शिमगा...
फाल्गून पोर्णिमेच्या दिवस म्हणजे शिमग्याचा दिवस.आजकाल मात्र या सणाला होळीचा सण म्हणूनच जास्त करून ओळखले जाते.भारतीय संस्कृतीमधे प्रत्येक सणाचे असे एक खास महत्व असते. होळीच्या सणाचेही असेमहत्व आहेच.पुराणातल्या कथा पुराणात जरी ठरवले तरी होळीच्या निमित्ताने मनात साठलेल्या वाईट भावना, आपापसातले हेवेदावे, मतभेद यांचे प्रतिकात्मक दहन होळीत केले जावे, परस्पर सामजस्य वाढावे यासाठी होळी साजरी केली जात असावी.भुतकाळात अजाणतेपणी माणसाच्या मनात कोणाहीबद्द्ल राग द्वेष वा इत्तर काही भावना साठलेल्या असतील तर वर्षातून एकदा त्या व्यक्तींच्या नावाने बोंब मारून त्या भावनांचा निचरा करून मनाची स्वच्छता करण्यासाठी शिमगा साजरा करण्याची कल्पना संस्कृतीत रुजवणार्या पुर्वजांना नक्कीच मानावे लागेल. होळीत अनिष्ट गोष्टींची आहूती देवून परिसराची स्वच्छता करण्याची प्रथा रूजली असावी. सण साजरा करण्याच्या पध्द्ती काळाप्रमाणे बदलत गेल्या होळीही त्याला अपवाद नाही.शहरात अनेक प्रांतातल्या पध्दतींची आजकाल सरमिसळ झालेली दिसतेआपल्याकडे होळीच्या दिवशी होळी पुजन करून पेटवली जाते,नारळ नैवेद्य होळीला अर्पण केले जाते.दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.रात्रभर जळत असलेल्या होळीच्या भोवती बाया बापड्या पाण्याच्या घागरी ओतून होळीला शांत केले जाई. होळीच्या भोवतीच्या मातीचा मस्त चिखल व्हायचा आणि मग या चिखलाने एकमेकाला माखण्याचा खेळ रंगात यायचा.आजकाल निसर्गोपचार करताना मडबाथ दिला जातो.वर्षातून एकदा प्रथा म्हणून मडबाथ करायला लाऊन शरीरशुध्दी करून देणारी ही पध्दत आज लोप पावली असली तरी त्या प्रथेमागे असलेली कल्पना नक्कीच अचंबीत करणारी आहे.आजकाल होळीच्या दिवशीच रंग खेळले जातात.उत्तर भारतातील ही प्रथा आपल्याकडे आता रुजली आहे पण आपल्याकडे रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी! नैसर्गिक रंग एकमेकांना लावून पुढे येवू घातलेल्या उन्हाळ्यासाठी शाररीक तयारी करून घेण्याचा विचार यामागे असावा असे वाटते.आजकाल मात्र या सणांच्या निमित्ताने अनेक अनिष्ट गोष्टी घडताहेत.रंग लावण्याच्या निमित्ताने छेडाछेडीचे प्रकार होताहेत. काळे अथवा रूपेरी रंग लावून नशापाणी करून बिभत्स चाळे करत शहरातील रस्त्यांवर अनिर्बंध तरूणाई रस्त्यावर धुडगूस घालताना दिसते तेव्हा मात्र या प्रथा कुठे भरकटत चालल्या आहेत याबद्दल खेदाची भावना दाटते. बहुतेक सणावारांची कमीअधिक प्रमाणात अशीच अवस्थ्या झाली आहे. होळीच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने जगातल्या सर्व अनिष्ट प्रथा,अंधश्रद्धा, आतंकवाद, भेदाभेद यांचे उच्चाटन होवून मने स्वच्छ व्हावीत, सुसंवाद वाढून माणुसकी खोलवर रुजावी यासाठी प्रार्थना करू या!..... प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment