Thursday, January 24, 2019

मोबाईलची कथा व्यथा

      मोबाईलची कथा व्यथा
       आमच्या बिल्डिंगमध्ये केवळ माझ्या घरात, तोही मी दूरसंचार खात्यात काम करत असल्याने फुकट मिळालेला टेलिफोन होता.बिल्डिंगमधील कुणाला फोन करायचा असला किंवा कुणाचा इनकमिंग कॉल आला तर त्याला बोलावून घेवून परत कॉल करायची मोफत सोय मी करून दिली होती.त्यावेळी मोबाईल सेवा नुकतीच चालू झाली होती इन्कमिंग कॉलला ही आठ रूपये चार्ज होता.आमच्या शेजारी एक व्यापारी राहायचे.त्यांच्याकडे असा मोबाईल होता.एकदा त्यांची बायको एका लग्नाला गेली आणि तेथे अचानक बेशुध्द  झाली.त्याचा फोन लागत नव्हता, त्यामुळे तो निरोप मला माझ्या फोनवर कुणीतरी दिला.ते महाशय नेमके बाहेर गेले होते.त्यांच्याकडे नवा नवा आलेला मोबाईल होता.मी त्यांना मोबाईलवर कॉल करून त्याच्या बायकोबद्दल सांगायचा प्रयत्न करत होतो;पण इन्कमिंगला चार्ज आहे म्हणून बाबा मोबाईलचा कॉल घ्यायला तयारच नाही! तब्बल एक तास मी  प्रयत्न करत होतो;पण त्याने फोन काही घेतला नाही! असा राग आला होता ना!शेवटी मी नाद सोडून दिला...
दुसऱ्या दिवशी कळाले की त्याच्या एका नातेवाईकाने परस्पर याच्या बायकोला हॉस्पीटलमध्ये  एडमिट केले होते ....

कथा कुणाची व्यथा कुणाला!
....प्रल्हाद दुधाळ.

Monday, January 14, 2019

शपथ...

शपथ....
 
   शिक्षिका असलेल्या एका फेसबुक मैत्रिणीचा मेसेज आला की शाळेत तिच्या विद्यार्थ्याना "अन्नाची नासाडी करू नये" अशा आशयाची  एक शपथ द्यायची आहे आणि त्यासाठीचा मजकूर मी लिहून द्यावा.मी प्रयत्न करतो म्हणालो...
 आज ती शपथ लिहून द्यायचा प्रयत्न केला.
मी लिहिलेली ती शपथ जेव्हा पुन्हा वाचली तेव्हा लक्षात आले की अरे; ते विद्यार्थीच का, अशी शपथ तर माझ्यासह प्रत्येकाने घ्यायला हवी ....
बघा जमली का?
 "आम्ही शपथ घेतो की...
- अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि या अन्नाचा प्रत्येक कण ही राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे हे मला माहीत आहे .अन्न वाया घालवून या संपत्तीचा मी विनाश करणार नाही व होवू देणार नाही.
- माझ्या ताटात येणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक घासामागे बळीराजाने केलेल्या अतोनात कष्टाची मला जाणीव आहे. अन्न वाया घालवून बळीराजाच्या त्या कष्टाचा मी अपमान करणार नाही .
- घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात जेवण करताना भूक असेल एवढेच अन्न मी वाढून घेईन .अन्नाचा प्रत्येक घास मी निर्मिकाने दिलेला प्रसाद म्हणून खाईन.अन्न वाया जाणार नाही याची मी दक्षता घेईन व ईतर लोकांनासुध्दा अन्नाचे महत्त्व समजावून सांगेन
- मला जाणीव आहे की माझ्या देशात अनेक लोकांना खायला पुरेसे अन्न मिळत नाही. माझ्या अवतीभवतीच्या अशा एका तरी उपाशी माणसाला जमेल तेव्हा माझ्या घासातला घास द्यायचा मी प्रयत्न करीन.
- भूक असताना खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती आणि स्वत: अर्धपोटी असताना आपल्यातला अर्धा घास दुसऱ्या गरजूला खायला देणे ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती जोपासण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करीन."
..... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, December 19, 2018

