Friday, October 25, 2013

रोखठोक.


              रोखठोक.  
         काही माणसे मनात येईल ते बोलून टाकतात.राग,लोभ जे व्हायचे ते होऊ दे असा विचार करून जी काही  मनातली भावना असेल ती रोखठोक बोलतात. अशा स्पष्ट वक्तेपणामुळे समोरचा माणूस  दुखावला तरी त्याची ते पर्वा करत नाहीत. जे खरे आहे ते बोलल्यामुळे किंवा वास्तव समोर ठेवल्यामुळे जरी तात्पुरता वाईटपणा आला. तरी तो घेण्याची अशा माणसांची तयारी असते. अशा प्रसंगी ऐकणाऱ्याला जे आहे ते जरी कटू असले तरी सत्य काय आहे हे माहीत होते. गप्प राहून किंवा गुळमुळीत उत्तर देऊन वेळ निभावून नेण्याच्या भागुबाई  वृत्ती पेक्षाहा रोखठोकपणा शत पटींनी चांगला.यातून फार तर आजचा दिवस निभावला जातो. पण आज ना उद्या सत्य समोर येते व केवळ वाईटपणा घ्यायला नको म्हणून केलेला खोटेपणाही उघड होतो. अशा केलेल्या खोटेपणामागे बऱ्याच वेळा तात्कालिक स्वार्थ असतो! अशा प्रसंगी परस्परात गैरसमज वाढू शकतात. खरे तर योग्य वेळी खरी परिस्थिती समोर ठेवली तर समोरचा माणुसही जमिनीवर राहून विचार करू शकतो.जे आहे त्यांचा स्वीकार करून पुढची वाटचाल करू शकतो. पण ......

                  पण नाही म्हणायला जे धैर्य लागते ते सर्वांपाशी कुठे असते?

                असे रोखठोक वागण्याची तेव्हढीच मोठी किंमतही मोजावी लागेल या जाणीवेने व भित्रेपणामुळे लोक असा वाईटपणा घेत नाहीत!  

Tuesday, October 8, 2013

विवाहोत्तर नात्यांचे संगोपन.


विवाहोत्तर नात्यांचे संगोपन.

 

                  भिन्न वातावरणात वाढलेले ते दोघे जेंव्हा लग्नानंतर पती-पत्नी च्या भूमिका साकारायला लागतात तेंव्हा बऱ्याचदा एकमेकाला समजून घेताना अडचणी येऊ शकतात. लग्नानंतर पती-पत्नी मधील नात्यांचे योग्य संगोपन होणे आवश्यक असते.एकमेकांना समजून घेताना वयक्तिक अवकाशाचा योग्य तो आदर ठेऊन काही घेण्याबरोबरच काही देण्याची मानसिक तयारी ठेवायला हवी. मी च्या जागी आम्ही यायला हवा.पती-पत्नी या नात्याबरोबरच दोघांच्याकडील कुटुंबे ही एकमेकाशी जोडली जातात. सख्ख्या नात्यागोत्यांबरोबरच चुलत/मावस नातेसंबंधही सांभाळावे लागतात. काही नाजूक नाती ही काचसामानाप्रमाने जपावी लागतात. नातेसंबंध सांभाळताना बऱ्याचदा अनोळखी घरात नुकत्याच आलेल्या नववधूला तारेवरची कसरत करावी लागते. लग्न करताना त्यानंतर कराव्या लागणार्या अशा तडजोडींचा जर आधीच विचार व मानसिक तयारी केलेली असेल तर गोष्टी सोप्या होऊन जातात, पण संपर्कात येणारी  व्यक्ती जर विनाकारण वाकड्यात घुसणारी, नकोसे रिमार्क पास करणारी किंवा टोमणे मारणारी असेल तर उमलण्यापूर्वीच अशी नाती कोमेजू शकतात. घरात आलेल्या नववधुला जर पहिल्या दिवसापासूनच मानापमानाच्या तराजूत तोलले जात असेल तर घरातील वडीलधार्या माणसांनी हस्तक्षेप करून योग्य ती जाणीव संबंधितांना देणे आवश्यक ठरते. नातेसंबंधातील पोषणासाठी घरातील प्रत्येकानेच समंजसपणे वागणे फायद्याचे आहे. प्रख्यात डॉ.ऋजुता विनोद यांच्या मते नवराबायकोचा  संसार यशस्वी होण्यासाठी त्यांच्या भावी  सुखी संसारात पती-पत्नी ही भूमिका जरी मध्यवर्ती असली तरी प्रसंगानुरूप वेगवेगळ्या भूमिका दोघांना साकाराव्या लागतात.-

 

