Wednesday, July 19, 2017

स्वप्नातले घर-एक प्रवास.

स्वप्नातले घर-एक प्रवास.
  अन्न वस्र निवारा या माणसाच्या आयुष्यातल्या मुलभूत गरजा आहेत.या गरजांच्या पूर्ततेसाठी तो आयुष्यभर प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला आपल्याला चांगल्या प्रतीचे पोटभर व वेळच्या वेळी खायला मिळावे चांगले कपडे घालायला मिळावे व रहायला छानसे घर असावे असे वाटत असते आणि मग आपल्या या अपेक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून धडपड करत असतो.माझे बरेचसे आयुष्यही या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून झगडण्यात गेले.इथे मी चर्चा करणार आहे ती माझ्या मनातल्या घरापर्यंतच्या प्रवासाची! आयुष्यात फार मोठी स्वप्ने मी पाहिली नाहीत,पण ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ या शिकवणी प्रमाणे छोटी छोटी स्वप्ने मात्र पाहायचो.
    माझे वडिलोपार्जित गावाकडचे घर म्हणजे मातीच्या विटानी (भेंडा) बाधलेल्या भिंती व वर छताला  जुन्या टाईपची कौले असलेले दोन खोल्यांचे घर होते.मी पाचवीसहावीला असताना पावसाळ्यात या घराची  मागची भिंत कोसळली.आधीच या घराचे कौल्रारी छत पावसाळ्यात ठिकठिकाणी गळायचे.घरातली सगळी भांडी छतातून गळणारे पाणी गोळा करण्यासाठी कामाला यायची! पन्नासेक वर्षापुर्वी साध्या पध्द्तीने बांधलेल्या त्या घराने सेवा तरी  किती द्यायची नाही का?तर आयुष्यातले हे पहिले घर पडले आणि आमच्या कुटूंबाचे रहायचे वांधे झाले! आई वडिलांनी जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्यात आपला संसार हलवला.
     गव्हाच्या काडापासून बनलेले छप्पर,कडब्यापासून बनवलेला झोपा हे त्याचे दार,कुलुपाची गरजच नाही! तर असा हा गोठा हे माझे घर नंबर दोन! या घरात माझे सगळे बालपण गेले.रॉकेलच्या चिमणीसमोर  अभ्यास केला,हाताला येईल ते पुस्तक वाचले! या उजेडातच पहिली कविता लिहिली.याच घरात आठवीत शिकत असताना माझे पितृछत्र हरपले.मॅट्रीक झाल्यावर शिक्षणासाठी बाहेर पडलो होतो तरी सुट्टीत आईबरोबर याच घरात रहात होतो.येथेच आईने माझ्यावर चांगुलपणाचे संस्कार केले.या राच्या छताकडे बघत छोटीमोठी स्वप्ने पाहिली.नोकरी लागली लग्नही झाले तरी हेच माझे म्हणावे असे एकमेव  घर होते!
      पुढील शिक्षणासाठी पुण्याला भावाकडे आलो. भावाला नोकरीनिमित्त परदेशी जावे लागले.त्याच्या मालकीची पत्र्याच्या भिंती व छताला लाकडी पट्ट्यावर मंगलोरी कौले असलेली येरवडा भागातील नागपूर चाळ येथील दहा बाय दहाची झोपडी मला राहायला मिळाली. जवळपास सहासात वर्षे मी या झोपडीत राहीलो. येथे पत्र्याच्या भोकातून शेजारच्या झोपडीतला संसार दिसायचा! इथे राहून शिकत असतानाच नोकरी मिळाली.कंदिलासमोर बसून अभ्यास केला.नोकरी करत पदवीही मिळवली.येथेच बरेवाईट मित्र मिळाले.त्यांच्यातले चांगले गुण आत्मसात केले.माणसाने कसे असावे व कसे नसावे हे या झोपडपट्टीतल्या  घरी राहून शिकलो.जीवनात स्थैर्य मिळवण्याची स्वप्ने पहात हे घर मी सोडले आणि लग्न केले. पुढच्या स्वप्नपूर्तीसाठी कुठेतरी एखादे घरटे उभारावे लागणारच होते!
      वडगांव शेरी येथे चाळीतली एक छोटी खोली भाड्याने घेतली आणि संसार थाटला. हे माझे तसे चौथे,पण गृहस्थ्याश्रम सुरू केल्यानंतरचे भाड्याचे का होईना,पण स्वत: सजवलेले पहिले घर! आम्हा  दोघांनी  उभारलेले हे होते आमचे घरटे!लवकरच या खोलीच्या शेजारची एक डबलरूम रिकामी झाली आणि मी  माझ्या पाचव्या  घरात रहायला गेलो! या भाड्याच्या घरात असतानाच आम्ही स्वत:च्या घराचे स्वप्न बघू लागलो.नोकरीत बढतीही मिळाली.इथे असतानाच आम्हाला मुलगा झाला.त्याचे पहिले बोबडे बोल,टाकलेले पहिले पाउल हे सगळे या घराच्या साक्षीनेच झाले!
  नंतर धनकवडीवनरूम किचन फ्लॅट बुक केला,स्वत:च्या घराचे आमचे स्वप्न साकार झाले! तिनशे स्क्वेअर फुटाच्या माझ्या आयुष्यातील सहाव्या घरात मी रहायला गेलो!येथे  पाण्याचे हाल असले तरी ते घर माझे स्वत:चे होते!या घरात मुलाचा शिक्षणाचा श्रीगणेशा झाला.येथे गैरसोयी होत्या! पाच वर्षे तेथे राहून मी मार्केटयार्डमध्ये वनबेडरूमचे घर घेतले. जीवनातल्या सातव्या वास्तूत गेलो!नंतर शेजारचा ब्लॉकही  घेतला. दोन्ही एकत्र करून तेथेच रहातो आहे.ऐसपैस घर आहे पण आता येथला गोंगाट नको वाटतोय! रिटायरमेंटनंतर एखादे निवांत घर घेउ असे स्वप्न पहात असतो! पाहूया काय होतंय या स्वप्नाचे!
                        ---प्रल्हाद दुधाळ ,
                                                          ५/९, रुणवाल पार्क पुणे ४११०३७
                        (मो.- ९४२३०१२०२०)


No comments:

Post a Comment