पुण्यकर्म

काल एक मनोरंजक तेव्हढीच   गंभीरपणे विचार करायला लावणारी केस माझ्यासमोर आली होती.प्रशासन विभागात काम करत असल्याने सामान्यपणे लोकांना होता होईल एवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो;पण कधी कधी अशी काही बिलींदर माणसे भेटतात की ज्याचे नाव ते!
   निवृत्ती जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड तपासून काही त्रुटी असल्यास त्या दुरूस्त करून पुढे पेंशन संबंधी काही अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही मोहीम राबवत असतो.अशाच एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला तो पुढच्या सहा महिन्यात रिटायर होत असल्याने त्याचे सर्व्हिस बुक दाखवले.
सर्व्हिस पुस्तकातल्या नोंदी पाहून तो बराच विचारात पडलेला दिसला . त्या  दिवशी तो निघून गेला; पण सातआठ दिवसांनी तो काही कागदपत्रे घेऊन पुन्हा आला . त्याने एक अर्ज आणला होता.
  अर्जात त्याने लिहिले होते...
" माझी पहिली पत्नी राजश्री केशव जाधव हीचे दिनांक  २०/५/२००० रोजी निधन झाले.( सोबत मृत्यू प्रमाणपत्र जोडले आहे) .त्यानंतर २ जाने.२००१ ला मी उषा केशव बेंद्रे हिच्याशी लग्न केले आहे आणि तिचे नाव बदलून राजश्री केशव जाधव असे ठेवले आहे! (सोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदली झाल्याचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे) . नजर चुकीने माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल ऑफिसला कळवणे राहून गेले होते त्याबद्दल माफी असावी .आता माझ्या सर्व्हिस पुस्तकात माझ्या पहिल्या  पत्नीचे नाव वगळून दुसऱ्या पत्नीची नोंद करावी तसेच माझे आधीचे नॉमिनेशन बदलुन नवीन नोंद करावी ....."
त्याचा अर्ज वाचून मी विचारात पडलो.  
त्याचा  अर्ज घेतला आणि त्याला दोन तीन दिवसात फोन करून कळवतो असे सांगितले.
मी गोंधळून गेलो होतो.  
 लगेच त्याची केस वाचायला घेतली ...
आता तुम्ही म्हणाल यात मजेशीर काय आहे?....सांगतो....
  या महाशयांनी दुसरे लग्न २००१ सालात केले असे म्हटले आहे; पण त्याची नोंदणी सतरा वर्षांनी केली आहे. ऑफिसला पहिल्या बायकोचे निधन आणि दुसऱ्या लग्नाबद्दल कळवावे असे त्याला तब्बल सतरा वर्षानंतर आवश्यक वाटले . आपल्या दुसऱ्या बायकोला त्याने पहिल्या बायकोचे नावच दिले!
 विशेष म्हणजे दुसऱ्या बायकोच्या वडिलांचे नाव आणि हे महाशय दोघांचे नाव सारखेच!
केशव!!! आहे का नाही योगायोग?
सगळी केस वाचून डोक्याचा गोयंदा झालायं....
त्याचा नॉमिनेशन फॉर्म वाचून मात्र मी गंभीर झालोय...
आधीच्या नॉमिनेशन मध्ये त्याच्या पहिल्या पत्नी बरोबर एक मुलगा आणि एका मुलीचे नाव होते .नवीन नॉमिनेशन फॉर्म मध्ये मात्र  त्याने फक्त दुसऱ्या बायकोचे नाव लिहिले आहे ....
काय दोष त्या मुलांचा?
केस पेंडीग ठेवलीय...
विचारात पडलोय ...
बघूया काय करता येईल.  ...
(उत्तरार्ध..)

काल तो पुन्हा आला .
त्याची केस माझ्याकडे पडलेली होती त्यामुळे मी त्याची वाटच बघत होतो. त्याने  आपले नॉमिनेशन बदलावे म्हणून दिलेले एप्लिकेशन अजून मी कार्यवाहीसाठी घेतले नव्हते.
या केसमध्ये आपण नियमात बसवून काहीतरी करायला पाहिजे असे मनापासून वाटत होते पण;शेवटी ते त्याचे नॉमिनेशन होते आणि ते त्याने कुणाच्या नावाने करावे हा त्याचा अधिकार होता!असे असले तरी कितीही वाईट असला तरी प्रत्येक माणसात एक सज्जन माणूस दडलेला असतो यावर माझा विश्वास होता आणि त्याच्यातल्या त्या सज्जन माणसाला आवाहन करायचे आणि त्या मुलांवर भविष्यकाळात कळत नकळत होणारा अन्याय दूर करायचा मी प्रयत्न करणार होतो.त्याला नियमांच्या खिंडीत गाठून हे करणे शक्य आहे हे दोन तीन दिवस केलेल्या विचाराअंती मला माहीत झाले होते. आता तो विचार प्रत्यक्षात आणायची वेळ आलेली होती.
" सर माझ्या अर्जाचे काय झाले?"
"ते दुसरे लग्न आणि नॉमिनेशन बद्दल ना..."
मी उगीचच अज्ञान पाजळले..
" हो सर..."
" त्याचे काय आहे की तुमची बायको गेली २००० ला , पुढे २००१ सालात तुम्ही दुसरे लग्न केले बरोबर ना ?"
" हो..."
" मग अठरा वर्षांनी तुम्हाला हे ऑफिसला कळवावे असे का वाटले?"
मी माझ्या मनात खदखदत असलेला प्रश्न विचारला...
" हे कळवायला लागतं हे मला माहीत नव्हतं..."
" मग आता कसं काय समजलं?"
" मी या वर्षी रिटायर होणार आहे त्यामुळे एका नातेवाईकाने सगळं रीतसर करून घ्यायला सांगितलं, म्हणून अर्ज दिलाय ..."
" आधी दिलेलं नॉमिनेशन बदलायला त्यानेच सांगितलं का?"
"हो,त्यानेच सांगितलं!"
" तो माणूस दुसऱ्या बायकोच्या नात्यातला आहे ना?"
त्याने आता मान खाली घातली आणि मान डोलावली.
आता माझा आवाज वाढला..
" अरे काय आहे, त्याने सांगितले आणि तुम्ही लगेच अर्ज दिला, थोड स्वतः डोकं चालवाव वाटलं नाही तुम्हाला? फक्त दुसऱ्या बायकोच्या नावाने नॉमिनेशन हवंय ? त्या दोन पोरांनी काय केलंय? त्यांची नावे वगळायची?"
खर तर त्याच्याशी असं बोलणं नियमानुसार नव्हतं;पण चांगल्या कामासाठी ही रिस्क मी घेतली.
माझा तो बदललेला पवित्रा बघून तो बराच गंभीर झाला होता.त्याने काढता पाय घेतला..
"मी दुपारनंतर परत येतो सर..."
माझा निरोप घेवून तो निघून गेला.
लंचला जाऊन मी परत आलो तर तो माझी वाटच बघत होता.
" सर, ते आधीचे पेपर परत द्या, आणि माझे हे नवे नॉमिनेशन घ्या ..."
मी त्याचा नवीन अर्ज वाचला आणि मी माझ्यावर खुश झालो.
ऑपरेशन सक्सेसफुल झाले होते!
नव्या नॉमिनेशन फॉर्म मध्ये त्याच्या दुसऱ्या बायकोला ५०टक्के आणि दोन्ही मुलांना २५ टक्के प्रत्येकी असे वाटप होते .
"धन्यवाद सर, मी चूक करत होतो. तुम्ही मला सावध केले..."
त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान होते.
नकळत हातून एक चांगले काम होणार होते .
...प्रल्हाद दुधाळ.