                १.प्रियकर प्रेयसी भूमिका- ही पती-पत्नीमधील  सर्वात भावणारी भूमिका आहे .या भूमिकांमध्ये स्पर्धा ,अहंकार वा कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड यांना थारा नाही.केवळ निकोप प्रेम या नात्यात असते.एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी व उस्फूर्तता व प्रसंगी वेडेपणा या भूमिकांत असतो. या नात्यात खोडकरपणा आहे. काव्य आहे,रसिकता आहे , निरागसता आहे. मोकळ ढाकळ पारदर्शी असे हे नाते असते. लग्नानंतर काही दिवस केवळ याच भूमिका जगल्या जातात. हळू हळू जबाबदार्यांच्या जाणीवा वाढतात आणि या भूमिकांचा प्रभाव कमी होऊ लागतो व समंजस गृहस्थाश्रमाची सुरुवात होते. आयुष्यातील अनेक प्रसंगी या उत्कट नात्याची पुनरावृत्तीचे दर्शन होते.आनंदी व  सशक्त दांपत्य जीवनासाठी आयुष्यभर या उत्कट भूमिका पुन्हा पुन्हा जगायला हव्यात.एकमेकांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस,मैत्री दिवस, व्हालेंटाइन डे, असे स्पेशल दिवस मनापासून साजरे केल्यामुळे  नात्यांतले माधुर्य वाढते.

 

                २.बालक पालक भूमिका- या भूमिकांमध्ये दोघात वात्सल्याचे नाते असते.  एकामधल्या बालकाला दुसरा जोडीदार पालकाच्या भूमिकेतून सांभाळतो. वेगवेगळ्या प्रसंगी गरजेप्रमाणे एकाने पालकाची भूमिका बजावली तर अहंकारांपोटी येणारी नात्यांमधील कटुता टाळता येऊ शकते. एकमेकाना सांभाळून घेणे / समजून घेणे  या भूमिकांच्या अंतर्गत येते. एकदा का एकमेकांची मने ओळखायला येऊ लागली की एकमेकांना समजून घेणे ही सोप्पे होऊन जाते .आपल्या जोडीदाराच्या किंवा मुलांच्या  आजारपणात त्यांची योग्य ती सेवा,औषधोपचार व सुश्रुषा या भूमिकेतून केली जाते. दोघांपैकी कोणालाही कुठल्याही प्रकारची समस्या आली तर दुसऱ्याने पालकाची भूमिका स्वीकारून त्या समस्येचे निराकरणासाठी योग्य ती मदत करायला हवी. एकमेकांच्या यशाचे मनापासून कौतुक तर अपयशाच्या प्रसंगी आधार/धीर देणे हे या बालक पालक भूमिकेतूनच साध्य होते.

               “एक जोडीदार जर कुठे कमी पडत असेल तर दुसऱ्याने त्याला सावरायचे असते, सांडलेच काही एकाकडून चुकून-माकून तर दुसऱ्याने न रागावता पुन्हा भरायचं असते!

             असे एकमेकाला समजून उमजून तर घ्यायचंच पण घरातल्या वयोवृद्ध माणसांचे/तिच्या किंवा त्याच्या जन्मदात्यांचे संगोपन आपुलकीच्या भावनेने पालक या नात्याने दोघांनी मिळून करण्याची दांपत्याची भूमिका असायला हवी. आयुष्यभर पती-पत्नी दोघांनाही  कधी बालक तर कधी पालक या भूमिका साकाराव्या लागतात.

             या भूमिका साकारताना निव्वळ कर्तव्यभावना कामाची नाही. या भूमिका साकारताना  कर्तव्यभावने बरोबरच आपुलकी ओलावा असेल तर सहजीवनातला आनंद कितीतरी पटीने वाढतो.

 

                              .यजमान–गृहिणी भूमिका- पती-पत्नी नात्यामध्ये ही भूमिका व्यापक अर्थाने खूप महत्वाची आहे. एक कुटुंब म्हणून समाजात स्थिरता आल्यावर एकमेकांच्या साथीने  पती व पत्नी आपल्या महत्वकांक्षा साकारतात. स्वत:चे शिक्षण करिअर घडवतात.आपापल्या कामात प्रवीण होतात. उद्योग व्यवसायात जम बसतो. यजमान–गृहिणी भूमिका साकारताना मुलांचे पालनपोषण तसेच त्यांचेवर उत्तम संस्कार केले जातात. एकसंघ आदर्श कुटुंब म्हणून नावलौकिक मिळतो.एकमेकांच्या सुख दुख:त साथ दिली जाते. येथे ना उपकाराची भाषा असते ना कुणी कुणाचे ऋणाईत असते.एका समान पातळीवर येऊन आपल्या जोडीदाराला प्रोत्साहित करून मिळणार्या यशापयशाची जबाबदारी एकमेकासाठी घेतली जाते. उत्तम सहजीवनात या भूमिकांचा वाटा मोलाचा आहे.

