प्रगल्भता.
साधारणपणे असे मानले जाते की माणसाचे वय
वाढले की त्याच्याकडे प्रगल्भता आलेली
असते, पण वयाप्रमाणे जे काही शहाणपण वा ज्ञान माणसाकडे येते त्याने प्रगल्भता
येईलच असे नाही! वय वाढले म्हणून किंवा एखादी उच्च पदवी घेतली म्हणून येण्याची माणसात
प्रगल्भताही आली असे होत नाही.कुणी असेही म्हणतात की एकदा दोनाचे चार हात केले की
सुखी संसारासाठी आवश्यक तेव्हढी अक्कल आपोआप येते,हा विचार तर शुध्द वेडेपणा आहे!
वयाबरोबर समजूतदारपणा वाढू शकतो पण समजूतदार माणूस आहे म्हणून तो प्रगल्भही आहे असे
मानणे धाडसाचे होईल. मुळात परिपक्वता आणि अध्यात्मिक प्रगल्भता यात प्रचंड फरक
आहे.आयुष्यात आनंदी सुखी व समाधानी असण्यासाठी माणसाकडे ही अध्यात्मिक प्रगल्भता
येणे आवश्यक आहे. आपण सहजपणे म्हणतों की मी आता प्रगल्भ आहे, पण व्यावहारिक परिपूर्णता
आणि प्रगल्भता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते. अध्यात्मिक प्रगल्भता
असणे म्हणजे नक्की काय आहे,याबद्दल कुठे कुठे वाचनात आले ते आपल्याशी शेअर करतो
आहे.
कशी असते अध्यात्मिक प्रगल्भता?
काय विशेष गुण असतात अशा प्रगल्भ माणसाकडे?
आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भता
असलेला माणूस आजुबाजूच्या लोकांमध्ये बदल व्हायची वाट न पाहता स्वत:मधे काय काय बदल व्हायला हवेत यावर विचार
आणि कृती करतो! अशी प्रगल्भता लाभलेला माणूस समोरच्या माणसांना त्यांच्यातील
गुणदोषांचसहीत सहजपणे स्वीकारतो.माणूस जसा आहे तसा स्वीकारण्याची वृत्ती असणे म्हणजे
प्रगल्भता असणे! प्रत्येक व्यक्तीचे एखाद्या बाबीबद्दल असलेलेले मत खोडून काढण्यात
आपली उर्जा वाया घालवण्यापेक्षा असा परिपक्व माणूस प्रथम हे कबूल करतो की एकाच
गोष्टीबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो! “झाले गेले विसरून जावू, नवी
सुरवात हवी!”
अशा दृष्टीकोनातून होवून गेलेल्या
गोष्टींकडे प्रगल्भ माणूस बघतो. माफ करून आणि माफी मागून जीवनात प्रगती साधता येते
यावर प्रगल्भ माणसाचा विश्वास असतो.असे विचार करणारी व्यक्ती कोणत्याही नात्यांकडून काही अपेक्षा
ठेवत नाही, तर काही घेण्यापेक्षा काही देण्यातला आनंद त्याच्यासाठी महत्वाचा असतो.प्रगल्भ
माणूस दुसऱ्यासाठी केलेल्या कोणत्याच गोष्टी दुसऱ्यासाठी केल्यात असे मानत नाही तर
जे काही केले ते स्वत:च्या आनंदासाठी केले असे तो समजतो.असा माणूस आपण फार
बुद्धिमान आहोत याची जाहिरात मुळीच करत नाही वा कुणी आपल्याला चांगले
म्हणावे,सगळ्या गोष्टींचे श्रेय मिळावे अशी अपेक्षा ठेवत नाही वा आपल्या आयुष्याची
कुणाशीही तुलना करत नाही. प्रगल्भ माणसाच्या जीवनात आत्मशांतीला सर्वोच्च स्थान
असते.आपल्या खऱ्या गरजा आणि बाळगलेल्या इच्छा यांच्यातला फरक प्रगल्भ माणसाला पक्का माहीत असतो.वेळप्रसंगी
आपल्या अशा अवास्तव इच्छांना आवर घालण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे असते. माणूस
जेंव्हा आपला आनंद भौतिक सुखांमधे न शोधता आयुष्यातल्या छोट्या मोठ्या प्रसन्न क्षणांमध्ये
शोधतो, कारणाविना जो समाधानी व आनंदी राहू लागतो तेंव्हा त्याला खऱ्या अर्थाने अध्यात्मिक
परिपक्वता आली असे म्हणता येईल.
आहात का तुम्ही अशा प्रकारचे प्रगल्भ
?
..... प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment