Friday, February 26, 2021

लवचिकता... एक आवश्यक बाब

 आपल्या लहानपणापासून आपण काही समजुती (किंवा गैरसमजुतीही) आपल्या मनात घट्ट बसवून ठेवलेल्या असतात.

   आपल्या भोवतालच्या परिस्थिती आणि माणसांनी या समजुती मनात अजूनच पक्क्या बिंबवण्यास मदत केलेली असते.

   माणसाचे वय वाढते तसे तसे खरं तर या समजुती तार्किक कसोट्यांवर घासून त्याची सत्य अथवा असत्यता पडताळून पहाणे अपेक्षित असते,पण प्रत्यक्षात मात्र माणूस अशी पडताळणी करायच्या भानगडीत पडत नाही.त्या समजुती बद्दल प्रश्न पडले तरी कुणी तरी दुखावले जाईल किंवा आपण कशाला आपले डोके चालवायचे? असा विचार करून त्या समजुती अंधपणे आपण कुरवाळत बसतो.कधी कधी तर या समजुती स्वतःच्या अहंकाराशी जोडून चुकीच्या पद्धतीने वागले जाते...

   खरं तर आपली वैचारिकता लॉजिकल आहे का हे वेळोवेळी तपासून बघायला हवे...

   काही चुकत असेल तर स्वतःमध्ये आवश्यक असलेले बदल अंगिकारण्यात कसला आलाय कमीपणा? ही लवचिकता तुमच्या अंगी असली ना की जीवनात आनंदी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही! बरोबर ना?( सहजच)

©प्रल्हाद दुधाळ.

Thursday, February 18, 2021

मी एक कॉम्रेड

 मी एक कॉम्रेड

गोष्ट 1985-86 मधली आहे, नोकरीत थोडाफार रुळलो होतो. 

   कामगार संघटनेचा सभासद असलो तरी फारसा ॲक्टिव नव्हतो. त्याच दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग नेमावा या मागणीसाठी देशभरातील कर्मचारी संघटनांनी आंदोलने करायला सुरुवात केली होती आणि त्याचा भाग म्हणून पुण्यातल्या सर्व केंद्रीय कर्मचारी संघटनांनी एका मोर्चाचे आयोजन करायचा निर्णय घेतला.पुण्याचे विधानभवन ते अलका टॉकीज असा भरपूर लांब मार्ग मोर्चासाठी ठरला.भर दुपारच्या उन्हात होरपळत जाणाऱ्या या मोर्चात सामील व्हायची माझी तरी तयारी नव्हती त्यामुळे मोर्चा सुरू होण्यापूर्वीच आपण ऑफिसातून हळूच मागच्या गेटमधून कलटी मारायची असा बेत मी केला होता.या गेटकडे कुणाची नजर असायची शक्यता नव्हती....

   आमच्या टेलिफोन खात्यातल्या सगळ्या कामगार संघटना या मोर्च्यात सामील होणार होत्या त्यामुळे सगळे पुढारी आपापल्या सदस्यांवर कुणी पळून जाऊ नये म्हणून नजर ठेऊन होते.त्यावेळी मी ज्या संघटनेचा सदस्य होतो त्या संघटनेची धुरा एका धिप्पाड रणरागिणीकडे होती....

  आमच्या खात्यात या कॉम्रेड शारदा मॅडमचा प्रचंड दरारा होता.खात्याचे मोठे मोठे अधिकारीसुध्दा तिला प्रचंड घाबरायचे.एखादे काम घेऊन ती अधिकाऱ्याकडे येणार आहे असा नुसता निरोप गेला तरी ते काम आधीच व्हायचे एवढी या मॅडमची दहशत होती! वेळ आली तर समोरच्या व्यक्तीच्या कानाखाली वाजवण्याची तिची तयारी असायची त्यामुळे सगळे सदस्यही तिला टरकून असायचे.त्या काळात ती स्कुटरवरून फिरायची.कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हककांसाठी प्रशासनाशी कोणत्याही प्रकारचा पंगा घ्यायच्या तिच्या गुणांमुळे पुण्यात तिच्या संघटनेची सदस्यता सर्वात जास्त होती....

