Monday, July 24, 2017

व्यायाम आणि आम्ही!

व्यायाम आणि आम्ही!
जन्मताच मी म्हणजे तब्बेतीने अगदी सुकट बोंबील! अगदी काटकुळ्या शरीरयष्टीचा! एकतर आईवडीलांच्या पन्नाशीतले आणि एकंदर सहा भावंडांपैकी शेवटचे अपत्य,त्यात घरात खायची मारामार आणि त्यात मला कधीच कडकडून भूक लागायची नाही त्यामुळे मी कायम बारकुंडाच राहिलो.असं म्हणतात की लहानपणी मी कधीच बाळसे धरलेच नाही! तसा लहानपणी फार आजारी पडल्याच काही आठवत नाही,पण एकदा मला आई म्हटलेलं आठवत की मी एक महीन्याचा असताना जगतो की मरतो एवढा आजारी पडलो होतो! अगदी लहानपणापासूनच मला खायला खूप कमी लागायचं!
या एकंदरीत कुपोषणाचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि मी शरीराने तोळामासाच राहिलो! खरी जन्मतारीख माहीत नसल्याने अंदाजे सहा वर्षाचा झाल्यावर शाळेत घालायला नेले तर मास्तरांनी सांगितले की हा सहा वर्षाचा वाटत नाही, त्यामुळे शाळाप्रवेश एक वर्षाने लांबला.माझ्या बरोबरीने जन्माला आलेली मुले मुली शाळेत जायला लागली मी मात्र ती मुले दुसरीत गेली तेंव्हां पहिलीत गेलो!लहानपणी माझा मैदानी खेळाकडे बिलकूल कल नव्हता! शाळेत शाररीक शिक्षणाच्या तासाला खोखो कबड्डी खेळायचो; क्वचित सुरपारंब्या व लगोरही खेळलो असेल; पण एकंदरीत बैठे खेळ, वाचन आणि भरपूर अभ्यास याच माझ्या आवडीच्या गोष्टी राहिल्या! अभ्यासात मात्र अगदी पहिली ते दहावीपर्यंत आपला पहिला नंबर असायचा त्यामुळे या पुस्तकी किड्याला कुणी कधी खेळायला जात नाही धुडगूस घालत नाही म्हणून रागावले नाही.PT च्या परीक्षेत लांब उडी, उंच उडी,दोरीवरच्या उड्या, पुलप्स हे सगळे केले पण एकतर शाळेचा हुशार मुलगा असल्याने असेल पण नापास कधी झालो नाही! आम्हाला धायगुडे नावाचे PT चे शिक्षक होते त्यांनी  विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेताना त्यांना मदतनीस म्हणून रेकॉर्ड कीपिंग चे काम माझ्यावर कायमचे सोपवून टाकले यामुळे झाले काय की अस्मादिकांचा रुबाब अजूनच वाढला!
शालेय शिक्षण चालू असताना शाळेपर्यंत अनवाणी पायाने तीनेक किलोमीटर सकाळी संध्याकाळी चालायला कमी जास्त करून उशीर होवू नये म्हणून पळायला लागायचे, हाच एक महत्वाचा व्यायाम कंपल्सरी घडायचा! शिवाय अर्धी वा चतकोर खाल्लेली भाकरी जिरवायला तो पुरेसा असायचा!
पुढच्या शिक्षणासाठी एक वर्ष घराबाहेर नातेवाईकाकडे राहिलो. मुळात लाजरा स्वभाव असल्यामुळे तिथे ताटात सुरवातीला जे काही वाढलेले असेल ते कसे तरी पोटात ढकलायचो आणि भरपूर पाणी पिवून जेवण संपायचे.पुढे स्वत: स्वयपांक करून खायला लागलो.मधला एक दोन वर्षांचा काळ सोडला तर अगदी वयाच्या पंचविशीपर्यंत मी जमले तर अन्न शिजवले आणि शिजवले तर खाल्ले अशा परिस्थितीत काढले. शाररीक तंदुरुस्तीसारखा विषय कायम ऑप्शनला टाकला गेला! कॉलेजलाअसताना सायकलवर येरवडा ते कर्वे रोडला गरवारेपर्यंत यायचो, रस्त्यात एखादा वडा सांबार किंवा टोमेटो आम्लेट खाल्ले की झाली दिवसाची पोटपूजा! त्यातच नोकरी करून शिकत असल्यामुळे
व्यायाम,खेळ असे विषय डोक्यात यायला कधी वेळच मिळाला नाही! मला वाचनाचा मात्र प्रचंड नाद लागला! जेवायला नसले तरी चालेल पण वाचायला दररोज एक आख्खे पुस्तक लागायचे! एखादे आम्लेटपाव,भाकरी आणि बेसनाची पोळी, आठवडा आठवडा माझा हा एकच चौरस आहार असायचा! ऐकायला मजा वाटेल पण एकवीस वर्षे वयाचा असताना माझे वजन होते चाळीस किलो! असे असूनही त्या वयात कोणता गंभीर आजार नाही झाला हे नशीब!
खाण्यापिण्याचे खरे नशीब उघडले ते लग्न झाल्यावर घरात अन्नपुर्णा आल्यावरच! ज्या वयात खऱ्या अर्थाने शरीराचे पालनपोषण होते त्या वयात झालेल्या कुपोषणामुळे असेल किंवा एकंदर प्रवृत्ती व प्रकृतीच तशी असल्यामुळे पोट भरण्यासाठी फार काही लागायचे नाही! आपली किरकोळ असलेली तब्बेत आता सुधारायला हवी असे आता आतून वाटायला लागले होते आणि आता हे शक्यही झाले होते. खाण्यात सकस पदार्थ वाढवले तब्बेतीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आणि त्याचा एकंदरीत परिणाम म्हणून लवकरच माझे वजन पंचावन्नच्या पुढे गेले! आता थोडे आर्थिक स्थैर्यही आले होते.बायकोही नोकरी करत होती त्यामुळे सकाळी घरातली सगळी कामे उरकून दोघानाही ऑफिसला जायला लागायचे.पहिले काही वर्षे सोडली तर पुढे प्रमोशन नंतर माझी नोकरीही दगदगीची झाली.साईट्सवर भरपूर फिरणे व्हायचे त्यामुळे व्यायाम वा खेळासाठी कधीच वेळ काढता आला नाही.यावर मी एक उपाय शोधला आणि एक व्यायामाची सायकल खरेदी केली.आता आम्ही दोघेही सकाळ संध्याकाळ ही सायकल चालवू लागलो आणि घरच्या घरी व्यायाम करू लागलो!
नव्याचे नऊ दिवस उत्साहात संपले आणि एक दिवस ही सायकल एका कोपऱ्यात धूळ खात पडली! कधी तरी आठवण झाली की त्यावरची धूळ झटकली जायची पण पुन्हा येरे माझ्या मागल्या! एक दिवस ट्रेडमिल घ्यायचं मनाने घेतलं आणि लगेच शक्ती स्पोर्ट्स मधून मैन्यूअल ट्रेड मिल घेवून आलो, आता वेळ मिळेल तेव्हा घरच्या घरी मस्त चालणे सुरू झाले! एखादे वर्ष गेले आणि गुढगे दुखायला लागले ही कसरत बंद पडली आणि त्या सायकलच्या बाजूला ही ट्रेडमिलही जावून पडली! घरात जीम केल्यावर व्यायाम आपोआप होतो हा विश्वास होता तो मात्र भंगला! मग अचानक वाटायला लागल की ही मॅन्युएल ट्रेडमिल जोर देवून चालवावी लागते म्हणून कंटाळा केला जात असावा ती जर स्वयंचलीत असती तर फार जोर न देता चालता येईल आणि गुढघेही दुखणार नाहीत! आता पुन्हा एकदा व्यायामाचे भूत अंगात संचारले आणि आधीची ट्रेडमिल बाय बॅक मधे दिली आणि नवीकोरी स्वयंचलीत ट्रेडमिल घेवून आलो.