Sunday, March 18, 2018

स्मरण आईचे.

स्मरण आईचे.
१८ मार्च १९९४चा तो दिवस! माझी आई आजारी असल्यामुळे मी ऑफिसातून रजा घेऊन गावाकडेच मुक्कामी होतो.सहाच दिवसापूर्वी म्हणजे १२ तारखेला कॅंटोन्मेट टेलिफोन केंद्राचे फॅटेक्स इलेक्ट्रॉनिक केंद्रात परिवर्तन करण्यात आले होते. त्या केंद्राच्या बाह्य विभागातल्या तांत्रिक बाबींची जबाबदारी माझ्यावर असल्याने वरिष्ठांनी रजा देतानाच हे बजावले होते की गरज लागली तर लगेच कामावर यावे लागेल.
     त्या दिवशी सकाळीच गावाकडच्या एकमेव लॅंडलाईनवर साहेबांनी फोन केला व कामावर यायची विनंती केली. तशी आईची तब्बेत आज थोडी बरी होती त्यामुळे मी तिला पुण्याला जाऊ का विचारले." जा तू , आता मला बरं आहे.माझी काळजी करू नको " तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला. मी स्कूटरला किक मारली व पुणे गाठले. ऑफिसमधे खरचं माझी गरज होती. मी कामाला सुरूवात केली. पाच वाजेपर्यंत डोके वर काढायला वेळ झाला नाही. पाच वाजता टेबलावरचा फोन वाजला,फोनवर चुलत भाऊ होता. त्याने आई गेल्याचा निरोप दिला आणि माझ्या हातापायातले बळच गेले.कसबस स्वत:ला सावरलं आणि गाडी करून गाव गाठलं.
आयुष्यभर आपल्या मुलांसाठी जी माऊली हसमुखाने राब राब राबली, हाळीपाटी करून भाज्या विकल्या, लोकांच्या कुरड्या शेवया केल्या,गोधड्या शिवल्या, सुईण होऊन बाळंतपणे केली, अडल्या नडल्याना मदतीसाठी खंबीरपणे उभी राहीली, स्वत: शाळेचे तोंड पाहिले नव्हते पण आम्हा भावंडांनी शिकावे म्हणून आग्रह धरला त्या माझ्या आईच्या शेवटच्या प्रवासाचा साक्षीदार होण्यासाठी मी गावाला आलो.
      आज मागे वळून मी माझ्या जीवनाकडे बघतो तेव्हा माझ्या जीवनातल्या काही गोष्टींबद्दल माझे मलाच आश्चर्य वाटते. सामान्यपणे असे म्हटले जाते की माणसाचे घडणे वा बिघडणे हे तो कुणाच्या पोटी जन्माला आला, लहानपणी त्याचे पालनपोषण कोणत्या परिस्थितीत झाले,त्याचे मित्र कसे होते,त्याच्यावर शिक्षणाचे संस्कार करणारे गुरुजन कसे होते,याबरोबरच त्याची स्वत:ची बुध्दिमता आणि ग्रहणशक्ती यावर अवलंबून असते. माझ्या बाबतीत म्हणाल तर वर सांगितलेल्या बाबींपैकी बहुतांश बाबी या माझ्या जडणघडणीमधे प्रतिकूल परिणाम करू शकत होत्या अशा होत्या,तरीही मी जीवनात बिघडण्यापेक्षा घडलो ते माझ्या आईने माझ्यावर नकळत केलेल्या संस्कारांनी! माझी आई किंवा वडील कधी कोणत्या शाळेत गेलेले नव्हते. दोघेही अशिक्षित सहीच्या जागी डाव्या हाताचा निशाणी अंगठा उठवणारे होते. माझ्या एकूण सहा भावंडात मी शेंडेफळ होतो.मी हायस्कूल पर्यंत पोहोचेपर्यंत सगळी भावंडे आपल्या मार्गाने गाव सोडून गेलेली होती.माझे पालक अल्पभूधारक असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर काबाडकष्ट केल्याशिवाय कुटुंबात दोन वेळचे जेवण मिळायची मारामार होती.तशात होती नव्हती ती शेतीही सावकाराकडे गहाण पडलेली होती.अशा परिस्थितीत सत्तरच्या त्या दशकात, एका आडगावात राहून स्वत: अशिक्षित असूनही माझ्यासाठी शिक्षणाची स्वप्ने पहाणारे पालक लाभणे म्हणजे माझे थोर भाग्यच की!
    वडील तसे कायम आजारीच असायचे त्यामुळे घराचा सगळा डोलारा माझ्या आईच्या खांद्यावर उभा होता.मी आठवीत असताना वडीलांनी या जगाचा निरोप घेतला त्यानंतर तर तिच्या कष्टाला पारावार उरला नाही.मला आजही आठवते ती माझ्यासाठी सतत राबणारी आई.......
कोंबड आरवायच्या आधीच तिने घेतलेली असायची डोक्यावर माळव्याची पाटी,
चालत रहायची अनवाणी, नसायची अंधाराची अथवा विच्चूकाट्याची भीती
मनात एकच ध्यास  दिवस वर येण्यापूर्वी पाटीतला भाजीपाला खपायलाच हवा...
परत धा वाजता कुणाच्यातरी शेतावर मजुरीसाठी पोचायला हवं...
तिच्या त्या ढोर मेहनतीत  तिने पेरली होती माझ्या उज्वल भविष्याची स्वप्ने...
आज ना उद्या या घामावर  सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल!
जीवनात कधीच दिसली नाही हतबल,सदा धीरोदात्त,कायम हसतमुख...
तिचे ते अहोरात्र राबणे सतत देत होते मला माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव....
जर बदल हवा असेल तर बेट्या, तुझ्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आज सुखदु:खात कायम स्मरते  माझी सतत राबणारी प्रेरणादायी आई!

     समोर प्रचंड संकटे असताना तिने मला शिकायला स्वत:च्या पायावर उभे रहायला प्रोत्साहन दिले. बऱ्याचदा स्वत: उपाशी राहून कोंड्याचा मांडा करून मला पोटभर खायला दिले.....

ती कधी न पाहिली थकलेली, समस्येशी कुठल्या थबकलेली.
सुरकुतल्या हातात हत्तीच बळ आधार मोठा ती असता जवळ.
कोणत्याही प्रसंगी मागे ती सदा,निस्वार्थ सेवा वृत्तीने वागे सर्वदा.
माया ममता सेवा भरलेल ते गाव, सदा ओठी असु दे आई तुझे नाव!

 माझी आई पहाटे उठून जात्यावर धान्य दळायची. दळताना ती जात्यावर छान छान ओव्या रचून म्हणायची.मी भान हरपून त्या ओव्या ऐकत रहायचो....प्रत्येक ओवीत तिने माझ्या भविष्याचे स्वप्न पेरलेलं असायचं!

अवसेची जाईल रात उगवेल तो चंद्र पुन्हा,बुक वाचतो माझा राजा, बैरीस्तर माझा कान्हा!
लेक चालला साळला संगे दिलीय भाकरी, साहेबावानी आहे त्याची मोठ्या पैक्याची नोकरी!
मला वाटते पुढे जीवनात मला चारोळ्या,कविता,कथा,लेख,लिहिण्यावाचनाची आवड निर्माण झाली ती आईने लहानपणी केलेल्या या संस्कारांमुळेच!
तिने आपल्या वागण्या बोलण्यातून मला सतत काही ना काही शिकवण दिली..
कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी आपल्या स्वाभिमानाशी इमान राखायचे.
उगाच हवेत इमले न बांधता कायम वास्तवात जगायचे.
जीवनात ऐश्वर्य आले म्हणून माजायाचे नाही,गरीबीला लाजायचे नाही.
अन्याय सहन करायचा नाही, स्वार्थासाठी कोणालाही फसवायचं नाही.
आपण चांगले वागलो तर आपल्याशीही लोक चांगलेच वागतात.
आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले की त्याचे चांगले फळ मिळतेच मिळते,
मोठी स्वप्ने बघायची पण नेहमी अंथरून पाहून पाय पसरायचे.
व्यसनाने आयुष्याचं वाटोळे होते त्यामुळे कधीही कोणतेच व्यसन करायचे नाही.
   मी आयुष्यभर तिची ती शिकवण जशी जमेल तशी आचरणात आणत राहिलो. हायस्कूल आणि कॉलेजला असताना अनेक व्यसनी मित्रांच्यात राहूनही मला कधी त्यांच्यासारखे वागायचा मोह झाला नाही.आयुष्यात वाममार्गाने पैसा कमावण्याच्या अनेक संधी समोर हात जोडून उभ्या होत्या; पण त्या आडवाटेने जाण्याचा मोह कधीच झाला नाही.कुणी याला माझा वेडेपणा म्हणून मला हिणवले;पण ज्या गोष्टीवर माझा नैतिक अधिकार नव्हता’अशा कोणत्याच गोष्टीचा मला कधी मोह झाला नाही.माझ्या तोंडी कधीही कुणासाठीही अरेतुरेची भाषा नसते.कुणी माझ्याशी वाईट वागले तरी मी कुणाबद्दलही आकस बाळगत नाही.कुणी माझा रस्ता आडवला तर मी आपली एनर्जी तेथे वाया न घालवता आपला रस्ता बदलण्याचा प्रयत्न करतो.
“ऐसी जगह बैठिये-कोई ना बोले उठ, ऐसी बात कहिये-कोई ना बोले झूठ!” हे माझे जगण्याचे तत्व माझ्या आईच्या संस्कारांचा परिपाक आहे असे मी मानतो! मी जीवनात यशस्वी आहे की नाही माहित नाही;पण आनंदी नक्कीच आहे आणि याबद्दल मी त्या सर्वशक्तीमान निर्मिकाचा कायमच आभारी आहे.
     आज अठरा मार्च ; माझ्या आईचा चोवीसावा स्मृतीदिन आहे.ती मला सोडून गेली त्याला एवढी वर्षे झाली:पण आजही माझ्या जीवनावर माझ्या आईचा प्रचंड प्रभाव आहे.
    अडचणी आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्या अडचणींचे संधीत रूपांतर करून त्यावर स्वार व्हायचे बाळकडू मला माझ्या आईकडून मिळालेले आहे आणि त्याच्या जोरावर माझी मार्गक्रमणा सतत प्रगतीच्या दिशेने चालू आहे, आणि अशीच चालू राहील.
  माझ्या पूज्य आईला तिच्या चोविसाव्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!!!

     ...... प्रल्हाद दुधाळ .

