ऐकूनही घ्या की राव!
माझ्या ऑफिसमध्ये एक सहकारी होता अनेकदा काही ना काही कामाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलावे लागायचे.त्याच्याशी बोलणे सुरू केले की मी माझे पहिले वाक्य संपवायच्या आतच जसं काही त्याला मला काय म्हणायचंय ते सगळं आधीच माहीत आहे असं गृहीत धरून माझं बोलणं मधेच थांबवून तो सुरू व्हायचा.फक्त माझ्यासारख्या सहकारी व मित्रांशीच नाही तर त्याचा बॉस किंवा हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येकाशी बोलताना त्याचं वागणं असंच असायचं!
थोडक्यात त्याला समोरच्याचं बोलणं ऐकून घेण बिलकूल मान्य नव्हतं! त्याच्या अशा वागण्यामुळे हळूहळू मी त्या व्यक्तीशी कामापुरताच संबंध ठेऊ लागलो.तो समोर असताना सहसा कुणी विषय वाढवायच्या फंदात पडायचं नाही कारण त्या संवादाचा शेवट नेहमी एकतरफी विसंवादात होणार हे निश्चित असायचं.पुढे पुढे मीसुध्दा त्याच्याशी बोलणेच नको असा विचार करुन त्याला टाळायला बघायचो.
आपल्या अवतीभवती अशा अनेक व्यक्ती वावरत असतात, ज्यांना समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे जमत नाही.जगातल्या कोणत्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान आपल्याला असल्याचा समज (खरं तर गैरसमज) अशा व्यक्तीला असतो. बोलणे ही एक कला आहे हे नक्कीच;पण त्याहीपेक्षा ऐकून घेण्याची कला महत्वाची आहे असे मला वाटते!
समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण म्हणणे ऐकून न घेता त्याला मधेच थांबवून आपले अर्धवट माहितीवर आधारित मत इत्तरांवर लादण्याची ही सवय अशा व्यक्तीला समाजापासून दूर करते.तडकाफडकी तोडायला जमत नाही म्हणून दोन चार वेळा लोक अशा व्यक्तीला सहन करतात;पण लवकरच अशा व्यक्तीला त्याला नकळत टाळणे सुरू होते.
दोन व्यक्तीमधील खऱ्या अर्थाच्या सुसंवादासाठी दोघांचीही एकमेकांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेण्याची मानसिक तयारी असायला हवी अन्यथा असा one way संवाद त्या व्यक्तींमध्ये गैरसमज रूजवतो.दुसऱ्या व्यक्तीला बोलूच न देणे आणि आपले म्हणणे इतरांनी ऐकून झाले की संवादाची खिडकी बंद करुन नामानिराळे होण्याची सवय म्हणजे एक प्रकारची मानसिक विकृती आहे असे मला वाटते!
आपल्या व्यावसायिक, सामाजिक वा कौटूंबिक जीवनात संवाद साधताना समोरच्या व्यक्तीचे म्हणणे त्याला मधेच कोणताही अडथळा न आणता ऐकून घेणे आवश्यक आहे.अगदी वादाचा मुद्दा असला तरी किंवा टोकाची मतभिन्नता असली तरी समोरच्या व्यक्तीची बाजू शांतपणे ऐकून घेण्याची सवय नक्कीच नातेसंबंधात येणारी संभाव्य कटूता टाळू शकेल असे मला मनापासून वाटते. प्रत्येक गोष्टीची एक निश्चित अशी दुसरी बाजू असते;ती बाजू योग्य आहे की अयोग्य आहे हा नंतरचा मुद्दा आहे;पण ती दुसरी बाजू किमान ऐकून घेतली गेली तरी माणसा माणसातील अहंकारापोटी होणारे टकराव कमी करू शकतील.सुसंवादासाठी एकमेकांशी संपर्कांचा दरवाजा कायम उघडा असला तर नातेसंबंधात दुराव्याची शक्यता निश्चितच काही प्रमाणात का होईना पण कमी होऊ शकेल. थोडीशी सहनशीलता ठेवून समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची सवय नसेल तर प्रयत्नपूर्वक ती सवय लावून घ्यायला हवी.
आनंदी जीवनासाठी निश्चितच हे आवश्यक आहे!
तुम्हाला काय वाटतं?
......प्रल्हाद दुधाळ . 9423012020.
No comments:
Post a Comment