आता आमचा दोघांचा व्यायाम जोषात सुरू झाला. यावरचे स्पीडचे आकडे, हवा तसा तो बदलता येणे,किती कैलरी जळाल्या याचा आकडा दिसणे या गोष्टींमुळे रेग्युलर व्यायाम करायचा उत्साह वाढला होता.मधल्या काळात सिद्ध समाधी योगा चा कोर्स करून घेतला आणि थोडाफार योगा प्राणायाम सुध्दा शिकलो होतो त्याचीही जोड मिळाली. योगा आणि प्राणायाम चालू राहिले पण ती ट्रेडमिल चालवायचा उत्साह मात्र दीडदोन वर्षात विरून गेला! लवकरच आधीच्या ट्रेडमिलच्या जागी ही नवी ट्रेडमिलही धूळ खात पडली. मग सकाळी व संध्याकाळी फिरायला जायची आवड झाली आणि उभयता मोकळ्या हवेत फिरायला जायला लागलो! हा सगळ्यात सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे याची प्रचीती यायला लागली. मधेच कधी तरी सिझनप्रमाणे यात अनियमितता येते मधेच फिरणे बंद होते पण पुन्हा रुटीन सुरू होते! आता जमेल तेव्हा जमेल तसे फिरतो,माफक योगासने आणि प्राणायाम करतो.यातही कधीतरी अनियमितता येते; पण पुन्हा सुरुवात करतो! अजूनपर्यंत थोडा सिजनल सर्दी खोकला श्वासाचा त्रास सोडला तर कोणताही मोठा आजार झालेला नाही. वर्षभरात वजन चोपन्न पासून ते अठ्ठावन्न पर्यंत वाढते व पुन्हा आटोक्यात येते. गेली पंधरा वर्षे ना कम ना जादा!
आणि हो ती व्यायामाची सायकल आणि ट्रेडमिल मात्र मी येईल त्या किमतीला विकून टाकली आणि घरातली अडगळ कमी करून टाकलीय!
एक लक्षात आलंय तुम्ही जमेल तेव्हा जमेल तो व्यायाम कराच पण सर्वात महत्वाची गोष्ट मात्र निश्चित करायला हवी ती म्हणजे जिभेवर ताबा ठेवायला हवा! दोन वेळच्या सकस जेवणानंतर अगदी कितीही आवडीचा पदार्थ समोर आले तरी ते खाण्याचा मोह आवरायला शिकायचं,मग वजन वाढणे आणि त्यापोटी होणारे आजार जवळ फिरकणारच नाही! वाटायला अवघड पण एकदम सोप्पा व्यायाम, जिभेला शिस्त लावायची! मी आता जिभेला बऱ्यापैकी शिस्त लावलीय आता मनाला शिस्त लावतोय त्यासाठी योगा प्राणायामाच्या जोडीला ध्यानधारणाही सुरू केली आहे. आपले मानसिक आरोग्य उत्तम असले, आहार विहारावर नियंत्रण असले की कोणताही आजार तुमच्याकडे फिरकू शकत नाही असे मला वाटते!
खर आहे ना?
...... प्रल्हाद दुधाळ.(९४२३०१२०२०)

2 comments:

  1. नमस्कार ,

    आमच्या येत्या दिवाळीअंकात तुमच्या एक लेख पाहवू शकाल का? अशी विनंती. नियमावली ची लिंक आणि मागच्या दिवाळीअंकाची लिंक देत आहे.
    अभिप्राय कळवावा

    http://www.marathicultureandfestivals.com/invitation-diwali-2017

    https://issuu.com/marathicultureandfestivals/docs/diwali_ank

    धन्यवाद
    ऐश्वर्या
    Aishwarya Kokatay
    kokatayash@gmail.com

    ReplyDelete
  2. धन्यवाद! मी लवकरच एक लेख पाठवतो.

    ReplyDelete