Wednesday, August 21, 2013

मन:शांतीसाठी.


 मन:शांतीसाठी.

 आजकाल धावपळीच्या युगात माणसाने आपले मन:स्वास्थ्य गमावले आहे.मन:शांतीसाठी मंदिरे व वेगवेगळ्या आध्यात्मिक गुरूंचे आश्रम धुंडाळले जात आहेत.त्यातून काहीच हाती लागत नाही आणि माणूस हळूहळू निराशेच्या गर्तेत लोटला जात आहे.
  खर तर “तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी!”
 या उक्तीप्रमाणे मन:शांतीसाठी माणूस इकडे तिकडे विनाकारण फिरत आहे असे करण्याची गरज नाही. मन:शांती साठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून काही सवयी सोडल्या व काही सवयी अंगीकारल्या तर सुख आणि मन:शांती लाभणे फार दूर नाही. यासाठी काही सुचना - 

१.तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत कार्यवाही करताना भूतकाळातील कुणालातरी आलेला अनुभव अथवा अपयशाची भीती यांचा विचार प्रथम करता, ही सवय सोडा. यश मिळणारच आहे असा सकारात्मक विचार करून केलेले काम नेहमी यशाच्या जवळ घेऊन जाते.तुमचा अनुभव हा तुमचा गुरु  असतो.आत्मविश्वासाने केलेले काम नेहमी मन:शांतीचे कारण असते.

 २.तुम्ही समोरच्या व्यक्ती बद्दल बऱ्याचदा पूर्वगृह मनात बाळगून वागता किंवा बोलता अशा तर्क करण्याच्या स्वभावामुळे आपली मन:शांती तुम्ही गमावलेली असते. तेंव्हा मोकळ्या मनाने स्वत:शी व  इत्तरांशी मुक्तपणाने संवाद साधा.

३.तुम्ही कोणतातरी न्यूनगंड बाळगत आयुष्य जगात असता एक लक्षात घ्या तुम्ही जसे आहात तसे समाजाला आत्मविश्वासाने सामोरे जा.स्वत:वर विश्वास ठेऊन केलेल्या कामातून निश्चितच आंतरिक समाधान मिळते

४.आजूबाजूच्या व्यक्ती तुमच्याबरोबर ज्या प्रकारे बोलतात किंवा वागतात त्याचा तुम्ही तुमच्या  मर्जीप्रमाणे अन्वयार्थ लावता व विनाकारण मनस्ताप करून घेता. हे समजून चला की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे.समोरच्याच्या वागण्याचा अर्थ लावण्यापूर्वी त्याच्या जागी स्वत:ला ठेऊन बघा,त्याची  बाजूही समजून घ्या. गैरसमज नेहमीच मनस्वास्थ्य बिघडवतात.

५.कुठल्याही गोष्टी बद्दल विनाकारण काळजी करायची सवय सोडून द्या. चिंता कटकटी निर्माण करते  व मानसिक शांततेचा भंग करते. जे आहे तसे स्वीकारा.जे बदलू शकता ते बदलण्याचा प्रयत्न करा पण त्यासाठी अट्टाहास मात्र करू नका.

६. तुम्ही निकोप मनाने दुसऱ्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करा. वाईटातही चांगले शोधायची  सवय लावा.

७.संवेदनाशील रहा.समोरच्याच्या मनाचा विचार प्रथम करा.तुम्ही आजूबाजूच्या लोकांच्या भावनांचा आदर करू लागलात की वेगळे मानसिक समाधान मिळेल.माणसांप्रमाणेच निसर्गालाही भावना असतात याची जाणीव ठेवा.

८.तुमच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवा.मनाची प्रसन्नता चेहऱ्यावर दिसायला हवी.

९.आपला आनंद एक दुसऱ्यात वाटून घ्या व स्वत:बरोबरच इत्तरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

१०.जे घडते आहे ते जसे आहे तसे विना अवरोध अति चिकित्सा न करता आनंदाने स्वीकारण्याची सवय तुम्ही लाऊन घ्या. 

