आज 'मदर्स डे'....मातृदिन ...
आपल्याकडे बरेच लोक अशा नात्यांसाठी वेगळे वेगळे दिवस साजऱ्या करण्याच्या फॅडला नाके मुरडताना दिसतात,मला मात्र पाश्चात्य संस्कृतीचे या 'डे' ज साजऱ्या करायच्या पद्धतीचे कौतुक वाटते.
कुणी म्हणेल त्यात कौतुक ते काय?
आम्ही संपूर्ण वर्षभर प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या नात्यांचे उत्सव साजरे करतच असतो,प्रत्येक नात्याचा वेगळा दिवस साजरा करायची आम्हाला गरजच नाही...
हो, मान्य आहे... आपली संस्कृती नक्कीच महान आहे आणि पूर्वी आमच्या प्रत्येक सणासुदीत आम्ही विविध नात्यांचा सन्मान करत होतो आणि आजही ती परंपरा काही प्रमाणात जोपासली जात आहे,पण हे सुध्दा तेव्हढेच खरे आहे की जागतिकीकरणाच्या धबडग्यात आपण न कळत का होईना पाश्चात्यांच्या पद्धतींचे अनुसरण करतो आहोत.
आपल्या परंपरा सांभाळून असे हे सण उत्सवही साजरे करायला काय हरकत आहे ?
तर या मातृदिनाच्या निमित्ताने माझ्या काही कविता ...खास आईसाठी!
हर दिन मातृदिन.....
मातृदिन आज
उमाळे मायेचे
हर दिवसाचे
होऊ देत...
आईसवे फोटो
सजल्यात भींती
कविता या किती
लिहिल्या हो...
स्मरतात सारे
उपकार तिचे
जग ते आईचे
गुण गाई...
एका दिवसाचा
नको हा देखावा
हर दिन व्हावा
मातृदिन...
सांभाळले तुम्हा
लावला जो जीव
असावी जाणीव
रात दिन...
थकलेली माय
ओझे नये होऊ
काळजी घे भाऊ
आईची रे...
पालक म्हातारे
अनुभवांचा ठेवा
उपयोग व्हावा
संस्कारांचा...
नात्यांचे हे दिन
उपयुक्त सारे
समजून घ्यारे
मोल त्यांचे...
मातृदिनी आन
जोपासेन नाती
नाहीतर माती
जीवनाची...
प्रत्येकाच्या आईने खूप कष्ट घेतलेले असतात आपल्या लेकरांसाठी...
आता माझी आईच बघा ना...
ती कभी ना पाहिली थकलेली
समस्येसी कुठल्या ती थबकलेली
सुरकुतल्या हातात हत्तीचे बळ
आधार मोठा असता ती जवळ
कोणत्याही प्रसंगी मागे सदा सर्वदा
निस्वार्थ सेवा वृतीने वागे ती सदा
माया ममता सेवा भरलेले ते गांव
सदा ओठी असु दे आई तुझे नाव!
अशी ती राबत असायची सतत ...सदैव ..
आई...
कोंबड आरवायच्या आधीच
तिने घेतलेली असायची
डोक्यावर माळव्याची पाटी
चालत रहायची अनवाणी
नसायची अंधाराची अथवा
विचूकाट्याची भीती
मनात एकच ध्यास
दिवस वर येण्यापूर्वी
पाटीतला भाजीपाला
खपायलाच हवा...
परत धा वाजता
मजुरीवर पोचायला हवं...
तिच्या त्या ढोर मेहनतीत
तिने पेरली होती
उज्वल भविष्याची स्वप्ने...
आज ना उद्या या घामावर
सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल.....
कधीच ती दिसली नाही हतबल
पण....
माहीत नाही तिची स्वप्ने
पूर्णत्वाला गेली की नाही
सुखदु:खात कायम स्मरते
माझी सतत राबणारी आई!
आज ती नाही...पण...
आईने शिवलेली एक मायेची गोधडी अजूनही माझ्याकडे आहे...तीची आठवण..
मायेची गोधडी...
नऊवारी जुन्या साड्या जपून जपून ठेवायची,
फाटक्या कपड्यातले डिझाईन कापून जपायची,
रंगीबेरंगी चिंध्या नी काठ शिंप्याकडून आणायची,
ऊन तापायला लागलं की स्वच्छ धुवून सुकवायची,
फुरसतीचा दिवशी मोठ्या सुईत दोरा ओवायची,
जमिनीवर कपडे अंथरून तयार व्हायचं डिझाईन,
चौकोन त्रिकोण,पक्षांचे आकार रंगीत वेलबुट्टी,
कल्पनेला फुटायचे पंख, पळायचा धावदोरा सुसाट,
आकाराला यायची आईच्या हातची मायेची गोधडी!