  तर,त्या दिवशी ठरवल्याप्रमाणे मी मोर्चाला जायला नको म्हणून हळूच ऑफिसच्या मागच्या गेटने बाहेर सटकलो.या गेटमधून बाहेर पडले की एका निमुळत्या गल्लीतून थेट सदर्न कमांडच्या प्रवेशद्वाराकडे बाहेर पडता यायचे त्यामुळे हा सेफ मार्ग मी निवडला होता...

 आता कुणाच्याही लक्षात न येता मी मोर्चाच्या विरुध्द दिशेकडे बाहेर पडणार होतो आणि भर उन्हातली माझी पायपीट वाचणार होती...

   मी गल्लीतून बाहेर पडणारच होतो तोच समोर एक स्कूटर येऊन उभी राहिली,आणि स्कुटरवर साक्षात कॉम्रेड शारदा!

  " काय रे, कुठे चाललाय?"

  " कुठे काय,... कुठे म्हणजे?.. तिकडे मोर्चाकडेच निघालोय की..." 

मी सारवा सारव करायचा प्रयत्न करायला लागलो. .

  माझ्याकडे हसरा कटाक्ष टाकून मॅडम म्हणाल्या  ....

 " बरं, चल बस माझ्यामागे ..."

 आता काही पर्यायच नव्हता...

 मी गुमान मॅडमचया मागे स्कूटरवर बसलो. तोपर्यंत मोर्चाचे सुरुवातीचे टोक पार ससून हॉस्पिटल ओलांडून पुढे गेले होते तर शेवटचे टोक अजून विधान भवनातच होते....

   मला वाटल होत की विधानभवनात नेऊन मला मोर्चेकऱ्यात सामील केले जाईल,पण मॅडमने स्कूटर मोर्च्याच्या कडे कडेने थेट नरपत गिर चौकाकडे जेथे मोर्चाचे पुढचे टोक होते तिकडे नेली...

  आमची वरात आता पार मोर्चाच्या सुरुवातीच्या पुढारी मंडळींपर्यंत पोहोचली होती ...

 कॉम्रेड शारदाने मला सरळ मोर्चाच्या फ्रंटवर नेले तिथे एकाच्या हातात असलेला भला मोठा लाल बावटा काढून घेऊन माझ्या हातात दिला आणि जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली!

   कामगार चळवळीत तोपर्यंत अगदीच बॅकफुटवर असलेल्या माझ्या हातात अचानकपणे कामगार चळवळीचा लाल बावटा देऊन कॉम्रेड शारदाने मला मोर्चातला क्रियाशील कार्यकर्ता केले...

  पुढे नोकरीत पस्तीस वर्षे मी कोणत्या ना कोणत्या कामगार वा अधिकारी संघटनेत जिल्हा स्तरावर पदाधिकारी म्हणून काम करायचे होते कदाचित त्याची मुहूर्तमेढ अशी रोवली गेली ..

   आजही मी निवृत बी एस एन एल अधिकारी संघटनेचा फायनान्स सेक्रेटरी आहे आणि तो बावटा अजूनही तसाच हातात आहे...

 ©प्रल्हाद दुधाळ.

Monday, December 7, 2020

त्या दोघी ..प्रल्हाद दुधाळ. ..कथा परीक्षण

 #कुबेरदिवाळीअंक    #आस्वाद(८)