 

               ४.मित्र-मैत्रीण भूमिका- नवदाम्पत्यांसाठी पती-पत्नी नाते यशस्वीपणे निभावण्यासाठी प्रथम एकमेकांचे मित्र होणे गरजेचे आहे. या भूमिकेत समजूतदारपणा असतो. मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांवर विश्वास असायला हवा. परस्पर आदरभावना असायला हवी. अनेक जोडपी लग्नापूर्वी एकमेकांचे चांगले मित्र असतात. त्यानंतर ते प्रियकर-प्रेयसी चे  नातेही यशस्वीपणे निभावतात पण लग्नानंतर पती-पत्नी भूमिकेत गेल्यावर ही मैत्रीभावना दुरावते. खर तर असे घडायला नको. पती-पत्नी जेंव्हा मित्र-मैत्रीण भूमिकेतून आयुष्याकडे पहातात तेंव्हा संसाराचा स्वर्ग व्हायला वेळ लागत नाही.

 

              ५.गुरु-शिष्य भूमिका - नवरा-बायको एकमेकांचे गुरु शिष्यही  असू शकतात.

             आजच्या उच्च शिक्षित जोडप्यामध्ये वयक्तिक अहंकारापोटी विसंवाद होतांना दिसतात. प्रत्येकजण स्वत:ला शहाणा समजतो व सहजीवानातली मजा लुटायची सोडून एकमेकांवर कुरघोडी करणे सुरु होते. अशी  एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा खर तर  पतीदेव  पत्नीकडून तर कधी पत्नी पतीकडून काही नवे शिकू शकतात. एकमेकातल्या त्रुटी शोधण्यापेक्षा त्या त्रुटी दूर करून जीवन समृद्ध कसे करू शकतो यावर भर असायला हवा. गुरु शिष्याच्या भूमिका मनापासून साकारून अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या ज्ञानसागराचा लाभ घ्यायला काय हरकत आहे ? आपल्याला जे माहित आहे ते जोडीदाराशी वाटून घेऊन/देऊन  पती-पत्नी नातेसंबंध एका नव्या उंचीवर पोहोचू शकतात. अशा दांपत्यांची पुढची पिढी निश्चितच अत्यंत हुशार निपजेल.

               सुखी संसारासाठी प्रत्येक जोडीदाराने आपल्या वाट्याला आलेल्या व वेळोवेळी आवश्यकतेनुसार साकाराव्या लागणार्या वरील वेगवेगळ्या भूमिका मनापासून साकारल्या तर सहजीवनाची ही वाट आनंद सुख समाधान यांनी सजलेली असेल.


भिन्न भिन्न स्वभाव, समंजसाचा तेथे अभाव,

शब्दांचे घणाघाती घाव, कुचकामी असा संसार!

नसावी ती "ग" ची बाधा, महत्व सदैव सुसंवादा,

आत्मसन्मानास नको ठेच,  तोच सुखी संसार!

एक दुस-यास सावरावे, दोषांसहीत स्वीकारावे,

सुसंवादातुन साधणे हीत, आनंदी होईल संसार!

..........
प्रल्हाद कों दुधाळ.

                 ९४२३०१२०२०

              Blog-www.dudhalpralhad.blogspot.com

 

 

 

Sunday, September 29, 2013

अपेक्षा.

