Thursday, August 28, 2014

मी जबाबदार आहे!

मी जबाबदार आहे!
   आपल्या जीवनात काही ना काही बऱ्या अथवा वाईट घटना घडत असतात.जेंव्हा आपण
 अशा घटनांची कारणमीमांसा जाणायचा प्रयत्न करतो तेंव्हा माणसाची एक सहजप्रवृत्ती
असते की, जीवनातल्या चांगल्या घटनांचे श्रेय तो स्वत:कडे घेत रहातो. मी यांव केले आणि
मी त्यांव केलं म्हणूनच मला यश मिळाले किंवा जे काही चांगले घडले ते केवळ माझ्या
 एकट्याच्या प्रयत्नाने! अशी शेखी मिरवत रहातो! अशा प्रसंगी तो आपल्या उपकारकर्त्यांना
पद्धतशीरपणे विसरलेला असतो.या यशासाठी ज्यांनी कुणी कळत नकळत हातभार लावलेला
असतो अशांच्या बाबतीत कृतघ्नपणा दाखवतो. याउलट जीवनात घडलेल्या वाईट घटनेसाठी
किंवा सामना कराव्या लागलेल्या परिस्थितीसाठी मात्र इतर कुणाला तरी दोष देत रहातो.
माझ्या अमुक वाईट परिस्थितीला अमुक माणूस जबाबदार आहे. तमुक परिस्थितीमुळे माझ्या
जीवनात तमुक वाईट प्रसंगाला मला सामोरे जावे लागले अन्यथा मी व्यवस्थित
परिस्थिती हाताळली असती वगैरे वगैरे.असा कुणावर आपण जेंव्हा आरोप करत असतो
त्यावेळी आपण वास्तवतेच भान सोडलेले असते.अशा वेळी शांतपणे आपल्या सारासार
विवेकबुध्दीला स्मरून जर विचार केला तर हे नक्की लक्षात येईल की आपल्याबाबत
आयुष्यात जे काही घडत असते त्याला सर्वस्वी आपण स्वत:च जबाबदार असतो! मग ती
चांगली घटना असो वा वाईट! पण आपले मन हे वास्तव मानायला तयार नसते, आपल्या
अपयशाच किंवा आपल्याला वाईट प्रसंगी जे काही भोगावे लागले त्यांचे माप दुसऱ्या कुणाच्या
पदरात घालायची आपण घाई करतो. जेंव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेंव्हा
आपल्या बोटाची उरलेली चार बोटे आपल्या स्वत:कडे अंगुलीनिर्देश करतात हे आपण
सोयीस्करपणे विसरलेले असतो!
    ‘आपल्यावर आलेल्या परिस्थितीला आपण स्वत:च जबाबदार असतो!’ हे कटू असले तरी
 सत्य असते. हे असे का घडते यामागे अनेक कारणे असू शकतात......
१.आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे?, आपल्या जीवनाचे अंतिम धेय्य काय
 असायला हवे? जीवनातला आनंद म्हणजे नक्की काय? सुख व समाधानी असणे म्हणजे
 काय?याबद्दल कुठल्याच दिशेने आपण विचार केलेला नसतो शिवाय आपल्याकडे पुरेसा
आत्मविश्वास नसतो किंवा स्वत:वर नको इतका फाजील विश्वास असतो.स्वत:ला
ओळखायला,स्वत:मधली कमजोरी आणि बलस्थ्याने जाणून घेण्याचे आपण जाणता अजाणता
टाळलेले असते.
२.कुठेतरी आपण आजूबाजूच्या व्यक्तींवर नको इतके अवलंबून असतो.स्वत: मुध्देसूद विचार
 न करता इत्तरानी आपल्यासाठी विचार करावा व योग्य निर्णय घ्यावा अशी आपली अपेक्षा
असते व अशाप्रकारे कुणीतरी सुचविल्याप्रमाणे आपल्याला निर्णय घेण्याची सवय लागलेली
असते.स्वावलंबनाचे महत्व शाळेत अभ्यासलेले असते पण व्यवहारातही ते वापरायचे असते हे
सोयीस्करपणे विसरलेले असते.आपली ओझी कायम दुसऱ्यांनी उचलावीत व जीवनभर अल्लाद