     लक्षात घ्या- मन ठेवा रे प्रसन्न सकल सिद्धीचे कारण!

                                           प्रल्हाद दुधाळ.

 

Friday, August 16, 2013

ओझी


जाणते अजाणतेपणी आपण भूतकाळात कुणा कुणाला त्यांच्या  संकटसमयी कोणत्यातरी स्वरूपातील मदत केलेली असते तुम्ही ही गोष्ट कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली असते.पण जेंव्हा तुमच्यावर तसाच प्रसंग येतो तेंव्हा उगाचच दुसरेही / निदान ज्यांना तुम्ही मदत केली होती त्या व्यक्ती तरी तुम्हालाही  तशाच प्रकारची मदत करतील असे आपण गृहीत धरून चालतो. पण प्रत्यक्षात असे घडेलच असे सांगता येत नाही! कोणत्या प्रसंगी कुणी कुणाशी कस वागाव यावर तुमचे नियंत्रण कसे असू शकेल? तुम्ही वेळेची गरज ओळखली हा तुमचा चांगुलपणा ( का वेडेपणा? ) असतो. तशाच वागण्याची अपेक्षा कुणाकडून ठेवणे हा अजून एक गाढवपणा ठरतो. थोडक्यात काय तुमची ओझी तुम्हालाच वाहायची आहेत!

Wednesday, June 12, 2013

तथास्तु!


                                   तथास्तु!

                  फार फार वर्षापूर्वी एका गावात एक सज्जन माणूस रहात होता.प्रयत्न व परमेश्वराची कृपा यामुळे सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती. परोपकारी म्हणून सर्वत्र त्याचे नाव झाले होते. परमेश्वरावर त्याची निस्सीम भक्ती होती.आपल्या भक्तीभावाने त्याने परमेश्वराला प्रसन्न करून घेतले होते.आपल्याबरोबरच सर्व जग सुखात असावे असे त्याला वाटत असे.या जगात कोणीही कुठल्याही समस्येने  गांजलेला नसावा अशी प्रार्थना तो दररोज करत असे.गावात त्याला सर्वजण मान देत असत.तो उदार मनाने सर्वांना कायम मदत करत असे.आपण जरी सुखात असलो तरी आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळ्या कारणाने दु:खात असलेले पाहून त्याने ठरवले की परमेश्वराला सांगून सर्वांना सुखी करायचे! त्यासाठी त्याने मनोभावे पूजापाठ सुरु केला.परमेश्वराने सज्जनाला दर्शन दिले व तुझ्यासाठी अजून काय करू असे विचारले.

                 “ तुझ्या आशीर्वादाने माझ्याकडे सर्व काही आहे! मला काहीच नको पण अवतीभवतीच्या सगळ्यांनाही तू  सुखी कर! “ भक्ताने साकडे घातले.

                “अरे असे नाही करता येणार! तू सुखात आहेस ते  तुझ्या कर्मामुळे!

           इथे प्रत्येकाला जे काही मिळते ते ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ असते! त्यामुळे कोण कसा जगणार ते मी त्याच्या बऱ्यावाईट कर्माप्रमाणे ठरवतो! तेंव्हा जसे आहे ते ठीक आहे तू सुखात आहेस ना? तेव्हढेच पहा! मला माझे काम करू दे !”

                 एवढे सांगूनही सज्जनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.त्याने सर्वांच्या सुखासाठी देवाला आळवणे चालूच ठेवले. देवाचा तो आवडता भक्त होता त्यामुळे देवाने शेवटी हार पत्करली व त्या गावातील सर्वांना सुखी करायचे ठरवले!