Friday, October 19, 2018

सिमोलांघण

सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
 माणसाने आपल्या भोवती वेगवेगळ्या नको त्या गोष्टींची कुंपने  घालून घेतलेली असतात.या कुंपणाच्या आतले जग हेच खरे जग आहे असे तो समजायला लागतो.अशा कुंपणा पलीकडे असलेल्या भव्य जगाची त्याला जाणीवच उरत नाही.मग त्याच्या त्या संकुचित जगातल्या जाती, धर्म, आपला, तुपला अशा भेदाभेदात तो अडकून पडतो.त्याने आपल्याभोवती तयार केलेल्या कोषात  तो इतका गुरफटून जातो की तो त्याचे खरे जगणेच विसरून जातो. ही एक प्रकारची गुलामगिरी त्याने स्वीकारलेली असते.या संकुचित जगात वावरताना तो मुक्तपणे विहरणे विसरून जातो आणि मग त्याची  खरी ओळख हळू हळू  पुसली जाते.
   आजच्या या विजयादशमीच्या निमित्ताने स्वतः ला ओळखण्यासाठी या संकुचित सीमांचे उल्लंघन करून बाहेर काय चालले आहे ते उघड्या डोळ्यांनी बघायला हवे.या काल्पनिक भिंती पलीकडे  मुक्त विचार, मुक्त जग आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत.तेव्हा आता चला; जात, पात, धर्म अशा सीमा ओलांडून त्या मोठ्या जगाकडे पाहू या! त्या  वेगळ्या जगात आपली नवी ओळख निर्माण करुया. सीमोल्लंघन करूया संकुचित विचारांचे, सीमोल्लंघन करूया अहंकाराचे, सीमोल्लंघन करूया भेदभावाचे!
 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे!
 या नव्या सीमा ओलांडून सुख, शांती, आरोग्य आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या समृद्ध आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
 हॅप्पी दशहरा!