 Pralhad Dudhal यांची #त्या_दोघी ही एक सुगम अशी लघुकथा. वृद्धाश्रम,  तिथली वेदना, त्या वेदनेला झिरपत नेणारे तिथले वृद्ध ..त्यांचं भावविश्व, त्यांचं कुटुंब, त्यांचे संस्कार आणि याच संस्काराला बाजूला सारून त्यांच्या  जीवलगांद्वारे  फोफावणारा स्वार्थ या सर्वांचं सुरेख चित्रण म्हणजे ही लघुकथा. कथेचा आवाका अत्यंत छोटा असला तरी विषयाने नि आशयाने कथेला महत्त्वाचे  स्थान मिळतेय. एका  संवेदनशील विषयाला अतिशय साधेपणाने पण सामर्थ्याने लेखकाने आपल्या शब्दांनी सजवलेय.  खरंच संस्कार  संस्कारच असतात. ते ग्रामीण आणि शहरी असा भेद करत नसतात. कारण कुठलेही आईवडील आपल्या लेकरांवर उत्तमोत्तम असेच संस्कार घडवत असतात. ग्रामीण, शहरी अशा वातावरणात फरक नसतो. तर तो असतो त्या व्यक्तिच्या विचारांच्या जडणघडणीत. स्वार्थ जेव्हा  पुढील दाराने आत प्रवेश करतो ना तेव्हा  हे उत्तम संस्कार मागील दाराने कधी निघून  जातात ते कळतही नाही. 'त्या दोघी' तील सरूबाई आणि सुमन अशाच स्वार्थीपणाला बळी पडलेल्या; पण सरूबाई... तिच्या मुलांनी तिला या आश्रमात आणलेले नसून त्यांच्या स्वार्थीपणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी  आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी  ती आपणहूनच या वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेते. तिथेच तिला मानसिक , भावनिक  नि शारीरिक साथ देणारी सुमन भेटते. या दोघींच्या भावविश्वावर प्रकाश टाकणारी ही कथा. अगदी साधीच. पण एक शिकवण देऊन जाते. आयुष्याच्या सायंकाळी  स्वाभिमानानं कसं जीवन जगावं हे सांगते. नवा विषय वाटला मला. नि तेवढाच समंजस आशय .. लेखक प्रल्हाद दुधाळ यांनी एक आगळीवेगळी कथा आपल्या हाती दिलीय . ते मुरलेले लेखक आहेत हे सर्वार्थाने खरे ठरले. 

या भावनिक , संवेदनशील कथेसाठी लेखकाला अनेकानेक धन्यवाद ...आणि अनंत शुभेच्छा लेखनप्रवाहासाठी.....!!

Wednesday, November 18, 2020

विचारचक्र आणि घटना

 आपले विचार आणि घटना....

  गेली अगणित वर्षे माणूस आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीला किंवा व्यक्तींना दोष देत आलेला आहे.त्याच्या या विचार धारणेमुळे  तो आपल्या मनात कुणाबद्दल तरी मत्सर घृणा असूया अशा भावना बाळगून दुःखात जगतो आहे.

   खरं तर माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या अथवा वाईट घटना या त्याने त्याच्या मनात भरलेल्या चांगल्या अथवा वाईट विचारांचा परिपाक असतो.

    आपल्या अंतर्मनात रात्रंदिवस जे विचारचक्र चालू असते त्या विचारांमध्ये जर भीती चिंता,अंधश्रद्धा,इर्षा,असूया आणि द्वेष अशा भावना भरलेल्या असतील तर तशाच घटना जीवनात विविध समस्यांच्या/घटनांच्या स्वरूपात समोर येतात.

     आपण आनंदात जगायचे की यातना भोगायच्या हे माणसाची विचार करण्याची पध्दती ठरवते. 

अवचेतन मन हे नेहमीच तटस्थ वृत्तीचे असते आणि त्यामध्ये चांगले काय आणि वाईट काय याचा फरक करण्याची शक्ती  किंवा भावना नसते ,म्हणूनच जर आपल्या अवचेतन मनातील विचार जर वाईट व नकारात्मक स्वरूपाचे असतील तर प्रत्यक्ष जीवनातही केवळ तसेच वाईट व नकारात्मक अनुभव येत राहील. 

  आपले अवचेतन मन जसा विचार करेल तशाच घटना समोर येत रहातात म्हणून आपले विचार बदलले तरच जीवनात सकारात्मक बदल जाणवेल... 

   (ज्ञानकण वेचलेले १)

   ....©प्रल्हाद दुधाळ.

Friday, October 30, 2020

बाबांची नोकरी

 मागच्या वर्षी मी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यावेळी माझ्या मुलाने सौरभने दिलेली कॉमेंट...नक्कीच अभिमानास्पद...


बाबा तुम्हाला नौकरी च्या शेवटच्या दिवशी खूप खुप शुभेच्छा..Well Played.


