Tuesday, August 12, 2014

कृतज्ञता....एक जादू .

कृतज्ञता....एक जादू .
      आपल्या दररोज च्या आयुष्यात पावलागणिक अनेक माणसे आपल्याला भेटतात.काही परिचित असतात तर काही अपरिचित असतात.अशा माणसांचे आपण जर निरीक्षण केले तर आढळून येईल की प्रत्येकजण कुठल्या तरी चिंतेत आहे.अनेक प्रकारच्या समस्यांचे ओझे घेउन माणसे जगत असतात.क्वचित एखादा माणूस खळाळते हास्य चेहऱ्यावर घेउन आणि तणावरहित असा दिसतो.अशा माणसाला निश्चितच विचारावेसे वाटते की त्याला कसलीच समस्या नाही का? आधुनिक जगात कुठलीच समस्या नाही अशी व्यक्ती अस्तित्वात असणे शक्य नाही असे मला वाटते.मग काही माणसे आपल्या सर्व समस्या बाजूला ठेउन कसे काय प्रसन्न चेहऱ्याने वावरू शकतात? माझ्या मते अशी माणसे वास्तवाचा स्वीकार करून आपल्या आयुष्याला सामोरे जात असावीत!
    समाधानी आयुष्यासाठी माणसाने प्रथम त्याच्याकडे असलेल्या गोष्टींबाबत आभारी असायला हवे पण माणूस नेमके याच्या उलट वागताना दिसतो.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो त्याच्या हातात नसलेल्या गोष्टींवरून भीती, चिंता, कटकट, वटवट करत, रडत आणि नशिबावर चिडत,कसेबसे जगत असतो असे करताना तो आपली मन:शांती सुख समाधान सगळ सगळ हरवून बसतो.खरे सुख कशात आहे याबद्दल त्याच्या भ्रामक कल्पना असतात.क्षणभंगुर समाधानासाठी तो आपले सर्वस्व पणाला लावतो व त्यापोटी एक दिवस निराशेच्या गर्तेत सापडतो.सकाळी उठल्यानंतर त्यांचा दिनक्रम चिडचिडेपणा करण्याने सुरु होतो आणि मग त्याचा सगळा दिवस,आठवडा,महिना आणि मग महिनोंमहिने शेवटपर्यंत तो निराशाग्रस्त रहातो.मन:शांतीसाठी कुठले ना कुठले उपाय करत रहातो.आध्यात्मिक गुरूंचे उंबरठे झिजवले जातात.काहीजण इत्तर काही अतर्क्य मार्गाने मन:शांती शोधू पहातात.यामध्ये माणूस गुरफटून जातो.अशावेळी खूप कमी लोकांना योग्य मार्गदशन मिळते.बाकीच्या असंख्य माणसांची ससेहोलपट होत रहाते.
   आपल्याला आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टींचे वरदान मिळालेले असते.आपल्याकडे खूप अंगचे गुण असतात,आजूबाजूला अनेक गुणवान माणसे असतात पण आपल्याला याची जाणीवच नसते आपल्याला असलेल्या अनुकूल परिस्थितीचे भान नसते आणि आपण या गोष्टींबाबत कधी गंभीरही नसतो.आपले सगळे लक्ष आसपासच्या सकारात्मक बाबींपेक्षा नकारात्मक गोष्टींकडे एकवटलेले असते.अशा नकारात्मक मनस्थितीचा एकूण जगण्यावरच वाईट परिणाम होत रहातो. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग विविध तज्ञ सुचवतात असाच एक मार्ग नुकताच मला THE MAGIC या पुस्तकात वाचायला मिळाला. या पुस्तकामध्ये कृतज्ञतेचा सिद्धांत सांगितला आहे.या थेअरी प्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सर्व गोष्टींची,परिस्थितीची,व्यक्तींची यादी करून त्या गोष्टीबाबत सजगपणे व सकारण कृतज्ञता व्यक्त करायची सवय लाउन घ्यायची आहे.
  आता आपण कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करू शकतो यावर थोडा विस्ताराने विचार करू.
आपण कृतज्ञ असले पाहिजे अशा गोष्टी शोधण्यासाठी सुरुवात आपल्या स्वत:पासून करणे योग्य राहील.
- अनमोल असा मानवाचा जन्म मिळाला म्हणून आभारी असायला हवे.
-आपल्याला निरोगी शरीर लाभल्याबद्दल आभार व्यक्त करायला हवेत.शरीरातील प्रत्येक अवयव अहोरात्र काम
करतो म्हणून प्रत्येक अवयवाचे तो देत असलेल्या सेवेचे स्मरण करून वारंवार आभार मानले पाहिजेत.
-आपण जे अन्न खातो त्या अन्नाबद्दल कृतज्ञ असायला हवे आपल्या ताटात जे वेगवेगळे पदार्थ
 येतात त्यासाठी अनेक व्यक्तीनी वेगवेगळ्या टप्प्यांवर आपआपले योगदान दिलेले असते त्या सर्वांचे तसेच
निसर्गाचे आपण आभार मानायला हवेत.
-आपण करीत असलेल्या कामाप्रती आपण आभारी असायला हवे. आपल्या कामामध्ये जे यश आपण
मिळवतो ते मिळवताना व  काम व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी आपला बॉस, हाताखालचे कर्मचारी, ग्राहक तसेच