अपेक्षा.
मी काही अशा विषयातला तज्ञ नाही. जे मला माझ्या आयुष्यात सुचले आणि जगताना कामाला आले ते मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे......
                    माणसाच्या आयुष्यात समस्या भरून राहिल्या आहेत! या समस्या सोडवत सोडवत माणूस जगायला शिकतो.अगदी तान्हे बाळ सुध्दा आपल्या समोर असलेली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. भूक लागली की भोकाड पसरते.आई आजूबाजूला असेल तर त्याची समस्या लगेच सुटते.पण तात्पुरता उपाय म्हणून स्वत:चा अंगठा चोखू लागते.हे त्याला कोणी शिकवलेले नसते! पडत झडत प्रगती करणे हे जिवंत माणसाचे लक्षण आहे. अपयशाने खचून न जाता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून नव्याने सुरुवात करणे हेच यशाचे गमक आहे असे अनेक मान्यवर सांगतात. पण कळत पण वळत नाही !
                   माणसाने आपल्या जीवनात यश अपयशाचे काही आडाखे बांधलेले असतात.अमुक एक गोष्ट मनाप्रमाणे झाली की मी यशस्वी आणि यशस्वी झालो की सुखी असे काही विचित्र आडाखे असतात ते! यश आणि सुख या अवस्थ्या व्यक्तीसापेक्ष आहेत! प्रत्येकाची यशाची (आणि सुखाचीही) व्याख्या वेगवेगळी असते .एकाचे  सुख हे दुसऱ्या व्यक्तीच्या दु:खाचे कारण असू शकते!.
                                      अपेक्षांबद्दल बोलायचे झाले तर माणसाची एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी अपेक्षा तयार होते ती पूर्ण झाली की पुढची! हे न संपणारे चक्र असते! शिवाय प्रत्येकाची हरेक अपेक्षापूर्ती नेहमी होईलच याचाही भरवसा नसतो.मनासारखे काही घडत नाही तेंव्हा माणूस वेड्यासारखा वागायला लागतो.अपेक्षाभंगाचे दुख: त्याला नकोसे होते.त्यातूनच मनावर ताण येतो.सततच्या ताणामुळे माणूस निराशाग्रस्त होतो. वैफल्यग्रस्त जीवन जगायला लागतो.त्याला जगण्यात राम वाटत नाही. असा निराशेने पछाडलेला माणूस चिडचिड करायला लागतो.आजुबाजूच्या माणसांवर खेकसायला लागतो.स्वत:बरोबरच निकटच्या सहवासातील व्यक्तींचे जगणेही अशी व्यक्ती अवघड करू शकते. अशा व्यक्तीला लोक टाळू लागतात व त्यामुळे त्याला आयुष्यात एकटेपणाला सामोरे जावे लागते.माझ्या एकट्याच्या वाट्यालाच हे भोग का आले  म्हणून तो दैवाला दोष द्यायला लागतो.आपल्या या अवस्थेला आजूबाजूचे लोक कारणीभूत आहेत असाही समज तो करून घेतो. आयुष्यातल्या अनेक सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून नकारात्मक गोष्टींना महत्व दिले जाते.यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन व जवळच्या माणसांची साथ मिळाली नाही तर अशी व्यक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक निराशेच्या गर्तेत फसत जाते.नकारात्मक विचारांमुळे व्यसनांच्या आहारी जाते.आजूबाजूच्यांना दुश्मन समजू लागते.निराशाग्रस्त अवस्थेत माणूस काय करेल याचा नेम नाही! टोकाच्या निराश अवस्थेतील व्यक्ती आत्मघात सुध्दा करू शकते.अशा व्यक्ती च्या जवळच्या व्यक्तींवर सुद्धा याचे दुष्परिणाम होऊ लागतात.आयुष्यात प्रत्येक माणसाला कमी अधिक प्रमाणात काही न काही समस्या असतेच! त्या समस्येच भांडवल करून आपल्या जीवनातला आनंद घालवायचा का त्या समस्येवर योग्य ते उत्तर शोधून पुढे वाटचाल करायची हे त्या माणसाच्या विचार पद्धती वर अवलंबून असते. एखाद्या समस्येवर एक आणि एकच समाधान आहे असे असू शकत नाही. असच घडायला पाहिजे नाहीतर जीवनाला  काही अर्थ नाही असा विचार चुकीचा आहे.कोणत्याही समस्येच/प्रश्नाच एक आदर्श उत्तर असते पण तेच फायनल उत्तर! दुसरा पर्याय नाहीच ही विचारसरणी तुम्हाला निराश करू शकते! माझ्या मते जीवनात येणार्या प्रत्येक अवघड प्रश्नाला/आव्हानाला एक आपल्याला हवे असलेले उत्तर असते हे उत्तर म्हणजे अपेक्षापूर्ती /पूर्ण समाधान/सुखच सुख! पण वास्तवात त्या अपेक्षित उत्तरापर्यंत प्रत्येकजण पोहचू शकत नाही! तेथे पोहोचणे कितीही आनंददायक असले तरी त्यासाठी काही किंमत मोजावी लागणार असते. कधी त्या उत्तरापोटी जवळचे  नातेसंबंध दूरावू शकतात,कधी कुणाचे अहंकार दुखावले जाऊ शकतात,तर कधी अगदी जवळच्या  कुणाचे आर्थिक वा वयक्तिक हितसंबंध अडकलेले असतात. आणि असे कुणाला दुखाऊन वा नाराज करून झालेली अपेक्षापूर्ती होणे म्हणजे दुसऱ्या आघाडीवरचे अपयशच की! कारण समाजात राहताना एकमेकांची मने सांभाळणे एकमेकांना आधार देणेही तेव्हढेच आवश्यक असते.त्यामुळे नुसती अपेक्षित अपेक्षापूर्ती हे त्या समस्येचे समाधानकारक उत्तर असू शकत नाही,कारण त्यातून एका नव्या समस्येचा जन्म होतो आहे.खरे तर हवे तसे घडले नाही म्हणून निराशेच्या गर्तेत जायची गरज नाही.आयुष्यातल्या गहन प्रश्नाची एकूण पाच उत्तरे असू शकतात –