Thursday, March 15, 2018

"माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी स्त्री"


 "माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी स्त्री"
        आज आठ मार्च जागतिक महिला दिन.या निमित्ताने माझ्या जडणघडणीतल्या प्रभावी महिला कोण आहेत यावर जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा काही मोजकीच नावे डोळ्यांसमोर आली.त्यात तिसऱ्या क्रमांकावर नाव होते ते स्वत:चा मुलगा समजून आपल्या मांडीवर बसवून माझा हात पकडून पहिल्यांदा क ख ग शिकवणाऱ्या माझ्या पहिलीच्या शिक्षिका कुचेकरबाई यांचे! मग आठवली ती माझ्यावर संस्कार करणारी माझ्यापेक्षा सातेक वर्षानी मोठी असलेली माझी ताई! अजून  पुढे आठवण्याचा प्रयत्न केल्यावर आठवल्या काही वर्गमैत्रिणी,ज्यांच्याबरोबर निकोप स्पर्धा केल्यामुळे मला अभ्यासाची व वाचनाची गोडी लागली! मग आठवल्या पहिल्यांदा नोकरी लागल्यावर कार्यालयातल्या माझ्या पहिल्या सुपरवायझर महाडिकबाई ज्यांच्याकडून मी खऱ्या अर्थाने शहरी पांढरपेशा वर्गात कसे वागायचे,कसे बोलायचे,याबरोबरच आपली नोकरी प्रामाणिकपणे व पूर्ण कार्यक्षमतेने कशी करायची हे शिकलो! दुसऱ्या क्रमांकार नाव घ्यावे लागेल माझी अर्धांगिनी-स्मिताचे जी गेली तेहतीस वर्षे माझ्या सुखदु:खात सतत साथ निभावते आहे!या सगळ्या झाल्या नंतरच्या गोष्टी;पण माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव जर कुणाचा असेल तर तो माझ्या आईचा!     
       आज मागे वळून मी माझ्या जीवनाकडे बघतो तेव्हा माझ्या जीवनातल्या काही गोष्टींबद्दल माझे मलाच आश्चर्य वाटते. सामान्यपणे असे म्हटले जाते की माणसाचे घडणे वा बिघडणे हे तो कुणाच्या पोटी जन्माला आला, लहानपणी त्याचे पालनपोषण कोणत्या परिस्थितीत झाले,त्याचे मित्र कसे होते,त्याच्यावर शिक्षणाचे संस्कार करणारे गुरुजन कसे होते,याबरोबरच त्याची स्वत:ची बुध्दिमता आणि ग्रहणशक्ती यावर अवलंबून असते. माझ्या बाबतीत म्हणाल तर वर सांगितलेल्या बाबींपैकी बहुतांश बाबी या माझ्या जडणघडणीमधे प्रतिकूल परिणाम करू शकत होत्या अशा होत्या,तरीही मी जीवनात बिघडण्यापेक्षा घडलो ते माझ्या आईने माझ्यावर नकळत केलेल्या संस्कारांनी! माझी आई किंवा वडील कधी कोणत्या शाळेत गेलेले नव्हते. दोघेही अशिक्षित सहीच्या जागी डाव्या हाताचा निशाणी अंगठा उठवणारे होते. माझ्या एकूण सहा भावंडात मी शेंडेफळ होतो.मी हायस्कूल पर्यंत पोहोचेपर्यंत सगळी भावंडे आपल्या मार्गाने गाव सोडून गेलेली होती.माझे पालक अल्पभूधारक असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर काबाडकष्ट केल्याशिवाय कुटुंबात दोन वेळचे जेवण मिळायची मारामार होती.तशात बहिणीच्या लग्नासाठी होती नव्हती ती शेतीही सावकाराकडे गहाण पडलेली होती.अशा परिस्थितीत सत्तरच्या त्या दशकात, एका आडगावात राहून स्वत: अशिक्षित असूनही माझ्यासाठी शिक्षणाची स्वप्ने पहाणारे पालक लाभणे म्हणजे माझे थोर भाग्यच की!
    वडील तसे कायम आजारीच असायचे त्यामुळे घराचा सगळा डोलारा माझ्या आईच्या खांद्यावर उभा होता.मी आठवीत असताना वडीलांनी या जगाचा निरोप घेतला त्यानंतर तर तिच्या कष्टाला पारावार उरला नाही.मला आजही आठवते ती माझ्यासाठी सतत राबणारी आई....
कोंबड आरवायच्या आधीच तिने घेतलेली असायची डोक्यावर माळव्याची पाटी,
चालत रहायची अनवाणी, नसायची अंधाराची अथवा विच्चूकाट्याची भीती 
मनात एकच ध्यास  दिवस वर येण्यापूर्वी पाटीतला भाजीपाला खपायलाच हवा... 
परत धा वाजता कुणाच्यातरी शेतावर मजुरीसाठी पोचायला हवं... 
तिच्या त्या ढोर मेहनतीत  तिने पेरली होती माझ्या उज्वल भविष्याची स्वप्ने... 
आज ना उद्या या घामावर  सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल!
