Monday, January 16, 2017

"मना दर्पणा" पुस्तकाची प्रस्तावना

चपराक साहित्य महोत्सव 2017 मधे अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचे प्रकाशन गुरूवार दि.19 जानेवारी 2017 रोजी होत आहे. या महोत्सवात माझ्या " मना दर्पणा" या पुस्तकाचेही प्रकाशन होत आहे.या संग्राह्य पुस्तकाला घनश्याम पाटील यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे.माझ्या एकूण पंचवीस लेखांचा हा संग्रह या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर येत आहे.माझे हे लेखन आपणास नक्की आवडेल अशी आशा आहे.आवर्जून वाचावे व संग्रही असावे अशा या पुस्तकाची आपण ऑनलाइन खरेदी करू शकता.
संपर्क..... चपराक प्रकाशन (020 24460909 )
माझा संपर्क क्रमांक.-- प्रल्हाद दुधाळ (9423012020 )

"मना दर्पणा" पुस्तकाची घनश्याम पाटील यांनी लिहिलेली प्रस्तावना खास माझ्या मित्रांसाठी....
प्रस्तावना
मानवी मन म्हणजे जणू अलीबाबाची गुहाच! या गुहेत काय काय दडवलंय हे भल्याभल्यांना कळत नाही. इतरांना सोडा पण खुद्द त्या व्यक्तिलाही माहीत नसते की आपण मनात काय काय साचवलंय. या ‘साचले’पणातूनच अनेक समस्या, प्रश्‍न उद्भवतात. म्हणूनच मन प्रवाही असायला हवं. त्यासाठी लागतो मनाचा निर्मळपणा, निरागसपणा. तोच दुर्मीळ होत चालल्याने समाजस्वास्थ्य धोक्यात आले आहे. एखादी ‘मनात’ली गोष्ट सांगितली की किती हलके हलके वाटते! तरीही अनेकजण हे ‘मणा मणा’चं ओझं अकारण सोबत वागवतात. त्यातूनच शारीरिक, मानसिक व्याधींना सामोरे जातात. आयुष्याचा अक्षरशः नरक होतो. का? तर मनातली ही घुसमट बाहेर न पडल्यानं! अशाच मनामनांचा आरसा दाखवण्याचं काम केलंय, पुण्यातील लेखक प्रल्हाद दुधाळ यांनी!
दुधाळ हे मुळात कवी आहेत. त्यामुळे संदेदनशीलता ओघाने आलीच. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. बीएसएनएल मधील नोकरी सांभाळत ते उत्तमोत्तम लिहित असतात. त्यांचा हा लेखसंग्रह प्रकाशित होत असतानाच एका कादंबरीची आणि कथासंग्रहाची त्यांची तयारी सुरू आहे. ‘लिहित्या’हातांना आणखी काय हवं? नव्याने लिहिणारे आणि मुख्य म्हणजे गुणवत्तापूर्ण लिहिणारे हे लेखक मराठी भाषेची पताका खांद्यावर घेऊन बेधुंदपणे डौलत आहेत. त्यांच्या या ‘झपाटलेपणा‘ला आपण दाद द्यायलाच हवी.
‘मना दर्पणा’ या पुस्तकात छोटे छोटे लेख आहेत. ते आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. आपले प्रबोधन करतात. मनातील संकोच, नैराश्य पळवून लावून आत्मबळ वाढवतात. आजुबाजूची सामाजिक परिस्थिती समजावून सांगतात. वर्तमानाची तटस्थपणे माहिती देतानाच भविष्याची जाणीव करून देतात. हे करताना आपला भूतकाळीही विसरू देत नाहीत. हीच तर प्रल्हाद दुधाळ यांच्या लेखणीची खासीयत आहे.