            १. तुम्हाला अपेक्षित असलेले उत्तर.(पूर्ण समाधान.)
            २. अपेक्षित उत्तराच्या अगदी जवळचे उत्तर.(थोडीशी तडजोड.)
            ३. अपेक्षित उत्तराच्या पन्नास टक्के जवळचे उत्तर(तडजोड.)
            ४. अपेक्षित उत्तराच्या वीस पंचवीस टक्के जवळचे उत्तर( एक पर्याय म्हणून केलेली तडजोड.)
            ५.समस्येला उत्तरच नाही.(तडजोडीची शक्यताच नाही,तुकडा तोडणे हा एकमेव पर्याय.)
                  आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जगताना माणूस आत्मकेंद्रित झाला आहे.स्वत:च्या सुखापलीकडे पहायची वृत्ती कमी झाली आहे. घेणे फक्त माहीत आहे, काही देऊनही आनंद मिळवता येऊ शकतो हे नव्या पिढीला शिकविणे आवश्यक झाले आहे.पाश्चात्य संस्कृतीमधील  DINK(Double Income No Kid) वा मी आणि माझा जोडीदार अशी संकुचित कुटुंबसंस्थ्या उदयाला येऊ घातली आहे.वयक्तिक स्वार्थापोटी स्वत:च्या आईवडिलांना वृध्दाश्रमात पाठवणारी जमात वाढते आहे.एकत्र कुटुंबसंस्था मोडीत निघाल्यामुळे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. नवरा बायको दोघेही आजकाल उच्च शिक्षित असतात. मोठ्या मोठ्या डिग्र्या व भरपूर पैसा याबरोबरच वयक्तिक अहंकारही वाढतो आहे.नात्यांमध्ये नव्या नव्या समस्या निर्माण होत आहेत. सुसंवादाचा अभाव आणि घरात वडीलधारे समजाऊन सांगणारे/सांभाळून घेणारे कुणी नाही, कोणी कुणाला समजून घ्यायला तयार नाही! अशा जोडप्यांचे अहंकारापोटी शुल्लक कारणांवरून घटस्फोट होत आहेत. कुटुंब व्यवस्थ्या धोक्यात आली आहे. ताणतणावामुळे नव्या नव्या आजारांना माणूस बळी पडत आहे.
                  हे सगळे टाळता येणार नाही का? यावर आपण काय करू शकतो यावर थंड डोक्याने विचार केला तर बरेच पर्याय समोर येऊ शकतात.  
                                                आपल्याला माहित आहे की अन्न,वस्र,निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत.या गरजा पूर्ण होण्यासाठी तो जीवापाड कष्ट करतो. एकदा का या मुलभूत गरजा पूर्ण झाल्या की आपण सुखी होणार असे त्याला वाटत असते.प्रत्यक्षात काय होते ते एक निवारा हे उदाहरण घेऊन पाहू. सुरुवातीला निवारा हा शब्द मोघम वापरला जातो.पण निवारा ही गरज पूर्ण होण्याची वेळ येते तेंव्हा समोर अनेक पर्याय दिसायला लागतात.चार भिंती व त्यावर छत हे खरे तर निवार्याची व्याख्या,पण येथे एक घर याला अनेक पर्याय समोर येतात, झोपडी, चाळीतले घर, सदनिका, वन बी एच के,टू बी एच के,रो हाऊस,आलिशान बंगला वगैरे वैगेरे.त्याबरोबरच विविध सोयी सुविधा हव्या असतात.जेंव्हा आकड्यांची गणिते जमत नाहीत तेंव्हा चिडचिड व्हायला लागते.जेंव्हा अपेक्षाभंग होतो आणि हेच कारण पुढे निराशाग्रस्त व्हायला पुरेसे असते. हीच गोष्ट प्रत्येक गरजेबाबतीत कमी जास्त प्रमाणात घडत असते!
                  आपल्या आवाक्यापलीकडे असलेली स्वप्ने पहायला काहीच हरकत नाही,पण ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आवश्यक ते मानसिक/शाररिक/आर्थिक अशा सर्व पातळ्यांवरचे  प्रयत्नही करायची तयारी असायला हवी. असे प्रयत्न करूनही मोठ्या स्वप्नांची पूर्तता  झाली नाही तर लगेच निराश व्हायची गरज नाही.आपण पाहिलेले स्वप्न आपल्या आवाक्या पलीकडचे आहे हे योग्य वेळी मनापासून स्वीकारणे गरजेचे असते. वास्तवातल्या आपल्या मर्यादा ओळखल्या की जीवन खूप सोपे होऊन जाते! आत्मपरीक्षण करून स्वत:ला काही प्रश्न विचारले तर हे आत्मभान यायला मदत होऊ शकते. जसे -
                आपली बलस्थ्याने कोणती आहेत?
                आपल्यातील कमतरता/त्रुटी काय आहेत?
                आपल्या स्वभावातले चांगले गुण कोणते?
                आपल्यात कोणते अवगुण आहेत?
               कोणत्या परिस्थितीत आपल्याला राग येतो/आनंद होतो/चिडचिड होते...... इत्यादी
            स्वत:च्या बद्दल माणसाला योग्य ते ज्ञान असले की निराशाग्रस्त होण्याच्या क्षणी वास्तवाचे भान येते व परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळली जाऊ शकते.
          