Tuesday, September 25, 2018

मढेघाट

मढेघाट ...
दररोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा कधीतरी खूप कंटाळा येतो.या धावपळीतून एखादा दिवस तरी ब्रेक मिळावा असे आतून वाटत असते;पण समोर उभे असलेले कामाचे डोंगर यावर विचारही करू देत नाही तर तो अमलात आणणे तर खूप लांबची गोष्ट. कधीतरी बोलाफुलाची गाठ पडते आणि अचानक एखाद्या एकदिवसीय सहलीचा प्रस्ताव समोर येतो.रूटीन आयुष्यातून एक दिवस का होईना पण बाहेर पडता येईल म्हणून आपण तो प्रस्ताव लगेच स्वीकारतो.आपण कुठे जाणार आहोत,सहलीत नक्की काय बघणार आहोत याचा विचार येथे गौण होतो.एक दिवसाचा बदल एवढाच एक विचार यामागे असतो.माझेही असेच झाले.आम्हा पुण्यात रहात असलेल्या गाववाल्यांचा एक मंच आहे आणि या मंचाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.महिन्यातून एकदा आम्ही भेटत असतो."या महिन्यात आपण एक दिवसाची एक सहल आयोजित करत आहोत" या प्रस्तावाला मी लगेच प्रतिसाद दिला तो हवा असलेला एक दिवसीय बदल या विचातूनच!    काल प्रत्यक्ष सहल सुरू झाल्यावर   मात्र पुण्यापासून इतक्या जवळ अशी देखणी उर्जादायी ठिकाणे असूनही अजूनपर्यंत आपण ती कशी काय पाहिली नव्हती याबद्दल क्षणभर खंत वाटली. आमची ही सहल सुरू झाली ती खडकवासला धरणापासून! मग आम्ही पानशेत व वरसगाव ही धरणे पाहून वरची खिंड ओलांडून गुंजवणी धरणाकडे कूच केले.या खिंडीतून एका वेळी एका बाजूला तीन धरणे आणि दुसऱ्या बाजूला गुंजवणीचा नजारा अक्षरशः अवर्णनीय होता!
    केवळ एका हिरव्या रंगाच्या या अगणित छटा पहाताना भान हरपून गेले!रस्त्याच्या दुतर्फा विविध रंगांची रानफुले अगदी स्वागताला उभी असल्यागत डोलत होती. निसर्गाने अशा सजवलेल्या मार्गाने आम्ही अलगद गुंजवणी गावात उतरलो.आता भूक लागली होती.विशाल नावाच्या हॉटेलमध्ये मिसळपाव चापून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता आम्ही तोरणा किल्ल्याच्या बाजूने मढे  घाट बघायला निघालो होतो. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून असे वाटत होते की तेथे मढे नावाचे गाव असेल आणि त्या गावाच्या नावावरून त्या घाटाचे हे नाव पडले असेल;पण प्रत्यक्षात वेगळाच इतिहास समजला. कोंढाणा किल्ला जिंकताना शिवबाचा शूर मावळा तानाजी मालुसरे कामाला आला.गड आला पण सिंह गेला.या सिहाचे शव   अंत्यसंस्कारासाठी या अत्यंत अवघड अशा घाटाने एका रात्रीत त्याच्या कोकणातील मूळ गावी नेले होते.बोली भाषेत शव म्हणजे मढे, म्हणून या घाटाचे नाव मढे घाट असे पडले. इथल्या निसरड्या वाटेने तोल सांभाळत खाली अर्धा किलोमीटर गेल्यावर विहंगम असा लक्ष्मी  धबधबा पाहिल्यावर प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जातो! वरच्या कड्यावरून दिसणारे तळकोकण नजरेत साठवू म्हटले तरी साठवता येत नाही. हिरवाईने सजलेली इथल्या सृष्टीचा नजारा इतका मनमोहक होता की परत निघावे असे वाटत नव्हते!आमचा हा सह्याद्री केवळ दगड धोंड्याचा नाही तर येथील निसर्गसौंदर्याने संवेदनशील मनाला मोहिनी घालण्याची अदा या सौंदर्यात नक्कीच आहे याची साक्ष पटते! दुपार उलटून गेली होती आता पोटात कावळे कोकलायला लागले होते त्यामुळे गाडीत बसलो आणि वाजेघरकडे कूच केले ...(क्रमशः)