तुम्ही एक चांगले अधिकारी , कुशल लीडर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेवट पर्यंत कंपनीशी प्रामाणीक राहिलात, मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो...आम्हा IT वाल्यांना या गोष्टी जरा नवीन...


एक काळ असा होता जेव्हा आपण पुण्यात कुठे जरी गेलो तरी टेलिफोन खात्यातील अधिकारी आले म्हणून जाम मॅन मिळायचा , तुम्ही त्या गोष्टी चा कधी गर्व ठेवला नाही किंवा त्या गोष्टीचा कधी गैरवापर पण केला नाही. 


मला नेहमीच तुम्ही hardworking achiever म्हणून आठवतात. रास्ता पेठ मधले रेकॉर्ड connection असू किंवा सांगवी चे रेकॉर्ड land line connections किंवा भोरचा Exchange Failure issue असू जेव्हा तुम्ही 10 दिवस घरी आला नव्हता. तुम्ही नेहमीच कुशल कामगिरी करताना दिसला आणि ते खूप मोठे योगदान आहे माझ्या करिअरसाठी


एक साधे टेलिफोन ऑपरेटर ते SDE हा प्रवास मी पाहिलाय, 

Competitive exams देताना , अभ्यास करताना मी पाहायचो आणि maybe त्यामुळे मला नेहमी अभ्यास आवडायचा. 1996 तुम्ही मुंबई ला गेला , मी आणि आई पुण्याला होतो पण जेव्हा जसा वेळ मिळेल तेव्हा भेटायला यायचा , त्यावेळी मुंबई पुणे प्रवास कढतर होता पण तुम्ही effortlessley ते करायचा.तुम्हाला मिळालेला संचार सारथी आठवतो , मी त्यावेळी 2nd किंवा 3rd ला असेल, खूप भारी वाटले .पेपर मध्ये फोटो पाहून lai bhari वाटले


तुम्ही 2005 च्या आसपास बाजीराव exchange चे service सेंटरची कामगिरी घेतली , मी कॉलेज मधून जेव्हा पण ऑफिस ला यायचो तेव्हा तुम्ही कस्टमर complaints कश्या हँडल करायच्या ते मी पाहिलेत. Top Managers पण फसतात पण तुम्ही खूप smoothness आणला असे तुमचे कितेक customer म्हणायचे आणि तुम्ही फक्त म्हणायचे इट्स part ऑफ my जॉब.


2009 मध्ये तुम्ही सत्याराला ट्रान्सफर घेतली आणि मी म्हैसूर ला गेलो, त्यावेळी manual डेटा एन्ट्री मुळे खूप त्रास झाला तुम्हाला . 2009 च्या शेवटी परत आलो तेव्हा तुम्ही सगळी process automate केली होती, मी त्यावेळी ज्या काही कॉर्पोरेट basics शिकत होतो त्या तुम्ही practically implement करत होता.त्यानंतर तुम्ही Corporate HR Administration मध्ये गेला आणि ते पण शिकला


Milestones खूप आहेत पण त्याबरोबर वर्क life बॅलन्स, लिहायचा छंद आणि technology शिकायला तुम्ही नेहमीच तयार होता...


Retirement enjoy करा आणि खूप लिहा....


Happy Retirement

Saturday, October 10, 2020

नावाचा घोळ....

 नावाचा घोळ....

   

     आमच्या टेलिफोन खात्यात जवळपासच्या खेड्यातून अनेक ग्रुप डी कर्मचारी कामावर यायचे.लोहगाव,वडगाव, केसनंद,वाघोली, फुरसुंगी इत्यादी गावांतून असे शेकडो कर्मचारी कामाला यायचे.

   मी नोकरीला लागल्यावर हळू हळू या लोकांशी ओळखी झाल्या आणि मग त्या त्या गावांच्या उरसाची निमंत्रणे आम्हाला मिळायला लागली. ही झाली ओळखी झाल्यानंतरची गोष्ट, पण नोकरीला  लागल्यावर पहिल्याच वर्षी घडलेली एक गोष्ट सांगतो....