       

Wednesday, August 21, 2013

मन:शांतीसाठी.


 मन:शांतीसाठी.

 आजकाल धावपळीच्या युगात माणसाने आपले मन:स्वास्थ्य गमावले आहे.मन:शांतीसाठी मंदिरे व वेगवेगळ्या आध्यात्मिक गुरूंचे आश्रम धुंडाळले जात आहेत.त्यातून काहीच हाती लागत नाही आणि माणूस हळूहळू निराशेच्या गर्तेत लोटला जात आहे.
  खर तर “तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी!”
 या उक्तीप्रमाणे मन:शांतीसाठी माणूस इकडे तिकडे विनाकारण फिरत आहे असे करण्याची गरज नाही. मन:शांती साठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून काही सवयी सोडल्या व काही सवयी अंगीकारल्या तर सुख आणि मन:शांती लाभणे फार दूर नाही. यासाठी काही सुचना - 

१.तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत कार्यवाही करताना भूतकाळातील कुणालातरी आलेला अनुभव अथवा अपयशाची भीती यांचा विचार प्रथम करता, ही सवय सोडा. यश मिळणारच आहे असा सकारात्मक विचार करून केलेले काम नेहमी यशाच्या जवळ घेऊन जाते.तुमचा अनुभव हा तुमचा गुरु  असतो.आत्मविश्वासाने केलेले काम नेहमी मन:शांतीचे कारण असते.

 २.तुम्ही समोरच्या व्यक्ती बद्दल बऱ्याचदा पूर्वगृह मनात बाळगून वागता किंवा बोलता अशा तर्क करण्याच्या स्वभावामुळे आपली मन:शांती तुम्ही गमावलेली असते. तेंव्हा मोकळ्या मनाने स्वत:शी व  इत्तरांशी मुक्तपणाने संवाद साधा.

३.तुम्ही कोणतातरी न्यूनगंड बाळगत आयुष्य जगात असता एक लक्षात घ्या तुम्ही जसे आहात तसे समाजाला आत्मविश्वासाने सामोरे जा.स्वत:वर विश्वास ठेऊन केलेल्या कामातून निश्चितच आंतरिक समाधान मिळते

४.आजूबाजूच्या व्यक्ती तुमच्याबरोबर ज्या प्रकारे बोलतात किंवा वागतात त्याचा तुम्ही तुमच्या  मर्जीप्रमाणे अन्वयार्थ लावता व विनाकारण मनस्ताप करून घेता. हे समजून चला की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे.समोरच्याच्या वागण्याचा अर्थ लावण्यापूर्वी त्याच्या जागी स्वत:ला ठेऊन बघा,त्याची  बाजूही समजून घ्या. गैरसमज नेहमीच मनस्वास्थ्य बिघडवतात.

५.कुठल्याही गोष्टी बद्दल विनाकारण काळजी करायची सवय सोडून द्या. चिंता कटकटी निर्माण करते  व मानसिक शांततेचा भंग करते. जे आहे तसे स्वीकारा.जे बदलू शकता ते बदलण्याचा प्रयत्न करा पण त्यासाठी अट्टाहास मात्र करू नका.

६. तुम्ही निकोप मनाने दुसऱ्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करा. वाईटातही चांगले शोधायची  सवय लावा.

७.संवेदनाशील रहा.समोरच्याच्या मनाचा विचार प्रथम करा.तुम्ही आजूबाजूच्या लोकांच्या भावनांचा आदर करू लागलात की वेगळे मानसिक समाधान मिळेल.माणसांप्रमाणेच निसर्गालाही भावना असतात याची जाणीव ठेवा.

८.तुमच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवा.मनाची प्रसन्नता चेहऱ्यावर दिसायला हवी.

९.आपला आनंद एक दुसऱ्यात वाटून घ्या व स्वत:बरोबरच इत्तरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

१०.जे घडते आहे ते जसे आहे तसे विना अवरोध अति चिकित्सा न करता आनंदाने स्वीकारण्याची सवय तुम्ही लाऊन घ्या. 

     लक्षात घ्या- मन ठेवा रे प्रसन्न सकल सिद्धीचे कारण!

                                           प्रल्हाद दुधाळ.