समर्थ रामदास स्वामींनी ‘मनाचे श्‍लोक’ लिहिले. तोच धागा पकडून दुधाळांनी मनाचे विवेचन केले आहे. आपल्या पहिल्याच लेखात ते म्हणतात, ‘धीर धरा रे...!’ असा सल्ला त्यांना का द्यावासा वाटतोय? तर आजच्या पिढीला धीरच धरवत नाही. सगळे काही ताबडतोब हवे. ‘आम्ही पैसा फेकतोय ना? झाले! मग आम्हाला जे हवे ते मिळायलाच हवे’ असा काहीसा उतावीळपणा अनेकात असतो. त्यांना ‘सबुरी’चा सल्ला दिलाय. सहनशीलता हरवत चाललेल्या समाजाला जीवन सुखकर करण्यासाठी थोडा धीर धरायला ते सांगत आहेत.
दुधाळांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वाचताना कुठेही कंटाळवाणे होत नाही. कोणीतरी आपल्याला वेदामृताचे डोस पाजत सुटलाय आणि आपल्याला त्यामुळे अजिर्ण होतेय असे त्यांच्याबाबत सुदैवाने घडत नाही. साध्या, सोप्या आणि संवादी भाषेत ते वाचकांशी सलगी साधतात. त्यात ‘मी कुणी फार मोठा लेखक आहे आणि सृष्टीच्या कल्याणाची जबाबदारी परमेश्‍वराने माझ्याकडेच दिलीय’ असा अहंकारी आविर्भाव नाही. त्यात सुलभता आहे. भाषा प्रासादिक आणि रसाळ आहे. अनेक ठिकाणी खुसखुशीत किस्स्यांची पेरणी केलीय. छोटीछोटी वाक्ये आहेत. त्यामुळे हे पुस्तक हातात घेतले की खाली ठेववणारच नाही. यातील अनेक घटना, प्रसंग, व्यक्ती आपल्या आजुबाजूला आहेत, आपल्यात आहेत असे वाटू लागते. मग विचारांच्या पातळीवर आपण बरीच पुढची मजल गाठतो आणि स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा ‘माणूस’ म्हणून विचार करू लागतो.
दुधाळ म्हणातात, ‘आपणच आपले वैरी...’ स्वतःच स्वतःशी शत्रूत्व घेणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. असे होऊ शकते का? आपण आपल्याशी वैर धरावे? कशासाठी? आणि ते कधी संपणार? पण घडतंय खरं असं! तटस्थपणे विचार केल्यास दुधाळांच्या विधानातील सत्यता पटेल. आभासी स्वप्नांमागे धावताना आपण वस्तुस्थिती स्वीकारायला तयार होत नाही आणि मग सुरू होते हव्यासांची स्पर्धा... या स्पर्धेने आपण मेटाकुटीला येतो, जिकिरीला येतो, काहीवेळा नैराश्याकडेही जातो पण सुखी आणि समाधानी जीवनाचा राजमार्ग खुल्या मनाने पाहतच नाही... हा दोष कुणाचा? मोठी स्वप्ने अवश्य पहावीत. ती पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्नशीलही असावे, पण नशिबाला दोष देत निराशेच्या गर्तेत जाण्याऐवजी, कुणाच्या मागे पळण्याऐवजी आपण आपला मार्ग सजगतेने चोखंदळायला हवा. मनाचे दरवाजे उघडण्याचा मार्ग प्रल्हाद दुधाळ यांनी या पुस्तकाद्वारे दाखवलाय.
