Thursday, April 10, 2014

ओळख.

ओळख.
आपण जेंव्हा बोलत असतो त्यावेळी सतत ‘मी’पणाचा पाढा म्हणत असतो. मी कोण आहे माहीत आहे का? माझी कोणा कोणाशी ओळख आहे माहिती आहे का? मी अमक्या चा मित्र/नातेवाईक/ओळखीचा इत्यादी इत्यादी अशी आपली ओळख करून देत असतो.मला तुम्ही ओळखत नाही का? मी यांव आहे आणि मी त्यांव आहे! अशा प्रकारे माणूस आपली ओळख सांगत असतो.ही ओळख सांगताना आपण कुणीतरी स्पेशल असल्याचा अविर्भाव शब्दा शब्दात ठासून भरलेला असतो. स्वत:बद्दल व स्वकर्तुत्वा बद्दल वास्तव अभिमान जरूर असायला हवा, पण हा अभिमानाला जेंव्हा गर्वाची बाधा होते तेंव्हा माणूस हा मीपणाचा ढोल अजूनच जोरात वाजवायला लागतो! माणूस सर्वात जास्त कुणावर प्रेम करत असेल तर ते या मीपणावर! खर तर जन्माला आलेल्या प्रत्येकाची किमान एक ओळख असतेच! अगदी बेवारस म्हणून सापडलेल्या बालकाची सुध्दा “ बेवारस” अशी एक ओळख असते! प्रत्येक व्यक्ती कुणाचे तरी अपत्य असते,कुणाचेतरी नातवंड असते,कुणाचा भाऊ अथवा बहीण असते अशी अनेक सख्खी, चुलत, मावस, वा दूरची जवळची नाती या स्वरूपात तर त्याची ओळख असतेच पण त्या बरोबरच त्याचे आडनाव, धर्म,जात,पोटजात अशा वेगवेगळ्या प्रकारची त्याची ओळख जन्मापासूनच त्याला चिकटलेली असते. पुढे घराणे,व्यवसाय,उपाधी, पुरस्कार ,प्रसिद्धी अथवा कुप्रसिद्धी यामुळे सुद्धा ही ओळख अजून घट्ट होत जाते.लग्नानंतर अमक्याचा जावई वा सून,अमक्याची बायको अथवा नवरा अशी ओळखीची लांबड वाढतच जाते.समाजात ही ओळख जेवढी मोठी तेवढे त्या व्यक्तीचे नाव मोठे असे गणित मांडले जाते! वास्तव आयुष्यात ही वेगवेगळ्या पातळीवरची ओळख त्या व्यक्तीला नाव व प्रतिष्ठा मिळवूनदेत असते. त्याच्या या ओळखी मुळे समाजात त्याला मान सन्मान मिळतो असा सर्वमान्य समज आहे.आपल्या समाजातील या ओळखीमुळे जे महत्व त्याला प्राप्त झालेले असते ते महत्व दिवसेंदिवस वाढायला हवे असे त्याला वाटत रहाते या मानसिक गरजेतून मग तो मीपणाची जाहिरात जेथे संधी मिळेल तेथे करायला लागतो अशा कायम आत्मस्तुती करणाऱ्या माणसाला काही काळानंतर सगळेजण अहंकारी व्यक्ती म्हणून ओळखायला लागतात. एक नवीन प्रकारची ओळख त्याला मिळू लागते! अशा व्यक्तीला एखाद्या प्रसंगी जर त्याला अपेक्षित असलेल्या प्रकारचे महत्व दिले गेले नाही तर त्याच्या अहंकाराला ठेच लागते. तो या गोष्टीला आपला जाणीवपूर्वक केला गेलेला अपमान मानतो व याला कारणीभूत असलेल्या सबंधित व्यक्तीला आपला वैरी मानायला लागतो! त्याचा द्वेष करायला लागतो.संधी मिळेल तेथे तो याचे उट्टे काढायचा प्रयत्न करतो.