Tuesday, May 1, 2018

कामगार दिन


कामगार दिनानिमित्त  ....
 आज १ मे कामगार दिन!
या निमित्ताने कष्टकरी जगतातल्या बदलाचा माझ्या अल्पमतीने घेतलेला अल्प धांडोळा!
  तो काळच वेगळा होता पुण्या मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यात अनेक मोठे मोठे उद्योग प्रचंड बहरात होते.या मोठ्या उद्योगांना पूरक अशा अनेक छोट्या मोठ्या कंपन्या येथे तीन तीन शिफ्टमध्ये आपल्या चिमण्यातून धूर ओकत होत्या.त्या काळी पुण्यातल्या पिंपरीचिंचवड एमआयडीसी भागात विविध कंपन्यांच्या भोंग्यांचे आवाज एकामागोमाग घुमायचे  आणि त्या आवाजाच्या तालावर निळ्या युनिफॉर्ममधल्या असंख्य कामगारांच्या शिस्तबध्द हालचाली चालू राहायच्या.
     आपापल्या शिफ्टला कामावर जाणाऱ्या आणि सुट्टी झाल्यावर घराच्या ओढीने सायकल दामटणाऱ्या शेकडो कामगारांची वर्दळ  आकुर्डी ते भोसरी पट्ट्यातल्या रस्त्यांवर सतत जाणवायची.आपल्या निढळाच्या घामाच्या जोरावर इथला कामगार एक खुशहाल जिंदगी जगत होता.
   दिवाळीचा बोनस,पगारवाढीचे करार अशा गोष्टींवर घरोघरी चर्चा झडायच्या.या कामगारांच्या हितासाठी जागरूक असलेल्या अनेक कामगार संघटनांचे आस्तित्व रस्तोरस्ती जाणवायचे. वेळप्रसंगी आंदोलनांचे हत्यार वापरून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या जायच्या.मनासारखी वेतनवाढ वा बोनस मिळाला की जल्लोष व्हायचा, गुलालाने  रस्ते लालभडक व्हायचे.औद्योगिक पट्ट्यातील कामगारांच्या आर्थिक उलाढालीवर पुण्यातल्या व्यावसायिकांची गणिते बदलत रहायची.हातात पैसा आला की कामगारांकडून मनसोक्त खरेदी व्हायची. थोडक्यात शहरी जीवनातच काय पण शहरालगतच्या गावातल्या दैनंदिन आयुष्यांत या कामगार जगताला प्रचंड महत्व होते.
   काळ बदलला आणि तांत्रिक प्रगतीमुळे कारखान्यातली मनुष्यबळाची गरज घटत गेली.प्रथम अकुशल कामगार आणि नंतर कुशल कामगारांच्या नोकऱ्या कपात होत गेली.काही मोठे उद्योग बंद झाले तर काहीचे स्थलांतर झाले.मग या मोठ्या कारखान्यांवर अवलंबून असलेले छोटे उद्योगही हळूहळू बंद झाले आणि एरवी सतत गजबजलेले एमआयडीसीतले रस्ते ओस पडायला लागले.
    आधुनिकीकरणाच्या या रेट्यात अनेक कामगारांना  आपल्या नोकऱ्याना मुकावे लागले.काहीना स्थलांतर करावे लागले.कामगार संघटनांचे आस्तीत्वही जाणवण्याइतपत कमी झाले.अनेक कामगारांनी पोटासाठी पर्यायी लहान मोठ्या नोकरी व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला.ज्या कामगारांनी काळाप्रमाणे आपले कौशल्य वाढवले तेच टिकले बाकी असंघटीत कामगारांची होरपळ सुरू झाली.
   पुण्यासारख्या शहरात छोटे कारखाने जरी कमी झाले तरी काही काळानंतर आयटी वा तत्सम क्षेत्रातले अनेक व्यवसाय वाढले.आता पुण्याची आय टी हब म्हणून ओळख वाढायला लागली.संगणक क्षेत्रातल्या अनेक कार्पोरेट कंपन्या इथे आल्या.या क्षेत्रात नोकऱ्याच्या नव्या संधी मिळू लागल्या आणि निळ्या युनिफॉर्ममधील कामगारांऐवजी अपटूडेट पोशाखातल्या संगणक अभियंत्यांची वर्दळ पुण्यात वाढली. हिंजवडी,बाणेर,खराडी,हडपसर, येरवडा अशा विविध उपनगरात अनेक कार्पोरेट जगतातील कंपन्यानी आपले बस्तान बसवले आणि पुण्यात नव्या आयटी संस्कृतीचा उदय झाला.
    औद्योगिक वसाहतीतल्या संघटीत कामगारांचे जीवन आता हळू हळू इतिहासजमा होत आहे आणि आयटी मधली एक नवी कामगार संस्कृती उदयाला आली आहे.
     या दोन संस्कृतीत फार मोठा फरक आहे.
   जुना औद्योगिक कामगार फार शिकलेला नव्हता तरी त्याचे कामाचे तास ठरलेले होते,त्याच्या सोयी सुविधा मर्यादित होत्या पण जीवन शिस्तबध्द होते. तो आनंदात जगत होता!
    याउलट,
  आजचा उच्चशिक्षित आयटी प्रोफेशनल प्रचंड पैसा मिळूनही असुरक्षित आहे.प्रचंड स्पर्धेचे दडपण घेवून तो जगतो आहे. त्यातच असंघटीत असल्याने शोषण होत असूनही तो त्याविरूध्द आवाज उठवू शकत नाही.
असो,आजच्या जागतिक कामगार दिनानिमित्त अशा सर्व कुशल,अकुशल,संघटीत,असंघटीत,ब्ल्यू कॉलर व व्हाईट कॉलर कामगारांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
   ...... प्रल्हाद दुधाळ.