   माझ्याबरोबर केसंनंद गावावरून दररोज ये जा करणारे ज्ञानेश्वर हरगुडे  हे काम करायचे.मीही खेड्यातून आलेला असल्याने आमची थोड्याच दिवसात चांगली मैत्री झाली होती.आम्ही त्याला माऊली या नावाने हाक मारायचो...

   डिसेंबर महिन्यात केसनंद गावचा उरूस असतो.माऊलीने सांगितले होते की उरसापूर्वी   पंधरा दिवस आधी त्यांच्या गावात दूध किंवा  दुधाचे सगळे पदार्थ वर्ज्य केले जातात,अगदी लहान मुलांनाही दूध दिले जात नाही! या काळात सगळे गाव कोरा चहा पिते...

  त्या वर्षी पहिल्यांदाच माऊलीने आम्हा मित्रमंडळींना उरसाच्या दिवशी संध्याकाळी केसनंदला यायचे निमंत्रण दिले.तोपर्यंत त्या गावाबद्दल तिथल्या लोकांबद्दल फार काही माहीत नव्हते....

   ऑफिस सुटल्यावर त्या दिवशी आम्ही सात आठजण सायकलवर पंधरा किलोमीटरवर असलेल्या केसंनंदला निघालो....

   एक तर अंधार आणि आमच्यापैकी कुणी याआधी तिकडे गेलेला नसल्याने रस्ता विचारत विचारत आम्ही त्या गावात एकदाचे पोहोचलो....

  " इथे माऊली हरगुडे कुठे रहातात हो? "

आमच्यापैकी एकाने रस्त्यात एकाला विचारले...

 " हे काय इथे ,चला माझ्याबरोबर...."

आम्हाला ती व्यक्ती एका चाळवजा घरात घेऊन गेली....

   आत जाऊन त्याने पाण्याचे तांबे भरून आणले आणि म्हणे...

"घ्या हात धुवून ...."

आम्ही हातपाय धुवेपर्यंत त्याने बसायला घोंगड्या अंथरल्या, आम्ही नजरेने माऊलीला - आमच्या मित्राला शोधत होतो, तोपर्यंत ती व्यक्ती म्हणाली...

" चला घ्या बसून जेवायला. .'

"माऊली कुठाय? "

" येईल तो एवढ्यात, बसा तुम्ही...."

समोर सुके मटण, कलरफुल रस्सा,चुलीवरच्या खरपूस भाकरी, कांदा लिंबाच्या फोडी भरलेली ताटे वाढली गेली. बऱ्यापैकी सायकलिंग झाल्याने सगळ्यांना सडकून भुका लागल्या होत्या....

   आम्ही सगळेजण त्या झणझणीत टेस्टी जेवणावर तुटून पडलो....

आमचे जेवण  करून झाले तरी आमचा मित्र माऊली काही आम्हाला दिसेना...

" अहो माऊली कसा काय नाही आला अजून?" 

  आमच्यातल्या एकाने पुन्हा विचारले....

 मग मात्र ती व्यक्ती बोलली...

"मी सुध्दा माऊली आहे की!"

आणि मी सुध्दा टेलिफोन खात्यात काम करतो की!"

आमच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह बघून शेवटी त्याने खुलासा केला....

" अहो खरंच, माझं नाव ही ज्ञानेश्वर हरगुडे आहे मलाही माऊली म्हणतात ..."

"मी लाईनमन आहे...

तुमचा माऊली ना, तिकडे वस्तीवर रहातो चला तुम्हाला सोडतो तिकडे!"

 म्हणजे आम्हाला भलत्याच माऊलीने जेवायला घातले होते तर!

 मग त्याने खुलासा केला...

 "पोरांनो तुम्ही टेलिफोन खात्यात नव्याने आलात म्हणून माहीत नाही तुम्हाला....

 आमच्या गावातल्या जवळ जवळ प्रत्येकाचे आडनाव हरगुडे आहे आणि प्रत्येक घरातला निदान एकजण तरी टेलिफोन खात्यात नोकरीला आहे! अजून एक - या गावात एकाच  नावाची दोन - दोन, तीन - तीन माणस आहेत बरं का! चला माऊलीचे घर दाखवतो!"

 एकदाचा आमचा माऊली आम्हाला भेटला आणि मग पुन्हा एकदा जेवणाची फर्मास पंगत जमली....

 नंतर हे चांगलच लक्षात आले की आमच्या लाईन स्टाफ मध्ये हरगुडे,शिंदे,सातव, हरपले  आडनाव असलेल्या माणसाचे नुसते आडनाव माहीत असून चालणार नाही तर त्याचे संपूर्ण नाव माहीत असायला हवे, कारण असे एकच आडनाव असलेली शेकडो माणसे पुण्यातल्या टेलिफोन खात्यात लाईनमन म्हणून काम करतात!

   ©प्रल्हाद दुधाळ.

संघर्ष व सकारात्मकता

 

#encouragement

 काही काही लोकांच्या प्रारब्धात केवळ संघर्षच लिहून आलेला असतो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याला संघर्ष केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही!

   माझ्या आयुष्याचे तसेच काहीसे आहे..

 मला जीवनात मिळालेल्या प्रत्येक यशाची एक संघर्ष गाथा आहे ती सगळी इथे मांडणे शक्य नाही!   तरीही ....

   मी जन्म घेतल्यापासूनच माझी जगण्याची लढाई सुरू झाली होती.माझी आई सांगायची की  जनमलो तेव्हा मी खूप अशक्त आणि आजारी होतो,जगतो की मरतो अशी माझी अवस्था होती, पण ती लढाई जिंकली! असो... 

   या लेखाचा विषय प्रेरणादायी संघर्ष असला तरी मला माझ्या संघर्षापेक्षा माझ्या सकारात्मक विचारांच्या जोरावर मला कसे मार्ग मिळाले ते सांगणे आवडेल....

त्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी कितीही त्रास झाला असला तरी शेवट सुखांत होता,मला सदैव एक अदृश्य शक्ती मदत करत होती,त्यामुळे असेल किंवा अशी मदत मला मिळणारच आहे या सकारात्मक विचाराच्या जोरावर असेल, मी अडचणी आल्या तरी त्यातून बाहेर पडलो...

आकर्षणाचा सिद्धांत मी हल्ली हल्ली वाचला पण त्याचा अनुभव मात्र मी लहानपणापासून घेतो आहे...

 माझे वडील मी तेरा वर्षाचा असताना गेलेले होते आणि आईच्या कष्टावर/ कसेबसे आमचे जगणे चालू होते.माझी आई कष्टाळू तर होतीच याशिवाय कमालीची स्वाभिमानी होती.धनाच्या बाबतीत दारिद्र्य असले तरी मनाची प्रचंड श्रीमंती तिच्या ठाई होती! सगळ्यांच्या मदतीला कायम तत्पर असणाऱ्या तिला कुणाकडूनही काही मागितलेले मात्र अजिबात खपायचे नाही. अभावातही मार्ग काढत जगण्याचे बाळकडू मला तिच्याकडून मिळाले.'आला दिवस जमेल तसा साजरा करायचा आणि पुढे चालायचे' ही तिची शिकवण मला पुढच्या आयुष्यात सतत कामाला आली....

घरी कमालीचे दारिद्र्य, खायची मारामार होती, असलेली थोडीशी जमीन गहान पडलेली, मोठा भाऊ दारूच्या आहारी गेलेला,अशा परिस्थितीत मी शिकत होतो. परिस्थितीने त्या वयातच एवढी प्रगल्भता आली होती की माझे सगळे लहानपण हरवून गेले होते.

    मी साधारण १० वी झालो होतो आणि अशी वेळ आली की सावकाराकडे गहान असलेली जमीन तो जप्त करणार असल्याची खबर मला मिळाली.नेमका त्याच सुमारास माझा एक चुलत चुलत भाऊ रिटायर झाला. कसं काय माहीत नाही, पण मला त्याला भेटून 'ती जमीन सोडव आणि तुझ्याकडे ठेव,मी नोकरी मिळाली की पैसे देईल' असे सांगायची बुध्दी मला झाली आणि विशेष म्हणजे माझ्या शब्दांवर विश्वास ठेऊन त्याने मदत केली...

