Wednesday, April 9, 2014

संवेदनशील.

                      संवेदनशील .

              हे खरे आहे की प्रत्येकाला हे जग आपल्या मनाप्रमाणे चालावे असे वाटते. मी म्हणतो तेच खरे आहे असे त्याचे ठाम मत असते पण असा विचार करताना त्याला इत्तरांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायची मात्र अजिबात गरज वाटत नाही! असा अतिरेकी विचार करणारी माणसे असंवेदनशील असतात! अशी माणसे सामान्यपणे हेकेखोरही असतात.आपल्या मनाप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे असा त्यांचा दुराग्रह असतो. या उलट संवेदनाशील माणूस प्रथम समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करतो. आपले योग्य असलेले म्हणणे समोरच्या व्यक्तीला समजाऊन सांगण्याचा व त्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न तो जरूर करतो,पण त्याच्या मनासारखेच घडायला हवे असा त्याचा अट्टाहास नसतो.अर्थात संवेदनाशील माणूस समझदार असतो व योग्य तेथे तडजोड करायची त्याची तयारी असते!
                   अशा इत्तरांच्या मनाचा सतत विचार करणाऱ्या माणसाची व्यवहारी जगात मात्र प्रचंड गोची होते! कोंडमारा होतो ! होते काय की, संवेदनाशील माणूस जगताना प्रत्येकाच्या मनाचा विचार करून निर्णय घेतो/वागतो.पण ज्याच्याशी तो असे वागतो ती व्यक्ती मात्र अनेकदा असंवेदनशील असते! कुणाच्याही मनाचा विचार करायचा असतो हे त्याचा गावीच नसते! असंवेदनशील माणूस स्वत: तर दु:खी होतोच पण आपल्या वागण्यामुळे आजूबाजूच्या विचारी माणसांना फक्त दु:खच देत रहातो.
           आजूबाजूच्या असलेल्या अशा बहुसंख्य हट्टी व दुराग्रही माणसांच्या वागण्यामुळे मुळात संवेदनाशील असलेला माणुसही काही काळानंतर निराश व्हायला लागतो. आपण सगळ्यां जगाचा विचार करतो पण आपला कोणीच विचार करत नाही असे नकारात्मक विचार तो करायला लागतो. मग तो सर्वांशीच कोरडेपणाने वागू लागतो! आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच, पण त्याबरोबरच आजूबाजूला वावरत असलेल्या माणसांच्या मनाचा विचारही आपण करायला हवा हे कर्तव्य मात्र तो सोयीस्करपणे विसरुन जातो. माणसांच्या अशा संवेदना जर बोथट होत गेल्या तर जगात सर्वत्र मनमानी होईल.
             थोडक्यात काय तर, निकोप समाज व्यवस्थेसाठी प्रत्येकाने समोरच्या माणसाच्या मनाचा विचार प्रथम करायला हवा! आपले मत लादण्या ऐवजी इत्तरांच्या मनाचा विचार व त्यांच्या योग्य मताचा आदर करायला हवा, आपल्या मनात असलेले सर्व खरेच आहे हा हेका बाजूला ठेऊन इत्तरांकडून वेगळा अधिक योग्य पर्याय समोर येऊ शकतो असाही विचार करायला शिकणे आवश्यक आहे. तेंव्हा एकदा आत्मपरीक्षण करून बघू या का? आपल्या चुकीच्या वागण्याचा कुणाला त्रास तर होत नाही ना?.
                                                                                                                                                                          ........प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment