कामगार दिनानिमित्त ....
आज १ मे
कामगार दिन!
या निमित्ताने कष्टकरी जगतातल्या बदलाचा माझ्या
अल्पमतीने घेतलेला अल्प धांडोळा!
तो
काळच वेगळा होता पुण्या मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यात अनेक मोठे मोठे उद्योग प्रचंड
बहरात होते.या मोठ्या उद्योगांना पूरक अशा अनेक छोट्या मोठ्या कंपन्या येथे तीन
तीन शिफ्टमध्ये आपल्या चिमण्यातून धूर ओकत होत्या.त्या काळी पुण्यातल्या पिंपरीचिंचवड
एमआयडीसी भागात विविध कंपन्यांच्या भोंग्यांचे आवाज एकामागोमाग घुमायचे आणि त्या आवाजाच्या तालावर निळ्या युनिफॉर्ममधल्या
असंख्य कामगारांच्या शिस्तबध्द हालचाली चालू राहायच्या.
आपापल्या
शिफ्टला कामावर जाणाऱ्या आणि सुट्टी झाल्यावर घराच्या ओढीने सायकल दामटणाऱ्या शेकडो
कामगारांची वर्दळ आकुर्डी ते भोसरी
पट्ट्यातल्या रस्त्यांवर सतत जाणवायची.आपल्या निढळाच्या घामाच्या जोरावर इथला कामगार
एक खुशहाल जिंदगी जगत होता.
दिवाळीचा
बोनस,पगारवाढीचे करार अशा गोष्टींवर घरोघरी चर्चा झडायच्या.या कामगारांच्या
हितासाठी जागरूक असलेल्या अनेक कामगार संघटनांचे आस्तित्व रस्तोरस्ती जाणवायचे.
वेळप्रसंगी आंदोलनांचे हत्यार वापरून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या जायच्या.मनासारखी
वेतनवाढ वा बोनस मिळाला की जल्लोष व्हायचा, गुलालाने रस्ते लालभडक व्हायचे.औद्योगिक पट्ट्यातील कामगारांच्या
आर्थिक उलाढालीवर पुण्यातल्या व्यावसायिकांची गणिते बदलत रहायची.हातात पैसा आला की
कामगारांकडून मनसोक्त खरेदी व्हायची. थोडक्यात शहरी जीवनातच काय पण शहरालगतच्या
गावातल्या दैनंदिन आयुष्यांत या कामगार जगताला प्रचंड महत्व होते.
काळ
बदलला आणि तांत्रिक प्रगतीमुळे कारखान्यातली मनुष्यबळाची गरज घटत गेली.प्रथम अकुशल
कामगार आणि नंतर कुशल कामगारांच्या नोकऱ्या कपात होत गेली.काही मोठे उद्योग बंद
झाले तर काहीचे स्थलांतर झाले.मग या मोठ्या कारखान्यांवर अवलंबून असलेले छोटे उद्योगही
हळूहळू बंद झाले आणि एरवी सतत गजबजलेले एमआयडीसीतले रस्ते ओस पडायला लागले.
आधुनिकीकरणाच्या
या रेट्यात अनेक कामगारांना आपल्या नोकऱ्याना
मुकावे लागले.काहीना स्थलांतर करावे लागले.कामगार संघटनांचे आस्तीत्वही जाणवण्याइतपत
कमी झाले.अनेक कामगारांनी पोटासाठी पर्यायी लहान मोठ्या नोकरी व्यवसायाकडे आपला मोर्चा
वळवला.ज्या कामगारांनी काळाप्रमाणे आपले कौशल्य वाढवले तेच टिकले बाकी असंघटीत कामगारांची
होरपळ सुरू झाली.
पुण्यासारख्या शहरात छोटे कारखाने जरी कमी झाले तरी काही काळानंतर आयटी वा
तत्सम क्षेत्रातले अनेक व्यवसाय वाढले.आता पुण्याची आय टी हब म्हणून ओळख वाढायला
लागली.संगणक क्षेत्रातल्या अनेक कार्पोरेट कंपन्या इथे आल्या.या क्षेत्रात नोकऱ्याच्या
नव्या संधी मिळू लागल्या आणि निळ्या युनिफॉर्ममधील कामगारांऐवजी अपटूडेट पोशाखातल्या
संगणक अभियंत्यांची वर्दळ पुण्यात वाढली. हिंजवडी,बाणेर,खराडी,हडपसर, येरवडा अशा
विविध उपनगरात अनेक कार्पोरेट जगतातील कंपन्यानी आपले बस्तान बसवले आणि पुण्यात नव्या
आयटी संस्कृतीचा उदय झाला.
औद्योगिक
वसाहतीतल्या संघटीत कामगारांचे जीवन आता हळू हळू इतिहासजमा होत आहे आणि आयटी मधली
एक नवी कामगार संस्कृती उदयाला आली आहे.
या
दोन संस्कृतीत फार मोठा फरक आहे.
जुना
औद्योगिक कामगार फार शिकलेला नव्हता तरी त्याचे कामाचे तास ठरलेले होते,त्याच्या
सोयी सुविधा मर्यादित होत्या पण जीवन शिस्तबध्द होते. तो आनंदात जगत होता!
याउलट,
आजचा उच्चशिक्षित आयटी प्रोफेशनल प्रचंड पैसा
मिळूनही असुरक्षित आहे.प्रचंड स्पर्धेचे दडपण घेवून तो जगतो आहे. त्यातच असंघटीत
असल्याने शोषण होत असूनही तो त्याविरूध्द आवाज उठवू शकत नाही.
असो,आजच्या जागतिक कामगार दिनानिमित्त अशा सर्व
कुशल,अकुशल,संघटीत,असंघटीत,ब्ल्यू कॉलर व व्हाईट कॉलर कामगारांना कामगार दिनाच्या खूप
खूप शुभेच्छा!
...... प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment