Wednesday, February 24, 2016

माणूस -- एक कृतघ्न जमात ....

माणूस -- एक कृतघ्न जमात ....
प्रवेश एक 


स्थळ- रस्ता.
वेळ – मे महिन्यातली दुपार.
विश्वास आणि गिरीधर- विश्वासचे वडील (वय अंदाजे पासष्ट )भर उन्हातून पायी चालले आहेत.डोक्यावर ओझी आहेत.रखरखत्या उन्हात घामाने निथळत ते हळूहळू चालले आहेत.विश्वास चांगलाच दमलेला आहे. धापा टाकत एक एक पाउल पुढे टाकतो आहे.त्याला आता थांबायचे आहे.
विश्वास –अहो दादा,ओझ्याने माझी मान खूपच अवघडून आलीये, उन्हाचा चटकाही खूप लागतोय,थांबू ना ज़रा इथेच.
गिरीधर–अरे विश्वास,माझीही मान अवघडलीय,थोड़ी कळ काढ ना,अजून बरच लांब जायचय,आणि या भर उन्हात थांबायचे तरी कुठे?दोन किलोमीटरच्या पट्ट्यात एक झाड शिल्लक राहीले असेल तर शप्पत!हे बघ, पुढच्या वळणावर एक वडाचे झाड आहे. घनदाट सावली असेल तेथे, थांबू घटकाभर तिथे तू म्हणतोय तर!
विश्वास- (नाईलाजाने) हो दादा,तिथेच थांबू.तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.पूर्वी या रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच प्रकारच्या झाडांची जणू नैसर्गिक कमान होती. साऱ्या रस्त्याने एवढी सावली असायची की प्रवासाचा शिण बिल्कूल जाणवायचा नाही.( विश्वासला आठ दहा वर्षापुर्वीचा तो रम्य हिरवागार रस्ता आठवतो.)
गिरीधर- हो ना,तिकडे सर्जापूरला तो केमिकल कारखाना काय आला,वाट लागली सगळ्या तालुक्याची! रस्ता मोठा करायला होती नव्हती ती झाडी पार तोडून टाकली.सगळ माळरान उघडबोडक करून टाकलय.कारखान्याच्या धुराने दहापंधरा किलोमीटरच्या पट्ट्यात डोळ्याची नुसती आग आग होत रहाते. मला तर हल्ली सारखा खोकलाही होतो ,इकडे रहायचच अवघड झालय बघ.नशीब, अख्ख्या परिसरात एवढेच एक झाड वाचलय!ते ही वठायला लागलय!
दोघेही बोलत बोलत त्या भल्यामोठ्या वडाच्या झाडाखाली पोहोचतात .झाडाच्या सावलीत येताच खूप थंड वाटायलालागते.डोक्यावरची ओझी खाली ठेवून दोघेही आरामशीर सैलावून बसतात.

प्रवेश दोन

स्थळ- तोच रस्ता पण आधीच्या प्रवेशानंतर दोन वर्षानंतरचा काळ, तशीच में महिन्याची दुपार.
हे बाप लेक रस्त्याने पायी चालले आहेत. दोन वर्षे सलग दुष्काळ पडलाय. हिरवी पाने असलेले एकही झाड आता रस्त्यात उरलेले नाही.जिकडे पहावे तिकडे उजाड माळरान दिसतेय.
श्वासविकाराने आता गिरीधर पुरता वाकून गेला आहे.त्याचा हात हातात पकडून विश्वास रणरणत्या उन्हातून गिरीधरला सरकारी दवाखान्यात घेवून चालला आहे. जिवघेण्या उन्हाने दोघानाही धाप लागली आहे. रस्त्याच्या कडेचे ते जुने वडाचे झाड आता वठले आहे. विश्वास गिरिधरला खोडाशी आणतो. गिरिधर आपल्या क्षीण डोळ्यानी झाडाकडे बघतो...
त्याला वाटते--- झाडही आपल्याशी बोलतय, हा भास नाही ----नक्कीच झाड आपल्यावर डाफरतय ..... काहीतरी सांगतय ......
"आयुष्याच्या या वळणावर
भरदुपारच्या टळटळीत उन्हात
सुन्नपणे मी उभा
असे का चा भुंगा कुरडतो आहे
पाडतोय तो भुगा मेंदूचा
कालपर्यंत गर्दी भोवतालची
हटता नव्हती हटत
आज मात्र
बरोबर सावलीही नाही स्वत:ची
कारणांचा शोध घेतोय
कालपरवापर्यंतचा कल्पवृक्ष
मी बहरलेला
जो जे वांछिल ते मनमुराद देणारा
आता संपूर्ण छाटलेला
जीवनरस आटलेला
आंतर्बाह्य वठलेला
माझ्या या स्थितीला जबाबदार कोण ?
ऐकले ते खरेच असावे
स्वार्थी आणि मतलबी माणूस
निसर्गाप्रती एकदम कृतघ्न जमात...."
(गिरीधर स्वत:शी हातवारे करत बोलत होता ....
विश्वास सुन्नपणे पहातोय वठलेल्या झाडाकडे)
(प्रकाश मंद मंद होत जातो ......)

No comments:

Post a Comment