खरच अशा बेगडी ओळखीमुळे मिळालेली प्रतिष्ठा एवढी महत्वाची असते का? सत्ता संपत्ती मान संन्मान यानेच माणसाची ओळख असायला हवी का? एका आध्यात्मिक ट्रेनिंग मध्ये“तुम्ही कोण आहात?” हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. पहिल्या पाच सहा वेळा त्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तरे मिळतात. जसे - प्रथम व्यक्ती आपले नाव/आडनाव सांगते. मग कुणाचा मुलगा आहे ते सांगितले जाते.नंतर कुणाचा नातू/पणतू/बहीण/भाऊ/नातेवाईक अशी उत्तरे मिळतात. त्यापुढे धर्म जात,शिक्षण,पदव्या ,पुरस्कार,अधिकार ,नोकरी,व्यवसाय यांचा आधार घेऊन व्यक्ती स्वत:ची ओळख तेत रहाते. पण पुढे “तू खरच कोण?”या प्रश्नाला उत्तर शिल्लक रहातच नाही! त्याला आपली ओळख सहा सात वाक्यातच संपली असल्याची जाणीव होते व एकवेळ अशी येतेकी “ तू कोण आहेस?” या प्रश्नाला केवळ एकच उत्तर द्यावे लागते,ते म्हणजे “मी एक माणूस आहे!” आणि हीच त्याची खरी ओळख असते! कोणत्याही व्यक्तीची एक माणूस हीच एकमेव चिरंतन ओळख आहे! ही खरी ओळख टिकविण्याचा माणसाने खर तर आयुष्यभर प्रयत्न करायला हवा पण वास्तवात असे घडत नाही प्रतिष्ठेच्या खोटा कल्पना घेऊन आयुष्यभर तो जगत असतो,मी आणि माझे माझे म्हणत नीती-अनीती चे सगळे विधिनिषेध पायदळी तुडवून मोहापोटी सत्ता,संपत्ती गोळा करण्याचा तो आटापिटा करतो, जे मिळाले ते त्याने त्याचे समाधान होत नाही मग दिवसेंदिवस त्याची ही हाव वाढतच जाते. मोहाच्या या लाटेत तो वाहात जातो. अखंड धावत रहातोपण ज्या जगण्यासाठी हे सर्व तो करतो ते जगण मात्र राहून जात! जे मिळाले आहे त्याचा उपभोग घ्यायचं तसचं राहून जात आणि एक दिवस त्याचा शेवट होतो! जसा आला होता तसाच मोकळ्या हाताने त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागतो. एका मानसाचं मुल म्हणून त्याची प्रथम ओळख असते तर डेड बॉडी म्हणून त्याची शेवटची ओळख असते! मधल्या आयुष्यात त्याला मिळालेली ओळख त्याच्या शेवटच्या क्षणी ओळख वा वशिला लावायला कामाला येत नाही!
म्हणूनच मला वाटते आपण आता तरी स्वत:ला ओळखायला हवं, माणसासारख, माणसाशी माणुसकीने वागायला हवं सर्वांना माणसासारख वागवायला हव!
ओळख आता तरी स्वत:ला, आहेस तू एक ‘टिंब’,
महासागरातल्या विशाल, इवलासा एक ‘थेंब’!
तू रे आहेस नियतीच्या हातचे, एक ते बाहुले,
आस्तित्व इथले तुझे, ‘त्याच्या’ इशाऱ्या वरती हले!
भंगून गेली सुख शांती, ऐहिकाच्या मोहापायी,
नीती अनीती ची चाड, उरली तुला मुळी नाही,
फासे तुझे टाकतो तो निर्मिक, बैसुनिया त्या ‘तिथे’
मारू नको बढाई सांगून, मी आलो कोठून कुठे!
माझे माझे म्हणून या जगाला, कितीही तू रे सांग,
सुटते जसेच तसे हातचे म्हणताच तो ‘थांब’!
हे सगळ असंच सुचल म्हणून आपल्याला सांगितलं!
कृपया गैरसमज नको, मी कुणी अध्यात्मिक गुरु नाही!
......प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment