांचे पाय ढोलकीच्या तालावर थिरकत असायचे.या कलावंतीना दौलतजादा करायला गावातले प्रतिष्ठित हजर असलेले आठवतात... एकदा सुगी सुरु झाली की काढणी मळणी उपणनी अशी कामे सुरू व्हायची.सगळे कुटुंब खळ्यावर कामासाठी उपस्थित असायचे.या सीझनला वासुदेव, पिंगळा, कुडमुडे जोशी, नंदिवाले असे लोककलाकार दारावर अथवा खळ्यावर हमखास हजेरी लावून जात.पिकलेल्या पिकातून सुपभर अशा कलावंतांच्या झोळीत ओतले जाई आणि भरभरून आशीर्वाद देऊन ही मंडळी जायची. यात्रा जत्रेचा सिझन सुरू झाला की ढोल लेझीम पथके अशा यात्रात हजेरी लावायला सज्ज होत.यात्रेच्या दिवशी अशा बाहेर गावाहून आलेल्या ढोल पथकांचे डाव पहाणे खूप आनंदाचे असायचे.उत्तम खेळ करून आपली कलाकारी दाखवणाऱ्या पथकाला खास बक्षीस जाहीर केले जात असे. गावच्या ग्रामदेवतेच्या उत्सवांचा अर्थात जत्रा यात्रा उत्सवाचा तमाशा फड हा अविभाज्य भाग असायचा. कोणत्या गावाने कोणत्या लोकनाट्य तमाशाला त्या वर्षी सुपारी दिली आहे हे आवरजून पाहिले जात असे. जत्रेतला तमाशा आणि त्याचे वगनाट्य जेवढे फर्मास त्यावर जत्रा कशी झाली याचे मोजमाप लोक करत.... संक्रातीच्या आधी महिनाभर गावात मारीआईचा फेरा येत असे.पोतराजाच्या आसुडाच्या फटके आणि ढोलकीच्या गुबुगुबु आवाजाने गावाकडे मरीआईचा डोलारा आल्याची वर्दी मिळे.आणि सवाष्णी पूजेच्या तयारीला लागत.या वर्षी संक्रात काय काय लेऊन आली आहे,तिने कोणता रंग घातला आहे, कोणत्या दिशेकडून आली आहे, कोणत्या दिशेकडे जाणार आहे यावरून संक्रात सणात काय काय वर्ज्य करायचे याची माहिती घेतली जात असे. हा फेरा घेऊन येणाऱ्या जोडीला धन धान्याची आणि ओटी बरोबर आलेल्या सामानाची बऱ्यापैकी कमाई होत असे. गावात कधी गारुडी येत असे.त्याचे खेळ बघायला पोराटोरांची चांगलीच गर्दी व्हायची.त्याच्याकडील मुंगूस आणि सापाची लढत बघायची उत्सुकता ताणत ठेवत गारुडी त्याच्याकडे असलेले ताईत मोठ्या खुबीने विकायचा. नजरबंदी चे जादूचे प्रयोग करून गारुडी लोकांचे मनोरंजन करत आपला गावातला शेअर घेऊन जात असे. गावात कधीतरी अचानक डोंबाऱ्याचा खेळ यायचा आणि त्यातल्या डोंबाऱ्याचा पोरांचे कसरतीचे खेळ पाहून गाव अंचांबित होऊन जात असे. त्यातल्या छोट्या मुलीने दाखवलेले खेळ गावात पुढे कित्येक दिवस चर्चेत असायचे. आता गावांचे शहरीकरण झाले आहे.आता लोककलेला खेड्यात सुध्दा पूर्वीसारखा लोकाश्रय राहिला नाही.अनेक लोक कलावंत आता त्यांचे पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरी धंद्याची वाट चोखाळत आहेत.नव नव्या मनोरंजनाच्या आधुनिक सोयींनी बाळबोध लोक कलेचे महत्व आज संपवले आहे. शहरात सोडा; पण ग्रामीण भागातही लोककला नामशेष होत चालली आहे... ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

No comments:

Post a Comment