जीवनात कधीच दिसली नाही हतबल,सदा धीरोदात्त,कायम हसतमुख...
तिचे ते अहोरात्र राबणे सतत देत होते मला माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव....
जर बदल हवा असेल तर बेट्या, तुझ्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही 
आज सुखदु:खात कायम स्मरते  माझी सतत राबणारी प्रेरणादायी आई! 
समोर प्रचंड संकटे असताना तिने मला शिकायला स्वत:च्या पायावर उभे रहायला प्रोत्साहन दिले. बऱ्याचदास्वत: उपाशी राहून कोंड्याचा मांडा करून मला पोटभर खायला दिले.....
ती कधी न पाहिली थकलेली, समस्येशी कुठल्या थबकलेली.
सुरकुतल्या हातात हत्तीच बळ आधार मोठा ती असता जवळ.
कोणत्याही प्रसंगी मागे ती सदा,निस्वार्थ सेवा वृत्तीने वागे सर्वदा. 
माया ममता सेवा भरलेल ते गाव, सदा ओठी असु दे आई तुझे नाव!
 माझी आई पहाटे उठून जात्यावर धान्य दळायची. दळताना ती छान जात्यावरच्या ओव्या म्हणायची.मी भान हरपून त्या ओव्या ऐकत रहायचो....प्रत्येक ओवीत तिने माझ्या भविष्याचे स्वप्न पेरलेलं असायचं!
अवसेची जाईल रात उगवेल तो चंद्र पुन्हा,बुक वाचतो माझा राजा, बैरीस्तर माझा कान्हा!
लेक चालला साळला संगे दिलीय भाकरी, साहेबावानी आहे त्याची मोठ्या पैक्याची नोकरी!
मला वाटते पुढे जीवनात मला चारोळ्या,कविता,कथा,लेख,लिहिण्यावाचनाची आवड निर्माण झाली ती आईने लहानपणी केलेल्या या संस्कारांमुळेच!
तिने आपल्या वागण्या बोलण्यातून मला सतत काही ना काही शिकवण दिली..
कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी आपल्या स्वाभिमानाशी इमान राखायचे.
उगाच हवेत इमले न बांधता कायम वास्तवात जगायचे.
जीवनात ऐश्वर्य आले म्हणून माजायाचे नाही,गरीबीला लाजायचे नाही.
अन्याय सहन करायचा नाही, स्वार्थासाठी कोणालाही फसवायचं नाही.
आपण चांगले वागलो तर आपल्याशीही लोक चांगलेच वागतात.
आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले की त्याचे चांगले फळ मिळतेच मिळते,
मोठी स्वप्ने बघायची पण नेहमी अंथरून पाहून पाय पसरायचे.
व्यसनाने आयुष्याचं वाटोळे होते त्यामुळे कधीही कोणतेच व्यसन करायचे नाही.
   मी आयुष्यभर तिची ती शिकवण जशी जमेल तशी आचरणात आणत राहिलो. हायस्कूल आणि कॉलेजला असताना अनेक व्यसनी मित्रांच्यात राहूनही मला कधी त्यांच्यासारखे वागायचा मोह झाला नाही.आयुष्यात वाममार्गाने पैसा कमावण्याच्या अनेक संधी समोर हात जोडून उभ्या होत्या; पण त्या आडवाटेने जाण्याचा मोह कधीच झाला नाही.कुणी याला माझा वेडेपणा म्हणून मला हिणवले;पण ज्या गोष्टीवर माझा नैतिक अधिकार नव्हता’अशा कोणत्याच गोष्टीचा मला कधी मोह झाला नाही.माझ्या तोंडी कधीही कुणासाठीही अरेतुरेची भाषा नसते.कुणी माझ्याशी वाईट वागले तरी मी कुणाबद्दलही आकस बाळगत नाही.कुणी माझा रस्ता आडवला तर मी आपली एनर्जी तेथे वाया न घालवता आपला रस्ता बदलण्याचा प्रयत्न करतो.
“ऐसी जगह बैठिये-कोई ना बोले उठ, ऐसी बात कहिये-कोई ना बोले झूठ!” हे माझे जगण्याचे तत्व माझ्या आईच्या संस्कारांचा परिपाक आहे असे मी मानतो! मी यशस्वी आहे की नाही माहित नाही;पण आनंदी नक्कीच आहे आणि याबद्दल मी त्या सर्वशक्तीमान निर्मिकाचा कायमच आभारी आहे.
     येणारा अठरा मार्च हा दिवस माझ्या आईचा पंचविसावा स्मृतीदिन आहे.ती मला सोडून गेली त्याला एवढी वर्षे झाली:पण आजही माझ्या जीवनावर माझ्या आईचा प्रचंड प्रभाव आहे.
    अडचणी आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्या अडचणींचे संधीत रूपांतर करून त्यावर स्वार व्हायचे बाळकडू मला माझ्या आईकडून मिळालेले आहे आणि त्याच्या जोरावर माझी मार्गक्रमणा सतत प्रगतीच्या दिशेने चालू आहे, आणि अशीच चालू राहील.  
     ...... प्रल्हाद दुधाळ .
         ( ८ मार्च २०१८)     