               सज्जनाचे घर सोडून सगळ्या गावातील लोकांना पक्की घरे मिळाली.सर्व लोक एका रात्रीत श्रीमंत झाले. दु:खाचा नायनाट झाला.कुणालाही काहीही करायची गरज राहिली नाही.खाणेपिणे व ऐशारामात रहाणे हा प्रत्येकाचा दिनक्रम झाला.कुणालाही काम करायची गरज उरली नाही! गाव सुखी व संपन्न झाले.

                 एकदा सज्जनाची चप्पल तुटली तो नेहमीच्या दुकानात गेला तर दुकान बंद!

             काही करण्याची गरजच उरली नसल्यामुळे चप्पल दुरुस्तीचे दुकान बंद झाले होते! सुखात असल्यामुळे गावातील सर्वांनी कामच करणे बंद केल्याचे दिसले! सज्जनाचे घर जसे आधी होते तसेच असल्यामुळे पावसामुळे गळायला लागले पण दुरुस्तीसाठी कोणीही येईना कारण सगळेच सुखात! कुणालाही कामाची गरजच  नाही! कुणालाही कसलीही चिंता नाही! सगळीकडे आनंदी आनंद!

                  सज्जनाला परमेश्वराचे म्हणणे आठवले. आपल्या हट्टापायी आपण काय चूक केली आहे हे सज्जनाला समजून आले! कोणतेही कर्म न करता आलेल्या सुखाची /ऐश्वर्याची लोकांना काहीच  किंमत नव्हती! सज्जनाने देवाला पुन्हा सगळे पाहिल्यासारखे करण्याबद्दल साकडे घातले! परमेश्वर गालातल्या गालात हसला!

                आपल्या आवडत्या भक्ताचे गाऱ्हाणे देवाने ताबडतोब ऐकले!

                   म्हणाला “ तथास्तु ” !

                                    .......... प्रल्हाद दुधाळ.                               (एका दंतकथेवर आधारीत)

                

Thursday, May 30, 2013

ताण तणाव.


                                 ताण तणाव.

              आपण हल्ली बऱ्याच लोकांकडून एकतो-

                मी फार टेन्शनमध्ये आहे हो!

                          आधुनिक जीवनशैलीमुळे माणूस अनेकदा ताण तणावाचा बळी होत आहे.त्याला भविष्याची चिंता वाटते ,नोकरीतील आव्हानांची चिंता वाटते, मुलांच्या शिक्षण व करिअर बद्दल तो कायम काळजीत असतो.जे जवळ आहे त्याबद्दल फारसा विचार न करता जे नाही किंवा काही आभासी गोष्टी बद्दल विचार/चिंता करत राहिल्यामुळे ताण तणावाचा सामना त्याला करावा लागत आहे. कायम तणावग्रस्त राहिल्यामुळे अनेक मनोकायिक आजार त्याच्या वर हल्ला करण्यासाठी टपून बसलेले आहेत.

                         तणाव म्हणजे जीवनातल्या येणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगांना आपल्या शरीराने दिलेली नैसर्गिक प्रतिक्रिया! तणावग्रस्त माणसाच्या शरीरात तणावामुळे काही बदल होतात आणि त्या व्यक्तीच्या अंगात बळ वाढते ,कधी त्याला भीती वाटू शकते, घाम फुटतो,बेचैनी वाढते,आत्मविश्वास कमी होतो,असुरक्षितता वाटायला लागते.

                         चांगल्या प्रकारच्या ताणामुळे माणसाच्या अंगात अचानक शक्ती वाढते व तणाव ज्या कारणामुळे वाढला आहे त्या कारणापासून दूर होणे शक्य होते .उदा. वाघ समोर आला की एरवी न पळू शकणारा माणुसही जीव वाचविण्यासाठी धूम ठोकतो!.एखादा विद्यार्थी टेन्शन मध्ये जास्त अभ्यास करू शकतो!

                        सध्याच्या काळात टेन्शन वाढायचे मुख्य कारण म्हणजे जीवनातली अनिश्चीतता,वाढलेली हाव व त्यामुळे समोर ठाकलेली वेगवेगळी आव्हाने हे आहे.सतत टेन्शन मध्ये राहिल्याने शरीरावर अनेक घातक परिणाम होऊ शकतात.

           टेन्शनमध्ये माणसात खालीलपैकी लक्षणे दिसू शकतात.

          १.जास्त भूक लागणे.

          २.जास्त झोप येणे .

          ३.खूप राग येणे व रागाच्या भरात  पुढचा मागचा विचार न करता वागणे.

          ४.आजूबाजूच्या व्यक्ती व परिस्थिती ची पर्वा न करणे .

          ५.पैशासाठी वेडापिसा होणे.

          ६.जास्त प्रमाणात व्यसने /शिगार/दारू पिणे.

          ७.जास्त प्रमाणात औषधे घेणे.

          ८.संथ व निष्क्रिय होणे.

                 असे वागल्याने  बरे वाटते हा समज आपला आपणच करून घेतला जातो  व आपण जे करतोय तेच बरोबर असे वाटायला लागते .

         ताण-तणाव किंवा टेन्शन मधील त्रासामधून सुटका होण्यासाठी काही सोपे उपाय आपण करू शकतो –

         मोकळ्या हवेतील भरपूर प्राणवायू शरीरात घेणे .

         आवडते संगीत/गाणी ऐकणे

         विनोदी पुस्तके वाचणे /भरपूर हसणे.

         शरीराचा हलका मसाज करणे .

         आवडत्या व्यक्तीच्या सहवासात रहाणे त्याच्याशी सुसंवाद साधणे.प्रसन्न रहाण्याचा प्रयत्न करणे.

         आवडता सेंट लावणे. मंद सुगंधात मन प्रसन्न करण्याची जबरदस्त शक्ती आहे.

         निसर्गाच्या सानिध्यात रहाणे. फळे फुले हिरवी राने यांच्या सहवासात मोकळा श्वास घेणे.

                निसर्गाच्या सानिध्यात  राहिल्याने माणूस सारासार विचार करायला लागतो आपले वास्तव स्वीकारायला शिकतो.सुख काय आहे? दुखः काय आहे? यावर डोळसपणे विचार करू लागतो. आत्मचिंतन व आवडत्या व्यक्तीशी केलेला मुक्त संवाद त्याला चिंतामुक्त व टेन्शन पासून दूर ठेऊ शकतो.दैनंदिन आयुष्यातील आव्हानांना दोन हात करायला नव्याने शिकवतो.पुन्हा नव्या जोमाने जगण्याच्या लढाईला सज्ज होतो!.

                                        ...........प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, May 22, 2013

व्यसनाधीन.


                                   व्यसनाधीन.

                    अनेक प्रकारच्या व्यसनांनी आजच्या माणसाचे आयुष्य भरून गेले आहे. आजकाल रस्त्याने जाताना      अनेक व्यसनांच्या आहारी गेलेली माणसे अवती भवती बघायला मिळतात.कोणी बडबड करत असतात, कुणी शून्यात नजर लाऊन धुराची वर्तुळे सोडत असतात,कोणी रस्त्यात पचापच थुंकत असतात तर काहीजण धक्के खात व धक्के देत फिरत असतात! मला तर अशी माणसे बघायचे व्यसनच लागले आहे! आहे की नाही गम्मत! व्यसनांवर एक व्यसनीच लिहितोय! आजकाल तर कानात हंड्स फ्री घालून हातवारे करत बडबड करणारेही वाढले आहेत!

   व्यसने अनेक प्रकारची असू शकतात. काही व्यसने शारीरिक आरोग्याला अपायकारक आहेत असे जाणकार म्हणतात तर काही व्यसने माणसाचे मानसिक आरोग्य सूद्धा धोक्यात  आणू शकतात.

या व्यसनांचे दुष्परिणाम सर्वांना माहीत असतात पण अंगवळणी पडलेल्या या सवयी ‘कळते पण वळत नाही!’ या सदराखाली सुटत नाहीत.

  पहिल्या प्रकारातील व्यसनामध्ये प्रामुख्याने नावे येतात ती  दारू, गांजा, चरस, गुटका, पान,तंबाखू ,

शिगार, बिडी ,ब्राऊन शुगर किंवा तत्सम इत्तर अमली पदार्थ यांचे सेवन .या प्रकारच्या व्यसनांवर आत्तापर्यंत अनेकजणांनी बोलून झाले आहे अनेक नामवंत संस्थ्या व प्रसिद्ध व्यक्ती अशा प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या माणसांच्या व्यसनमुक्तीवर काम करत आहेत आणि भविष्यात करत राहणार आहेत.

  इथे  मी लिहिणार आहे ते दुसऱ्या प्रकारच्या व्यसनांवर किंवा सवयींवर! या प्रकारच्या सवयींचा माणसाच्या एकंदर आयुष्यावर दृष्य/अदृश्य स्वरूपात लगेच किंवा काही काळानंतर परिणाम होतो.अशी काही व्यसने माणसाला लागली आहेत त्यापैकी काही –

   आधुनिक जीवनशैली चा भाग व सुरुवातीला गरज म्हणून माणसाच्या जीवनात आलेल्या मोबाईल फोन ने  अनेक व्यकीना आज गुलाम केले आहे. कानाला सतत मोबाईल लावलेल्या माणसांच्या झुंडी च्या झुंडी  आज रस्त्यावर पहायला मिळतात.मोबाईल वर बोलताना आजूबाजूला काय चालू आहे यांचे भान नसलेले अनेकजण पाहिल्यावर नक्की त्यांचे काय होणार याची चिंता पडते. दुचाकीस्वार बेफाम वेगात गाडी चालवत असतो त्याचा एक हात बाईक च्या हंड्ल वर असतो तर दुसरा मोबाईल वर असतो .बोलण्यात तो इतका रंगलेला असतो की रस्त्यावर असलेल्या इत्तरांचा आणि अर्थात स्वत:चाही जीव धोक्यात घालत असतो. मला आजपर्यंत न कळालेलं कोड आहे की आपला जीव पणाला लाऊन एवढ महत्वाच हे लोक काय बोलत असतात? लक्षात घ्या जीव असेल तर बाकी सर्व गोष्टींना अर्थ आहे.जी गोष्ट द्चाकीस्वारांची तीच चारचाकी चालावणारांची आहे.

    माणसाने आपले काम सुलभ व्हावे म्हणून अनेक शोध लावले त्यातीलच एक म्हणजे संगणक होय ! अनेक अवघड कामे संगणकामुळे चुटकीसरशी होऊ लागली .इन्टरनेट ने माणसाच्या जीवनात क्रांती झाली. इन्टरनेट वरील साईट वर नको ते पाहण्याचे व्यसन अनेक लोकांना जडले! हव्या असलेल्या सर्व प्रकारच्या  माहिती बरोबरीने नको त्या माहितीचे भांडार ही सर्व वयोगटातील स्री पुरूषांना उपलब्ध झाले! सोशल नेटवर्क साईट्स चे चाहते वाढले त्यातूनच एका नव्या व्यसनाची माणसाला बाधा झाली आणि अक्षरश: पिढी च्या पिढी त्याची गुलाम झाली  जे ज्या वयात पाहू नये ते नजरेच्या टप्प्यात आले! त्यातूनच अनेक मनोकायिक विकार माणसाला जडू लागले! सतत तणावाखाली राहिल्यामुळे मानसिक तसेच शारीरिक व्याधी जडू लागल्या.

अकाली वृद्धत्व येऊ लागले. व्यसनाने आपले काम करायला सुरुवात केली आहे!

    अन्न वस्र निवारा याबरोबरच माणसाला मनोरंजनाची गरज भासू लागली .दैनंदिन कामामधून सवड काढून तो नाटक सिनेमा पहात असे .विरंगुळा म्हणून रेडीओ वरील संगीत, टी.व्ही. वरील काही कार्यक्रम यातून घरातच मनोरंजनाची भूक भागू लागली. जोपर्यन्त मर्यादित स्वरूपात वाहिन्या होत्या तोपर्यंत ठीक होते पण च्यानेल वाढले आणि स्पर्धा आणि टी.आर.पी.च्या नादात टी. व्ही.वर सिरीयल्स चा रतीब घातला जाऊ लागला.चानेल्स वर कौटुंबिक कलह दाखवले जाऊ लागले. निर्माते आपला गल्ला भरण्यासाठी विवाह बाह्य संबंधावर मालिका बनऊ लागले. टी व्ही चे जग हेच वास्तव जग आहे असे लोक समजू लागले .एखाद्या मालिकेतला एखादा भाग चुकविणे म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न वाटू लागला.दैनंदिन आयुष्यातले प्रश्न विसरून माणूस आभासी मालिकेत रमू लागला. कुटुंबातला संवाद हरवायला लागला. मालिका बघण्याचे एक नवीन व्यसन संपूर्ण कुटुंब संस्थेला हादरे देऊ लागले आहे. टी व्ही मालिकांमुळे लोकाना जेवायला वेळ मिळेनासा झाला आहे. काही लोक जेवताना ते व्ही पहातात आपण काय खात आहोत यावरही लक्ष नसते.अशा व्यसनी कुटुंबाकडे जर मालिकेच्या वेळात पाहुणे आले तर मालिका पाहण्याच्या नादात पाहुण्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते त्यातूनच अनेक जीवाभावाचे संबंध दुरावताना दिसत आहेत. सोशल नेट्वर्किंग वर हजारो मित्र जोडणारया माणसाकडे प्रत्यक्ष भेटायला आलेल्या मित्राशी बोलायला वेळ या मालिकांमुळे मिळत नाही हे वास्तव आहे. मालिका पहाण्याचे हे व्यसन माणसातल्या माणुसकीला संपवायला निघाले आहे!

       ही आधुनिक व्यसने पारंपारिक व्यसना एवढीच धोकादायक आहेत !

       तुम्हाला काय वाटते ?

                                     ......... प्रल्हाद दुधाळ .पुणे

                                     www.dudhalpralhad.blogspot.com

 

 

 

Monday, April 8, 2013

जिवलग मित्र.- Story


                एका गावात एक गृहस्थ रहात होते.आयुष्यभर प्रचंड काबाडकष्ट करून आपला संसार त्याने उभा केला होता. मुलांना उत्तम शिक्षण दिले.गावात मोठे घर बांधून सर्व मुलाबाळांबरोबर तो रहात होता .मुले मोठी झाली, कमावती झाली.मधल्या काळात त्याची पत्नी किरकोळ आजाराचे निमित्त होऊन देवाघरी गेली.आता आपल्या जबाबदाऱ्या मुलांवर सोपऊन आपल्या लाडक्या मुलांबरोबर आरामशीर आयुष्य घालवायचे असे त्याने ठरविले. आपली सर्व मालमत्ता सर्व मुलांना त्याने वाटून टाकली व ते  आपल्या  विवाहित मुलांबरोबर राहू लागले.कालपरत्वे गृहस्थ म्हातारे झाले .नजर अधू झाली होती. ऐकायला कमी येऊ लागले होते.ज्या मुलांना त्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते त्या मुलांना आपला बाप आता अडचण वाटू लागला होता. त्यांची जबाबदारी घेण्यावरून घरात भांडणे होऊ लागली. म्हाताऱ्याचे गाठोडे आता एका बंदिस्त खोलीत हलवण्यात आले. खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. आठ आठ दिवस म्हाताऱ्याकडे कुणी फिरकत नव्हते. कुणी विचारपूस करीत नव्हते. होते नव्हते ते सर्व मुलांना देऊन आपण हे संकट ओढावून घेतल्याची जाणीव झाली पण आता उशीर झाला होता. अतिविश्वास नडला होता.आपले आयुष्य आता असेच सडणार या जाणीवेने गृहस्थ खूप दु:खी कष्टी झाले. त्याच गावात गृहस्थाचा लहानपणीचा एक मित्र रिटायर झाल्यावर नुकताच राहायला आला होता.स्वत:च्या मुलांकडून आपल्या मित्राचे चालू असलेले हाल त्याला समजले. आपण त्याच्यासाठी काहीतरी करायचे असे त्याने ठरविले.प्रथम त्याने काही नाणी घेतली व एका पितळी डब्यामध्ये भरली. तो डबा एका फडक्यात बांधला व दुपारच्या वेळी गृह्स्थ्याला भेटायला गेला .घरात त्यावेळी फक्त गृहस्थ्याची एक सुनबाई असते हे त्याने पाहून ठेवले होते. मित्राच्या घरी गेल्यावर त्याने मित्राची चौकशी केली. त्याच्या सुनेला त्याने तिच्या सासऱ्याचे त्याच्यावर कितीतरी उपकार असल्याचे सांगितले.सुनेने त्याला म्हाताऱ्याच्या खोलीत नेले. म्हाताऱ्याची अवस्थ्या पाहून मित्राला अत्यंत वाईट वाटले .आपल्या जिवलग मित्राशी खूप दिवसांनी मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत असे सांगून त्याने सुनेला खोलीबाहेर काढले व दरवाजा बंद केला. एक पत्र व आणलेला डबा म्हाताऱ्याकडे  दिले व पत्रातील मजकूर वाचायला दिला. म्हाताऱ्याने मित्राचे आभार मानले .अर्धा तास हितगुज करून मित्र निघून गेला .म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्याची सून बुचकळ्यात पडली. तिने रात्री आपल्या नवऱ्याला घडलेली घटना थोडा मसाला लाऊन सांगीतली. सर्वांनुमते म्हाताऱ्याच्या मित्राला निश्चित काय घडले आहे ते विचारायचे ठरविले. गृह्स्थ्याच्या मित्राने त्याच्या मुलांना  आपल्याकडे  मित्राचे काही लाखांचे गुपित आहे व तुम्ही मुलांनी कमीत कमी पाच वर्षे तरी आपल्या बापाला नीट सांभाळले तरच ते माझ्याकडून तुम्हाला समजेल हे सुध्दा सांगितले. दुसऱ्या दिवसापासून घरातील सर्वजण जातीने वडिलांची चौकशी करू लागले .त्यांची वारंवार माफी मागू लागले. व्यवस्थित खायला व दवापाणी मिळू लागला .मनाने खचलेल्या गृहस्थ्याने पुन्हा उभारी धरली .समाधानी साडेचार वर्षाच्या नंतर गृहस्थ्य वारले. क्रियाकर्म होताच मुले वडिलांच्या मित्राकडे लाखांचे गुपित विचारण्यासाठी गेले.  

               मित्राने गुपित सांगितले “ माझ्या जिवलग मित्राने तुम्हाला निरोप दिला आहे की तुमच्या सारख्या मुलांना जन्म देण्याऐवजी निपुत्रिक म्हणून जगलो असतो तर बरे झाले असते! तसेच त्यांनी तुमच्यासाठी एक डबा पलंगाखाली ठेवला आहे त्यात लाखो रुपयांचे धन ठेवले आहे.हे धन वडीलांनी तुमच्यासाठी ठेवले आहे पण ते तुम्हाला तरच मिळेल जर त्यांच्या  शेवटच्या दिवसात  तुम्ही जे काही  केले ते लोभापायी केले नसेल!

               अन्यथा त्याची माती झालेली असेल! “

               लोभी कुटुंबाने ताबडतोब डबा शोधून काढला व उघडला.
  डब्यात माती होती ! 
 ................प्रल्हाद दुधाळ.
                       
             

Tuesday, April 2, 2013