सध्या एक होतंय, अनेक दहशतवादी संघटना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांची जबाबदारी घेण्यासाठी धडपडत असतात. त्यातून त्यांना राजकारण साधायचे असते. समाजाला वेठीस धरायचे असते. मात्र सामान्य माणूस फक्त जबाबदार्‍या झटकायचा प्रयत्न करत असतो. ‘नकोच ती कटकट’ म्हणून ‘मी नाही त्यातला’ हे सूत्र तो अवलंबतो. स्वतःच्या अपयशाचे खापर कुणावर तरी फोडले की झाले! हजार पळवाटा तयारच असतात. म्हणून दुधाळ म्हणतात, यशस्वी व्हायचे असेल तर जबाबदारी घ्यायला शिका. ‘मी जबाबदार आहे’ हा मूलमंत्र त्यांनी वाचकांना दिलाय. दुसर्‍याकडे बोट दाखविण्याऐवजी आधी स्वतःकडे पहावे यासाठी त्यांनी काही चिंतनसूत्रे दिली आहेत. आपल्यावरील परिस्थितीला आपणच जबाबदार कसे असतो याची दहा कारणेच त्यांनी या लेखात दिलीत. ती मुळातून आणि गंभीरपणे वाचायला हवीत.
आपला देश कृषीप्रधान आहे. मग आपल्या शेतीची अवस्था नक्की कशी आहे. ‘वडिलोपार्जित शेती’ बिल्डरांच्या घशात घालताना पैशाच्या मागे लागून आपण नक्की कोणता करंटेपणा करतोय? त्याचे भवितव्य काय असणार आहे? शेतीच्या विक्रीतून अचानक आलेल्या मोठ्या पैशाने माणसाचे काय होते? आपली परंपरागत शेती विकून आयता पैसा मिळवायची लोकांची मानसिकता कशी व का तयार होतेय, हे सगळे चिंतन त्यांनी डोळसपणे मांडले आहे. आज सर्वत्र नागरीकरण झपाट्याने होत असताना अनेक शेतकर्‍यांनी जमिनी विकून कसा पैसा केला आणि पुढे त्यांची कशी वाताहत झाली याची अनेक उदाहरणे आपण बघितलेली आहेतच. म्हणजे दीडशे एकर जमिन एखाद्या कंपनीला विकल्यानंतर आलेल्या पैशातून ‘सर्व प्रकारची’ मौजमजा केली आणि आज त्याच कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला असलेला एक दळभद्री इसमही मला माहीत आहे. दुधाळ नेमके हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. धरणीमायेचा आक्रोश त्यांनी समाजभान ठेवून प्रभावीपणे मांडलाय.
राग हा तर माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू! ‘विनाशक क्रोधभावनेने’ होत्याचे कसे नव्हते होते हेही त्यांनी डोळसपणे दाखवून दिले आहे. ‘साम, दाम, दंड, भेद असे सर्व पर्याय आपल्या वैर्‍यावर सूड उगवण्यासाठी वापरले जातात. असे करताना आपले वैयक्तिक नुकसान होत आहे हेच माणसे विसरतात. ती एकप्रकारच्या नशेत वावरत असतात’ हे सत्य दुधाळांनी अधोरेखित केले आहे. क्रोधभावना व त्यापायी होणारे मनोकायिक दुष्परिणाम टाळायचे असतील तर सारासार विवेकबुद्धी कायम जागृत असायला हवी. हे ‘जागे’ करण्याचे काम या पुस्तकातून साधले आहे.
नात्यातला सगळ्यात मोठा रोग कुठला? तर तो गैरसमज! या रोगामुळे अनेक साम्राज्ये खालसा झालीत. भाऊबंदकी होऊन मोठा रक्तपात घडलाय. अनेक मित्र पुढे कट्टर शत्रू बनलेत. गैरसमजाची लागण झाल्याने झालेल्या विनाशाची उदाहरणे कमी नाहीत. तरीही अनेकदा आपण मोकळेपणे बोलत नाही. हे स्नेहबंध जपताना कोणती काळजी घ्यावी याचा वस्तुपाठ दुधाळांनी घालून दिलाय. ते याचे काव्यात्म प्रगटीकरण करताना म्हणतात,
चुकलं चुकून काही, लगेच मागावी माफी
चुकलं कुणाचं काही, करून टाकावं माफ
बोलून टाकावं काही, खुपलेलं मनामनात
किल्मीष नकोच काही, आनंदी नातेसंबंधात...