Saturday, March 3, 2018

सोशलमिडीया- दुधारी तलवार.


सोशलमिडीया- दुधारी तलवार.

     सोशलमिडीया म्हणजे खरे तर आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला दिलेले एक महत्वाचे वरदान आहे.आयुष्याच्या विविध टप्प्यावर भेटलेली पण पुढे जगण्याची लढाई लढताना गर्दीत हरवलेली माणसे या मिडीयाने पुन्हा आभासीरूपाने का होईना पण पुन्हा संपर्कात आली.सुखदु:खे शेअर करू लागली.
साहित्यिक कलाकारांना आपले कलागुण सादर करायला मीडियामुळे एक सशक्त व्यासपीठ मिळाले.आपल्या कोंडलेल्या भावनांना व्यक्त करायला इथे हक्काचे ठिकाण मिळाले. सकारात्मक विचारांची,माहितीची देवाणघेवाण करणारे अनेक समूह (उदा. कुबेर समूह, कुबेरफौंडेशन, मकस ई.) सोशल मेडीयाच्या माध्यमातून उदयाला आले आणि समाज जागृती व इत्तर रचनात्मक कामे करू लागले.या मेडीयाने अनेकांना आपल्या व्यवसाय धंद्याची जाहिरात करायला, आपल्या मनात आलेले विचार तत्क्षणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक साधन दिले.एकूणच व्यक्तीला व्यक्त होणे सोपे झाले. सोशल मिडियाचे काही सकारात्मक उपयोग होत असले तरी दुसऱ्या बाजूला काही धर्मांध/जात्यांध लोक आपल्या व काही विशिष्ट गटाच्या स्वार्थासाठी समाजात धर्मभेद व जातीभेदाचे विष पेरण्यासाठी,माणसामाणसात तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मिडीयाचा अंधाधुंद वापर करू लागले.अफवा पसरविण्यासाठी या माध्यमाचा सर्रास वापर वाढला.सांस्कृतिक प्रदूषण वाढवण्यासाठीही सोशल मिडीयाचा उपयोग होवू लागला.विद्यार्थी अभ्यास सोडून सोशल मिडीयावर पडीक राहू लागले.नको त्या गोष्टी नको त्या वयात उपलब्ध झाल्या. जोडीदाराबद्दल गैरसमज वाढून सहजीवनात कटूता येण्याचे प्रकार मिडीयावरील अतिरेकी वावरामुळे वाढले. लोक आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू लागले.आभासी मिडीयावर हजारो मित्रमैत्रिणी असणारी माणसे या मिडीयाच्या अतिरेकी वापरामुळे वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटी व निराशाग्रस्त दिसत आहेत.मानसिक रोग वाढत आहेत. सोशल मिडियाचे भयंकर दुष्परिणाम आता समोर दिसू लागले आहेत.
ही दुधारी तलवार योग्य प्रकारे वापरली नाही तर नक्कीच माणसे या तलवारीने आत्मघात करून घेवू शकतात याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी.अनिर्बंध असलेला हा मिडीया नीट वापरला नाही तर त्याचे भयंकर परिणाम या व यानंतरच्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागणार आहेत
     सोशल मिडीयाचा वापर करताना प्रत्येकाने काही पथ्ये पाळणे आवश्यक झाले आहे.यासंबंधी सर्वांनी जागृत व्हायला हवे आणि मिडीयाच्या नकारात्मक व सकारात्मक परिणामाबद्दलचे प्रबोधन घरोघरी करायला हवे. प्रत्येकाने मनोमन ठरवणे आवश्यक आहे की ....
१.मी फक्त मनोरंजन,ज्ञानवर्धन,विचारविमर्श,मार्गदर्शन,लेखन,वाचन अशा रचनात्मक बाबीसाठीच सोशल मिडीयाचा वापर करेन.मिडीयाचा वापर मी अगदी मर्यादित स्वरूपात करेन.सोशल मिडियाचे मला व्यसन लागू नये याबाबत दक्षता घेईन तसेच माझ्या कार्यक्षमतेवर अथवा कौटूंबिक जीवनावर या मीडियामुळे प्रतिकूल परिणाम तर होत नाही ना या बाबतीत मी सदैव जागरूक असेन.
२.मी सोशल मिडीयावर फक्त सकारात्मक पोस्ट्सचा प्रसार करेन.
३.कुठल्याही प्रकारच्या द्वेषमुलक पोस्ट्स मी वाचणार नाही,लिहिणार नाही वा फौरवर्ड करणार नाही. धर्म वा जातीवाचक लिखाण,अश्लील लिखाण वा चित्रे माझ्याकडून प्रसारित होणार नाहीत याबाबतीत मी दक्षता घेईल.
४. जेथे समाजात तेढ निर्माण केली जाते द्वेष पसरवला जातो अशा मिडीयावरील कोणत्याही समुहाचा मी सदस्य होणार नाही वा तशा गोष्टीत भाग घेणार नाही.
५. सोशल मिडीया ही दुधारी तलवार आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे त्याचा योग्य आणि मर्यादित वापर व्हावा म्हणून मी माझे मित्र व कुटुंबीय यांचे प्रबोधन करत राहील.
.... प्रल्हाद दुधाळ.


Monday, February 19, 2018

लेखकांच्या व्यथा.

