#माझा_आवडता_चित्रपट
‘पुष्पक’
अलिकडच्या काळात म्हणजे गेल्या दहाबारा
वर्षांपासून मी फारसे चित्रपट पाहिले नाहीत.आवडलेल्या चित्रपटावर लिहिण्याचा
जेव्हा विचार केला तेव्हा थेट पंचवीस तीस वर्षापूर्वी पाहिलेल्या चित्रपटांचा
विचार मी करायला लागलो आणि मला त्यावेळी अतिशय आवडलेल्या चित्रपटाचे नाव समोर आले
ते “पुष्पक”या चित्रपटाचे नाव!
शृंगार नागराज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सिंगीतम श्रीनिवास राव यांनी
केले आहे.फार पूर्वी म्हणजे ८७-८८ मधे पाहिलेल्या या चित्रपटाविषयी लिहायचे तर तो
पुन्हा एकदा बघावा लागणार होता.यु ट्यूबवर धांडोळा घेतला आणि आज पुन्हा एकदा या
चित्रपटाचा आस्वाद घेतला.
मूळ तामिळी भाषेतील
“पुष्पक विमान” या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन म्हणजे हा “पुष्पक” चित्रपट.
विशेष म्हणजे या
चित्रपटातील पात्रांच्या तोंडी एकही संवाद नाही! चित्रपटातील कलाकारांनी केवळ
हावभावांच्या माध्यमातून( मायामिंग) केलेला अभिनय केवळ अप्रतिम आहे!
कमल हसन,अमला आणि टिनू आनंद यांनी पुष्पकमधे
अभिनय करताना अक्षरश: जीव ओतला आहे.फरीदा जलालचीही यात भूमिका आहे.
एक बेरोजगार तरुण(कमल हसन) नोकरी शोधून शोधून
वैतागलेला असतो.आपण खूप श्रीमंत असावे असे त्याचे स्वप्न असते;पण प्रत्यक्षात तो
खायलाही महाग असतो.पुष्पक नावाच्या आलिशान हॉटेलसमोर उभा राहून तो श्रीमंतांचे
चकाचौंध जीवन लांबून पहात असतो.तेथेच तो त्या श्रीमंत उद्योगपतीला पहातो.पुढे योगायोगाने
तोच व्यक्ती रस्त्याच्या कडेला नशेत चूर होवून पडलेला दिसतो.तो त्याचे (समीर
खक्कर) अपहरण करतो आणि त्याला स्वत:च्या खोलीत डांबून त्याच्या हॉटेलमधील आलिशान
सूटचा ताबा घेतो.त्याच्या पैशावर तो मनसोक्त मजा करायला लागतो. हॉटेलातल्या
जादूगाराच्या मुलीचे(अमला) आणि दोघांचे प्रेम जमते.उद्योगपतीच्या जीवावर उठलेला एक
भाडोत्री गुंडापासून(टिनू आनंद) त्याला धोका निर्माण होतो.उद्योगपतीचे अपहरण,त्याच्या
जागी याचे हॉटेलात रहाणे,एका कफल्लक तरुणाला अचानक घबाड मिळणे,त्याची व त्या
जादुगार मुलीची प्रेमकहाणी यातून एक
मजेशीर विनोदी कथा आकार घेते, ती कथा म्हणजे हा बिनसंवादी विनोदी चित्रपट!
चित्रपटाचे मुख्य वेगळेपण म्हणजे यातली विज्युअल
भाषा! चित्रपट सुरू झाल्यावर पहिली पंधरावीस मिनिटे एकही संवाद नसल्यामुळे आपण थोडे
अस्वस्थ होतो;पण एकदा का त्याच्यातील दृश्यांच्या फ्रेम्स आणि नुसत्या हावभावातून
साधलेले पात्रातले संवाद (मायमिंग) आपण समजून घेऊ लागलो की या चित्रपटात अक्षरश: हरवून
जातो. प्रत्यक्ष संवाद ऐकू येत नसला तरी चित्रपटातली दृश्यांची एक एक चौकट
आपल्याशी संवाद साधायला लागते! एल वैद्यनाथन यांनी दिलेल्या पार्श्वसंगीताने ही
जादू साधली आहे.