   अभ्यासाला पोषक वातावरण नसूनही नशिबाने मी अभ्यासात हुशार होतो. अगदी पहिली ते दहावीपर्यंत मी शाळेत पहिला यायचो आणि केवळ हेच माझे सामर्थ्य होते! मला हायस्कूल स्कॉलरशिप, १२ रुपये महिना मिळायची, सहा महिन्याची स्कॉलरशिप ७२ रुपये एकदम आले की पुढचे चारपाच महिने घरातली तेल मिठाची नड भागवायची. नादारीमुळे शाळेच्या फीचा प्रश्न नव्हता, पण दहावीच्या फॉर्म फी साठी काय करायचे हा मोठा प्रश्न समोर आला होता...

   इथेही माझे प्रगतीपुस्तक कामाला आले आणि पडवळ नावाच्या शिक्षकाने माझी फी भरली...

   अकरावीला लोणंद या गावी नातेवाईकाकडे रहावे लागले, पण मानी स्वभावामुळे मी सहा महिन्यातच मी माझ्यासारख्याच एका फाटक्या मित्राच्या खोलीवर रहायला गेलो. जुनीपानी भांडी गोळा करून स्वतःची भाकरी तयार करायला शिकलो.इथले रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलचे बा.ना.येडेकर नावाचे मुख्याध्यापक आणि पुढे १२ वीला निरेत भोसले सर देवासारखे मागे उभे राहिले आणि अत्यंत वाईट आर्थिक आणि मानसिक परिस्थितीतही मी बारावी पास झालो.

    निरा गावात शिकत असताना जवळ पैसे नाहीत म्हणून सलग चार दिवस उपाशी रहाण्याची वेळ आली तेव्हाच ताटातली भाकरी किती मोलाची असते याचा साक्षात्कार झाला...

त्यावेळी क्षीरसागर नावाचा वीज मंडळाच्या लाईनमनने येऊन माझ्या खिशात नको नको म्हणत असताना वीस रुपयाची नोट कोंबली ...

वेळेला मिळालेल्या या मदतीला काय म्हणावे?

  पुढे पुण्यात दुसऱ्या भावाकडे शिक्षणासाठी आलो, पण त्याचवेळी त्याला परदेशी जायची संधी आली आणि त्याने आपले कुटुंब गावी पाठवले व तो दुबईला गेला.

    पोटासाठी एक भाकरी थापून मी भाड्याच्या सायकलवर १५ किमी सायकलिंग करून गरवारे कॉलेजला जायला लागलो.

   ज्या नागपूर चाळीत मी रहात होतो तिथे माझ्या नव्याने जोडलेल्या मित्रांत  आम्ही शिकणारी एकदोन मुले सोडली तर सगळा आनंदच होता.सगळ्या प्रकारची व्यसने करणारे अनेक मित्र आजूबाजूला होते, पण आपण त्यांच्यासारखे करून बघावे असे कधी वाटले नाही,उलट त्या छंदीफंदी मित्रांनी कायम मला अडचणीच्या वेळी सपोर्टच केला.पैशांची चणचण पाचवीलाच पुजलेली होती, त्यावेळी त्या गलिच्छ वस्तीतल्या इस्माईल खान या बेकरी दुकानदाराने तसेच राजू गुप्ता नावाच्या किराणा दुकानदाराने मला 

" जितना चाहे माल उधार लेके जाना, नोकरी लगेगी तब पैसा देना" असे सांगितले होते आणि स्वतःहून  मदत केली ते माझ्या बाबतीत एवढे उदार होऊन उधार द्यायला स्वतःहून का तयार झाले याचे स्पष्टीकरण मला कधीच समजले नाही! नोकरी लागल्यावर मी त्यांची उधारी चुकवली!

  पुढे एक वर्षातच मला शिक्षणाचे स्वप्न अर्धवट सोडून नोकरी शोधण्याची वेळ आली आणि मला फार तिष्ठत न ठेवता माझ्या शालांत परीक्षेच्या गुणांच्या जोरावर मला  टेलिफोन खात्यात ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली! कुणाची तरी कृपादृष्टी असल्याशिवाय अडचणीच्या प्रसंगी एकदा नाही अनेकदा मार्ग मिळणे शक्य होते का? पण, हे सत्य आहे की प्रचंड अडचणी आल्या,त्या निर्मिकाने थोडीफार परीक्षा घेतली आणि संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग मिळत गेले...कुणी याला अंधविश्वास म्हणेल,पण माझ्या सकारात्मक विचारांनी हे मार्ग माझ्यासमोर आले हा माझा ठाम विश्वास आहे....