लेखकांच्या व्यथा.
                   लेखणीत एवढी ताकद असते की सर्व शक्तीमान सत्ताही लेखनी उलथवू शकते.खरच आहे ते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधे वृत्तपत्रानी ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्यात सिहांचा वाटा उचलला. ब्रिटीश सत्तेविरूध्द असंतोष पसरविण्याचे महत्वाचे काम लोकमान्य टिळक,महात्मा गांधी यानी आपल्या अग्रलेखातुन केले.स्वातंत्र्य लढ्यात लोकानी स्वत:ला झोकून दिले अनेक स्वातंत्र्य सैनिकानी चलेजाव आंदोलनात उडी घेवून हौतात्म्य पत्करले. भारत स्वतंत्र झाला . लेखणी काय करू शकते याचे हे उदाहरण. अनेक लेखकानी आपल्या लेखनातुन सामाजिक क्रांतीचे महत्व जनतेपर्यंत पोहोचवले. सामान्य माणसापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यात लेखकानी अहम भुमिका निभावली.अनेक लेखक कवी आपल्या लेख कविता कथा कादंबर्या इत्यादि विविध प्रकारचे साहित्य निर्माण करून समाजाचे प्रबोधन व मनोरंजन करत असतात. पण लेखक म्हणजे शेवटी एक माणूसच आहे त्याच्याही समाजांच्या विविध घटकांकडून काही अपेक्षा असू शकतात लेखक म्हणून त्यांच्याही काही व्यथा असू शकतात नाही का?मी या क्षेत्रात अगदीच नवखा आहे पण जेंव्हा लेखकांच्या व्यथांचा मी जेंव्हा विचार केला तेंव्हा काही समस्या माझ्या अल्पअनुभवाने लिहाव्या वाटल्या त्या येथे मांडतों ...
            लेखकाच्या अनेक व्यथांपैकी प्रमुख व्यथा म्हणजे लोकांचे वाचन कमी कमी होत चालले आहे. टीव्ही चॅनल्स,फेसबूक ट्वीटर व वॉट्स ॲप सारख्या सोशल नेटवर्क साइट्समुळे उथळ लिखानाचा सुळसुळाट झाला आहे व सकस व अभ्यासपूर्ण वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. दुसरी समस्या अशी की ,जे काही लिहिले जातेय ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य प्रकाशक करत असतात पण या प्रकाशन व्यवसायाचे व्यापारीकरण झाले असल्याने जे लेखक नामांकित व प्रस्थ्यापित आहेत त्यांचेच साहित्य प्रकाशित केले जाते आहे. जे विकण्याची खात्री आहे तेच छापले जाते आहे . नवे साहित्यिक प्रयोग तसेच उदयोन्मुख लेखकाना काही हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या प्रकाशकांचा अपवाद वगळता प्रकाशक संधी द्यायचे टाळताना दिसतात. नव्या लेखकाना आपले लेखन वाचकांपर्यंत पोहोचावे असे वाटते. काही नवसाहित्यिकाना मार्गदर्शन हवे असते पण प्रस्थ्यापित लेखक व कवी अशा नवसाहित्यिकाना जवळ फिरकू देत नाहीत.मग असे बरेच साहित्यिक नाऊमेद होतात व लिखाण सोडून देतात. काही नवोदित मात्र फेसबूक ट्वीटर वा वॉट्स ॲप इत्यादिच्या माध्यमातुन आपली लिखाणाची हौस भागवताना दिसतात.लेखकाची अजून एक व्यथा म्हणजे साहित्य मंडळा मधील कंपूशाही. विविध पातळ्यांवर अशी कंपूशाही आढळते. प्रदेश,जात,धर्म, लिंग अशा विविध निकषावर साहित्यिकाचे व त्याच्या लिखाणाचे मूल्यांकन होत असते. प्रस्थ्यापित साहित्यिक सगळेच वाईट आहेत असे मला मुळीच म्हणायचे नाही ,तेथेही काही चांगली माणसे आहेत म्हणून तर काही प्रमाणात नविन साहित्यिक उदयाला येताना दिसताहेत पण अशा वृत्ती क्रियाशील आहेत हे नक्की.साहित्य परीषदे सारख्या संस्थ्येत नवोदित लेखकांसाठी काही ठोस होताना दिसत नाही.काव्य हा साहित्य प्रकार दुर्लक्षित होतो आहे ही अजुन एक व्यथा आहे. साहित्य सम्मेलनातही कवी व कवितेकडे दुर्लक्ष केले जाते.नुकत्याच झालेल्या पिंपवड साहित्य सम्मेलनात कविकट्टा सभागृह याचे ताजे उदाहरण आहे. इत्तर साहित्य प्रकार आलिशान सभागृहात सादर होत होते. मूठभर निमंत्रित कवि याच सभागृहात कविता सादर करीत होते पण नवोदितांच्या कवीकट्ट्याची अवस्थ्या अगदी केविलवाणी होती! तेथे एकदम ढिसाळ व्यवस्थ्या होती. मान्य आहे सध्या कवी व कवितांचे उदंड पिक येते आहे पण अशा उदंड पिकातुनच सकस लिखाण करणारे साहित्यिक तयार होऊ शकतात! पण हे लक्षात कोण घेणार ?
प्रल्हाद दुधाळ (९४२३०१२०२०)

Tuesday, February 13, 2018

आठवणीतली महाशिवरात्री....