वाहून न्यावीत अशी अवास्तव अपेक्षा आपण केलेली असते.
३.आपण सारासार विचार न करता, परिणामांचा विचार न करता आततायीपणा करून निर्णय
घेतलेले असतात.पण जेंव्हा त्या निर्णयाची जबाबदारी घ्यायची वेळ येते तेंव्हा ती
झटकण्याकडे आपला कल असतो.एक गोष्ट येथे नमूद करायला हवी की कोणताही निर्णय
कुणीही कुणावर लादला तरी तो घेण्याचा अंतिम अधिकार आपण स्वत:च बजावलेला असतो!
हे वास्तव आपण सहजपणे विसरतो व इत्तराना दोष देत रहातो. खर तर कुठलाही निर्णय
घेतल्यानंतर त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होणार आहेत त्याची पूर्ण जबाबदारी आपली
स्वत:चीच आहे.
४.आपण माणसांशी नाती जोडण्यात व असलेली नाती जोपासण्यात कमी पडतो.नाती
जोपासण्या पेक्षा आपण आपला अहंकार कुरवाळत बसतो.जीवनातल्या आजूबाजूच्या
माणसांच्या चुका माफ करून आणि आपल्या झालेल्या चुकांसाठी माफी मागून मानवी जीवन
अधिक सुखी होते समृध्द होते हे आपल्या गावीच नसते! वास्तव जीवनात अस्तित्वात
नसलेल्या गोष्टी साठी, वा हरवलेल्या निसटून गेलेल्या क्षणांसाठी रडत बसण्यापेक्षा
समोर जे मिळाले आहे त्यावर लक्ष केंद्रित करून आयुष्य समरसतेने जगण्याची जी संधी
निर्मिकाने आपल्याला दिलेली आहे, त्याबद्दलची कृतज्ञता आपण बाळगत नाही.
५.आपण आपल्याच विश्वात कुपमंडूक वृत्तीने जगत असतो बाहेरच्या विशाल जगाची
आपल्याला जाणीवच नसते. या स्वत:च्या कोषातल्या  जगातील स्पर्धा असूया मत्सर भीती
चिंता कटकटी यातच आपण इतके गुंतून पडतो की जेंव्हा बाहेरच्या जगातील लोकांचा संबंध
येतो तेंव्हा त्या जगात वावरताना गोंधळून जातो.
६.आपल्यात इच्छाशक्तीचा अभाव असतो.केवळ नशिबावर हवाला न ठेवता त्या नशिबाच्या
साथीला आपले योग्य दिशेने केलेले अथक प्रयत्न सुध्दा यश,सुख ,समाधान मिळण्यासाठी
आवश्यक असतात याची आपल्याला जाणीवच नसते. ’अपयश ही यशाची पहिली पायरी असते’
 हे सुविचार म्हणून आपण बऱ्याचदा वाचलेले असते पण त्यावर विश्वास ठेवलेला नसतो!
७.आपण नकारात्मक विचारातच रमलेले असतो हे जीवन सुंदर करण्यासाठी जी सकारात्मकता
अंगी बाळगायला हवी त्याबद्दल एक तर अनभिज्ञ असतो किंवा त्या दिशेने कधी विचारच
केलेला नसतो. मनात कायम नकारात्मक विचार ठेवल्यामुळे आकर्षणाच्या नियमाप्रमाणे
जीवनात फक्त वाईट गोष्टीच घडत रहातात व माणूस हळू हळू निराशेच्या गर्तेत फसत
जातो.केवळ सकारात्मकता बाळगण्याने जीवनात चमत्कार घडतात!
८.मिळालेल्या संधीचा सुनियोजित वापर करण्याचे आपण टाळलेले असते,थोडक्यात आपण
 नेमक्या वेळी कामचुकारपणा केलेला असतो, आयुष्यात प्रत्येकाला योग्य वेळी संधी मिळतेच
 मिळते, पण ही संधी ओळखून अचूकपणे पकडण्याचा डोळसपणा आपल्याकडे असायला
 हवा.आपल्याच कोषात राहणाऱ्या व्यक्तीची अर्थातच ही संधी हुकते आणि मग तो आपल्या
 नशिबाला दोष देत रहातो. “ वक्तसे पहले और नाशिब से जादा किसीको कुछ नही मिलता”
 असे जरी काही लोक म्हणत असले तरी