 

Friday, August 16, 2013

ओझी


जाणते अजाणतेपणी आपण भूतकाळात कुणा कुणाला त्यांच्या  संकटसमयी कोणत्यातरी स्वरूपातील मदत केलेली असते तुम्ही ही गोष्ट कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली असते.पण जेंव्हा तुमच्यावर तसाच प्रसंग येतो तेंव्हा उगाचच दुसरेही / निदान ज्यांना तुम्ही मदत केली होती त्या व्यक्ती तरी तुम्हालाही  तशाच प्रकारची मदत करतील असे आपण गृहीत धरून चालतो. पण प्रत्यक्षात असे घडेलच असे सांगता येत नाही! कोणत्या प्रसंगी कुणी कुणाशी कस वागाव यावर तुमचे नियंत्रण कसे असू शकेल? तुम्ही वेळेची गरज ओळखली हा तुमचा चांगुलपणा ( का वेडेपणा? ) असतो. तशाच वागण्याची अपेक्षा कुणाकडून ठेवणे हा अजून एक गाढवपणा ठरतो. थोडक्यात काय तुमची ओझी तुम्हालाच वाहायची आहेत!

Wednesday, June 12, 2013

तथास्तु!


                                   तथास्तु!

                  फार फार वर्षापूर्वी एका गावात एक सज्जन माणूस रहात होता.प्रयत्न व परमेश्वराची कृपा यामुळे सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती. परोपकारी म्हणून सर्वत्र त्याचे नाव झाले होते. परमेश्वरावर त्याची निस्सीम भक्ती होती.आपल्या भक्तीभावाने त्याने परमेश्वराला प्रसन्न करून घेतले होते.आपल्याबरोबरच सर्व जग सुखात असावे असे त्याला वाटत असे.या जगात कोणीही कुठल्याही समस्येने  गांजलेला नसावा अशी प्रार्थना तो दररोज करत असे.गावात त्याला सर्वजण मान देत असत.तो उदार मनाने सर्वांना कायम मदत करत असे.आपण जरी सुखात असलो तरी आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळ्या कारणाने दु:खात असलेले पाहून त्याने ठरवले की परमेश्वराला सांगून सर्वांना सुखी करायचे! त्यासाठी त्याने मनोभावे पूजापाठ सुरु केला.परमेश्वराने सज्जनाला दर्शन दिले व तुझ्यासाठी अजून काय करू असे विचारले.

                 “ तुझ्या आशीर्वादाने माझ्याकडे सर्व काही आहे! मला काहीच नको पण अवतीभवतीच्या सगळ्यांनाही तू  सुखी कर! “ भक्ताने साकडे घातले.

                “अरे असे नाही करता येणार! तू सुखात आहेस ते  तुझ्या कर्मामुळे!

           इथे प्रत्येकाला जे काही मिळते ते ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ असते! त्यामुळे कोण कसा जगणार ते मी त्याच्या बऱ्यावाईट कर्माप्रमाणे ठरवतो! तेंव्हा जसे आहे ते ठीक आहे तू सुखात आहेस ना? तेव्हढेच पहा! मला माझे काम करू दे !”

                 एवढे सांगूनही सज्जनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.त्याने सर्वांच्या सुखासाठी देवाला आळवणे चालूच ठेवले. देवाचा तो आवडता भक्त होता त्यामुळे देवाने शेवटी हार पत्करली व त्या गावातील सर्वांना सुखी करायचे ठरवले!

               सज्जनाचे घर सोडून सगळ्या गावातील लोकांना पक्की घरे मिळाली.सर्व लोक एका रात्रीत श्रीमंत झाले. दु:खाचा नायनाट झाला.कुणालाही काहीही करायची गरज राहिली नाही.खाणेपिणे व ऐशारामात रहाणे हा प्रत्येकाचा दिनक्रम झाला.कुणालाही काम करायची गरज उरली नाही! गाव सुखी व संपन्न झाले.

                 एकदा सज्जनाची चप्पल तुटली तो नेहमीच्या दुकानात गेला तर दुकान बंद!

             काही करण्याची गरजच उरली नसल्यामुळे चप्पल दुरुस्तीचे दुकान बंद झाले होते! सुखात असल्यामुळे गावातील सर्वांनी कामच करणे बंद केल्याचे दिसले! सज्जनाचे घर जसे आधी होते तसेच असल्यामुळे पावसामुळे गळायला लागले पण दुरुस्तीसाठी कोणीही येईना कारण सगळेच सुखात! कुणालाही कामाची गरजच  नाही! कुणालाही कसलीही चिंता नाही! सगळीकडे आनंदी आनंद!

                  सज्जनाला परमेश्वराचे म्हणणे आठवले. आपल्या हट्टापायी आपण काय चूक केली आहे हे सज्जनाला समजून आले! कोणतेही कर्म न करता आलेल्या सुखाची /ऐश्वर्याची लोकांना काहीच  किंमत नव्हती! सज्जनाने देवाला पुन्हा सगळे पाहिल्यासारखे करण्याबद्दल साकडे घातले! परमेश्वर गालातल्या गालात हसला!

                आपल्या आवडत्या भक्ताचे गाऱ्हाणे देवाने ताबडतोब ऐकले!

                   म्हणाला “ तथास्तु ” !