आठवणीतली महाशिवरात्री....
माझ्या लहानपणी गावाकडे महाशिवरात्री जोरात साजरी व्हायची. गावाच्या वायव्येस रूद्रगंगेच्या काठी सिध्देश्वराचं एक पुरातन मंदिर होते.गोळे असे आडनाव असलेल्या ब्राम्हण कुटुंबाकडे या मंदिराचे पौराहित्य होतं.मंदिराभोवती या गोळे यांच्या वहिवाटीत असलेली हिरवीगार शेती होती.त्या काळी या शेतातली डाळींबबाग, मंदिराच्या आवारातली फुलांनी बहरलेली चाफ्याची झाडे. बाजूच्या शेतातील या सिझनला मोहरांनी लगडलेली आंब्याची झाडे, मंदिराभोवतीची जुन्या किंग साईझ भाजक्या विटात व चुन्यात बांधकाम केलेली पक्की भींत, छोटेखानी सुंदर मंदिर, त्यासमोर बसलेला नंदी आणि गाभाऱ्यातली महादेवाची पिंड या सगळ्या गोष्टी इतक्या वर्षांनी सुध्दा आठवणींत ताज्या आहेत.
असं म्हटलं जातं की हे पांडवकालीन मंदिर होते पुढे पेशवे कालात त्याचा जिर्णोध्दार झाला असावा.
माझ्या लहानपणी या सिध्देश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रीचा सण अत्यंत उत्साहाने साजरा व्हायचा.अख्खे गांव शंभो महादेवाच्या दर्शनाला जमायचे. भल्या पहाटे अभिषेक पुजा व्हायची. गावकरी पिंडीवर वाहण्यासाठी बेल, फुले, आंब्याचा मोहोर,फळे, दुध,दही व उपवासाचे पदार्थ आणायचे.एरवी रिकामा असलेला मंदिर परीसर माणसांनी गजबजून जायचा.
गावातल्या लहान थोरांना त्या दिवशी उपवास असायचा.आठवणीतला तो पवित्र महाशिवरात्रीचा सण मी आजही जपला आहे....
आता ते जुने मंदिर इतिहास जमा झाले आहे. शेताच्या मध्यभागी असलेल्या सिद्धेश्वराला बांधावर एक छोटीशी खोली बांधून स्थलांतरित केले आहे.असे का केले गेले या बाबतीत लोकांमधे खूप विविध व विचित्र चर्चा आहेत.कुणी म्हणत गुप्तधनाच्या लोभापायी व त्या धनाच्या शोधासाठी ते जुने मंदिर जमीनदोस्त केले गेले , खर खोट त्या शंभूदेवालाच माहीत! एरवी अगदीच शुकशुकाट असलेल्या या मंदिरात सोमवार महाशिवरात्रीला शिवभक्त आवर्जून भेट देतात."हर हर महादेव" चा गजर अजुनही तेथे होतो; पण काहीतरी हरवलं आहे! आठवणीतली ती पावित्र्याची दरवळ जाणवत नाही.....
" हर ssहर ssमहादेव!"
महाशिवरात्री च्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा ..भोले बाबा सर्व मित्रांच्या मनोकामना पूर्ण करो...जय शिव शंकर ..
..... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, January 11, 2018

राष्ट्रीय युवा दिन

राष्ट्रीय युवा दिन ....एक विचार मंथन..... 
आजचा युवक ....? 
एक सर्वसाधारण मत.....बेजबाबदार......दिशाहीन..... .....भरकटलेला...संवेदनशून्य.... 
खरच आहे का असे?
मला विचाराल तर ....
.....साफ खोट आहे ते ....
आहे तो जबाबदार..संवेदनशील!
....थोडाफार बिनधास्तही......प्रचंड वेगाचं आकर्षण आहे त्याला!
तो आहे स्पष्टवक्ता मनात आलेलं ठोकून देणारा...
उगाच कुणाची भीडभाड नाही ठेवत तो!
त्याच्यासमोर उभी आहे.....अस्तित्वाची लढाई.....प्रचंड जीवघेण्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करायचंय त्याला!
.......नक्कीच दमछाक होतेय त्याची!
....अशा भयंकर शर्यतीत या,..... अस्तित्वाच्या!
...त्याला निश्चित माहीत आहे ....
जागतिकीकरणाच्या रेट्यात....मुक्त स्पर्धेच्या युगात ........त्याला जीव घेऊन पळायलाच हवं....काही पर्यायच नाहीये!
....कारण .... थांबला तो संपला!
त्याला आहे जाणीव ....पालकांनी त्याच्या भविष्यासाठी केलेल्या कष्टाची...वेळ पडली तर स्वत:च्या पोटाला चिमटा घेवून आपल्या मुलांसाठी पाहिलेल्या स्वप्नांची....
...त्याच्यावर आलेल्या जबाबदारीची...
तो पेलतोय ती जबाबदारी
पण .....पण ....तो दबून गेलाय ...
मान्य आहे .....
.....त्याच्यासमोर नाहीच प्रश्न ...स्वातंत्र्याचा ....अन्न, वस्र वा निवाऱ्याचा......
हेसुध्दा कबूल आहे .....तुम्हाला खूप सोसायला लागलं होत ....
त्यावेळी ...
...तुमच्यासमोरच्या समस्या वेगळ्या होत्या ....
आता त्याचे प्रश्न वेगळे आहेत ...
काळाप्रमाणे ......त्याची लढाई आहे वेगळीच ....
जे मिळाले आहे ते टिकवण्याची .... अधिकाधिक मिळवण्याची.....
हरवतोय तो या गोंधळात .......
थकतोय कधी लढताना ही लढाई......
कधी येते आहे त्याला नैराश्य.....
भावनाशुन्य असल्यासारखा तो दिसतोय कधी कधी ....
त्याला त्याची सहनशक्ती कमी पडतेय!
....गोंधळ होतोय त्याचा,तोल सावरताना ......
माणूसच आहे ना तो शेवटी, ....हाडामासाचा!
...पण निश्चितच तो, घेऊन आलाय ....प्रचंड उर्जा ....आधुनिक तंत्रज्ञान.....आपल्या आयुष्याबद्दलची व्हिजन!
नका त्याला अजमावू असे संकुचित दृष्टीकोनातून ....
...नाहीच तोलता येणार त्याला .......पारंपारिक तोकड्या तराजूत!.........
त्यासाठी तेव्हढा मोठा आवाकाही असायला हवा....
.....नाहीच जोखता येणार त्याला....... पारंपारिक नजरेतून.......मन विशाल हव त्यासाठी!
....त्याच्या प्रचंड अपेक्षा व उद्दिष्टे साध्य होण्यासाठी, स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी.....
त्याच्या पंखांना तुमच्याकडून बळ हवंय.......
...गरज असेल तेथे त्याला हवे आहेत धीराचे दोन शब्द.....
तर ........मिळालेल्या प्रत्येक यशाच्या क्षणी त्याला हवीय ...
तुमच्याकडून पाठीवर शाबासकीची थाप!............
.....कधी पडलाच चुकून कमकुवत या लढाईत .....
.....तर आधाराचा हवाय हात .....
.....पुन्हा नव्याने भरारीसाठी ........
प्रोत्साहनाचा एक शब्द हवा......
" पुन्हा लढ, मी तुझ्या पाठीशी आहे!"
....समजून घेवूया ....या प्रचंड उर्जास्रोताला!
जाणून घेवूया ..........आजच्या युवामनाला!
.......एका नव्या नजरेने!
राष्ट्रीय युवक दिनाच्या हार्दिक शुभेच्या...
.......................................प्रल्हाद दुधाळ.

