Tuesday, January 17, 2017

.....जामिन कुणा राहू नको !

.....जामिन कुणा राहू नको !

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको
चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलुं नको
अंगि नम्रता सदा असावी राग कुणावर धरूं नको
नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणां घेउं नको
भली भलाई कर कांहीं पण अधर्ममार्गीं शिरूं नको
मायबापांवर रुसूं नको
दूर एकला बसूं नको
व्यवहारामधिं फसूं नको
कधीं रिकामा असूं नको
परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठीं करूं नको
संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको
वर्म काढुनी शरमायाला उणें कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर्‍याचा ठेवा करुनी हेवा झटूं नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि एक चढी जगामधि थोरपणाला मिरवुं नको
हिमायतीच्या बळें गरिबगुरिबाला तूं गुरकावुं नको
दो दिवसांची जाइल सत्ता अपयश माथां घेउं नको
बहुत कर्जबाजारी हो‍उनि बोज आपुला दवडुं नको
स्‍नेह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहुं नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी तराजू तोलुं नको
गहाण कुणाचें बुडवुं नको
असल्यावर भिक मागुं नको
नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरूं नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेचि चोरि नको
दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढती पाहुं नको
उगिच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठीं करूं नको
बरी खुशामत शाहण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको
आतां तुज ही गोष्ट सांगतों सत्कर्मा ओसरूं नको
असल्या गांठीं धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटूं नको
सुविचारा कातरूं नको
सत्संगत अंतरूं नको
द्वैताला अनुसरूं नको
हरिभजना विस्मरूं नको
गावयास अनंतफंददिचे फटके मागें सरूं नको
सत्कीर्तिनौबदिचा डंका गाजे मग शंकाच नको

     अनंत फंदी यांचा हा  "फटका " आपण बऱ्याचदा रेडिओवर ऐकलेला असेल.या फटक्यात त्यांनी माणसाने कसे वागावे कसे वागू नये ते अगदी उत्तम पध्दतीने सांगितले आहे.एका ओळीत त्यांनी पुढे असेही सांगितले आहे की ..
...जामिन कुणा राहू नको!
पण समाजात रहात असताना आजच्या युगात आपण कुणाला जामिन राहायचे नाही असे कितीही ठरवले तरी शक्य होता नाही.याचे मुख्य कारण म्हणजे आपला भिडस्त स्वभाव!
   आपल्याला अनेक जीवश्च कंठश्च मित्र असतात,अनेक नातेवाईकाचे आपले अगदी घरचे/जिव्हाळ्याचे संबंध असतात.आपली संस्कृती "एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ!" असे शिकवते; त्यामुळे कधी ना कधी आपण वरीलपैकी कुणालातरी, कधी जाणतेपणी तर कधी भिडस्तपणामुळे एखाद्या कर्जासाठी वा इत्तर कारणासाठी जामिन राहतो.
    माझंही असं बऱ्याचदा झालंय.ज्यांच्या कर्जासाठी आपण जामिन राहतो त्यावेळी आपण असे गृहीत धरतो की समोरची व्यक्ती सगळी देणी वेळेत देणारच आहे, त्यामुळे सही द्यायला काय हरकत आहे?
दोन हजार साली अशाच ऑफिसातल्या अगदी जवळच्या मित्राने मला गळ घालून एका सहकारी बँकेत नेले.त्याला पन्नास हजार कर्ज घ्यायचे होते .कागदपत्रे अगोदरच तयार होती.माझ्याआधी एका बाईनीं जामिनदार म्हणून सही केलेली होती.या मित्राची नोकरी तर होतीच ,शिवाय काही जोडधंदेही तो करायचा.दररोजच्या संबंधातला हा मित्र कायम थोडाफार आर्थिक अडचणीत असायचा.तसे माझ्या माहितीत तरी त्याने कुणाचे पैसे बुडवल्याचेही ऐकिवात नव्हते, त्यामुळे त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून जामिनदार म्हणून त्याच्या त्या कर्ज प्रकरणावर मी सही केली.
     पुढे माझी बदली दुसऱ्या विभागात झाली आणि त्याच्याबरोबरच्या गाठीभेटी बंद झाल्या .नंतर त्याने दुसऱ्या उपनगरात घर खरेदी केले. त्याची बायकोही सरकारी नोकरीत आहे.चारचाकीत फिरणाऱ्या या मित्राला कधीकाळी आपण जामिनदार राहिलो होतो हे तर मी पूर्णपणे विसरून गेलो होतो, पण एक दिवस बँकेने मला पत्र पाठवून याची ठळकपणे आठवण करून दिली!
      मला बँकेची नोटीस आली होती आणि त्या नोटीशीत असे स्पष्ट लिहिले होते की “सदर कर्जदाराने कर्जच काय पण व्याजही भरले नाही!” आता त्या पन्नास हजार रुपयांचे व्याजासहित नव्वद हजार झाले  होते! नोटीशीत वसुलीसाठी चांगलाच दम भरलेला होता.खिशात पैसे नसले तर उपाशी राहील,पण कुणापुढे हात पसरणार नाही, या बाण्याचा मी, त्या नोटीशीला चांगलाच घाबरलो! त्या मित्राला फोन केला आणि बरेच काही बोललो.त्याने मला झालेल्या त्रासाबद्दल माझी माफी मागितली.एकदोन दिवसात बँकेत जाउन काय असेल ते बघून टाकतो, असा त्याने मला शब्द दिला.आठवडाभरानंतर मी पुन्हा त्याला फोन केला तर त्याने बँकेत जावून आल्याचे सांगितले आणि मी निर्धास्त झालो.
या गोष्टीलाही आता पाच वर्षे झाली.मधल्या काळात दोनचार वेळा आम्ही भेटलोही!
   काल पोस्टाच्या पेटीत एक पत्र दिसले. मी पत्र खोलले ..
  बापरे,आता पन्नास हजार रुपयांचे एक लाख पचेचाळीस हजार झाले होते. कर्जदार आणि दुसरा  जामिनदार या दोघांचेही राहण्याचे पत्ते आता बदललेले होते त्यामुळे त्यांना अशी नोटीस मिळण्याचा प्रश्नच नाही पण मी त्याच पत्त्यावर राहतोय त्यामुळे मला मात्र नोटीस बरोबर मिळालीय! त्या मित्राला नोटीस वाटस अप केलीय.बघू या काय करतोय ते!
  आज अनंत फंदी यांच्या त्या ‘फटक्या”तला एकूणेक शब्द खरा आणि आचरणात आणावा असे वाटायला लागलंय!
  अशा लोकांमुळे माणसांचा माणुसकीवरचा विश्वास उडून जाईल.
  काय मत आहे आपलं?
    ............... प्रल्हाद दुधाळ.


No comments:

Post a Comment