  एकट्याच्या तुटपुंज्या पगारात समोर असलेले मोठे मोठे प्रश्न सुटणे केवळ अशक्य होते त्यामुळे आपण शक्यतो विवाह करताना कमावती मुलगी बघायची असा मी विचार करत होतो.माझ्या मनात विचार आला आणि मला हवे तसे स्थळ स्वतःहून समोर आले, लग्न व संसार उभारणी ही कामे माझ्या आर्थिक गणितात बसणे सोपे नव्हते,पण मार्ग निघत गेले... वडगाव शेरीत एका सिंगल खोलीत गांधी शेठच्या दुकानातून हप्त्यावर सगळ्या संसारोपयोगी वस्तू खरेदी केल्या आणि स्मिताचा आणि माझा संसार सुरू झाला!

लग्न ही गोष्ट माझ्या आयुष्यातली टर्निंग पॉइंट ठरली आणि एकापाठोपाठ समस्या सुटत गेल्या...

   जमीन सोडवली, दोन्ही भावांच्या मिळून  पाच  मुलींच्या लग्नाला भरीव अर्थसहाय्य केले, गावी छोटेसे घर बांधले, पुण्यात एक छोटा फ्लॅट घेतला ..

    एका बाजूला आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली तर दुसऱ्या बाजूला स्पर्धा परीक्षा देत एकामागोमाग एक प्रमोशन घेत गेलो...

 कधीतरी इंजिनिअर व्हायचं हुकलेले स्वप्न साकार झाले.

मुलगा इंजिनिअर झाला...

हे सगळ चांगलं घडत होते तरी माझ्या समोर नोकरीत व वैयक्तिक पातळीवर काही ना काही अगदी हातघाईच्या समस्या उभ्या रहात होत्याच,पण एव्हाना मला या गोष्टींची सवय झाली होती....

 सकारात्मक विचारसरणीच्या जोरावर आज मी वयाची एकसष्टी पार केली आहे आणि सध्या समाधानी सेवानिवृत्त जीवन जगतो आहे...

  समस्या आली तरी न डगमगता सारासार विवेक वापरून, सकारात्मकता ठेऊन थंड डोक्याने शक्यता पडताळून बघायच्या आणि विश्वासाने निर्णय घायचा, अपयश आले तर एक धडा म्हणून त्याकडे बघायचे आणि पुन्हा प्रयत्न करायचा! 

   फायनली यश मिळणारच आहे या सकारात्मक विचाराने यश निश्चित मिळते, हे मी आज ठामपणे सांगू शकतो ते केवळ मला आलेल्या प्रचीतीमुळे!

 माझा हा संघर्ष माझ्याच एका कवितेत...

जमले जसे....

काही असे काही तसे, जगलो असे जमले जसे,

लाचार कधी झालो नाही, स्व कधी विकला नाही,

 हात कधी पसरला नाही,पडले मनासारखे फासे,

जगलो असे जमले जसे!

गरिबीची लाज नाही,श्रीमंतीचा माज नाही,

सरळ मार्ग सोडला नाही,टाकले नाही घेतले वसे,

जगलो असे जमले जसे!

हवेत इमले बांधले नाही,मृगजळामागे धावलो नाही,

शब्दात कधी सापडलो नाही,झाले नाही कधी हसे,

जगलो असा जमले जसे!

भावनेत कधी वाहीलो नाही, वास्तव कधी सोडले नाही,

विवेकाला तोडले नाही,वागावे लागले जशास तसे,

जगलो असे जमले जसे!

वावगा कधी हट्ट नाही, तडजोडीला ना नाही,

रक्त उगा आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे,

जगलो असे जमले जसे!

काही असे काही तसे, 

जगलो असे जमले जसे!

Be Positive...

धन्यवाद....

©प्रल्हाद दुधाळ.(9423012020)