Saturday, November 18, 2017

ड्रायव्हर....

ड्रायव्हर....
शिंगटेआण्णा म्हणजे अफलातून माणूस! हवाई दलात शिपाई म्हणून पंधरा वर्षाची नोकरी करून आण्णा रिटायर झाला आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीमधे ड्रायव्हर म्हणून सरकारी खात्यात चिकटला.
सगळ्याच सरकारी खात्यात मुख्य अधिकाऱ्यांच्या ड्रायव्हरचा फारच रूबाब असतो. अधिकारी कधीच त्याच्या ड्रायव्हरला दुखावत नाही, त्याची बरीच कारणे असतात! त्यातले महत्वाचे कारण असते ते म्हणजे साहेब दिवसभरात कुठे कुठे फिरला, कुणाकुणाला भेटला हे सगळ फक्त त्याच्या ड्रायव्हरलाच माहीत असते आणि त्यातली काही ठिकाणे साहेबाला कुणाला समजू द्यायची नसतात! आपली गुपिते ड्रायव्हरने कुणाला सांगू नयेत म्हणून मग साहेब लोक आपल्या ड्रायव्हरला खूप जपतात, विश्वासात घेतात! साहेबाची अशी बरीच खाजगी गुपिते ड्रायव्हर स्वत:जवळ बाळगत असल्यामुळे साहेब लोक आपल्या ड्रायव्हरला वचकून असतात.
तर आपला हा शिंगटेआण्णाही अशाच एका बड्या अधिकाऱ्याच्या दिमतीला ड्रायव्हर म्हणून काम करायचा. साहेबाचा जवळचा माणूस म्हणून त्याला अख्ख्या खात्यात सगळे टरकून असायचे.मुळात आण्णा दिसायला एकदम गोरागोमटा होता शिवाय एक्स सर्व्हीसमन असल्याने त्याचे राहणीमान कडक होते.दररोज गुळगुळीत दाढी करून कडक इस्त्रीचा सफारी घातलेल्या आण्णाची छाप समोरच्या माणसावर अशी काही पडायची की कधीकधी साहेबच याचा ड्रायव्हर असावा असे वाटायचे!
एकदा काय झालं, दिल्लीच्या मुख्य कार्यालयातून एक व्हीआयपी अधिकारी इन्स्पेक्शनसाठी पुण्याला यायचा होता.या बड्या अधिकाऱ्याला रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करून हॉटेलवर घेवून जायची सूचना साहेबाला मिळाली.ठरलेल्या वेळी शिंगटे आण्णाला घेवून साहेब रेल्वे स्टेशनवर पोहोचले. आण्णाने आज नवीन सफारी घातला होता. 
फलाटावर आण्णा पुढे आणि साहेब मागे असे उभे राहिले.साहेबाच्या हातातला त्या बड्या अधिकाऱ्यासाठी बनवलेला स्वागतफलक आपल्या हातात घ्यायला हवा हे आण्णा विसरून गेला. 
गाडी फलाटावर आली. तो बडा अधिकारी फलाटावर उतरला.आल्या आल्या त्याने कडक सफारीतल्या आण्णाशी हस्तांदोलन केले.आपली व्हीआयपी सुटकेस त्या अधिकाऱ्याने आण्णाच्या साहेबाच्या हातात दिली! हे एवढे पटकन झाले की साहेबाला काही बोलायचे सुचलेच नाही.आण्णाने साहेबाच्या हातातली सुटकेस पटकन काढून घेतली आणि स्टेशनबाहेरच्या गाडीत ड्रायव्हरसीटवर जावून बसला!
दोन्ही अधिकारी कानकोंडे होत काही न बोलता गाडीत येवून बसले.
आण्णाने साहेबाच्या तोंडाकडे बघायचे टाळत हॉटेलकडे गाडी पिटाळली. 
दुसऱ्या दिवशी साहेबाने आण्णाला यापुढे दररोज खाकी युनिफॉर्म घालायचा आदेशच काढला!
...... प्रल्हाद दुधाळ.