एका
गजबजलेल्या कामगार वसाहतीमधील चाळीत या चित्रपटाची सुरुवात होते.कष्टकरी व
बेरोजगार लोकांच्या वर्दळीच्या वस्तीत एक उफाड्याची मोलकरीण चाळ झाडत असते आणि
तिथले पुरूष तिच्या मादक हालचालींवर झुलत तिला नजरेने पीत आहेत अशा प्रसंगाने
चित्रपटा सुरु होतो.मोलकरीण झाडू मारता मारता मुरकेही मारत टेरेसवर राहात असलेल्या नायकाच्या
खोलीजवळ पोहोचते.ही खोली विविध सिनेतारकांच्या पोस्टर्सनी व्यापलेली आढळते,अर्धनग्न
फोटो असलेली मासिके खोलीत अस्ताव्यस्त पसरलेली असतात.ती उचलून ठेवता ठेवता
मोलकरीणही ती चित्रे बघते.अशा छोट्या छोट्या प्रसंगातून विनोद फुलवला आहे. कामवाली
चपला नायकाच्या डिग्रीच्या कागदावर टाकते आणि आपल्याकडील पदव्यांची वास्तव परिस्थिती
चटका लावून जाते. एकट्या रहाणाऱ्या तरुणाचे घर कसे असते याचा नमुना म्हणजे ही चाळीतली
खोली!
नायकाच्या खोलीत कार्ल मार्क्सचे एक पोस्टरही चिटकवलेले
दिसते!त्याच खोलीत नंतर उद्योगपतीला अपहरण
करून नायक ठेवतो! संपूर्ण चित्रपटात विविध पोस्टर्सच्या माध्यमातून मार्क्सवाद आणि
भांडवलशाही यातील संघर्षावर भाष्य केले आहे. बेकार असलेला कमल हसन जेव्हा
नोकरीसाठी वणवण फिरत असतो,श्रीमंत होण्यासाठी धडपडत असतो तेंव्हा दोन वर्गातली दरी
प्रकर्षाने अधोरेखित होते.एका प्रसंगात कमल हसनचा तुटलेला चहाचा कप अर्धा भरलेला
दाखवला आहे त्याच वेळी इत्तर लोक संपूर्ण भरलेल्या कपातून चहा पीत असतात!
चित्रपटात पुष्पक हे एका आलिशान हॉटेलचे नाव
असते.वर्तुळाच्या दोन बाजूला भव्य पंख असलेले शिल्प हा या हॉटेलचा लोगो असतो.दर्शनी
भागात मालकाचा भव्य फोटो असतो.अत्यंत विपरीत परिस्थितीतून अगदी छोट्याशा हॉटेलव्यवसायापासून
ते या आलिशान हॉटेलपर्यंत मालकाने प्रगती केलेली असते.या हॉटेलाबाहेर आशाळभूतपणे उभा
असतानाच त्या दारूबाज श्रीमत उद्योगपतीचे पहिले दर्शन नायकाला होते.अप्रतिम
प्रतिमांचा वापर दिग्दर्शकाने अफलातून पद्धतीने केला आहे.
या चित्रपटातले काही प्रसंग विनोदी पध्दतीने तर
काही हसवता हसवता प्रेक्षकाला अंतर्मुख करतात.