मानवी मनाच आणि त्याच्या आनंदी, निरामय जीवनाचं सार इतक्या नेमकेपणे सांगणारे दुधाळ हे खरे संस्कृतीदूत आहेत. त्यांच्या लेखणीचा हा आविष्कार आपल्याला समृद्ध करतो.
या पुस्तकातील सर्वच लेख विचारप्रवर्तक आहेत. मात्र मला सर्वाधिक भावलेला लेख कोणता? तर, ‘नाही म्हणायला शिका!’ दुधाळांनी हा मंत्र दिला असला तरी हे काम नेमके मला कधीच जमत नाही. ‘नाही’ म्हणायला येत नसल्याने मी अनेक फटके सहन केलेत. अनेकदा उद्ध्वस्त झालोय आणि त्यातून पुन्हा पुन्हा सावरलोय. प्रांजळपणे आणि तटस्थपणे ‘नाही’ म्हणता आले असते तर मला हा ‘रिटेक‘ इतक्यावेळा द्यावा लागला नसता! पण स्वभावाला औषध नसते असे म्हणतात. दुधाळांचा हा लेख वाचून मात्र मला आता स्वतःत काही बदल निश्‍चितपणे करावेत असे गंभीरपणे वाटू लागले आहे आणि हेच दुधाळांच्या लेखणीचे यश आहे. ‘प्रस्तावनाकाराचे’ विचार जो लेखक बदलू शकतो तो वाचकांच्या मनावर गारूड घातल्याशिवाय थोडेच राहील?
‘विचारांचा गुंता’, ‘ओळख स्वतःची‘, ‘कौतुक‘, ‘आयुष्यातील चिडचिड’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’, ‘अपेक्षा’, ‘आनंदी जीवन’, ‘संवेदनशीलता’, ‘माणसाची जडणघडण’, ‘मोठ्या मनाची माणसं’, ‘अहंकार’, ‘कृतज्ञता एक जादू’, ‘मनःशांतीसाठी’, ‘व्यसनाधीन’, ‘ताणतणाव’ हे लेखही वाचनीय आहेत. महत्त्वाचे म्हणजे ‘सुसंवाद-यशस्वी विवाहाचा पाया’ आणि ‘विवाह आणि जोडीदाराची निवड’ हे लेख तर आजच्या तरूण-तरूणींनी वाचायलाच हवेत. विवाहातून एक उत्तम सहजीवन फुलताना यशस्वी आणि आदर्श संसार कसा असावा हे त्यांनी नेमकेपणे सांगितले आहे. सध्या सर्वप्रकारच्या वैचारिक स्फोटांमुळे घटस्फोटांसारखे दुर्दैवी प्रमाण वाढले असताना दुधाळांचे शब्द त्यांना चार विधायक कानगोष्टी सांगतील.
एखादे लेखन वाचून माणूस घडतो असेही मला म्हणायचे नाही. घडण्या-बिघडण्यात आपल्यावरील संस्कार, आजुबाजूचे वातावरण, साथसंगत, परिस्थिती या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात! मात्र उमेद खचू नये, उत्साह वाढावा, एकमेकांविषयी प्रेम-आदरभाव वाढीस लागावेत, चांगुलपणाची शिकवण मिळावी यासाठी असे कसदार साहित्य वाचायला हवे. कसलाही अभिनिवेष न बाळगता किंवा ‘पंडिती’खाक्या न वापरता दुधाळांनी या लेखांची मांडणी केली आहे. त्यातून हे अर्थपूर्ण गुणात्मकदृष्ट्या अव्वल असणारे पुस्तक जन्मास आले आहे. आपण वाचावे, संग्रही ठेवावे, इतरांना भेट द्यावे असे हे पुस्तक आहे. त्याबद्दल प्रल्हाद दुधाळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि भावी साहित्य साधनेस शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील
7057292092

No comments:

Post a Comment