जाणते अजाणतेपणी अनेक इत्तर घटक योगदान देतात या सर्वांचे आपण आभारी असायला हवे.
 -समाजात आपण जेंव्हा एक यशस्वी व्यक्ती म्हणून मिरवतो तेंव्हा हे यश मिळवताना आपल्या अगदी आपल्या
बालवयापासून शिक्षण तसेच इत्तर आवश्यक कौशल्ये प्राप्त करताना प्रगती करताना आपले पालक तसेच अनेक
व्यक्ती,संस्थ्या,मित्रमंडळी, शेजारी, नातेवाईक ई.यांचा हातभार लागलेला असतो हे यश साजरे करताना आपण
या सर्वांचे आभारी असायला हवे.
-आपण ज्या घरात सुखाने व समाधानाने रहातो ते घर बनविण्यासाठी ज्यांनी कष्ट उपसले त्या सर्वांचे तसेच
घरासाठी जे मटेरीअल वापरले ते बनविणारे व घराच्या जागेपर्यंत पोहाचते करणारे हात तसेच विविध अभियंते व
तंत्रज्ञ यांचेही आभारी असायला हवे.
-आपण सुखी व समाधानी जीवन जगत असताना आपल्या अशा जीवनासाठी अनेकजण जाणते अजाणतेपणे
आपली सेवा करत असतात जसे पेपरवाला, दूधवाला, सफाई कर्मचारी, रिक्षावाला ,भाजीवाला,सार्वजनिक वाहतूक
कर्मचारी,नगरपालिका,सीमेवरील जवान ,पोलीस तसेच इत्तर सेवा पुरवठा करणाऱ्या सरकारी तसेच खाजगी
कंपन्यांचे कर्मचारी ई.ई. असे अनेक लोक आपल्या सुखासाठी अहोरात्र झटत असतात अशा सर्वांचे आपण
आभारी असायला हवे.
-एक व्यक्ती म्हणून आनंदात जगत असताना आपल्या आनंदी जगण्यासाठी आपले सर्व कुटुंबीय जसे आई,
वडील पत्नी मुले अनेक जवळचे व लांबचे नातेवाईक आपापल्यापरीने हातभार लावत असतात.आपल्या
आरोग्यपूर्ण जगण्यासाठी आपले डॉक्टर योग्य मार्गदर्शन करत असतात.विविध कलाकार आपलेमनोरंजन करत
असतात अशा अनेक व्यक्तींमुळेच आपले जीवन समृध्द होत असते.आपण जर व्यावसायिक असलो तर आपले
कर्मचारी,पुरवठादार व सर्वात महत्वाचे म्हणजे आपले ग्राहक व नोकरदार असलो तर आपले सहकारी व आपण
काम करत असलेली संस्थ्या  यांच्यामुळेच आपल्याला पैसा मिळत असतो त्यामुळे अशा सर्व व्यक्तींचे आपण
सतत आभारी असायला हवे.
-अनेकदा आपल्याला काही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो काही नको त्या व्यक्ती व नकारात्मक  
परिस्थितीचा सामना करावा लागतो तेंव्हा आपल्याला मिळालेल्या या अनुभावाप्रतीसुध्दा आपण आभारी असायला
हवे कारण त्यातूनच आपल्याला जगण्याचे धडे मिळत असतात.चिडचिड न करता आपण कृतज्ञ राहिल्यामुळे
अशी परिस्थिती झपाट्याने सकारात्मक होते.
   आयुष्यात आपल्याला अशी अनेक वरदाने मिळालेली असतात पण आपण या वरदानांच्या बाबत
कधीच कृतज्ञता व्यक्त करत नाही त्यामुळे आपण जीवनात अनेक दु:खांचा सामना करत रहातो.समाधानी
आयुष्यासाठी ही कृतज्ञतेची जादू वापरता येणे आवश्यक आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला मिळालेल्या
 अगणित वरदानांची यादी वाचून हरेक वरदानाबाद्द्ल आभारी आहे असे किमान तीन वेळा म्हणून कृतज्ञता
व्यक्त केल्याने तसेच रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्वात आनंददायक घटनेचे स्मरण केल्यामुळे आपल्या
आयुष्यात खूपच फरक होतो कारण जेंव्हा तुम्ही चांगली घटना आठवत झोपी जाता तेंव्हा प्रसन्नपणे झोपता
तसेच सकाळी आपल्याला लाभलेल्या वरदानाबाद्द्लआभारी आहे असे म्हटल्याने सकाळी आपले मन प्रसन्न रहाते
दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी झाल्यामुळे दिवसही आनंदात जातो.दिवसाचा शेवटही चांगल्या विचारांनी
होतो त्यानुळे शांतपणे झोप मिळते सतत आनंदी रहाण्याची सवय होते त्यामुळे आकर्षणाच्या नियमाप्रमाणे फक्त आनंददायक गोष्टीच आयुष्यात घडत रहातात.जीवनात यश,सुख समाधान पैसा सशक्त नातेसंबंध यामध्ये झपाट्याने सुधारणा घडून येते असा लेखिकेचा दावा आहे.
   अधिक माहिती व ज्ञानासाठी The SECRET आणि  THE MAJIC ही पुस्तके जरूर वाचायला हवीत.
                                                             -----प्रल्हाद दुधाळ
    



No comments:

Post a Comment