एका प्रसंगात दाखवले आहे की प्रेमिका अमलाची आवडती फुले अगदी अडचणीच्या
ठिकाणी असतात.नायक तिच्या प्रेमापायी
धूळमातीची पर्वा न करता त्या ठिकाणी पोहचतो व तिला ती फुले आणून देतो.त्यातील काही
फुले ती त्याला देते.तिने दिलेली फुले त्याच्या एका हातात असतात आणि दुसऱ्या हातात
नोटां असतात. नायकाकडून चुकून दोन्ही वस्तू खाली पडतात.तो घाईघाईने नोटा गोळा
करायला लागतो.नोटा उचलण्याच्या नादात एका हातातून निसटलेली आणि पायदळी पडलेली फुले
त्याच्या बुटाखाली चिरडली जातात! या प्रसंगातून नायकाची प्राथमिकता अधोरेखित होते.
दुसऱ्या
एका प्रसंगात बेरोजगार असताना नायक हातातले एक नाणे नाचवत रस्त्याच्या कडेला भीक
मागणाऱ्या एका भिकाऱ्याला हिणवतो.भिकारीही त्याला त्याच्या कपड्यातल्या वेगवेगळ्या
खिशातून त्याला नोटा काढून दाखवतो सर्वात शेवटी त्याच्या बसायच्या पोत्याखाली
लपवलेल्या नोटा दाखवतो आणि कुत्सितपणे हसतो. चित्रपटात पुढे त्या बेवारस भिकारी
मेल्यानंतर पालिकेचे कामगार त्याचे प्रेत उचलायला येतात.प्रेत उचलल्यानंतर
त्याच्या कपड्याखाली असलेल्या नोटा बाहेर उडायला लागतात आणि सगळे कामगार व
आजूबाजूचे बघे त्या नोटा गोळा करायला धावतात.ज्यांच्या हातात प्रेत असते ते
कामगारही प्रेत बाजूला ठेवून नोटा गोळा करायला धावतात. जीवनात माणसाला पैशाचे
महत्व किती टोकाचे असते ते पाहून नायकाला पैशाच्या मागे धावणे किती व्यर्थ असते याची
जाणीव होते!
या चित्रपटात कमल हसनने एका मिडलक्लास बेकार
स्ट्रगलर तरुणाची भूमिका केली आहे.अनेक ठिकाणी नोकरीसाठी नाकारल्यानंतर तो त्या
उद्योगपतीचे अपहरण करून स्वत: त्या श्रीमंत उद्योगपतीचे जीवन जगायला लागतो.आता
त्याला सगळेजण सैल्युट करायला लागतात.त्याची प्रेमिका त्याचा रूबाब,त्याची आलिशान
गाडी,त्याची हॉटेलातला आलिशान सूट व त्याचे गुलहौशी राहणीमान हे सगळे बघत असते.
चित्रपटाच्या शेवटी नायकाला आभासी श्रीमंती व
ऐयाशी यापेक्षा प्रामाणिकपणे स्वकष्टातून मिळालेल्या गोष्टीतल्या समाधानाचे व
आनंदाचे महत्व समजते. तो त्याचे पूर्वीचे जुने कपडे घालतो पूर्वीसारखाच नोकरी
मिळवण्यासाठी झगडणाऱ्या लोकांच्या गर्दीत सामील होतो. पत्र लिहून तो त्याचे वास्तव
प्रेमिकेला कळवतो.त्याच्यातल्या साध्यासुध्या माणसावरच ती प्रेम करत असते!आता त्याच्या हातात प्रेमिकेने दिलेली फुले असतात!
ऐहिक सुखामागे धावताना माणूस खरे जगणे,छोट्या
छोट्या गोष्टीतला आनंद हरवून बसतो.आणि तो खऱ्या आनंदापासून कोसो दूर जातो तेव्हा
ऐहिक गोष्टींपेक्षा वास्तविक सुख,समाधान,आनंद याला जीवनात जास्त महत्व द्यायला हवे
अशी शिकवण पुष्पक चित्रपटातून मिळते किंबहुना हाच चित्रपटाचा गाभा आहे!
ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल त्यांनी एकदा
तरी हा चित्रपट जरूर पहावा.
......... प्रल्हाद दुधाळ 9423012020
.
No comments:
Post a Comment