तिच्यात असायची स्नेहाळ ऊब थंडीत रक्षणारी,
गुरफटून घेताच गाढ झोप लागायची जणू कुशीसारखी!
आता गोधडी जीर्ण झालीय,तरी जपतोय आठवण,
मन सैरभैर होते तेव्हा तेव्हा शिरतो या गोधडीत,
मायेचा हात फिरतो पाठीवर,मिळते नवी उमेद!
लाखोच्या आलिशान गादीवर नाही मिळत ते सुख,
मिळते जे मायेच्या त्या जीर्ण ओबडधोबड
गोधडीतून!
अशी असते आई...तिच्या नसण्याने आयुष्य अर्थहीन होऊन जाते ..
तुझ्याविना आई ...
वासल्य करुणा माया ममता
हृदयात भरली ठाई ठाई,
त्यागास त्या लेकरास्तव
वरणाव्यास योग्य शब्द नाही!
तव कष्टास त्या सीमा नव्हती,
संकटांची मालिका ती भवती
हसतमुखी गायलेली अंगाई
कसे होऊ आम्ही उतराई?
संस्कारांची दिली शिदोरी
स्वाभिमानाची बळकट दोरी
आशीर्वाद नी तुझी पुण्याई
चाललो आडवाट वनराई
जात्यावरील ओवी आठवे
स्वाभिमानाची ज्योत आठवे
आहे येथेच भास असा होई
तुझ्याविना व्यर्थ हे जिणे आई!
आईने इतके कष्ट घेऊन मोठे केले तेव्हा तिला एक शब्द देणे आवश्यकच होते...
गवसणी...
शिकवलेस स्वाभिमानी जगणे
माणुसकीने जिंकण्याचा ध्यास,
संकटातही आई शोधेन संधी
घालेन गवसणी मी गगणास!
नक्कीच ...आईच्या त्या प्रचंड उपकारांचे उतराई होणे केवळ अशक्य आहे...
असं असलं तरीही समाजात आज वेगळं वेदनादायी चित्र बघायला मिळते आहे ..
महान संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या आमच्या देशातले हे चित्र नक्कीच विचार करायला लावते..m
आज मातृदिन म्हणजे अनेक कृतघ्न लोकांसाठी केवळ एक उपचार झालेला आहे....ते झाले आहे...
सेलिब्रेशन...
तो पोटचा पोरगा
नटवलेल्या बायको आणि पोरांना घेऊन
मिठाईचं मोठ्ठ खोकं घेऊन
सक्काळी सकाळी
आश्रमाच्या गेटवर आला तेव्हा
तिच्या सुरकुतलेल्या चेहर्यावर आणि डोळ्यात
खूप खूप दिवसांनी मोकळढाकळं
हास्य ओसंडलं
भराभर उरकून
ठेवणीतलं लुगडं नेसून
थरथरते पाय सावरत
व्हरांड्यात ती उभी्.....
आज कित्येक दिवसांनंतर
नातवंड गळ्यात पडणार होती....
तिला अनुभवाने आता हे माहीत होतं...
आता मोबाईल सरसावतील
अंगाखांद्यावर तिच्या सलगीने रेलून
मिठाईचा मोठा तुकडा
तोंडात कोंबता कोंबता
होईल फोटोंची लयलूट
उद्या झळकतील छब्या
सोशल मिडियावर...
तिने झटकले मनातले विचार ..
मनोमन...
हात जोडले त्या गोऱ्या साहेबाला...
जाता जाता देवून गेलेल्या संस्काराला...
‘मदर्स डे’
एक निमित्त...
पाडसांना कुरवाळण्याचं
कोंडलेल्या वात्सल्याला
वाट करून द्यायचं...
आता तिचा उत्साह दुणावला...
सज्ज आता ती....नव्याने....
‘मदर्स डे’
सेलिब्रेशनसाठी....
हे कटू असले तरी सत्य आहे...
यांना कोणीतरी सांगा हो..
मदर माता अम्मी वा मम्मी
माय अथवा म्हणू दे आई ....!
जगात निरपेक्ष स्नेहाचे
दुजे नाते आस्तीत्वातच नाही...!
आई... मातृदिनाच्या निमित्ताने तुला विनम्र अभिवादन...
..... ©प्रल्हाद दुधाळ.
(९४२३०१२०२०)
No comments:
Post a Comment