                                    .......... प्रल्हाद दुधाळ.                               (एका दंतकथेवर आधारीत)

                

Thursday, May 30, 2013

ताण तणाव.


                                 ताण तणाव.

              आपण हल्ली बऱ्याच लोकांकडून एकतो-

                मी फार टेन्शनमध्ये आहे हो!

                          आधुनिक जीवनशैलीमुळे माणूस अनेकदा ताण तणावाचा बळी होत आहे.त्याला भविष्याची चिंता वाटते ,नोकरीतील आव्हानांची चिंता वाटते, मुलांच्या शिक्षण व करिअर बद्दल तो कायम काळजीत असतो.जे जवळ आहे त्याबद्दल फारसा विचार न करता जे नाही किंवा काही आभासी गोष्टी बद्दल विचार/चिंता करत राहिल्यामुळे ताण तणावाचा सामना त्याला करावा लागत आहे. कायम तणावग्रस्त राहिल्यामुळे अनेक मनोकायिक आजार त्याच्या वर हल्ला करण्यासाठी टपून बसलेले आहेत.

                         तणाव म्हणजे जीवनातल्या येणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगांना आपल्या शरीराने दिलेली नैसर्गिक प्रतिक्रिया! तणावग्रस्त माणसाच्या शरीरात तणावामुळे काही बदल होतात आणि त्या व्यक्तीच्या अंगात बळ वाढते ,कधी त्याला भीती वाटू शकते, घाम फुटतो,बेचैनी वाढते,आत्मविश्वास कमी होतो,असुरक्षितता वाटायला लागते.

                         चांगल्या प्रकारच्या ताणामुळे माणसाच्या अंगात अचानक शक्ती वाढते व तणाव ज्या कारणामुळे वाढला आहे त्या कारणापासून दूर होणे शक्य होते .उदा. वाघ समोर आला की एरवी न पळू शकणारा माणुसही जीव वाचविण्यासाठी धूम ठोकतो!.एखादा विद्यार्थी टेन्शन मध्ये जास्त अभ्यास करू शकतो!

                        सध्याच्या काळात टेन्शन वाढायचे मुख्य कारण म्हणजे जीवनातली अनिश्चीतता,वाढलेली हाव व त्यामुळे समोर ठाकलेली वेगवेगळी आव्हाने हे आहे.सतत टेन्शन मध्ये राहिल्याने शरीरावर अनेक घातक परिणाम होऊ शकतात.

           टेन्शनमध्ये माणसात खालीलपैकी लक्षणे दिसू शकतात.

          १.जास्त भूक लागणे.

          २.जास्त झोप येणे .

          ३.खूप राग येणे व रागाच्या भरात  पुढचा मागचा विचार न करता वागणे.

          ४.आजूबाजूच्या व्यक्ती व परिस्थिती ची पर्वा न करणे .

          ५.पैशासाठी वेडापिसा होणे.

          ६.जास्त प्रमाणात व्यसने /शिगार/दारू पिणे.

          ७.जास्त प्रमाणात औषधे घेणे.

          ८.संथ व निष्क्रिय होणे.

                 असे वागल्याने  बरे वाटते हा समज आपला आपणच करून घेतला जातो  व आपण जे करतोय तेच बरोबर असे वाटायला लागते .

         ताण-तणाव किंवा टेन्शन मधील त्रासामधून सुटका होण्यासाठी काही सोपे उपाय आपण करू शकतो –

         मोकळ्या हवेतील भरपूर प्राणवायू शरीरात घेणे .

         आवडते संगीत/गाणी ऐकणे

         विनोदी पुस्तके वाचणे /भरपूर हसणे.

         शरीराचा हलका मसाज करणे .

         आवडत्या व्यक्तीच्या सहवासात रहाणे त्याच्याशी सुसंवाद साधणे.प्रसन्न रहाण्याचा प्रयत्न करणे.

         आवडता सेंट लावणे. मंद सुगंधात मन प्रसन्न करण्याची जबरदस्त शक्ती आहे.

         निसर्गाच्या सानिध्यात रहाणे. फळे फुले हिरवी राने यांच्या सहवासात मोकळा श्वास घेणे.

                निसर्गाच्या सानिध्यात  राहिल्याने माणूस सारासार विचार करायला लागतो आपले वास्तव स्वीकारायला शिकतो.सुख काय आहे? दुखः काय आहे? यावर डोळसपणे विचार करू लागतो. आत्मचिंतन व आवडत्या व्यक्तीशी केलेला मुक्त संवाद त्याला चिंतामुक्त व टेन्शन पासून दूर ठेऊ शकतो.दैनंदिन आयुष्यातील आव्हानांना दोन हात करायला नव्याने शिकवतो.पुन्हा नव्या जोमाने जगण्याच्या लढाईला सज्ज होतो!.

                                        ...........प्रल्हाद दुधाळ.