 “कोशिश करने वालोंकी कभी हार नही होती” हे
 सुध्दा तेव्हढेच खरे आहे! आवश्यकता आहे ती यश अपयाशापलीकडे जाऊन केलेल्या
  प्रयत्नांची!
९.आपल्यातली जिद्द कुठेतरी कमी पडलेली असते,एखाद्या प्रयत्नात मिळालेल्या अपयशामुळे
आपण हताश होतो.सगळ काही संपल्याची भावना मनाचा ताबा घेते आणि अपयशाच्या
 भीतीपोटी प्रयत्न करणेच बंद केले जाते.यश अपयशाची चिंता न करता मनाची जिद्द कायम
ठेउन केलेले सतत चे प्रयत्न शेवटी यशापर्यंत घेऊन जातात.
१०.आपण काम क्रोध मद मत्सर इ .च्या आहारी जाऊन आपल्या कामाकडे दुर्लक्ष केलेले
असते वा आपली कुवत समजून न घेता पाउल टाकलेले असते. आपण आपले उद्धिष्ट
ठरवताना आपली शाररीक व बौद्धिक कुवत सुद्धा लक्षात घ्यायला हवी पण बऱ्याचदा
“दिल मांगे मोअर” च्या चक्रात आपण अडकतो व अधिकाधिक च्या या नादात हातात असलेले
सुध्दा उपभोगायचं राहून जात.त्यामुळे कुठे थांबायचं हे सुध्दा ठरवता आले पाहिजे.आधुनिक
युगात गरजेच्या गोष्टी निश्चितच मिळायला हव्या पण या गोष्टीपायी आपले भावानाविहीन
यंत्र तर होत नाही ना याचे तारतम्य असायला हवे.
    अशा प्रकारे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक बऱ्या वाईट घटनांची जबाबदारी  आपणच
 घ्यायला हवी. ती कुणा दुसऱ्यावर ढकलून इत्तराना दोष देणे चुकीचे आहे !
    आपल्याला आयुष्यात जे काही मिळते ते आपल्या कर्माचे फळ असते त्यामुळे मनात
कायम ही गोष्ट असायला हवी की अशा बऱ्या अथवा वाईट गोष्टीला “मी जबाबदार आहे, मी
जसे वागतो,बोलतो व त्या वागण्याबोलण्याचे जे काही परिणाम समोर येतात त्याला मी
जबाबदार आहे. माझ्या वेगवेगळ्या प्रसंगी केलेल्या बऱ्या वा वाईट कृतीचे जे काही बरेवाईट
परिणाम समोर येणार आहेत त्याला मी जबाबदार आहे.अशा बऱ्या वाईट परिणामामुळे मला
जो काही आनंद मिळेल त्याला मी जबाबदार आहे.जे काही मानहानीचे प्रसंग माझ्या समोर
येतील त्याला मी जबाबदार आहे. जे काही दु:ख वाट्याला येईल त्याला मी जबाबदार आहे.एक
माणूस म्हणून या जगात जन्म घेतल्यानंतर त्या जन्माबरोबर जे काही दु:खाचे, दैन्याचे,
अगतिकतेचे ,अपमानाचे, सुखाचे ,आनंदाचे, वा अन्य कुठल्याही प्रकारचे प्रसंग समोर येतील
ते कृतज्ञा पूर्वक निर्मिकाकडून मिळालेला अनुभवरूपी प्रसाद म्हणून  स्वीकारण्याला मी
 जबाबदार आहे”.
मला हे पूर्णपणे माहीत आहे की –
   “माझ्या जीवनाचा शिल्पकार ‘मी’ च आहे!”


                       .........................प्रल्हाद दुधाळ .
प्रकाशित -साहित्य लोभस दिवाळी अंक २०१५ 

No comments:

Post a Comment