Friday, July 22, 2016

दुकानदारी.

                                     दुकानदारी.

   साताठ वर्षापूर्वी मी शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी माझ्या मेव्हण्याच्या स्टेशनरी दुकानात जावून बसायचो. गिऱ्हाइकांची गर्दी वाढली तर मी त्याला मदतही करायचो.हळूहळू मला या दुकानातल्या वस्तू, त्यांच्या किमती,होलसेल मार्केट या धंद्यातले मार्जिन इत्यादीबद्दल बऱ्यापैकी माहिती झाली. आपणही धंदा करू शकू असे वाटायला लागले! कधी मेव्हण्याला दुसरे काही काम असेल तर मी त्याला सुट्टी द्यायला लागलो.अशावेळी संपूर्ण दुकान सांभाळण्यापर्यंत माझा  आत्मविश्वास वाढला होता.तर अशाच एका रविवारी मी दुकान उघडले व दुपारपर्यंत व्यवस्थित दुकान चालवले.तो शाळा कॉलेजेसचा दिवाळीच्या सुट्टीचा हंगाम होता, त्यामुळे स्टेशनरीला तशीही फारशी मागणी नव्हती. निवांत बसलो असताना साधारणपणे तिसरी चौथीच्या वर्गात असावीत अशी दोन मुले दुकानात आली. मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले.नेहमीचे काका दुकानात नाहीत हे पाहून एकाने विचारले.
“ते दररोज असतात ते काका नाहीत का आज?”
“का ,काही काम होत का त्यांच्याकडे?”
“नाही,असंच विचारलं,दिसले नाही म्हणून!”
दुसऱ्याने विचारले-
“काका, व्हाईटनर  आहे का हो?”
“हो आहे की, पंधरा रुपये.”
“दाखवा की”
मी त्याला पंधरा रुपये किमतीचे व्हाईटनर दाखवले.
“हे नाही हो दोन बाटल्यावाले व्हाईटनर पाहिजे.”
मी आतून मोठे व्हाईटनर काढून दाखवले.त्याने ते हातात घेवून दोन्ही बाटल्या आहेत का पाहून घेतले.
“कितीला आहे?”
मी खोक्यावर किंमत बघून सांगितले-
“बावीस रुपये!”
“काय कमी नाही का, काका.”
“नाही रे बाबा,ते दुकानवाले काका रागावतील ना?”
त्याने खिशातल्या पैशाचा अंदाज घेतला.
“बर काका,दोन मोठे व्हाईटनर द्या!”
मी त्याच्याकडून पन्नासची नोट घेतली.वरचे सहा रुपये आणि दोन बाटल्या त्याच्या हवाली केल्या. दोन्ही मुले उड्या मारत निघून गेली.
अर्धा तास झाला असेल नसेल साधारण त्याच वयाचा एक मुलगा आला.
“काका, व्हाईटनर आहे का हो?”
“हो आहे की, मोठा का छोटा?”
“मोठ्या तीन बाटल्या द्या!”
त्याने मोजून सहासष्ट रुपये आणले होते.
मी त्याला तीन बाटल्या काढून दिल्या.तो निघून गेला.
पंधरा वीस मिनिटानंतर  अजून एक थोडा मोठा मुलगा आला.त्याने चार बाटल्या व्हाईटनर मागितले. मी कुतुहलाने त्याला विचारले.
“एवढे व्हाईटनर कशाला लागतंय रे.”
“काका,अहो त्या पलीकडच्या रस्त्यावर प्रिंटींग प्रेस आहे तेथे लागतंय!”
मी त्याला चार बाटल्या व्हाईटनर काढून दिले.
दुकान दुपारी बंद होईपर्यंत अजून सहा बाटल्या व्हाईटनर विकले गेले!
सुट्ट्यांचा  सिझन असूनही गल्ल्यात या व्हाईटनर विक्रीमुळे बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते त्यामुळे आपला रविवार कामाला आला याचे वेगळे समाधान वाटत होते.दुकान बंद करून मी घरी गेलो.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या ऑफिसला गेलो. दुपारी मेहुण्याचा फोन आला.
“ अहो त्या कपाटात व्हाईटनर होते ते सगळे विकले का?”
“हो सगळ्या बाटल्या विकल्या की!” मी थोड्या फुशारकीतच सांगितले!
“छोटी मुले आली होती का घ्यायला?”
“हो,अरे तीन चार मुलेच आली होती.त्यांनाच विकले की! का? काय झाले?”
“अहो,त्या पोरांना नाही द्यायचे व्हाईटनर!”
“का नाही द्यायचे?” माझा इनोसंट प्रश्न!
“अहो ही मुले या व्हाईटनरच्या बाटलीत एक थिनरची बाटली असते ना ते पिवून नशा करतात! मी अशा लहान मुलांना अजिबात व्हाईटनर विकत नाही, सरळ नाही म्हणून सांगतो,मी दुकानात नाही याचा बरोबर फायदा घेतला कारट्यांनी!”
माझा मेहुणा हळहळत होता!
मी फोन बंद केला.
बापरे, म्हणजे मी नकळत का होईना,या पोरांच्या नशापानाला मदत केली होती!
माझी दुकानदारी केल्याची मिजास ताबडतोब उतरली!
                                                     ........ प्रल्हाद दुधाळ.






No comments:

Post a Comment